Saturday, February 4, 2017

नायिकाभेदबाई ठेवणे, अंगवस्त्र, नाटकशाळा, रक्षा, दासी, वेशस्त्रिया वगैरे उल्लेख आपण इतिहासात अनेकदा ऐकतो. त्याबाबत अर्थात खूप गैरसमज असतात. वास्तविक "चारीत्र्य" बघून मग "चरीत्र" ठरवण्याचा आपला "भारतीय" दृष्टीकोन इतिहासाचे फार मोठे नुकसान करतो असे माझे मत आहे. कारण एखादि व्यक्ती सामाजिक/धार्मिक/आर्थिक/राजकिय कारणांनी कितीही थोर असली तरी ज्याला आपण ठराविक मापदंड लावून तथाकथित "स्वच्छ" चारीत्र्य वगैरे म्हणतो त्यात ती व्यक्ती बसत नसेल तरी आपण बहुतेकवेळा त्या व्यक्तीवरती फुल्ली मारुन मोकळे होते. त्यातून ती व्यक्ती स्त्री असेल तर बघायलाच नको.

या लेखाच्या सुरुवातीला ज्या संज्ञा वापरल्या त्यांचा उल्लेख आल्यावरती आपल्या डोक्यात पहीला विचार येतो तो राजाने अथवा त्या पुरुषाने "शरीरसुखासाठी" केलेली सोय असा आणि इतकाच असतो. इतिहासाचा अभ्यास करताना माझ्यामते एकतर बंद दरवाज्याआड ती व्यक्ती काय करते? हा आपला प्रश्न असूच शकत नाही. तरीही ह्याबाबत बोलायचे झालेच तर सुरुवात राजवाडेंनी लिहीलेल्या "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" काय होता हे समजुन मग करावी लागेल. निसर्गातील इतर बहुसंख्य प्राण्यांप्रमाणेच मुक्त लैंगिक संबध ते एकपती/पत्नीत्व हा प्रवास मानवी समाजजीवनातील बदलत राहीलेला पैलू आहे. व यापुढेही तो बदलत रहाणार. ह्यावर अनेक धक्कादायक चर्चा व लेख होऊ शकतात.

रामायण - महाभारतात बहुपत्नीत्व/पतीत्व दिसून येतेच पण दासींचेही अर्थात अनेक उल्लेख आढळतात. विदुरचे मोठे उदाहरण आहेच. इतिहासाच्याबाबतीत आपण हे लक्षात घ्यायला हवं की ह्या तत्कालिन समाजमान्य परंपरा होत्या. महाभारत कालात उपस्त्रीयांना "वेशस्त्रिया" म्हणत. त्यांना राणीचा दर्जा नसे पण त्यांचा मान राजांच्या  विवाहित स्त्रियांच्या खालोखाल असे. नंतरच्या काळात यांनाच रक्षा/राख म्हंटले गेले. ह्या "वेश्या" नव्हेत त्या फक्त राजाशी एकनिष्ठ असत. व त्यांना मान असे. महाभारतातील उद्योगपर्वात अज्ञातवासांतुन प्रकट झाल्यावर तहाचे बोलणे करण्यासाठी आलेल्या संजयाकडे युधिष्ठिराने हस्तिनापुरातील वडिलधारे, बंधु यांचे कुशल विचारले त्यात तो बंधुंच्या अथवा राजपरीवारातील वेशस्त्रीयांबाबत क्षेमकुशल विचारतो असा श्लोक आहे -
अलंकृता वस्त्रवत्या: सुगन्धा अबीभत्सा: सिखिता भोगवत्य:।
लघु यासां दर्शनं वाक्‌ च लघ्वी वेशस्त्रिया: कुशलं तात पृच्छे:॥

(उद्योगपर्व अध्याय ३०) - अलंकार घातलेल्या, चांगली वस्त्रे नेसलेल्या व नानाप्रकारचे सुवास लावलेल्या, सुखामध्ये वाढलेल्या व मर्यादाशील असणार्‍या आणि सर्व प्रकारचे उपभोग मिळणार्‍या व ज्यांचे रुप व भाषण सुंदर आहे अश्या वेशस्त्रियांस माझ्यातर्फे कुशल विचारा!" याचा अर्थ त्या मर्यादाशील असून युधिष्ठिराच्या आदरास पात्र होत्या.

मुळात आपण हे समजुन घ्यायला हवं की अंगवस्त्रे, रक्षा ह्या केवळ आणि केवळ शरीरसुखासाठी नसत. पुर्वी मुलामुलींची लग्नं लहान वयातच होत. स्त्रीयांवर अनेक बंधने असत. त्यामुळे त्यांचे शिक्षण अल्प अथवा बिलकुल नसे. अश्यावेळी घरा बाहेर जात असलेला पुरुष व खास करुन तो रणांगण गाजवून आला असेल, बारा गावचं पाणी पिऊन आलेला व्यापारी असेल, स्वत: बहुश्रुत वा कलासक्त असेल तर अश्यांना आपल्या भावना आपली आवडनिवड त्याच पातळीवरती समजून घेणारं कोणीतरी लागे. आज मानसशास्त्र देखिल हे मान्य करतं की आपल्या भावना आपण भिन्नलिंगी व्यक्तीसमोर जरा जास्त चांगल्या व्यक्त करतो अथवा तशी सुप्त इच्छा कळत-नकळत असते. हे फार नैसर्गिक आहे. अश्यावेळी अश्या नाटकशाळा, अंगवस्त्र वगैरे त्यांची ही भावनिक - बौद्धिक गरज भागवत. त्या कलानिपुण असत, गायन, नृत्य, काव्य, चित्रकला वगैरे बाबतीत त्या हुशार असत. अनेकदा ह्याच स्त्रीया राजकारणाचे पट मांडत - उधळत. अर्थात मानसिक - बैद्धिक - शारिरीक पातळीवरती अशीच इच्छा स्त्रीयांच्या मनात येत असणे सहाजिक आहे पण पुरुषसत्ताक पद्धतीने स्त्रियांना त्यांच्या भावनांसकट दडपून टाकले.

चाणक्य तर अश्या स्त्रियांना आसरा द्यावा तसेच मुद्दाम अश्या स्त्रिया तयार कराव्या, अगदी विषकन्या सुद्धा. त्यांचा उपयोग हेर म्हणून करावा असेही म्हणतो. हे प्रकार त्याकाळी समाजमान्य होते, आज काही शे वर्षांनी त्याबाबत आपली मते बनवणे काहीच फायद्याचे नाही. त्यामुळे शहाजीराजे, संभाजीराजे, राजाराम, शाहुराजे, नानासाहेब पेशवे वगैरेंना नाटकशाळा होत्या ह्यात बिचकण्यासारखं काहीच नाहीये. तत्कालिन इतिहासात अजुन एक उल्लेख येतो तो म्हणजे "कुणबिणी". मध्ये ह्याला "जातीय" ठरवून बराच गदारोळ झाला होता. पण तो गदारोळ म्हणजे इतिहासाचे शून्य ज्ञान असल्याचे मोठे उदाहरण आहे. मुळात बाजारात विकत मिळणार्‍या "कुणबिणी" हा जातीय उल्लेख मुळीच नाही; "कुणबी" जातीशी त्याचा संबध नाही. ब्राह्मण कुणबिणी हव्यात अशी मागणी असलेले अथवा हलक्या जातीतील कुणबीण घरात काही महीने वावरली त्याबद्दल तत्कालिन समाजरुढीनुसार एका कुटुंबाला प्रायश्चित्त घ्यायला लावल्याचे उल्लेख आहेत. मुळात "कुणबिणी" हा उल्लेख घरातील पडेल ते काम करणार्‍या बायका म्हणून येतो. मेण्याबरोबर पाणी घेऊन वेगाने पळू शकतील अश्या काटक कुणबीणी हव्यात असे उल्लेख आढळतात. इतकेच कशाला खंडोजी माणकरास छत्रपती शाहु महाराजांचे "बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या दहा अकरा वर्षांच्या निरोगी नाचावयालायक आणवणेविशी महाराजांची एकांताची फर्मास आहे" असे पत्र मिळाते. त्यावर खंडोजी माणकराने "कोंकणात अशा पोरी मिळत नाही!" असा जबाब पाठवला. नानासाहेबांनी देखिल शाहु महाराजांनी अशाच कुणबिणींची चौकशी केल्याबद्दलची पत्रे आहेत. माझ्या दृष्टिने ह्यात कुठेही जातीय, भावनिक वगैरे काहीच नाहीये. तो सगळा तत्कालिन मामला होता.

भारतीय कामसुत्रांत "नायिकाभेद" सांगितले आहेत. त्यावर अनेक ग्रंथ लिहीले गेले आहेत. अशा एकनिष्ठ अंगवस्त्रांपासून ते वेश्यांपर्यंत सर्वच स्त्रियांना वात्सायनाने कामसुत्रात तसेच इतरांनी राजतरंगिणी, शृंगारतिलक, श्रृंगारप्रकाश, अग्निपुराण, रसमंजीरी वगैरे ग्रंथात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. ह्या नाजुक विषयाला धसमुसळीने हाताळण्याऐवजी थोडं तारतम्य ठेवून हाताळलं तर अनेक गणिते सोपी होतात.

 - सौरभ वैशंपायन

Thursday, December 1, 2016

क्रांति: पूर्वार्ध आणि उत्तरार्ध२५ तारखेला फिडेल कॅस्ट्रो वारल्याची बातमी आली आणि जगभर श्रद्धांजलीचे लाल सलाम झडू लागले. तर काही ठिकाणी एक हूकूमशहा गेला अशीही प्रतिक्रिया आली. बर्‍याच जणांना हा इसम कोण हे माहीत नव्हते आणि जो उठतोय तो ह्याला सलाम का ठोकतोय म्हणूनही गोंधळले होते. एव्हाना कॅस्ट्रो आणि पर्यायाने चे गव्हेराबाबत बर्‍याच जणांचे जुजबी ज्ञान मिळवून झाले असेलही. लोकसत्ताने देखिल २८ तारखेला फिडेल कॅस्ट्रोंवरती अग्रलेख लिहीला. अग्रलेख काहीसा नकारात्मक अंगाने जाणारा होता. काही वर्षांपूर्वी मी फिडेल आणि चे बाबत अर्धवट लिहीलेलं काही मी फेसबुकवरती शेअर केलं. एका परीचिताच्या टिपण्णी नंतर क्रांती आणि क्रांतिकारकांबाबत लिहावसं वाटू लागलं.

कॅस्ट्रोंच्या निमित्ताने होणार्‍या चर्चांमधून फेसबुकवरही एकंदरच क्रांती यशस्वी होऊन सत्ता मिळाली की क्रांतिकारी सत्ताधिशाचे रुपांतर हुकूमशहात होते हाच सुर दिसत होता. व तो बहुतांशी बरोबरच आहे. कुठल्याही क्रांतीचा पूर्वार्ध हा नेहमी भारावून टाकणाराच असतो. कारण एखाद्या प्रस्थापित व्यवस्था, विचारसरणी अथवा व्यक्तीच्या दडपशाहीला वैतागुन कुणी एक अथवा काही लोकांचा गट क्रांतिची स्वप्ने पाहू लागतो. काहीवेळा २-३ पिढ्या ही क्रांती केवळ कागदावरतीच रहाते तर कधी सगळे इतक्या झटपट घडते की ते लिखाणच भडका उडवायला कारणीभूत ठरते. ही कागदावरची क्रांतीच पुढे त्या त्या क्षेत्रांतील - देशातील लोकांची गीता-बायबल-कुराण बनते. ह्या लिखाणाची गोची अशी असू शकते की ज्या लोकांना ते लिखाण - ती विचारसरणी हेच सर्वस्व वाटू लागते व त्यासाठी ते जीवही द्यायला तयार होतात ती लोकं त्या पुस्तकाच्या अथवा विचारसरणीच्या बाहेर बघूच शकत नाहीत अथवा जाणूनबुजून बघत नाहीत .... कारणे काहीही असोत. अश्याने त्या विचारसरणीचे डबके बनते. मग ती विचारसरणी राजकीय असो, आर्थिक असो अथवा धार्मिक. हे लोक इतरांनाही त्यात खेचतात. कुठल्याही क्रांतीची परीणीती २ गोष्टीत होते; म्हणजे क्रांती आपल्याच पिलांना खाते हे एक आणि दुसरे म्हणजे एक क्रांती कालांतराने दुसर्‍या क्रांतीला जन्म देते. कुठल्याही क्रांतीच्या पूर्वार्धात क्रांती करु पाहणारे नेहमी वजाबाकीत असतात. खायची-प्यायची भ्रांत, डोक्यावर छप्पर नाही आणि जीवाची शाश्वती नाही असेच असतात. त्यांच्या क्रांतीवरच्या आणि नवीन स्वप्नांवरच्या स्वत:च्या निष्ठा इतक्या प्रबळ असतात की त्यांना मृत्यूचेही भय वाटत नसते. ह्या अफाट निष्ठेमुळे त्यांना त्यांच्यावरती जीवापाड निष्ठा ठेवणारे साथीदार मिळतात. ही गंमत खचित नव्हे. त्या क्रांतीची परीणीती कशातही होवो पण जगातील कुठल्याही क्रांतीचा पूर्वार्ध हा नेहमीच भारावणारा व रोमांचित करणाराच असतो ह्यात वाद नाही.

यशस्वी क्रांतींचा पूर्वार्ध हा वादळी वगैरे असतो. उत्तरार्ध मात्र अजगरासारखा संथ, थंड व क्रूर असतो. कारण एकदा का क्रांती यशस्वी होऊन सत्ता क्रांतिकारकांच्या हातात आली की त्या क्रांतीच्या मंथनातून चौदाच काय पण अनेक रत्ने बाहेर पडतात. काही अमृत घेउन येतात काही हलाहल. क्रांती यशस्वी झाली की २ गोष्टी कल्पनातीत वेगाने घडतात. पहीले - विरोधकांचे शिरकाण. ह्यात क्रांतीला विरोध केलेले आधीच्या व्यवस्थेला पाठींबा दिलेले बळी जातातच पण क्रांती घडवू पाहणारा जो म्होरक्या असतो त्याला नको असलेले अनेक स्वकीय आणि परकीय क्रांती विरोधी किंवा द्रोही ठरवून तुरुंगात डांबले जातात किंवा फासावरती लटकवले जातात. दुसरे म्हणजे अनेकदा क्रांतीकारी म्हणून जो सर्वात पुढे असतो त्याला बाजूला सारुन दुसर्‍या किंवा तिसर्‍या फळीतील खरे खेळाडू जे पडद्या मागून हालचाली करत असतात व ह्याचा चेहरा वापरत असतात ते पुढे येतात.


साधारण क्रांती ही लष्करशहांकडून होते असा एक सार्वत्रिक समज आहे. मात्र अहींसक क्रांतिंची उदाहरणे कमी तरीही ठळक आहे. गांधी - मार्टीन ल्युथर किंग - नेल्सन मंडेला. ही प्रातिनिधीक उदाहरणे. अशांचेही हट्टी अहिंसक हुकूमशहा बनू शकतात. असो, तो विषय अजून वेगळा. अर्थात ज्यांच्या विरुद्ध चळवळ करायची असते ते किती क्रूर आहेत ह्यावर चळवळ हींसक की अहींसक हे सगळे ठरते. क्रांती यशस्वी होईतोवर सर्वात जास्त कुणी भरडले जात असेल तरे ती जनता. तरी क्रांति झाली की नव्याने सत्तेवरती आलेल्यांचे झेंडे आनंदाने किंवा नाईलाजाने खांद्यावर घ्यावेच लागतात. सुरुवातीचा क्रांतीचा बहर ओसरला की "पुन्हा तेच ते" च्या चक्रात अडकलेल्या जनतेचा भ्रमनिरास होण्याचीच शक्यता जास्त असते. शिवाय आधीची दडपशाही हटवून सत्ता हातात घेतलेले स्वत:च हुकूमशाहीकडे आपसूक ढकलले जातात. त्यात त्यांच्यावर मुख्य पगडा असतो तो "आपण जीवावर उदार होऊन केलेली क्रांती व बघितलेले स्वप्न धुळीस मिळेल काय" ही भीती आणि लागलेली सत्तेची चटक. ह्या गोष्टी पकड अजून घट्ट करायला भाग पाडतात. साधारणत: लष्करशहाने क्रांती घडवून आणली असेल तर तो हयात असेतो किंवा त्याला दुसर्‍यांनी पदच्युत करेपर्यंत सत्तेवरील पकड सोडत नाही. किंवा लष्करातील चार डोकी एकत्र येऊन झालेल्या क्रांतीत लष्करशहा बदलतात पण सत्ता लष्कराचीच रहाते. दुसर्‍या देशाकडून त्या देशाला सारखे अपमानित केले जात असेल अथवा बाहेरचा देश येऊन तिथली साधनसंप्पत्ती लुटत असेल अश्या ठिकाणी त्या अपमानाने निर्माण झालेली चीड लष्करशहांच्या देशाभिमानाला डिवचून क्रांतीप्रणव बनवते. गडाफी, सद्दाम ही काही उदाहरणे.


