Thursday, November 26, 2009

तर्पण
सूर्यग्रहणाआधी जसे सूर्याला त्याचे वेध लागतात तसेच वेध गेल्या दोन दिवसांपासून सामान्य मुंबईकरांपासून ते मिडियापर्यंत सगळ्यांना लागले होते. निमित्त होते २६/११ च्या वर्षपूर्तीचे. मी ठरवलं होतं यावर नाहि लिहायचं. कारण हर तर्‍हेने हा विषय गेली वर्षभर चर्चिला गेला आहे. पण मनातली अस्वस्थता अखेर आता इथे कागदावर बाहेर पडतेच आहे. का?? माहित नाहि! पण त्या घटनेशी प्रत्येक मुंबईकराचं नात जडलय. आणि हे नातं म्हणजे नुसते भावनांचे बळे बळे काढलेले कढ नव्हेत किंवा कुणाला दाखवण्यासाठी छाती पिटुन काढलेले हेलहि नव्हेत. २६/११ ला आतुन हादरलेला मुंबईकर आत्ताशी कुठे सावरतोय. दबकत बिचकत ट्रेन मध्ये चढताना, सीएसटि, ताज इथे उभं राहताना परत परत ती खपली निघतेय. मुंबई स्पीरीट - वर्क स्पीरीट नावाच्या कुबड्यांवर मुंबई उभी राहते आहे. आणि अशीच अनंतकाल त्या कुबड्यांवर उभी राहिल. “मजबुरी का नाम मुंबई स्पीरीट!” काहिंना हे पटेल तर कोणाला अजीर्ण होईल, पण हि वस्तुस्थिती आहे. पण मजबुरी म्हणुन का होईना त्याच वर्क स्पीरीटसाठी मोठ्या मनानं टाळ्या वाजवाव्यात म्हणून नाहि नाहि म्हणताना लिहितोय.

आज सकाळी जाग आली तीच सकाळच्या टि व्ही वरील बातम्यांनी. त्यातली पत्रकार अखंड बडबडत होती मध्येच ती म्हणाली बरोबर एका वर्षापूर्वी याच ताजवर अनपेक्षीत दहशतवादि हल्ला झाला. डोक्यात सणकच गेली. अनपेक्षीत??? RAW आणि सरकारी यंत्रणांना धडधडित संदेश मिळाला होता मुंबईवर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. आणि म्हणे अनपेक्षीत हल्ला. खरी प्रश्नांची सुरुवात इथुन होते. त्या संदेशाचं काय केलत?? हा प्रश्न स्ट्रायकर सारख्या दुसर्‍या प्रश्नावर आदळतो आणि बघता बघता हजारो प्रश्न डोक्यात विखुरतात.

या ठिकाणी हल्ला कसा झाला? कोणी केला? सरकार किती छान झोपलं होत? याची चर्चा करण्यात हशील नाहि. ते सगळ्यांना माहित आहे. कौतुकाची गोष्टि अशी आहेत कि आमचं साहित्यच काम करत नव्हतं. आमच्या पोलिसांकडे असलेल्या बंदुकिंनी आपण शेवटची गोळी कधी ओकलो होतो हे आठवायचा प्रयत्न केला तर तीला आठवेच ना!!! आणि आमची “बुलेटप्रुफ जॅकेट्स?” बेसिकली ती फक्त जॅकेट्स होती कारण त्यात बुलेट थांबल्याच नाहित. किंवा असतील असतील जॅकेट बुलेटप्रुफच असतील पण कसाब आणि कंपनीच्या गोळ्यांमध्येच डिफेक्ट असेल. कुठल्या कंपनीच्या गोळ्या वापरता तेहि विचारा त्याला चौकशीत.

करकरेंनी सारखी मदत मागुन देखिल कामा हॉस्पिटलकडे मदत का पाठवली नाहि?? कि पोलिस दलाचा शिरस्ता आहे कि सहकार्‍यांनी मदत मागितली तर शपथेवर ती मिळु द्यायची नाहि?? कारण दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलित जे १६ पोलिस शहिद झाले त्यांनी सुध्दा लवकरात लवकर हॅलिकॉप्टरची मदत पाठवा असे वायरलेस वरुन सांगितले होते, मदत येते आहे हे ते किमान चार तास “ऐकत” होते. केवळ दारुगोळा संपला म्हणुन नक्षलवाद्यांनी त्या बहाद्दरांना कुत्र्याच्या मौतीने मारले. याउलट आमच्या माननिय नेत्यांना निवडणूकिच्या प्रचाराला कशी भराभर हॅलिकॉप्टर्स मिळतात हे बहुदा E=mc² पेक्षा कठिण समिकरण आहे. पुढचे प्रश्न कामटेंना कामा हॉस्पिटलपाशी कोणी जायला सांगितले? आमचे तीन मोठ्या पदावरील अधिकारी एकाच गाडित का बसले? अलम दुनियेला आग लागली तरी प्रोटोकॉल मध्ये न बसणारी गोष्ट करायची नाहि असे स्पष्ट आदेश त्यांना ट्रेनिंगमध्ये असताना हि चूक त्यांच्याकडुन का घडली? ते जबर जखमी आहेत हे कळल्यावर सुध्दा अर्धातास त्यांच्याकडे कोणीच का फिरकले नाहि? कंट्रोलरुमला करकरेंनी किमान ६ - ७ संदेश पाठवुन देखिल “करकरे कुठे होते हे मला माहित नव्हते!” असे राकेश मारीया कसे म्हणू शकतात? करकरेंचं सो कॉल्ड बुलेटप्रुफजॅकेट कसं गायब झाल? हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांच्याच स्ट्रेचरवर होतं म्हणे. मज पामराच्या डोक्यापलिकडचे प्रश्न आहेत.

या सर्व हल्ल्यात सर्वात महत्वाची बाब “नरीमन हाऊस” ज्या गोष्टिकडे सगळ्यांच सर्वात जास्त दुर्लक्ष झालं ते ठिकाण. इथे इस्त्रायली किंवा ज्यू लोकं राहतात, हे २७ तारखेपर्यंत आजुबाजुच्या इमारतीमधील लोकांनाहि महित नव्हते ते ठिकाण अतिरेक्यांनी किती अचूक टिपले हे पाहता ताज-सीएसटी-ट्रायडंट हे खरंतर फक्त “स्क्रीन सेव्हर” असावेत आणि मेन डेस्क्टॉप वेगळाच असावा हे समजतं. कॅफे लिओपोल्ड देखिल केवळ गोरी चमडि मारायची आणि मुंबई परदेशींसाठी असुरक्षित आहे हे जगाला दाखवायचं त्याने भारताच्या आर्थिक राजधानीला “डॉलर्स” मध्ये फटका बसला पाहिजे यासाठी निवडलं. बाकि ताज- ट्रायडेंट हे उच्चभ्रू तर सीएसटी आम जनतेला सैरभैर करण्यासाठी वापरलं. नरीमन हाऊस एकदा उडवलं कि आपोआप इस्त्राइल – भारत यांच्यात कटुता निर्माण होणारच हे ते ओळखुन होते. आतातर हेडली प्रकरणामुळे ज्यूंची भारतातील वसतीगृहे वा धर्मस्थळे हि “मोसादच्या” कारवायांची ठिकाणे असु शकतात हे ठरवुन त्यांवर निशाणा साधुन ते इस्त्राइलला धमकवण्याची नवी पध्दत सुरु करत आहेत.

बाकि काहिहि म्हणा, या अतिरेक्यांना आपण एखादे “मॅनेजमेंट” कॉलेज काढुन दिले पाहिजे. ज्या मास्टर माईंड ने हा कट रचला त्याला केवळ यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत कि “बाबा आमच्या व्यवस्थेत किती भगदाडे आहेत हे दाखवलस हे उपकारच होय!” या घटनेनी गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत भल्याभल्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या हिसकावुन घेतल्या. लोकांनी सगळं ऑपरेशन संपल्यावर पुढचे काहि दिवस “we want CEO not CM!” असे फलक झळकावले. लाखो रुपयांच्या मेणबत्या जाळल्या, ढिगाने गुलाबांची निर्माल्ये झाली, हे सगळं बेगडि होतं असं मी मुळीच म्हणणार नाहि उलट ती त्यावेळची स्वाभाविक प्रतिक्रियाच होती आणि ती बरोबरहि होती. पण आपला ताणून झोप काढायचा दिवस दर पाच वर्षांनी एकदा येतो. आपला CEO कोण व्हावा हे आम्हि तेव्हा ठरवत नाहि. मग ५२% झालेल्या मतदानावर आपापसात “मांडवली” करुन ते सत्तेवर बसतात. त्यांना सरकार स्थापन करायला पंधरवडा लागतो याची लाजहि वाटत नाहि. याला कारण आपणच आहोत.

आता प्रत्येकाने आपापली जबाबदारी मान्य करायची वेळ आलीये. अन्यथा शहिद झालेले १६ पोलिस आणि १ उमदा NSG कमांडो यांच बलिदान केवळ फुकट गेलं असच म्हणावं लागेल. त्यावेळि अथवा त्यानंतर समाजाने काय चुका केल्या हे बघितले पाहिजे. सोपे उदाहरण – नरीमन हाऊस! काय घडतय हे दुसर्‍यांच्या खांद्यावरुन वाकुन वाकुन बघायची सवय त्यादिवशीहि आपण जाहिर केली. तिथे नरीमन हाऊस मध्ये जे काहि सुरु होते तो तमाशा खचित नव्हता, पण गर्दि करायचा काय तो उत्साह? वा?? पोलिसांची कामं हि अशी वाढतात. एखाद्या अतिरेक्याने खिडकितुन एखादि फैर खाली चालवली असती तर गोळ्यांनी ८-१० आणि पळापळित - चेंगराचेंगरीत ८० जण मेले असते. तीच गोष्ट मिडियाची, सबसे तेज च्या नावा खाली कुठली बातमी? कशी द्यायची? काय दाखवायचं? किती दाखवायचं? याचं भानच TRP च्या घाणेरड्या स्पर्धेत मिडियाला राहिलं नव्हतं किंवा रहात नाहि हि १०१% सत्य गोष्ट आहे. कदाचित काहि पोलिस आणि एका NSG कमांडोच्या रक्ताचे डाग मिडियावर कायमचे लागले आहेत भले ते कितीहि नाकारोत. कराचित बसलेले आका जे संदेश देत होते त्यावरुन ते धडधडित समोर आलय.

या सगळ्यात अतिशय कौतुक करावं आणि पाठ थोपटावी असे काम मुंबई अग्निशमन दलाने केले. पोलिस – NSG इतकेच त्यांचे कौतुक करायला हवे जे तितकेसे झाले नाहिये. समोर केवळ मृत्यु तांडव करत असताना कुठल्याहि सुरक्षा साधनांशिवाय ताज आणि ट्रायडेंटला भिडायच हि कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आणि त्या लोकांनी सलग ७२ तास ते काम यशस्वीपणे करुन दाखवलय. नेहमीप्रमाणेच जीवापेक्षा कर्तव्याला पुढे ठेवणार्‍या त्या हिरोंची मुंबई कायमची आभारी राहिल.

एका वर्षात सुरक्षेत ज्या सुधारण्या घड्ल्या त्या स्वागतार्ह आहेतच पण त्या पुरेश्या नाहित हेहि खरयं. सीएसटि सारख्या प्रचंड गर्दिच्या ठिकाणी अजुन सुरक्षा ढिलीच आहे. आणि असं किती स्टेशन्सवर सुविधा कश्या पुरवणार हा नविन प्रश्न आहेच. कितीहि उपाय केले तरी तोकडेच ठरतील हे सत्य आहे. नव्याने फोर्स वन हि यंत्रणा स्थापन केलेली असली तरी त्याचा उपयोग व्हायला हवा आणि त्याचा ताण दुसर्‍यावर पडता कामा नये. हे सगळं यासाठी म्हणतोय कि काल पेपर मध्ये बातमी होती कि एका वर्षात जरुरिच्या शस्त्रांची खरेदि सरकारने केलीच नाहिये. फोर्स वनला AK -47 कमी पडु नयेत म्हणुन क्विक रीसपॉन्स टिम च्या “कॉम्बॅट व्हॅन” वरील AK -47 काढुन घेतल्या आहेत. मग जमेल तेव्हा शस्त्रे खरेदि केल्यावर ह्या रायफल्स परत केल्या जातील. सगळा आनंदि आनंद आहे. म्हणजे न होवो पण उद्या परत असा हल्ला झालाच तर NSG टिम येईतो कॉम्बॅट टिम काय गाडि साईडला लावुन भजन करणार??? आणि कसली क्विक रीस्पॉन्स टिम?? करकरेंनी मदत मागितल्यावर क्विक रीस्पॉन्स मिळालाच नाहि. हि टिम भलत्याच बिल्डिंगच्या छतावर मुक्काम ठोकुन होती कारण त्यांना वरिष्ठांकडुन आदेश मिळाले नव्हते. उद्या फोर्स वनचा असा बोर्‍या न वाजला म्हणजे मिळवलं.

याखेरीज साध्या साध्या बाबतीत जागरुकता येणे गरजेचे आहे. ट्रेन मध्ये ८ – १० स्टेशन नंतर एखादि बॅग हलली नसेल, व ठेवणारी व्यक्ती कोण हे समजत नसेल तर ती कोणाची आहे हा एक प्रश्न विचारायचा त्रास आपण घ्यायला हवा. पर्यटनाच्या नावाखाली अनेक महत्वाच्या वास्तुंचे फोटो कोणीहि काढतो. महत्वाच्या ठिकाणी फोटो काढण्यास सरकारने बंदि करावी. सरकारी कार्यालयांचे फोटो कोणी घेत असेल अथवा महत्वाच्या वास्तुंच्या पार्श्वभूमीवर कोणी स्वत:चे फोटो काढुन घेत असेल तर पोलिस व सामान्य जनता यांनी त्यांना हटकायला हवे. गुगल मॅप कितीहि प्रगत झाले तरी प्रत्यक्ष इमारतींचे फोटो काढल्या शिवाय अतिरेकि कुठलिहि योजना बनवत नाहित. म्हणून शक्य तिथे या गोष्टि राबवल्या पाहिजेत. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्कालि व्यवस्थापनांचे गट मुंबई अथवा महत्वाच्या शहरांतील प्रत्येक उपनगरांत तयार करवेत. त्यांचा पहिला संपर्क स्थानिक पोलिस ठाण्यांशी होईल अशी व्यवस्था करावी. याने दहशतवादि हल्ला असो वा पाऊस-भूकंप यांसारखे नैसर्गिक संकट याचा फायदा होईलच.

२६/११ जी जखम खूप खोल आहे, नाहि भरणार इतक्यात. भरुहि देऊ नका! असे अपमान धगधगत ठेवायचे असतात. विज्ञान, अध्यात्म, तत्वज्ञान आणि इतिहास हे सगळे एका नियमा बाबत एकमत दर्शवतात – चक्र नेहमी पूर्ण फिरतं. कदाचित हे चक्राच अर्धच आवर्तन असेल, पण गेल्या वर्षभरात खुद्द पाकिस्तानात लाहोर, पेशावर, कराची, इस्लामाबाद इथे जे स्फोट होत आहेत त्यावरुन चक्र त्याचं आवर्तन पुर्ण करायच्या दिशेने जातय. उरल्या आवर्तनात अजुन काय समोर येणार ते नियतीलाच ठाऊक. पण अशी वर्षश्राध्द आणि तर्पण परत न करायला लागोत हिच इच्छा!

- सौरभ वैशंपायन.

Monday, November 16, 2009

JUST DO IT!CNG - Clean ‘N’ Green! तसा नवाच ग्रुप. कोणी सुरु केला? कोणती NGO मदत करते?, काय कामं करतात? कुठे करतात? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात येतील. तर मुळात सुरुवात कशी झाली हा मुद्दा. शिवाजीपार्क मध्ये रोज येत असलेल्या एकाच्या डोक्यातली हि झकास कल्पना. आपण रोज इथे असतो. कधीकधी तर घरात कमी आणि पार्कातच जास्त पडिक असतो. अर्थात दादर – माहिम भागातल्या प्रत्येक तरुणाचं असच असतं. पार्कचा कट्टा हि हक्काची जागा असते. पण तेच पार्क कचर्‍याने भरलं असताना लोकांना चैन कसं पडतं? ह्यासाठी काहितरी आपणच सुरु केलं पाहिजे असं ठरवुन दादरमधील “मुकुल साठेनं” हा ग्रुप, नपेक्षा “प्रोजेक्ट” सुरु केलाय. मला हि कल्पना आवडली आणि मी व अजुन काहिजण मुकुलला ह्यात मदत करत आहोत. कुठलीहि NGO ह्यात आम्हाला मदत करत नाहिये, किंवा तशी अपेक्षाहि नाहि. आम्हाला इथे हवे फक्त न लाजता काम करणारे जास्तीत जास्त हात. व ह्याची जाणीव असलेले सुजाण नागरीक.

मुकुल सांगतो – “हा विचार अनेक दिवस डोक्यात होता, पण आपण हे कोणाला सांगितलं तर ते वेड्यात काढतील असं वाटायचं! पण एके दिवशी माझ्या ग्रुपसमोर मी हि कल्पना मांडली आणि सगळ्यांना पसंतहि पडली!” मुकुल आणि त्याच्या ग्रुपने एका रविवारी संपूर्ण पार्क भोवती एक चक्कर मारली. कुठे कुठे कचरा पडलाय? कुठे प्लास्टिक जास्त आहे? कचराकुंड्या कुठे आहेत? ह्या सगळ्याचा विचार केला आणि १ नोव्हेंबरला त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली देखिल. काम आणि एरिया वाढत गेला तशी कचर्‍याच्या पिशव्यांची संख्या वाढत गेली. पहिल्याच रविवारी पार्कातल्या एका कोपर्‍यातुन १२ पिशव्या प्लास्टिक निघाले यात होती मुख्यता गुटख्याची पाकिटे. खालोखाल होते चहा – कॉफिचे प्लास्टिक ग्लास, मग वेफर्स ची पाकिटे, चॉकलेट रॅपर्स वगैरे वगैरे. ८ तारखेच्या रविवारी आम्ही १४ पिशव्या प्लॅटिक जमा करुन ते कचर्‍यात टाकले. कालच्या रविवारी पार्कात कुठल्यातरी सत्संगाच्या निमित्ताने गर्दि असल्याने फक्त ७ पिशव्याच झाल्या पण हेहि नसे थोडके.

कालचा महत्वाचा मुद्दा – एका जॉगिंग करणार्‍या व्यक्तीने स्वत: थांबुन आजुबाजुला पडलेल्या चार सहा प्लॅस्टिकच्या पिशव्या पटापटा गोळा करुन आमच्या पिशवीत टाकल्या आणि परत जॉगिंगला निघुनहि गेला. हे असं झालं कि थोडं समाधान वाटतं, कदाचित आमच्यासारखाच पार्कावर मनापासून प्रेम करणारा कोणीतरी होता, नाव माहित नाहि, चेहराहि लक्षात न रहावा इतक्या पटकन आला थोडि का होईना मदत केली नी गेला. लोकांपर्यंत CNG चे काम पोहोचायला सुरुवात झालीये हे आमच्या दृष्टिने महत्वाचं आहे. तेव्हा मुकुलला मी म्हणालो – “मुकुल यात ह्याने जितकी मदत केली तितकी मदत समोर सत्संगाला आलेल्या गर्दितल्या प्रत्येकाने केली तरी तासाभरात सगळे पार्क चकाचक होईल!” आणि शब्दश: ते शक्यहि होते. शाळेत शिकवतात कि स्वच्छता हे देवाचे रुप आहे वगैरे, पण सत्संग करुन देव मिळवणारेच तिथे कचरा टाकुन जातात तेव्हा त्यांची किव येते. त्यांना आणि इतरांना सांगावसं वाटतं कि “बाबांनो मद्त केली नाहित तरी चालेल निदान कामं वाढवु नका!” अनेक लोकं आम्हांला थांबवुन हे काय करताय? का करताय? ह्याची माहिती घेतात. त्या लोकांना सुध्दा “कामं वाढवु नका!” हे गोड शब्दात सांगतो.

तसा तर हा विषय फार मोठा आहे. ह्याचा एक धागा थेट ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत जोडताहि येईल. पण फारसे प्रवचन न देता काहि गोष्टि नमुद कराव्याश्या वाटतात. आपण आपल्या पुरती वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छता बाळगली तरी खूप काहि बदलु शकेल. अर्थात प्रत्येकाने हा विचार करायला हवा. स्वत:ला “सुशिक्षित” म्हणवणारे आणि चकाचक ब्रॅंडेड कपडे – बुट घालुन वावरणारे जेव्हा वेफर्स खाऊन त्याचे पाकिट चुरगाळुन रस्त्यात फेकतात, कोल्ड्रिंकचे ग्लास रेल्वेच्या रुळांत फेकतात तेव्हा त्रागा होतो. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलामांनी आपल्या एका भाषणात एक अचुक उदाहरण दिले होते – “आपण परदेशात गेल्यावर तिथले स्वच्छतेचे नियम पाळतो कारण माहित असतं कि चुकले तर पकडले जाऊ आणि डॉलर्स मध्ये दंड भरावा लागेल. पण ज्या क्षणी आपण भारतात उतरतो लगोलग हातातला कचरा खाली पडतो आणि घरी आल्यावर मात्र बाहेरच्या देशात किती स्वच्छता आहे हे आपण इतरांना सांगतो!” हे कुठेतरी बदलायला हवं.

शहरातच कशाला? गेल्यावर्षी मी कोयना अभयारण्यात व्याघ्रगणनेसाठी गेलो होते तिथेहि गुटख्याची काहि पाकिटे आढळली होती. डोकं फिरणं सहाजिक आहे पण आपल्याला हे मान्य केलं पाहिजे कि प्लॅस्टिक हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झालाय, त्याला आता हद्दपार करणे शक्यहि नाहि. पण आपण त्याचा वापर शक्य तितका कमी करु शकतो. पावसाळा वगळता एरवी ७-८ महिने आपण कापडि आणि कागदि पिशव्या वापरु शकतो. चॉकलेट ची रॅपर्स, चहा – कॉफिचे ग्लास आपण सार्वजनिक कचराकुंड्यातच टाकायचे कष्ट घेतले तर BMC चे काम आपोआप कमी होईल. आपण फक्त महानगरपालिकेला शिव्या देण्यात धन्यता मानणे मुर्खपणाचे आहे. आपण काय करतो? किती कचरा करतो? हे बघुन त्यात चांगला बदल घडवणे गरजेचे आहे. यात नुसता प्लॅस्टिकच नव्हे तर कुठल्याहि प्रकारचा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाहि हा नियम प्रत्येकाने स्वत:पुरता तरी पाळावा.

तर पुन्हा मुळ मुद्याकडे – प्रत्येक रविवारी सकाळी ९ वाजता आम्हि शिवाजीपार्क जीमखान्यापाशी भेटतो. तिथे सर्वानुमते शिवाजीपार्कचा कुठला एरिया स्वच्छ करायचा हे ठरतं आणि ग्रुप तिथे सरकतो. सध्यातरी महिन्यातुन एक रविवार दादर चौपाटी साफ करायचे ठरते आहे. खरंतर दादर चौपाटि साफ करणं हे सध्या आमच्या आवाक्यापलीकडचं काम आहे हे समजतय, पण कुठुनतरी सुरुवात केलीच पाहिजे. मुळात दादर चौपाटिवर लोकं जात नाहित कारण ती अस्वच्छ आहे आणि ती दुर्लक्षीत राहिल्याने अजुन अस्वच्छ होते आहे.

काहि महिने असेच काम करुन दादर चौपाटि व शिवाजीपार्क जर आम्हि साफ करु शकलो तर पुढील निवडणूकित आम्हि “कार्यसम्राट” म्हणून निवडुन येऊ. हा विनोदाचा भाग सोडला तर महापौर निवासाच्या मागचा समुद्रकिनारा कचर्‍याने भरलेला असतो आणि महापौर निवासाच्या गेट शेजारच्या बसस्टॉपवर “keep Mumbai clean!” चा मुंबई महानगरपालिकेचा बोर्ड लागलेला असतो ह्यापेक्षा मोठा विनोद क्वचितच दुसरा असेल.

असो, सध्या तरी आम्हांला गरज आहे कुठलीहि अपेक्षा न ठेवता आम्हांला मदत करणार्‍या लोकांची. “आम्हि” तुमची वाट बघतोय!


ऑरकुट आणि फेसबुकवर आमच्या ग्रुपच्या कम्युनिटिज आहेत, त्यांना भेट देऊन त्यात सहभागी होऊन तुम्हि आमच्या कामात सहभागी होऊ शकता, नव्या कल्पना राबवायला मदत करु शकता. -

Click here for Orkut community Link
.

Click here for Facebook group link


- सौरभ वैशंपायन.

Friday, September 25, 2009

चातक

खरं तर हि कविता म्हणजे नाल होती म्हणुन घोडा विकत घेतला असा प्रकार आहे. खरं तर या कवितेच्या पुढे काहितरी इंजिन लाव अशी पिन श्री श्री ओंकारबुआ घैसास यांनी टोचल्याने हि कविता लिहिलीये.


------------------------------

आभाळ भरले ढगांनी, वेडा चातकहि झुरे
मौन सोड जरा बोल, राग लटका हा पुरे ॥धृ॥


आधीच उशीराने येणे, आणि लगबग जाणे
तुझे आणि पावसाचे, असे सारखे बहाणे
खेळ पाठशिवणीचा, तुझा-माझा आता पुरे,
असे ठेवुन तृषार्त, नाहि परतणे बरे - १


तश्या तहानेला माझ्या, काहि आदि - अंत नाहि,
त्यात भेटुन नेहमी, तुझी निघण्याची घाई,
कुणा हवे इंद्रधनु? कुणा हवे गार वारे?
फक्त सोबत रहा तू, येती आपसुक सारे - २- सौरभ वैशंपायन

Friday, September 18, 2009

थरार

कोयना नगरच्या जंगलातला शेवटचा दिवस. बुध्द पौर्णिमा होती त्या दिवशी. १९ मे २००८. त्या दिवशी आम्हाला रात्रभर जागायचं होतं आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात जंगल वाचायचं होतं. सगळी सकाळ कुठल्या जागी जास्त प्राणी दिसतील यावर खल करत कोयनेच्या पाण्याभोवती फेरी मारत घालवली. बापूकाकांनी डाव्याहाताला दूऽऽर एक जागा दाखवली "त्या तिथं बसुया! समोर किंजरवड्याचा वढा बी हाय, जनावरं तिथुन खाली सरकतात पाण्याला!" रात्री टेहाळणी करायला जागा खरचं चांगली होती त्या ठिकाणी मागे मोठं झाडहि होतं आणि पुढे थेट २५-३० फुटाची उतरंड होती. शिवाय एक झाडहि आडवं पडलं होतं त्यामुळे नैसर्गिक आडोसा देखिल तयार झाला होता.

