Wednesday, December 17, 2014

आशा

ऑक्टोबर २०१० मध्ये मी अफगाणिस्थान वरती "दुर्दम्य" म्हणून अगदिच छोटा लेख लिहीला होता. एक अफगाण मुलगा "कब्रस्तानात" ऊभा राहुन पतंग उडवण्याची "मजा" घेतोय असा तो फोटो होता. त्या फोटोचा परीणाम माझ्यावरती अजूनही असेल असं वाटलं नव्हतं. २ दिवसांपूर्वी तेच चित्र जसंच्या तसं आठवलं आणि पुढील कविता सुचत गेली.
=================


दूर जाती रक्तरेषा
ओसाडलेल्या तप्त देशा,
चालत्या कलेवरांच्या
डोळ्यात उमटे मौन भाषा ||१||

आक्रोशुनि निस्तब्ध झाल्या
खुणा थडग्यांच्या अशा,
डोळ्यातुनी अश्रु हरवले
हरवल्या रस्त्यांच्या दिशा ||२||

पाऊस आगीचा का पडावा?
का पडावी पदरी निराशा?
का भीतीने गोठुन जावी
क्षितिजावरी हसरी उषा? ||३||

बुलबुलाने बेभान गावे,
विसरुनी अडकल्या हिंस्र पाशा,
पतंगाने उंच जावे,
सोबतीला घेऊन आशा ||४||

- सौरभ वैशंपायन

Sunday, December 14, 2014

।।प्रतिभा।।


कोण अशी तू? कुठे निघालीस?
इथे कशी तू? चांदणवेळी?
चिंब कशी तू? दवात न्हालिस?
कुंतल ओले रुळती भाळी - १

अंधाराचे वसन लपेटुन
आलिस कोठुन उत्तररात्री?
प्रलय-निर्मिति, शांति - भ्रांति
घेऊन भिडलिस येऊन गात्री - २

अंधाराच्या वसनावरती
जरतारी चांदण नक्षी,
उडुगणांच्या आधाराने
भरारणारा प्रवास पक्षी - ३

थांब जराशी, निसटुन जाशी,
घेउन चुंबन दुरावशी का?
शकुंतला तू? की उर्वशी?
की यक्ष विरहिणी अभिसारिका? - ४

आवाज कसला मंजुळ मंजुळ?
पैंजण तर तू ल्याले नव्हते,
गुंगी कसली? शुद्ध हरपली
पण मधुरसांचे प्याले नव्हते - ५

कुशी बदलता डावी जराशी,
कर्णफुले तुझी खुपली अंगी
काय टोचले? पापणी उचलता
तु निजलेली मम वामांगी - ६

घेऊन जवळी तुज, मिटले डोळे,
पूर्व क्षितिजावर केशर आभा
जे घडले ते स्वप्नी राहीले
कागदावरती उरली "प्रतिभा" - ७

 - सौरभ वैशंपायन.