क्रांती झाली की सर्वात मोठा फटका बसतो तो त्या समाजाच्या अथवा देशाच्या अर्थव्यवस्थेला. क्रांतीनंतर देशाची अर्थव्यवस्था नीट बसवणे हे सर्वात जोखमीचे काम असते. त्यातच अपयश आले तर क्रांती फसायची किंवा अख्खा समाज आर्थिक, वैचारीक व नीतीमत्तेबाबत डळमळीत होण्याची शक्यता निर्माण होते. आर्थिक कारणांनी समाजाची नीतीमत्ता काळवंडली तर क्रांतीचा पायाच उध्वस्त होतो. हा भाग समाजाचा झाला. क्रांती झाल्यावर सत्तेत आलेला नेता अथवा त्याचा गट याच कारणाने भ्रष्टाचारी झाला तरी क्रांती बोंबलते. मुख्य उद्देश बाजूला रहातो व हे डोक्यावर बसलेले मलई खातात. जनता उघड्यावरती येते. जर ही क्रांती बाहेरच्या बलाढ्य देशाची मदत घेऊन पार पाडली असेल पुढे दिर्घकाळ त्या देशाच्या ताटाखालचं मांजर होऊन रहावं लागतं. त्यांना आवडतात ते सत्ताधिश बसवावे लागतात. त्यांचे शत्रू ते आपले शत्रू मानावे लागतात. तो बलाढ्य देश देखिल आपल्याला हवे ते घडवून आणायला सढळ हाताने पैसा ओतत रहातो. सत्तेत असलेले गबर होत जातात. स्वबळावर केलेल्या क्रांतीत मात्र बहुतकरुन असे नसते. उलट अश्या क्रांतीत ज्याच्या विरुद्ध उठाव केला जातो त्याला बलाढ्य शक्तींचा पाठींबा असतो आणि उठाव करणार्‍यांना दडपण्यासाठी तो बलाढ्य देश सत्ताधार्‍यांना सहाय्य करतो. अश्यावेळी जनता कुणाच्या बाजूने ऊभी रहाते त्यावर त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं.

काही क्रांतीकारक आणि त्यांनी घडवलेली क्रांती हा जगभरात कुतुहलाचा विषय होतो. क्रांतीसाठी मृत्यू पत्करलेला कुणी एखादा चे गव्हेरा जगभरतील पोरांच्या टि-शर्टवरती "डिझाइन" म्हणून जाऊन बसतो. तो कोण? त्याने काय केलं हे त्यांच्या गावीही नसतं. फक्त ते "COOL" दिसतं म्हणून त्यांना हवं असतं. चे सिगार ओढायचा म्हणून तो तथाकथित Hi-class चरसी लोकांचा "आदर्श" बनतो. ड्रग्स घेऊन जगाला फाट्यावर मारुन जगायची स्वप्ने कुठल्याही क्रांतीकडे घेऊन जात नाहीत अणि अखेरीस खरोखर जगाचा चेहरा मोहरा बदलू इच्छिणारी काही भव्य दिव्य स्वप्न ही स्वप्नच रहातात अगदी चे गव्हेराच्या क्रांतीसारखी.

 - सौरभ वैशंपायन


Tuesday, August 2, 2016

लोकमान्य : एक गारुडलोकमान्य टिळक हे गारुड आहे, "अफाट" हा एकच शब्द!

एक माणूस किती विषयांत पारंगत असावा? डोंगरी तुरुंगातील १०० दिवस हा त्यांच्या कार्याचा "ट्रिगर पॉइंट" म्हणता येईल. मग ह्या माणसाने मागे वळून बघितलेच नाही. आपला काळ त्यांनी एकहाती गाजवला. केसरी व मराठातुन पत्रकारिता, समाजकारण, देश पातळीवरील गुंतागुंतीचं राजकारण, शिक्षण - शाळा महाविद्यालये, "ओरायन" व "आर्क्टिक्ट: आर्यांचे वस्तीस्थान" या क्लिष्ट ग्रंथांचे लेखन, हे एकीकडे करत असतानाच दुसरीकडे ताई महाराज प्रकरण, विनाकारण गोवले गेलेले वेदोक्त प्रकरण, चिरोल केस, राजद्रोहाचे खटले, काळे पाणी, काळ्या पाण्याच्या काळातच गीतारहस्या सारखा अतुलनीय ग्रंथ उतरवुन काढायचा, बंगालच्या फाळणीला विरोध, लखनौ करार, शिवजयंती - गणेशोत्सव, हे चालवलं होतं. आपल्याला वाचून धाप लागते, त्या महापुरुषाने ते सगळं धडाडीने पार पाडलं. दुसरं कुणी असतं तर चरख्यातल्या ऊसाच्या चिपाडागत हालत झाली असती पण हा माणूस मंडालेहुन परत येतो काय? आणि "पुनश्च हरी ॐ" म्हणतो काय? त्यांचे काम मोजता मोजता दम लागतो पण टिळकांच्या अष्टावधानी व्यक्तित्वाचा शोध संपता संपत नाही. कितीही शोध घेतला तरी हा माणूस प्रत्येक ठिकाणी दशांगुळे उरतोच. आजकालची अनेक क्षेत्रातली मोठ्या सावलीची पण वास्तवात खुजी लोकं बघितली की टिळकांचे रुप अजून विराट व्हायला लागते. एकाचवेळी हा माणूस इतक्या वेगवेगळ्या आघाड्यांवरती सर्जनशील काम करत होता काही आघाड्यांवरती "लढत" होता.

त्यांना नसतील का सांसारिक व्याप? त्यांच्या आयुष्यात हळवे कोपरे नसतील का? त्यांना शारिरीक व्यथा नव्हत्या का? मुलाशी तात्विक वाद, मंडाले मध्ये असताना सहचारीणी सोडून गेल्याची आलेली तार, केसरी सांभाळताना केलेली आर्थिक तडजोड? ह्या माणसाने मनात आणलं असतं तर सगळं सोडून सरकारी वकिली करुन सुखात नसता का राहू शकला? लब्धप्रतिष्ठितांत सहज ऊठबस करु शकला असता. टिळकांवरती आजकाल हीनपातळीवरची जातिय टिका वाचून ऐकून मन निराश आणि डोकं सुन्न होतं. ज्या माणसाने इंग्रजांना राजकिय हादरे दिले, नाकाने कांदे सोलणार्‍या इंग्रज सरकारला चक्कर येऊन कांदे हुंगायला लागावेत अश्या गरगर करणार्‍या आवर्तनात ढकलून दिले त्याची आजची केली जाणारी किंमत समाजाची बौद्धिक पातळी किती खालावली आहे त्याची निदर्शक आहे.

टिळक काय किंवा कुठलेही स्वातंत्र्यपूर्व नेते काय त्यांनी केलेली अग्निदिव्य एकतर आजच्या पिढीला माहीत नसतात, माहीती झाली तरी तो नेता कुठल्या जातीचा होता? ह्यावरती झुंडि झुंडिंनी त्याचा स्वीकार अथवा धिक्कार होतो. स्वातंत्र्य जन्मताच फुकटात मिळालं की हे असं होतं. हे दिशाहीनपण देशाला कुठे घेऊन जाणार नियतीच जाणे.

बाळ गंगाधर टिळक - केसरी संपादक - बंगालचे बडेदादा - लोकमान्य टिळक - टिळक महाराज हा प्रवास थक्क करणारा आहे. टिळकांना लोकांनी ईश्वराचा अंश मानायला सुरुवात केली होती. शंख -चक्र - गदा- गीतारहस्य असे चतुर्भुज रुप असलेले चित्रही बघायला मिळते. टिळकांवरती राजद्रोहाचे ३ खटले झाले, पण राजद्रोही तोच लोकमान्य हे समीकरणही पक्के झाले. भारतातला पहीला गिरणी कामगारांचा संप मुंबईत झाला कारण होते टिळकांना झालेली ६ वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा. हा संप ६ दिवसांचा होता. ज्यावेळी गिरण हा मुंबईच्या चलनवलनाचा एक भाग होता तो सहा दिवस उत्स्फुर्तपणे बंद होता ह्यावरुन टिळकांवरील लोकांचे निरातीशय प्रेम समजेल.

आमुचा वसंत कुणी नेला।
त्यावाचूनि जनहृत्कमलांचा बाग म्लान झाला।।धृ।।
या पुण्योत्सवकालाला
टिळकतुकोबा देशभक्तीच्या का न कीर्तना आला?
वाल्मीकि म्हणू टिळकाला।
स्वतंत्रतेचे जो रामायण नित्य कथी विश्वाला।।
आम्हाला मोक्षाला नेण्याला।
ज्ञानेश्वरी केसरिपत्रिका ज्ञानेश्वर तो बनला।।
तह देशाचा करण्याला।
नरवर गाजी शिवाजी दिल्लीला का गेला?
कथी न्यायदेवते मजला।
टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला।।
- कवी गोविंद

लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्ह कवी गोविंदांनी केलेले कवन - "टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला" ही ओळच सर्व काही सांगुन जाते. लोकमान्य हे लोकांच्या मनातील अढळ श्रद्धास्थान होते; ती जागा आजवर कुणी घेऊ शकले नाही. आजही "केसरीकार टिळक" हा पत्रकारितेमधला मापदंड आहे.

टिळकांच्या आयुष्यातील प्रकाशात असलेल्या गोष्टी इतक्या आहेत की त्यावर अनेक खंड सहज लिहुन व्हावेत ...... मग मौन धरलेल्या इतिहासाच्या पोटात अश्या किती गोष्टी असतील ज्या केवळ मौखिक होत्या? केवळ टिळकांच्या शब्दांवरती राजकारणाचे, क्रांतिकार्याचे पट रचले - उधळले गेले असतील?


- सौरभ वैशंपायन.

Saturday, July 2, 2016

The lesson of History!!!

इतिहासाचा अभ्यास करताना साधारण कसा केला जावा ह्याबाबत स्वानुभवाचे चार शब्द देतो आहे. मी ह्या विषयातला अधिकारी वगैरे मुळीच नाही हे सर्वप्रथम सांगुन टाकतो. विद्यार्थी आपण कसा अभ्यास करतो हे मित्रांना सांगतो तद्वत हे एका परीने स्वानुभव कथन आहे. मी देखिल आत्ताशी कुठे अभ्यासाला प्रयत्नपूर्वक सुरुवात केली आहे. खाली लिहीलेल्यापैकी अनेक गोष्टी मलाही नीट जमत नाहीत पण त्याचा विचार करुन ठेवला आहे तो मांडतो आहे.

जगप्रसिद्ध अमेरीकन संशोधक व अत्यंत जेष्ठ श्रेष्ठ इतिहासकार विल ड्युरांट आणि त्यांची बायको व नंतरची सहलेखिका एरियल ड्युरांट ह्यांनी आपल्या आयुष्यातली किमान ३० वर्षे फक्त वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करण्यात, वेगवेगळे साहित्य, लेख, ताम्रपट, वस्तू, हस्तलिखिते, पोथ्या, कथा, वगैरे जमवण्यात घालवली आणि मग एक एक करत जगभरातील संस्कृतींवरती अवाढव्य ग्रंथ लिहीले. विल ड्युरांटचे फक्त "history of civilization" चेच ११ खंड आहेत. ते त्याने १९३५ ते १९७५ ह्या ४० वर्षांच्या काळात लिहीले व प्रसिद्ध केले. २० इतर ग्रंथ आहेत पैकी ५ ग्रंथ तर त्याच्या मृत्यु पश्चात तब्बल २ दशकांनी प्रसिद्ध केले गेले. सांगायचा मुद्दा असा की लोकं आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात संशोधनापोटी त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना इतिहास हा समुद्र आहे; समुद्र पिऊन संपवून टाकू म्हणणार्‍या टिटवीच्या चोचीत असे कितीसे पाणी मावणार? ह्याच विचाराने ह्याला हात घालावा. आपण जितके वाचू त्याच्या पलीकडे अस्पर्षित असे हजारपट उरलेले आहे ह्याची जाणीव सतत ठेवावी.

इतिहास हा फसवा असतो. विल ड्युरांटच्या "The lesson of History" ची प्रस्तावनाच इतिहासवाचकांसाठी गीता-बायबल-कुराण आहे. त्यात ते म्हणतात - "आपण हे सगळं का करतोय? आपल्या हाताला काय लागणार आहे? पराक्रमी राजांच्या दु:खद मृत्युच्या घटना? इतिहासातून मनुष्य स्वभावाबाबत तुम्हांला असं काय वेगळं मिळतं जे रस्त्यात चालणार्‍या कुणाही भणंगाला एकही पान न वाचताच समजू शकतं?" ...... "History is non-sense" ...... "To begin with, do we really know what the past was? what actually happened? or is history "a fable" not quite "agreed upon"? Our knowledge of any past event is always incomplete probably inaccurate, beclouded by ambivalent evidence & biased historians, & perhaps distorted by our own patriotic or religious partnership. "most history is guessing , & the rest is prejudice." विल ड्युरांटने फार ओघवत्या शैलीत हे सगळं लिहीलं आहे. जमल्यास नक्की मिळवुन वाचा.

आपल्याकडे इतिहासाचार्य राजवाडेंनी देखिल इतिहासाचा अभ्यास कसा करावा ह्याबाबत फार काटेकोर लिहीले आहे. "अस्सल कागदाचा एक चिठोराही समस्त बखरीं व इतर साधनांची मते हाणून पाडू शकतो!" इतक्या स्वच्छ शब्दांत त्यांनी अस्सल साधनांचे महत्व विशद केले आहे. म्हणून अस्सल साधने मिळतील तितकी मिळवण्याचा प्रयत्न करावा. ह्यातही प्रथम दर्जाची, दुय्यम व तिय्यम असे गट पडतात. शक्य तितक्या समकालिन साधनांवरती जोर देऊन इतिहास मांडता येतो. तुम्ही त्या काळापासून जितके दूर सरकता तितके गोंधळ वाढत जाणे, असलेली माहीती नष्ट होणे, नसलेली माहीती घुसवली जाणे हे प्रकार फार सर्रास घडतात. समकालिन साधनांतही पदरी ठेवलेले लेखनिक, भाट त्या त्या घराण्याची वाहवा करतानाच दिसतात. म्हणुन एकाच घटनेबाबत स्वकीय - परकिय काय म्हणतात त्यातले योग्य - अयोग्य काय हे समजून घेण्याची तयारी हवी. अनेकदा आपल्याला अप्रिय उल्लेखही सापडतात, अनेकद धक्कादायक माहीती हाताला लागते. ती स्वीकारायची तयारी हवी ..... निदान नवीन पुरावे समोर येईपर्यंत तरी. नवीन विश्वासजन्य पुरावे समोर आले तर ते स्वीकारावेत आधीचे मत बदलण्यात कमी पणा वाटून घेउ नये.

