Wednesday, January 26, 2011

दे (सु)दान सुटे गिरान
एखादं राष्ट्र स्वतंत्र होणं ही घटना एकुणच इतिहासाला कलाटणी देणारी असते. पण ते स्वातंत्र्य आपल्याच लोकांकडुन देशाच्या फाळणीसकट मिळत असेल तर त्याच्या जखमा फार खोल असतात. फाळणीच्या वेदना भारताला अनोळखी नाहीत पण सुदैवाने भारतात सुंदोपसुंदी माजली नव्हती. सध्या आफ्रिकेतल सर्वात मोठा देश असलेल्या सुदानच्या बाबतीत मात्र तसे नाही. परवा दक्षिण सुदानमधील निवडणूकांची बातमी आली, ही निवडणूक नेहमीची निवडणूक नव्हती तर सुदानच्या एकूणच इतिहासाला बदलणारी होती. गेली चार दशके नागरी युध्दाने पिसल्या गेल्यावर, अनेक लाख नागरीकांचे बळी घेतलेल्या सुंदोपसुंदीनंतर दक्षिण सुदानच्या स्वातंत्र्यासाठी जाहीर बहुमत घेण्याची पश्चातबुध्दी झाली. खरंतर याला पश्चातबुध्दी म्हणावे का? हाच प्रश्न असू शकतो. परीस्थिती हाता बाहेर गेली आहे हे लक्षात आल्यानंतर घेतलेला निर्णय म्हणणं जास्त योग्य राहील.

मुळात याची सुरुवात ब्रिटिशांनी केली असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळि ब्रिटिशांच्या वसाहती आफ्रिकेत पसरल्या होत्याच. आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी ८ रेखांश व १० रेखांश असे सुदानचे नकाशावर अदृष्य विभाजन केले. उत्तर सुदान मधील रहिवाश्यांनी ८ रेखांशाखाली स्थलांतर करायचं नाही, तर दक्षिण सुदान मधील रहिवसी असलेल्यांनी १० रेखांशावर जायचे नाही अशी कायदेशीर तरतूद केली होती. एक हेतु असा कि वैद्यकिय सुविधांअभावी आफ्रिकेत मोठ्याप्रमाणावर सहज पसरणारे मलेरीयासारखे रोग एकिकडून दुसरीकडे पसरु नयेत. दुसरा छुपा हेतु म्हणजे खिश्चन धर्माचा प्रसार करणे. एकूणच आफ्रिका खंडाचा धार्मिक इतिहास बघता साधारण ८ रेखांशाच्या वरती मुस्लिमबहुल तर त्याखाली ख्रिश्चनबहुल भाग दिसून येतो. याची उघड कारणे आहेत ऑटोमन साम्राज्याखाली मुस्लिम धर्माचा प्रसार झाला त्यात उत्तर आफ्रिका देखिल होते. उत्तर - पुर्वेकडे सौदि अरेबिया आहेच. तर खाली दक्षिण आफ्रिकेतुन खिश्चन धर्माचा प्रसार करायला सुरुवात झाली होती. या सगळ्या कारणांमुळे उत्तर सुदान अर्थात विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इजिप्तच्या अंमलाखाली होता. त्यामुळे सामाजिक व धार्मिक दृष्ट्या इतिप्तचा उघड प्रभाव त्यांवर होता. तर दक्षिण सुदानमध्ये ख्रिश्चन व अ‍ॅनिमिस्ट म्हणजे प्राणी/निसर्गपूजक होते.

१९४६ मध्ये ब्रिटिशांनी दक्षिण सुदान मधील नागरीकांचे मत न घेता प्रशासकिय दृष्ट्या आपणच विभागलेले भाग पुन्हा जोडले. यावेळि पहिल्यांना दक्षिण सुदान मधील लोकांत चलबिचल झाली. १ जानेवारी १९५६ रोजी ब्रिटिश व इजिप्तच्या अधिपत्याखालून सुदान स्वतंत्र झाला. मात्र ५३ सालापासून याला गृहकलहाची पार्श्वभूमी तयार झाली होती. ब्रिटिश-इजिप्त स्वातंत्र्य देणार याची कुणकुण ५३ साली लागली होती. येत्या सरकार मध्ये आपल्या योग्य स्थान मिळणार नाही, आणि उत्तर सुदानकडून दडपले जाण्याची स्वाभाविक शंका दक्षिण सुदानमधील लोकांना येऊ लागली. आणि ५५ सालापासूनच सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक संघर्षाला सुरुवात झाली. दक्षिण सुदानी नेत्यांना पकडले जाऊ लागले. यातुन "अन्यान्या" क्रांतीची सुरुवात झाली यात मुख्यत: तरुण विद्यार्थी होते. एकुणच १९५५ ते ७२ हे साधारण दिड दशक प्रचंड उलथापलथीचं होतं. यात २ सैनिकि उठाव, कम्युनिस्ट - कम्युनिजम विरोधी, राष्ट्रवादी विचारवंत असे अनेक प्रवाह बनत होते बिघडत होते.


