Wednesday, October 22, 2008

पालपुराण!

ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ असे ओरडुन तीने मला घट्ट मिठी मारली. मला नक्कि काय झाले ते समजले नाहि, पण लग्गेच फिल्म मध्ये दाखवतात तसे बासरीचे प्रसन्न background music कानात आपसुक वाजायला सुरुवात झाली. मुळात काय झाले हेच माहित नसल्याने तीने ती मिठी आनंदाने, दु:खाने कि घाबरुन मारली होती हे मला कळेनासं झाल. पण सुरुवातीला तिने जो ईकारान्त स्वर काढला होता त्यावरुन घाबरुन तिने मला मिठी मारली असावी असा अंदाज मी बांधला(कारण मुली ८०% वेळा हाच स्वर वापरतात आणि हा आनंदाचा देखिल असु शकतो you never know). तिच्या मिठीतुन सुटण्याचा अज्जिबात प्रयत्न न करता मी शांतपणे विचारले “काय झाल?”, “ भिंतीवर बघ” - ती, मी म्हणालो “घड्याळ आहे! मग काय झालं?” तशी माझावर डाफरली “इडियट, उजवीकडे बघ! २-२ पाली आहेऽऽऽऽत!” मग मी उजवीकडे बघितले दोन पाली एकमेकांकडे तोड करुन भिंतीवर चिकटल्या होत्या. मध्येच एक पाल चुकचुकली पण हे चुकचुकणे समोरच्या पालीसाठी होते कि हि सुंदर कन्यका माझ्या मिठीत आल्याबद्दल होते ते मला समजले नाहि. मी तिला म्हणालो “अग घाबरतेस काय? पाल म्हणजे काय मगर आहे कि डायनॉसोरस?” तशी रडवेल्या स्वरात म्हणाली “ते बरे, त्यांची भिती तरी वाटते किळस नाहि!” तसा मी अजुनहि शांत होतो. इथे कोणाला घाई होती मिठी सोडवण्याची? पण ती मध्येच माझ्यावर ओरडली “अरे बघतोस काय? हाकलव ना त्यांना!” आणि मग लहान मुले हॉरर फिल्म बघताना डोळ्यांच्या कडेतुन किंवा बोटांच्या फटितुन बघतात तशी एका डोळ्याने ती पालींकडे बघायला लागली.

नाईलाजाने मी पालींना “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे त्यांना झेपतील असे आवाज काढुन हाकलवायचा प्रयत्न करु लागलो. हि एका डोळ्याने तो चित्तथरारक प्रसंग बघत होतीच. पण झाल उलटंच त्यातली शिशुपाल(लहान पाल) वर सरकण्याऐवजी चार बोटं खालीच सरकली तशी खसक्कन मान वळवुन “आंऽऽऽऽऽ“ असा अनुनासिक स्वर तिने काढला आणि माझ्या शर्टचा चोळामोळा करत तिने तिची पकड अजुन घट्ट केली. तिचे लक्ष नाहि असे बघुन मी हाताने पालीला “जा” ऐवजी “ये-ये” अशी खुण करु लागलो. परत मी “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे आवाज काढुन बघितले, न जाणो हिच “पाली भाषा” असायची आणि त्या आवाजांपैकी एकाचा अर्थ “खाली ये” असा असेल तर? म्हणून मी नेटाने आवाज काढणे सुरु ठेवले होते. आता मात्र ती पाल वर-वर गेली, तशी दुसरी पाल परत चुकचुकली. प्रत्येक ५ सेकंदानी ’इकडुन’ प्रश्न येत होता “गेल्या का? – गेल्या का?” . मी उत्तर न देता फक्त “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे आवाजच काढत होतो त्यावरुन त्या अजुन आहेत असे तिला आपोआप समजत होते व त्यामुळे ती जैसे थे स्थितीत उभी राहिली. व्वा! काय प्रसंग होता? पाली भिंतीला चिकटल्या होत्या आणि ती मला!