दुपारी साधारण ३ वाजता कोयनानगर अभयारण्याचे प्रमुख नाईक साहेब बोटितुन झुंगटिला आले होते. ते आल्यावर थोड्या गप्पा झाल्या आम्ही मिळावलेला वाघाच्या पायचा १४x१४ सेमी. चा ठसा बघुन ते खुष झाले, शिवाय आदल्या दिवशी मिळालेली वाघाची विष्ठा बघुन ते आपणहुन सांगत होते. विष्ठेवरुन वाघाने काय खाल्लं ते समजतं. कुठल्या जनावराचे केस आहेत ते समजतं. इव्हन नुसती शिकार झालेली असेल तर ती कोणी केलीये ते समजतं. वाघाने शिकार केल्यावर तो शिकारीला छातीपासुन पोटापर्यंत फाडतो आणि कोथळा बाजुला काढुन मांस खातो. पण बिबट असेल ते लचके तोडुन खातं मिळेल तो भाग ओरबाडायला सुरुवात करतं. वाघ अतिशय स्वच्छ खातो. तसंच तरस, दिसायला बेढब प्राणी पण शिकार स्वच्छ खातो. बिबट्या खाताना खाल्ल्या ठिकाणी मांसाचे तुकडे - रक्त आसपास उडतं. शिकारी कुत्रे तर जिवंत फाडायला सुरुवात करतात, अतिशय निर्दय शिकारी. मग वेगवेगळ्या विषयांवरुन प्राण्यांची हद्द कशी ठरते ते सांगायला लागले. वाघाला साधारण १०० चौ किमी परीसर लागतो, मादा वाघाला ६० चौ किमी परीसर लागतो, कधीकधी नर-मादा यांचे परीसर एकमेकांमध्ये शिरलेले असतात. त्यांच्यात त्यावरुन फारसा झगडा होत नाहि पण २ नर समोर आले कि "जंगल राज" म्हणजे काय ते समजतं. पण तसं फार कमी होतं. एक तर सध्या वाघांची संख्या कमी. त्यातुन अभयारण्यात बरीच जागा मिळते. वाघ स्वत:ची हद्दा ठरवताना स्वत:च्या मुत्राचा फवारा आजुबाजुच्या झाडांवर उडवतो अथवा विष्ठा केल्यावर मागचा भाग खोडांवर घासतो. शिवाय जर तुम्हांला आजुबाजुच्या झाडावर दोन बाजुंनी जमिनीपासुन १० फुटांवर नखांचे २ ओरखाडे असले तर खुषाल समजा कि तुम्हि जंगलाच्या राजाच्या क्षेत्रात घुसखोरी केली आहे. पण तेच ८ फुटांवर तीन ओरखाडे असतील तर ते अस्वलाचे असतात. सांभर आपली शिंगे मुळा पासुन ते साधारण चारफुटांपर्यंत घासतो. त्यावरुन तिथे कोणाची सत्ता आहे वावर आहे ते समजतं. अखेर त्यांनी गप्पा आटोपल्या व म्हणाले "आम्हि समोरच्या किनार्‍यावर आहोत आज वस्तीला! आजच्या रात्रीसाठी कुठली जागा निवडली आहे?" बापुंनी बोटानी ती जागा दाखवली तसे मान हलवत ते उठले आणि आपली हॅट चढवत बोटीकडे निघाले. समोरच्या किनार्‍यालाच त्यांनी तंबु ठोकला.

रात्री जागायचं म्हणुन त्या दुपारी झाडांच्या गार सावलीत तासभर सगळ्यांनी ताणून दिली. दुपारचे साडे चार वाजले तसे आम्ही निघायची तयारी करु लागलो. मीनलने प्रत्येक माणसाला एक या हिशोबाने सरळ ५ मॅगीची पाकिटे शिजवुन एका पातेल्यात घेतली. आकाश तस ढगाळचं होतं. जंगलाच्या मधुन वाट काढत बापूंनी दाखवलेल्या ठिकाणी बाहेर पडलो. साधारण ५:३० वाजत आले होते. आम्ही जी जागा निवडली होती तिथुन कोयना अभयारण्यातील झुंगटि विभागाचा एक मोठा कोपरा नजरेच्या टप्प्यात येत होता. शिवाय ३ दिवसांपूर्वी खालच्याच बाजुला तिथे बिबट्याचा ताजा ठसाहि मिळाला होता म्हणजे प्राण्यांच्या बर्‍यापैकी वावरात असलेली जागा होती.

अमित आणि माझी स्लीपिंग मॅट अंथरुन त्यावर एक गडद रंगाची चादर पसरली आणि बसलो. बापू आमच्याहुन थोडे उंचावर बसले होते. साधारण अर्धातास गेला असेल नसेल बापूंनी शूऽऽक असा हलका आवाज काढुन डावीकडे बोट दाखवले. एक मोठ्ठा गवा सुकल्या ओढ्याच्या डाव्या बाजुला असलेल्या उतरंडि वरुन खाली येत होता. लगोलग अजुन २ गवे त्याच्या पाठी होते. तो झाडांची रांग जिथे संपते तिथे येऊन उभा राहिला व सगळ्या परीसराचा अंदाज घेऊ लागला. आता गव्यांची एक रांगच खाली सरकु लागली. दोन बच्चेहि होते. कुठलाहि धोका नाहि म्हंटल्यावर तो हळु हळु पुढे सरकला मागोमाग त्याचा ११ जणांचा कळप सावकाश पाण्याजवळ आला. वार्‍याची दिशा आमच्याकडे होती म्हणजे आमचा वास त्यांच्यापर्यंत जाण्याची शक्यताच नव्हती. फक्त आवाज आणि हालचाल या दोन गोष्टि कमीतकमी होणे गरजेचे होते.

पाणी पिताना २ गवे आजुबाजुला लक्ष ठेवत होते. सगळ्यांचं पाणी पिऊन झाल्यावर ते पुढे आले आणि पाणी पिऊ लागले. गव्याला दिवसभराची तहान भागवायला किंवा पाण्याचा जरुरी इतका साठा(साधारण १२ गॅलन) करायला त्याला किमान १०-१२ मिनिटे लागतात. किमान १००० किलोचा हा प्राणी जेव्हा जंगलातुन कळपाने फिरतो तेव्हा कोणीहि वाटेला जायची शक्यता नसते. साधारण चार फुट उंच आणि १०-११ फुट असलेल्या या धुडाच्या वाटेला जाणार तरी कोण? पोटभर पाणी प्यायल्यावर परत मुख्य नर गवा जंगलाच्या वाटेला लागला. मधुनच तो मागे वळुन बघत होता. बघता बघता कळप आल्या ठिकाणहुनच परत गेला. जंगलाचे काहि अलिखित नियम असतात, प्रत्येक प्राण्याची हद्द, त्यांचे येण्या जाण्याचे रस्ते ठरलेले असतात. जेव्हा या गोष्टिंचे दुसर्‍याकडुन उल्लंघन होते तेव्हा संघर्ष अटळ असतो.

गवे आल्यावाटेने गेले. मध्ये मोजुन ३-४ मिनिटे झाली असतील नसतील गवे जिथुन आले होते त्याच बाजुन ओरडण्याचा आवाज आला आणि काहि कळायच्या आत एक सांभर मादि जीवाच्या आकांताने धावत तिथुन पाण्याकडे आली आणि समोरच्या काठावरुन समांतर धावु लागली. मागोमाग ८ शिकारी कुत्रे धावत होते, ती बिचारी पोटातुन फ्रॅक फ्रॅक असे आवाज काढत होती. एकाने धावता धावता तिच्या पायाला जबड्यात पकडले तशी तिने दुणग्या झाडल्या तो शिकारीकुत्रा ७-८ फुट उडला, उठुन त्याने मान झाडली आणि परत पाठलागावर निघाला बाकिच्या ७ जणांनी तिला हुसकावत पुढे नेले. आमच्या पासुन २५०-३०० फुटांवर सगळं सुरु होतं. आम्ही श्वास रोखुन सगळं बघत होतो. मादि हुशार होती ती सरळ पाण्यात शिरली आणि पाण्यात पाय आपटु लागली. पाण्यात जाऊन तीच्यावर हल्ला करायचा अयशस्वी प्रयत्न २ कुत्र्यांनी केला पण कुत्र्यांची उंची कमी होती एखादा जवळ आलाच असता तर तीने त्याला खुराने पाण्याखाली दाबले असते. हे नैसर्गिक शहाणपण होतं. उंचीचा लाभ घेत तीने पाण्यात सुरक्षित जागा मिळवली होती.

मागे बापू काकांचा जीव वरखाली होत होता - "आरं आरं त्ये फाडुन खाणार रं!" सारखी चुक चुक करत करु लागले. आणि अचानक उभे राहुन "हेऽऽऽ हुश्शाऽऽ हॅहऽऽऽ" असे ओरडायला लागले हातवारे करु लागले. आम्ही गोंधळलो इतकावेळ काय वेडे म्हणुन दबकुन बसलो होतो?? बापू काका खाली बसा काय करताय?? तसे ते आमच्यावर खेकसले - "थांबा वो! हे ह्यांच खाण नाय! हुश्शऽऽ हॅकऽऽ!!हे ससे खाणार, येखादा पट्टेरी असता तर मी काय बी बोललो नसतो!!" आम्हि कपाळाला हात लावला. अमीतने त्यांच्या पॅंट चा बॉटम खेचायला सुरुवात केली. आम्हाला जे घडतय त्या बद्दल वाईट वाटत होतं पण निसर्गाचा नियम मोडायला आम्हाला काहिहि अधिकार नव्हता. समजा आम्हि तिथे नसतो तर काहि बदलणार होतं का? ती मादा शिकार बनणारच होती. "जीवो जीवस्य जीवनम!" हा नियम इथेहि होता. त्या शिकारी कुत्र्यांना देखिल पिल्ले असतील ती जगवायला त्यांना या मादिचा जीव घेणे भाग होते. शिवाय दुसरी भीती हि होती कि शिकारी कुत्र्यांनी त्यांचा मोर्चा आमच्याकडे वळवला तर आमच्यापर्यंत पोहोचायला त्यांना २-४ मिनीटेहि खूप होती. शिवाय आम्हाला वाचवायला सांभर हुश्श हुर्र असे आवाज काढणार नव्हतं!

अखेर छ्या! छ्या!! म्हणत बापू काका खाली बसले. पुढे काय घडतय ते बघत आम्ही पुन्हा शांत बसुन राहिलो. त्या कुत्र्यांनी अखेर १०-१५ मिनिटांनी तीचा नाद सोडला आणि ते जंगलात निघुन गेले. सांभर मादि थोडावेळ पाण्यातच राहिली मग हवेत कुत्र्यांचा वास घेत घेत एक एक पाऊल ताकत ती पाण्याच्या बाहेर आली. परत थोडावेळ ती काठावर उभी राहिली व नंतर दबकत दबकत जंगलात निघुन गेली. जे काहि बघितलं होत त्यामुळे आम्ही अजुनहि हबकलो होतो. बापू हुश्श सुटली असं म्हणुन निश्वास टाकला. आता अंधारायला सुरुवात झाली त्यातुन आकाश काळ्या ढगांनी भरुन आल्याने अजुनच अंधार दाटला. अमित वैतागुन दबक्या आवाजात पुटपुटला - "मे च्या मध्यावर पावसाळी ढग?? गेल्यावर्षी सुध्दा हेच झालं होतं!" इतक्यात तेजसने हं! असं ओरडुन परत समोरच्या काठाकडे बोट दाखवलं पुन्हा सांभर मादि पुढे आणि ते कुत्रे पाठी असे परत धावत आले. ती परत पाण्यात शिरली. यावेळी मात्र सहाच कुत्रे होते. बराचसा अंधार पडला तसा ते धावत जंगलात निघुन गेले. बापू दबक्या आवाजात म्हणाले अंधारात कुत्र्यांना शिकार नाय करता येत. परत सांभर मादि कान टवकारुन बाहेर आली तीची शेपटीहि वर होती. आता ती जंगलात निघुन गेली तसे बापू म्हणाले "नाय वाचत ती! जखमी आसल तर रक्ताचा वास काढत उद्यापर्यंत ते तीची शिकार करतील!!" पण बुध्द पौर्णिमेच्या रात्री तरी तीला जीवदान मिळाले होते हे नक्कि.

अंधार पडला आणि मागोमाग पाऊस पडायला सुरुवात झाली. पाऊस वाढला तसा आम्हि टॉवर वर जायचा निर्णय घेतला. बॅटरीच्या प्रकाशात किर्र जंगलातुन वाट काढताना मनात कुठेतरी धागधुग होती. जीम कॉर्बेटचे नरभक्षक वाघांचे किस्से आठवत होते. वाघ शिकार करताना शेवटच्या माणसाला बरोबर उचलतो आणि पुढील माणसाला काहि समजायच्या आत त्याला ओढुन नेतो हे कॉर्बेटसारख्या पट्टिच्या शिकार्‍याचे बोल मनात यायला लागले .... सर्वात मागे मीच चालत होतो. वाघोबा आजची रात्र उपास करा उद्या आम्हि गेल्यावर हवा तो गोंधळ घाला असे म्हणत अखेर टॉवरपाशी पोहोचलो. थंऽऽड झालेली मॅगी किती वाईट्ट लागते हे त्या दिवशी समजलं भूक असुन देखिल थोडि मॅगी उरलीच. अमितला म्हणालो अमित हिच गरम असती तर आपण भांडुन-भांडुन मॅगी ओरबाडली असती ना? अखेर टॉवरवर पसरलो आनी पाऊसानेहि जोर धरला रात्री उशीरापर्यंत पाऊस पडत होता. सकाळ उजाडली ती थंड वारे आणि पक्ष्यांचे सुंदर किलबिलणे घेऊन.

दुसर्‍या दिवशी नाईक साहेब म्हणाले "बरं झालं तुमच्या समोर शिकार नाहि झाली ते! वाईट्ट फाडतात शिकारी कुत्रे. सांभर मादि सापडली असती तर आधी त्यांनी डोळ्यावरच हल्ला केला असता. दोन्हि डोळे चावुन - ओरबाडुन बाहेर काढले असते आणि मग खाली पाडुन मांडि पासुन फाडायला सुरुवात केली असती. ती रक्त जाऊन मरेतो ओरडत राहिली असती! पण तुम्हांला जे बघायला मिळालं ते खुप कमी जणांना बघायला मिळतं! नशिबवान आहात!!"

हे बघायला मिळालं म्हणून आम्हि नक्किच नशीबवान होतो. कारण असा जंगलातला लाईव्ह थरार रोज रोज थोडिच बघायला मिळतो??

- सौरभ वैशंपायन

Saturday, August 22, 2009

दधिची


पुराणात दधिची ऋषींची गोष्ट आहे. शेकडो वर्षे तप केल्याने अभेद्य झालेल्या आपल्या अस्थी त्यांनी इंद्राला अर्पण केल्या. त्या अस्थिपंजरातुनच देवांच्या राजाने आपले वज्र बनवले, व असुरांवर जय मिळवला. कालचक्र अविरत फिरत असते. आधी घडलेल्या घटना नवे संदर्भ घेऊन पुन्हा घडतात. "भारतरत्न डॉ. अवुल पकिर जैनुलबद्दिन अब्दुल कलाम" यांच्या रुपाने दधिची पुन: अवतरले. आपल्या प्रखर बुध्दिला पणाला लावुन या आधुनिक ऋषीने "अग्नि" नामक एक अमोघ अस्त्र भारताच्या चरणी अर्पण केले.

जो स्वप्नेच बघु शकत नाहि त्याला ती पूर्ण करण्याचा ध्यास तरी कसा असेल? मात्र प्रक्षेपक(अंतराळ) व क्षेपणास्त्र(संरक्षण) या दोन्हि बाबतीत भारताला स्वयंपूर्ण करायचे स्वप्न डॉ. विक्रम साराभाईंनी बघितले होते, कलामांनी त्या स्वप्नात स्वत:ला गुंतवुन घेतले. मुळात त्यांना पायलट व्हायचे होते पण एका क्रमांकाने त्यांचे स्वप्न मोडले......कदाचित नशिबाने त्यांच्या आयुष्यात वेगळेच लिहुन ठेवले होते. प्रथम DRDO व नंतर ISRO मध्ये त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. भारताचा पहिला indigenous Satellite Launch Vehicle (SLV-III) उपग्रह कलामांच्याच नेतृत्वाखाली सिध्द झाला, Integrated Guided Missile Development Programme (IGMDP) चे प्रमुख तेच पृथ्वी - अग्नि अशी क्षेपणास्त्रे हि कलामांच्या कष्टाची फळे आहेत. अर्थात यात आपल्या सहकार्‍यांचा वाटा अहे हे कलाम अतिशय नम्रपणे सांगतात. प्रत्येक गोष्टित ते "आम्हि" केले असे शब्द वापरतात. उगीच त्यांचे सहकारी त्यांना ऋषी संबोधत नाहित.

११ मे व १३ मे १९९८ रोजी पोखरणमधील वाळु २४ वर्षांनी पुन्हा उधळली गेली, त्या अणूस्फोटांमागचे कष्ट श्री चिदंबरम आणि कलामांचेच तर होते. अर्थात कलामांसारख्या द्रष्ट्याला शांतता अभिप्रेत आहे पण शांतता सबलांची असावी हि इच्छा. महासत्तांनी देखिल भारता विरुध्द हालचाल करताना दहावेळा विचार केला पाहिजे अशी ताकद ते राष्ट्राला देऊ इच्छितात. चीन कडे intermediate-range ballistic missile (IRBM) क्षेपणास्त्रे असताना भारताने गप्प रहाणे केवळ मुर्खपणाचे ठरेल. पाकसाठी "पृथ्वी" पुरेसे आहे पण चीन कडुन मदत घेऊन पाकने पृथ्वीला उत्तर म्हणून "घोरी" व "हफ्त" हि क्षेपणास्त्रे बनवली शिवाय चीनने त्यांना M-11 हि ३०० किमी मारा करणारी क्षेपणास्त्रे पुरवली आहेत.याला पुरुन उरायचे असेल तर अग्नि हेच चोख उत्तर आहे. म्हणुनच या सगळ्याच्या विचार करता भारताचा "अग्नि - १" ते "अग्नि - ४" म्हणजे Short Range Ballistic Missile ते Intercontinental Ballistic Missile इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे जेव्हा इतिहास नमुद करेल तेव्हा त्यात अब्दुल कलामांचे नाव या चारहि रेंजच्या अग्नि समोर असेल.

विचाराने इतके आक्रामक असलेले कलाम मनाने मात्र तितकेच हळवे आहेत. म्हणुनच चेन्नई मधील एका इस्पितळातील अपंग मुलांना पाहुन त्यांना वाईट वाटले ती लहान मुले जड कुबड्यांचा संसार ओढताना बघुन त्यांच्या पोटात गलबलले. म्हणुनच कुबड्यांसाठी मजबुत पण अतिशय हलक्या धातुंचा वापर करावा असा विचार त्यांनी केला व या भेटिने मुले "खेळु" लागली. याखेरीज बायपास चा प्रश्न खुप खर्चिक होता. परदेशी स्टेन्स खुप महाग असल्याने गरीब-गरजु लोकांना हि शस्त्रक्रिया करुन घेणेआर्थिक दृष्ट्या कठिण होते मात्र डॉ. कलाम व डॉ. सोम राजु या दोघांनी नवा आणि स्वस्त इतकेच नव्हे तर परदेशी स्टेन्स पेक्षा प्रगत असा देशी स्टेन्स बनवुन हृदयरोग्यांना दिलासा दिला.

काळाने डॉ. कलामांच्या पदरात त्यांच्या योगतेचे माप पूरेपुर ओतले. सर्व भारतीयांच्या सुदैवाने ते राष्ट्रपती बनले. त्यांनी तरुण रक्ताला २०२० चे स्वप्न दाखवले. आज आम्हि तरुण मुले ते स्वप्न घेऊन जगतोय. तामिळनाडुच्या किनार्‍यावरील एका बोटकामगाराचा मुलगा ते राष्ट्रपतीपद हा प्रवास सोपा खचित नव्हता. अनंत ध्येयासक्ती असलेली माणसे काय करु शकतात याचे चालते बोलते उदाहरणच आंम्हाला २०२० चे स्वप्न देत आहे यापेक्षा भाग्याची गोष्ट ती काय?

इतके मान - सन्मान मिळुन त्यांचे पाय कधी जमिनीवरुन सुटले नाहित. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांनंतर इतका दूरचा विचार करणारा राष्ट्रपती भारताला मिळाला. कलाम पूर्णत: शाकाहारी आहेत. पुस्तकं, वीणा, शास्त्रीय संगीताच्या कॅसेट व विज्ञान इतकिच माझी मालमत्ता आहे असे ते गंमतीने म्हणतात. पण त्यात अतिशयोक्ती नाहि. ३४४ खोल्यांच्या राष्ट्रपती भवनात हा माणूस २ सुटकेस भरुन गेला व परत येताना २ सुटकेस घेऊन बाहेर आला. आपले नातेवाईक चार दिवस राष्ट्रपती भवनात आले तेव्हा त्यांचा खर्च हा स्वत:ला मिळाणार्‍या पगारातुन केला सरकारी खात्यात नव्हे. ब्रह्मचारी असल्याने कुठलेहि सांसारीक मोह नाहि त्यामुळे खरोखरच ते ऋषी आहेत!


- सौरभ वैशंपायन.

Wednesday, August 19, 2009

दुरुन डोंगर साजरे!!

दुर डोंगरावर ढगांचे थवे उतरताना पाहण्यासारखा सुंदर अनुभव दुसरा क्वचितच असेल. पावसाने हिरवे झालेले डोंगर आणि अंधारुन आल्याने गडद निळसर दिसणारे त्यांचे कडे, मग त्यांच्या डोक्यावरुन अलगद सरकणारे आत्म्यांसारखे गुढ - संथ धुके, गंभीर, निशब्द, गार, हुरहुर लावणारे आणि किंचित दडपण आणणारे. त्या मागोमाग ढगांचे थवे. थकल्यावर आपल्याला मोकळ्या, अंग पसरता येण्याजोग्या जागेची जशी स्वाभाविक ओढ लागते तशीच या ढगांना डोंगरमाथ्यांची लागत असावी. मात्र या ढगांच्या ताफ्यात काळे ढग मात्र तीन किंवा चार. बाकि सगळे करड्या रंगाचे. आपण जिथे उभं असतो तिथुन थेट डोंगराचा पायथा दिसत असतो, डाव्या-उजव्या बाजुला एखादि बुटकि टेकडि बाकि डोंगराच्या माथ्यापर्यंत मोकळे मैदान, हिरवी शेते, झाडांच्या गच्च रांगा. मधुनच एखाद्या एकांड्या शिलेदारा सारखा सगळ्या चित्राहुन वेगळा पण चित्र खुलवायला सरसरत आकाशाकडे वाढलेला उंऽऽच माड. माडाच्या झाडाला दुसर्‍या झाडाला स्पर्ष आवडत नाही म्हणे.... म्हणूनच असा एकांडा!!

आणि त्या बुटक्या टेकडिवर एक छानसे पांढरट मंदिर, त्याच्या कळसाच्या माथ्यावर पावसाळी हवा खात अव्याहत फुरफुरणारा भगवा झेंडा. आणि अश्याच एखाद्या क्षणी डोक्यावरचा ढग विरळ होत जातो, अचानक त्या माडाच्या झावळ्यांना, शेतातील पोपटि गवताला तजेला आल्यागत वाटु लागते. त्या विरल्या ढगातुन सुर्याची किरणे त्या टेकडिवर उतरतात....फक्त टेकडिवरच, बाकि ठिकाणी सावलीच. मग प्रकाशाचे फराटे उठतात आणि मिनिटभरासाठी सुर्यनारायण दर्शन देतात. परत मागचे ढग तरंगत पुढे सरसावतात. विरलेले ठिगळ पुन्हा जोडतात. आता टेकडिवर सुध्दा सावली येते पण त्या ढगांची वरची किनार मात्र चांदि लावल्यागत चंदेरी होते. त्या काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर उडणारे ४-६ बगळे उगीच सुंदर भासतात.

मग सगळं उत्कट उत्कट होत जातं आणि परत एखादि पावसाची सर येते, डोंगरावर नवे अंकुर उगवतात.... डोंगराला अजुन हिरवेगार करण्यासाठी.

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, August 18, 2009

दिसलीस तू फुलले ऋतु

दिसलीस तू फुलले ऋतु, बाबुजींनी अजरामर केलेले अप्रतिम गाणे!


----------------------------------------------

Get this widget | Track details | eSnips Social DNA

बडि नाजुक है ये मंझिल...

जॉगर्स पार्क मधील सुंदर गीत!

......................


Get this widget | Track details | eSnips Social DNA

Wednesday, August 5, 2009

अश्वत्थ!
एखाद्या अंधार्‍या खोलीत एका कोनड्यात कुणीतरी समईची मंद वात लावावी आणि तिच्या शांत तेवण्याने अवघी खोली तीच्या सोनप्रकाशाने भरुन जावी असेच काहीसे सातशे वर्षांपूर्वी झाले. आक्रमकांच्या वरवंट्याखाली अवघा समाज भरडुन निघत असताना चार भावंडांनी ब्रह्मविद्येचा सुकाळु करावा ….... अगदी ठरल्यासारखा, हे एखाद्या आश्चर्यापेक्षा काही वेगळे नव्हते. बरं स्वत: चारही भावंडे त्याच समाजाच्या निरर्थक हेटाळणीस पात्र ठरलेली असताना त्याच बोचकारणार्‍या समाजाला “जो जे वांछिल तो ते लाहो।“ म्हणण्याचा समजुतदारपणा तरी कुठुन यावा? निवृत्तीनाथ स्वत: नाथपंथीय, ज्ञानेश्वरांनी त्यांच्याकडुन तीच दिक्षा घेतली. मात्र नीट बघितल्यास लक्षात येते कि नाथपंथीय असुन त्यांनी वैदिकांच्या परंपरेत प्रवेश केला व त्याच चौकटित राहून कर्मकांडांत अडकलेल्या वैदिकांचा पराभव केला. मात्र अखेर भागवत धर्माची पताका वैदिकाच्याच पायावर उभी केली. कर्मकांडाच्या पलिकडे जाऊ त्यांनी सर्वांना अध्यात्माची दारे मोकळी करुन दिली. स्वत: नाथपंथीय म्हणाजे शैव असुन भक्ती विठ्ठलाची म्हणजे विष्णुची केली. अवघा हरी-हराचा भेद कृतीतुन मिटवुन टाकला. श्रुतीस्मृतीपुराणोक्त वागणार्‍या समाजात वर्णभेद, जातिभेद, रोटि-बेटि बंदी अनेकविध दैवतांच्या उपासना अघोरी तंत्रोपासना यांमुळे विस्कळितपणा आला होता. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांचा उदय हा महत्वाचा ठरतो. तत्कालिन ग्रंथसंपदा ही संस्कृत भाषेत होती. सामान्यजन त्यापासुन कोसो दूर होते. त्याच ज्ञानाला ज्ञानेश्वरांनी प्राकृतात आणले. बरं इतके ज्ञान आत्मसात केले व नि:स्पृहपणे ते वाटले, तिथे गर्वाचा लवलेशही कधी दिसला नाही.

