Wednesday, February 24, 2010

किमयागार


सचिनने कसोटित सलग चौथे शतक झळकवल्यावर मागच्या पोस्ट मध्ये मी म्हणालो होतो कि "सचिनद्वेष्ट्यांनी सचिनच्या नावाने बोटे मोडणे थांबवा कारण सचिन सगळ्याच्या पलीकडे गेलाय! उगीच तुमचे ब्लडप्रेशर वाढवुन घेऊ नका. सचिन इतकं क्रिकेट खेळलाय इतकं क्रिकेट खेळलाय कि उद्या एखाद्या सामन्यात लंच नंतर नॉन स्ट्रायकर एंड ला उभं राहुन दात कोरत कोरत एखाद - दुसरी ढेकर दिली तर तीहि त्याच्या रेकॉर्डवर येईल!" सचिन ते इतकं मनावर घेईलसं वाटलं नव्हतं. आज सचिन जे काहि खेळलाय ते आधी कोणी पाहिलं नव्हतं नंतर कोणी पाहिल याची शक्यता जवळपास नाहिये. आमच्या पिढीचं भाग्य आहे कि आम्हि सचिनला "लाईव्ह" खेळताना पाहतोय! दुपारि मॅच सुरु झाली तेव्हाच बाबांना म्हणालो - "तेंडल्या आज सेंच्युरी करणार!" आणि झालेहि तसेच, फरक फक्त इतकाच होता कि ती डबल सेंच्युरि होती. हा दुपटिचा फरक सुखावणारा होता.

"तो आला... त्याने पाहिले... त्याने जिंकले!" याहुन कमी किंवा जास्त सचिनच्या आजच्या द्विशतकि खेळीचे वर्णन करता येणेच शक्य नाहिये. आजवर सचिनला ज्यांनी खेळताना बघितले असेल.... सचिनच्या प्रत्येक फटक्यावर ज्यांचा जीव वरखाली होतो त्यांना माझे म्हणणे पटेल - "सचिनने सईद अन्वरचा १९४* चा रेकॉर्ड मोडल्याच्या आनंदाचा भर ओसरल्यावर २०० होईतो श्वास अडकल्यागत झाले होते. आतुन सचिन २००....सचिन २००" इतकच ऐकु येत होतं." युसुफ पठाण व धोनी सुध्दा आज पिसाळल्यागत खेळत होते, शेवटच्या दिड ओव्हर मध्ये धोनीने अशक्य फटकेबाजी चालू केली पण आज कोणालाहि धोनीच्या सिक्स बघायच्या नव्हत्या आज त्याने ६ बॉल मध्ये ६ सिक्स मारल्या असत्या तरि त्याचे कौतुक नव्हते. आज पाहिजे होते फक्त तेंडल्याचे द्विशतक. गेली अनेक वर्ष तमाम सचिनप्रेमींची एकच खंत होती अजुन.... या बादशहाच्या खजिन्यात ODI मधले द्विशतक नाहिये. आज सचिन द्विशतक करु शकला नसता तर लाखो अतृप्त आत्म्यांच्या पिंडाला कावळा शिवला नसता. आज साऊथ आफ्रिकन खेळाडुंना वेड लागायचं बाकि होतं, सेहवाग आऊट झाल्यावर भारताची पडझड होणार असं वाटत असतानाच सचिन मधला "सच्चिन" जागा झाला व त्याने कार्तिक, पठाण आणि धोनी बरोबर साऊथ आफ्रिकेला पार झोपवले. त्सुनामी किंवा चक्रिवादळानंतर एखाद्या प्रदेशाची जी हालत होते तीच अवस्था आफ्रिकन संघाची झाली आहे, भारत सरकारने त्या बद्दल त्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली तरि कोणीहि विरोध करणार नाहि. शिवाय सगळ्यांनी BCCI ला जाहिर आवाहन केले पाहिजे कि साऊथ आफ्रिकन खेळाडुंना विमनस्क आणि बधीर अवस्थेतुन बाहेर काढायला जगातले उत्तमोत्तम मानसोपचार तज्ञ त्यांनी बोलावुन घ्यावेत. कारण आत्ता त्यांची चाचपडणारी बॅटिंग बघताना जाणवतय कि ते आजच "शिमगा" साजरा करणार. इच्छा हिच आहे कि त्यांना १५० मध्ये गुंडाळुन आपण सचिनला मोठ्ठि भेट दली पाहिजे.