मात्र तरी दक्षिण सुदानी लोकांना एकत्र घेऊन लढा देणारा कोणी नसल्याने त्यांचे उघड वा छुपे प्रयत्न हाणून पाडले जात होते. अखेर जोसेफ लॅगू यांनी सगळ्या असंतुष्ट घटकांना Southern Sudan Liberation Movement (SSLM) खाली एकत्र आणले. आता एका व्यासपिठावरुन त्यांनी दक्षिण सुदानींची गळचेपी जगासमोर मांडली. अखेर World Council of Churches (WCC) आणि All Africa Conference of Churches (AACC) यांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर करताच जगभरातुन सुदानप्रश्नाकडी लक्ष दिले गेले. अखेर १७ वर्षांनी म्हणजे १९७२ साली साधारण ५ लाख लोकांचा बळि घेऊन हे पहिलं गृहयुध्द थांबलं. आदिस अबाबा येथे झालेल्या करारात भौगोलिक दृष्ट्या एक, मात्र प्रशासकिय दृष्ट्या उत्तर सुदान - दक्षिण सुदान असे विभाजन केले गेले.

१९८३ पर्यंत गाडा नीट हाकला गेला. मात्र ८३ मध्ये दुसर्‍या गृहयुध्दाची ठिणगी पडली. आणि या ठिणगी पडण्याचे व भडक उडण्याचे मुख्य कारण ठरले "तेल". तेलाने भडका उडण्याचे प्रकार नविन नाहीत. १९७३ साली सौदि अरेबिया व ओपेक राष्ट्रांनी अमेरीका व कंपू विरुध्द उगारलेल्या तेलास्त्राने एकुणच जगाचे डोळे कसे पांढरे झाले होते? हा मोजून ३५-४० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. मात्र तेलासाठी देशांर्तगत यादवी माजण्याचा प्रकार बहुदा सुदानमध्येच झाला असावा. बेन्ट्यू, दक्षिण कोर्डोफान, निळ्या नाईलच्या उत्तरेतील खोरे इथे मोठ्या प्रमाणावर तेलसाठ सापडले होते. राष्ट्राध्यक्ष गफार निमैरी यांनी या तेलाच्या विहिरी शासकिय  कारणांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळि त्यांनी सुदान हे मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित केले. या दोन्हि कारणांनी दक्षिण सुदानी चिडले. नैसर्गिक साधन संपत्तीवर उत्तर सुदानी हक्क सांगु लागले होतेच वरुन देशावर धार्मिक शिक्का मारण्याचा प्रयत्न त्यांनी झिडकारुन लावला. १९९१ साली तर उघड युध्दच सुरु झाले.


या संघर्षात भरडले गेले सामान्य नागरीक. जबरदस्ती सैन्य भरती, विस्थापितांचे हाल, स्त्रीया - मुलांना गुलाम म्हणून दिली जाणारी वागणूक, त्यातूनच केनिया, इथिओपिया, युगांडा, चांड यांचा पाठिंबा याने गोंधळात भर पडली. ९१ सालीच गल्फ वॉर सुरु झाल्यावर सद्दाम हुसेन यांनी सुदानच्या सरकारला पाठिंबा दर्शवताच आपोआप अमेरीकेचे मन कलुषित झाले. त्यांनी आपल्या तेल कंपन्यांना इथे गुंतवणूक न करण्याविषयी बजावले. त्याने तेल असून देखिल आर्थिक परीस्थती बिकट होत गेली. आफ्रिकेतील या सर्वात जास्त लांबल्या गेलेल्या गृहयुध्दाने वीस लाख बळी घेऊन मगच ढेकर दिली. २००५ साली पुन्हा गृहयुध्द थांबले. मात्र आता संशयाची दरी अधिकच रुंदावली होती. धार्मिक रस्सीखेचित देश मनाने दुभंगला होताच. त्यात नैसर्गिक साधनांची पाचर अजून खोल घुसली. सुदानचं दु:खच वेगळं आहे. आत्यंतिक गरिबी, क्रुरता, भुक, रोगराई, कुपोषण यांना अंत नाहि. त्यात दुष्काळात तेरावा महिना असावा तसे अनेक दशके चाललेली यादवी. या सगळ्यात कळस म्हणजे दरफर प्रांतातला अरब - अरबेतर लोकांतला वर्णवादी आणि वंशवादि टोकाचा जीवघेणा संघर्ष.