भग्वतगीतेसारख्या खुद्द भगवंतांच्या मुखातुन निघालेल्या स्वयंभू वाक-प्रवाहात आकंठ डुंबुनहि ज्ञानेश्वरांची तहान भागत नाहीच वरुन त्यात आकंठ बुडुन मला अजुन काहीच समजले नाहिये हा भाव सदैव कृतीत व उक्तीत दिसतो, किती हा नम्रपणा?? मी जी भावार्थदिपिका सांगत आहे ती केवळ अजाण बालकाची बडबड आहे, तरी सगळ्या श्रोत्यांनी मज अज्ञ बालकाचे वेडोकोडे बोबडे बोल गोड मानुन घ्यावेत हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात –

नातरी बालक बोबडां बोली । कां वाकुडां विचुकां पाऊलीं । तें चोज करुनि माऊली । रिझे जेवी ।।
बाळक बापाचिये ताटीं रीगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे । की तो संतोषलेनि वेगे । मुखचि वोडवी ।।


ज्याप्रमाणे एखादी आई आपले लेकरु वेडेवाकडे चालते, बोबडे बोलते तरी त्याचे कौतुक करते किंवा बाप जेवत असताना बालक रांगत जाऊन त्याच्याच ताटात हात घालुन बापालांच घास भरवायला लागते व बाप ते पाहुन आनंदाने तोंड पुढे करतो तसे तुम्ही येथे जमलेले सर्व संत - सज्जन मला समजुन घ्या. पुढे गीतेवर टिका लिहिणे किती कठीण आहे हे सांगताना माऊली म्हणतात -

ऐसे जें अगाध। जेथ वेडावती वेद। तेथ अल्प मी मतिमंद। काय होय।।
व्यासादीकांचे उन्मेष, रहाटती जेथ साशंक। तेथे मी एक रंक, वाचा लै करी।।


ज्या ज्ञानाची उकल करताना व्यासांसारखे ज्ञानभानू सुध्दा चाचपडतात, जेथे वेद नेती नेती म्हणतात तिथे मी फार वाचाळ असल्यागत बडबड करत सुटलो आहे.

पुढे तेच ज्ञानदेव अर्जुनाची जागा घेऊन भगवंतांना विनवणी करताना दिसतात की बा भगवंता आत्मा, पुनर्जन्म, अनादि-अनंत असलेल्या संदिग्ध गोष्टी सांगुन मला गोंधळात टाकु नकोस, किंवा सांगायच्या असतील तर मला समजतील अश्या भाषेत सांग अशी विनवणी ते करतात व ती विनवणी एकट्याची नसुन अवघ्या मराठी जनांची आहे याचे भान देखिल त्यांना आहे ते म्हणतात –

म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थ आतां न बोलावा ।। मज विवेकु सांगावा। मर्‍हाठा जी।।

हळुच आपल्या विनवणीत ते सहज मर्‍हाठा जीं ना त्यात सामावुन घेतात. मराठी भाषेबद्दल आपल्या माणसांबद्दल ज्ञानेश्वरांना किती आत्मियता होती हे यातुन दिसुन येते. आपण जे शाश्वत - शुध्द ज्ञान सांगत आहोत ते सर्वसमावेशक असले पाहीजे, ते सहज – स्वाभाविक असले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष आहे. ज्यांना प्रपंच देखिल धड चालवता येत नाहि अश्यांना परलोकाच्या गोष्टि सांगुन काय उपयोग? या वास्तवाची जाणीव त्यांना आहे. या खेरीज आपल्या समोर संत-सज्जनां खेरीज आपला सद्गुरु बसला आहे तो आता केवळ आपला थोरला बंधु नसुन मार्गदर्शक आहे याचेही योग्य भान त्यांना आहे. त्याने दिलेले ज्ञान आपण आत्मसात केले आहे याची खात्री सुध्दा आपल्या गुरुला झाली पाहिजे व अगदि सामान्य माणसालाही गीतेचे मर्म समजले पाहिजे अश्या भाषेत ते सांगण्याचे प्रचंड अवघड काम ज्ञानेश्वर सहज करत आहेत.

सगळी ज्ञानेश्वरी त्यांनी अतिशय रसाळ, मधाळ व लयबध्द लिहिली आहे. गीतेतले मोठे मोठे दृष्टांत सुध्दा त्यांनी सोप्पे करुन सांगितले आहेत. इतकेच कशाला? ज्या करीता योगीजन आपले आयुष्य खर्ची घालतात त्या कुंडलिनीवर टिका लिहिताना ज्ञानेश्वर सहाव्या अध्यायात भगवंताचे बोल सहज लिहुन जातात –

“ गुद मेंढ्राआंतौति । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांती । सांडुनियां ॥
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते ॥
नागाचे पिलें। कुंकुमें नाहलें। वळणी घेऊनि आलें। सेजे जैसें॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥ “


हे पार्था, गुदद्वाराच्यावर चार अंगुळे, कुंडलिनी खाली तोंड करुन साडेतीन वेटोळे घालुन निद्रिस्त असते. तिला जागृत करण्यासाठी काय करावे ते सांगताना भगवंत म्हणतात -

“ उचलिले कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥
अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ॥ “


प्रथम वज्रासन घालुन गुदद्वार आत ओढुन घ्यावे, इथे मुलबंध लागतो. अपान वायु आत कोंडला जातो. मग पुढे पुढे ते काय होते ते सांगत जातात, आधी बुबुळे टाळुच्या मध्यभागी असलेल्या सहस्त्रदलांच्याकमळाकडे लागतात व मग बुबुळे भ्रुमध्यावर स्थिरावतात. नंतर हळुहळु ती नासिकाग्रावर स्थिरावतात, नजर अर्धोन्मिलीत होते. हनुवटी खाली जाऊन कंठकुपीवर दाबली जाते. नाभी व पोट आत खेचले जाते व हृदय प्रकाशाने भरते. असे स्वाधिष्ठानचक्र जागृत झाल्यावर क्षुधा व निद्रा यांची जाणिव राहत नाही.

“ जो मुळबंधे कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी ॥
क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपुरेंसी झुंजे । राहोनियां ॥
भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्ताचे थारे । उरों नेदी॥
धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥
नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकांते भेडसावी । परि बिहावें ना ॥
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते ॥
नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥
विद्युलतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥ “


मुलबंधात कोंडलेला अपानवायु उर्ध्व दिशेस जायला सुरुवात करतो. तो मणिपुरचक्रांत क्षोभ(हालचाल) निर्माण करतो. आणि कुंडलीने जागृत व्हायला सुरुवात होते. कुंडलिनी तिचे वेटोळे सोडुन वर सरकु लागते ती एखाद्या कडाडणार्‍या वीजेसारखी असते. मग शरीरातले धातुंचे समुद्र तो अपान ओलांडायला सुरुवात करतो, मेदाचे पर्वत फोडुन चुर करतो.

“ सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविलीं तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥
मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी ।आरोगुं लागे ॥
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥
आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची ॥
मग सप्तधांतूच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा । तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली ॥ “


तिची बहुत दिवसांची भुक भागवायला ती हृदयाखाली असलेला वारा पिऊन टाकते, तिच्या ज्वाळा मांस जणु जाळत जातात.तळहातांत भिनुन ती नखांचे सत्व शोषते. अस्थि व हाडांच्या नळ्या तो अपान निरपुन घेतो. सगळ्या रोमांतुन ती उर्जा भिनते. सगळे सांधे झडत आहेत कि काय असे वाटते. शरीरातील सप्त धातुंचे समुद्रच ती कुंडलिनी पिऊन टाकते. शरीरातील वायु नाकांतुन आत येतो व गुदद्वारांतुन सुटत जाणारा अपान माघारी फिरतो. अखेर ती शरीरातील सगळा ओलावा चाटुन घेते.

“ ऐसी दोनी भुतें खाये । ते वेळी संपूर्ण धाये । मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषे । प्राणु जिये ॥
तो अग्नि आंतूनि निघे । परि सबाह्य निववूंचि लागे । ते वेळी कसु बांधिती आंगे । सांडिला पुढती ॥
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥ “


व अखेर संपुर्ण जागृत झालेली कुंडलिनी गरळ ओकते. त्यातुनच अखेर शरीराला पुन: प्राणवायु मिळतो. शरीराला नविन संजीवनी मिळते. इडा-पिंगला एकत्र वाहु लागतांत. पुढे संपूर्ण क्रियेचे वर्णन करताना कि इडा व पिंगला या चंद्र व सुर्याच्या प्रतिनीधी आहेत अशी कल्पना करुन ज्ञानेश्वर म्हणतात कि इडा पिंगलां व मेरुदंडातुन मस्तकाच्या मध्यभागापर्यंत जाणारी मध्यमा यांच्यात अक्षय उर्जेचा अविरत संचार सुरु होतो. मस्तकातुन चंद्राच्या चांदण्यासारखा शीतल प्रवाह खाली झीरपु लागतो.

अखेर कुंडलीनी जागृत झालेला देह कसा दिसतो याचे वर्णन ते पुढिल प्रमाणे करतात –

“ तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा ॥
हो कां जे शारदियेचे वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥
तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये । मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥
कनकद्रुमाचां पालवीं । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥
दांतही आन होती । परि अपाडें सानेजती । जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥
माणिकुलियांचिया कणिया । सावियाची अणुमानिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचियां ॥
करचरणतळें । जैसीं कां रातोत्पळें । पाखाळीं होती डोळे । काय सांगो ॥
आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें । जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥ “


तो देह जणु सोनचाफ्याच्या ताज्या टवटवीत कळी सारखा दिसतो. शरदाच्या चांदण्यातील चंद्रबिंबाने न्हाऊ घातलेल्या मुर्तीप्रमाणे भासतो. सर्व देहांतुन चंद्रबिंबाचीच प्रभा ओसांडु लागते. त्या योग्याची नखे सुध्दा रत्नांसारखी नवेली दिसतात. व दात हिर्‍यासारखे भासमान होतात. अंगावरील रोमांच माणिकांसारखे प्रतित होतात. देह सोन्याचाच भासतो. मात्र त्यात जडपणाचा अंशही नसतो. अवघा देह वायुसारखा हलका होऊन जातो.


“ मग समुद्रपैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत ओळखे । मुंगियेचे ।।
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे । येणें येणें प्रसंगे । येती बहुता सिध्दी ॥
हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी । ते फेडुनियां वेगळी । ठेवली तिया ॥
नातरी वारयाचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निमटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥ “


एकदाका कुंडलिनी जागृत झाली की त्या योग्याला समुद्रापलीकडचे दिसते. मुंगीच्या मनातील गुपित सुध्दा समजते. ती कुंडलीनी सोनसळी वस्त्र ल्यायल्यागत असते, व वार्‍याची पुतळी असल्यागत तिचा संचार असतो. दिठी म्हणजे दृष्टीला जशी गगनातली क्षणभर लखलखणारी वीज भासावी तशीच ही अक्षय उर्जा होय. मात्र हे इतके सहज साध्य नाही, हे सांगताना ते मधल्या एका ओवीत म्हणतात की गृहस्थाश्रमाचे ओझे जड होते म्हणुन संन्यास घेतात मात्र संन्यासकर्माचे ओझे हे त्याहुन कठीण आहे. बाराव्या अध्यायात तर ते योग्यांच्या मार्गाला किती संकटे असतात तेहि सांगतात. -


“ कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग । आणि शून्येंसीं आंग । झुंजवावें कीं ॥
ताहानें ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावीं । मवावा वारा ॥
शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घरांआंतु ॥
किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा । भातारेंवीण करावा । तो हा योगु ॥
ऐसें मृत्यूहूनि तीख । कां घोंटे कढत विख । डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ? ॥
म्हणौनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ “


कामक्रोधांची वादळे येतात, तहान लागली की तहान पिऊनच रहावे लागते, भुक लागली की ती भुकच खाऊन पोट भरावे लागते, थंडीत वाराच पांघरावा लागतो तर उन्हाळ्यात उन सहन करावे लागते. किंबहुना पती नसताना सती जाण्यासारखा हा प्रकार आहे. जळजळीत विष प्यावे किंवा डोंगर खाताना तोंड फाटावे असे क्लेष वाटेला येतात. थोडक्यात सामान्यांनी निष्कारण व्यवस्थित चाललेला संसार सोडुन मुक्तीच्या मागे पळु नये असेच त्यांना वाटते आहे. कदाचित आपल्या आई वडिलांच्या व तदनंतर या चार भावंडाच्या वाटेला आलेल्या क्लेषाचा हा परीणाम असेल किंवा गीतेत सांगितलेली योग्याची लक्षणे अनुभवल्यानंतर आलेला हा शहाणपणा असेल पण देव मिळवायला कार्य विन्मुख होऊ नये असेच ज्ञानदेव सांगताना दिसतात.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडें सारख्या दिग्गजांनी रामदास स्वामी वगळता बाकी सगळ्या संतांना टाळकुटे व परकिय आक्रमण आले असतां देव-देव करायला लावल्याचे आरोप ठेवले आहेत. इतिहासाचार्यांच्या नखाचीही सर मला नसताना त्यांचे हे मत तितकेसे बरोबर नव्हते हे नम्रपणे नमुद करावेसे वाटते. तसे असते तर तत्कालिन भारताची अवस्था बुध्द धम्माच्या उदयानंतर पाचशे वर्षांनी जशी युध्दविन्मुख होत गेली भारताच्या पौरुषाचे जे नुकसान झाले तशीच झाली असती. पण तसे झाले नाही आक्रमणे भरपुर झाली मात्र याच संतांमुळे लोकांत आशा जिवंत राहिली हेच खरे.

ज्ञानेश्वरांबाबत कितीही लिहिले तरी कमीच आहे. ते सद्गुरु आहेत, ती माऊली आहे. असामान्य बुध्दिमत्ता व आत्मज्ञानाची जाणीव झालेली एक लोकोत्तर अद्भुत व्यक्ती असेच ज्ञानदेवांचे सरळ सोपे वर्णन करता येईल. नियतीने दिलेले कार्य पुर्ण केल्यावर कसलाही मोह न धरता ते शांतपणे समाधीरुप झाले. “तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर। असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ “ हे गीतेतलेच वचन ते जगले असेच म्हणावे लागेल. आज सातशे वर्षांनी देखिल ज्ञानदेव एखाद्या पुराणकालिन अश्वत्थ वृक्षाप्रमाणे अखंड शीलत सावली देत उभेच आहेत. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात क्षणभर त्याच अश्वत्थाच्या सावलीत विसावा घेऊन, त्यांची एकतरी ओवी अनुभवण्याचा हा तोकडा प्रयत्न.


- सौरभ वैशंपायन

Wednesday, July 22, 2009

पुकार

पहिल्यांदाच हिंदिमध्ये लिहायचा प्रयत्न आहे. माहित नाहि किती यशस्वी होतोय ते?
-------------------------------------------------------

युध्द - ज्वर का यज्ञ हो, हो विजय कि आरती।
रक्त का अभिषेक हो, मॉं भारती पुकारती। - १

व्युहसे न डर तु पार्थ, कृष्ण जब हो सारथी।
चाप फिरसे कर में ले, मॉं भारती पुकारती। - २

तीर का न क्षय तेरे, तु हि राम भू-पती।
अश्वमेध यज्ञ कर, मॉं भारती पुकारती। - ३

राष्ट्रगान मंत्र गर, न होगी राष्ट्र दुर्गती।
ले सृजन का ध्यास तू, मॉं भारती पुकारती। - ४

- सौरभ वैशंपायन.

Monday, June 15, 2009

सोहळा

काजळ उधार मागावे, तुला आभाळाने आज
अन सोबत मागावी, तुझ्या कटाक्षाची वीज - १

मग अधीर थेंबांनी, तुझी मोहरावी कळी,
एक अवखळ बट, अन गालावर खळी - २

ओला आसमंत सारा, ओला मातीचा सुवास,
ओली ओठांची पाकळी, ओले मोकळाले केस - ३

अशी कडाडावी वीज, उरामध्ये झंझावात,
ओले गौर तनु तुझे, ओघळावे अंतरात - ४

सये असा उतरावा, तुझ्या रुपाचा सोहळा,
आणि कोसळुन जावा, नवा पाऊस हळवा - ५

- सौरभ वैशंपायन.

Thursday, June 11, 2009

इतिहास

सेंट हेलेनातील तुरुंगातुन नेपोलियन ने आपल्या मुलाला जे पत्र लिहिले त्यात तो म्हणतो – “इतिहासासारखा गुरु नाहि, आयुष्याचे तत्वज्ञान ज्याला म्हणतात ते इतिहासाच्या मननानेच तयार होते!” स्वत: इतिहास घडवणार्‍या माणसाचे हे अनुभवी शब्द आहेत. इतिहास हि काळाची पाऊले आहेत, काळ स्वत: पुढे जाताना हि पाऊले मागे ठेवुन जातो. काळ स्थितप्रज्ञ असला तरी त्याची पाऊले कुठल्या दिशेने पडतील हे समजायला त्याच्या आधीच्या पाऊलांची दिशा बघणे क्रमप्राप्त असते. आणि वेळ पडल्यास राष्ट्र निर्मितीसाठी ती पाऊले बदलण्याची ताकद अंगी बाणावी लागते. इतिहासात काय घडले ह्याचा बारीक अभ्यास केला तर भविष्यात इतिहास घडवता येतो – वाक्य विचित्र वाटेल पण खरे आहे. हिटलर ने सिध्द करुनहि दाखवले. सत्तेत आल्यावर त्याने दरवेळी अश्या कृती केल्या ज्याने जर्मन राष्ट्राच्या अस्मितेला चेतवले जाईल. मग ते व्हर्साय कराराच्या जाहिर चिंध्या करणे असो, किंवा फ्रान्सची शरणागती त्याच गाडिच्या डब्यात घेणे असो. ज्या घटनांनी जर्मनीच्या मानहानीचा इतिहास रचला त्याच घटनांना त्याने उलटे फिरवले. मात्र हाच हिटलर रशियावर हल्ला करताना इतिहासातील काहि गोष्टि नजरेआड करता झाला आणि जर्मनी पराभवाच्या गर्केत फेकला गेला.“

काय करायचे?” या पेक्षा “काय करायचे नाहि?” हे इतिहासापासुन शिकावे. इतिहास बदलणे शक्य नसते वेळप्रसंगी निदान शब्द बदलावेत. इतिहास शिकवतानाच राष्ट्रीय अस्मितेला हात घातला जाईल असा शिकवावा. आपापल्या देशाचा नागडा स्वार्थ कसा साधावा व प्रसंगी दुसर्‍याला नागवुन आपले भले कसे करावे याची उदाहरणे जगाच्या इतिहासात पानोपानी मिळतील. दुसर्‍या महायुध्दाआधी ब्रिटिशांनी जगाचे मातेरे केले आणि नंतर अमेरीकेने. या जगातला असा एकहि भाग नाहि जिथे या दोन उपद्रवी देशांनी अशांतता निर्माण केली नाहिये. स्वत:च्या पोळिवर तुप ओढताना या दोघांनी कसल्याहि नीती नियमांची तमा बाळागली नाहि. किती रक्तपात होतो याची फिकिर केली नाहि. यांनी शस्त्राच्या बळावर आपल्याला हवा तसा इतिहास लिहिला. हवे तसे निष्कर्ष काढले. पण म्हणून काळ त्यांना माफ करेलच असे नाहि. आज दहशतवाद अमेरीकेला उध्वस्त करायला उस्तुक आहे आणि हे अमेरीकेच्या कर्माचेच फल आहे. पण इथे भारताचे बरोबर उलटे झालेय, दरवेळी पडती बाजु घेतल्याने भारतासमोर दहशतवादाचा प्रश्न उभा आहे.

प्रत्येक भूमीचा एक स्वभाव असतो. जसा मध्यपुर्वेच्या भूमीला कायम रक्ताची तहान आहे तशीच भारताची भूमी हि मुळातच शांतताप्रिय भूमी आहे. गेल्या अडिच हजार वर्षात भारताने कोणावरहि आक्रमण केले नाहिये, मात्र भारतावर अव्याहत आक्रमणे झाली. जगात भल्याभल्या संस्कृती आणि साम्राज्ये उदयास आली अणि धुळीला मिळाली, मात्र भारत सगळी आक्रमणे पचवुन आजहि उभा आहे, नाहि म्हणायला काहि कधी भरुन न येणार्‍या काहि जखमा झाल्याहि पण वैदिक संस्कृती मात्र नामशेष झाली नाहि. असे असताना डॉ. आंबेडकरांसारखा विद्वान जेव्हा “हिंदुंचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे!” असे विधान करतो तेव्हा राग येण्यापेक्षा त्रागा होतो. मुळात इतिहास शिकवण्यातच चुक होतेय. जग पालथे घालणारा सिकंदर भारताचे अंगणहि पार करु शकला नाहि, हुण, शक यांच्या टोळधाडि जगभर उच्छाद मांडत असताना भारत त्यांना पुरुन उरला हे का सांगत नाहि? एकछत्री साम्राज्याचे स्वप्न देणार्‍या आर्य चाणक्यांचा इतिहास का शिकवत नाहि? मुघलांचा इतिहास २ धड्यांत विभागुन दिला जातो मात्र शिवछत्रपती, राणाप्रताप एकेका परीच्छेदात संपतात याचे आश्चर्य वाटते. संभाजीराजे आणि थोरल्या बाजीरावांचा २ ओळिंपेक्षा जास्त उल्लेखहि मिळत नाहि. पण दुसर्‍या बाजीरावाच्या पानभर चुका दाखवल्या जातात. १८५७ ला शिपाईगर्दि ठरवले जाते. टिळक मंडालेयात हवापालटाला काय गेले होते आणि वेळ जावा म्हणून गीतारहस्य लिहिला जवळपास अश्या पध्दतीचा इतिहास शिकवला जातो. सगळे क्रांतिकारक एकमेकांच्या कोपरांना ढुश्या देत बिचारे एकाच धड्यात कोंबले असतात. बाकि इतिहास १९२० पासुन सुरु होतो. आणि व्हाया १९४२+ गोलमेज परीषद, लाल किल्यावर संपतो. सगळं कसं मिळमीळीत. बचावात्मक मानसिकता तयार करायची सवयच लागलीये. जरा म्हणून आक्रामकता नाहि. तीच तीच पाठ्यपुस्तके, तीच जरुरीच्या मार्कांपुरती बघायची दृष्टि. तसेहि इ.भू.ना. मध्ये ५० मिळाले कि आम्हि धन्य. खर्‍या अर्थाने उद्याचे नागरीक घडवणार्‍या या तीन विषयांबाबतच कमालीची अनास्था. सन आणि तहांची कलमे लिहिली कि मार्क्स मिळतात. बाकि वासुदेव बळवंत फडके कोण? सुभाषबाबुंनी काय अग्निदिव्य केले? याच्याशी काहिहि सोयरसुतक नसते. शिवरायांना रायगडावर जन्माला घालणारी आणि शिवनेरीवर राज्याभिषेक करवणारी विद्वान मंडळी कमी नाहित. हि आमची इतिहासाबद्दलची आस्था. चित्रपट बनवले तरी त्यात असोका कलिंगच्या राजकुमारीबरोबर नाचतो, आणि अकबराला जोधा शिवाय काहि दिसत नाहि.


आमच्या राजधानीत आजहि घोरी, बाबर, अकबर, हुमायुन, औरंगजेब यांच्या नावाचे रस्ते आहेत, मुंबईच्या संग्रहालयाच्या पाटिवर “छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय” या शेजारी कंसात - “जुने प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय” असे लिहिले जाते. गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभिकरच्या नावाखाली करोडो रुपये खर्च होतात पण युनियन जॅक आपल्या बगलेत मारुन शेवटचा ब्रिटिश याच वास्तुमधुन बाहेर पडला असे शिल्प सोडा साधी पाटिहि लावली जात नाहि. शिवरायांचा पुतळा समुद्रात उभा करायला काहि शे करोड रुपये जाहिर करतात पण एकेकाळी महाराजांच्या काळजाचे तुकडे असलेले बेलाग किल्ले मोडकळिस आले आहेत हे सोयीस्करपणे सरकार व जनता विसरते. भारताला स्वातंत्र्य “बिना खड्ग बिना ढाल” मिळाले हे धातांत असत्य सांगताना कोणाची जीभ जराहि अडखळत नाहि. आमचे जवान युध्द जिंकतात आणि नेते त्यांना त्यांच्या सहकार्‍यांच्या रक्तरेषेवरुन परत बोलावुन, "झाले गेले विसरुन जाऊ" अशी चाल न बदलणारी शांततेची रटाळ गाणी गातात. मग आत्मिक समाधानासाठी आम्हि “इस्त्राएल असं नाहि करत!” म्हणुन त्यांच्यासाठी चार टाळ्या वाजवतो आणि शांत होतो. कारण आमचा शालेय इतिहास हा अहिंसा शिकवतो एका कानफटात मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला सांगतो. निदान आपल्या देशाने जसे वागावे असे वाटते तसे दुसरा देश वागतोय हे दिसल्यावर अशी सहाजिक भावना त्यापाठी असते. मग यातुनच स्वकियांचेच कसे चुकले हेहि सांगणारी कोडगी मनोवृत्ती तयार होते. "अकबर महान सम्राट था, शिवाजी तो लुटेरा था।" अशी गरळ उत्तरेतली तरुण मंडळी इंटरनेटवर ओकताना सापडतात. या वृत्तीला समाजवादि, कम्युनिस्ट किंवा मानवतावादि वृत्ती असेहि समानार्थी शब्द आहेत. ते चुकिचा इतिहास अजुन रंगवुन सांगतात. हे चक्र अव्याहत चालुच राहते. बरं शिकवा पानिपताचा पराभव कोण नको म्हणतोय? पण हेहि सांगा कि हे राष्ट्रावरच संकट एकट्या मराठ्यांनी आपल्या छातीवर घेतलं. अब्दालीला असा फ्टाकारला कि परत दिल्लीत फिरकला नाहि. डंकर्कच्या पळपुटेपणाला यशस्वी माघार म्हणावताना त्यांना लाज वाटत नसेल तर राष्ट्र वाचवताना रणात मरुन पराभव झाल्याची खंत आपण का बाळगावी? पण चर्चेत सर्व गमावुन यशाला गालबोट लावणारे, पराभवाची धुंदि तरी बाळगतील हे शक्य नाहि.