क्रिकेट हा भारतीयांचा धर्म आहे आणि सचिन हा देव! सचिन पीचवर असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक फटक्यावर १०० करोड हृदये आंदोलने घेत असतात. तो नव्व्याणव वर असताना तेहतीस कोटि देव पाण्यात ठेवलेले असतात, लाखो ओंजळी त्याच्याकरता "दुआ" मागत असतात. त्याचे प्रत्येक शतक - बॉम्बस्फोटाने जखमी झालेल्या, महागाईने पिचलेल्या, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या आमच्या मनावर तात्पुरती का होईना फुंकर घालते. आणि त्याबदल्यात आम्हि त्याला फक्त "थॅंक्स" देऊ शकतो.

सचिन आता शतकांच्या शतकापासून केवळ ६ शतके दूर आहे. आणि आता तो दिवसहि दूर नाहिये हे गेल्या महिना भरातील त्याच्या खेळावरुन दिसतय. आता माझ्यासारख्या अजुन काहि अतृप्त आत्म्यांची एकच इच्छा आहे - २०११ चा वर्ल्डकप सचिनच्यासकट भारताने जिंकावा.

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, February 23, 2010

चांदणे

कपाळी चांदव्याची कोर,
डोळि शिंपिले चांदणे,
चांदण्याचे डोळे भोर,
कसे वागावे शहाणे? - १


नाहि फिकिर जगाची,
धुंदित आपुल्या रहाणे,
अजुन किती दिन असे
नशिबी दुरुन पहाणे? - २

- सौरभ वैशंपायन.

Thursday, February 18, 2010

उट्टं !



१८ फेब्रुवारी २०१०, दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाला एक डाव आणि ५८ धावांनी नमवुन भारत कसोटि क्रिकेटमध्ये क्रमांक एकवर कायम राहिला. खरतर मागच्याच नागपुर कसोटित एका डावाचा पराभव पदरात पडल्यावर भारतीय संघाच्या मनोधैर्यावर परिणाम हॊणे स्वाभाविक होते. पण त्या सामन्यात "व्हेरी व्हेरी स्पेशल" लक्ष्मण आणि "द वॉल" राहुल द्रविड हे दोघेहि नव्हते. त्यामुळे पत्याच्या बंगल्यागत सगळे ढासळले होते. पण यावेळि लक्ष्मण संघात आला आणि नुरच बदलला. इडन गार्डन आणि लक्ष्मण हा फॉर्म्युलाच विनिंग फॉर्म्युला आहे. अर्थात त्याने निराशा केली नाहि. [:-)]

एकुण सामन्यात ७ शतके झळकली. इडन गार्डन फलंदाजांसाठी नंदनवनच ठरले. सेहवाग, सचिन, धोनी आणि लक्ष्मणने नेत्रदिपक खेळ केला. तर दक्षिण आफ्रिकेकडुन पीटरसनने एक तर हाशिम अमलाने दोन्हि डावांत शतके झळकावली. काहिहि म्हणा अमलाच्या हमल्यापुढे भारतीय गोलंदाज हतबल झाले होते विशेषत: जहिर जखमी झाल्यावर सगळा भर फिरकि गोलंदाजांवर पड्ला, हरभजनने ५ विकेट्स घेत तो सार्थहि ठरवला पण दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाला हाताशी धरुन नाबद राहिलेल्या अमलाने भारताचा विजय बराच लांबवला. भारतीय संघात ऑस्ट्रेलिया प्रमाणे "killing instinct" नाहिये हे परत सिध्द झाले. सामना जिंकला हा भाग वेगळा, पण २०११ च्या विश्वचषकाचा विचार करुन भारतीय संघात आक्रामकता वाढिस लागणे गरजेचे आहे.

