Tuesday, August 3, 2010

सलाम !

मध्ये काही दिवसांपूर्वी एका अजाण पामराने "कशाला ट्रेकला जायचं? घरात स्वस्थ बसायचं सोडुन नस्ती पायपीट!" अशी मुक्ताफळं उधळली, या क्षुल्लक जीवांना आजकाल दुर्लक्षीत करायला शिकलोय मी. पण आत कुठेतरी अस्वस्थता उरतेच त्यांना गदागदा हलवुन सांगावसं वाटतं - खरच एकदा ट्रेकिंगचा अनुभव घ्या. आपण आपल्या व्यापांत इतके अडकलो असतो कि हे अनुभव सोडा त्याबद्दल आपण विचारच करत नाही. किंवा केला तरि "आपल्याला बुआ झेपणारं नाहि" असाच करतो. मला आठवतय माझ्या आयुष्यात मी "शिवशंभो युवा हा्यकर्ससोबत" पहिल्यांदा रॉकक्लायबिंगच्या एका दिवसाच्या कॅम्पला गेलो होतो. कदाचित पाचवीत असेन. अनेक वर्ष न वापरलेली दगडाची खाण होती कर्जतमधली. माझ्याहुनही २ वर्षांने लहान असलेला सुमित नावाचा एक मुलगा सर्वात पहिल्यांदा त्या ५५ - ६० फुटि पॅचला भिडला होता. कारण तो इतका लहान असुन त्याच्या भावाबरोबर हे सगळं करत असे. लोकांची भीती जावी म्हणुन सुमितलाच पाठवायचे ठरले असावे. साधारण २५-२७ फुट गेला असेल नसेल थोडं उजव्या बाजुला होण्यासाठी त्याने वर कमांड दिली - "बिलेऽऽ लुऽजऽ" साधारण अश्यावेळी फुटभर बिले लुज करुन वर येणार्‍याला जरा सुटा करतात. वरच्याकडुन काय चूक झाली ते माहित नाही पण ३०-४० फुटाचा बिले सर्रकन त्याकडुन सटकला आणि कोणाला काही कळायच्या आधी सुमित तिथुन दाण्णकन खालच्या दगडांवर येउन आदळला. मग धावाधाव झाली मिनिटभर सुमितला धड श्वासही घेता येत नव्हता. सगळे हादरले होते खास करुन माझ्यासारखे नवखे होते ते तर लटलट करायला लागले. "च्यायला? असं असेल तर आपण इथुनच मागे!" हा विचार आला पण पुढे त्याच्याच मोठ्या भावाने, अमितदादाने ते करुन दाखवलं.

अखेर लटपटत का होईना मी ती वेळ मारुन नेली. नंतर अमितदादाने विचारलं "कसं वाटलं?" म्हणालो - "वार्षिक परिक्षा झाल्यागत वाटतय!" पण मग भीडच चेपली त्याचं वेड लागलं. त्या हर्नेस, डिसेंडर्स, कॅराबिनर्स विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट कारणांसाठीच वापरल्या जाणार्‍या गाठी, बिले प्लेट हे सगळं आवडायला लागलं. रोपची गुंडाळी करुन काळजीपूर्वक ठेवणे, तंबु उभारणे, कोणाला अपघात झाल्यावर वेळेचं गांभिर्य समजुन जबाबदारी घेऊन धावपळ करण्यात वेगळीच नशा वाटायला लागली. घरी खाण्यातले माज दाखवणारा मी भुक लागल्यावर ३ टॉमेटो पोटात ढकलुन गपगुमान झोपायला शिकलो. ग्रुपमधल्या लहान मुलांची किंवा बरोबरच्या स्त्रीयांची काळजी घेणं वेळप्रसंगी आपल्याला त्रास घेऊन त्यांना रिलॅक्स करणं शिकलो.

नाही म्हणता म्हणता ८०० फुटांच्या ड्युक्सनोजचं रॅपलिंग केलं. त्या कॅंपला खुऽऽऽऽऽऽप शिकायला मिळालं. सगळ्यांची जेवणं झाल्यावर ५ मोठी पातेली घासुन हात कसे भरुन येतात तेही समजलं. त्या कॅंपमध्ये सिनिअर्सनी खरोखर आमचं रॅगिंग करावं तसं काम करुन घेतलं तेव्हा रागही आला पण ती माणसं त्यातुनच गेली होती...... इतरवेळी विकासकाका किंवा अमितदादा, संतोषदादा हे सुध्दा मागेपुढे न बघता हिच कामं करताना आधी व नंतर आम्हि बघितली होती. इथे कोणी राजा नसतो सगळे सारखे असतात. तुम्हि जितकी जबाबदारी घ्याल व ती पार पाडाल तितका अनुभव व आदर दोन्ही मिळतात आणि शपथेवर सांगतोय दैनंदिन जगात ह्याचा कुठेना कुठे फायदा होतोच.