आम्हि आमचा इतिहास लिहित नाहि, मग कोणी ग्रॅंट डफ मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणवला जातो, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला इंग्रज उठाव-जिहाद म्हणतात आम्हिहि तेच मानतो, जगभरातील नकाशे “POK” पाकिस्तानचा भाग दाखवतात आम्हि आक्षेपच घेत नाहि. तिबेट गिळुन चीन सिक्कीमकडे वळतोय आम्हि निद्रिस्त. स्वत:लाच एकदा विचारा पुर्वेकडील सातहि राज्यांची नावे एका फटक्यात मला सांगता येतात? त्यांची राजधानी कोणती ते मला माहितीये? त्यांचा इतिहास मला माहितीये? त्यांना मी “ए चीनी” अशी हाक मारतो आणि आमच्याशी जोडलेली नाळ हिसडामारुन तोडतो. याच गोष्टितुन इतिहास घडतो, विघटनवादि वृत्ती येते मग ते आपल्याकडे बोट दाखवुन “यु इंडियन” अशी हाक मारतात. काळ अश्या चुकांना माफ करत नाहि.

इतिहासात काय नाहि? देव देश, धर्म, भाषा, विज्ञान, कला, भूगोल या सगळ्याला इतिहासाने वेढले आहे. हाच इतिहास जपा, मनन करा, राबवा अन्यथा कोणी जेम्स लेन येऊन तो विकृत करेल आणि आम्हि एकमेकांची नरडि धरु. परत ये रे माझ्या मागल्या… आम्हि भांडु आणि पुस्तकात परकियांच्या कौतुकाचे पोवाडे गायले जातील.

अजुन काय लिहिणे सुज्ञ असा.

लेखनसीमा।


- सौरभ वैशंपायन.

Tuesday, May 19, 2009

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..... लता दिदिंनी गायलेलं सुंदर गाणं, प्रथम या गाण्याचे कवी ग्रेस आहेत असं मला वाटलं होत, पण हे सुरेश भटांनी लिहिलेलें काव्य आहे(माहिती दिल्या बद्दल धन्यवाद यशोधरा आणी प्रशांत).


Get this widget | Track details | eSnips Social DNA

Monday, May 18, 2009

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा...

परवा १६ तारखेला निवडणुकिचा निकाल लागला. त्यावरुन आचार्य अत्र्यांचा एक किस्सा आठवतोय. अशीच निवडणुकिची रणाधुमाळी झाली, अत्रे स्वत: उभे होतेच पण स्वत:च्या भागात प्रचार करण्यापेक्षाहि जास्तवेळ आपल्या साथीदारांच्या प्रचारात घालवला विशेषत: स. का पाटिलां विरुध्द जो उमेदवार उभा होता त्यासाठीतर त्यांनी आपले वक्तृत्व पणाला लावले. सकांवर अत्र्यांचा खास राग होता. स का पाटीलांना ते "नासका पाटील" म्हणत. झालं मत मोजणीला सुरुवात झाली बातमी आली अत्रे जिंकले, पाठोपाठ बातमी आली सका पाटील पडले. अत्र्यांनी प्रचार केलेला उमेदवार दणदणीत जिंकला. अत्रे दुहेरी खुषीत घरी आले, हार-तुरे स्वीकारत दारात उभे राहिले त्यांच्या मुलीने ओवाळायला तबक समोर धरले आणि एक कार्यकर्ता बोंबलत आला "साहेब, घोळ झालाय, मगाची बातमी चुकिची होती तुम्हि हरला आहात....साहेब तुमचा पराभव झालाय!" सगळ्या कार्यकर्त्यांवर निराशा पसरली पण हतबुध्द होतील ते अत्रे कसले आपल्या पहाडि आवाजात ते मुलीवर ओरडले "अगं मी पडलो म्हणुन काय झालं??? सकाला त्याच्या एरीयात जाऊन पाडलाय तु ओवाऽऽऽळ!!" हा किस्सा आठवायचे कारण असे कि सध्या महाराष्ट्रात तशीच घटना पुन्हा घडलीये, १५व्या लोकसभेच्या निवडणुकीत नवखी मनसे सपशेल आपटली एकहि जागा मिळाली नाहि पण मुंबईच्या सहाहि जागांवर त्यांनी इतकी मतं खाल्ली कि शिवसेनेला त्याचा जबर फटका बसुन शिवसेनेच्या मुंबईतील सहाहि जागा गेल्या. तुला ना मला.... अशी अवस्था झाली.

सत्तेची वारांगना काय खेळ खेळेल आणि भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळवेल ते सांगता येत नाहि. या निवडणुकेच्या आधी केलेली सगळी भाकिते आणि गणिते चुकवत कॉंग्रेसने मित्रपक्षांसकट २६१ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले. आता २७२ च्या आकड्यासाठी त्यांना अजुन फक्त ११ खासदार हवे आहेत. ते मिळाले कि पुढल्या आठवड्या भरात मंत्रीमंडळ व शपथविधींचे कार्यक्रम होतील कि पुढली ५ वर्षे बघायला नको. मुंबईवरील हल्ला, जगभरातील आर्थिक मंदि व त्यामुळे बेरोजगारी, महागाई असे प्रश्न सरकार पुढे उभे होते. भाजपाला परत संधी आहे असे जाणवत होते. अणुकराराच्या घटनेत हातालाच हात दाखवुन अवलक्षण करणारे उपद्रवी डावे भलत्याच प्रादेशिक पक्षांची मोळी बांधुन तिसरी फळी उभी करत होते. तर काहि अति शहाणे चौथी फळी उभी करत होते. मायावती, जयललिता, लालु-पासवान, डावे सगळे फालतु भाव खात होते मधुनच महाराष्ट्रात "मराठी पंतप्रधानाची" पुडी सोडली जात होती. कोणाचाहि पायपोस कोणाच्या पायात नव्हता. भाजपा - कॉंग्रेस कोणीहि आले तरी टेकुचे राजकारण होण्याची चिन्हे होती. मग ह्याला कडेवर घे, त्याचे गालगुच्चे घे, याची दाढी कुरवाळ हे प्रकार पुढले ५ वर्ष होणार हेहि समजत होते. आणि १६ तारखेला दुपारी १२ पर्यंत सगळं चित्र नीट समजलं उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश इथे कॉंग्रेसने मुसंडि मारुन आपली खुंटि बळकट केली होती. एरवी कॅमेरासमोर यायला उत्सुक चेहरेच गायब झाले, अडवाणींसारखा दिग्गज निवृत्तीची भाषा करु लागला. डाव्यांच्या तर कोणीतरी उलट्या हाताने सणसणीत मुस्काटात मारावी अशी अवस्था झाली. २००४ मध्ये ४३ जागांवर असलेले हे अडेलतट्टु लाल खेचर या निवडणुकित माकप १६ तर भाकप ६ वर आले(या गोष्टिवर मी मनातल्या मनात किमान लाखाची माळ वाजवली आणि दिवसभर नाशिक ढोलावर नाचत होतो!). एरवी विनाकारण धावणारी रालुंच्या राजदची आगगाडी ४ वर अडवली (इतकेच कशाला लालुप्रसाद पाटाण्यात पटाशीच्या दातांवर आपटले आहेत.)


मी भाजपासमर्थक असलो तरी यावेळी जे झाले ते चांगलेच झाले असे वाटतेय. मुख्यत: एका मोठ्या पक्षाचे सरकार आले आणि पुढील पाच वर्ष स्थिर सरकार राहणार हे नक्कि झाले. निदान आर्थिक मंदिच्या काळात सरकार स्थिर असणे अतिशय महत्वाचे होते. पावलापावलाला अडवणुक करणारे लालभाई आता फार फार तर रागावलेले लाल डोळे आणि जनतेने जाहिरपणे फोडलेले थोबाड घेऊन विरोधी बाकावर बसतील आणि हात चोळण्यापलीकडे काहिहि करु शकणार नाहित हि २००९ मधली सर्वात मोठी गॊष्ट. बरोबरच स्थानिक पक्षांचे असलेले अवास्तव महत्व कमी होऊन जनतेने राष्ट्रिय पातळीवरील पक्षांनी मते दिली हि त्याहुन उत्तम गोष्ट. लोकशाहि प्रगल्भ आणि बळकट होतेय हे दाखवणारी घटना आहे. २००४ मध्ये कॉंग्रेसला १४५ जागा मिळाल्या होत्या तर यावेळी त्यांना २०६ जागा मिळाल्या. भाजपाला चांगलाच फटाका बसलाय २००४ मध्ये त्यांना १३८ जागा मिळाल्या होत्या यावेळी त्यांना ११६ जागा मिळाल्या आहेत म्हणजे २२ जागा निसटल्या आहेत. प्रमोद महाजनांची उणीव, अटलजींची निवृत्ती, आपापासतले हेवेदावे, आणि राजस्थाम - मध्यप्रदेशातील फाजील आत्मविश्वास भाजपाला नडलाय. आता डोळे उघडतील हि अपेक्षा. तरी यावेळी सरासरी ५२-५३% इतकेच मतदान झाले ते निदान ७०% झाले असते तर कदाचित निर्णय थोडे बदलले असतेहि पण हि जर तर ची गोष्ट झाली.

आता थोडं महाराष्ट्राबद्दल - महाराष्ट्रात देखिल या निवडणुकिने बरेच राजकिय भूकंप घडवुन आणले आहेत. अर्थात इथेहि कॉंग्रेसची चांदि झाली आणि वेगवेगळ्या कारणांनी राष्ट्रवादि - शिवसेना यांना फटके बसले आहेत. मुंबईत मनसे इफेक्ट मुळे शिवसेनेच्या सगळ्या जागा गेल्या. सुरुवातीला म्हणालो तसे तुला ना मला घाल... अशी अवस्था नक्किच झाली विशेषत: मनसेने मराठीच्या मुद्यावरच शिवसेनेची लाखा - लाखांची मते खाल्ली आणि आपोपाप काहि अमराठी नेत्यांना मुंबईतुन लोकसभेवर जायला वाट करुन दिली. ह्याला विनोद म्हणा किंवा दैवदुर्विलास म्हणा पाच वर्षे काहिहि करु शकत नाहि. शिवसेनेहि हि अवस्था तर राष्ट्रवादिचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्र खिळखिळा झाल्याची जाणीव त्यांना झाली. कोल्हापुरात मंडलिकांनी केलेली यशस्वी बंडखोरी आता राष्ट्रवादिसाठी नक्किच चिंतेचा विषय आहे. तर हातकणंगलेतील शेट्टींचा विजय हा तिथल्या शेतकर्‍यांचा राष्ट्रवादिवरील उघड रोष दाखवतो, तिथे प्रचारासाठी तळ ठोकुनहि जयंत पाटिल काहिहि चमत्कार घडवु शकले नाहित यावरुन राष्ट्रवादिने धडा घ्यावा. असाच फटाका भाजपाला विदर्भात कॉंग्रेसकडुन मिळाला पण उत्तर महाराष्ट्रात अचानक चार जागांचा जॅकपॉट लागल्याने निदान भाजपाची लाज राखली गेली म्हणायची. उत्तर महाराष्टात राष्ट्रवादिने समीर भुजबळांच्या रुपाने एकमेव जागा जिंकली ती सुध्दा २०००० च्या निसटत्या फरकाने. मात्र हरुनहि हिरो ठरले ते मनसेचे हेमंत गोडसे. २ लाख मते खेचणार्‍या गोडसेंना नक्किच दाद द्यायला हवी. उत्तर महाराष्ट्रातल्या जातीय प्रचाराला कंटाळलेल्या आणि तरुण मतदारांनी गोडसेंना हा कौल दिला हे उघड आहे. सध्या तरी मुंबईच्या पराभवामुले सन्नाटा @ शिवसेना भवन असे वातावरण आहे. काल पासुन "बाळासाहेबांचे स्वप्न चक्काचुर केल्याबद्दल धन्यवाद राज ठाकरे!" असे खोचक sms फिरत आहेत. पण एकुण बघता राज ठाकरेंना जे साध्य करायचं होत ते त्यांनी केलं. पंजाच्या लढाईत हरल्यावरहि समोरच्याच्या ताकदिपेक्षा आपली बेटकुळी किती फुगते हे त्यांना आजमावयाचे होते ते त्यांनी केले. उलट आता मनसेची खरी परीक्षा आहे. येत्या चार महिन्यात जी विधानसभा निवडणुक येते आहे त्यात आपली करामत मनसेला दाखवणे आता भाग आहे कारण लोकांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत हे उघड आहे. सत्ता मिळाली नाहि तरी नजरेत भरतील इतक्या जागा जिंकुन विधानसभेचे व्यासपिठ स्वत:साठी मिळवणे आता मनसेला क्रमप्राप्त आहे.

जाता जाता आजची दणकेबाज गोष्ट सांगतो आज सकाळी ११:५५ च्या सुमारास निर्देशांकाने उसळी घेतली आणि थेट १४ हजारावर उडि मारली. स्थिर सरकार आलं म्हंटल्यावर निर्देशांकात वाढ होणार हे नक्कि होतं, पण १०% ची उसळी? कि त्यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच अप्पर सर्किट लागण्याचा प्रकार घडवा? अखेर दिवसभरात दोनदा अप्पर सर्किट लावल्यानंतर बाजाराचे व्यवहार दिवसभरासाठी थांबवण्यात आले. एका तासात १०% पेक्षा जास्त चढ-उतार झाल्यास त्याला सर्किट म्हणतात, अश्यावेळी मार्केट अजुन अस्थिर होऊ नये म्हणून सेबी ताबडतोब थोडावेळ अथवा दिवसभरहि मार्केट बंद करते. दिवसभरात २ वेळा सेबीची धावपळ झाली हि मंदिच्या काळात टाळ्या वाजवण्यासारखि गोष्ट आहे.

एकुण काय नव्या कॉंगेस सरकारची आणि पर्यायाने देशाची सुरुवात चांगली झाली आहे म्हणायची. पुढे ५ वर्षात काय घडते ते काळावर सोडुन महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेवर लक्ष ठेवा!

Wednesday, April 29, 2009

परीभ्रमणे कळती कौतुके

१ फेब्रुवारी तारीख उजाडली तशी माझी दिवसांची उलटि मोजणी सुरु झाली. उत्तर भारताची सफर करायला मी अधीर झालो होतो. मुळात वैष्णोदेवीच्या निमित्ताने उत्तरेत जात होतो, म्हणुन परत येताना अमृतसर – दिल्ली– मथुरा - आग्रा असे करुन यायचे ठरवले. ६ तारखेला मुंबईहुन निघालो वैष्णोदेवी ला म्हणजे जम्मुला.मुंबईहुन श्री. दुग्गल दरवर्षी किमान ५००-६०० जणांना घेउन हि यात्रा करतात. देवीवर त्यांची अपार श्रध्दा आहे. ना नफा - ना तोटा तत्वावर ते हि यात्रा नेतात. अतिशय सुंदर व्यवस्था असते. विशालने याबद्दल सांगितले तेव्हाच जायचे हे नक्कि झाले. बर कटराला जाईपर्यंतचा खर्च म्हणजे सिंगल तिकिट – जातानाचे गाडितले जेवण/सुकामेवा/आयस्क्रीम/फळे/चहा/नाश्ता – कटरात रहायची सोय- व तिथले२ दिवसांचे जेवण/चहा-नाश्ता यांचा एकुण खर्च यावर्षी १९००/- फक्त आला होता. थोडक्यात फक्त वैष्णोदेवी ला जाऊन येण्याचा खर्च २५००/- पर्यंत आटपु शकतो. या शिवाय दुग्गलांनी एक चांगली मोठी ट्रॅव्हल बॅग, एक ताट, भांडे, एक नॅपकिन, आणि ब्रश-पेस्ट-साबण असे टॅव्हलिंग किट दिले होते ते वेगळेच. थोडक्यात घरुन बुड हलवुन बांद्रा टर्मिनसला गाडित टेकवायचे कष्ट तेव्हढे घ्यायचे होते.

६ तारखेला बांद्रा टर्मिनस वरुन सकाळी ७:३० ला ’जम्मुतावी उर्फ स्वराज्य’ गाडित बसलो. गाडि गुजरात –राजस्थान - मध्यप्रदेश – राजस्थान – दिल्ली – हरीयाणा – पंजाब मार्गे जम्मुला जाते. स्वत:चा कॅटाररचा व्यवसाय असल्याने दुग्गलांनी गाडीत खाबुगीरीची भरपुर सोय केली होतीच, म्हणजे गाडित सकाळी नाश्त्याला ढोकळा,समोसा,अळुवडि, २ ब्रेड स्लाइस, जाम-बटर असा सरंजाम होता. मग दुपारचे जेवण त्यात पनीरची भाजी, दाल - जीरा राईस होता. जेवणा पाठोपाठ सुकामेव्याची पाकिटे, चॉकलेट आयस्क्रीम, मग फळे म्हणुन द्राक्षे असा अक्षरश: मारा करत होते. तो खाऊन होत नाहि तोच संध्याकाळचा नाश्ता म्हणुन बिस्कीटे आणि अमुल कुल ची बाटली हातात थोपवली. इतके खाऊनहि संध्याकाळी ६:१५ ला रतलामला पोहोचलो तिथे रतलामचे पोहे खाल्लेच वा! झकास! थोडक्यात पोटावर लाडिक अत्याचार सुरु होते. रात्रीचे जेवण सुध्दा मटारची सुंदर भाजी आणि रोटि होती.

नागदा – कोटा करत ७ तारखेच्या पहाटे ४:४० ला नवी दिल्लीला पोहोचली सगळी गाडि थंऽऽऽऽड पडली होती. नवी दिल्ली स्टेशनच काय कोणी न्यूयॉर्क आलय असं सांगितलं असत तरी उबदार पांघरुणा खालुन कोणीहि बाहेर आलं नसतं. स्वेटर-हातमोजे विकणारे गाड्यांच्या डब्यात शिरुन त्यांचा धंदा करत होते. एका चक्कर मध्येच त्यांची बॅग अर्ध्याने हलकी झाली. त्यांच्या ओरडाण्यानेच जाग आली तेव्हा कळले नवी दिल्ली स्टेशन आले आहे. चाळावलेली झोप ये –ये करुन परत बोलवण्यात १० मिनिटे गेली. थेट ७:३५ ला जाग आली. अंथरुण आवरेपर्यंत अंबाला(सकाळी ७:४५))आलेच, तिथे कुलचा खाल्ला. पुढे लुधीयाना(१०:००) जालंधर(११:००) अशी स्टेशन घेत अखेर दुपारी ४:३०ला जम्मुला थडकली गाडिची खरीवेळ २:३०pm होती पण हा उशीर होतोच, उलट विशाल तर मागच्या वर्षीपेक्षा दिड्तास लवकर पोहोचलो म्हणुन खुषच होता. स्टेशन बाहेर पडलो. गारवा जाणवत होता. बाहेर दुग्गलांनी बसची सोय करुनच ठेवली होती. जम्मु ते कटरा साधारण ५०-५४ कि.मी चे अंतर २ तासात कापता येते. गाडि सुरु झाली तशी, गार वार्‍यामुळे पहिल्या ५ मिनिटातच गाडिच्या सगळ्या काचा बंद झाल्या होत्या. उजव्या हाताला दरी ठेवुन गाडि एक-एक पिनबेंड घेत रस्ता कापत होती. मध्ये मध्ये पाण्याची डबकि देखिल दिसत होती दोन दिवसांपूर्वीच पाऊस पडुन गेला होता हे नंतर समजलं. उंचावर असल्याने इथे अंधार लवकर होतो. ६ वाजताच काळोख पसरायला सुरुवात झाली तसे समोरच्या उंच पहाडावर अगदि माथ्यापर्यंत दिव्यांची एक माळच गेली होती. ती दाखवत विशाल म्हणाला “हि दिव्यांची रांग बघ, सगळा वैष्णोदेवीचा रस्ता आहे. सर्वात वर भैरवनाथाचे मंदिर आहे. वैष्णोदेवीचे मंदिर पहाडाच्या त्या भागात येते ते इथुन दिसत नाहि.”


साधारण संध्याकाळी ७ वाजता कटरात पोहोचलो. सम्मोर वैष्णोदेवीचा पर्वत होता. पांढर्‍या-पिवळ्या दिव्यांची एक रेष अगदि माथ्याला भीडली होती अगदि “नव लाख वीजेचे दिप तळपती येथ…!” असाच झगमगाट होता. दुग्गलांनी जम्मु-काश्मीर पर्यटन विभागाच्याच यात्री निवासात सगळी सोय केली होती. आवरायला सोपे जावे म्हणुन आम्हि सहा जणांनी वेगळ्या दोन खोल्या घेतल्या. अतिशय छान खोल्या होत्या. समोर रात्रभर तो दिव्यांनी नटलेला डोंगर दिसत होता. रात्री ९:३० ला निवासा मागेच जेवणाची सोय होती. आम्हि जेवुन कटराच्या बाजारात एक फेरफटका मारला. सकाळी लवकर निघायचे ठरवुन आम्हि आपापल्या खोलीत झोपायला गेलो.

सकाळी ४:३० ला उठुन आवरले पण तरी निघायला ७:३० झालेच. वैष्णोदेवीच्या यात्रेत पायथ्यापासुन माथ्या पर्यंत “अर्धकुंवारी – वैष्णोदेवी – भैरवनाथ” अशी मंदीरे आहेत. एका दिवसात तीन्हि करणं थोडं कठीण काम आहे. कारण कटरा ते भैरवनाथ हे अंतर फक्त १४-१५ किमी असलं तरी सगळा चढ असल्याने सवय नसल्यास थकवा येतो. शिवाय अर्धकुंवारी मुळ वाटेपेक्षा २ किमी डावीकडे असल्याने जाऊन-येऊन ते ४ किमी होतं. थोडक्यात संपुर्ण टप्पा हा परतीच्या प्रवासासकट ३० किमी आहे. वरती दर्शनासाठी एक पर्ची खाली कटारामध्येच घ्यावी लागते हि फुकट असते आणि संस्थानाच्या संगणकिकृत कार्‍यालयात मिळते यात किती माणसे आहेत, कोण पर्ची घेतय त्याचं नाव, पुरुष-स्त्रीया-मुले यांची संख्या यांची नोंद असते. पर्ची घेतल्या पासुन ६ तासांत मंदिराकडे निघावं लागतं. मात्र हि पर्ची नसेल तर वैष्णोदेवी मंदिरापासुन मागे फिरावं लागतं त्यामुळे ज्यांना हे माहित नाहि ते शिंगरा सारखे हेलपाटे घालुन मरतात. बहुदा सुरक्षा आणि मुख्यत: रोज येणार्‍या भक्तांची संख्या मोजण्याची हि चांगली सोय आहे. वर डोंगरावर रांगा लावायला फारशी मोकळी जागा नसल्याने पायथ्याशीच या पर्चीची सोय केली आहे. इथे वर जायला घोडे – हॅलिकॉप्टर यांची सोय आहे. पंजीकृत घोडेमालकांकडुनच घोडा घ्या असे कार्यालयात बोर्ड लावले आहेत. जाऊन – येऊन ६२५/- रु मध्ये हि यात्रा करता येते. मात्र अर्धकुंवारीचे याशिवाय १२५/- रु वेगळे घेतात. हॅलिकॉप्टरचा एक वेळचा प्रौढांसाठीचा खर्च १३००/- रु आहे.

हर्षदला पायाला दुखापत असल्याने डॉक्टरांनी “आधीच पाय बोंबललाय, घोडा किंवा पालखी करुन जाणार असलास तरच जा!” अशी तंबी दिल्याने तो घोड्यावरुनच जाणार हे ठरलं होतं. मग सगळेच घोड्यावरुन जायचे असे ठरले. चालत तीन्हि होणं कठीण आहे घोड्याने वेळ तरी वाचेल म्हणुन सगळे तयार झाले. मला मिळालेल्या घोड्याचे नाव “बादल” होतं. घोड्याचे मालक त्यांना डोगरी भाषेत आदेश देत होते. “इकोड्डा” हॅक-हॅक असे काहितरी वसा-वसा घोड्यावर ओरडायचे, कि घोडा दुडक्या चालीने भराभर पुढे जायचा. डोगरी भाषेत इक्कोड्डा म्हणाजे घोडा. पायरी आली की आपण पुढे व्हायचं आणि उतार आला कि मागे व्हायचं हे घोडे मालकाने सांगितल होतं. घोड्यावर तसा पहिल्यांदाच बसत होतो. पण मजा वाटली. मध्येच त्याच इक्कोड्ड-इक्कोड्डा झालं कि घोडं धावायचं मग त्याचीहि सवय झाली आपोआप रीकिबीत पाय रोवुन घोड्याबरोबर वर-खाली होण्याचं तंत्र जमु लागलं. आजुबाजुनी परतीचे घोडे अगदि खेटुन जात होते. रस्त्यातली माणसं जागा करुन देत होती क्षणभर पूर्वी कोण्या सरदार-राऊताची स्वारी आली कि रस्त्यातली लोकं कशी भराभरा कडेला होत असतील याचा अंदाज आला. पण घोडा खरच मांडिला झेपला पाहिजे नाहितर मांड्या भरुन येतात. विषेशत: घोड्या बरोबर वर-खाली होण्याचे तंत्र जमले नाहि तर अंजर-पंजर ढिले होतात. नंतर रात्री माझीहि पाठ भरुन आली होती. घोड्यावरुन उतरल्यावर जर एखाद्या कट्ट्यावर बसलो तर बुड नावाचा अवयव आहे याची जाणीव होत होती. पण बाकि त्रास झाला नाहि. एकुण घोड्यावरचा प्रवास छान होता, घोडा धावताना त्याच्या गळ्यातल्या घुंगरांचा लयबध्द आवाज त्याच्या टापांच्या आवाजाशी फ्युजन साधत होता. कधी उजव्या हाताला तर कधी डाव्या हाताला खाली खोलवर कटरा शहर दिसत होते. इथले पहाड मातीचे आहेत भुशभुशीत. बर्‍याच ठिकाणी भूस्खलन झालेले दिसत होते. वर वर मात्र कातळ लागतो.

रस्त्यात खाण्या-पिण्याची भरपुर दुकाने आहेत. सगळी फुले-प्रसादाची दुकाने ऐन पायथ्याशी आहेत. नंतर मात्र खाण्याचीच दुकाने लागतात. अगदि बरीस्ता, CCD, देखिल इथे पोहोचले आहेत. शिवाय इथे कोवळे मुळे गाजरं हिरवी चटणी किंवा मसाला लावुन मिळतात. गोटि सोडा देखिल इथला प्रसिध्द प्रकार आहे. इथे खाण्या-पिण्याची ददात नाहि. जम्मु-कटरा-डोडा हे तसे बरेच आतंकवादि हल्ले झेललेले भाग आहेत. त्यामुळे इथे बरीच सुरक्षा आहे. दर दिड दोन किमीवर एक चौकी बसवली आहे आणि तिथे सामान कन्व्हेअर बेल्टवर मेटल डिटेक्टर ने चेक केले जात होते. त्यामुळे दर २ किमी नंतर घोड्यावरुन पाय उतार व्हावे लागत होते किमान ३ वेळा तरी हे चेकिंग झाले. घोड्यांचे खोगीर देखिल तपासले जात होते. इथे मध्ये मध्ये विश्रांती घेण्यासाठी आडोसे आणि चौथरे केले आहेत. जेणेकरुन पाऊस आला तरी माणुस भिजत नाहि. पिण्याच्या पाण्याची सोय देखिल ३-४ ठिकाणी केलीये. भक्तांसाठी दर एका किमीवर स्वच्छतागृहे बांधली आहेत. सध्या घोड्यांसाठी एक वेगळा रस्ता काढला आहे. फक्त घोडेस्वारच त्या रस्त्याने जातात. असे चेकिंग होत, कधी घोड्यांना तर कधी आम्हाला आराम मिळावा म्हणून थांबत वरती पोहोचायला १२:३० झाले होते.

