Wednesday, April 11, 2007

रानवेडा!

कीर्र झाडी गच्च दाट,
अंधारात रातकीडा,
भयाण-भीत जंगलात
फ़िरे एक रानवेडा. - १

माती मऊ साय जणु,
काळा उभा कातळकडा,
शांत-शीत जंगलात,
फ़िरे एक रानवेडा. - २

जाई-जुई पारीजात,
बकुळाचा नाजुक सडा
जंगलात सुगंधाच्या
फ़िरे एक रानवेडा. - ३

मोहरला आंबा कधी,
कधी बहरे केवडा,
मंद-धुंद रानामधे,
फ़िरे एक रानवेडा. - ४

होत अचानक शांत,
कधी खेळवित झाडा,
वा‍र्‍यास अश्या देत साथ,
फ़िरे एक रानवेडा. - ५

निळे सांगते आकाश,
हात पसरुन भिडा,
खुणावणार्‍या क्षीतिजासाठी
फ़िरे एक रानवेडा. - ६

कधी गुलाबी थंडी,
रापला उन्हात बापुडा,
घमघमणार्‍या पावसामध्ये,
फ़िरे एक रानवेडा. - ७

उदास पायवाट कधी,
कधी खळखळे ओढा,
पाय सोडुन पाण्यात,
फ़िरे एक रानवेडा. - ८

घाली बुलबुल साद,
कधी ओरडे कवडा,
वसंताच्या कोकीळासंगे,
फ़िरे एक रानवेडा. - ९

कधी पौर्णिमेचा चंद्र,
पडे चांदण्याचा सडा,
अश्या टिपुर चांदण्यात,
फ़िरे एक रानवेडा. - १०

सौरभ वैशंपायन.

मी - एक शब्द!

वेचता वेचता कधी,
शब्द असे सांडुन जातात,
लाडे लाडे बिलगतात,
कधी मधेच भांडुन जातात. - १

शब्द कधी मधेच,
अचानक खुशीत येतात,
पाठीवरती थाप मारुन,
अलगद मला कुशीत घेतात. - २

कधी शब्द फ़ुरंगटुन,
गाल फ़ुगवुन बसतात,
अन पुढच्याच क्षणी,
निष्पाप मुलासारखे हसतात. - ३

असाच एखादा शब्द,
ओळी मधुन हरवतो,
माझ्याच मागे लपुन,
मला जग भर फ़िरवतो. - ४

नि:शब्द शांती नंतर,
शब्दांचच वादळ येतं,
विखुरलेले विचार सारे,
क्षणार्धात पोटात घेतं. - ५

उंच उंच जाउन शब्द,
उर भरुन वारा पितात
श्रावणातले पाऊस थेंब,
स्वत:हून टिपुन घेतात. - ६

शब्द कधी तलवार होतात,
शब्दच होतात माझी ढाल
शब्द कधी गाणे बनतात
ठेक्यावरती धरतात ताल. - ७

शब्द माझे स्वत:भोवती,
गिरकी घेउन फ़िरतात
ओघळणारे अश्रु बनुन,
कधी डोळ्यांमधे भरतात. - ८

-सौरभ वैशंपायन.

Tuesday, April 10, 2007

फाळणी

परवाच एका स्फोटात मेलो,
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो,
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता,
सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता. - १


स्वर्गात जाताच टिळक दिसले,
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले,
- टिळकांनी विचारले.......
काय रे, स्वातंत्र्या नंतर बदलय का काही?
म्हंटल, छे हो, सरकारच डोक ठिकाणावर नाही,
तिथुन लगबगीने सुभाषबाबु आले,
विचारु लागले खाली नेमके काय झाले? - २


मी म्हणालो,
नेताजी काय काय म्हणुन घड्तय हल्ली?
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली!
नेताजी! आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो
फक्त 'खुन' आमचं असतं आणि आझाद कश्मीर होतो! - ३


तितक्यात....
दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो,
म्हंटल 'तात्या', उभ्या जन्माचं पुण्य पावलो,
म्हणाले, सध्या तरी सगळं कसा निवांत आहे,
इथे कॉंग्रेसवाला नाही तर सगळं कस शांत आहे - ४


त्यांनाच विचारल....
तात्या, इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते काय सौ्धातुन आपल्याकडेच पाहतात!
छत्रपतिंचा विजय असो, म्हणुन चटकन हात जोडले,
पण घडल भलतच, ते माझ्यावरच ओरडले,
- काय रे? कोण्या जेम्स लेनने म्हणे बत्तमिजी केली
तुमची अक्कल, तेंव्हा सांगा कोठे चरायला गेली? - ५


मान वर करायची माझी हिंमत होत नव्हती,
आणि महाराजांची नजर माझ्या वरुन ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, आम्हाला तुमची स्वप्न कळलीच नाही,
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही.
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके सावाज हेरतात,
आणि ब्र म्हणायचा अवकाश, गाढवाचे नांगर फिरतात. - ६


सगळे ऐकुन महाराजांच्या गालचे कल्ले थरारले,
आमचं केविलवाणं जगणं बघुन डोळ्यात पाणी तरारले,
क्षणभर राजेपण विसरुन ते दु:खावेगाने थरथरले,
आणि मग आमचं असं वागणं बघुन रागाने बिथरले - ७


पाय लटपटले....
वाटल आता, कंबख्ति भरलिच म्हणुन समज,
चुकिची शिक्षा, गर्दन मारलीच म्हणुन समज,
पण न्याय-कठोर असले तरि हृदय त्यांचे 'रीते' नव्हते,
अन मेलेल्यांनाच मारायला ते 'खुर्चीतले' नेते नव्हते. - ८


म्हणाले, फक्त नाव सांग, खाली जाउन समाचार घेतो,
म्हणालो राहु द्या 'लोकशाहीत' प्रत्येकाचा विचार होतो,
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,
आणि पैसेवाला दुसर्‍यांच्या जिवाशी खेळतो. - ९


फक्त एकच काळवीट मारले!म्हणत आपले माजोरडे नाक मुरडतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो
महाराजांनी मोठ्या मुश्किलीने, डोळ्यातलं पाणी अडवल,
कळलं मला हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवल - १०


मान खाली घालुन तसाच पुढे गेलो............
अहो आश्चर्यम?? स्वर्गात मला औरंग्या भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला

जिन्हा सुध्दा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल
आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल - ११


- सौरभ वैशंपायन