Wednesday, August 19, 2009

दुरुन डोंगर साजरे!!

दुर डोंगरावर ढगांचे थवे उतरताना पाहण्यासारखा सुंदर अनुभव दुसरा क्वचितच असेल. पावसाने हिरवे झालेले डोंगर आणि अंधारुन आल्याने गडद निळसर दिसणारे त्यांचे कडे, मग त्यांच्या डोक्यावरुन अलगद सरकणारे आत्म्यांसारखे गुढ - संथ धुके, गंभीर, निशब्द, गार, हुरहुर लावणारे आणि किंचित दडपण आणणारे. त्या मागोमाग ढगांचे थवे. थकल्यावर आपल्याला मोकळ्या, अंग पसरता येण्याजोग्या जागेची जशी स्वाभाविक ओढ लागते तशीच या ढगांना डोंगरमाथ्यांची लागत असावी. मात्र या ढगांच्या ताफ्यात काळे ढग मात्र तीन किंवा चार. बाकि सगळे करड्या रंगाचे. आपण जिथे उभं असतो तिथुन थेट डोंगराचा पायथा दिसत असतो, डाव्या-उजव्या बाजुला एखादि बुटकि टेकडि बाकि डोंगराच्या माथ्यापर्यंत मोकळे मैदान, हिरवी शेते, झाडांच्या गच्च रांगा. मधुनच एखाद्या एकांड्या शिलेदारा सारखा सगळ्या चित्राहुन वेगळा पण चित्र खुलवायला सरसरत आकाशाकडे वाढलेला उंऽऽच माड. माडाच्या झाडाला दुसर्‍या झाडाला स्पर्ष आवडत नाही म्हणे.... म्हणूनच असा एकांडा!!

आणि त्या बुटक्या टेकडिवर एक छानसे पांढरट मंदिर, त्याच्या कळसाच्या माथ्यावर पावसाळी हवा खात अव्याहत फुरफुरणारा भगवा झेंडा. आणि अश्याच एखाद्या क्षणी डोक्यावरचा ढग विरळ होत जातो, अचानक त्या माडाच्या झावळ्यांना, शेतातील पोपटि गवताला तजेला आल्यागत वाटु लागते. त्या विरल्या ढगातुन सुर्याची किरणे त्या टेकडिवर उतरतात....फक्त टेकडिवरच, बाकि ठिकाणी सावलीच. मग प्रकाशाचे फराटे उठतात आणि मिनिटभरासाठी सुर्यनारायण दर्शन देतात. परत मागचे ढग तरंगत पुढे सरसावतात. विरलेले ठिगळ पुन्हा जोडतात. आता टेकडिवर सुध्दा सावली येते पण त्या ढगांची वरची किनार मात्र चांदि लावल्यागत चंदेरी होते. त्या काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर उडणारे ४-६ बगळे उगीच सुंदर भासतात.

मग सगळं उत्कट उत्कट होत जातं आणि परत एखादि पावसाची सर येते, डोंगरावर नवे अंकुर उगवतात.... डोंगराला अजुन हिरवेगार करण्यासाठी.

- सौरभ वैशंपायन.

2 comments:

प्रशांत said...

छान मस्त.

Sneha said...

gresanchya kavitech vi9shleshan vataty... :)