इतिहास वाचताना कधी अंगावरती गुलाबपाणी शिंपडलं जात तर कधी कधी चिखलही. इतिहास दचकवणाही असू शकतो. एखादी व्यक्ती बघता बघता नायक अथवा खलनायक बनू शकते. तरीही कुठलीही व्यक्ती संपूर्णत: एकाच रंगात रंगवून टाकण्याचा मोह शक्य तितका आवरावा. बहुतांषी प्रत्येक व्यक्ती आणि घटनेत चांगले व वाईट अश्या दोन्ही बाजू असतातच. व्यक्ती अथवा साम्राज्यांची बलस्थाने व कमकुवत बाजू नोंद करुन आणि मान्य करुन पुढे गेल्यास डोक्याला व पर्यायाने अभ्यास करताना त्रास कमी होतो. दोन व्यक्तींमध्ये तुलना शक्यतो टाळावी खासकरुन त्यात एक वा अनेक पिढ्यांचे अंतर असल्यास, कारण दोन व्यक्तींची मानसिक, शारिरीक, बौध्दिक, आर्थिक, सामाजिक वगैरे अनेक पातळ्यांवरती परीस्थिती सारखी असेलच असे नाही. यातला एखादा पैलू देखिल त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व अथवा एखाद्या घटनेचे परीमाण व परीणाम टोकाचे बदलू शकतो.
अजून एक, खास करुन भारतीय मानसिकतेसाठी नोंदवावंस वाटतं - चारीत्र्य व चरीत्र एकच समजू नये. बाई-बाटलीचा शौक, रंगेल, इष्कबाझ म्हणजे ती व्यक्ती वाईटच हा पूर्वग्रह इतिहासाच्या अभ्यासाचे फार मोठे नुकसान करतो. लेबल लावलं की विषय संपल्यात जमा असतो. वैयक्तिक आयुष्याचा अभ्यास करताना ह्या नोंदी निश्चितच महत्वपूर्ण असतात क्वचित प्रसंगी ह्यातूनच इतिहास घडत असतो हे देखिल मान्य पण सुरुवातच झापडं लावून करु नये. जमल्यास ऐतिहासिक व्यक्तीचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य वेगळं करुन अभ्यासावं.
इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ रक्ताचे पाट व लढाया नव्हेत. "सामान्यांचे आयुष्य हाच इतिहासाचा विषय असतो" असे टॉलस्टॉयने म्हंटले ते उगाच नाही. इतिहासात अवघं जग सामावलं आहे. इतिहासात अगणित विषय आहेत. तरी एखाद्या व्यक्तीच्या चरीत्रापासून ते महायुध्दासारख्या जगड्व्याळ विषयापर्यंत काहिही असू शकतं. उदा. एखादा मानवसमूह अभ्यासासाठी घेतला तरी त्यावर तत्कालिन भूगोल, हवामान, रहाणीमान, सामाजिक, आर्थिक, लष्करी, धार्मिक समजूतींचा पगडा अभ्यासावा लागतो. ह्या कसोट्यांवरती घासून तो मानव समूह किती प्रगत होता हे समजू शकतं. इतिहासाचा अभ्यास करताना घडून गेलेल्या घटनांवरती आपला सद्य कालखंड व आपले विचार लादू नयेत. त्यात हमखास तफावत असते. अगदि २-३ दशकांमध्ये देखिल सर्वसाधारण समाजमान्यतांमध्ये टोकाचा फरक पडलेला असू शकतो. त्यावेळची समाजमान्यता कशी होती ह्याची नोंद करुन ठेवल्यास इतिहास सुटसुटित होतो. त्याच्याशी नाही - नाही म्हणून झगडत बसण्यात वेळ वाया घालवू नये. नेमकं असं घडलं हा "निष्कर्ष" अथवा असं व्हायला हवं होतं किंवा नको होतं हे आपला "मत" असू शकतं - "हट्ट" नव्हे. शिवाय तो निष्कर्ष अथवा मत ही काळ्या दगडावरती रेघ मानून चालू नये.

इतिहासाच्या अभ्यासात भूगोल, खगोल, हवामान, अन्न, धार्मिक - जातीय प्रथा व परंपरा, कायदा व व्यवस्था, आर्थिक, सामाजिक व लष्करी घडी, पत्रे, पोथ्या, दंतकथा, गाणी, तंत्रज्ञान, वास्तुशास्त्र अथवा वास्तूसंरचना, तत्कालिन शिक्षण पद्धती, दळणवळणाची साधने, भाषा, लीपी, चलन, शेती, करपद्धती, शस्त्रास्त्रे, तत्कालिन विज्ञान असे शेकडो विषय अभ्यासता येतात. आमच्या पूर्वजांकडे हे होतं आणि ते होतं वगैरे म्हणणं अस्मितेचा भाग असू शकतो त्याने जीवाला बरं वाटतं पण त्याची कसोटीवर उतरलेली सिद्धता व डोळ्यांना दिसणारे अंतिम रुप काय? हा मोठा प्रश्न आहे. ह्यावर विचार व्हावा. एखादे ऐतिहासिक साधन समोर धरले तर त्यातून आपण किती विषय काढू शकतो ह्याचा विचार करावा. उदा. एक साधे पत्र घेतले तरी त्यातून त्या दोन व्यक्तींचा एकमेकांशी असलेला नातेसंबध, दोघांची सामाजिक अथवा अर्थिक परीस्थिती, वयातील अंतर, सामाजिक परीस्थिती, धार्मिक समजूती, वगैरे आपल्याला शोधक नजरेने बाजूला काढता येतात का? हे बघावे, त्या पत्रातील कालगणना, सही, शिक्के, पत्राची भाषा, मायने, लीपी ह्या तांत्रिकबाबी मेहनत करुन आत्मसात केल्या तर साधने हाताळताना सोपी जातात. इतिहास अभ्यासताना ज्योतिषापासून ते विज्ञानापर्यंत कशालाही त्याज्य अथवा तुच्छ समजू नये समावेश करुन घ्यावा. तो इतिहासाकडे बघण्याचाच एक पैलू आहे. ऐकायला गंमत वाटेल पण नेपोलियन वरती फ्रेंचांनी इतका अभ्यास केलाय की म्हणे एक पुस्तक हे त्याला लहानपणापासून मरेपर्यंत झालेल्या आजारांवरतीच आहे. लोकं इथवर इतिहास खणून काढतात. यावर थोडा विचार व्हावा.
दर्या्खोर्‍या तून भटकणार्‍या माझ्या मित्र-मैत्रिणींना विनंती. ह्या भटकंती दरम्यान एक कसलातरी छंद जीवाला लावून घ्या, फोटोग्राफी, वनस्पती - प्राणी - पक्षी - किटक ह्यांच्या नोंदी, भौगोलिक रचना, गड - दुर्गांचे स्थापत्यशास्त्र, पाणी साठवण्याच्या जुन्या सोयी आणि पद्धती, जुन्या कला, गावागावांतुन मिळणार्या दंतकथा, कविता, गाणी, लोककथा, परंपरा, त्या त्या भागातले अन्न अश्या विभिन्न गोष्टींपैकी एकाची नोंद करायचा व जमल्यास ब्लॉग - सोशल साईट्स वरती त्या बाबतीत लिहिते होण्याचा तरी छंद लावून घ्या. विश्वास ठेवा इतिहास ह्यातूनच जपला जातो - समजतो - उलगडतो. न जाणो तिथला कुणी म्हातारबाबा वळचणीला अडकवलेलं एखादं शे - दोनशे वर्षांपूर्वीच तलवारीचं - भाला - बरच्याचं पातं, एखादा जीर्ण कागद, जुनाट वस्तू, नाणं काढून तुमच्या समोर ठेवेल आणि सुखद धक्का देईल. किंवा तुमच्या एकद्या झाडा-पाना-फुलाच्या अथवा प्राणी-पक्षी -किटकाच्या नोंदिने/ फोटोने निसर्गाचा इतिहास उलगडला जाईल. तुम्हांलाच नाही तर ह्या विषयांचा अभ्यास करणार्‍यांसाठी तुमची एक नोंद अथवा फोटो हा घबाड मिळाल्याचा आनंद देऊ शकतो.
थोडक्यात काय? तर इतिहास फार सुरेख आहे. त्यावर कुठलाही पूर्वग्रह न ठेवता प्रेम करता यायला पाहीजे बस्स!

अजून काय लिहिणे? सुज्ञ असा.

लेखनसीमा.

- सौरभ वैशंपायन.

Friday, June 10, 2016

मुस्लिम धर्मातील चार्वाक - अकबर बादशहा!

कुठल्याही गोष्टीच्या दोनच नव्हे तर अनेक बाजू असू शकतात हे मी इतिहासाचा वाचक अथवा साधा अभ्यासक म्हणून सांगु इच्छितो. सरळसोट मापदंड लावणे अनेकदा अंदाज चुकवू शकते. एक व्यक्ती चांगली म्हणजे दुसरी व्यक्ती ठार वाईटच असते असं नाही. किंवा वाईट असलीच तरी जे चांगलं होतं ते चांगलंच अथवा चूकीचं होतं ते चूकीचंच होतं होतं हे मान्य करुन पुढे जायची गरज असते. दोन्ही व्यक्तींच्या वागण्याला वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, वैचारीक कारणे असतात. ती समजून न घेता दात-ओठ खाऊन तुटून पडणे तत्कालिन समाधान देत असेलही पण त्याला ठोस आकार येईलच असे नाही. अकबर बादशहाच्या बाबतीत अनेकदा असे मापदंड लावले जाताना दिसतात. एकतर तो सरळसोट निधर्मी महान वगैरे असतो किंवा पुर्णत: क्रुर तरी असतो. शिवाय अकबराची कुठलीही एक बाजू उजळून दाखवली की लग्गेच त्याचा आपल्याला हवा तो अर्थ लावून धोपटायला दोन्ही बाजूची लोकं मोकळी होतात. अकबराबाबत इतिहास दाखवतो तेच ससंदर्भ चार बरे वाईट शब्द बोललो तर लोकांना धर्म बुडल्यागत कळ उठते. अकबराबाबत बरे बोलणे म्हणजे राणाप्रतापाचा अपमान वगैरे ठरवून लोकं मोकळी होतात. पुर्ण म्हणणे काय आहे हे मत का बनले वगैरे आगा-पिच्छा माहीत नसताना घरात फोटो लावा आणि पुजा करा वगैरे अनाहुत सल्लेही मिळतात. अकबराला पेनच्या एका फटक्यात किंवा कि-बोर्डच्या एका लेखात उडवून लावावा इतका अकबर साधा माणूस खचित नव्हता. त्याने घेतलेल्या निर्णयांनी भारताच्या लष्करी, राजकिय व मुख्यत: धार्मिक बाजूंवरती दूरागामी परीणाम झाले हे लक्षात घ्यावेच लागेल. अकबर हा आदर्श माणूस अथवा राजा नसेलही पण तो अतिउत्तम "राजकारणी" होता हे अजिबात नाकारता येत नाही.

अकबर सत्तेवरती आला तोच १४-१५ वर्षाच्या कोवळ्या वयात. अकबर शहाणा होईतो बैरामखान त्याचा पालक होता. अकबर "निरक्षर" होता. सुरुवातीचा सर्व वेळ शिकारींत जात असे. अकबराकडे जे काही म्हणून शहाणपण होतं ते त्याने निरिक्षणातून व प्राण्यांकडून जमवले होते. मग ते क्रौर्य असो वा मनाचा मोठेपणा. "स्व" ची जाणीव झाल्यावरती बैरामखानला मक्केला पाठवून मग मागहुन आजूबाजूच्या बंडखोरांना ताळ्यावर आणून सत्ता मिळवण्याचा अकबराचा इतिहास वादळी आहे; त्याची नशिबाशी जुगार खेळण्याची बेफिकीर वृत्ती, संतापी स्वभाव, डुख धरायची वृत्ती ह्याकडे कल असलेला आहे. अकबराचा इतिहास हा वयानुसार येत जाणारी समज व त्यायोगे माणूस कसा बदलत जातो ह्याचे फार मोठे उदाहरण आहे. 


अकबर हा शब्दश: विक्षिप्त होता. त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक खरे-खोटे किस्से आहेत. अकबराची, सत्ता टिकवण्यासाठी धडपडणारा तरुण ते सत्तेसाठी वाट्टेल ते राजकारण - समाजकारण करणारा बादशहा आणि नंतर स्वयंघोषित प्रेषित बानलेला सम्राट ही वाटचाल स्तिमीत करणारी आहे. अकबराच्या काळात ग्रंथसंपदा, अनेक उत्तम व भव्य वास्तू, अनेक शहरे उभी राहीली. जनानखान्या बरोबर त्याचा पीलखाना म्हणजे हत्तींचा भरणा ह्याबाबत अनेक आश्चर्यकारक कथा आहेत. अकबराच्या कारकिर्दिवरती शेकडो पुस्तके लिहीली गेली इतका हा विषय मोठा आहे. पण मला मुख्य भर द्यायचा आहे तो धार्मिक व राजकिय  बाबतीत.

अकबर सत्तेवरती येणे हा हिंदूंसाठी "buffer Period" होता हे आपण लक्षात घ्यायला हवे.  सत्ता स्थापून ती पक्की होईतो २-४ प्रसंग सोडले तर अकबराने सरसकट कत्तल केलेली नाही. उलट अकबर एक आदर्श "राजकारणी" होता. फायदा असेल तेव्हा जमेल तितके उपसून काढा व कठिण प्रसंग असताना कमीतकमी नुकसान होऊन टिकून रहाण्याचे कसब अकबराने दाखवले. त्यासाठी त्याने साम-दाम-दंड-भेद जमेल तिथे, जमेल तसे व जमेल तितके वापरले. अनुभवाने शहाणे होऊन त्याने रजपुतांशी संघर्ष होईतो टाळला. रजपुतांशी संघर्ष करुन आपण शक्तीहीन होत जाऊ व आज ना उद्या आपली सत्ता जाईल हे त्याने हेरले. मोठ्या धूर्तपणे रजपुतांना समजावून अथवा दमात घेऊन एकएकाला फोडून आपल्या भजनी लावले. रजपुतांची सत्ता कायम ठेवण्याच्या बदल्यात त्यांच्याशी रक्तसंबध जोडायची सुरुवात अकबराने केली व ती मुघलांच्या पुढील पिढ्यात सुरु राहीली. ह्यावेळी घाबरलेले अथवा आपला फायदा बघणारे रजपूत अकबराच्या ह्या जाळ्य़ात अडकले. एकच झेंडा शेवटपर्यंत वाकला नाही - "उदयपुर." अकबराच्या रजपुतांसाठी ३ अटी होत्या १) आपल्या घराण्यातील एक उपवर मुलगी अकबराला द्यावी,  २) दरवर्षी एक ठराविक रक्कम खंडणी म्हणून अकबराला द्यावी व  ३) अकबराला कुर्निसात करुन त्याच्या समोर गुढगे टेकावेत. राणा प्रतापांनी ह्यातले काहीच मान्य केले नाही. अखेर अकबराने राणा प्रतापांसाठी पहिल्या २ अटी देखिल काढून टाकल्या. आपल्या समोर आपला शत्रू गुढघे टेकतो आपल्याला कुर्निसात करतो हा अहं सुखावणारा भाग तसेच राजकिय दृष्ट्या इतरांसाठी ह्याचे निघणारे सुचक अर्थ एक बादशहा म्हणून अकबराला हवे असणे फार सहाजिक होते. पण इथे राणा प्रतापांचा स्वाभिमान अकबराच्या गर्वापेक्षा दृढ व मोठा ठरला. राणाप्रताप शेवटपर्यंत झुकले नाहीच. म्हणूनच पुढल्या पिढ्यांसाठी कायमचे ते "राणांचे" - "महाराणा" असे आदर्श बनले.

अकबराने जनान्यातील रजपूत स्त्रीयांना हिंदू सण साजरे करायची परवानगी दिली. तो स्वत: त्या सण-समारंभात सामिल होऊ लागला. हे त्याकाळच्या मुस्लिम धर्ममार्तंडांना न झेपणारं होतं. पुढे पुढे तर त्याने रजपुत स्त्रीयांच्या सहवासात येऊन मांसाहार बंद केला. जेवण्याच्या पध्दतीत हिंदुंच्या अन्नाप्रमाणे बदल होत गेले. त्याने हिंदु सण साजरे केले अथवा अन्नाच्या सवयी बदलल्या म्हणून अकबर महान वगैरे अजिबात होत नाही. मात्र ह्याचा तत्कालिन "राजकारणावरती" व समाजावरती प्रभाव पडला होता हे नक्की. कालांतराने लोकांना तो आपसूक आपल्यातला वाटू लागला. त्याच बरोबर त्याच्या अश्या वागण्याने मुल्ला-मौलवींचा जळफळाट सुरु झाला. अकबराचा धार्मिकतेचा प्रवास आणि संघर्ष सुरु होतो तो इथुन.
 