मग गेट नंबर ३ वर आमचे चेकिंग करुन आत सोडले आम्हि तिथे एल लॉकर घेऊन आम्हा सहा जणांच्या वस्तु तिथेच ठेवल्या. चामड्याची वस्तु, मोबाईल मंदिरात नेउ देत नाहित. मोजा काढुन पाय जमिनीवर टेकवला तशी एक थंऽऽऽऽड शिरशीरी डोक्यापर्यंत गेली. आम्ही सगळ्या वस्तु त्या लॉकर मध्ये ठेवुन वैष्णोदेवेच्या मंदिराकडे आलो. वैष्णोदेवीची आणि या मंदिराची अख्यायिका अशी सांगितली जाते कि वैष्णोदेवीचा जन्म दक्षीणेतील रत्नाकर सागर नावाच्या घरात जन्म झाला. त्याने तिचे नाव वैष्णवी ठेवले. लहानपणीच ती संन्यासीण/जोगीण झाली आणि राम रुपातील विष्णुला ती आपला पती मानु लागली. जेव्हा सीतेच्या शोधार्थ निघालेले श्रीराम तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी तिला वचन दिले कि या जन्मी मी एकपत्नी व्रत घेतले आहे. मात्र तोवर उत्तरेत जाऊन हिमालयातील त्रिकुट पर्वतरांगेतील माणिक डोंगराच्या गुहेत तप कर, जर तु तप करुन परमपदाला पोहोचलीस तर मी कल्की रुपात मी तुझ्याशी लग्न करेन. या बदल्यात त्रिकुटाने राम-रावण युध्दात रामाचा विजय व्हावा म्हणुन ९ रात्री न झोपता देवादिकांची प्रार्थना केली. देवी तप करत तिथे राहु लागली पुढे कटारा जवळलीच हंसाली गावातील तिच्या श्रीधर नावाच्या भक्ताकडे देवी लहान मुलीच्या वेषात गेली. आणि त्याला पुजा करुन भंडारा कर लोकांना प्रसादाचे जेवण दे. श्रीधरने सगळ्यांना जेवायला बोलावले त्यात भैरवनाथ या मांत्रिकाला देखिल निमंत्रण गेले(काहि कथा म्हणातात कि गोरखनाथांनी भैरवनाथाला देवी बद्दल अजुन जाणुन घेण्यास पाठवले होते). त्याने श्रीधरची परीक्षा घ्यायची ठरवली आणि जर जेवण कमी पडले तर त्याचे भयानक परीणाम होतील अशी धमकी दिली मात्र देवीमुळे श्रीधर वाचला. देवी बद्दल अजुन जाणुन घ्यायला भैरवनाथ देवीचा शोध घेऊ लागला तेव्हा त्याला समजले की हि साध्वी नसुन दैवी शक्ती असलेली मुलगी आहे जी सतत धनुष्य-बाण घेऊन फिरत असते व तिच्या रक्षणासाठी मोठी वानरे व सिंह आजुबाजुला फिरत असतात. आपले तप अखंड सुरु रहावे म्हणुन देवी पुढील नऊ महिने गर्भजून किंवा अर्धकुंवारीच्या गुहेत लपली तिला तहान लागली तेव्हा तिने जमिनीत बाण मारुन पाण्याचा प्रवाह काढला तोच आजचा बाणागंगा तिथे जवळच तिच्या चरणपादुका देखिल उमटल्या आहेत. भैरवनाथ जेव्हा या गुहेपाशी पोहोचला तेव्हा देवी दुसर्‍या मार्गाने सटकुन अजुन वरच्या गुहेत गेली जी आज वैष्णोदेवीची गुंफा म्हणुन ओळखतात. भैरवनाथ तिथेहि पोहोचला तेव्हा प्रथम देवीच्या रक्षणा करता हनुमान तेथे आला व भैरवनाथाशी लढु लागला. शेवटि न राहवुन देवी बाहेर आली तीने कालीचे रुप धारण करुन श्रीकृष्णाकडुन भेट म्हणून मिळालेल्या सुदर्शन चक्राने भैरवनाथाचे मुंडके उडवले ते वर जाऊन पडले तेच भैरवनाथ मंदिर. मग भैरवनाथाच्या शीराने तीची माफी मागितली तेव्हा देवीने त्याला सांगितले कि माझ्या दर्शना नंतर तुझे दर्शन घेतल्यावरच माझ्या दर्शनाचे पुण्य मिळेल अन्यथा नाहि. पुढे आपल्याला कोणी त्रास देऊ नये म्हणुन देवीने ३ पिंडिंचे रुप घेतले आणि तिथेच राहिली. इथे श्रीधर बेचैन झाला व तो देवेच्या शोधात वणवण भटकत या गुहेत पोहोचला. त्याने देवीची हर तर्हेने विनवणी केली देवी प्रसन्न जाली आणि तेव्हा पासुन हि यात्रा सुरु झाली.

मंदिराकडे गेल्यावर परत एकदा शेवटाचे चेकिंग झाले ज्यांच्याकडे चामड्याच्या वस्तु होत्या त्या सरळ एका डब्यात फेकुन देत होते. अखेर आम्हि दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. हि गुंफा ३० मीटर लांब आहे. व साधारण ३ मीटर उंच आहे. दर्शन घेताना नमस्कार करुन देवीला आपले हात दाखवायची पध्दत आहे. इथे हात दाखवणे हे अवलक्षण नसुन सुलक्षण आहे. देवी तुमचे ग्रहयोग बदलते व तुम्हांला सुखाचे दिवस येतात असा समज आहे. पंधरा मिनिटे रांगेत उभे राहिल्यावर देवीचे दर्शन मिळाले. आत तीन पिंडि आहेत. डावीकडुन क्रमाने काली – वैष्णोदेवी – लक्ष्मी अश्या त्या पिंडि समजल्या जातात. उजवीकडे वळायला एक चिंचोळा मार्ग आहे जो बाहेर निघतो. बाहेर आल्यावर एका खिडकीपाशी खडिसाखर आणि देवीच्या प्रतीमा असलेले एक नाणे प्रसाद म्हणुन दिले जाते. ते घेऊन आम्हि पुढे आलो. सावलीत आलो कि थंडि वाजायची उन खुप बरं वाटायच. जेवणाची वेळ टळुन गेली होती भुकहि लागली होती म्हणुन तिथेच मंदिराशेजारील कॅन्टिन मध्ये राजमा-भात घेतला – वा!! तसा मला राजमा फारसा आवडत नाहि मात्र इतका सुरेख राजमा मी आधी खाल्ला नव्हता. वाफाळता राजमा-भात खाऊन तरतरी आली.

पुढे भैरवनाथाकडे निघालो, वर पोहचुन समोरच्या डोंगरांपलिकडे नजर गेली खुप दुरवर हिमशिखरे दिसत होती. एका स्थानिकाने सांगितले ते काश्मीर घाटितले डोंगर आहेत तिथवर पोहोचायला एक दिवस सहज जाईल. ते पर्वत इतके सुंदर होते कि दहा मिनिटे सगळ जग विसरुन आम्हि ती शिखरे डोळ्यात साठवुन घेत होतो. अखेर फोटो वगैरे काढुन घेतले आणि भैरवनाथाच्या दर्शनाला गेलो. एका बाजुला हवन सुरु होते लोकं थोडि थोडि उदि घेउन जात होते. भैरवनाथा वरुन आम्हि अर्धकुंवारीकडे कुच केले. ते खरच थोडं आड्वाटेवर आहे आता सगळ्या सोयी आहेत म्हणुन जास्त त्रास जाणवत नाहि मात्र २०-२५ वर्षापूर्वी ते खरोखर एका बाजुला असेल. आम्हि पायर्‍यांचा रस्ता घेउन पटापट खाली उतरत होतो. अर्धकुवारीपाशी परत एक पर्ची घ्यावी लागते ती घेतली तर आमचा ३२४ व नंबर होता म्हणजे किमान ३ तास हरी हरी. तसेहि पाच वाजत आले होते व ६ वाजता अर्धकुंवारी गुंफा बंद होते. त्यामुळे दर्शन मिळण्याची शक्यता नव्हती. थोडि वाट बघुन गर्दिचा अंदाज घेतला मात्र मग निघायचे ठरले. रमतगमत सुर्यास्ताचे रंग अनुभवत आम्हि खाली उतरत होतो. खाली कटारात आमच्या खोलीवर यायला आंम्हाला ८:३० झाले होते. देवीचे दर्शन पूर्ण झाले होते. ज्यासाठी घरुन निघालो होतो ते पूर्ण झाले होते. जेवुन आम्हि बॅग भरायला घेतली. दुसर्‍या दिवशी सकाळची गाडी होती. सकाळि उठुन आवरण्यापेक्षा झोपायला उशीर झालेला परवडतो.

जम्मुची धावती सफर वैष्णोदेवीच्या निमित्ताने झाली होती. जम्मु – लोकं असं मानतात कि जंबुलोचन नावाच्या राजाने हि ख्रिस्तपूर्व १४०० वर्षांपूर्वी हि जागा वसवली त्याच्या जंबु वरुन जम्मु हे नाव आलं. जंबुलोचन शिकारीला गेला असताना त्याला एक विचित्र दृष्य दिसले बकरी आणि सिंह असे दोघहि तावी नदिच्या किनारी एकाच टिकाणि पाणी पित होते. ते बघुन त्याने शिकार थांबवुन इथे एक नगर – जंबुनगर वसवायचा निश्चय केला. त्याचा भाऊ बाहुलोचन याने तावी नदिच्या किनारीच बाहु किल्ला बांधला आजहि तो एक महत्वाचा ऐतिहासिक ठेवा समजला जातो. सध्याचा किल्ला हा डोगरा राजांनी बांधुन घेतला आहे. सध्या त्या किल्ल्यात कालीमातेचे मंदिर आहे. जम्मु जवळील “अखनुर” या गावाचे उल्लेख महाभारतातहि आहेत म्हणे, इथे हरप्पा संस्कृतीची काहि पाळे-मुळे देखिल सापडली होती. पुढे मौर्य, कुशाण कुशाणाशहा अश्या वंशांकडे जम्मु गेला. नंतर Hephthalites राजांकडे गेला मग शाहि आणि सरते शेवटि गझनवी राजांनी तो इसवी सन १००० मध्ये जिंकला. पुढील सत्ता स्पर्धेत तो अर्थात मुघलांकडे आला, तदनंतर शिखांकडे. आणि अखेर भारताच्या इतर भागांप्रमाणे ब्रिटिशांकडे आला. फाळणी नंतर हा भारताकडे आला, मात्र १९४८ च्या युध्दात जम्मु-काश्मीरचा बराच भाग पाकिस्तानकडे गेला आज आपण त्याला POK म्हणुन ओळखतो. राजा हरीसिंग हे डोगरा घराण्याचे राजे त्यावेळि तिथे आपले संस्थान राखुन होते.

दुसर्‍या दिवशी दुपारी २ ची गाडी असल्याने किमान १०:३० पर्यंत कटरावरुन जम्मुकडे कुच करणे गरजेचे होते कारण मधल्या प्रवासाला २ तास लागतात. थोडा बफर टाईम ठेवुन आम्हि निघालो. येताना संध्याकाळ होती म्हणुन आजुबाजुचे फारसे बघता आले नव्हते. परतीच्या प्रवासात आजुबाजुचे रौद्र पहाडि सौंदर्य बघताना २ तास कसे गेले समजले नाहित. मधुनच तावी नदिचे हे भले मोठ्ठे पात्र दिसत होते. सगळे पात्र पांढर्‍या राखाडी गुळगुळित गोट्यांनी भरले होते. नदिला तसे पाणी कमीच होते. ऐन हिमालयीन नदि असल्याने हि नदि सुद्धा उथळ पण वेगवान होती. जम्मु स्टेशनला आमचे सामान कन्व्हेअर बेल्ट वर टाकले, ते मेटल डिटेक्श्तर मधुन स्कॅन होऊन पलिकडे परत मिळाले. अमृतसरवरुन जाणारी टाटा एक्सप्रेस १ नंबरवर लागलीच होती. अर्धातासाने दरवाजे उघडले आणि आम्हाला आत शिरता आले. गाडित परत गप्पा-टप्पांना ऊत आला. गाडित एक दोन अडिच वर्षांचा छोटासा दोस्त देखिल भेटला. मुंबईचेच कुटुंब होते. अमराठी असुन त्याची आई सुंदर मराठी बोलत होती. त्याच्याबरोबर मस्ती झाली, मग थोडं खाऊ-पिऊ झालं. अमृतसरसाठी एकुण सहा तास प्रवास करावा लागणार होता. रग्गड वेळ होता. हळु हळु त्या AC बोगीत सगळे आडवे झाले आणि २ तास झकास झोप काढली.

साधारण रात्री ८:३० ला अमृतसर आले. बरोबरचे कुटुंब देखिल तिथेच उतरले. गाडीतनं उतरलो आणि अमृतसरच्या थंडिने स्वागत केले. स्टेशन बाहेर पडुन रिक्षा केली आणि ठरल्या हॉटेलवर आलो. तिथे रिक्षात ५-६ जण सहज बसु शकतील अशी व्यवस्था आहे. रीक्षातुन जाताना चेहर्‍यावर येणारा थंड वारा नकोसा वाटत होता. अमृतसरचे वातावरण पहिल्याच क्षणी आवडले. लोकं तसे निवांत आहेत पण मुंबई बाहेर कुठेहि हिच परीस्थिती आहे मग अमृतसर कसे अपवाद असेल? आवरुन सुवर्णमंदिरात जायचे ठरले. नाहि म्हणायला मंदिरात पोहोचायला रात्रीचे १०:३० होऊन गेले. मंदिराचा बाजुचा परीसर खूप मोठा आहे. मात्र व्यवस्थापनाने सोयी अतिशय छान करुन ठेवल्या आहेत. उजवीकडिल जोडा घर मध्ये बुट काढले. डोक्यावर रुमाल घट्ट बांधला आणि ’आटा मंडि देओरीच्या’ प्रवेशद्वाराने मंदिरात शिरलो. मंदिरात जाताना मध्ये तळवे बुडतील इतपत पाणी खेळवलेली जागा आहे, जेणेकरुन आपोआप पाय धुतले जातात. अमृतसरच्या थंडीत पाण्यात पाय घालायचे जीवावर आले होते, नाईलाजाने पाय आत घातला आणि… वाह चक्क कोमट पाण्याची व्यवस्था होती. पाण्याचा उबदार स्पर्ष फारच सुखावह होता, पाऊल पुढे टाकुन नजर वर केली. सुवर्ण मंदिराचे पहिलेच दर्शनच त्या पवित्र वास्तुच्या प्रेमात पाडणारे होते. रात्री हज्जारो दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचा संपुर्ण सोन्याने मढवलेला वरील मजल्याचा भाग चमकत होता. मंदिराच्या पाचहि कळसांवर नजर ठरत नव्हती. त्याचे सोनेरी झळाळणारे प्रतिबिंब अमृतसरच्या पवित्र सरोवरातील पाण्यावर डुलत होते. मात्र यावेळि मंदिरातुन उलट्या दिशेने एक रांग निघाली होती बरोबर कर्णे, ताशे होते. क्षणभर कळेना काय नक्कि होतय ते. लगबगीने तळ्यापाशी आलो तळ्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिराला जोडणर्‍या रस्त्यावरुन गुरुग्रंथसाहेबाची मिरवणुक निघाली होती. आम्हि सगळे अंतर पार करुन तिथे जाईतो तो घोळका अकाल तख्तच्या इमारतीत पोहोचला सुद्धा. थोडे खट्टु होऊन आम्हि मंदिराकडे वळलो.

सुवर्ण मंदिर…
सुवर्ण मंदिराच्या जवळ सरकु लागलो तशी त्याची भव्यता डोळ्यात भरु लागली. मुख्य दारावर एक आलिशान झुंबर लटकले होते. तळ्याच्या मधल्या रस्त्यात दोन्हि बाजुला दिव्यांची रोषणाई होती. मंदिराचे सोन्याचा मुलामा दिलेले त्याचे वरचे २ मजले आणि कळस झगमगत होते. आत पोहोचलो तर सगळा गाभारा म्हणा किंवा मुख्य जागा म्हणा मोरचेलाने साफ करत होते नोटा-नाणी एकत्र केली जात होती. मुख्य जागे भोवती गुडघ्या इतक्या उंचीचे रॉड चे चौकोन बनवले आहेत त्याच्या बाहेर उभं राहुन दर्शन घ्यायचं. त्याच्या आत गादि होती आणि भगव्या रंगाचा स्वच्छ कपडा त्यावर अंथरला होता. याच ठिकाणी एक गुडघ्या इतक्या उंचीचा चौकोन ठेवला होता त्यावर देखिल गादि होती आणि त्याची जी सरबराई चालली होती त्यावरुन गुरुग्रंथसाहेब त्यावरच ठेवत असणार हे उघड होते. शिवाय जवळ एक तलवारहि ठेवली होती. साफ करणारे अकाली असावेत कारण सगळ्यांच्या कंबरेला कृपाण होते. अंगात निळ्या रंगाचे गुडग्याखाली येणारे झगे होते. डोक्यावर निळी किंवा पिवळी पगडि. नुसत्या गादिलाच इतरांप्रमाणे नमस्कार करुन आम्हि बाहेर पडलो. प्रथमत: फोटो काढु कि नको हा संभ्रम होता. कारण सुरक्षेच्या दृष्टिने फोटो काढु देतात का हे नक्कि माहित नव्हतें. कृपाण आणि भाले धारकांच्या गराड्यात नसती आफत कोण ओढावुन घेईल? मात्र लगोलग आजुबाजुला ४-६ फ्लॅश उडले तसा धीर एकवटुन एका भालाधारी द्वारपाल सरदारजीला विचारलं – “ओ जी यहाँ फोटो ले सकते है?” एखादं गणिताचं प्रमेय विचारलं असावं असं त्याने माझ्याकडे बघितलं आणि अर्ध्या मिनिटाने उत्तर दिलं – “हाँ लेकिन जल्दि!” मग काय खचा-खच फ्लॅश वर फ्लॅश. वेऽऽऽऽऽड लागायचं बाकि होतं. जो रात्रीच्या वेळी सुवर्ण मंदिर बघतो तो त्या वास्तुच्या प्रेमात पडल्या खेरीज राहत नाहि. हा ऍंगल तो ऍंगल शक्य त्या सगळ्या कोनातुन - अंतरातुन मंदिराचे फोटो काढायला घेतले. त्यातुन मैथिलीने नविन डिजीटाल कॅमेरा घेतल्याने वेगवेगळ्या मोड वरचे प्रयोग सुरु होते. जो मोड चांगला वाटत होता त्यावर नव्याने फोटोंचा रतिब घालत होतो. समाधान होत नव्हते. प्रसाद देण्यासाठी मुख्य दारावर दोन जण उभे होते. मुगाच्या डाळीचा शिरा प्रसाद म्ह्णुन दिला जातो. त्यात इतकं तुप असतं कि प्रसाद खाऊन झाल्यावर सगळ्या अंगाला त्याने मालिश सहज करता आली असती. प्रसादासाठी दोन्हि हातांची ओंजळ करायची असते एक हात पुढे केला तर “बेअक्कल कुठचा” अश्या तर्हेनं बघुन प्रसाद देत नाहित.
प्रसाद देणारा एकदम भला माणूस होता. मंदिराबाबतची सगळी माहिती त्याने आपणहुन दिली. “कहाँ से आये हो? कहाँ उतरे हो?” वगैरे जुजबी माहिती विचारल्यावर आपणाहुन म्हणाला - “अगलीबार आओगे तो यहाँ धर्मशाला मे मुफ्त मै जगाह मिलेगी, इसके पिछे और नयी इमारते बनवां रहे है!” त्याने एका वास्तुकडे हात करत सांगितले. त्या वास्तुला देखिल सोन्याचे कळस होते वर त्रिकोणी झेंडा फुरफुरत होता अगदि मंदिराच्या समोरची वास्तु होती. मी चटकन विचारलं “सरदारजी, यहि अकाल तख्त है ना?” तसे दाढी मागुन प्रसन्न हस्त उत्तरला – “हाँ जी, यहि तो है हमारा सबकुच, हम तो मिट्टि के पुतले है!” अजुन दोन – चार गोष्टि सांगुन निघुन गेला.

सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्त याबाबत प्रत्येक शिखाच्या अश्याच भावना असतात. आणि का असु नये? हेच ते अकाल तख्त ज्याने बलाढ्य मुघल सत्ते विरुध्द टक्कर दिली. हेच ते सुवर्ण मंदिर ज्यात ऑपरेशन ब्लु स्टार झाले होते. सामान्यातला सामान्य शिख सुध्दा या दोन गोष्टिंबाबत फार भावनिक असतो. शिख धर्माची स्थापना गुरु नानकांनी केली. गुरु नानक मुळात राजा कुशच्या म्हणजे श्रीरामाच्या मुलाच्या वंशावळीतील मानण्यात येतात. त्यांच्या नंतर शिखांचे नऊ गुरु झाले. गुरु नानक(१४६९ – १५३९), गुरु अंगद(१५३९ – १५५२), गुरु अमरदास(१५५२ – १५७४), गुरु अर्जुनदेव(१५८१ – १६०६), गुरु हरगोविंद(१६०६ – १६४५), गुरु हरीराय(१६४५ – १६६१), गुरु हरीकिशन(१६६१ – १६६४), गुरु तेगबहादुर(१६६४ – १६७५), गुरु गोविंदसिंग(१६७५ – १७०८) असे एकुण दहा गुरु आहेत. मग गुरु गोविंद सिंगांनी जाहिर केले कि माझ्या नंतर कोणीहि गुरु बनणार नाहि. गुरुग्रंथसाहिब हाच गुरु समजण्यात यावा. गुरुग्रंथाला आदिग्रंथ देखिल म्हणतात. शिख मुर्तीपुजा करत नाहिते. शिखांना रोजच्या जीवनात मार्गदर्शन करायला एक ग्रंथ असावा म्हणून गुरु अंगद यांनी या ग्रंथाचे काम सुरु केले. अमरदासांच्या काळात त्यात प्रगती झाली व बरीच भर पडली. अखेर अर्जुनदेवांनी ग्रंथाचे मुळ संकलन गोविंदवाल येथुन आणले व त्यात अनेक हिंदु व मुस्लिम संत – पीरांची पदे घातली. हे सगळे काम रामसर तलावाच्या जवळ संत व फकिरांच्या मदतीने एका तंबुत करण्यात आले. गुरुदास भल्ला याने हे लेखन केले. १६०४ मध्ये त्या ग्रंथाचे लेखन पूर्ण झाले.व त्या ग्रंथाची देखभाल करायला भाई बुढ्ढा याला ग्रंथी नेमण्यात आले. प्रस्तुत ग्रंथात पहिल्या पाच गुरुंची एकुण ४८३९ पदे आहेत व १४ हिंदु व कबीरा सकट २ मुस्लिम संतांची इतर पदे आहेत. व नवने गुरु तेगबहादुर यांची काहि पदे आहेत. ग्रंथाच्या शेवटि रागमाला व मुंडवनी अशी २ प्रकरणे आहेत. संत नामदेवांची ६१ पदे गुरुग्रंथसाहेबात आहेत. नामदेवांनी पंजाबात १८ वर्षे वास्तव्य केले होते.या पदांखेरीज त्यानंतर ग्रंथसाहेबात कुठलीहि भर घातली नाहि. सर्व गुरुद्वारात गुरुग्रंथाची प्रत सुशोभित रेशमी कपड्यात ठेवली जाते व त्यावर चवर्‍या ढाळतात. याची सेवा करायला जो नेमतात त्याला ग्रंथी म्हणातात. त्याला गुरुवाणीचा भरपूर अभ्यास करावा लागतो. सर्व गुरुद्वारात हा ग्रंथ ठेवला जातो व याचीच पुजा अर्चा करतात. गुरुद्वारामध्ये दिनक्रम ठरलेला असतो – जपुजी(नानककृत), सुखमनी(अर्जुनदेवकृत), आसा दि वार, जाप व आनंद(अमरदासकृत) हे नित्याचे प्रात:कालिन पाठ तर सायंकाळी रहरासीचा पाठ, प्रार्थना व प्रसाद होतो. शिखांचे पाच “क” कार असतात – केश, कृपाण, कडे, कच्छ आणि कंगवा या गोष्टि धारणा करणार्‍याला खालसा अथवा सरदार म्हणतात. थोडक्यात प्रत्येक सरदार हा शिख असतो पण प्रत्येक शिख सरदार असेलच असे नाहि.

