Tuesday, June 17, 2014

वर्षाऋतु


सीताहरण झाल्यावर तिचा शोध घेता घेता श्रीराम - लक्ष्मण माल्यवान पर्वतावर पोहोचले. याच दरम्यान वर्षाऋतु सुरु झाला. आद्य कवि वाल्मीकिंना देखिल रामाच्या मुखातुन वर्षाऋतुचे कौतुक लक्ष्मणाला ऐकवण्याचा मोह आवरला नाही. वर्षाऋतुचे तोंड भरुन कौतुक करताना देखिल रामाला सीतेचा विरह जाणवतो आहे.

===============

जणू आसन्नप्रसवा गर्भधारिणी,
मार्ग क्रमती मंदगामिनी,
धारण करुनी गर्भि जलाशय
तनु अलंकारली सौदामिनी ।।१।।

नभ उतरले गिरिशिखरावर,
पाय-या जणू या सौमित्रा,
चढुन जावे क्षणिक झरझर
बलाकमाला द्यावी मित्रा ।।२।।

भरुन ओंजळ घ्यावी ज्याची,
गंध केतकी असा चिंब अन्
माखुन घ्यावा गंध मातीचा,
घमघमुन जावे कुटीर अंगण ।।३।।

लगडुन आले थेंब बिलोरी,
झुकुन गेला तो जांभुळ बघ,
मागला निसटला झाडावरुनी,
रंग तयाचे किती मोज बघ ।।४।।

केकारव करती मोर आम्रवनी,
उडती चक्रवाक अन् बगळे,
हिरव्या गार तृण शालीवर,
इंद्रगोपांची लाल ठिगळे ।।५।।

माल्यवान गेला मदात झिंगुन,
सृजनास लागते काय आणखि?
धरणीच्या तापल्या श्वासासारखि
जळत असेल जानकी, हाय! मम सखि ।।७।।

- सौरभ वैशंपायन

Monday, June 9, 2014

बाहुली

सुखदेव - भगतसिंगांबाबत एक छान "दंतकथा" सांगितली जाते की, त्यांनी काहि कुटुंबांना रावीच्या महापुरात उड्या घालून वाचवले होते. एका कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यावरती त्यातली एक लहान मुलगी खूप रडून गोंधळ घालू लागली सारखी पाण्याच्या दिशेने धावू लागली. काही केल्या ती गप्प होईन ना. मग भगतसिंगांना समजले की ज्या घरातून त्यांना वाचवले तिथे त्या छोटिची बाहुली राहिली आहे. तिचं रडणं न बघवून त्या दोघांनी पुन्हा पुराच्या पाण्यात उडि मारली आणि ती बाहुली आणून दिली. चिखलाने बरबटलेली बाहुली बघून देखिल ती मुलगी हसली व चिखलाने माखलेली ती बाहुली तीने घट्ट कवटाळली. ते बघून सुखदेव - भगतसिंगांना क्षणभर वाटून गेलं की एका निर्जीव बाहुलीसाठी इतका जीव टाकते आणि आपण आपल्या मातृभूमीसाठी काहितरी केलं पाहिजे. ही दंतकथा आहे हे माहित असून त्यावर कविता कराविशी वाटली.
= = = = = = = = = = = = = = = = = = = =

ध्रोंकार करत मग अशी निघाली रावी,
तोफेतून बारुद जशी फुटावी,
ओढ तीज अनिवार वाहिला ऊत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥१॥

सरसरत अंतर कापत पाणी गहिरे,
लोटित पाणी मागे, चुकवित भवरे,
दो तीरावरती जन अचिंबित होत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥२॥

वादळवार्‍या समोर जणू चिमुकले घरटे,
तसे उधाण पाण्यामधले गाठले घर ते,
जणू तुफानाशी लढू लागली ज्योत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥३॥

दिसली कोपर्‍यात बाहुली निवांत निजलेली,
चिखलात माखली पाण्यात चिंब भिजलेली,
घेऊन प्राण सानुलीचा परतले दूत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥४॥

धावली चिमुकली पाहताच बाहुली,
कवटाळली उराशी जणू ही तिची माऊली,
का रे मम देशासाठी जीव असा न होत?
तत्क्षणी शहारुन आले मायचे पूत॥५॥

 - सौरभ वैशंपायन