अजमेरला तापल्या वाळूत नागव्या पायाने चालत जाऊन मुलासाठी नवस करणारा अकबर नंतर नंतर खूप बदलत गेला. जनानखान्यामुळे रजपूत स्त्रीयांच्या सहवासात तो आलाच होता पण पुढे त्याने आपल्या दरबारातील लायक अश्या हिंदू लोकांना महत्वाची पदे देऊ केली. राजा तोरडमल, बिरबल, तानसेन वगैरे सर्वांच्या ओळखिची नावे आहेत. ह्या लोकांकडून त्याने समाजातील हिंदू लोकांच्या पध्दती समजावुन घेतल्या. हिंदुंवरील जिझिया हा अपमानकारक कर काढून टाकला. दुसरीकडे शिखांना जमीन दान केल्याचेही उल्लेख आहेत. अकबर समोर दिसेल तेच मानणारा व तर्काच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी तासून बघणारा होता. दरबारातील मुल्ला-मौलवींशी भाषा - माणसाचे संवाद करणे वगैरे बाबतीत त्याचे वाद झाले. मुल्ला-मौलवी नेहमीप्रमाणे फरीश्ते येऊन मानवाला भाषा शिकवून गेले वगैरे बरळू लागले तसे अकबराने हे चूकीचे आहे. मुल आजूबाजूच्यांकडे बघून शिकते हे ठासून सांगितले पण मुल्ला-मौलवी धर्मग्रंथाच्या बाहेर यायला तयार नव्हते. "विक्षिप्त" अकबर जागा झाला त्याने शहरा बाहेर दूर एका निर्जन ठिकाणी एक महाल बांधला व राज्यातील काही मोजकी तान्ही मुले तिथे ठेवली. त्यांना सांभाळणारे सगळे मुके बहिरे ठेवले. आणि ४-५ वर्षांनी त्या मुलांना सगळ्यां समोर आणल्यावर ते फक्त प्राण्यांसारखे आवाज तितके काढत होते. ही कथा जर खरी असेल तर त्याने मुल्ला-मौलवींची तोंडे बंद केली पण त्या मुलांच्या आयुष्याशी तो खेळला हे देखिल खरे.

त्याने उत्तर आयुष्यात अनेक
हिंदु - ख्रिश्चन - जैन - बौध्द तत्वज्ञांबरोबर त्या त्या धर्माबाबत सविस्तर व सखोल चर्चा  केली. १५७६च्या सुमारास अकबराने फत्तेपुरसिक्री मध्ये एक खासबागेत "इबादतखाना" नामक एक मोठी वास्तू बांधून घेतली. त्याला चार मोठी दालने बांधून घेतली. भिन्न भिन्न दालनात वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना बसवत असे. त्यांना समोरासमोर बसवून तो वाद घडवूण आणि. ज्याची मते पटत त्याला बक्षिसी दिली जाई. गोवेकर पोर्तुगिझ ख्रिस्तींनी अकबराला ख्रिस्ती बनवण्यासाठी चर्चेचे हर एक प्रयत्न केले. एका पाद्रिने तर मी हातात बायबल घेऊन अग्निदिव्य करायला तयार आहे मुस्लिम धर्मगुरुने तेच करुन दाखवावे असे आवाहनही दिले. अकबर मधल्या काळात ख्रिस्ती धर्मात नको इतका रस घेऊ लागला. फादर अक्वाविया, मान्सेराट, हेन्रीक असे तीन धर्मगुरु जाऊन अकबराला भेटले. अनेक भेटवस्तू बायबलची प्रत अश्या हेटी त्यांनी अकबराला दिल्या. अकबराने ते बायबल मस्तकावर धारण केले. पाद्रिंना आपल्या राज्यात धर्मप्रसार करायची सुट दिली. चर्च ऊभारायला परवानगे दिली. त्यांच्या प्रार्थना स्थळांत जाऊन तो देखिल गुडघे टेकून येऊ लागला. मात्र अकबराने बाप्तिसमा घेतला नाही. ख्रिस्ती लोक फारच मागे लागल्यावर त्याने आपला बारा वर्षांचा मुलगा मुराद ह्याला  काही महिन्यांकरता ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला लावला. मात्र घरातील लोकांनी अकबरावरती जणू अघोषित बहिष्कार टाकला. बायकांनी आम्ही असले प्रयोग करणार नाही असे निक्षून सांगितले. अखेर अकबराने आपले प्रयोग आपल्यापुरतेच ठेवले.

मात्र दुसरीकडे त्याने उलेमांच्या मनमानीला चाप लावायला धार्मिक अधिकार आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली. "मला किती लग्न करायचा अधिकार आहे?" असा प्रश्न त्याने मौलवींना विचारला. अकबराची अनेक लग्ने झाली होतीच. कुराणानुसार चारच लग्न करु शकता अथवा पहीली चार लग्नच शरियानुसार अधिकृत आहेत असे सांगणार्‍यांना त्याने हाकलून दिले. पुढे पुढे तर हे मुल्ला-मौलवी एकमेकांत भांडू लागले व इबादतखान्याचा आखाडा होण्याची वेळ आली. म्हणून जिथे मौलवींना निर्णय देता येणार नाही तेथे कुराणाला अनुसरुन बादशहास गरजेपुरते बदल करण्याचा अधिकार आहे असा करारनामा शेख मुबारक नामक आपल्या विश्वासू माणसाला तयार करायला सांगितला व मौलवींना त्यावर सह्या करायला लावले. अकबराच्याच तुकड्यावरती त्यांची पोटे भरत असल्याने त्यावर निमुटपणे सह्या झाल्या. काही दिवसांनी अकबराने धार्मिक न्यायदान करणार्‍याला काढून टाकले. पण हे असंच चालू राहीलं तर आपली आणि ह्या भूमीत मुस्लिम धर्माची धडगत नाही हे ओळखून मुल्लामौलवींनी अकबराच्या विरोधात असंतोष पसरवायला सुरुवात केली. अकबराला हे प्रकरण खरंच जड गेलं. पण त्याने अत्यंत निष्ठूरणे हे बंड विझवले. आणि शेकडो मुल्ला-मौलवींना पकडून चौकशी केली व दोषी मौलवींना बाजारात गुलाम म्हणूण विकले व त्या बदल्यात चक्क बैल आणले. का? तर बैल जास्त उपयोगी आहेत. त्याने काही मशिदि पाडून चक्क घोड्यांचे तबेले ऊभे केले. अकबराने अनेक बाबी इस्लामच्या बाहेरीलच नव्हे तर इस्लामच्या पूर्ण विरुद्ध केल्या. आईकडून इराणी असल्याने तो सूर्य आणि अग्नि पूजक बनला. मोठा खर्च करुन त्याने आपले प्रतिनीधी इराणाला किर्मान येथे पाठवले आणि तिथल्या मंदिरातील पवित्र अग्नि आणविला. सूर्य हा सर्वांना उर्जा देतो त्याची उपासना करायला हवी हे तोच सांगु लागला. अकबर सूर्य नमस्कार घालत असे. "अकबरनामा" व "ऐन-इ-अकबरी" ह्या ग्रंथांचा कर्ता अबुल फजल ह्याला बिरबल आणि तोडरमल जबाबदार असून त्यांनी बादशहाला बिघडवले असे तो म्हणतो. अकबरने ह्याच अबुल फजल कडून महाभारताचा अनुवाद करवून घेतला वरुन त्यात जस्स दिलय तस्सच भाषांतर कर एकही शब्द तुझ्या मनातला लिहायचा नाही अशीही तंबी दिली. काफरांचे हे ग्रंथ वाचल्यामुळे मला जहन्नुममध्ये जावं लागेल अशी भीती वाटाल्याचेही अबुल फजल लिहीतो.

अकबराची केस दिवसेंदिवस मुल्ला-मौलविंच्या हाताबाहेर जाऊ लागली. आईकडून इराणी पध्दतीचा वारसा असल्याने तो "नवरोज" हा पारशी लोकांचा नववर्षाचा पहीला दिवस मोठ्या समारंभात साजरा करत असे. इस्लाममध्ये "दर्शन देणे" असा काही प्रकार नाही. अकबर मात्र सकाळ - संध्याकाळ लोकांना सज्जात उभं राहुन "दर्शन" देऊ लागला. हीच प्रथा पुढे मुघल घराण्यात कायम राहीली हे आपण लक्षात घ्यायला हवे. लोकांचाही तो अवतारी पुरुष किंवा धर्माची नव्याने स्थापना करणारा बारावा इमाम आहे ह्याची खात्री पटली. अकबर जी फळे वाटत असे ती लोकं प्रसाद म्हणून नेत. अकबर स्वत:च्या पायाचे तीर्थ आजारी लोकांत वाटत असे. अकबराने पैगंबराच्या अनेक कृतींना चूक ठरवले. पैगंबर स्वर्गात फिरुन आल्याची कथा ही खोटी असल्याने तो मौलवींना उघड बोलून दाखवू लागला. अकबराने १५८३च्या सुमारास गोवध बंदि केली. दाढी राखण्यावर त्याने चक्क बंदि आणली. बहुदा त्यामुळे हातभर वाढलेल्या दाढ्या गायब होऊन अकबराचा एकंदर दरबार "सटासट" दिसत असेल. ह्याच दरम्यान अकबर चक्क गंध लावून दरबारात येऊ लागला. कुत्रा व डुक्कर हे प्राणी साधे असून त्यांना अपवित्र वगैरे मानू नये असे जाहीर केले. त्याच्या आवडत्या कुत्र्याची त्याने चक्क कबर बांधली. अकबराने मुल्ला-मौलवींच्या डोक्यावरती फोडलेला बॉम्ब म्हणजे त्याने सर्व धर्मातील त्याला पटलेल्या व चांगल्या वाटणार्‍या गोष्टी एकत्र करुन १५८२ च्या सुमारास लाहोर मुक्कामी स्वत:चा "दिन-ए-इलाही" हा धर्म स्थापून स्वत:ला प्रेषित घोषित केले. तोवर जगभराच्या इस्लामच्या इतिहासात असला धार्मिक धरणीकंप झाला नव्हता. अर्थात त्याला हाताच्या बोटावरतीच मोजता येतील इतपतच अनुयायी मिळाले. अबुल फझलने अठरा लोकांची नावे नोंदवली आहेत. त्या धर्माची जबरदस्ती त्याने कुणावरही केली नाही. तो धर्म केवळ नोंदवला गेला व त्याच्या बरोबरच लुप्त झाला. अरे हो अजून एक! आयुष्याच्या एका टप्यावरती कधीतरी अकबराची गंगेवरती फार श्रद्धा बसली. त्याला पीण्यासाठी फक्त गंगेचंच पाणी लागे. अगदि स्वारीसाठी तो शेकडो किमी दूर असला तरी त्याच्यासाठी गंगेच्या पाण्याची खास सोय केली जात असे. तो हींदूप्रमाणे गंगेला पवित्र मानत असे. इस्लाममध्ये हा देखिल प्रकार नाही.


अकबर हा माणूस एकंदरच विचित्र होता. अकबरनामा नुसार त्याला लहानपणापासून अंधाराची भिती वाटत असे, तो आपल्या दोन मजली शाही तंबूच्या बाहेर पुरुषभर उंचीच्या मेणबत्या रात्रभर जाळत ठेवत असे. पहाटे फटफटलं की मग थोडावेळ झोपत असे. रात्रभर मशाली व शेकोट्यांच्या प्रकाशात विवीध खेळ, मल्लांच्या कुस्त्या, गायन,  आणि अगदिच हटके म्हणाल तर रात्रीबेरात्री बैल, हत्ती, कोंबड्या-कबुतर्‍यांच्या झुंझी वगैरे बघत बसे. असाच एकदा उधळलेला बैल त्याच्या अंगावरती येऊन अकबर जखमी झाला होता. पण त्याला एकंदरच पशु-पक्षांचा शौक होता. तो शिकार वगैरे करत असे पण त्याच बरोबर पकडलेल्या प्राण्यांच्या, पक्षांच्या - किड्यांच्या झुंजी ला्वत असे. काचेच्या पेटीत २ कोळी कींवा नाकतोडे सोडून त्यांची मारामारी व दुसर्‍याला पकडून खाऊन टाकणे वगैरे फार रस घेऊन बघत असे. हत्तींप्रमाणे त्याला कबुतरांचाही फारच शौक होता. उत्तमोत्तम जातींची कबुतरे त्याने जमवली होती. महालाच्या गच्चीत जाऊन ती कबुतरे उडवायचा छंदच होता त्याला. त्याने त्या छंदाला नावही एकदम रोमॅंटिक दिले - "इश्कबाजी." पारव्या-कबुतर्‍यांच्या एकंदरच "गुट्टरग्गुम" आवाजामुळे आणि एकमेकांशी चावटपणे वागण्याची पध्दत बघून त्याला हे नाव सुचले का हे कळायला मार्ग नाही.  हे असले प्रकार करणारा  विक्षिप्त अकबर न्यायदानाचे नियम मात्र काटेकोर ठेवी. भूक लागली असताना, न्यायदानाच्या आधीच दुसर्‍या कारणाने चीडचीड होऊन मग न्यायासनावर बसले असल्यास किंवा आधीच्याला कडक शिक्षा दिली असताना पुढल्या प्रकरणात लगोलग शिक्षा अथवा निर्णय न द्यायचा नाही असा नियम त्याने बनवला होता. कारण अश्या मनस्थितीत गरजेपेक्षा जास्त कठोर शिक्षा अथवा अविचारी निर्णय दिला जाऊ शकतो असे त्याचे तर्काला धरुन असलेले मत होते.


तर असा हा अकबर. अनेक पैलू असलेला विचित्र, विक्षिप्त आणि कधी कधी दिलदार असलेला. अकबरच्या राजकिय, सामाजिक, आर्थिक बाबी. प्रशासन, लढाया, कौटुंबिक कलह, त्याचे हत्तींवरील प्रेम वगैरेंवर एक एक लेख होईल. पण ह्यात थोडीशी राजकिय बाजू व मुख्यत: धार्मिक बाजू दाखवण्याचा उद्देश हा आहे. की बहुदा अकबर हा इस्लाममधील आजवरचा एकमेव "चार्वाक" असावा. उत्तर आयुष्यात त्याने अनेक कृतीतून मुल्ला-मौलवींच्या नाका कांदे लावावे लागतील असे निर्णय घेउन ते राबवले. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक धर्मात अधून मधून असले "चार्वाक" व्हायला हवेतच अन्यथा धर्ममार्तंड त्या-त्या धर्माचे डबके बनवतात.

मुस्लिम धर्मातला चार्वाक -" अकबर" .....  अकबराची ही बाजू जास्त उजळून दाखवणे सध्या गरजेचे आहे.


 - सौरभ वैशंपायन.

Thursday, June 9, 2016

श्री. म. माटे हे नाव महाराष्ट्राला नवीन खचित नाही. अस्पृष्यता निवारण चळवळ, साहित्य निर्मिती अश्या २ आघाड्यांवरती त्यांनी बरेच काम केले होते. १९४३ सालच्या महाराष्ट्र साहीत्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या लेखनाचे २ खंड २००७ मध्ये देशमुख प्रकाशनाने प्रकाशित केले. त्यापैकी दुसर्‍या खंडात त्यांनी "अस्पृष्टांचा प्रश्न" असा एक दिर्घ प्रबंध लिहिला आहे. प्रचंड अभ्यास व स्वानुभवावरुन लिहिलेला हा प्रबंध असून पूर्वापार चालत आलेल्या बिनडोक रुढी परंपरांनी भारताचे कसे नुकसान केले ह्यावर त्यांनी अनेक स्मृतींमधले दाखले देऊन, अनेक बखरींमधले उतारे देऊन दाखवून दिले आहे. हा प्रबंध वाचताना मला महाराष्ट्रात अस्पृष्यांच्या परीस्थितीबाबत थोडेसे वाचायला मिळाले. अस्पृष्यांना गावगाड्य़ात अनेक हक्क असत असं ते म्हणतात. बिदरच्या बादशहाने एका महार घराण्याला एका गावची बावन्न हक्कांची हक्कदारी दिली असे ते नोंदवतात. ते ५२ हक्क कुठले हे शोधायची गरज आहे. महार - मांग ह्यांच्या हक्कांची नोंद पैठणच्या ब्रह्मवृंदांकडे जी निर्बंधपुस्तके असतात त्यात दिली होती. महार - मांग यांच्यातील हक्कांबाबतच्या तंट्यात पैठणच्या ब्रह्मवृंदाने त्याच निर्बंध पुस्तकांचा आधार घेउण तो तंटा सोडवला होता (म.इ.सा खंड २० लेखांक १७४) हे ससंदर्भ ते नमुद करतात.