अखेर ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०११ म्हणजे गेल्याच आठवड्यात संपूर्ण दक्षिण सुदानमध्ये सार्वमत घेण्यात आले. प्रश्न एकच सुदानचा हिस्सा बनुन रहायचे कि स्वतंत्र व्हायचे. एकुण ८३% लोकांनी मतदान केले व त्यातील ९८.३% लोकांनी स्वतंत्र व्हावे असे मत दिले. निर्णय घेण्यासाठी किमान ६०% बहुमत ठरले होते. एकुण रागरंग बघुन सुदानच्या राष्ट्रध्यक्षांनी "जबरदस्तीने एकता निर्माण करता येत नाही. आम्ही दक्षिण सुदानच्या लोकांच्या मताचा आदर करतो!" हे जाहीरपणे मान्य केले.

मात्र हा सगळा प्रवास ९ जुलै २०११ रोजी पूर्ण होईल. ९ जुलै २०११ या दिवशी एक देश म्हणून दक्षिण सुदान  जुबा या जगातील सर्वात नव्या राजधानीसकट जगाच्या नकाशावर येईल. या मधल्या सहा महिन्यात. उत्तर सुदान व दक्षिण सुदान यांच्यात सुरक्षा, नैसर्गिक साधनसंप्पत्तीची वाटणी, जोवर इंधन सामग्रीची दुसरी सोय होत नाही तोवर दक्षिण सुदानकडून तेलाचा पुरेसा पुरवठा, दक्षिणोत्तर दोहो दिशांना वाहणार्‍या विस्थापितांचे लोंढे, त्यांचे नागरीकत्व, सीमेवरील अरब - अरबेतर लोकं यांच्यातील तंटे सोडवणं, ९ जुलै नंतर दक्षिण सुदानमध्ये होणार्‍या निवडणूका या सगळ्यात जाणार आहेत.

एखादा देश अनेक दशके अंतर्गत यादवीने पिळुन - होरपळुन निघाल्यावर तो देश उभा करणे हे आव्हान असते. पुढली किमान दोन - तीन दशके व साधारण दोन पिढ्या या नव्या देशाची घडी बसवण्यात जातील. सध्याचा फाळणी झालेला नकाशा बघता फाळणीचा तोटा दोहोंना झालाय. निळ्या नाईलमुळे तयार झालेली उपजाऊ जमिन, तेलसंप्पन भाग अशी नैसर्गिक साधन संप्पत्ती दक्षिण सुदानकडे तर व्यापारी दृष्ट्या महत्वाची असलेली रेड सी मधील बंदरे उत्तर सुदानकडे अशी वाटणी झाली आहे. म्हणजे भारताची फाळणी झाल्यावर ताग उत्पादन करणारी शेते बांगलादेशात तर त्यावर प्रक्रिया करण्याचे कारखाने कोलकत्यात अशी विचित्र परीस्थिती निर्माण झाली होती तसेच काहिसे हे म्हणता येईल. बंदरांची व्यवस्था नसली कि व्यापारात किती त्रास होतो? किती रोजगारांची मारामार होते? त्यातुन अनेक दशकांच्या सामाजिक व आर्थिक अस्थिरतेनंतर नव्याने सुरुवात करणार्‍या देशाचे काय हाल होऊ शकतात? याचे दुसरे उदाहरण म्हणजे अफगाणिस्थान. ९ जुलै रोजी दक्षिण सुदान स्वतंत्र होतोय. सुदानमध्ये दुसर्‍या यादवीत झालेली मनुष्यहानी ही दुसर्‍या महायुध्दानंतरची जगातील सर्वात मोठी मनुष्यहानी म्हणता येईल. ही सगळी पार्श्वभूमी बघता देव करो आणि आता तिथल्या लोकांना, येणार्‍या नविन पिढ्यांना सुखाचे दिवस बघायला मिळोत. पुढल्या सहा महिन्यात कुठलाही नवा बखेडा उभा न रहाता हे "सु - दान" दक्षिण सुदानच्या यादवीने चिंध्या झालेल्या फाटक्या झोळित एकदाचे सुखनैव पडो अशी सदिच्छा.