बिआस(व्यास) नदिवर वसलेले अमृतसर १५७७ मध्ये स्थापन झाले.या ठिकाणाला प्रथम साक असे नाव होते. शिखांचे चौथे गुरु रामदास यांना वाटले कि शिखांसाठी एक मंदिर असावे. त्यांनी आधी तलाव खोदायला घेतला त्याचेच नाव अमृत सरोवर. हि जमिन मुळात अकबराने रामदासांना दिली होती. प्रथम तिथे रामदासपूर नावाची वसाहत वसली मग वरील कारणाअने त्याचे नाव अमृतसर असे झाले. हे सरोवर ४७५ फुट लांब व रुंद आहे. या सरोवराच्या मध्यभागी सुवर्णमंदिर आहे. याचा चौथरा ६५ फुट आहे. हे मंदिर शिखांचे पाचवे गुरु अर्जुनसिंग यांनी पूर्ण केले. याचा पाया २८ डिसेंबर १५८८ रोजी पीर मुहम्मद उर्फ हजरत मियाँ यांनी घातला. साधारण १० वर्षे हे काम सुरु होते. सरोवराच्या पश्चिमेला २०० फुट लांब पुल आहे. महाराजा रणजितसिंहने या मंदिरासाठी अपार धन दिले होते. या दरम्यान याचे छत व भिंतींना सोन्याचा वर्ख लावला गेला. साधारण १०० किलो सोने यासाठी वापरात आणले होते. मंदिराच्या पश्चिमेला अकाल तख्त आहे. रोज सकाळी ५ वाजण्याच्या आधी अकाल तख्त मधुन गुरुग्रंथसाहिब मंदिरात आणतात व रात्री मंदिरातुन परत अकाल तख्त मध्ये वाजतगाजत नेतात. १६ ऑगस्ट १६०४ पासुन हि प्रथा गुरु अर्जुनदेवांनी बाबा बुधा याला सांगुन चालु केली. १७६२ मध्ये अहमदशहा अब्दालीने सुवर्ण मंदिराची नासधुस केली होती. मात्र दल खालसा च्या भाई देसराजने त्याची १७७६ मध्ये पुर्नबांधणी केली. अमृतसरच्या मंदिरात मोफत लंगर चोवीस तास सुरु असतो. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात जुबी वृक्ष म्हणून झाड आहे. ४५० वर्षांपूर्वी बाबा गुजहाजी यांनी याच वृक्षाखाली बसुन मंदिरचे बांधकाम बघितले होते. तर अकाल तख्ताचे काम १५८९ मध्ये सुरु होऊन शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांनी १५ जुन १६०६ मध्ये ते पूर्ण केले. तेथे शिख गुरुंच्या तलवारी व ध्वज ठेवले आहेत. शिखांचे हे न्याय स्थान आहे.शिखांचे पाच पवित्र तख्त आहेत – अकाल तख्त(अमृतसर), पटणासाहेब, केशरगढ, नांदेड व दमदमसाहेब(भतिंडे). शिखांमध्ये पंथहि बरेच आहेत. – अकाली पंथ, उदासी पंथ, कूका पंथ, खालसा पंथ, ग्यानी पंथ, नानकशाहि, निरंकारी पंथ, निर्मल पंथ, निहंग पंथ, भगत पंथ, सिंग सभा, सुथराशाहि पंथ, सेवा पंथ हंदाली पंथ असे १४ मुख्य पंथ निश्चित सांगता येतात. यापैकी शिख पंथच अकाली पंथ म्हणुन ओळखला जातो. अकाल म्हणाजे कालरहित. सत श्री अकाल हि त्यांची घोषणा आहे. या नंतर ३० मार्च १६९९ मध्ये गुरु गोविंददासांनी “खालसाची” स्थापना केसरगढ(आनंदपूर) केली. त्यांच्या हाताखाली २०००० वेषधारी खालसा अनुयायी तयार झाले. हे मुळात लढवय्ये अनुयायी होत.


रात्री ११:३० ला परत हॉटेलवर आलो. दुसर्‍या दिवशी परत सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि अटारी(वाघा) बॉर्डर बघायचे ठरवले होतेच. दुसर्‍या दिवशी दुपारनंतर अटारीला जाण्यासाठी हॉटेलवाल्याच्या ओळखिने गाडि ठरवली. सकाळी आवरुन निघायला ९:३० वाजले. हॉटेल बाहेर निघालो तो भरपुर अंधारुन आलं होत आणि रीप रीप पावसाला देखिल सुरुवात झाली होती. एका रिक्षावाल्याला पकडले आणि सुवर्णमंदिराकडे चल म्हंटल तर साहेबाने १५०रु. मध्ये आम्हा सगळ्यांना अमृतसर फिरवतो म्हणाला.
त्याने प्रथम सुवर्ण मंदिरात नेले. रात्रीचे कौतुक सोहळे कमी होते म्हनून कि काय पुढला तासभर सुवर्ण मंदिर परीसरात फिरत होतो. मग दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. सुदैवाने पाऊस देखिल जवळपास थांबला होता. साधारण १५-२० मिनिटांनी आत जायला मिळालं. जाड-जुड ग्रंथ साहेब ठेवला होता त्यासमोर भजन-किर्तन सुरु होते एकजण त्यावर चवर्‍या ढाळत उभा होता. नमस्कार करुन बाहेर पडलो. अमृतसर मंदिरा पासुन मोजुन २-३ गल्ल्या सोडुन जालियनवाला बाग आहे.

जालियनवाला बाग चटकन ओळखु येणार नाहि अशी आहे. एका काळ्या रंगाच्या भिंतीवर रंग उडालेल्या अक्षरात जालियनवाला चे नाव लिहिले आहे. गेटवर एक उदासिन पोलिस बसला होता. एका बोळातुन आत गेल्यावर उजव्या हाताला एक फलक लावलाय – “यह धरती लगभग दो हजार निर्दोष हिंदुस्तांनियोंके रक्त से पवित्र हुई है। जो कि १३ अप्रैल १९१९ को ब्रिटिश सरकार की गोलियो का निशाना बने। इस जमीन को लोगो से चंदा एकत्रित करके इसके मालिकोंसे खरीदा गया।“ वाचल्यावर सर्रकन अंगावर काटा उभा राहिला. २००० मुडदे? म्हणजे जालियनवालाच्या बलिदानाचा इतिहास कितीहि जवळचा वाटत असला - तोंडपाठ असला तरी त्या प्रत्यक्ष ठिकाणी उभं राहुन तो फलक वाचताना भिरभिरायला होतं. म्हणजे आम्हि ज्या बोळातुन आत आलो त्याच बोळातुन जनरल डायर नामक राक्षस आत आला असेल मागोमाग शे-दिडशे सैनिक ३-३ च्या ओळिंमध्ये मार्च करत आले असतील, जनरल डायरने खुनशी आवाजात सैनिकांना पोझीशऽऽन अशी ऑर्डर दिली असेल त्या मैदानात जुलमी रौलट कायद्याला विरोध करायला जमलेल्या हजारो लोकांची चल बिचल झाली असेल आणि कुठलीहि पूर्व सूचना न देता…..फायऽऽऽर अशी ऑर्डर डायरने दिली असेल हां इथुनच!!! तसच लिहिलय इथे “लोगों पर गोली यहाँ से चलाई थी।“ एक हजार सहाशे पन्नास गोळ्या…..इथुनच सटासटा गोळ्या सुटल्या असतील. वय-लिंग-जात-धर्म कसलाहि विचार न करता गोळ्या फक्त निशाणा शोधत निघाल्या असतील काहि निशाण्यावर बसल्या असतील तर काहि आसपास – त्या काय समोरच्या भिंतीवर आहेत अजुन गोळ्यांच्या खुणा. आणि मागच्या बाजुला “शहिद कुआँ” गोळ्यांपासुन वाचण्यासाठी काहि अभागी जीव हिच्या आश्रयाला धावले होते कोरड्या विहिरीत उड्या टाकल्या काहिंचे हात-पाय मोडले काहिं वरुन उड्या मारणार्‍या इतर लोकांच्या वजनाखाली दबुन गुदमरुन मेले. काहिच झाले नाहि अश्या आविर्भावात मग्रुर पावले टाकत गाडिच्या धुराची वलये काढत जनरल डायर निघुन गेला असेल. नंतर आठवडाभर अमृतसरचा पाणीपुरवठा बंद होता. कोल्ह्या-कुत्र्यां खेरीज कोणालाहि जालियनवालात प्रवेश नव्हता. जे वाचले होते त्यांना ओल्या वेताचे १००-१०० फटके खाल्यां नंतरच बोळातुन सरपटत बाहेर जावे लागत होते. १०० फटके खाल्यावर कातडि जवळापास लोंबायला लागत असे.

सुन्न मनाने तिथल्या एका नविन वास्तुत प्रवेश केला, इथे सध्या सगळ्या क्रांतिकारकांची सुंदर तैलचित्रं लावली आहेत. कर्तारसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, उधमसिंग, भगतसिंग-राजगुरु-सुखदेव, मादाम कामा, श्यामजी कृष्ण वर्मा अश्यां बरोबर कर्झन वायली आणि मायकेल ओडवायर या ब्रिटिश अधिकार्‍यांची चित्रे सुध्दा आहेत त्यात त्यांच्या वध भारतीय क्रांतिकारकांनी का केला हे ३ भाषांत तिथे लिहिले आहे. आवर्जुन बघण्यासारखे प्रदर्शन आहे. कारण आमचा शाळकरी इतिहास हाच मुळात १९२० नंतर सुरु होतो आणि व्हाया १९४२ तो लाल किल्ल्यावर संपतो. १९२० च्या आधीच्या घटना, क्रांतिकारकांचा इतिहास आणि आझाद हिंद सेनेचा इतिहास हे प्रत्येकि एका धड्यात संपतात. तसेहि या गोष्टिंना महत्व आहेच कुठे? माथेफिरु क्रांतिकारकांना दुसरे उद्योग धंदे नव्हते म्हणुन ते मारोकाटो का पंथ उघडुन जे मुडदे पाडत फिरत होते नाऽऽऽ?? जालियनवाला बद्दल ब्रिटिशांनी तरी कुठे अजुन जाहिर माफी मागितली आहे अजुन? हे सो कॉल्ड मानवता जपणारे ब्रिटिश किती क्रुर होते हे त्यांनी डायरला निर्दोष मुक्त केले तेव्हाच समजले. डोक्यात संताप आणि बधीरता घेऊन तिथल्या स्मारकाचे दर्शन घेऊन आम्हि निघालो. मग रिक्षावाल्याने २ मंदिरांत नेले एक वैष्णोदेवी मंदिर तिथे वैष्णोदेवी मंदिराची मिनी प्रतिकृती आहे म्हणजे गुहाच तयार केलीये छोटिशी आणि मग बाहेर निघाल्यावर भरपूऽऽऽऽऽर वेगवेगळे देव त्या मंदिरात सर्वत्र होते बोले तो देवांची को-ऑप हाऊसिंग सोसायटीच होती. तिथुन त्याने अजुन एका मंदिरात नेले हे मंदिर तर सुवर्ण मंदिरची हुबेहुब प्रतिकृती आहे. कृष्णाचे मंदिर होते ते. या मंदिरापाशी आलो आणि परत पावसाला सुरुवात झाली. तसेहि २:३० वाजत आले होते. अटारीसाठे गाडिला ४ वाजता बोलावले होते. मंदिरा बाहेरच्याच एका छोट्याश्या टपरीवर चहा-कॉफि आणि ब्रेड-बटर टोस्ट खाल्ले पाऊसाने थंडि बर्‍यापैकी वाढल्याने गरमा गरम चहा आणि ब्रेड-टोस्ट खाताना मिळणारं सुख हे शब्दांच्या पलिकडच होतं. हॉटेलवर पोहचलो. तेव्हा गाडीवान दादा ओमनी घेऊन ऑलरेडि पोहोचला होता. पाच मिनिटात आलो असे सांगुन वर जाऊन थोडं फ्रेश झालो आणि निघालो.

अमृतसर – अटारी हे अंतर साधारण ४४ किमी आहे. तासाभरात आम्हि अटारीला पोहोचलो. आत जाताना ३ ठिकाणी चेकिंग होते. आत प्लॅस्टिकची पिशवी नेऊ देत नाहित. आपण नेहमी ज्याला वाघा बॉर्डर म्हणतो ती मुळात अटारी सीमा आहे वाघा हे पाकिस्तानकडिल सीमेचे नाव आहे. तिथे दर सकाळी- संध्याकाळी न चुकता ध्वजवंदना दिली जाते. संपूर्ण जगात हे असे एकच ठिकाण आहे जिथे रोज दोन देशांचे सैनिक ध्वजारोहण करताना वा ध्वज उतरवताना मोठा कार्यक्रम करतात व हस्तांदोलन करतात. आम्हांला आत सोडले तसे डावीकडिल जीन्याने आम्हि वर पब्लिक गॅलरीत गेलो समोर BSF चे कार्यालय आहे. गॅलरीत स्त्रीयांना गेटच्या जवळचे स्थान दिले आहे तर पुरुषांना कार्यालया समोरचे. त्यामुळे आम्हि इकडॆ तर बरोबरच्या दोघी गेटच्या जवळील भागात गेल्या. गर्दि झाल्यावर मोठ्ठ्या आवाजात देशभक्तीची गाणी लावली. आपल्याकडे तुडुंब गर्दि होती पाकिस्तानचा भाग मात्र शांत शांत होता मोजुन १००-१५० जण असतील. आपोआप दोहो बाजुंनी नारेबाजी सुरु झाली. इथेहि मराठी माणसे भरपुर होती कोणीतरी मध्येच “ शिवाजी महाराज किऽऽऽऽ!” अशी ललकारी दिल्यावर सगळ्यांनी जीव काढुन जयऽऽऽ असा प्रतिसाद दिला. मग किमान १५-२० मिनिटे शिवरायांचा दरबार भरला होता. तिकडुन देखिल पाकिस्तान जिंदाबाद चे नारे लावले जात होते. इथुन वंदे मातरम चे. असे वाक् युध्द बराचवेळ सुरु होते. ्त्यातुन रेहमानचे वंदे मातरम किंवा चक दे इंडिया लागले कि आपल्याकडचा उत्साह ओसांडुन वाहत होता.

पलीकडे लाहोर दिसत होते. वाघा बॉर्डर पलीकडचे लाहोर बघुन बैचैनी वाढतच गेली. मोजुन ६२ वर्षांपूर्वी “तो” भाग माझ्या मातृभूमीचा हिस्सा होता. काय नाहिये त्या सीमेपलीकडे? पाणीनीचा सिंध, हिंदु संस्कृतीचा पहिला हुंकार जिथे उमटला असेल - जिच्या काठावर जगातला सर्वात जुना ग्रंथ असा ऋग्वेद लिहिला गेला ती सिधु नदि, हरप्पा – मोहंजोदाडो, मराठी माणासाचा मानबिंदु –ज्यापलीकडे राघोभरारींनी भगवा फडकवला होता ती “अटक”. प्रतिमुंबई असलेली कराची जिथे राष्ट्रिय कॉंग्रेसची अनेक अधिवेशने झाली असतील. आणि खुद्द लाहोर?? त्या बद्दल काय बोलणार? प्रत्यक्ष श्रीरामाच्या सुपुत्राने “लव” ने जे “लवपुर” वसवले तेच आजचे लाहोर. स्वातंत्र्यपूर्व काळात तर लाहोर म्हणजे क्रांतिकारकांचे आग्यामोहोळ बनला होता. दक्षीण भारत सोडता भारताच्या कुठल्याहि भागात एखादे क्रांतिकारी कृत्य झाले तर त्यावर लाहोरचा शिक्का असायचाच. महाराष्ट्र-पंजाब-बंगाल या तीन प्रांतात कधी काय घडेल हे सांगता येत नसे. इथे महाराष्ट्राने हाक दिली कि पंजाब ओ द्यायचा आणि पंजाबने ओ दिली कि त्याचा परीणाम, बंगाल पेटुन उठायचा. लाहोरच्या सेंट्रल जेल मध्ये ३ वेड्या पीरांनी फाशीच्या निर्दयी-राठ दोरांची हजार-हजार चुंबने घेतली असतील. वंदे मातरम! च्या जय घोषात त्यांच्या गळ्याभोवती ते दोर आवळले गेले असतील आणि मग जेलरच्या हातातला रुमाल खाली पडल्यावर पायाखालची फळी सरकली असेल, मग काहि क्षणांची जीवघेणी तडफड होऊन याच मातृभूमीला परत नऊ महिन्यांनी भेटायची अनिवार ओढ मागे ठेवुन ३ कलेवर तिथे झुलत राहिली असतील. भगतसिंग – सुखदेव – राजगुरु, मेल्यानंतर देखिल त्यांच्या प्रेतांची विटंबना झाली. कुर्हाडिचे घाव घालुन त्यांची विच्छिन्न प्रेते पोत्यात घातली आणि रावी नदिच्या काठी भडग्नी दिला. पण …. पण आज लाहोर मध्ये ते सेंट्रल जेल आहे कुठे? तिथल्या पिढीला ना भगतसिंगांचा त्याग माहितीये ना ते सेंट्रल जेल. “शहिदों कि चितांओ पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मिटनेवालोंका यहि बाकि निशान होगा।“ हे स्वप्न तसेच राहिले. मिळाले काय? फाळणी? रक्तपात?? जेव्हा रामप्रसाद बिस्मिलांनी “सरफरोशी कि तमन्ना..” लिहिलं तेव्हा
“है लिए हथियार दुश्मन ताक में बैठा उधर, और हम तैयार हैं सीना लिए अपना इधर।
ख़ून से खेलेंगे होली गर वतन मुश्क़िल में है, सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।“
या ओळी त्यांच्या येणार्‍या पिढ्या एकमेकां विरुध्द वापरतील अशी त्यांना कल्पनाहि नसेल. आताहि तेच तर चालु होत. भारतमाता कि जय – पाकिस्तान जिंदाबाद हे काय वेगळं सांगत होते?

सारख त्या सीमेपलीकडे जावसं वाटत होतं. पण कितीहि वाटलं तरी त्या सीमेपलीकडे मला जाता येणार नव्हतं. व्हिसा नामक एका कागदि चिठोर्‍याची गरज त्यासाठी लागणार होती. खुप वाटत होतं पलीकडे जावं किमान ५-७ हजार वर्षांच्या इतिहासाला प्रेमाने कुरवाळावं पण ते शक्य नव्हतं. त्या तिथे उभं राहिलो आणि प्रथमच इतिहासाकडे तटस्थपणे बघितलं तेव्हा मला ना जीनांची बाजु जाणुन घ्यायची होती ना सावरकरांची ना गांधींची. असं का घडलं? कोण चुकलं? कोण बरोबर होतं? कोणी स्वार्थीपणा केला? कोण पराभूत झाले? हे सगळे प्रश्न गळुन पडले. सत्य फक्त इतकच होतं कि ६२ वर्षांपूर्वी २ देश निर्माण झाले, जे शेजारी रहात होते ते एकमेकांच्या जीवावर उठले. आजहि त्यात खंड नाहि. दोघांत संशयाची दरी होती – आहे – राहिल. सुदैवाने आज भारतात लोकशाहि आहे. भारत – पाकिस्तान हे दोन देश दोन चित्रे दाखवतात. एक दंडुकेशाहिच दुसरा लोकशाहिचं. पाकिस्तानात लोकशाहि कधीच मुळ धरु शकली नाहि.

अचानक बिगुल वाजले तशी तंद्रिं भंगली. सहा उंच जवान आधी २ आणि मग ४ असे गेट कडे शिस्तित सरसर पुढे जाऊ लागले. एक सरदारजी ऑफिसर त्यांना आदेश देत होता. सगळीकडे उत्साह ओसांडुन वाहत होता. त्यांचे चालणे – पाय खांद्याच्या उंचीला आणुन आपटणे. सगळं कसं रोमांचक होतं. मधुन मधुन जमावांतुन येणारे जयघोष जवानांचा उत्साह वाढवत होते. पलिकडे जर घोषणा सुरु झाल्या तर लोकांना सिचना देणारा जवान आमच्याकडे बघुन त्याचे मनगट तोंडाजवळ न्यायचा, कि काय ते समजुन आम्हि बोंब मारायचो किंवा आरडाआओरडा करुन त्यांचा आवाज दाबुन टाकायचो. हा संपुर्ण कार्यक्रम तिथेच जाऊन बघण्या-अनुभवण्यासारखा आहे. दोन्हि देशांचे झेंडे एकमेकांना क्रॉस होतात तेव्हाचा क्षण खरोखर कॅमेरात पकडण्यासारखा असतो. मात्र मला पाऊस असल्याने कॅमेरा बाहेर काढताच आला नाहि. तरी बरं बरोबर छत्री होती. आमच्या समोर दोन गोरे येउन उभे राहिले. अखेर त्यांची दया येऊन आम्हि आमच्या छत्रीत दोन गोर्‍यांना वळचणीला घेतलं. अतिथी देवो भव: च्या जाहिरातीत घ्यावा असा तो क्षण होता. ते हे सगळं डोळे विस्फारुन बघत होते. आपल्या जवानांनी केलेल्या करमाती बघुन “ओह वंडरफुल! लुक हि इज व्हेरी इन्थुजियास्टिक!” अशी दाद आपसुक त्यांच्याकडुन येत होती. पाऊस पडल्याने तापमान चटकन खाली आलं. बोटं गार पडली होती. सगळं संपल्यावर बाहेर आलो तसे समोर किमान सव्वासहाफुटाचा उभा आडवा जवान, त्यात त्याच्या डोक्यावर लाल-पिवळा तुर्रा असलेली भारदस्त पगडि, तरतरीत नाक, आवाजात जबर असा एक अवाढव्य देह उभा होता. मग त्याच्या बरोबर फोटो सेशन झाले. शेवटि आम्हिच होतो मग कहां से हो? क्या करते हो? वगैरे जुजबी माहिती त्याने विचारली. तो हरीयाणाचा होता. त्याला शेकहॅन्ड केल्यावर गारव्याने बधिरता आलेला हात सुध्दा बोंबलुन उठला. आर्मीवाले कसा कडक शेकहॅन्ड करतात हे माझ्या नातातल्या युनिफॉर्म सर्विस मधल्या लोकांमुळे माहित होतं ….पण इतका कडक?? तिथेच BSF ने कॅन्टिन उभं केलय. तिथले प्रत्येकी ४-४ समोसे हादडले गरमा-गरम चहा घेतल्यावर जे काहि म्हणून स्वर्गिय सुख मिळालाय अहाहाऽ!

परतीच्या वाटेवर डोकं फिरावं अशी गोष्ट घडली. गाडिचे वायपर्स चालत नाहियेत हे अर्ध्या रस्त्यात आल्यावर समजले. संध्याकाळ त्यातुन पाऊस, रस्ता दिसेना ड्रायव्हर अर्धा गाडिबाहेर डोकावुन सारखी काच पुसत होता. सगळ्यांनी त्याला परोपरीने सांगुन बघितलं कि बाबा बाजुला गाडि लाव तासभर उशीर झाला तरी चालेल कायमचा उशीर व्हायला नको. पण हा ऐकायलाच तयार नाहि. वायपर्स बदलायचे म्हणजे त्याच्या खिशाला चाट लागली असती. कदाचित गाडि त्याच्या मालकिची नसावी, तो फक्त चालवत असावा मिळालेले पैसे कोणी इथे घालवायला सांगितले असे मालकाने विचारले तर पगारहि जायचा म्हणुन बहुदा तो टाळाटाळ करत होता. मैथिली तर या रेट ने बडबड करत होती, कि ते ऐकुन ऐकुन थोड्या वेळाने त्याला मराठी बोलता आले असते. अखेर पाऊस थांबला आणि अखेरची(म्हणजे प्रवासाची) पंधरा मिनिटे नीट गेली. रात्री जेवायला खैबर नावाच्या हॉटेल मध्ये गेलो म्हणजे दोन्हि दिवशी रात्री जेवायला तिथेच जात होतो. छान हॉटेल होते.

दुसर्‍या दिवशी दिल्लीसाठी निघायचे होते. सकाळचीच गाडि होती. समोर एक पंजाबी कुटुंब होतं, साधारण आपल्या नशिबातच आगाऊ कार्टि यावी असं यावेळीहि घडलं. पण मुलं आगाऊ का होती हे त्यांच्या आई – वडिलांनी देखिल सिध्द केलं. त्यांतल्या बायका इतक्या बडाबड करत होत्या कि सिट फाडुन त्यातला कापुस काढुन कानात घालवासा वाटत होता(म्हणाजे साधारण बायका जितक्या म्हणून बोलतात त्यापेक्षाहि किमान पाचपट जास्त बोलत होत्या) त्यांचा नेहमीच्या बोलण्याचा आवाज हा गाडि हाकणार्‍या मोटरमनशी बोलावं इतपत होता. त्यातुन त्या हसल्या कि गाडिचा डबा हा चालण्यामुळे हलत नसुन त्यांच्या हसण्या-बोलण्याने थरथरत असावा असे वाटायचे. बोले तो इरीटेटिंग या प्रकारात सगळी गोष्ट येत होती. समाधान एकाच गोष्टिचे कि खाणं-चहा सगळं कसं असं आपोआप टेबल वर येत होतं. चहा/ब्रेकफास्ट जागच्या जागी मिळाल्यावर कित्ती बर वाटतं? साधारण १२ वाजता आम्ही नवी दिल्लीला पोहोचलो. मला वाटलं होतं कि वाटेत गाडि पानिपत स्टेशनला थांबेल पण तसं झालं नाहि. प्रत्यक्ष पानिपत जिथे घडलं तिथे नाहि तरी किमान त्या स्टेशनला पाय लावायची इच्छा होती. पण सोनपत, भागपत, पानिपत असं एका मागोमाग एक निघुन गेलं आणि माझी जरा निराशाच झाली. आता विशाल, गिरीश-साक्षी आमच्या बरोबर राहणार नव्हते ते मुंबईला परतणार होते. त्यांची ४ची राजधानी होती. आम्हि टाटा च्या जिंजर हॉटेल मध्ये रुम बुक केल्या होत्या. नवी दिल्ली स्टेशनच्या अगदि समोरच आहे. मस्त सोय आहे, सेल्फ सर्विस आहे पण इतर कसलाहि त्रास नाहि. रुम्स तश्या लहान तरी सुटसुटित आहेत. लॉन्ड्रि सर्विस, इंटरनेट्ची सोय, खाली कॅफे, त्याच बिल्डिंग मध्ये केमिस्ट आणि पुस्तकांचे दुकान – अजुन काय हवय २-३ दिवसांच्या वास्तव्यासाठी? शिवाय हे हॉटेल टाटाने IRTC बरोबर भागीदारीत उघडल्याने टाटाच्या इतर ठिकाणच्या जिंजर चेन पेक्षा इथे रुम्स स्वस्तच आहेत. जरा आराम करुन ते तिघं राजधानी साठी निघाले. ते गेल्यावर आम्हि परत आडवे.डोळे उघडले ते थेट ८ वाजुन गेले होते. मी, हर्षद – मैथिली तिघांनी आवरले आणि “इंडिया गेट” कडे निघालो. साधारण दहा मिनिटांच्या रीक्षेतील प्रवासाने आम्हि इंडिया गेट समोर पोहोचलो. रात्री पिवळ्या रंगात संपूर्ण इंडिया गेट न्हाऊन निघाले होते. इंडिया गेटच्या जसजसं जवळ जाऊ लागलो तशी त्यांची भव्यता समजु लागली. इंडिया गेट भोवती पोलिसांचा पहारा होता. एक मिडियाची व्हॅन देखिल उभी होती. इंडिया गेट पहिल्या महायुध्दातील व अफगाण युध्दातील शहिद झालेल्या ९० हजार सैनिकांच्या आठवणीत उभे केले आहे. नवी दिल्लीचे नगररचनाशास्त्रज्ञ एडविन ल्युटेन हेच याचेहि आर्किटेक्ट होते. भारतीय सैनिकांना समर्पित असलेले हे सर्वात मोठे स्मारक आहे. इंडिया गेटच्या इमारतीच्या मध्यावर बंदुकिची नळी जमिनीकडे व त्यावर शिरस्त्राण अशी खुण असलेली ’अमर जवान” ज्योत आहे. ७१ च्या पाक युध्दातील जवानांच्या आठवणीत ही ज्योत उभी केली आहे .२६ जानेवारी १९७२ मध्ये इंदिरा गांधींच्या हस्ते ह्या ज्योतीचे अनावरण केले. तेव्हा पासुन दर २६ जानेवारीला राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व तिन्हि दलांचे प्रमुख त्यांना पुष्पचक्र अर्पण करतात. ज्योती समोर तीन्हि दलांचे झेंडे फडकत असतात. व सैनिकांचा अहोरात्र पहारा असतो. दर २० मिनिटांनी पहार्‍यावरचा जवान बदलतो. एकमेकांची जागा घेण्याची व पापणी न लवता ज्योतीकडे टक लावुन पाहण्याची त्यांची मिनिटभराची कसरत/परेड देखिल पाहण्यासारखी असते. अतिशय शिस्तीत हे सगळं होतं. आपल्याला थेट ज्योती जवळ जाता येत नाहि. इंडिया गेट भोवती सुरक्षा व पावित्र्य या दोन्हि कारणांनी साखळीचे रींगण केले आहे. व त्यात चार जण सतत फिरत असता. तुम्हि जर त्या साखळ्यांना खेटुन उभे राहिलात तर लग्गेच तुम्हांला लष्करी खाक्यात अतिशय प्रेमाने हटकतात.