पूर्वीच्याकाळी एखाद्या आरोपीला दिव्य करावे लागत असे. त्यात महाराच्या मताला बरीच किंमत असे. शाहु रोजनिशी नुसार शके १६६५ मधल्या फुरसुंगीच्या पाटिलकी बद्दल तंटा ऊभा राहीला. कामठे-बोराडे आणि गायकवाड ह्यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. कृष्णावेण्णा संगमस्थळी गोतसभा भरली. वादि-प्रतिवादी व येसनाक महार संगमाच्या पात्रात शिरले. दिव्य पार पाडताना येसनाकाने कामठ्यांना उजव्या हाताने बाहेर काढले व गायकवाडांना डाव्या हाताने. कामठ्यांना निम्मी पाटीलकी व वडिलकीचा मान मिळाला. गोतसभेने येसनाकाचा निकाल मान्य केला. इतकेच नव्हे तर खामगावात शिवेच्या हद्दिच्या वादात निळनाक महाराने आपला मान घेतला व तो जिथवर चालत गेला ती हद्द गावकर्‍यांनी मान्य केली (रा खं ६ पृष्ठ १११) ह्याचा अर्थ पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेल्या माहीतीच्या आधारावर गावाची शिवारे ठरविण्याचा मान महारांना होता. बेलसर येथे नाव्ही व गरुड समाजात रहायच्या जागेच्या वाटणीवरुन झालेला कज्जा असाच महाराच्या डोईवरती देवीचा अंगारा व पांढरीचा भेंडा देऊन "नावियांची जागा पुरातन असेल तिथवर चालत जावे" असे ठरले व केलेला निवाडा मान्य केला.

१७६० मध्ये कर्ज निवारण्यासाठी पेशव्यांनी काही काळ कर्जपट्टी बसवली. त्याची वसूली महारांकडूनही होऊ लागली. नाणे मावळातील महारांनी एकत्र येऊन अर्ज केला की "आमच्याकडून अशी पट्टी आजवर घेतली गेली नाही सबब ह्यापुढेही घेतली जाऊ नये असा पेशजीचा करार आहे" पेशव्यांनी तात्काळ त्यांना सुट दिली. काही उध्वस्त झालेली गावे वसवताना गावकरी व बलुतेदारांबरोबर महारांना देखिल त्यात कायम केले. त्यासाठी शंभर रुपये कर्ज व पाच खंडी धान्य सरकारातून दिल्याची नोंद थोरले माधवराव रोजनीशीत आहे. (पृ ३५). जमिनीची पहाणी करुन सरकारने आकारलेल्या करातून महारांना दरशेकडा रुपये ५ ची सुट दिल्याची नोंद तसेच मौजे कळंबी प्रांत मिरज येथील एका गाववरतीच जप्ती आणली पुढे चौकशी अंती तो गाव राजनाक वल्लद काळनाक महाराकडे पूर्वीपासून असून तो हुजुर चाकरी करतो हे समजतच गावचा मोकासा व महसून त्याकडे परत केला आणि गाव जप्तीतून मोकळी केली (थो. मा. रो. भा १ पृष्ठ ३१० नोंद क्रमांक ३४०). पाली गावच्या भोयी महारास सरकारचा अधिकारी म्हणून कुलकर्णी, खोतपाटीलांसारखाच गावठाण माफ केल्याचे नानासाहेबाच्या रोजनीशीतील उल्लेखात कळते (रो भा पृ २०३). पंढरपुरात राडिचा खेळ होत ती जागा खणून तयार करायचा मान महारांचा असे. एका वर्षी बडवे तो खणू लागताच तंटा ऊभा राहीला व सवाई माधवराव रोजनीशी भाग ३ पृष्ठ २८५ नुसार निकाल महारांच्या बाजूने देऊन बडव्यांना सख्त ताकिद केली. १७८९ मध्ये कात्रज गावानजिक महार, चांभार व मांग समाजाची वस्ती होती ती. काही कारणाने मोडावी लागली. लगोलग हुजुरातीतून २५१ रुपये आणि ३०० वासे नवीन घरे बांधण्यासाठी दिल्याचे सवाई माधवराव रोजनिशी ३-२८६ नुसार स्पष्ट होते.

महारांकडे गावच्या रक्षणाचे काम असे. शके ९७३च्या सूडी मधील कानडी शिलालेखात तराळांचा उल्लेख आहे व हे गावाचे चोर - दरोडेखोरांपासून रक्षण करणारे तराळ मुख्यत: महार असत असे माटे म्हणतात. गावकीच्या भांडणाचे निकाल होत त्यात महार, मांग व चांभारांच्याही सह्या होत व निशाणी म्हणून महाराची काठी, मांगाची दोरी व चांभाराचा इंगा अश्या निशाण्या असत. असे महजर बरेच मिळतात. हुजुरपागेत बिगार म्हणूनही काम असे. आरमारात चांभांरांची नेमणूक होत असे. पुणे, राहुरी, खेड, संगमनेर, जुन्नर, पारनेर, नेवासे, कर्डे, बेलापूर, गांडापूर ह्या ठिकाणी ३१३ महार, ५४ मांग, ५२ चांभार हुजुरकामी असल्याचा उल्लेख नानासाहेबांच्या रोजनीशीत आहे. तसेच हुजुरपागेत २७७ महार राबते म्हणून होते. राणोजी भोसल्यांकडे यांच्या पागेत असेच महार होते. लढाईत जखमी माणसाला परत पिछाडिवरती आणायचे काम महार करत. (सवा माध रो भा १-४३) इ.स. १७७८ मध्ये तळेगावाहुन लष्करातील जखमी लोकांना पुण्यास हलविण्यासाठी महारांचेच पथक होते (सवा माध रो भा २ पृ ४३). वसईच्या मोहीमेत अतिशय उत्तम पोहोणारे "पेटेकरी" हे महार - मांग होते. त्यावेळी महत्वाची माणसे, पत्रे वगैरे पाण्यातून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचविण्याचे जोखमीचे काम ह्याच बहाद्दरांनी केले (पे.द. ३-२०९). देहू, बांबुर्डी, भिमथडी, नागेवाडी-सातारा, भांबुर्डे अश्या अनेक ठिकाणची पाटिलकी देखिल महारांकडे होती. जंजिरा मोहिमेत सिद्दी सातच्या बाजूने कोंडनाक महार लढत होता अशी नोंद ब्र.स्वा चरीत्रात आहे. त्याची नावासकट नोंद घेतली आहे म्हणजे कोंडनाक सिद्दीकडील महत्वाचा माणूस असणार. याखेरीज पेशवे सनदा १७- ३०४ नुसार महारांचे "हुलस्वारांचे पथक" असे.बहुदा शत्रुला हुल देऊन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे काम हे पथक करीत असावे असे नावावरुन दिसते.

तसेच एका पाटिलकीच्या प्रकरणात भांडण राजाराम महाराजांपर्यंत गेले. राजाराम महाराजांनी दावा सांगणाअर्‍या महारांनी वैराटगड जिंकून दाखवायचे "दिव्य" करावे आणि बागेवाडीची पाटिलकी मिळवावी असे ठरविले. महारांनी मोठ्ठा पराक्रम करुन वैराटगड स्वराज्याला परत मिळवून दिला व ती पाटिलकी मिळवली. माटे गुरुजींनी एक घटना दिली आहे परंतु संदर्भ दिला नाहीये - खर्ड्याच्या लढाईत शिवनाक महाराचे पथक होते. हा तांसगावकडील कळंबी गावचा वतनदार. शिवनाकाचा तळ इतर ब्राह्मण आणि मराठा सरदारांच्या शेजारी पडला. लोकांत कुरकुर सुरु झाली. ती सवाई माधवरावांपर्यंत आली. त्यावेळी बैठकीत पाटणकर म्हणून वृद्ध सरदार होते. ते कडाडले - "ही तलवार बहदूरांची पंगत आहे येथे विटाळचांडाळ काही नाही!" श्रीमंतांनी तोच निकाल दिला. शिवनाकाचे पथक तिथेच सारख्याच मानाने राहीले. वसईच्या मोहीमेत तुकनाक महाराने मांडवीजवळील मोर्चे उत्तम रीतीने सांभाळले. त्याचा सन्मान करताना पेशव्यांनी कंठी-तोडे देऊन गौरव केला. आबा चांदोरकरांनी पेशवे काळातील तब्बल ४४ महार पथकदारांची नावे प्रसिद्ध केली होती - १) आपनाक २) उमनाक ३) उपनाक ४) कालनाक ५) कासनाक ६) कुसनाक ७) केरनाक ८) खंडनाक ९) गोमनाक १०) गोंदनाक ११) चांगनाक १२) चिमणनाक १३) चिडनाक १४) जाननाक १५) झुकनाक १६) तुकनाक १७) दमेनाक १८) दसनाक १९) दादनाक २०) देवनाक २१) धावनाक २२) धूळनाक २३) धोंडनाक २४) नागनाक २५) पदनाक २६) पुजनाक २७) बदनाक २८) बाणनाक २९) माळनाक ३०) मायनाक ३१) मेघनाक ३२) येमनाक ३३)येसनाक ३४) रामनाक ३५) राजनाक ३६) राणनाक ३७) लाहालानाक ३८) वामनाक ३९) सटवानाक ४०) संभनाक ४१) सिवनाक ४२) सुकनाक ४३) सुबनाक ४४) सिदनाक

ह्यावरुन इतके नक्कीच उघड आहे की पेशव्यांवरती जो जातीभेदाचा सरसकट आरोप केला जातो त्याला ऊभा छेद देणारे हे संदर्भ आहेत. उत्तर पेशवाईत महारांच्या गळ्यात मडके आणि कंबरेला खराटा बांधला जात असे ह्याला एकही समकालिन पुरावा ऊपलब्ध नाही. तशी काही प्रथा असती तर किमान एक लिखित पुरावा अगदि सहज मिळाला असता तो देखिल इंग्रजांच्या जवळच्या काळातील. इंग्रज अथवा परकियांकडूनही एकही ओळ ह्यावर लिहीली गेली नाही. त्याकाळातील समाज सुधारकांकडून असे काही लिखाण उपलब्ध नाही. ह्या सगळ्या ऐकिव गोष्टी आहेत व एकाचे दोघांना दोनांचे चारांना करत पसरलेले आहे.
लेखनसीमा।

- सौरभ वैशंपायन

=============
संदर्भ -
१) निवडक श्री. म. माटे : खंड २
२) पेशवे थोरले माधवराव रोजनीशी

Tuesday, September 29, 2015

The storm on the sea of GalileeRembrandt ह्या डच चित्रकाराने १६३३ मध्ये काढलेले हे चित्र - "The storm on the sea of Galilee." भर समुद्रात आलेले वादळ येशुने शांत केले व लोकांचा जीव वाचवला अश्या कथेवर आधारित हे चित्र होते. १९९० मध्ये अमेरीकेतील एका संग्रहालयातुन हे व अशी अजुन १०-१२ चित्र चोरी झाली ती आजतागयत मिळाली नाहीये. आजवरची सर्वात मोठी चोरी आहे म्हणे ही.
असो, त्या चित्राला बघुन एक कविता सुचली -
===============
तटतटून फुगले शिड,
नेई गलबत हाकारुन,
भणाण वाऱ्यासंगे त्वरेने
आले जलद भरुन

आले जलद भरुन,
दश दिशा अंधारुन
उठु लागती पर्वतप्राय
लाटा चोहीकडुन

लाटा चोहीकडुन,
उसळती,
लाटा चोहीकडुन
बुडविन नौका
म्हणतो सागर
एका इरेस पडुन

सागर इकडे
सागर तिकडे
खाली सागर
सागर वरती
घेरुन टाकी
उधाण भरती
दूरवरी ना
दिसते धरती

पुन्हा न दिसणे
अंगण - घर ते
क्षणा क्षणाला
आशा विरते
मृत्यु समोरी
जीवन हरते
आणि अचानक
कुणास स्मरते -

नौकेत अपुल्या
एक विभूति
लाडकी अपुली
म्हणे प्रभू ती
उडवुन खिल्ली
ज्यास नाडती
त्राहि म्हणूनी
हात जोडती

ऊभा राहीला
हासत हासत
अभय वचने
बोले प्रेषित
सोडुन द्या रे
दृष्टि दूषित
उजळुनी टाका
मने कलुषित

जन्म मृत्युचे
चक्र अटळ जरी
रात्री नंतर
येई दिवस तरी
मनी धरा रे
दृढ विश्वासा
येवोत संकटे
किती तुम्हांवरी

स्मरा पित्यासी
हाका गलबत
दुर किनारा
मिळेल अलबत
निधडी छाती
करी करामत
उधळुनी द्या हे
वादळ खलबत

ऊभा निश्चयी
दावित वाटा
जाइ गलबत
फोडुनी लाटा
शमले वादळ
बघता बघता
नियतीचाही अन्
झुकला काटा

- सौरभ वैशंपायन

Thursday, June 4, 2015

मास्तर - KEYवसंत वसंत लिमये, ऐकायलाच हटके असलेलं नाव. जसं नाव तसा माणूसही एकदम हटके. जवळच्या माणसांसाठी "बाळ्या", नवख्यांसाठी "सर" आणि ह्या दोहोंच्या मधल्यांसाठी "मास्तर." माणूस दिलखुलास. एखादी गोष्ट मनात आली की घोळ घालत न बसता काम करुन मोकळा होणारा. माझ्या आठवणीप्रमाणे माझे ट्रेकवरचे २ लेख वाचून खुली दाद द्यायला म्हणून आपणहून मास्तरांनी मला फोन केला होता तिथे आमची औपचारीक ओळख झाली. गिर्यारोहण क्षेत्रात वावरणार्‍या लोकांसाठी "वसंत वसंत लिमये" हे नाव किती मोठं आहे हे वेगळं सांगायला नको, त्यांचा आपणहून आलेला फोन ही माझ्यासाठी अर्थात मोठी गोष्ट होती. ४ वर्षांपूर्वी तो फोन त्यांनी का केला होता? हे मला आत्ता २-३ दिवसांपूर्वी समजलं जेव्हा त्यांच नवं पुस्तक "कॅम्प फायर" हातात पडलं. ट्रेकिंगच्या सुरस रम्य कथा हा आम्हांला त्यावेळी जोडणारा धागा होता. वास्तविक "कॅम्प फायर" हे त्यांचे पहिले पुस्तक नाही, आधीही अनेक ठिकाणी स्तंभलेखन, लघुकथा लेखन, "धुंद-स्वच्छंद" हे पुस्तक आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ असणारी अत्यंत वेगवान कथानकाची "लॉक ग्रिफिन" हि कादंबरी त्यांच्या लेखणीतून उतरली आहे. पण ह्या नव्या पुस्तकाची - बात ही कुछ और है।

मला स्वत:ला "Story teller" व्हायची इच्छा आहे. आपण घेतलेला अनुभव किंवा सुचलेली कल्पना सांगताना समोरच्या माणसांनी खुर्चीची टेकली पाठ सोडून उत्सुकतेनं पुढे झुकून बसायला हवं हे माझं स्वप्न आहे. मास्तरांशी माझी ओळख वाढत जाण्यामागचं हे एक कारण. मास्तर स्वत: एक उत्तम  "Story teller" आहे हे मी स्वानुभवावरुन सांगतो. कॅम्प फायरची पानं पलटताना देखिल ह्याचा अनुभव येत रहातो. मुळात निलेश जाधव यांनी तयार केलेलं पुस्तकाचं मुखपृष्ठंच झकास उतरलंय. त्यातल्या डोंगराच्या चित्राचा हाताला जाणवणारा खरखरीतपणाच उत्सुकता चाळवणारा आहे. आतली प्रत्येक लेखांना अनुरुप काढलेली रेखाचित्रे सुद्धा अत्यंत सुरेख झाली आहेत.