या सामन्यातील जमेची बाजु म्हणजे धोनीची सरस कॅप्टनशीप, जहिर - हरभजनची भेदक गोलंदाजी. भारताची चार शतके आणि द्रविडची न जाणवलेली कमतरता जी नागपुरला प्रकर्षाने जाणवली होती. सचिनबाबत म्या पामर काय बोलणार? सचिन महान आहे. सलग चार सामन्यात चार शतके?? आता सचिन द्वेष्ट्यांना एक गोष्ट सांगु इच्छितो - "सचिनच्या नावाने बोटे मोडणे थांबवा कारण सचिन सगळ्याच्या पलीकडे गेलाय! उगीच तुमचे ब्लडप्रेशर वाढवुन घेऊ नका. सचिन इतकं क्रिकेट खेळलाय इतकं क्रिकेट खेळलाय कि उद्या एखाद्या सामन्यात लंच नंतर नॉन स्ट्रायकर एंड ला उभं राहुन दात कोरत कोरत एखाद - दुसरी ढेकर दिली तर तीहि त्याच्या रेकॉर्डवर येईल!"

असो, इतका किबोर्ड बडवण्याचा उद्देश एकच - "मागच्या सामन्याचं उट्ट भारताने अखेर काढलच!"


- सौरभ वैशंपायन.

Friday, February 5, 2010

सावधान ... वणवा पेट घेत आहे.

इतिहासाची नव्या संदर्भांसकट पुनरावृत्ती होते हे ऐकले होते काहि मोजक्या घटनांत दिसले सुध्दा होते आज परत तेच दिसते आहे. हे वर्ष संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सुवर्ण मोहोत्सवी वर्ष आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु होती तेव्हा "मुंबई - बेळगाव कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" अशी घोषणा होती. अर्थात नेहरुंचा पर्यायाने कॉंग्रेसचा "मुंबई" महाराष्ट्राला द्यायला खुला विरोध होता. तगडे राजकारणी आणि मुजोर "धनानंद" महाराष्ट्राविरोधात उभे राहिले होते. महाराष्ट्राचा हा स्वभाव आहे कि तुम्हि जितका विरोध कराल जितके दडपाल तितका तो उसळतो. "केला जरी पोत बळेची खाले। ज्वाळा तरी ती वरती उफाळे॥" हिच महाराष्ट्राची आंगिक प्रवृत्ती आहे. दुर्दैवाने काहि अंशी सर्व ठिकाणी दिसतो तसा टोकाचा लाळघोटेपणा देखिल आहे - त्यावेळि यशवंतराव चव्हाण यांनी जाहिर विधान केले - "मला संयुक्त महाराष्ट्र आणि नेहरु यांच्यात निवड करायला सांगितली तर मी नेहरुंची निवड करीन, नेहरु हे महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत!" आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोच लाळघोटे पणा नेहरुंच्या पतवंडासाठी करत आहेत. "राहुल-सोनियांसाठी कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन शिवसेना - मनसे चा समाचार घेतील!" हे त्यांचे कालचे बोल आहेत. पण चालायचेच हा लाळघोटेपणा केला नाहि तर बुडाखालची खुर्ची डुगडुगते हे सगळ्या कॉंग्रेसी जनांना माहित आहे.


आज राहुल गांधी मुंबई दौ‍र्‍यासाठी येत आहे. बाळासाहेबांनी त्याला काळे झेंडे दाखवायला सांगितले आहे. जर शिवसैनिक काळे झेंडे घेउन राहुलसमोर गेले तर कायदा सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलच पण मुख्यमंत्री आणि सरकारची दिल्लीतील कॉंग्रेसच्या वर्तुळात नाचक्कि होईल. हे टाळायला ते शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अटक करत सुटले आहेत मगाशी अटक केलेल्यांची संख्या २३० सांगितली आहे. आता मजा येणार आहे, कारण जर तरीहि कोणी हरीचा लाल शेकडो शिवसैनिकांसकट काळे झेंडे फडकावत राहुलसमोर गेलाच तर नक्किच हमरीतुमरी होऊन वातावरण गरम होईल आणि मग पोलिसांचा लाठिचार्ज फार स्वाभाविक आहे ...... मग शिवसेना - मनसे, सरकार आणि अशोक चव्हाणांवर "महाराष्ट्रद्वेषी राहुलसाठी मराठी माणासावरच निंदाजनक हल्ले करतात, बघा बघा आणि हेच महाराष्ट्रावर राज्य करणार!" अशी बोंब मारायला मोकळे.


पण राडा झाला तर सामान्य माणूसच भरडला जाणार आहे.

सावधान ...... वणवा पेट घेत आहे.



- सौरभ वैशंपायन.