अखेर त्या दोन्हि पाली कुठल्याश्या कपाटामागे लुप्त झाल्या(बॅड लक). मी फारच जड अंत:करणाने तीला “हुं गेल्या गं!” असे सांगितले तशी मग ती दोन पावले मागे सरकली. परत-परत भिंतीच्या या टोका पासुन त्या टोकापर्यंत नजर भीरभीरवत ती बाजु झाली. मग जीवाचे असे हाल करुन वर लाडिक आवाजात “ओह सॉरीऽऽ“ असेहि म्हणाली. “मोस्ट वेलकम!” हे शब्द मी जीभेकडुन पडजीभेकडे ढकलले. “मला ना लहानपणा पासुन पालीची किळस वाटते! एकदा माझ्या अंगावर पडली होती, तेव्हापासुन पाल म्हंटलं कि ….यॅक !” असं म्हणुन तीने चेहरा शक्य तितका वाकडा केला. मी मनातल्या मनात त्या पालीची दृष्ट काढुन टाकली.

मग मला उगीच सुरसुरी आली –

मी: बर झालं ना मी बंगाली नाहिये ते?

ती: का?

मी: बंगाली असतो तर बहुदा माझे आडनाव “पाल” असते. (यावर ती खीखी करुन मनापासुन हसली.) पण मग मला सांग…

ती: काय?

मी: समजा माझे आडनाव “पाल” असते तर आत्ता तु मला मिठी मारली असती का? कि भिंतीवरची पाल आणि हा मनुष्य पाल यांच्यात गोंधळुन उभी राहिली असतीस?

ती: आता हा फालतु प्रश्न आहे, मुळात तुझे आडनाव पाल असते तर मी तुझ्याशी मैत्रीच केली नसती.(आईचा घो रेऽऽ! पोरगी स्मार्ट आहे यार, साला हा विचारच केला नव्हता!)

मी: “अगं घरात असावी एखदि पाल!”

ती: शीऽऽऽऽऽऽऽ ती कशाला?

मी: अगं म्हणजे झुरळं होत नाहित घरात (आता अजुन काय सांगणार? खर कारण म्हणजे मगाचा ऍक्शनरीप्ले होत रहावा हेच होतं)!

ती:यॅऽऽऽक, अशी पाल वगैरे असेल तर मी परत नाहि हं येणार तुझ्या घरी! त्या पालींना घराबाहेर काढ आधी.(आयला, आला का प्रॉब्लेम? समस्त पाल जमात माझ्यासाठी अडचण ठरत होती. उद्या केलं प्रपोज आणि फक्त घरात पाली आहेत म्हणुन ती नाहि म्हणाली तर?)

मी: बरं बाई! तु गेल्यावर हाकलवीन झालं समाधान?

ती गेल्यावर आधी त्या पालींना घरा बाहेर हुसकावलं(बिचार्‍यांनी माझ्या आयुष्यात काहि अतिसुंदर क्षण आणल्यावर असे करणे शुध्द कृतघ्नपणा होता हे मला समजत होतं, पण माझाहि नाईलाज होता. माझ्या लग्नानंतर नक्कि परत बोलविन या बोलीवर त्यांना बाहेर हुसकावले!) . आणि लगोलग काहि गोष्टिं ठरवुन टाकल्या – १)आम्रपाली हा चित्रपट बघायचा नाहि. २)अर्जुन रामपालचे चित्रपट बघायचे नाहित(तसहि कोण त्या ठोकळ्याला बघतोय?) ३)श्री नायपाल(कि नायपॉल? एकच ते) यांच्या पुस्तकाला कितीहि पुरस्कार मिळाले तरी ते वाचायचे नाहि ४)पाली गावात जायच नाहि, अष्टविनायकांपैकी सात जणांनाच भेट द्यायची. आणि ५)निदान “होकार” येईपर्यंत पाल अथवा पाली अश्या कुटल्याहि उच्चाराशी संबधित गोष्टिंची आपण संबध ठेवायचा नाहि.