दक्षिण सुदानी लोकांच्या नशिबी आजवर लागलेल्या ग्रहणासाठी आपण एकच प्रार्थना करु शकतो - दे (सु)दान सुटे गिरान!

- सौरभ वैशंपायन.

Monday, January 24, 2011

युगांतचार युगं उलटली कि ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. मग पुराणात एक युग म्हणजे किती दिवस वगैरे गणितं मांडली आहेत. मर्त्य लोकांसाठी ब्रह्मदेवाचं युग बघणं ते जगणं शक्य नसतं, पण आपल्याच आसपास काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांचं आयुष्य एक "युग" बनलेलं असतं. त्या व्यक्ती बरोबर ते "युग" संपतं. सकाळि पंडितजींच्या निधनाची बातमी आली आणि अजून एक "युग" संपलं याची जाणीव झाली.

समाजात काही मोठी माणसं अशी असतात कि त्या व्यक्तींशी कदाचित कधी भेट झाली नसते, त्यांच्या बरोबर कधी ओळख किंवा प्रत्यक्ष संबध आलेला नसतो. पण भावनिक दृष्ट्या ती व्यक्ती तिथे असणं आपल्याकरता समाधानचं असतं.  समाजासाठी त्या व्यक्तीने बरच काही दिलं असतं ..... देत असते. हि माणसं एक एक करुन आपल्यातून निघून जातात, ती जागा कायमची रिकामी होते. अगदी टिपिकल श्रध्दांजली टाईप "पोकळी" वगैरे नाही म्हणणार मी, पण ती रीकामी जागा दुसरं कोणी नाही घेऊ शकत हे सुध्दा तितकच खरं.

ह्या माणसांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या क्षेत्रातले आणि एकुणच समाजामधले भरपुर चढ उतार बघितले असतात, बर्‍याचदा त्या चढ उतारांचे कारणच ती व्यक्ती बनुन जाते. त्यांनी स्वत: नवी कलाकृती किंवा नवे आदर्श उभे केले असतात. सृजनाची उर्मी - त्याचा अर्थ लोकांना समजावलेला असतो. समाज बांधणीत आपला वाटा दिलेला असतो. त्यांचे बोट धरुन समाज, नवीन पिढी युगांतरातुन जात असते. त्यांना एखादा पुरस्कार मिळाला कि आपल्याला आपल्या घरातील कोणाचा तरी सन्मान झाल्यासारखा वाटतो. अशी माणसं गेल्यावर मग अनेक दिवस हुरहुर लागुन रहाते.

पंडितजी गेले ..... भारताने आज खर्‍या अर्थाने एक "रत्न" गमावले. अशी माणसं देव आपल्याला देतो त्याबद्दल त्याचे धन्यवाद द्यावेत, कि त्यांना परत बोलावुन घेतो त्याबद्दल त्याच्याशी भांडावं? हे समजत नाही. पु. लं., बाबुजी किंवा बाबा आमटे गेल्यावर आतून जितकं रिकामं रिकामं वाटलं होतं तितकच आज परत वाटतंय.

पंडितजींच्या गाण्याला "वन्स मोअर" देता यायचा, तसा त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच "वन्स मोअर" देता आला असता तर किती बरं झालं असतं?? पण प्रत्येक रंगलेल्या मैफिलीला आणि आयुष्याला भैरवी असते हेच वास्तव आहे. आत्ता राहुन राहुन पंडितजींची "बोले ना वो हमसे पिया" हीच भैरवी आत कुठेतरी रेंगाळतेय.

 - सौरभ वैशंपायन.