इंडिया गेटच्या एका बाजुला एक उंच मेघडंबरी आहे. एडविन ल्युटेन यांनी महाबलीपुरम येथील एका मेघडंबरीवरुन प्रेरीत होऊन त्याची बांधणी केली आहे. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. मात्र स्वातंत्र्यानंतर तो हटवण्यात आला आहे. सध्या ती मेघडंबरी रीकामी आहे. मेघडंबरीच्या पलीकडला रस्ता मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम कडे जातो. पुढे मग तोच उजवीकडे रस्ता पुराना किला वगैरे भागात जातो. तर डावीकडे प्रगती मैदान कडे जातो. इंडिया गेटच्या दुसर्‍या बाजुला म्हणजे वेस्ट एन्डला थेट नाकासमोर राष्ट्रपती भवनाकडे जाणारा रस्ता आहे. म्हणजे राजपथ पूर्व – पश्चिम पसरला आहे. रात्री इंडिया गेटकडुन राष्ट्रपती भवन बघण्यात देखिल खुप आनंद मिळतो. राष्ट्रपती भवन कडे जाणारा रस्ता दोहो बाजुंनी रस्त्यावरच्या दिव्यांनी उजळलेला असतो. राष्ट्रपती भवनकडे दिव्यांच्या दोन रांगाच गेल्या असतात. राजपथचे जर मधोमध भाग केले तर उत्तरेकडे कॅनॉटप्लेस हा दिल्लीचे हृदय म्हणावे असा भाग आहे एकदम हॉट एन हॅपनिंग! तर दक्षीणेकडे अकबररोड त्याला येऊन मिळतो. अकबर रोड म्हणजे सगळ्या मंत्र्या-संत्र्यांचे बंगले व पक्षाची कार्यालये किंवा “हाय कमांड” इथे आहेत. या खेरीज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश, न्यायाधीश, उपराष्ट्रपती वगैरे यांचे बंगले याच अकबर रोड वर आहेत.

नवी दिल्ली हि प्लान्ड सीटि आहे. एड्विन ल्युटेन व त्यांचे सहकारी हर्बट बेकर यांच्या कल्पनेतुन ह्याची नगररचना झाली आहे. पुर्वीच्या रायसिना पिंड या शिखांच्या गावामधील जागेत - रायसिना हिल वर बेकर यांनी व्हॉइसरॉय हाऊस उभे केले आज तेच राष्ट्रपती भवन म्हणुन ओळखले जाते. त्याच्या बाजुच्या सेक्रेटरीस्ट बिल्डिंग्स ज्यांना आज नॉर्थ ब्लॉक व साऊथ ब्लॉक असे म्हणतात त्या देखिल बांधुन काढल्या. राजपथला पूर्वी “किंग्स वे” असच नाव होतं. अर्थात राजपथ ने त्याचा अर्थ तोच राहतो पण निदान भारतीयकरण झाले हे समाधानाचे आहे. व्हॉइसरॉय हाऊसला मध्यावर ठेवुन सगळ्या नगराची बांधणी झाली. मग पार्लिमेंट हाऊस व संसद मार्ग यांचीहि रचना बेकर यांच्या कल्पनेतुन झाली. १२ डिसेंबर १९११ रोजी जॉर्ज पंचम यांनी त्यांची राजधानी कलकत्याहुन दिल्लीस हलवायचे ठरवले. आणि मग मुळ दिल्ली जवळच नवी दिल्ली बांधायला घेतली. हे सगळे बांधकाम १९१२ ते १९३१ मधील आहे. १९३१ मध्ये संपुर्ण प्लान्ड दिल्ली उभी राहिली. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तरी नवी दिल्ली शहराचा संपूर्ण ताबा १९५६ मध्ये भारत सरकारला मिळाला. राष्ट्रपती भवन देखिल ५० साली भारतसरकारच्या ताब्यात आले.

रात्री ११ पर्यंत आम्हि इंडिया गेट भोवतीच घोटाळत होतो. वेगवेगळ्या ऍंगल्सनी त्याचे फोटो घेत होतो. वर पौर्णिमेचा चंद्र होता. बर्‍यापैकी थंडि देखिल होती. अखेर घड्याळ बघितलं तेव्हा चला टळुया इथुन असं वाटलं. दिल्लीत रिक्षा बरीच महाग आहे. बर जी रिक्षा केली तीने हॉटेलपासुन दुरच सोडलं. अखेर विचारत विचारत आम्हि जिंजरला पोहोचलो तेव्हा साडे अकरा वाजत आले होते. खालीच कॅफे मध्ये थोडसं खाल्लं. दुसर्‍या दिवशी पहाटेच ताजमहाल बघायला जायचं होतं म्हणून पटापट निजानिज केली.

सकाळी सातलाच निघालो. एक गाडि ठरवली होती. सकाळी हॉटेलमधुन बाहेर पडलो आणि दिल्लीची थंडि अनुभवली. तरी डेनिम जॅकेटवर भागत होतं पण बोटांची टोकं गाऽऽर पडली होती. मध्ये एका ढाब्यावर थांबुन आलु के पराठे हाणले दोन पराठ्यात पोट पॅक. दिल्ली सोडुन आम्हि उत्तर प्रदेशात शिरलो आणि ट्रॅफिक मधला बेशिस्तपणा लग्गेच जाणावला. दिल्ली – आग्रा हे अंतर २०० किमी आहे. मथुरा मार्गे NH2 हा रस्ता आग्र्याला जातो. साधारण साडेतीन – चार तासाचे ड्राइव्ह करावे लागते. प्रथम गाडिवाल्याने आम्हाला मथुरेतील इस्कॉन टेंपल मध्ये नेले. तेथे ११:१५ ला पोहोचलो. आत गेलो तर सगळे देव दरवाजे लावुन आराम करत होते. मंदिरात समजले कि मुर्त्यांसमोरचे दरवाजे १२ वाजता उघडणार. आम्हि परत बाहेर आलो. गाडिवाला म्हणाला अर्ध्यातासा साठी दर्शन चुकवु नका. मगशी आम्हि आत जाताना आंम्हाला मोबाईल आत नेता येणार नाहि, कॅमेरा आत नेता येणार नाहि असे सुरक्षा रक्षकाने सांगितले होते. हर्षद बाहेरच थांबला होता. आम्हि वस्तु गाडित ठेवल्या होत्या. परत जाताना हर्षद ने गाडितला मोबाईल बरोबर घेतला. सुरक्षा रक्षकाने त्याला अडवले तसे हर्षदने त्याला “टोक” काढली “गोरोंको सब माफ है? उस परदेसी लडकि को देखो – वो मोबाईल साथ मै लिये घुम रहि है ऊसे कुच नहि कहोगे? मै इसकि कंप्लेंट करनेवाला हुं, वैसे भी आप सरकारी लोग नहि हो!” तो गडबडला “वो साहब…वो हमें.. “ पण हर्षद ने त्याला झटकले आणि आम्हि आत गेलो. अर्ध्या तासात देवा समोरचे दरवाजे-पडदे उघडले आणि आत श्रीकृष्ण, राधा, बलराम राम –कृष्ण यांच्या सुंदर मुर्ती सजवल्या होत्या. मग आरती झाली. आरती म्हणणारे दोघे आणि पुजा करणारा एक जण गोरे चमडिवाले होते. पण हिंदि उच्चार चांगले होते. आजुबाजुला बरेच गोरे होते. मग दोन्हि हात आधी आकाशाकडे करुन तसेच खाली बसत आणि मग लोटांगण घालत. हा प्रकार पाचेक मिनिटे सुरु होता. शेवटि आम्हि स्वामी प्रभुपाद यांच्या पुतळ्यापाशी आलो. तिथे एकाने आम्हाला पकडले आणि “हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे।“ हा जप १०८ वेळा करा आणि अनुभुती घ्या वगैरे सांगायला सुरुवात केली तसे मी आणि मैथिलीने त्याला उलट्या चार गोष्टि सांगितल्या. मग त्याला समजले कि गीता केवळ आमच्यासाठीच बनली आहे. बिचारा इस्कॉनचा गंडा सोडुन आमच्यामागे यायचा म्हणुन पाच मिनिटांच्या बौध्दिकानंतर आम्हि थांबलो.

इस्कॉनमधुन निघायला १२:४५ वाजले. ताज महालकडे आम्ही कुच केले,थंडिचे दिवस असल्याने उन्हाचा मुळिच त्रास होत नव्हता. आग्र्यात शिरलो दुपार झाली होती. तशी सर्व ठिकाणी शांतताच होती. आग्रा या स्थानाचा पहिला उल्लेख महाभारतात अग्रवन या नावाने येतो. सध्याचे आग्रा शहर सिकंदर लोदिने १५०६ मध्ये वसवले १५२६ ते १६२८ या दरम्यान आग्राच मुघल साम्राज्याची राजधानी होते. मधल्या काळात हिंदु राजा हेमु विक्रमादित्य याने आग्रा-दिल्ली जिंकुन पुन्हा काहि काळ हिंदुंचे राज्य आणले होते. त्याच्या झंझावाता पुढे आग्र्याने न लढताच शरणागती दिली होती असे इतिहास सांगतो. ताज महाल शिवाय फत्तेपुर सिक्री, आग्रा किल्ला, अकबराची कबर, मानकामेश्वर मंदिर, गुरु का ताल, जामा मशिद, राम बाग, माहताब बाग अशी बरीच ठिकाणे आहेत. वेळेच्या बंधनामुळे दुर्दैवाने आम्हाला फक्त ताज महालच बघता आला.

गाडिवाल्याने ताजच्या सर्वात जवळच्या पार्किंग लॉट मध्ये गाडि पार्क केली. सर्वात जवळ असलेला पार्किंग लॉट किमान दिड किमी दुर आहे. उत्तरप्रदेश सरकारने ताजच्या साधारण एक दिड किमीच्या परीसरात गाड्यांना बंदि केली आहे. घोडागाड्या – इलेक्ट्रीक कार्स तिथे उपलब्ध केल्या आहेत. त्यातुन प्रवास करणारे मुख्यत: परदेशी पाहुणे असतात. एका घोडेगाडि वाल्याने सांगितले प्रत्येकी २० रुपये घेऊन ताजच्या प्रवेशद्वारापाशी सोडतो. दिड किमी साठी ६० रुपये?? अरे मुंबईते सुद्धा देत नाहि रेऽऽऽ असं झालं होत आम्हांला. आम्हि चालतच निघालो. दुर ताजचा संगमरवरी घुमट दिसत होता. प्रवेशद्वारापाशी गेलो. हर्षदच्या मावशीचे यजमान सरकारी अधिकारी आहेत. त्यांच्या हाताखाली काम केलेले एक सहकारी दिलीप यांनी त्या सकाळीच ताजच्या प्रवेशद्वारावर आमचे पास तयार करुन घेतले होते. तिथे आमच्या बॅगचे चेकिंग झाले. आत सोडल्यावर तिथल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ऑफिसरलाच भेटलो. त्याला पुर्व कल्पना असल्याने आमची बरीच सरबराई केली. अर्धातास गप्पा – टप्पा झाल्यावर त्याने एक पोलिसवाला वॉकिटॉकि सकट आमच्या बरोबर दिला. त्यांचे नाव करणसिंग होते. मग पुढचे चार तास आम्हि आणि ताज. ताजचे त्याच्या मोठ्या प्रवेशद्वारातुनच दिसणारे प्रथम दर्शन तुम्हांला संमोहित करते. आणि ताज कडे पडणारे प्रत्येक पाऊल ताजचे विराट आणि अंगावर येणारे रुप खुलवत जाते. त्या वास्तुत इतके भारावलेपण आहे कि क्षणभर तो ताज महाल कि तेजो महाल हा वाद विसरायला होते. ज्या कोणा अजोड बुध्दिमत्ता असलेल्या इसमाच्या टाळक्यात हि वास्तु उभी राहिली त्याच्या आणि ज्या हजारो हातांनी हि वास्तु अहोरात्र खपुन तयार केली त्या अनाम हातांची हजार चुंबने घ्यावीशी वाटतात.

बुर्‍हाणपुरात मुमताज महल चौदाव्या बाळंतपणा नंतर पैगंबरवासी झाली. मरताना म्हणे तीने शहजहानला सांगितले कि माझी कबर अशी बनवा कि जगात कुठेहि अशी दुसरी वास्तु नसेल (मुघल सम्राट असला म्हणुन काय झाले शेवटि बिचारा नवराच कि, त्यानेहि हो म्हंटले). तीच्या मरणानंतर एका वर्षाने ताज महालचे बांधकाम सुरु झाले १६३२ मध्ये सुरु झालेले काम १६५३ पर्यंत सुरु होते. अखेर १६५७ मध्ये परंपरागत रक्तरंजीत स्पर्धेत सत्ता औरंगजेबाकडे आल्यावर त्याने आजारी बापाला कैदेत टाकले. व अखेर शहाजहान मेल्यावर त्याच्या इच्छेनुसार त्याला मुमताज महल शेजारीच दफन केले. ताजमहाल हा एका डोक्यातुन अवतरला नसुन काही वास्तुथापत्य शास्त्रज्ञ एकत्र येऊन बांधलेले हे काम आहे. अब्द उल-करीम मामुर खान, मकरामत खान व उस्ताद अहमद लाहोरी अश्या तीन आर्किटेक्ट्सची नावे मिळतात. लाहोरी त्यांच्यातील प्रमुख होते. संपुर्ण बांधकाम करायला त्यावेळी ५ लाख रुपये खर्च आला होता. सगळे संगमरवर राजस्थानातील मकराना येथुन आणले. बाकि २८ प्रकारचे दगड, व मौल्यवान रत्ने, ह्या गोष्टी पंजाब, तिबेट, श्रीलंका, चीन, पर्शिया, अफगाणिस्थान, अरेबिया इथुन मागवल्या गेल्या. ताजवरचे कोरीवकाम बघताना डोळे विस्फारले जातात. इतके सुंदर कोरीवकाम त्यांनी कसे केले असेल? कोणती हत्यारे वापरली असतील? आणि बर्याच ठिकाणी तर एकाच आकृतीच्या मिरर इमेज आहेत त्या इतक्या हुबेहुब आहेत कि खरोखर कोणीतरी आरसा धरला असावा. ताजच्या भिंतींवरच्या अनेक आकृत्या या एकसंध आहेत. म्हणजे फुलाच्या पाकळीपासुन ते कुंडिपर्यंत एक अखंड कोरीवकाम आहे. त्यावरुन हलका हात फिरवला तर माणसाची नस जशी हाताला जाणवते तसे ते काम हाताला जाणवते. एकाच मापाची दहा दहा फुटी सलग बारीक नक्षीदार जाळी, एकमेकांत गुंफलेल्या वेली. लाल, केशरी, नीळ्या रंगातील फुले, हिरव्या रंगाची पाने हे खुप जिवंत आहेत. करणसिंगांनी तिथल्या एका गाईडला आमच्या बरोबर दिले. त्याने आतले काम दाखवताना डोळ्यांच्या ऊंचीला असलेल्या एका वीतभर आकाराच्या पट्टीवरील पाना-फुलांवर खिशातला पेन-टॉर्च चालु करुन टेकवला. तेव्हा त्या नीळ्या किंवा केशरी फुलांतुन आणि हिरवट पानांतुन प्रकाश आत गेला आणि शब्दश: त्यांच्या मागुन कोणीतरी दिवा धरावा असा इफेक्ट आला. हे असे काम आधी कधीच बघितले नव्हते आणि कदाचित दुसरीकडे बघायला मिळणे कठीण. आणि हि पाने-फुले बाहेरुन त्यात बसवली आहेत, म्हणजे संगमरवरावर इंचभर खोल कोरीवकाम करुन मग त्यात त्या वेगवेगळ्या रंगाचे दगड, वेली, पान, फुले यांचे आकार बनवुन आत अडकवले आहेत.

शहाजहान - मुमताज महलच्या कबरींभोवती जाळी बसवली आहे. अप्रतिम कलाकुसर. मंद प्रकाश, थंड फरशी आणि घुमणार्या पारव्यांचा आवाज याने आतले वातावरण गंभीरच असते. जर शांतता असली तर इथे घुमटाखाली उच्चारलले शब्द मिनिटभर सहज घुमत राहतात असे गाईडने सांगितले.मुळ कबर म्हणे खाली आहेत. खाली जायचा दरवाजा बंद केलाय व या त्यांच्या प्रतिकृती आहेत. ताज महालच्या या भागाला म्हणजे मुळ इमारतीला “रझा – इ – मुनावरा” म्हणतात. मुमताज महलच्या कबरीवर आणि ताजमहालच्या प्रवेशद्वारांवर कुराणातील आयता अथवा सुराह लिहिल्या आहेत. त्यापैकी मुमताज महलच्या कबरीवरील सुराहचा अर्थ – “इथे कायमसाठी नीजलेला जीव हा पुण्यात्मा होता त्याला कुठलेही क्लेष न होता जन्नत मिळो” – असं म्हणतात कि देवाचे आसन धरलेले चार देवदुत संपुर्ण कुराणात एकदाच बोलतात तीच हि ओळ. याखेरीज दोन्हि कबरींवर भरपुर वेली-पाना-फुलांची नक्षी आहे. शहाजहानच्या कबरीवर एक उंचवटा आहे. पुरुषाची कबर ओळखता यावी म्हणुन तो उंचवटा आहे असे म्हणतात. मुमताज महलची कबर वास्तुच्या मध्यभागी असुन नंतर शहाजहानची कबर नंतर पश्चिमेला बनवली आहे. आत फोटो काढायला बंदि आहे. ताजच्या प्रवेशद्वारावर लिहिलेल्या आयता वैशिष्ट्यपुर्ण आहेत. म्हणजे त्यांची जाडि खालपासुन वरपर्यंत एकाच आकाराची दिसते. त्याचे कारण वर जाणारे कोरीवकाम हे आकाराने जाड करत गेले आहेत त्यामुळे वर – वर जाऊन सुध्दा आकार तितकाच वाटत राहतो. कबरीच्या भागात जाताना बुट काढावे लागतात. किंवा बुटांवर एक आवरण चढवावे लागते. बरोबर करणसिंग असल्याने चिंता नव्हती. त्यांनी खिशातुन तीन सॉक्स सारखे जोड काढले व बुटांच्या वरुन घालायला सांगितले. तेच घालुन आम्हि आत जाऊन आलो.

ताज एक गारुड आहे. तुम्ही त्या वास्तुभोवती जितके फिरता तितके तिच्यात गुंतत जाता. त्याचा मुख्य दरवाजा – “दरवाजा-इ-रौजा” वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे. दरवाज्यातुन आत गेल्यावर समोर दोन पुरुष उंचीच्या प्रचंड चौथर्यावर दक्षिणाभिमुख ताज दिमाखात उभा आहे. बाजुला ताजच्या उंचीशी स्पर्धा करणारे आणि वरच्या बाजुला निमुळते होत गेलेले चार मिनार आहेत. या मिनारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बांधुन काढतानाच बाहेरच्या बाजुला २ डिग्रीने झुकवले आहेत जेणेकरुन जर भुकंप झाला तरी मिनार बाहेर कोसळतील व मुळ वास्तुला धक्का लागणार नाही. वास्तुकलेतील अनेक आश्चर्ये ताजच्या बांधकामात दिसतात. मुळात त्याची मोजमापे इतकि अचुक कशी घेतली असतील हेच मोठे कोडे आहे. मुख्य दरवाजा, मधल्या पट्यातली कारंजी व ताजच्या मुख्य इमारतीच्या दरवाज्याचा मध्य इतका एक रेषेतील आहे कि त्या अचुकतेचा विचार करताना सामान्य माणुस डोकं खाजवत रहावा. दरवाजा-इ-रौजा व ताज महाल यांच्या मधल्या जागेत चार प्रशस्त बगिचे बनवले आहेत. चार बगिच्यात प्रत्येकि चार असे एकुण १६ सुंदर गवताचे वाफे बनवले आहेत. मध्यभागी अगदि काटकोनात छेदणारे + च्या आकाराचे पाण्याचे हौद आहेत त्यातच कारंजी खेळवली आहेत. एकमेकांना येऊन मिळणारे हे हौद जन्नत मधील चार नद्यांचे प्रतिक आहेत. व मध्यभागी असलेला हौद “हौद-अल-क्वथार” म्हणजे स्वर्गात पोहचल्यावर पुण्यात्म्यांची तहान भागवणारा हौद समजतात. पश्चिमेकडे असलेली मस्जिद आणि पूर्वेच्या बाजुला जवाब म्हणजे मस्जिदिचेच प्रतिबिंब भासणारा मेहमानखाना आहे. मेहमानखान्यात पुर्वी कबरीवर चादर चढवायला आलेल्या प्रतिष्ठितांच्या भेटीगाठी होत. ताजमहालच्या उत्तरेला यमुना वाहते. सध्या यमुना काळवंडली आहे. नदि पलीकडे म्हणे शहाजहानला काळा ताज बांधायचा होता, स्वत:ची कबर म्हणुन. पण त्याची तब्येत बिघडली व औरंगजेबाने त्या आधीच त्याला कैदेत टाकले. आपली शेवटची सात वर्ष आग्रा किल्यातील मुमताज महलसाठी खास बांधुन घेतलेल्या “मुसम्मन बुर्ज” इमारतीतच दुरुन ताज बघत बघत त्याने घालवली. यात किती खरे किती खोटे तो पैगंबरवासी शहाजहानच जाणे पण आजहि यमुनेच्या पलिकडे ताजमहालच्या चौथर्याला लागेल इतकि प्रचंड जागा मोकळी सोडली आहे. तिथेच माहताब बाग म्हणजे चांदण्यात फिरताना समोरचा ताज बघायला बनवलेली बाग होती असे सांगतात. यमुनेला सतत येणार्या पुरामुळे सध्या तिथे ओसाड जमिन दिसते.

करणासिंगांशी गप्पा मारताना त्यांना विचारले “आपने तो ताज को पुनम कि रात मै भी देखा होगा?” त्यावर मनमोकळे हसत म्हणाले “जिहॉं!! ऐसी खुबसुरत जगह शायदहि कही होगी!” आणि मग साडे चार च्या उन्हात ताजच्या द्वारावरच्या आयता चमकत होत्या. त्यांच्याकडे बोट दाखवुन ते म्हणाले “पुनम कि रात पुरा ताज इसी तरह जगमगाता है!” त्यांचा हेवा करावा तितका कमी वाटला. ताजचे शेकडो ऍंगल्स कॅमेरात पकडले. मिनाराचे, मशिदिचे, जवाबचे, दरवाजा-इ-रौजाचे अनेक फोटो काढले. मन भरत नव्हतं. एखादा ऍंन्गल राहिला नाही ना? असे वाटत होते. सुर्य मावळतीकडे झुकत होता आणि ताज सोनेरी रंगात न्हायला लागला. घुमटावर पडणारे पिवळे-तांबुस उन. घुमटाभोवती चक्कर मारत परत मिनार आणि घुमटाच्या खाली आश्रय घेणारे कबुतरांचे थवे आणि दुरच्या कुठल्यातरी मशिदित दिली जात असलेली अजान……..सगळेच अविस्मरणीय. त्यांनाच विचारले इथे अजुन काय बघण्यासारखे आहे? त्यावर म्हणाले “आग्रा फोर्ट है! वो सामने!.... लेकिन छह बजे बंद होता है! अब तो सवापॉंच बज गये है!......वहॉं पहुचतेहि आपको और आधा घंटा लगेगा।“ मग आम्हि ठरवले ताजच बघायचा. त्यावर त्यांनीच उपाय सांगितला – “अजी आप यहॉ जो म्युझियम है उसे देख सकते है!” म्युझियम मध्ये खरच अनेक गोष्टि ठेवल्या आहेत. दुर्मिळ चित्रं, शस्त्रे, अन्नात विष मिसळल्यास रंग बदलणारे दगडि ताट. नकाशे, ताज मधले वेगवेगळे दगड ते कुठुन आणले त्यांची जगाच्या नकाशासह दिलेली माहीती. उत्तम म्युझियम आहे.

अखेर साडेसहा पर्यंत ताजच्या फिरुन परत कंत्रोलरुम मध्ये गेलो. त्या ऑफिसरला भेटुन त्याला धन्यवाद दिले. त्याने विचारले “कितने दिन हो दिल्ली मै?” एकच दिवस आहोत परवा पहाटे जातोय असे म्हंटल्यावर तोच हिरमुसला झाला – कारण दिल्लीत काय काय बघा, व कुठे काय खा याची यादिच त्याने आमच्यासाठी केली होती ती फुकट जाणार याची चिंता त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. तो पंजाबी असल्याने खाण्याचा शौकिन होता त्याने किमान २०-२२ हॉटेल्स ची लिस्ट दिली. काहि नाहि तरी कॅनॉटप्लेस ला एका साऊथ इंडियन माणासाचे हॉटेल आहे तिथे जाऊन साऊथ इंडियन डिशेश खाऊन बघा हे सांगायला विसरला नाही. बाहेर पडल्यावर आधीस समोर भेळवाला होता त्याकडे भेळ हाणली. दुपारी ताजमुळे तहानभुक हरपली होती त्याची जाणीव आत्ता झाली. साधारण ७ वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत भरपुऽऽर पेठा घेतला. मध्ये एका धाब्यावर परत पराठे आणि पनिरचे पदार्थ हादडले. काहिहि म्हणा उत्तरेत खाण्याची चंगळ असते हे समजुन चुकलं. हॉटेलवर पोहोचायला रात्रीचे बारा वाजुन गेले. इथे एका गोष्टिची आठवण कायम झाली – दिल्लीत भाड्यावर गाडि घेतली तर गाडि जिथली असेल तिथुन तुम्हाला जिथे पिकअप केले जाते तिथपर्यंतचा खर्च घेतात वर परत तुम्हांला जिथे सोडतात तिथु परतीचा खर्च देखिल घेतात. आम्ही जी गाडि घेतली होती तो आमच्या हॉटॆल पासुन ७ किमीवर रहात होता म्हणजे त्याला दोन्हि वेळचा खर्च द्यावा लागला. आधी हे आचरट प्रकार सांगितले नसल्याने बरीच हुज्जत झाली. शिवाय कारण नक्कि आठवत नाहि पण ३००-४०० रुपये अधिक खर्च द्यावा लागला होता. म्हणुन जर तुम्हि उत्तरेत फिरायला जाणार असाल तर सगळ्या अटि चार-चारदा समजावुन विचारुन घ्या. अन्यथा दिल्लीतले ठग कधी गंडा घालतील ते सांगता येत नाही. अखेर जेवुन झोपायला दिड झाला होता. सकाळी उठुन दिल्लीत फिरायचे होते जंतरमंतर, कुतुबमिनार, लाल किल्ला, नॅशनल म्युझियम बघायचे होते. शेवटच्या दिवसाचे मनातल्या मनात प्लॅनिंग करता करता कधीतरी डोळा लागला.