तुर्तास इतकच!

------------------------------------------
डिस्क्लेमर: दुर्दैवाने हि घटना व यातली "ती" अजुन तरी पुर्णत: काल्पनिक आहे. हे ज्या दिवशी खरे होईल त्या दिवशी हा डिस्क्लेमर काढण्यात येईल याची आगाऊ नोंद घ्यावी.
------------------------------------------


- सौरभ वैशंपायन.

Monday, October 20, 2008

वेठबिगारी

सध्या घरात वेठबिगारीवर काम करतोय. म्हणजे दिवाळी आधीची आवराआवर!
दिवाळी टु दिवाळी काहि काम करायची असतात त्यापैकी एक म्हणजे माळा आवरणे, पलंग, मोठ्ठे लोखंडि कपाट, ह्या गोष्टि पोटात खड्डा पडेपर्यंत जोर लावुन (विनाकारण)जागेवरुन हलवायच्या असतात. चुकुन "अग जाऊदे ना! कोण कपाटं हवलुन त्याच्या मागे बघणार आहेत?" असा प्रश्न तोंडुन निघुन गेला कि "हे बघ हे मलाहि समजत तु अक्कल शिकवायची गरज नाहिये, सांगतेय ते नीमुटपणे कर, तुझ्यापेक्षा ३० पावसाळे जास्त बघितले आहेत मी, हां आता तु शिकव मला, मागच्या वर्षी देखिल हेच म्हणाला होतास, कपाटामागे किती जंजाळ आहे ते माहिती आहे का? दोन आठवड्यांपूर्वी रद्दी काढायला सांगितली होती ती तश्शीच, मित्र-मैत्रिणींच्या हमाल्या करायला सांगा एका पायावर तयार मी चुकुन काहि सांगितल तर तोंड वाकडे, आमची कींमतच नाहिये कोणाला!!!!" अशी सगळी हुकमी वाक्ये एका नजरेतुन टपाटप पडतात. म्हणुन मग काहिहि न बोलता हो हुक्म म्हणत झाडु, पोतेरी, पिशव्या, केरभरणी अशी अस्त्रे-शस्त्रे बळजबरी हाता कोंबली जातात. "अरे उंच आहेस ना? नुसता हात वर केलास तरी छतापर्यंत झाडु पोहचतो तुझा, मला मेलीला खुर्ची घ्यावी लागते!" अशी प्रस्तावना करत या गोष्टिंनी तुम्हांला एखाद्या बंदुकिप्रमाणे लोड केलं जातं.

कालहि आईने हसत-हसत चहाचा कप हातात दिला - "आज ओट्याखालची आवराआवर करायची आहे!" मी काहिहि उत्तर/रीऍक्शन/प्रतिक्रिया न देता पेपर मध्ये तोंड घातले.

आई: "अरे काय म्हणतेय मी?"

मी: "हं"

आई: "मग जरा थोबाड उघडुन करतो म्हण कि"

मी: "हं, करतो!"

आई:"हे बघ आधी पुढचे डबे काढुन इथे ठेव ओलं कापड देते डब्याची झाकणं पुसुन ठेवत जा दोन्हि कामं होतील!"

मी: "हे बघ मला ज्या गोष्टिंची अडगळ वाटेल ते मी फेकणार थांबवणार नसशील तरच ओटा डिपार्टमेंटला हात लावणार. एकतर ओटा हा फारच संवेदनशील भाग आहे घरातला. दिवसभरातुन किमान एक हजार एकशे एक वेळा पुसला जातो!"

आई: "...आणि म्हणुनच तो स्वच्छ राहतो. मेलं एक दिवस काय काम करायला सांगितलं तर अटि घालतात, आमची किंमतच कुठे आहे!"

मी: "ऑफर आपके सामने है! हां या ना?"