Thursday, January 20, 2011

राजगडच्या सदरेवरुन

२०११ च्या पहील्याच पंधरवड्यात अनायसे राजगडची वारी झाली. आदल्याच दिवशी - १४ जानेवारीला पानिपताच्या घटनेला २५० वर्ष पूर्ण झाली होती. पानिपतावर किमान लाखभर बांगड्या फुटल्या. राष्ट्रावरचं संकट स्वत:च्या छातीवर घ्यायची संथा मराठ्यांना ज्या महामानवाकडून मिळाली होती त्याच्या पहील्या राजधानीला भेट देणं ही अर्थात समाधानाची बाब होती.

बालकाच्या जन्मानंतर त्याची कुंडली मांडली जाते, त्यात पुढे त्या बालकाच्या आयुष्यातल्या चढ - उतारांचे आखाडे मांडले असतात. तसेच महाराष्ट्र आणि अफगाणिस्थान पानिपतावर समोरासमोर उभे ठाकण्याचे भविष्य जिथे लिहिले होते त्या किल्यावर उभं राहून इतिहासाकडे नव्या दृष्टिने पहाणं बरच काही शिकवणारं होतं. पानिपताचा इतिहास बघता आपल्याला औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत मागे जावं लागतं. कारण मराठ्यांची ताकद त्या दिवसांनंतर कशी दिसामासाने वाढत गेली हा मोठा रंजक इतिहास आहे. पण औरंगजेबाचा मृत्यु म्हणताना आपल्याला एक समांतर विचार करावा लागतो - असं काय होतं या मातीत कि देशभर जुलमी वरवंटे फिरवणारे सुलतान - बुतशिकन गाजी इथे कायमचे गाडले गेले? त्याचे कारण स्वातंत्र्याची ओढ, स्वातंत्रप्रियता ही महाराष्ट्राची आंगिक प्रवृत्ती आहे. शहाजीराजांनी ३ वेळा स्वराज्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यातल्या पहिल्याच प्रयत्नात मिळालेले गड म्हणजे तोरणा व राजगड.राजगडचा इतिहास किमान इसवीसन १२०० सालपर्यंत नक्किच मागे जातो. १२१३ मध्ये देवगीरीस सिंहण यादव राज्य करित होता. त्याने कोल्हापूर जवळिल पर्णालपर्वतावर म्हणजे पन्हाळ्यावर राजधानी असलेल्या राजा भोज शिलाहारांचा मोड केला. यादवांच्या शिलालेखात "पर्णालपर्वतावरील भोजरुपी सर्पाला हाकलून लावणारा गरुड" अशी पदवी सिंहणराजाला दिलेली आढळते. अर्थात पन्हाळ्याकडे जाताना तो मधला प्रदेश जिंकत गेला. त्यावेळि आपल्या सैन्याची पिछाडि सांभाळायचे काम त्याने मावळांतील चोरघे घराण्याला सोपवले. चोरघे याचा अर्थ पिछाडि राखणारा असा होतो (या खेरीज सैन्याच्या पिछाडिला "चंदावर" असाही शब्द आहे, बहुदा त्यावरुनच "चंदावरकर" हे आडनाव आले असावे). त्यांच्या जमावाला "गुंज" म्हणतात. तसेच "वणी" म्हणजे मारा करणारा. जमावाने मारा करतात त्यांचे वसतीस्थळ म्हणजे गुंजवणी. याच नावाची नदी राजगडच्या जवळुन वहाते. पुढे चोरघ्यांनी आपले ठाणे बिरमगीरीवरती हलवले. म्हणजेच राजगडवर. या डोंगराचे मुळ नाव - ब्रह्मदेवाचा डोंगर. पुढे अपभ्रंश होत होत त्याचे बिरमदेवाचा डोंगर, मुरुमदेवाचा डोंगर, मुरुंबदेवाचा डोंगर अशी नावे बदलत गेली. गडावरती पद्मावती देवीचे मंदीर आहे, ती ब्रह्मदेवाची पत्नी. राजगडाला अनेक नावे मिळत गेली  - बिरमदेवगड, मुरबदेव, मुरुमदेव, मुरुंबदेव, राजगड, मुसलदेव, मूरबगर, मुरंबाद, राजगिरी, नबीशाहगड, शहामृग पर्वत, दुरजादेवीचा डोंगर, मुर्‍हारजगड, राजनग, मुद्रोदेव.