जाग आली तर ९:१५ होऊन गेले होते. रात्री थकुन आल्यावर त्यातुन झोपायला उशीर झाल्याने इतक्या उशीरा उठलो होतो. पांघरुण फेकुनच उठलो आधी हर्षद-मैथिलीच्या रुम वर फोन लावला तिथेहि तिच कथा. हर्षद म्हणाला कि गाडि १०:३० ला येणार आहे. म्हणजे अजुन अर्धातास तरी झोप होणार होती. मऊ-मऊ दुलई घेऊन परत ताणून दिली. वरच्या बोनस अर्ध्या तासाच्या झोपेनंतर दिवसाची सुरुवात एकदम समाधानकारक झाली, हा म्हणजे दूधवाल्याने आपणहुन मापभर दुध जास्त घालावं किंवा भाजीवाल्याने चार मटार शेंगा वरुन टाकल्यावर गृहिणींना जसा आनंद होतो त्या कॅटेगरीतला आनंद होता. आवरुन निघायला साधारण ११ वाजले. सर्व प्रथम गाडि जंतर - मंतर ला न्यायला सांगितली. भारत भरात ५ जंतर मंतर किंवा यंत्र मंत्र आहेत. महाराजा जयसिंग दुसरे यांनी १७२४ ते १७३५ या दरम्यान हि यंत्रे बनवुन घेतली. खगोलिय अभ्यास करण्यासाठी त्यांची बांधणी केली. जंतर मंतर मध्ये सम्राटयंत्र, रामयंत्र, जयप्रकाश यंत्र व मिश्रयंत्र यांचा समावेश आहे. खरे तर जंतर मंतर समजावुन घ्यायचं असेल तर दिवसं कमी पडेल. पण इथे समजावुन द्यायलाच कोणीहि नाहि. रामयंत्राचे आरे सुद्धा मोडले आहेत. सम्राटयंत्रावर जाण्याचा रस्ता बंद! अर्थात बंद नसता तरी काय फरक पडला असता? समजणार तर काहिच नव्हते. कॉलेजची मुलं-मुली या यंत्रांच्या पायर्यांवर बसुन चकाट्या पिटर होती. अजुबाजुला सुंदर बागा लावल्या आहेत, कोणी तिथल्या झाडांखाली दुपारची झोप घेत होतं. एकुण जयसिंगानी ज्या कल्पकतेनं व ज्या कारणासाठी ह्या वास्तु बांधल्या होत्या त्या लोकांपर्यंत पोहचु शकेल असा कुठलाहि मार्ग नव्हता. नाहि म्हणायला २ तास तिथे मोडले.

दोन तासांनी आम्हि कुतुबमिनारकडे निघालो. हर्षदला दिलीपकाकांचा कॉल आला – “कुठे आहात?” हर्षदच्या बोलण्यावरुन त्यांचे प्रश्न समजत होते. नंतर हर्षदच्या चेहर्यावर आनंदमिश्रीत आश्चर्य होते त्याने मोबाईल खिशात टाकला आणि ड्रायव्हरला सांगितले “दिलीपजीने गाडि जनपथ पे कॉंग्रेस ऑफिसके सामने खडि करने के लिये कहॉं है!” मग आमच्याकडे बघत हर्षद म्हणाला – “दिलीपकाकांनी राष्ट्रपतीभवनचे पास बनवुन घेतले आहेत!” पुढली दोन मिनिटे कोणी काहिच बोलले नाहि. अकबर रोड वर गाडी थांबवली. दहा मिनिटात दिलीप काका आले त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये नेले. चहा – कॉफि घेऊन आम्हि राष्ट्रपती भवनाकडे निघालो. विजयचौक ओलांडला तशी संसदभवनाची वास्तु उजव्या हाताला उभी राहिली. दिलीपकाका गाडित पुढे बसले होते मागे वळुन म्हणाले – “मी संसदभवनाचे पासेस मिळवायचा प्रयत्न केला होता पण किमान ३ दिवस आधी अर्ज करावा लागतो, शिवाय आजच रेल बजेट आहे. आज नाहि कोणाला सोडणार तिथे!” म्हणे म्हणे पर्यंत सिग्नल सुटला. गाडि राजपथवरुन राष्ट्रपतीभवनाकडे धावु लागली.

राष्ट्रपती भवन – भारताच्या प्रथम नागरीकाचे “घर”. मुळात राष्ट्रपती भवन भारताच्या व्हॉइसरॉयसाठी रहायला बनवला गेलेला वाडा होता. त्याला व्हॉयसरी हाऊस म्हणत. एडविन लॅन्डसीर ल्युटेन्स व बेकर हे दोघे राष्ट्रपती भवनाचे स्थापत्यशास्त्रज्ञ होते. रायसिना हिल वर ३०० एकर जागेत ह्या वास्तुला बनवले आहे. १४ जुन १९१२ मध्ये बांधकामाला सुरुवात झाली, पुढील वीस वर्ष या वास्तुची उभारणी होत होती. व्हॉयसरी हाऊसच्या आवारातच सेक्रेटरीएट बिल्डिंग बांधुन काढल्या आज त्याच नॉर्थ ब्लॉक व साऊथ ब्लॉक म्हणुन ओळखल्या जातात. रायसीना हिलच्या पायथ्याशी या वास्तु आहेत. सध्या साऊथ ब्लॉक मध्ये परराष्ट्र व्यवहार कार्यालय आहे. दोन्हि ब्लॉक मागे टाकुन गाडि रायसीना हिलचा चढ चढु लागली. ३ ठिकाणी थांबवुन गाडिची झडती झाली. २ ठिकाणी नावे, गाडिचा नंबर यांची नोंद घेतली. आत कॅमेरा – पेनड्राईव्ह सारख्या वस्तु आत नेण्यास मनाई असल्याने त्या वस्तु बॅग मध्ये टाकल्या व गाडितुन उतरुन आम्ही राष्ट्रपती भवनासमोर उभे राहिलो. त्या भव्य वास्तु समोर उभं राहताना अभिमानानी उर भरुन आला, मध्यावरच्या उंच घुमटावर तिरंगा फडकत होता. ती भव्यदिव्य वास्तु बघताना डोळे विस्फारले गेले. पहार्यावर गुरखा रेजिमेंट होती. उंची कमी पण बांध्याने मजबुत आणि नजरेत सावधपणा घेऊन उजव्या कानावर झुकलेली शानदार गुरखा कॅप तोलत शेकडो जवान ठिकठिकाणी दक्ष अवस्थेत उभे होते. प्रवेशद्वारापाशी २ चकाकत्या तोफा आ वासुन उभ्या होत्या. राष्ट्रपतीभवनाच्या समोर जयपुर कॉलम आकाशाकडे सरसरत वर जाऊन “स्टार ऑफ इंडिया” ला धरुन उभा होता. मुळात हा स्टार ऑफ इंडिया १८८५ साली जो ब्रिटिशांचा भारतातील युनियन फ्लॅग होता त्याच्या मध्यावरचा स्टार होय. या स्टारच्या डोक्यावर इंपिरीयल क्राऊन असायचा.

आत गेलो पहिल्याच दालनात सध्याच्या राष्ट्रपती (राष्ट्राध्यक्षा??) डॉ प्रतिभा पाटिल यांचा फोटो लावला होता. मग डावीकडे रीसेप्शन वर दोन जण बसले होते त्या हॉलमध्ये एका काचेच्या पेटित संपूर्ण राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती ठेवली होती. त्या मोठ्या हॉल मध्ये राजेंद्रबाबूंपासुन ते प्रतिभा पाटिल यांच्यापर्यंत राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या सर्व व्यक्तींचे फोटो त्यांच्या सेवेच्या कालखंडासकट लावले होते. रीसेप्शन जवळच आमची नावे घेतली व फोटो काढुन पासेस तयार केले. मग आमच्या बरोबर एक सुटाबुटातला स्मार्ट माणूस राष्ट्रपती भवन दाखवायला पाठवला. परत आमची झडती झाली आणि मग आत सोडले. त्याने सर्वप्रथम आम्हांला राष्ट्रपती भवनाच्या तळघरात असलेल्या म्युझियम मध्ये नेले. ते म्युझियम सुध्दा जमिनीखाली २ मजली होते. त्यात भाराताच्या पहिल्या व्हॉइसरॉय पासुन ते माऊंटबॅटनपर्यंत सगळ्यांची लाईफ साइझ पेंटिंग्स लावली आहेत. वॉरेन हेस्टिंग पासुन सुरु होणारा इतिहास सरकत सरकत माऊंटबॅटनपाशी थांबताना फक्त “बघण्यात” किमान तास-सव्वा तास निघुन गेला. त्यांच्याखाली त्यांचा कार्यकाल दिला होता. मला त्याक्षणापासून आतापर्यंत एक गोष्ट समजली नाहिये – ह्या वस्तु इतक्या व्यवस्थित सांभाळुन ठेवल्या बद्दल पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहचवला म्हणून कौतुक करावे कि गुलामीची मानसिकता अजुन गेली नाहिये असं समजून दु:ख मानावं?? त्या पेंन्टिंग्समध्येहि डलहौसि, कनिंग, कर्झन, चेम्सफोर्ड, आयर्विन, वेव्हेल, माऊंटबॅटन यांच्या चित्रा समोर उभं राहताना आपोआप कपाळावर आठी येत होती….. एक भारतीय म्हणुन तसे तर सगळेच अत्यंत अप्रिय होते पण यांचा इतिहास व सत्ता बळकट करण्यासाठी यांनी केलेले विशेष प्रयत्न त्याला कारणीभूत असावेत. माऊंटबॅटनतर भारताची फाळणी करणारा महाभागच होता. बंगालची फाळणी करणार्या कर्झनपेक्षाहि संतापजनक. याने नेहरुंना सांगितले होते – “स्वातंत्र्य मिळाले तरी राष्ट्रपती भवनाच्या मुख्य दालनात माझे चित्र कायम असावे!” पुढच्यावेळी तो आला तेव्हा त्याचे चित्र त्या जागेवर नव्हते हे बघुन जाम गुस्सा झाली होती स्वारी. त्याच म्युझियम मध्ये फ्रान्सच्या राजाराणीचे चित्र देखिल होते. एक मोठा पृथ्वीगोल आहे. युनियन जॅक एका पेटित ठेवलाय. एक पंचधातुंचा मोठाच्या मोठा युरोपियन स्टाईलचा किंग्स क्राऊन ठेवलाय. त्या क्राऊन मध्ये किमान ३-४ राजांची डोकी मावली असती. राणीची चांदिची खुर्ची ठेवली आहे. लॉर्ड माऊंटबॅटन व लेडि माऊंटबॅटन यांचे ६-७ फुटि संगमरवरी पुतळे ठेवले आहेत. कलाकुरस म्हणुन अतिशय सुरेख व तुकतुकित पुतळे आहेत.

सगळे बघुन झाल्यावर त्या माणासाने अजुन खालच्या भागात नेले तिथे भारताच्या राष्ट्रपतींच्या सरबराईत ज्या गोष्टि वापरल्या जातात त्या ठेवल्या आहेत म्हणजे चहा प्यायच्या कपांपासुन ते रात्रीच्या जेवणापर्यंत काय-काय करतात? त्यासाठी कोणते साहित्य वापरले जाते? खास मेजवानी असेल तर कुठली क्रोकरी वापरतात ती सगळी तिथे मांडुन ठेवली होती. खरतर हे सगळं बघण्यात मजा येत होती पण दिलीपकाका घाई करत होते इथुन नॅशनल म्युझियम मध्ये जायचे आहे तर सगळे पटापटा बघा. नॅशनल म्युझियम मध्ये एका ओळाखिच्या माणसाला देखिल आमची नावे सांगुन म्युझियम मधले खास भाग माहितीसकट फिरवायची व्यवस्था केली होती. मग फारसा वेळ न दवडता आम्हि राष्ट्रपती भवनाच्या वरच्या मजल्यांकडे निघालो. बरोबरचा माणूस सगळी माहिती देत होता. तिथली पेंन्टिंग्स, वेगवेगळ्या वस्तू, त्या कोणी कुठल्या राष्ट्रपतींना भेट म्हणुन दिल्या? किंवा कुठल्या राष्ट्रपतींनी कुठली वस्तु राष्ट्रपतीभवनाला सजवायला आणली ते सांगत होता. त्या सगळ्यात दोन गोष्टिंनी मनात कायम जागा केली आहे एक म्हणजे भगवान बुध्दांची कंबोडियातुन आणलेली भव्य मुर्ती. या मुर्तीच्या मागे जी प्रभावळ आहे ती हातांची प्रभावळ आहे. व १००० हातांची प्रभावळ व खुद्द भगवान बुध्दाचे २ हात असे मिळुन एकुण १००२ हातांनी सजलेली ती मुर्ती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इजिप्तच्या पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना दिलेले दगडि चित्र. या चित्रात वाळवंटात एक माणूस उंटासकट जाताना दाखवला आहे आणि हे चित्र वेगवेगळ्या रंगांच्या दगडांचा वापर करुन बनवले आहे. अतिशय सुंदर चित्र होते! मधल्या कॉरीडोअर मध्ये सगळ्या राष्ट्रपतींचे फोटो लावले होते. छतावर पानावेलींचे चित्र असलेले सुंदर कापड लावले होते. कॉरेडोअरच्या एका भागाकडे बोट दाखवुन त्या माणसाने सागितले “महामहिम राष्ट्रपतीजी का कार्यालय उस दरवाजे के पिछे है!” अर्थात तिथे विनापरवानगी जायला बंदि होती. चार सुरक्षा रक्षक तैनात होते.

आम्हि एक एक दालन ओलांडत एका प्रशस्त हॉल मध्ये आलो. इतका प्रचंड हॉल क्वचितच कुठल्या वास्तुत बघायला मिळाला असेल. संपूर्ण हॉल मध्ये मऊ गालिचा अंथरला होता. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेला तो गालिचा चार – सहा माणसे उकिडवी बसुन मऊ ब्रशने साफ करत होती. समोर साधारण वितभर उंचीचा चौथरा होता व त्याच्यावर एक खुर्ची ठेवली होती. त्या खुर्ची समोर पिवळसर रंगाचा एक २x२ चा चौकोनी गालिचा अंथरला होता. “अशोका हॉल” बरोबरच्या माणसाचे शब्द ऐकुन तिथे काय समारंभ होतात हे एका क्षणात लक्षात आले.हाच तो हॉल जिथे बालश्री पुरस्कारांपासून ते भारतरत्न पुरस्कारांपर्यंत सगळे अतिशय मानाचे नागरी किंवा लष्करी पुरस्कार खुद्द राष्ट्रपतींच्या हातुन दिले जातात. त्याने वर छताकडे बोट दाखवले त्या अख्या हॉलच्या छतावर एक अखंड चित्र होते. मध्यभागी घोड्यावर बसलेला राजा व आजु बाजुला त्याचे सैनिक आहेत असे ते चित्र होते. कोणा अफगाणिस्थानच्या राजाचे ते चित्र होते व अफगाणिस्थानच्या राष्ट्रपतींनी ते भेट म्हणून दिले होते. त्या चित्राचे वैशिष्ट्य म्हणाजे हॉलच्या कुठल्याहि कोपर्यात उभे राहिलात तरी तो राजा आपल्याकडेच बघतोय असं वाटतं. हे सगळं फार भव्य-दिव्य होतं. एक सेकंद थांबुन “त्याने विचारले – बाहरसे एक गुंबद देखा था? जिसके उपर हमरा राष्ट्रध्वज लहरा रहा था?? वह गुंबद अब बिलकुल हमारे सिर के उपर है!” हे वाक्य ऐकल्यावर क्षणभर अंगावर रोमांच उभे राहिले. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती जागा भारताच्या सर्वात महत्वाच्या जागांपैकी एक आहे. आणि भारतातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या वाड्यावरच्या झेंड्याखाली उभं राहण्याचं सुख समजायला तो अनुभव स्वत:हून घ्यावा लागतो. कदाचित काहि जणांना यात काहिहि विशेष वाटणार नाहि .पण माझ्यासारखं इतिहासाचं वेड असलेले माझ्या भावना नक्कि समजु शकतील. समोरच ती जागा होती जिथे उभं राहून भल्या भल्या अवलियांनी आयुष्यभर मेहनत घेऊन एखाद्या कार्याला सर्वस्व देऊन जे कमावलं असतं त्याची पावती समस्त भारतीयांतर्फे खुद्द राष्ट्रपती देतात. एक गोष्ट मान्य करावी लागेल - त्या जागेसमोर उभं राहताना एक क्षणभर मोह झाला कि त्या चौथर्यावरच्या पिवळ्या गालिच्यावर उभं रहावं! तसं केलं असतं तरी कोणी काहिहि बोललं नसतं पण लगेच स्वत:ला आवरलं आणि स्वत:ला बजावलं – लेका तिथे उभं रहायचा विचार करण्याचीहि सध्या तरी तुझी लायकी नाहिये!

त्या माणसाने मग समोरच्याच एक लांबलचक हॉल मध्ये नेले. तिथे मध्यभागी एक लांऽऽऽबलचक टेबल होते खुर्च्या काढल्या होत्या, पण तो डायनिंग हॉल आहे हे ओळखणं सहज शक्य होतं. किमान शंभर माणसं सहज मेजवानीत सहभागी होऊ शकतील इतके मोठे टेबल तर नक्किच होते. भींतीवर वेगवेगळी शस्त्रास्त्रे लावली होती. आजुबाजुच्या टेबल वर अनेक फ्लॉवरपॉट ठेवले होते. तसेच प्रत्येक फ्लॉवरपॉटच्या वर वेगवेगळ्या राष्ट्रपतींची तैलचित्रे लावली होती. त्यात डॉ. कलामांचे चित्र मला सर्वात जास्त आवडले. ते बघायला पुढे गेलो तसे खिडकितुन खाली फुलांनी बहरलेली बाग दिसली. मैथिलीली हाक मारुन मी बाग दाखवत होतो तेव्हा तो माणूस स्वत:हुन म्हणाला – “मोगल गार्डन्स – उसेहि देखने अब निचे जानेवालें है! वह सामने जो लॉन है वहॉ अगर कोई खास व्यक्ती के सम्मान मै समारोह होता है तब वहि खाना दिया जाता है ! वहिं आलिशान पार्टि रखि जाती है!” त्याच्या मागोमाग आम्हि मुघल गार्डन्स कडे वळलो. मध्ये एका ठिकाणी बेकर यांचा पुतळा होता त्या अर्ध पुतळ्याकडे बोट दाखवुन त्याने सांगितले कि राष्ट्रपतीभवनाचे ते आर्किटेक्ट होते. जीना उरताना त्याने माहिती दिली यहॉ कुल ३४४ कमरे है!” यावर मी विचारले “गर कोई यहॉ पे खो जाता है तो उसे ढुंडने केलिये कोई सिस्टम है?? या हर दिन एक कमरा इस हिसाब से लगभग सालभर वो आदमी अंदर हि अंदर घुमता रहता है??” यावर तो खदाखदा हसला. आता ३४४ खोल्या म्हंटल्यावर माझा प्रश्न अगदिच चुकिचा म्हणता येत नाहि. खाली पोहोचल्यावर वेड लागायचं बाकि होतं. दोन हातांच्या ओंजळी इतका एक एक गुलाब होता. रंगांची तर गणानाच नव्हती. या खेरीज शब्दश: जेवणाच्या ताटाच्या आकारा एव्हढ्या सुर्यफुलांचे ताटवे होते. त्या माणसाने आंम्हाला एक कुंडितले वडाचे बोन्साय दाखवले साधारण कंबरेइतके उंच वडाचे झाड फक्त ८१ वर्षांचे होते. खरंतर बोन्साय प्रकारच मला आवडत नाहि. पण ८०-८१ वर्षांचे वडाचे झाड कुंडित वाढवणार्यांची कमाल मान्य करावी लागेल. मग गुलाबांच्या बागेकडे वळलो जवळपास तीनशे - साडे तीनशे जातींचे गुलाब होते तिथे. मुघल गार्डन्स मध्ये तेव्हा लोकांची बरीच गर्दी होते कारण दर वर्षी फेब्रुवारी महिन्यातील दुसर्या आठवड्यात सामान्य जनांसाठी मुगल गार्डन खुले असते हे नंतर समजले. अर्थात त्यातल्या विशिष्ट भागांमध्ये जाण्यावर बंदि असते पण बरोबरच्या माणसामुळे आम्हाला तोहि भाग बघायला मिळाला. दिलीपकाका घाई घाई करत होते घड्याळात पाच वाजले होते आणि नॅशनल म्युझियम ५:३० वाजता बंद होते.

सगळं बघुन आम्हि बाहेर आलो तर राष्ट्रपतीभवनासमोर काहि लोकं फोटो काढत होते. कॅमेरा आत न्यायला बंदि आहे, बाहेरुन फोटो काढायला परवानगी आहे असे समजल्यावर धावपळीत एक फोटो सेशन झाले. दिलीपकाकांची घाई सुरु होतीच. अखेर त्यांनी जवळपास आम्हाला किडनॅप करुन गाडित बसवले. आणि गाडिला म्युझियमकडे नेण्यास सांगितले पण तेच झाले आम्हि तिथे पोहोचेपर्यंत सव्वापाच होऊन गेले असल्याने आम्हि म्युझियम मध्ये पाय ठेवेतो त्याची दालने बंद व्हायला सुरुवात झाली. तिथे एका दालनात नौदलाची मेडल्स ठेवली होती. एकाच दलात इतके बहुमान असतील असं स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. बाजुलाच १९७१ च्या युध्दातील पाक शरणागतीचं शिल्प लावलं होतं. पाकिस्तानकडुन ले.जन. नियाझी शरणागतीच्या करारावर स्वाक्षरी करत आहेत आणि भारताचे ले.जन. जगजितसिंग अरोरा शेजारी बसले आहेत. कुणाहि भारतीयाची छाती अभिमानाने फुलुन येईल अश्या क्षणाचे ते शिल्प होते. या खेरीज विविध दालनांतुन अनेक सुंदर व प्राचिन मुर्ती ठेवल्या होत्या. अखेर साडेपाचला लगोलग आम्हाला बाहेर पडावं लागलं.

आम्हि आमचा मोर्चा आता कुतुब मिनारकडे वळवला. कुतुबुद्दिन ऐबक या पहिल्या मुस्लिम शासकाने अफगाणिस्थानातील जाम मिनारतीवरुन प्रेरणा घेऊन दिल्लीत हा मिनार उभारायचे ठरवले. पण ११९३ मध्ये हे बांधकाम सुरु केले. पाया बांधुन तो पैगंबरवासी झाला वरचे ३ मजले त्याच्यानंतर गादिवर आलेल्या अल्तमशने १२३० मध्ये तर शेवटाचा पाचवा मजला १३८३ साली फिरोजशहा तुघ्लक ने बांधुन पुर्ण केला. १३६८ मध्ये एकदा वीज कोसळुन मिनाराचे नुकसान झाले होते. १५०३ मध्ये परत वीज कोसळुन नुकसान झाल्याने सिकंदर लोदिने त्याची डागडुजी केलीह होती. केवळ वीटांनी बांधुन काढलेला इतका उंच मिनार जगात दुसरीकडे कुठेहि नाहि. कुतुबमिनार उभारायला तेथील २७ जैन मंदिरे धुळीस मिळवीली. कुतुबमिनार रचणार्यांनी मिनारावर “इति श्री विश्वकर्मा प्रसादे रचित्” अशी पाटि कोरुन बसवली आहे. ह्याहुन मोठा दैवदुर्विलास तो कुठला? कुतुब मिनार पायथ्यासे १४.२ मिटरच्या व्यासाचा तर सर्वात वरचा मजला २.७५ मिटरचा आहे. त्याची एकुण उंची ७२.५ मिटर आहे. त्यावर कुराणातील आयता कोरुन बसवल्या आहेत. कुतुब मिनारच्या आजुबाजुला अनेक कबरी आहेत, १-२ मशिदि आहेत. कुतुबमिनार समोरच एक लोखंडि खांब आहे. गेली हजारवर्षे तो तिथे ऊन – पाऊस खात उभा आहे पण अजुनहि त्याला गंज चढलेला नाहि हे विशेष. डोकं खाजवायला लावणारी गोष्ट निश्चितच आहे कि इतकं शुध्द लोखंड कसं बनवलं हजार वर्षांनी देखिल विना तेलपाणी उघड्यावरचा खांब गंजलेला नाहि. त्या खांबाबद्दल अशी श्रध्दा आहे कि खांबाला पाठ लावुन हात मागे केले व जर पाठुन तुमचे हात जुळले तर मनातील इच्छा पुर्ण होते. तो खांब लोकांनी खराब करु नयेत म्हणून सध्या त्या खांबा भोवती सरकारने कुंपण घातले आहे …. त्यामुळे माझ्या मनातल्या अनेक सुप्त इच्छा अपुर्या राहिल्या. तशीहि संध्याकाळ झाली असल्याने तिथले सुरक्षा रक्षक सगळ्यांना बाहेर जायला सांगत होते. मग झटपट फोटो काढुन आम्हि बाहेर पडलो. आता गाडि परत हॉटेलकडे धावु लागली. काच खाली केली तसा दिल्लीचा गार वारा चेहर्यावर आला. पुन्हा कॅनॉटप्लेसचा झगमगता भाग बघताना दिल्ली सिक्स मधले गाणे डोक्यात घुमत होते “ये दिल्ली है मेरे याऽऽर, बस इश्क मुहब्बत …प्याऽऽर!” दुसर्या दिवशी पहाटेची ट्रेन होती. आता पायांना घराची ओढ लागले होती आणि डोक्यात शेकडो विचार होते. उत्तरेतील पहिली सफर सुफळ संप्पन्न झाली होती.


- सौरभ वैशंपायन.