हे पुस्तक म्हणजे वसंत लिमयेंनी स्वत: ८० आणि ९० च्या दशकांत वेगवेगळ्या मासिकांत, वृत्तपत्रात त्यांच्या डोळस भटकंतीच्या अनुभवांवरती जे स्तंभलेखन केले त्याचं संकलन आहे. वास्तविक माझं अर्धं पुस्तक वाचून झाल्यावरच पुस्तकावरती लिहायचा मोह अनावर झाला होता, पण त्यावर ताबा ठेवून आधी पुस्तक पूर्ण केलं आणि आत्ता लिहायला बसलो.  प्रत्येक लेख अनुभवांचा खजिना आहे. वाचता वाचता आपण मास्तरांबरोबर तिथे त्या जागी जाऊन पोहोचतो. पुस्तकाचं नावंच इतकं मस्त ठेवलंय - "कॅम्प फायर" ..... ट्रेक अथवा भटकंतीच्या रात्री शेकोटीभोवती जागवत ट्रेकच्या, प्राणी-पक्षांच्या, जंगलाच्या, इतिहासाच्या, माणसांच्या आणि अगदी भूताखेतांच्या अश्या जगभरच्या गप्पा मारण्याची मजा काय असते ती ट्रेकर्सना विचारा. तो अनुभव घेतला नसेल तर स्वत: घ्या .... आणि कुठल्याही कारणाने ते पण झेपणारं नसेल त्यांनी निदान हे पुस्तक वाचा. या पुस्तकाची तुलना मी "सिंहासन बत्तीशी" बरोबर करेन. जशी दर रात्री सिंहासनावरची एक एक पुतळी जिवंत होऊन विक्रमादित्याची गोष्ट सांगते तसंच पुस्तकाची दिड - दोन पानं जिवंत होतात आपल्याला गोष्ट सांगतात. मास्तर सुरुवातीचे २-३ परीच्छेदच अशी वातावरण निर्मिती करतात कि ते सगळं समोर घडायला लागतं. डोंगर दर्‍यातुन फिरला असाल, गिर्यारोहणातील चार तांत्रिक बाबी माहीत असतील तर ह्या "कथाकथनाची" मजा अजूनच वाढते.

अडीच - तीन हजार फुटी कोकणकड्याला सर करणारा हा माणूस कोकणकडा संबधीत चार लेखात त्यांच्या सगळ्या ग्रुपची सगळी उरफोडी धडपड मांडतो ती वाचूनच थकायला होतं. इतका वेडेपणा करायची काय गरज? हा प्रश्नही काहींना पडेल आणि त्याची उत्तर पुस्तकाच्या इतर लेखात निश्चित सापडतील. सह्याद्रि अथवा हिमालयातील माहीती देणारं हे पुस्तक नव्हे. गिर्यारोहणातील तांत्रिक बाबींचा खल करणारं देखिल नव्हे पण हे त्यांच्या काही दशकांतील अनुभवांचे गाठोडे आहे. हे पुस्तक वाचून ट्रेकिंग मधलं सगळ सगळं समजेल असंही नाही कारण व्यक्तीपरत्वे अनुभव बदलतात व ते अनुभव स्वत: घेणं हाच सर्वोत्तम मार्ग. पण निदान कसं वागावं? हे नक्कीच समजेल. हे बरे - वाईट अनुभव रक्त आटवूनच मिळतात.

हे पुस्तक म्हणजे पांढर्‍यावरती काहीतरी काळं आत्मस्तुतीपर लेखन नव्हे. बहुतांशी वेळा लिहिताना मास्तरांनी "आम्ही सगळे" हा  ट्रेकिंगचा नियम लिखाणात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे पाळलाय. १९८२ - ८३ साली स्कॉटलंडला जाऊन त्यांनी आऊट डोअर एज्युकेशमध्ये टिचर्स डिप्लोमा पूर्ण केला. सह्याद्रि - हिमालय आणि युरोपातल्या भटकंतीचा प्रचंड अनुभव ह्या व्यक्तीने घेतलाय. आज ह्या माणसाचा शब्द गिर्यारोहण क्षेत्रात फार लक्षपूर्वक ऐकला जातो. चुकणार्‍यांचा हक्काने कान पकडावा इतका अधिकार आज निश्चित त्यांच्याकडे आहे. लिमयेंचे लिखाण अथवा कार्यक्रमांमधले भाषण अथवा अनुभवकथन हे केवळ शब्दांचे मनोरे नसतात. गिर्यारोहण क्षेत्रात एक जबरदस्त गोष्ट म्हणजे समजा तुम्ही अथवा तुमच्या चमुने आजवरती अस्पर्शित शिखर सर केले तर त्याला नाव द्यायचा मान त्या व्यक्ती अथवा चमूला मिळतो. नाव देताना काही अलिखित बाबी सांभाळाव्या लागतात जसे - ते नाव आजुबाजूच्या परीसराला साजेसे असावे, त्याने त्या शिखराचे वैशिष्ट लक्षात यावे. एव्हरेस्ट सर करण्याआधी शेर्पा तेनसिंग व एडमंड हिलेरी यांनी सरावासाठी हिमालयातील बद्रिनाथ परीसरातील एक शिखर सर करायचा प्रयत्न केला होता, त्यात त्यांना काही कारणाने अपयश आले होते. पुढे एका चमूने तो सर केला, त्या चमुचे ग्रुप लिडर होते वसंत वसंत लिमये - त्या शिखराला नाव दिले - "एकदंत" आता बद्रिनाथ परीसरात ३ शिखरे झाली - निलकंठ, पार्वती व त्या दोहोंमध्ये तुटलेल्या दातासारखा दिसणारा "एकदंत". ह्या शिवाय कुमॉंऊ भागात त्रिधार, खड्गधुरा आणि उत्तरधुरा अशी अजुनही तीन अस्पर्शित शिखरांना नाव देण्याचा मान लिमये व त्यांच्या चमूला मिळालाय. गिर्यारोहण क्षेत्रात वावरणार्‍यांना ज्यांच्या अंगाखांद्यावरती आपण खेळलो त्यांचेच बारसे करण्याचा हा मान नक्की काय असतो हे समजेल. आयुष्यात ४ वेळा ही संधी मिळणं हा केवळ नशिबाचा भाग नव्हे. त्यासाठी स्वत:ला त्या हजारो फुटी दोरांवरती झोकून द्यावं लागतं. कभिन्न कातळाला भिडावं लागतं. कंबरभर बर्फात खसर-फसर करत पाय ओढावे लागतात. तेव्हा हे मोठेपण येतं. अनेकदा कल्पनेबाहेरची किंमत चुकवावी लागते. स्वत:च्या जीवाशी खेळावं लागतं. दुर्दैवाने आपले साथीदार गमवावे लागतात. हे सगळं केल्यानंतर मागे उरतो तो "अवलिया" बनतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे नाही लागत. निसर्ग कधी कुरवाळून तर कधी धपाटे घालून तुम्हांला शहाणं बनवतो. ह्या प्रवासात इतर अवलियेही भेटतात. मग यात्रेत चार क्षणांकरता भेटलेले फकिर गप्पा मारता मारता कसे चिलीम फिरवतात? तशीच जगण्याचीही मैफिल सजते. मास्तरांच्या आयुष्यात आलेले असे काही अवलियेही त्यांनी आवर्जून नमुद केले आहेत.


मी पूर्ण लेखात वसंत लिमयेंचा उल्लेख अनेकदा "मास्तर" असा मुद्दामहुनच केलाय कारण खरंच हा माणूस "मास्तर" आहे - सह्याद्रीच्या  "blackboard" किंवा हिमालयाच्या "whiteboard" वरती शिकवणारा "मास्तर". त्या अनुभवांची एक "मास्तर - key" देखील आहे त्यांच्याकडे. त्याच मास्तर-key ने भटकंतीची दारं उघडायची असतील हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं ..... चुकलं .... मास्तरांच्या समोरील त्या शेकोटीभोवती बसायला हवं ..... पानं पलटता पलटता "कॅम्प फायरची" मजा घ्यायलाच हवी.

  - सौरभ वैशंपायन


Saturday, March 28, 2015

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही


श्रीराम - श्रीकृष्ण ह्या लोकोत्तर महापुरुषांच्या कार्यावरती अतुलनिय महाकाव्ये लिहिली गेली. ह्या दोघांनी आपले एकंदरच आयुष्य किती व्यापुन टाकले आहे ह्याचा विचार करताना मजा वाटू लागते. रोजच्या लहान सहान गोष्टी घ्या. कुणा भावंडामध्ये प्रेम दिसलं की - "बघा राम-लक्ष्मणांसारखी जोडी आहे" असे आपण म्हणतो. लहान मुलांच्या लीला ह्या "कृष्णासारख्या" असतात. आज्ञाधारी मुलगा हा "रामासारखा" असतो तर सतत मुलींच्या गराड्यात असलेला "कान्हा" असतो. उदाहरणे सुद्धा आपली जागा बदलत नाहीत. एक मर्यादा पुरुषोत्तम दुसरा अमर्याद पुरुषोत्तम. दोन व्यक्ती दोन टोके. ह्यांना आपल्या आयुष्यातून वजा केले तर? संस्कृती समजवणारी २ महाकाव्ये, अनेक कथा, हजारो काव्ये, हजारो गाणी, हजारो चित्रे निघून जातील. जगण्यातून "राम" निघून जाईल. माझ्या मते श्रीराम हा आत्म्याप्रमाणे आहे तर श्रीकृष्ण मना सारखा आहे. आत्म्याला जन्मभर शरीराची मर्यादा सांभाळावी लागते मन मात्र अमर्याद संचार करु शकतं. शरीरातुन आत्मा गेला कि देह निष्प्राण होतो अशी समजुत आहे .... आयुष्यात अथवा एखाद्या गोष्टीत राम राहिला नाही असेच आपण म्हणतो. तेच मनाबाबत म्हणाल तर मन आपल्या ताब्यात नसून आपण मनाच्या ताब्यात असतो हे कुणालाही मान्य होईल.पण आपली गोची अशी आहे की स्वत:वर मर्यादा आलेल्या चालत नाही आणि अमर्याद वागणं आपल्याला झेपत नाही.

याक्षणी मी मुद्दामहुन रामावरती लिहायला बसलोय. म्हणजे हा विषय अनेक दिवस डोक्यात होताच, व्हॉट्सअ‍ॅपच्या एका ग्रुपवरती राम - सीता - अग्निदिव्य वगैरे अगदि जुजबी चर्चा झाली त्याने परत ह्या विषयाने डोक्यात बागडायला सुरुवात केली. आधी अनेक वर्ष मलाही ह्याबाबत काही कळत नव्हतं. राम आपोआप IPC खाली आरोपीच्या पिंजर्‍यात ऊभा केला जात असे. पण मग हळुहळू काही गोष्टी नव्याने वाचनात येऊ लागल्या काही गोष्टी आपणहुन उलगडल्या जाऊ लागल्या. २०१४-२०१५ मध्ये राहुन आपण काही शे अथवा काही हजारवर्षांपूर्वीची समाजव्यवस्था व समाजमान्यता काय होती हे समजून घ्यायला हवे. आपण उलटे करतो त्यांना समजून घेण्या ऐवजी आपली मते आपण आदर्शांवरती लादतो. मात्र आपण २०१५ चे भारतीय संविधान त्या काळाला लागु करुन चालणार नाही ह्याची जाणीव होत गेली तशी विचारांना वेगळी दिशा वेगळी वाट मिळाली.

श्रीराम अथवा श्रीकृष्ण ह्यांना आपण आधीच देवत्व देऊन त्यांच्या प्रत्येक कृतीला गुदमरवून टाकतो. यांनी केली ती दैवी योजना होती म्हणून विचार चिरडून टाकले जातात. पण त्यांना माणसात आणले तर त्यांनी "माणूस" म्हणून केलेले कार्य अवाढव्य आहे ह्याची जाणीव होऊन मग ही माणसे  Larger than life बनतात. रामाबाबत विचार करतोय तेव्हा सगळे काव्य फुलोरे आपण बाजूला ठेवू. अमानवीय गोष्टी, चमत्कारांची जळमटे दूर करु. तसेच आधीच रामाला आरोपिच्या पिंजर्‍यात न ढकलता रामायणकालीन व त्याबरोबर अगदि अलीकडच्या काळाचाही विचार करुन बघायचा हा प्रयत्न आहे. लोकांना माझी मते पटतीलच असेही नाही व ती पटवून घ्यावीतच असाही हट्ट नाही.

मुळातच रामायण अथवा रामाचे आयुष्य हे "मर्यादा" सांभाळण्यात गेले आहे. समाजमानस व राम दोन्ही चौकटी मोडणारे नाहीयेत हे लक्षात घ्यावे लागेल. यद्यपी शुद्धम् लोक विरुद्ध नाकरणीय़म्‌ नाचरणीयम्‌ ..... चांगली गोष्ट असली तरी बदल नको. आहेत ते नियम काटेकोरपणे पाळू, उगीच प्रवाहा विरुद्द जाणारा रामही श्रीकृष्णाप्रमाणे क्रांतिकारी वगैरे नाही आणि जनता त्याहुन नाही. "जैसे थे" परीस्थिती मान्य करणारे समाजमानस रामायणात सतत डोकावते. मला याक्षणी कुठले कांड व त्यातील नेमका श्लोक आठवत नाही मात्र रामाच्या एका पूर्वजाला काही नियम मोडले म्हणून राज्यत्याग करावा लागल्याचा उल्लेख वाचल्याचे स्मरते. रामाची निवड देखिल सभा भरवुन दशरथाचे मोठे लांबलचक भाषण होऊन मग झालेली आहे. मी म्हातारा झाल्याने मला राज्य चालवणे आता जमत नाही असा सूर लावून ज्याला "जाणीव" अथवा ताकद नाही तो राज्य चालवण्यास उपयुक्त नाही वगैरे वगैरे बरेच काही सांगुन दशरथ रामाचे व त्याच्या गुणांचे कौतुक करुन राम हे राज्य चालवायला माझ्या दृष्टिने योग्य आहे असेही मत मांडतो. मात्र पुढे तो जनतेला विचारतो कि "तुम्हांला हे मान्य आहे का? राम तुम्हांला राजा म्हणून चालेल का? अजुन कोणाचे/मध्यस्थांचे काही विरोधी विचार असतील तरी त्यांनी नि:शंक मनाने मांडावे त्यातुन भलेच होऊ शकेल!" -


यदीदम् मेऽनुरूपार्धं मया साधु सुमन्त्रितम् |
भवन्तो मेऽनुमन्यन्तां कथं वा करवाण्यहम् ॥१५॥
यद्यप्येषा मम प्रीतिर्हितमन्यद्विचिन्त्यताम् |
अन्या मद्यस्थचिन्ता हि विमर्दाभ्यधिकोदया ॥१६॥ (अयोध्या कांड सर्ग २)

हे ऐकल्यावर सर्व जनता खुष झाली सर्वजण रामाचा जयजयकार करु लागले. त्यावर दशरथ गंमतीने म्हणतो - "अरे हे काय? रामाला राजा म्हणून तुमची मान्यता मिळताच मी तुम्हांला अप्रिय झालो बहुदा!" थोडक्यात राजा आहोत म्हणून वाट्टेल तसा राज्यशकट हाकला जात नसे. राजा हा जनतेच्या मान्यतेवरती निवडला जात असे हेच यातून दिसते.

ही रामाला "राजा" म्हणून मान्यता मिळताना "आनंदाची" घटना ह्या करीता आधीच सांगितली कारण साधारण समाजमन व राजाची मानसिकता कुठे झुकली होती हे समजेल. राम वनवासाला निघेपर्यंत व्यक्ती अथवा लोकांच्या समुहाची आनंद अथवा दु:खाची वर्णने ही एका चौकटीबाहेर गेल्याची उदाहरणे मिळत नाहीत. रामायण हे काव्य एकंदरच पुलंच्या कथाकथना मधील त्या पिंजर्‍यातील पोपटाप्रमाणे मीरची खात खात "अहिंसा - सत्य - अस्तेय"  हेच परत परत म्हणणारे आढळते. वाली देखिल मरताना फिल्म मधल्या शेवटचे श्वास मोजणार्‍या भारत उर्फ मनोज कुमार सारखा बडबड बडबड करत - रामाशी "शास्त्रार्थाची" चर्चा करत करत शेवटी स्वत:ची चूक मान्य करुन मरतो.