आई: "ठिक आहे पण मला दाखव आणि मगच टाक."

मी: "म्हणजे थोडक्यात जैसे थे?"

आई: "चहा पिऊन झाला कि लग्गेच कामाला लाग, मला नंतर तिथे स्वयंपाक करायचा आहे!" (माझ्या प्रश्नाला आईने मुरलेल्या राजकारण्या प्रमाणे "कट" मारला होता.)


भारतात बालमजुरांची वयोमर्यादा फक्त १४ असल्याचे दु:ख झालेल्या काहि क्षणांपैकी काहि क्षण गोंजारत मी कामाला सुरुवात केली. या "बायका" कॅटेगरीचं मला फाऽऽऽऽऽऽर कौतुक वाटतं. "लागेल कधीतरी" या घोषावर अनेक चित्रविचित्र किंवा त्याच त्याच गोष्टि जमा केल्या जातात. मी सामान काढलं तसं मागे उभं राहुन "हळु, तेल आहे!" किंवा "ग्लासचा बॉक्स सांभाळुन काढ. मागच्यावेळी बाबांनी त्यातला एक फोडुन झालाय ऑलरेडि!" अशी हतविर्य करणारी वाक्ये(हुकुम) "चॅलेंज" खेळल्या सारखी "मेरा एक और" करत टाकली जात होतीच.

डब्यांची पहिली रांग संपल्यावर मग अलीबाबाची खरी गुहा उघडली. रीकाम्या बरण्या, बरण्यांची झाकणे, टप्परवेअर(हा एक घाणेरडा प्रकार असतो, बायकांना जाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽम कौतुक असतं या प्रकाराचं. इतका बेक्कार प्रकार मी अजुन पाहिला नाहिये.) दुधाचे २ कुकर, चकलीचे साधारण ५ सोर्‍ये( सोर्‍येच ना?) पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी असे काहितरी काळॆ-मिठ किंवा तत्सम काहितरी हाताला लागत होते.

हे सगळं काढताना मी चेहर्‍यावर आयुष्यभराचे त्रासिक भाव आणुन "काय हे? बरण्या-बरण्या-बरण्या-बरण्या, सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये, झाकणं-झाकणं-झाकणं-झाकणं" अशी प्रत्येक गोष्टिची चारवेळा यादि करत होतो. मागुन आईने एकदा ऐकल, दोनदा ऐकलं मग आईने ऐकवलं - "बघु ना! तुझी बायको आली कि बघुच! तेव्हा तीने काहिहि केलं तरी चकार शब्द काढणार नाहिस. लिहुन ठेव!" मग मी "काहि म्हणालीस का?" असे भाव करुन परत ओट्याखाली डोकं घातलं. मग परत डोकं बाहेर काढुन आईला विचारलं - "आई!! आजीनी बाबांना असंच म्हंटल असेल का गं?" असा सरळ साधा प्रश्न केला. त्यावर आईनी "अनुल्लेखाने मारणे" हा उपाय वापरला. मला आजकाल आईची भीती वाटते काहिहि झालं तरी आई माझ्या होणार्‍या बायकोवर जाऊन पोहोचते. ती कोण आहे ते अजुन तरी मला माहित नाहि(म्हणजे तश्या मी बर्‍याच जणी आईला सुन म्हणुन ठरवुन ठेवल्या आहेत!) पण तिला जिथे असेल तिथे बर्‍याच उचक्या लागत असतील हे नक्कि!(त्यातल्या प्रत्येकिला विचारलं पाहिजे "काल तुला उचक्या लागल्या होत्या का?" म्हणजे पत्रिका वगैरे बघायला नको ना!)