चोरघे घराणे इथला महसूल गोळा करुन देवगीरीस पाठवत, पण दरवर्षी इतक्या दूर महसूल पोहोचवणे कठिण होते, म्हणुन ५ - १० वर्षातून एकदा तो महसूल पाठवत. तोवर जमलेल्या पैश्यांचे (पद्मटंक नामक नाणी) हंडे, अथवा सोन्याच्या लडिंचे हंडे गुप्तपणे सुरक्षित ठिकाणी लपवुन ठेवत. अशी भांडि चोरघ्यांनी गुंजवण दरवाज्याचा उंबरठ्यात पुरली होती. किल्ले बिरमदेवाचा गुंजण महादरवाजा त्याने बांधला तेव्हा महाद्वारावरील "गजलक्ष्मीचे" शिल्प त्यानेच बसवले. या दरम्यान जर एखादे परचक्र आले व त्या घराण्यातील कर्ती व्यक्ती मारली गेली अथवा परागंदा झाली तर त्या गुप्तधनाची माहिती नाहीशी होई. असंच काहीसं झालं १२९५ मध्ये.(पुढे महाराजांना राजगडाच्या तटबंदिची नव्याने बांधणी करताना जे धन मिळाले किंवा तोरण्यावर जे हंडे मिळाले ते असेच काहीसे असावे.) दिल्लीहून अल्लाउद्दिन खिलजी देवगिरीवर चालून आला. पुढे १३१८ पर्यंत यादव - खिलजी युध्दे होत राहिली. त्यात चोरघे कुल यादवांकडुन लढले. या खेरीज मुरंजन, तोरणा इथल्या परीसरातले देशमुख देखिल तेथे लढले. यादवांच्या पराभवाबरोबर यांचे दिवस फिरले. काही युध्दात संपले काहि देशोधडिला लागले.

अर्थात यादवांच्या र्‍हासाबरोबर त्यांच्या अधिपत्याखालील जमीन - किल्ले खिलजींकडे आले. पुढे दिल्लीतील व दख्खनेतील सत्तापालटांच्या क्रमात तुघलक, बहामनी अश्या सुलतानांच्याकडे तो हस्तांतरीत होत गेला. पुढे १४९० नंतर बहमनी वजीर अहमद याने शिवनेरी, जोंड, लोहगड, तुंग, तिकोना, कोंडाणा, पुरंदर, भोरप, जुधान, खाज, खेरदुर्ग, तुंगी, तरोणी, महोली, पालीचा किल्ला,राजापुरी यांच्या बरोबरच मराबदेव उर्फ मुरुंबदेवाचा किल्ला जिंकला. चोरघ्यांची उरली सुरली मालमत्ता खंडणी म्हणून जप्त झाली. व किल्ले मुरुंबदेव बेवसाऊ झाला. पुढे बहामनी सत्तेची पाच छकले झाली. त्यातल्या निजामशाही व आदिलशाहीकडे हा किल्ला नाममात्र का होईना पण आलटुन पालटुन जिंकला जात होता. चित्रे शकावलीत रागडाचा उल्लेख "शहामृग पर्वत" असा केला आहे. त्याच्या मागचा इतिहास असा कि विजयनगरच्या सम्राटाचा चार पातशाह्यांनी राक्षस - तागडि अथवा तालिकोट येथील युध्दात पराभव केला त्याची आठवण म्हणून हुसेन निजामशहाने त्याच्या व आदिलशाहिच्या हद्दिवरती असलेल्या मुरुंबदेवावर एक शिल्प बसवले - एका हरीणाच्या अंगावर दोन वाघ आपले पंजे गाडुन उभे आहेत असे ते चित्र आहे. यातल्या मृग म्हणाजे विजयनगर सत्ता व त्यावरील ते दोन वाघ म्हणजे "शहा" म्हणून तो "शहा-मृग" पर्वत.