यानंतर मुख्य प्रसंग म्हणजे सीतेचे अग्निदिव्य व पुढे अयोध्येत पोहोचल्यावर सीतेचा त्याग. रामायण वाचताना रामाच्या प्रतिमेला पहिला धक्का तेव्हा बसतो जेव्हा रावणवध झाल्यावरती बिभीषण सीतेला सन्मानपूर्वक रामासमोर आणतो तेव्हा पूर्ण रामायणात एकदाच रामाचा तोल सुटलेला दिसतो. सीता समोर आल्यावरती चारचौघात तो तिला अद्वातद्वा बोलतो. मी तुला मुक्त केले आहे सर्व दिशा तुला मोकळ्या आहेत तुला हवे तिथे तू जाऊ शकतेस. तुला इथे उपस्थित असलेला किंवा नसलेला दुसरा कुणी पुरुष आवडला तर तू त्याच्या बरोबर उरलेले आयुष्य व्यतीत करु शकतेस. मी तुझ्या स्वीकार करु शकत नाही. रावणाने तुझ्यावरती कशावरुन जबरदस्ती केली नसेल? वगैरे वगैरे बरेच काही आणि २-३ तुरळक ठिकाणी तर असंबद्ध बोलताना आढळतो. हा भाग आतापर्यंत वाचलेल्या संयमी रामाशी अजिबातच संगती लावता येत नाही इतका टोकाचा संतापी राम उभा केला आहे. (गदिमांनी याच प्रसंगावरती गीत रामायणात "सखी सरले ते दोघांमधले नाते" हे गाणे लिहिले आहे.)  एक अख्खा सर्ग ह्यावरतीच आहे. मग सीतेचा सहाजिक विलाप आणि संताप ह्यावरती पुढचा सर्ग आहे. सीता रामाचा धिक्कार करते आणि लक्ष्मणाला चिता रचायला सांगते. आणि अग्नीचे स्मरण करुन त्यात प्रवेश करते. म्हणजे थोडक्यात रामाने अग्निपरीक्षा मागितली नाहीये आणि सीता अग्निपरीक्षा देत नसून संतापून जीव देते आहे असा सीन आहे. तीने अग्नित प्रवेश केल्यावरती एक अख्खा सर्ग देवता खाली येऊन रामाचे व सीतेचे गुणगान करतात सीतेचा स्वीकार कर म्हणून गळ घालतात. तोवर ही अग्नीमध्ये "वेटिंग" मोडवरती. मग पुढल्या सर्गात अग्निच प्रकट होतो. सीतेचा हात धरुन रामासमोर तीला ऊभी करतो आणि ती माझ्या तेजाहुनही पवित्र असल्याची साक्ष देतो मग राम आनंदाश्रु ढाळत स्वत:च्या मुळ स्वभावाला जागुन अत्यंत मृदुभाषी झालेला आढळतो. ज्याप्रमाणे सूर्य व प्रकाश वेगळे नाहीत तसेच सीता आणि मी वेगळे नाहीच, माझा सीतेवरती पूर्ण विश्वास आहे. मात्र त्याच बरोबर अग्नी देवाची साक्ष मिळाल्याने कोणी हिच्यावरती संशय घेणार नाहीत तसेच मलाही कामांध बनून सीतेचा स्वीकार केला असे म्हणणार नाहीत. हीचे पावित्र्य इतके प्रखर आहे की रावण हिचे काहिच वाकडे करु शकणार नव्हता. असे बरेच कोडकौतुक करताना आढळतो. ४ सर्गांची संगती लागता लागत नाही.

शांत, संयमी, मृदुभाषी, एक वचनी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम असलेला राम अख्या रामायणातले आपले रुप ह्या ३-४ सर्गांकरतो सोडतो आणि अयोध्येला निघताना पुन्हा आपला शांत, संयमी, मृदुभाषी, एक वचनी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम होतो. माझा सांगायचा मुद्दा असा की हा भाग उत्तर रामायणा प्रमाणेच प्रक्षेप आहे का? अशी स्वाभाविक शंका येते म्हणजे ज्या काळात स्त्रीयांना मर्यादा घातल्या जाव्यात अशी आचरट धारणा पक्कि होत गेली व काळाच्या ओघात स्त्रीयांना घरात कोंडले गेले त्याकाळात हा भाग आला असावा का? लोकांनी मुळ वाल्मिकी रामायण नक्की वाचून माझ्याप्रमाणे त्यांनाही हेच वाटतं का ते तपासून बघावे. मला इथे रामाची वकीलीही करायची नाहीये अथवा मला हा भाग अडचणीचा वाटतो म्हणून तो प्रक्षेप आहे असेही मला म्हणायचे नाही.  एकतर मी म्हणालो तसे चमत्कार काव्य फुलोरे बाजुला ठेवुन आपण असा विचार करु की सीता संतापून अग्निदिव्याला (अथवा जीव द्यायला) तयार झाली तरी पेटलेल्या चितेत जाऊन जिवंत परत येणे अथवा अग्नीपुरुष प्रकट होणे वगैरे सरळ सरळ भाकड कथा आहेत. आता रामायण कालिन अग्नि अथवा कुठलीही दिव्ये कशे होती कल्पना नाही मात्र शिवकालात अथवा पेशवाईत कुठल्या पद्धतीची दिव्य करावी लागत त्याची कल्पना देतो. त्या दिव्यांना कुठलाही वैज्ञानिक अथवा प्रमाण आधार नाही. पंचमहाभुतांची भीती  ... खोटं बोललं तर ती शक्तीच शिक्षा करेल ही भाबडी भावना असे. अग्नीदिव्य म्हणजे एक तापलेला आगीचा लालबुंद गोळा ज्याने अग्निदिव्य घ्यायचे कबूल केले त्याला दोन हिरव्या पानांमध्ये धरुन उचलावा लागे. त्या आधी तो पुरेसा गरम आहे हे लोकांना कळावे म्हणून त्यावरती पेंढ्याच्या काड्या टाकत त्यांनी पेट घेतलेला बघितला की तो पुरेसा तापलेला गोळा उचलायचा व तिथून काही पावले जी काही पन्नास - शंभर ठरलेली असतील ती पावले शांतपणे चालत जाऊन दुसर्‍या पेंढ्याच्या भार्‍यावरती टाकायच्या म्हणजे तो पेंढा जळत असे. ह्या दरम्यान त्याचा हात पोळला, त्याने तो गोळा खाली टाकला अथवा दुसर्‍या टोकाला असलेल्या पेंढ्याला आग लागली नाही तर हा माणूस खोटं बोलतोय असं समजलं जात असे. दुसरे असे जलदिव्य. म्हणजे काय तर जो दिव्य करणार आहे त्याने पाण्यात बुडी मारायची त्याच्या शेजारी एक धनुर्धारी व दुसरा एक पोहणारा असे दोघेजण असत. ह्याचे डोके पाण्याच्या खाली गेल्याक्षणी धनुर्धर बाण चालवणार. तो बाण पाण्यात अथवा काठावर कुठेही जाऊन पडला कि पोहायला उभा असलेला माणुस तिथवर जाणार व गेल्या मार्गानेच परत येणार. हे होईपर्यंत  डोके वर काढायचे नाही. माणूस परत आला की पाण्यात डुबकि मारलेल्याला वरती खेचणार. ही अशी दिव्ये असत. ज्यांना काही लॉजिक नाही. असेच काहीसे दिव्य सीतेने केले असावे का?

उत्तर रामायण मी आधी म्हणालो तसा सरळ सरळ प्रक्षेप आहे. कारण वाल्मिकी रामायणात शेवटच्या सर्गात रामाने पुढे दहा हजार वर्षे सुखाने राज्य केले. त्याच्या राज्यकालात कुनीच दु:खी नव्हते, रोग, वन्यप्राणी वगैरेंपासून प्रजाजन सुरक्षित होते वगैरे रामराज्याची कल्पना आहे. त्याच्या पिढ्यांनी देखिल सुख उपभोगले हे सांगुन रामायण जो कोणी वाचेल त्याचे कसे भले होईल ह्याची जंत्री दिली आहे. म्हणजे सीता - लक्ष्मणाचा त्याग वगैरे मुळ रामायणात नाही. आता तरीही उत्तर रामायणाचा विचार करायचा म्हंटलाच तर आपण हे लक्षात घ्यायला हवे की रामाची पत्नी कोण असावी? हा लोकांचा आक्षेप नसून राजाप्रमाणेच आमची राणी आदर्श व चारीत्र्याची पुतळी असावी हा आग्रह आहे. रामही जनतेच्या मागणीसाठी तिचा त्याग करतो. तिला वनात पाठवून पुन्हा तिच्याशी काहीच संपर्क ठेवत नाही. मात्र आपण हे देखिल लक्षात घ्यायला हवे की तो दुसरे लग्न करत नाही, राजा असून भूमीशय्या करतो, एकभुक्त रहातो, ब्रह्मचर्य पाळतो, यज्ञ समारंभात सीतेची मुर्ती बनवून घेतो. अखेर सीतेला धरणीने पोटात घेतल्यावर आपला देखिल अवतार संपला ह्याची जाणीव होते ... थोडक्यात त्यालाही आयुष्यात रस उरत नाही मात्र स्वत: देहत्याग करण्या आधी एका घटनेत तो शब्द दिला असल्याने लक्ष्मणाचा देखिल त्याग करतो. कथेनुसार होते असे की रामाच्या अवतार समाप्तीचा निरोप घेऊन काळपुरुष रामाला भेटायला येतो व सांगतो मी देवलोकांतुन काही निरोप घेऊन आलो आहे. तो तुला सांगायचा आहे मात्र आपल्या बोलण्याच्या मध्ये कुणीही खंड पाडू नये. राम त्याला वचन देतो की जर कोणी मध्ये आलंच तर त्याला देहांत प्रायश्चित्त देईन. बाहेर सर्वात विश्वासु म्हणून लक्ष्मणाला पहार्‍यावरती उभे करतो. थोड्याच वेळात दुर्वास तिथे येतात व मला रामाची भेट हवी म्हणून हट्ट करतात. लक्ष्मण प्रेमाने, आदराने, गयावया करुन सर्व प्रकारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. पण उलट ते अजून चिडतात व रघुकुलासकट अयोध्येलाच शाप देण्याची धमकि देतात. नाईलाजाने लक्ष्मण त्या खोलीचा दरवाजा उघडून दोघांच्या बोलण्यात व्यत्यय आणतो. काळपुरुष अदृष्य़ होतो. राम दुर्वासांची भेट घेतो. मात्र काळपुरुषाला दिलेल्या शब्दानुसार राम लक्ष्मणाला बोलावतो आणि सांगतो - "मी तुला माझ्यापासून दूर जायला सांगतो आहे, कारण माझ्यापासून दूर जाणे हेच तुला मृत्युसमान आहे! हेच तुझे देहांत प्रायश्चित्". लक्ष्मणही रामाला नमस्कार करुन सरळ शरयुवरती जाऊन जलसमाधी घेतो. म्हणजे राजपदासाठी एकट्या सीतेचा त्याग केला का तर नाही. राजा म्हणून दिलेला शब्द पाळायला त्याने लक्ष्मणाचाही त्याग केला आहे. राजमर्यादा सांभाळताना त्याने स्व:ता सगळ्या मर्यादा आखून घेतल्या व त्या पाळल्याचे रामायण - उत्तर रामायण सांगते. तिथे त्याने स्त्री - पुरुष भेद केला नाही.

सीतेवरती रामाचे किती निरातीशय प्रेम होते हे त्याच्या सीता हरणानंतरच्या विलापातुन दिसते. सीतेसाठी अठरा पद्मं वानर जमा करतो, जीव पणाला लावून तो युद्ध करतोच की. त्या ३-४ सर्गांनंतर परत राम - सीता दोघही "जैसे थे". अख्या रामायणतल्या त्या तीन असंबद्ध सर्गांसाठी रामाला एका बाजूने सरसकट झोडपले जाऊ नये. इतकेच म्हणणे मांडायला मी हा लेख लिहिला आहे. उत्तरकालात स्त्रीयांना धार्मिक रुढी परंपरांच्याखाली दडपून टाकायला कुणीतरी रामाचा वापर केला हा रामाचा दोष नाही. २०१५ चे नियम व रामायणकालिन नियम हे एक असूच शकत नाहीत. मी उत्तर रामायणाला तसेही फारसे महत्व देत नाही. मुळ वाल्मिकी रामायण मी म्हणालो तसे वाचून बघावे. माझे म्हणणे पटतय का त्याचा विचार व्हावा.

बाकी राम हा म्हणालो तसा आत्मा बनला आहे. आपल्या संस्कृतीत अखेरचे नाम हे रामनाम असावे असे मानले जाते इतका राम अभिन्न भाग झालाय. उत्तरेपासून दक्षिणेत लंकेपर्यंत ते पार तिथे पलीकडे इंडोनेशियापर्यंत रामायणाच्या पाऊलखुणा सापडतात. वडिलांनी दिलेल्या शब्दाखातर वनवास स्वीकारायचा, वनवासात पत्नीचे अपहरण झाल्यावरती शोध घेत घेत दंडकारण्य ओलांडायचे,  राज्य मिळवून देऊन सुग्रीवावरती उपकार करुन त्याची मदत घ्यायची, रावणाच्या राज्यात सत्तेची इच्छा कुणाला आहे हे ओळखुन बिभिषणाशी संपर्क साधायचा, समुद्रातुन सेतु बांधायचा, रावणाचा पराभव करुन त्याला मारुन त्याच्या पाठीराख्यांची गठडी वळायची, राजकिय, सामरिक व इतर नीती नियमांचा - आदर्शांचा - कारणांचा - परिणामांचा विचार करुन ते राज्य स्वत: न उपभोगता बिभीषणाच्या पदरात टाकणे आणि परत येणे ..... हे सगळं भव्य दिव्य आहे.त्याने दिपून जायला होतं आणि समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात तसा राम पाठीराखा भासायला लागतो आपोआप हात जोडले जातात व मुखातुन श्लोक बाहेर पडतो -

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे?
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥

 - सौरभ वैशंपायन

Saturday, January 24, 2015

मै तो सुपरमॅन ...

मध्ये काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरती मेसेज आला होता, संभाजी महाराजांबाबत. शंभूराजांचं अमानवी वर्णन त्यात केलं होतं. उंची सात फुट काय? आणि तलवारीचं वजन ६५ किलो काय? सिंह-वाघांचे जबडे हाताने उभे फाडत ... वगैरे वगैरे बरच काही. कपाळाला हात लावावा इतकाही तो मेसेज विशेष नव्हता. त्या आधी शिवाजी महाराजांवरती देखिल एक मेसेज फिरत होता - व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने रायगडवर येऊन तिथली माती बॅग मध्ये घेतली, सुभाषबाबू हिटलरला भेटायला गेले तेव्हा हिटलर शिवरायांवरचे पुस्तक वाचत बसला होता; अश्या अनेक सुरस रम्य कथा त्यात होत्या. हे मेसेज हसून सोडून द्यायचे असतात.

आपले राष्ट्रपुरुष हे "अमानवी" किंवा १००% आदर्शांचा  आणि फक्त सद्गुणांचाच तितका पुतळा असायलाच हवेत हा आपला हट्ट का असतो हे मला समजत नाही. मुघलांसमोर हार न मानलेले सगळे महायोद्धे अश्या अनुयायी + मावळ्यांसमोर आपली तलवार निमुटपणे म्यान करतात. मला शाळेच्या अभ्यासक्रमात जनार्दन लवंगारेंचा "महापुरुषांचा पराभव" म्हणून एक धडा होता. महापुरुषांचा पराभव हा शत्रू करत नाहीत तर त्याचे अनुयायीच करतात हे सप्रमाण त्यांनी सांगितले होते. तो धडा दुसर्‍या चालीवरती वाचायची गरज मला वाटली. म्हणजे नेत्याने - आदर्शाने जे नीतीनियम घालून दिले त्याला हरताळ फासणे हा वेगळाच मुद्दा आहे, मात्र आपल्या आदर्शाने काडीचीही चूक करता कामा नये ... नव्हे!!! त्यांनी चूक केली असेल तरी ती चूक नव्हतीच हा जो काही आपल्या समाजाचा हट्ट असतो त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे.