ट्रेकिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेकडो स्वभावांची माणसं तुमच्या आयुष्यात येतात. सुरुवतीला विक्षिप्त किंवा डोक्यात जाणारी माणसं प्रत्यक्षात प्रचंड हुशार व मदत करणारी असतात तर सुरुवातीला प्रेमळ वाटणारी माणसं काम समोर आलं की कटकट करताना मी बघितली आहेत. अश्यावेळी ती वेळ कशी सांभाळायची "human resource Management" कसं करायचं कोण कुठलं काम चांगलं करतो किंवा करु शकेल? लोकांवर वेळप्रसंगी जरब कशी ठेवायची किंवा कुठल्या प्रसंगाने ताण निर्माण झाला तर तो कसा कमी करायचा हे सगळं सगळं तुम्हांला शिकता येतं.

ह्या गोष्टि कुठल्याही मॅनेजमेंट स्कुल मध्ये कदाचित हज्जारो रुपये देऊनही मिळणार नाहीत त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात आयुष्य आहे. या ट्रेक्स मध्ये अनेक जणांशी चांगली नाती जुळली. रात्री २ वाजता देखिल "SOS" चा मेसेज केल्यावर लगोलग दारात उभी राहुन पडेल ते काम करणारे जीवलग भेटले. ग्रुप मधल्या ग्रुप मध्ये अनेकांच्या आयुष्याचे साथीदार गवसले. आज त्यांची मुलं काका - मामा म्हणत "हे काय? हे असंच का? हे तसंच का? इथे आता वाघोबा येनाल?? शिवाजी महालाज इतुन आले होते??? हायला? त्यांना माझ्यासालखं लागलं नाहि तेव्हा?" असे भाबडे प्रश्न अंगावर घेताना आपण सुध्दा कधीतरी इथेच होतो आणि आपल्याजागी अमितदादा - संतोषदादा होता हे समजतं. कधी कधी उरं भरुन येतं.

पूर्ण फिरलेलं ते सुंदर चक्र बघताना समोरचा हिरवाकंच डोंगर फिकट होत जातो...... पण तो डोळ्यातल्या पाण्यामुळे कि धुक्यामुळे हे बर्‍याचदा समजत नाही.

आणि हे इतकं सगळं भरभरुन देणार्‍या भटकंतीला मी "सलाम" करण्याखेरीज काहीच करु शकत नाही! .... फार फार तर अजुन दोन पावलं त्या ठिकाणी आणून उभी करु शकतो जिथुन मी चालायला सुरुवात केली होती.

- सौरभ वैशंपायन.

Monday, August 2, 2010

पाऊस फुल्ल!

रात्री बेरात्री जोरदार पाऊस सुरु होतो, त्याच्याच आवाजाने जाग येते. मग कोसळणार्‍या सरींचा आवाज बराचवेळ झोपु देत नाही. अश्यावेळि कुशी बदलत बराच वेळ निघुन जातो ..... बाहेर पावसाचा जोर कमी होतो मग झाडावरुन, छतावरुन एकाच जागी टपटपणार्‍या थेंबांचा एका ठराविक लयीतला आवाज तेव्हढा ऐकु येत रहातो .... कुणा रुणझुण रुणझुण चालणार्‍या नाजुक पावलांगत... मग परत पेंग येऊ लागलेलीच असताना अचानक दोन - चार शब्द सुचतात, परत झोप उडते पुढचे शब्द शोधायला मन दहा दिशांना पळतं .... बर्‍याच वेळाने कदाचित चारच ओळि तयार होतात पण त्यातही मजा वाटते. चटकन बाजुचा मोबाईल उचलायचा आणि ड्राफ्ट्स मध्ये त्या चार ओळि रोमन मराठित टाईप करायच्या. पण अश्या ओळि मग हरवुन जाऊ नयेत म्हणून त्या अश्या एकत्र करायचा प्रयत्न .... उडणार्‍या कागदांवरील पेपरवेट सारखा. यापुढे २ महीने सुचतील तश्या पावसावरच्या ओळी इथे देत जाईन. हळुहळु पावसाळ्यावरिल ओळिंची मैफिल जमेल आणि मोसमातील शेवटची सर बरसून गेल्यावर "पाऊसफुल्ल" चा बोर्ड लागेल .... पुढल्या पावसाळ्यापर्यंत!

- सौरभ वैशंपायन.

=================

पाऊस तिथे बाहेर,
पाऊस माझ्या अंगणात,
चिंब ओली तू,
उभी माझ्या मनात.

=================

गुढ गाऽऽर धुके,
डोंगरावर ढगांची झुल,
हातात तुझा नाजूक हात,
त्यात अशी ही रानभूल !

=================

बाहेर रीमझीम पाऊस,
आत मोहरलेली गात्र,
जळणारा अत्तरदिवा,
सुगंधु लागलेली रात्र.

=================

हेवा वाटतो थेंबांचा,
सुदैव त्यांच्या भाली,
नभातुन निसटलेले,
उतरले तुझ्या गाली.

=================