असो, तर सध्या वेठबिगार म्हणुन काम करतोय, मोबदला म्हणुन दोन कप चहा, दोन वेळच जेवण आणि झोपायला थोडि जागा दिली जाते. विनोद सोडा पण आवरायला काढलेली जागा दुसर्‍या दिवशी बघुन "वा! बर झालं आवरलं. आता पुढच्या दिवाळीपर्यंत आराम!!" असा विचार येतो आणि सुटलो बाबा एकदाचा म्हणुन निश्वास टाकतो न टाकतो तोच "अरे पंखे पुसायचे आहेत आज!" असा आईचा खुऽऽऽऽऽप प्रेमळ आवाज येतो तिच्या हातात एक चहाचा वाफाळता कप असतो आणि चेहर्‍यावर "आज इतक तर कर उद्या काय करायच ते आज ठरवुन ठेवते!" अश्या आशयाचे स्मित असते. मग चहा संपवुन परत "बालमजुर" वेठबिगारीला जुंपला जातो!

- सौरभ वैशंपायन.

Friday, October 17, 2008

विक्रमादित्य११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल. “इडियट सालेऽऽ हा काय प्रश्न झाला का?? झक मारायला पत्रकार आणि क्रिडा समिक्षक झाले का?? तेंडल्या म्हणजे काय यांना म्युनसिपाल्टिचा बेजबाबदार अधिकारी वाटाला काय??” असे प्रश्न चेहर्‍यावर आपसुक आले असतील. तर काहि विघ्नसंतोषी समाजकंटक किंवा ऑस्ट्रेलियाचे कट्टर भारतीय समर्थक “सचिनने आज १३ धावा केल्या तरी बस झालं!” , “सचिन म्हातारा झालाय, सचिनला हाकला” असे म्हणत कडकडा बोटं मोडत बसले असतील.

पण “सचिन संपला” हि गोष्ट ०८-०८-२००८ किंवा ०९-०९-२००९ या दिवशी जगबुडि होणार इतकीच धादांत खोटि आहे. जेव्हा डॉन ब्रॅडमन म्हणाले “सचिन माझ्यासारखाच खेळतो!” तिथे अवघा संदेहो तुटला आहे. सचिन हा प्रत्यक्ष इश्वरी अवतार आहे या एकाच गोष्टिवर मी डोळॆ झाकुन विश्वास ठेवतो. ब्रायन लारा हा देखिल माझासाठी देव असला तरी तो गावकुसा बाहेरचा देव झाला. माझ्या देव्हार्‍यात सचिन-गावस्कर-कपिल-कुंबळे-गांगुली हे पंचायतन आहे. यातल्या शेवटच्या ३ नावांवर काहिजण हसतील देखिल पण हसोत बापडे, भारत जिंकावा म्हणुन मी व अनेकांनी केलेले अनेक नवस याच पंचायतनाने पूर्ण केले आहेत यात वाद नाहि. गावस्कर-कपिल यांना प्रत्यक्ष खेळताना पाहिल्याचं फारच अंधुक आठवतय. कपिलने विश्वचषक उचलला तेव्हा माझा जन्म देखिल झाला नव्हता. पण तरी त्यांचं देव्हार्‍यातील पारंपारीक स्थान मी हलवले नाहिये. पाकिस्तानच्या १० गड्यांना एकहाती तंबुत पाठविणार्‍या कुंबळेचा बॉल बर्‍याचदा सुतापेक्षाहि सरळ जातो हे माहित असुनहि मी त्यावर तुडुंब खुष आहे. त्याला कोणी कितिहि डिवचल तरी त्याला जे काहि सांगायच-करायचय ते तो मैदानात सिध्द करतो. सौरव गांगुलीबाबत म्हणाल तो उद्दाम आहे पण महाराजा उद्दाम वागणारच. साध्या सोज्वळ भारतीय संघाला त्यानेच “अरे” ला “का रे?” विचारायची हिंमत दिली हे कोणी नाकारु शकत नाहि. इंग्लंडला नॅटवेस्ट सीरीज जिंकल्यावर त्याने टि-शर्ट गरगरवुन फ्लिंटॉप आणि कंपनीला जी काहि म्हणुन खुन्नस दिली होती त्यासाठी मी त्याच्यावरुन १०० ग्रेग चॅपेल ओवाळुन टाकले आहेत. मध्ये त्याच्या माजोरडेपणामुळेच वर्षभर त्याला टिममधुन बाहेर ठेवलं होतं. पण पिंजर्‍यात गेला म्हणुन वाघ गवत खात नाहि हेच त्याने धडाकेबाज पुनरागमन करुन सिध्द केलं. सध्या महाराजाचं संस्थान खालसा होण्याच्या मार्गावर आहे पण तो महाराजा होता आहे आणि राहिल. तर सचिन – सौरव गांगुली किंवा कुंबळे यांना हातात कधी बॅट न पकडलेल्यांनी किंवा सोबर्सला आपणच बॅटिंग शिकवली होती अणि वॉर्नला आम्हिच चेंडु वळवायला शिकवल होतं अश्या तोर्‍यात टाकुन बोलणार्‍यांचा मला मनस्वी राग आहे. तसा तर सचिनला किंवा अनिल कुंबळेला नावे ठेवणारा प्रत्येक जण माझासाठी समाजकंटक असुन त्यांना किमान ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा द्यावी अशी एक जनहित याचिका मी न्यायालयात दाखल करायच्या विचारात आहे.