ते क्षत्रियकुलावतंस शिवाजीराजे झाले म्हणून झोपतानाही कंबरेला तलवार असायलाच हवी ही अपेक्षा करणारे आपल्याकडे बहुसंख्य मिळतात हे स्वानुभवाने सांगतोय. बरं, चार खर्‍या गोष्टि ह्यांना ससंदर्भ समजवाव्यात तर "महापुरुषांचा" अपमान झाला असं गावभर बोंबलत फिरतात. आजकाल सोशल नेटवर्किंगच्या साईट्स असल्याने भोंग्याच्या रिक्षांचे पैसे देखिल भरायची गरज उरलेली नाही. म्हणजे जसं पोरगं उकाड्याने कितीही कावलं असलं तरी बहुतांशी आयांचा त्याला गोंड्याची कानटोपी चढवायचा जो हट्ट असतो; त्याच पद्धतीने इतिहासातील महापुरुषांच्या मोठेपणाची हौस ह्या महाभागांनाच असते. मोबाईलवरती आलेले मेसेज व कादंबर्‍या हे ह्या महाभागांचे "संदर्भ" असतात. वरुन ते महापुरुष जातीनिहाय वाटून घेतलेले असतात. आंबेडकरवादि सावरकरांकडे बघत नाहीत, सावरकरवादि गांधींकडे बघणार नाहीत, गांधीवादी कुणाकडेच बघणार नाहीत.

मी तरी खोटं का बोलू? ८-१० वर्षांपूर्वीपर्यंत मी सावरकरांपलीकडे बघत नव्हतो. पण वय, वाचन, अक्कल वाढत गेली तशी निदान दुसर्‍या बाजूचं म्हणंणं ऐकायची तयारी झाली. फाळणीच्या बाबतीत डॉ आंबेडकरांचे बरेचसे विचार "प्रॅक्टिकल" होते. वास्तवाला धरुन होते तर सावरकरांचे विचार हे कितीही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते तरी ते आत्यंतिक आदर्श असे "हिंदू" विचार होते. व मुळात हातातली परीस्थिती कुठल्याही कारणाने निसटल्यावर सावरकरांचे ते विचार प्रत्यक्षात येऊ शकत नव्हते ह्याची जाणीव झाली. शिवाय स्वा. सावरकर अथवा डॉ. आंबेडकर हे "इतिहासकार" खचितच नव्हेत ह्याची जाणीव झाली. ते "विचारवंत" होते असं म्हणता येईल व त्यांच्या दृष्टिने समाज जसा होता अथवा व्हायला हवा होता ती उदाहरणे इतिहासातून हुडकून लोकांसमोर ठेवली. स्वा. सावरकरांवरती जसा आत्यंतिक व एकांगी हिंदूत्वाचा शिक्का मारुन लोकं मोकळे होतात तसेच डॉ आंबेडकरांवरती देखिल धम्माबाबत त्यांनी जे विचार मांडले त्यावर धम्मप्रसारासाठी डॉ. आंबेडकरांच्याही १०० वर्ष आधीपासून काम करणार्‍या जगभरातील संस्थांनी "श्रीयुत आंबेडकरांनी त्यांना हवा तो धम्म मांडला खरा धम्म नव्हे!" अशी टिका केली होती. या प्रकारच्या समकालिन टिका आपण लक्षात घ्यायला हव्यात. त्यांच्यात काही तथ्य असेल तर निदान ते ध्यानात घ्यायला हवे.

मुळात महापुरुष असोत अथवा आपल्या दृष्टिने खलपुरुष असोत पहिल्यांदा त्या गुणदोषांसकट इतिहासातील ते पात्र स्वीकारायला हवं. तरच इतिहास समजायला सुरुवात व मदत होते. खलपुरुषांचा चांगला गुण अथवा महापुरुषाचा वाईट गुण नाकारुन काही मिळणार नसते ना इतिहास बदलणार असतो. शिवाय जे कर्तृत्व गाजवले अथवा ज्या चूका झाल्या त्या पूर्वायुष्यात कि उत्तर आयुष्यात ह्यावर विचार व्हायला हवा. आधी चूका करुन नंतर इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असे काही अचाट - अफाट करुन दाखवले असेल तर उत्तमच. मात्र राघोबांसारखे आधी अटकेपार झेंडे गाडायचे व नंतर इंग्रजांशी चुंबाचुंबी करायची असे असेल तर कपाळाला हात लावावासा वाटतो. अर्थात अटकेपारचा झेंडा ही जमेची बाजू घ्यायची व उत्तर आयुष्यातून काय करायचं नाही? हे शिकायचं. इतिहास हा धडा घेण्यासाठी असतो. एकमेकांच्या उरावर बसण्याकरता नव्हे हे समजून घ्यायची वेळ आली आहे.

शेकडो वर्षांनी अथवा काही दशकांनी आपल्याला एकसंध इतिहास दिसू शकतो, आधीच्या व नंतरच्या घटना संगतीवार दिसतात पण त्याकाळी तो इतिहास "LIVE" असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. दुसरी गोष्ट  इतिहासातील पात्रांची मनोभूमिका आपण अनेकदा लक्षात घेत नाही. सर्वात मोठे उदाहरण छत्रपती शंभूराजे. आजकाल - "शंभूराजे मुघलांना जाऊन मिळाले ते शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा मुघलांना चकवायला ठरवलेला संयुक्तिक राजकिय डाव होता." असं सांगितलं जातं. पण त्यात घरातल्या स्त्रीयांना कसं काय समाविष्ट केलं ह्याचं उत्तर कोणी देत नाही. वर्षभर आघाडी शांत ठेवायची म्हणून भूपाळगड प्रकरण होऊ देतील? भूपाळगडावरती सातशे जणांचे हात तोडले गेले, भूपाळगड पाडला गेला. हे केवळ एक डाव म्हणून शिवराय कसे होऊ देतील? ती संभाजी महाराजांची तरुण वयातल्या उसळत्या रक्ताची चूक होती हे लक्षात घ्यायला हवं. उलट संभाजीराजे त्यांच्या शीघ्रकोपी स्वभावाला धरुनच वागले. शीघ्रकोप हा त्यांचा स्वभाव होता त्याला कोणी काहीच करु शकत नाही. त्या शीघ्रकोपी व्यक्तित्वासकट त्यांचा इतिहास मान्य करायला हवा. आणि हा शीघ्रकोप पुढेही गोवा स्वारीत पोर्तुगीज विजरई दिसल्यावर वहात्या पाण्यात घोडा घालणे असो अथवा कलशाची बाजू घेऊन शिर्क्यांवर केलेला हल्ला असो कायम दिसून येतो. एखादा गुण चांगला की वाईट हा प्रश्नच नाही परीस्थितीनुरुप तो गुण चांगला - वाईट असा बदलू शकतो. त्यामूळे शीघ्रकोपी शंभूराजांचे व्यक्तित्व एकदा लक्षात घेतले की इतिहास सुटसुटित होतो.

संभाजीराजांची मनोभूमिका अत्यंत शांतपणे लक्षात घ्यायची गरज आहे. सख्खी आई नाही. वयाच्या नवव्या वर्षी राजकारणासाठी मुघलांचा मनसबदार म्हणून जावं लागतं, मागोमाग आग्र्याचं जीवघेणं संकट, जीव वाचावा म्हणून का होईना पण खुद्द वडीलांनीच जिवंतपणी श्राद्ध घालणं,  मग परत मुघलांशी शांतता हवी म्हणून पुन्हा मनसबदार होणे. हे सगळं वयाच्या १२-१४ पर्यंत बर्‍याच अंशी अनाकलनिय असेलही. वडील सांगतात ते चांगलच असेल हा समजूतदारपणा असेलही, पण शारीरिकच नव्हे तर जे वैचारीक दृष्ट्या उमलण्याचं फुलण्याचं वय असतं त्या वयात संभाजीराजे जगावेगळ्या मनस्थितीतून गेले ह्यात वाद नाही. अश्या घडामोडी कुणा पिता-पुत्राच्या आयुष्यात आल्यासं दुसरं उदाहरण नाही. उलट म्हणूनच मुघलांना जाऊन मिळणे अथवा पुढे शिवाजी महाराज जिवंत असताना अघोर मार्गाला जाऊन केलेला कलषाभिषेक असो, संभाजी महाराजांच्या जुन्या दुखावलेपणाची संगती लागायला सुरुवात होते. आज ३५०-३७५ वर्षांनी आपण बघताना शिवराय हे सगळं सगळं स्वराज्यासाठी करत होते हे आपल्याला समजतं पण आपण मागे जाऊन संभाजीराजांच्या त्या त्या वयात स्वत:ला त्या जागी ठेवायचा प्रयत्न जरी केला तरी मनात शेकडो प्रश्न उभे रहातात.

जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची त्या - त्याक्षणी एक राजा अथवा राजपुत्रच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून जे वाटलं ते त्यांनी केलं. आपण दोहोंची बाजू समजून घ्यायला हवी. खासकरुन शंभूराजांची. आणि बाजू समजून घेणे म्हणजे जे कटू घडलं त्यावर मखमालिशी करणं नव्हे. संभाजीराजे अत्यंत बुद्धीमान होते आणि अश्या माणसांची घुसमट लवकर होते. त्यांच्या मनासारखं व त्यांना आव्हान देईल असं काम मिळालं नाही की अश्या बुद्धीमान लोकांच "आपली इथे किंमत नाही" हे मत फार लवकर बनतं. कदाचित अश्याच परीस्थितीत मनाचा कोंडमारा होऊन ते मुघलांना जाऊन मिळाले. मात्र ते ज्या तिरमीरीत उठून मुघलांना जाऊन मिळाले त्याहून जास्त ओढीने स्वराज्याकडे परत आले. आपलं ऐकणारं इथे कोणीच नाही संतापाच्या भरात आपण आपल्याच माणसांना त्रास दिलाय हे ज्याक्षणी लक्षात आलं त्याक्षणी त्यांनी परतायचा निर्णय घेतला.

दुसरी गोष्ट बाकरें गुरुजींना दिलेले दानपत्र एक -एक ओळ सुटी करुन वाचली की संभाजीराजांचे संपूर्ण व्यक्तीमत्व तपशीलवार डोळ्यासमोर उभे रहाते. ते स्वत: संभाजीमहाराजांनी दिलेले दानपत्र असल्याने ऐतिहासिक दृष्ट्या ते अमुल्य आहे. यामध्ये ते आजोबा शहाजीराजे व वडिल शिवाजी महाराज यांच्या शौर्याची, पराक्रमाची, दानशूरतेची, प्रजाहीतासाठी असलेल्या तळमळीची प्रचंड स्तुती करतात. मात्र शिवराय "वडिलांच्या भूमिकेत कमी पडले" असा सूर एका वाक्यात दिसून येतो. ते सगळं वाचताना पंचपक्वानात कचकन दाताखाली बारिकसा खडा यावा तसं एकक्षण वाटतं, पण संभाजीराजांच्या बाजुचा विचार करता यात मला काहीच वावगे वाटत नाही. मी परत सांगतो जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची. शिवाजी महाराजांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. पण त्यात ते कुटुंबाला वेळ देऊ शकले नाहीत आणि ते शक्यही नव्हतं. अन्यथा स्वराज्य उभं रहातंच ना. पण वडिलांकडून मुलाच्या ज्या अपेक्षा असतात त्यांची अपेक्षा संभाजीराजांनी उमलत्या वयात केली असेल व व्यस्त वेळामुळे महाराज त्या पूर्ण करु शकले नसतील तर संभाजीराजांची घालमेल होणं स्वाभाविक होतं.

वडील - मुलाच्या नात्यातला हा तडा इतरही अनेक थोरा मोठ्यांच्या बाबतीत दिसून येतो. मग ते लोकमान्य टिळक - श्रीधरपंत टिळक असोत अथवा महात्मा गांधी व हरीलाल असोत. लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक भूमिकेत अजिबात पटत नसे. त्याचे पडसाद अगदी केसरी विरुद्ध मूकनायक अश्या स्वरुपातही उमटले. पण लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत हे मात्र बाबासाहेबांचे जीवलग मित्र बनले. बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की बाळ गंगाधर टिळक हे खरे लोकमान्य नव्हेत. तर श्रीधरपंत हेच खरे लोकमान्य. श्रीधरपंत देखिल बाबासाहेबांना इतके जवळचे मानत की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचे पत्र लिहीले ते डॉ आंबेडकरांना. श्रीधरपंतांचं असं जाणं बाबासाहेबांनाही भावनिक पातळीवरती फार हेलावून टाकणारं होतं. तीच गोष्ट गांधीजी व त्यांचा थोरला मुलगा हरीलालची. तुम्ही असाल जगासाठी बापू - महात्मा ... "माझे वडील कुठे आहेत?" हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. व त्यांना तो प्रश्न पडायचे कारण सर्वात मोठा पुत्र असल्याने वडिलांचा आपल्या हातातून सुटत चाललेला हात त्यांनी अनुभवला होता. इंग्लंडला जाऊन वकिलीच्या उच्च शिक्षणाबाबत वडिलांनीच घेतलेली विरोधाची भूमिका ही "स्वातंत्र्यसैनिक" म्हणून घेतलेली होती. तो नकार एक तरुण, काहीतरी करुन स्वत:ला सिद्ध करायला धडपत असणारा "मुलगा" म्हणून हरीलाल यांच्या मनाला लागणं हे आपण समजून घ्यायला हवं. ह्या नात्यांच्या नाजूक गाठी हलक्या हातानेच सोडवाव्या लागतात. दोहोंची भूमिका समजून घ्यावी लागते.

इतिहास हा दरवेळी तलवारींनी खेळलेला - रक्ताळलेला नसतो. त्याला नात्याचेही अत्यंत हळवे पदर असतात. ते हातावर बसलेल्या फुलपाखरागत हळुवार हाताने सांभाळावे लागतात ह्याचं भान आपल्याला यायला हवं. एकदा संभाजीराजांची मनोभूमिका अंशत: अनुभवली तरी संभाजीराजे मुघलांना जाऊन मिळाले ह्यावर पांघरुण घालायची गरज उरत नाही. उलट नंतर त्यांचा त्या सगळ्यातून बाहेर पडून डोळे दिपवून टाकणारा पराक्रम व मृत्यूलाही धीरोदात्तपणे सामोरे जाणारी वीरवृत्ती अजून लखलख करत तेजाळते.

मी काय लिहीलय हे कदाचित काही त्रस्त समंधांना समजणारही नाही. तो त्यांना महापुरुषांचा अपमान, संभाजीराजांना बदनाम वगैरे करण्याचा डाव वाटेल कारण ती लोकं झोपतानाही कंबरेला एक अदृष्य़ तलवार लटकवून झोपतात. ह्याच त्रस्त समंधांपासून इतिहास जपण्याची विनंती करणारा हा लेख. आपले महापुरुष सुद्धा "माणूस" होते "सुपरमॅन" नव्हते. त्यांनाही राग-लोभ-प्रेम-तिरस्कार-भीती-करुणा अश्या सहाजिक मानवी भावना होत्या. त्यांच्या हळव्या भावना आपण समजून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही तर स्वत:ला अनुयायी तरी का म्हणवून घ्यायचे? आपले हट्ट व अवाजवी अपेक्षांचे ओझे इतिहासातील महापुरुषांच्या खांद्यावर टाकणे आपण थांबवायला हवे. एखाद्या मेसेजमध्ये कधीच न घडलेल्या गोष्टी ठोकून देऊन महापुरुषांना मोठे करण्याइतके आपण मोठे झालो नाही ह्याची जाणीव ठेवावी. महापुरुषांनी आधीच इतके करुन ठेवले आहे की त्यांना खोट्या ठिगळांची गरज नाही. त्यामुळे जगातल्या सगळ्याच गोष्टिंची अपेक्षा एकाच व्यक्तीकडून करण्यात काही हशील नाही हे आजकालच्या वैचारीक "सुपरमॅन" असलेल्यांनी समजून अमानवी मेसेज तयार करणे अथवा अजून पुढे दहा जणांना पाठवणे थांबवायला हवे.

अजून काय लिहीणे? सुज्ञ असा!

 - सौरभ वैशंपायन.