सध्या पुलंच "पूर्वरंग" वाचतोय. त्यात जपानच्या क्योटो या प्राचीन शहरामधील "रोयान-जी" मंदिराच्या परिसराचे वर्णन करताना पुलं लिहितात -
"उंच उंच आणि घनदाट वृक्षांच्या रायांतून चिंतन मनन करीत हिंडण्यासाठी पायवाटा काढल्या होत्या. थोडा चढ थोडा उतार, थोडे वळण, थोडे सरळ. ह्या पायवाटा माणसाला अंतर्मुख करतात. ..... असल्या पायवाटांतून पाखरांची किलबिल ऐकत, उंच वृक्षराजांच्या छत्राखाली चालताना आपल्या जोडीला फक्त सुंदर विचार चालत असतात. उपनिषदांची, आरण्यकांची महान निर्मिती असल्याच चालण्यातून झाली असावी."
पुलं आपलं बोट धरुन आपल्याला नकळत कधी कुठे घेऊन जातील हे सांगता येत नाही, या वेळीही असच झालं "ह्या पायवाटा माणसाला अंतर्मुख करतात." या वाक्यापाशी मी चार क्षण थांबलो, ते वाक्य परत वाचलं .... परत एकदा ... अजून एकदा ... असं ३ -४ वेळा ते वाक्य वाचलं. मी वाचलं म्हणण्यापेक्षा आपसूक वाचलं गेलं. खर्या गोष्टी मनापासून पटतात, आणि अनेक पटणार्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा करतो किंवा त्यांचा विचार करतो. हे वाचून बहुदा माझही तसंच झालं असावं. इतकं बरोबर क्वचित वाचायला मिळतं.
भटक्यांच्या जमातीला पुलं नेमकं काय म्हणाले ते लवकर समजेल. दूर जंगलात गुडुप होणार्या वाटांवर भटकंती करताना मनात किती आणि काय काय विचार येतात हे तो अनुभव घेतलेल्यालाच समजेल. एकदा ग्रुपपासून वेगळे होऊन जंगलात हरवलं की कितीही भिरभिरलं तरी वाट मिळत नाही, जंगलात हिंस्त्र प्राणी आहेत, सूर्य तासभरातच सायोनारा म्हणणार आहे आणि आपल्याला परतीची वाट मिळत नाहीये हे लक्षात आलं की पहिला विचार डिस्कव्हरीवरती "I Shouldn't be alive" सारख्या एखाद्या घटनेचाच येतो. वास्तविक असा विचार येण्याचं काही कारण नसतं, मग त्याची जागा घाई घेते, घाईने चुकलेली वाट अजून चुकते, परत परत त्याच जागा येत रहातात किंवा जागा वेगळ्या असल्या तरी जंगलात सगळंच सारखं वाटायला लागतं. प्रत्येक नवीन झाडापाशी आपण अगोदर येऊन गेलोय हे मत ठाम होत जातं. परत दहा मिनिटाची वेडीवाकडी उलटी वाट धरायची त्यातुन नव्याच फुटणार्या दोन- तीन वाटा, मग रॉबर्ट फ्रॉस्ट च्या "The road not Taken" कवितेतून नको त्यावेळी प्रेरणा घेऊन "I took the one less travelled by, And that has made all the difference" हे शपथेवर दुसर्या अर्थाने खरं करुन दाखवतो. या सगळ्याऽऽ नाटकात सुर्याचा अस्त झालेला असतो उरलेल्या संधीप्रकाशात बाहेर पडण्याची संधी आपण शोधत असतो. आपण नेमके कुठुन चुकलो याचं रीवाइंड - फॉरवर्ड होतं. या संपूर्ण प्रवासात मन केव्हाच घरी पोहोचलेलं असतं, डोकं त्याच जंगलात अस्ताव्यस्त फार वेगाने पळत असतं तर थकलेले पाय ओढगस्तीने पुढे पुढे जात असतात, डोळे वाट आणि येऊ शकणारे धोके यावर नाईलाजाने लक्ष ठेवुन असतात ... वास्तविक ते स्वत:ला थोडावेळ शांत मिटुन घ्यायला अधीर झालेले असतात आणि मग अच्चानक "युरेक्का" होतं आणि वाट गवसते मग सगळं कसं ओळखीचं वाटायला लागतं. मंद चंद्रप्रकाशात सुध्दा थकलेल्या पावलांना उमेद आणायला एखादे झकास गाणे सुचते. दूरचे दिवे दिसतात आणि त्यांच्या दिशेने थकलेली पावलं वेगाने पडायला सुरुवात होते.
खर्या आयुष्यातही असंच होत कि नाही??? आयुष्यात किमान एकदा वाट चुकलेल्यांना वरचं वर्णन रोजच्या आयुष्याशी नक्किच निगडित करता येईल. एका क्षणी नकळत आपण आपल्या माणसांपासून दूर जातो, चूकून किंवा मुद्दाम एखादी नवीन वाट धरतो, मग पहिल्यांदा वाटलेलं थ्रील, मग गोंधळ, मग घाई, मग चिडचिड, निराशा, त्यातुन बाहेर निघायला घेतलेले अजून चुकीचे निर्णय, एका क्षणी दुनियेला फाटा देऊन जगायची भाषा करत असताना सालं याच दुनियेत जगायचं आहे याचीही जाणीव असते, बेदरकार जगणं नाही सगळ्यांना जमत, मग आपसूक उसने मुखवटे गळून पडतात. मग नेमकं चुकलं कुठे? याचा विचार करताना वाट मिळते ... जुनीच किंवा कदाचित नविन सुध्दा. एखादं गाणं गुणगुणत पुढे जाता यावं इतपत सोपी नक्किच.
पायवाटा जंगलातल्या असोत, आयुष्यातल्या असोत किंवा वरच्या प्रमाणे एखाद्या पुस्तकातल्या सुध्दा. तुमचंच बोट पकडून तुम्हाला तुमच्याच मनात कुठेतरी खोऽऽल अगदी आतवर घेऊन जातात. आता हे लिहिताना मी सुध्दा अशीच मनातली पाऊलवाट चालतोय ..... तुम्हीही कदाचित चालायला लागला असाल ... keep walking!!!
- सौरभ वैशंपायन.