असो, तर मुळ मुद्दा ११९५३ या संख्येचा आहे. सचिन रमेश तेंडुलकर हा (देव)माणुस ब्रायन लारा नामक व्यक्ती पेक्षा फक्त १५ धावांनी मागे होता. बंगरुळ कसोटितच हा विक्रम तो मोडणार असे वाटत असताना हाय रे दैवा घात ची झाला. वैयक्तीक १३ धावांवर असताना तो बाद झाला होता. मात्र आज(१७-१०-०८) त्याने ८८ धावा ठोकत आपल्या अर्धशतकांचेहि अर्धशतक साजरे केलेच पण त्याने लाराचा ११,९५३ धावांचा विक्रम मोडला आता १२,०२७ धावांसहित तेंडुलकर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तसे बघता सचिन विक्रम करण्यासाठी कधीच मैदानात उतरत नाहि पण तो मैदानात उतरला कि किमान ५ सामन्यांमागे एखादा विक्रम त्याच्या नावावर आपोआप घडत जातो. आज फलंदाजी मधले कुठले असे विश्वविक्रम सचिनच्या नावावर उरले आहेत हा पीएच डि करण्यासारखा विषय आहे. आता त्याच्या पाठी लारा ११,९५३, ऍलन बॉर्डर ११,१७४, स्टीव वॉ १०,९२७, राहुल द्रविड १०,३४१ आणि रीकी पॉंन्टिंग १०,२३९ असे पाच जण त्यातल्या त्यात ’जवळ’ आहेत त्यापैकी लारा, बॉर्डर आणि स्टिव वॉ हे तर क्रिकेट मधुन निवृत्त झाले आहेत. आणि द्रविड-पॉन्टिंग त्यापेक्षा किमान १६०० धावांनी मागे आहेत.

१५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी त्याने वयाच्या १६व्या वर्षी कराचीत पाकिस्तान विरुध्द आपल्या कारकिर्दिची सुरुवात केली. आणि ३५ वर्षांचा सचिन आजहि भल्या-भल्यांच्या तोंडचे पाणी पळवत धावतोच आहे. आजवर त्याने ४१७ एकदिवसीय सामन्यांत एकुण ४२ शतके व ८९ अर्धशतकांसहित, ४४.३३ च्या सरसरीने १६,३६१ धावा कुटल्या आहेत. यात सर्वोच्च धावसंख्या आहे १८६* आहे. गोलंदाजीत ४४.१२ च्या सरासरीने १५७ विकेट्स मिळवल्या आहेत. १५२ कसोटी सामन्यांत एकुण ३९ शतके व ५० अर्धशतकांसहित ५४.०२ च्या सरासरीने १२,०२७ धावा काढल्या आहेत. २४८* या कसोटितील सर्वोच्च धावा आहेत.

सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि. नाहि म्हणायला टायटन कप जिंकला वानखेडेवर, पण तो अपवाद ठरला. त्याकडुन कर्णधारपद काढुन घेतले आणि परत त्याची फलंदाजी बहरली. तो नंतर गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे, धोनी यांच्या सोबत खेळाला पण त्याने कुठेहि आपण फार कोणी मोठे असल्याचे दाखवले नाहि. कर्णधार-प्रशिक्षक-निवड समिती यांच्या बरोबर त्याचे कधी वाद झाले नाहित. त्यांनी ठरवल त्या क्रमांकावर तो फलंदाजीला उतरला. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा सचिन म्हणुनच सर्वांचा आदर्श ठरला. हरभजन-सायमंड वादात तोच सर्वप्रथम हरभजनच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. वैयक्तीक आयुष्यात देखिल त्याने कधीहि वाद-विवादांना उपजु दिले नाहि. तो मध्ये सलग ३-४ सामन्यांत एकेरी धावसंख्येवर बाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे हुर्यो उडवली होती. पण सचिन खचला नाहि. खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!" आणि सचिन "परत" आला.

सचिन तेंडुलकर एक गारुड आहे. सगळ्यांना लहानपणी तेंडुलकर व्हायची स्वप्ने पडतात. सगळ्यांना सचिनची प्रसिध्दी दिसते, त्याचे मान-मरातब दिसतात, त्याची पारीतोषके, दिसतात, त्याच्या जाहिराती आणि त्याची फेरारी दिसते पण सचिनची मेहनत किती जणांना दिसते? सचिनला एका मुलाखतीत विचारले तुझ्या यशाचे रहस्य काय? त्यावर सचिन उत्तरला: “there in no shortcut to success! Hardwork is the only way!” मेहनत-मेहनत-मेहनत हिच सचिनची त्रिसुत्री आहे. विनोद कांबळीची एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे – "मागे एकदा इंग्लंड दौर्‍यावर गेले असताना सकाळी ६ वाजता भिंतीवर पलीकडुन काहितरी सतत धपऽधप असं आपटत होत, मी बघितले तर शेजारच्या खोलीत सचिन रबरी चेंडु घेऊन मॅचची तयारी करत होता!!" कदाचित बाकिचे खेळाडु व सचिन यांच्यात हा फरक आहे आणि म्हणुनच सचिन ग्रेट आहे.

सचिनने निवृत्त व्हावे असे म्हणणारे आता किमान पुढील २ सीरीजपर्यंत गप्प बसतील. तरी सचिन २०११ चा वर्ल्डकप खेळेल याबद्दल मला खात्री आहे. किंवा किमान त्याने एकदिवसीय सामन्यात ५० शतके व १०० अर्धशतके करावीत तर कसोटीत देखिल ५० शतके व ७५ अर्धशतके करावीत आणि मग वटल्यास निवृत्त व्हावे अशी "रास्त" अपेक्षा आहे. इथे त्यावर अपेक्षा लादल्या जात आहेत असे वाटेलहि पण सचिनला पुढील ३ वर्षात एकुण १९ शतके अज्जिबात कठीण नाहियेत.

आज सचिन सर्वोच्च धावा काढणारा फलंदाज झाला आहे. एक भारतीय आणि त्यातुन मराठी माणुस असे झेंडे उभारत चालल्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचे नाव आता विक्रमादित्यच ठेवायला हवे. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय या दोन मराठी दैवतांची माफी मागुन या तिसर्या दैवतासाठी मी म्हणेन – “विक्रमांचा महामेरु। भारतीय संघासी आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। “श्रीमंत” योगी॥“


- सौरभ वैशंपायन.