१६१६ नंतर निजामशहाने इथली जहागिरी शिलिंबकरांना दिली. हे मुळचे वाई जवळचे घराणे होते. दुसरी गोष्ट म्हणजे हे शिलिमकर (मुळचे शिळिंबकर) चंद्रराव मोर्‍याचे मातुल घराणे. निजामशाहीच्या पडत्या काळात नाईलाज झाल्याने त्यांनी मुरुमदेव किल्ला खाली केला असल्याचा उल्लेख मिळतो. मात्र त्याच्याच थोडे आधी शहाजीराजांचे सेवक सोनजी म्हणजेच सोनोपंत डबीर मुरुमदेव येथे आश्रय करत असता आदिलशाही आक्रमण आले त्यात ते जखमी झाले. म्हणजेच शहाजीराजांनी बेवसाऊ असलेल्या मुरुंबदेवाला आपल्या ताब्यात घेतले होते.

गुंजवण्याशी संबधीत गोष्ट दादोजी कोंडदेवांच्या २ निवाड्याशी संबधीत आहे. गुंजण मावळाच्या देशमुखीवर शिंदे, शिलिमकर, चोरघे, कोंडे अशी घराणी हक्क सांगु लागली. यातले चोरघे शिरजोर होते ते इतरांना दडपत. एका कागदपत्रात "तो दादाजी कोंडदेव यांनी रामजी चोरघा जीवे मारीला" असा उल्लेख आहे. तो याच कारणाने. पुढे याच गुंजाण्याच्या देशमुखीशी संबधित निवाड्यात देशमुखी अर्धी अर्धी देतो असे सांगुन दादोजींनी प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला होता मात्र फुलाजी (शिंदे घराणे) ऐकायला तयार नव्हता त्याने गडबड करणे चालूच ठेवले, अखेर "त्यावरुन दादोजीपंतांनी सिलीमकर याचे अगत्य धरुन फुलाजीस नेऊन बासाचा मार देऊन जीवे मारीले ..."

८ एप्रिल १६३३ पर्यंत शहाजीराजांकडे मुरुंबदेवाचा अंमल निजामशाही कडून होता. मात्र १६३४ च्या दरम्यान तो आदिशहाकडे गेला असावा. या शिवाय २० फेब्रुवारी १६३५ मधल्या एका कागदावरुन खेळोजी भोसले हे देखिल आदिलशाही कडून इथे अंमल राखुन होते. बहुदा याच सालात बाजी घोरपडे याने इथे एक छोटि स्वारी करुन दहशत वसवली आणि शिलिमकरांच्या गुंजवण देशमुखीचे चार हिस्से करुन ते ३ भावांत वाटले. तसे बघता १६२५ ते १६३६ हा कालखंड शहाजीराजांसाठी धावपळिचा व निजामशाही - आदिलशाही - मोंगल यांच्याकडे आलटून पालटून येण्याजाण्यात गेला. अखेरीस ते आदिलशहाकडे गेले व त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली. इंदापूर, सुपे, चाकण ही जहागिरी नंतर मिळाली.

राजगड गुंजवण मावळांत वसलेला आहे. गुंजवणी नदिच्या खोर्‍यातील भाग उत्तरेस कानद खोरे, इशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, अग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैऋत्य व पश्चिमेस कोकण, वायव्येस मोसे खोरे असा वेढलेला आहे. त्यावेळि गुंजवण मावळांत ८१ गावे होती. पुण्याच्या आजुबाजूला एकुण १२ मावळ होती. पैकि गुंजवणची माहिती घेतलीच आहे उरलेली अकरा - अंदर, नाणे, पवन, घोटण, मोसे, मुठे, वेळवंड, कर्यात, हिरडस, शिवरळ व जुने मावळ अशी होती. दादोजींनी साम - दाम - दंड - भेद वापरुन यातील बहुतेक वतनदारांना, देशमुखांना शरण आणले. त्यातील कान्होजी जेधे हे मातब्बर होत. ते आणि बाजी पासलकर दादोजींबरोबर स्वराज्याच्या बांधणीला उभे राहीले. पुंडावा करणार्‍यांना या तिघांनी वचक बसवला. वारंवार नीट अथवा धाकाने न ऐकणार्‍या देशमुखाचा चौरंग करण्यात येई - कृष्णाजी बांदल हे मुख्य उदाहरण. ही घटना घडल्यावर हळु हळू आजूबाजूच्या मावळातील - झुंजारराव, शिळमकर, कोंडे देशमुख, पायगुडे देशमुख हे दादोजींना आपणहुन येऊन मिळाले.

पुंडावा मोडुन शांतता निर्माण झाल्यावर आता किल्ले ताब्यात असणे महत्वाचे होते. शिवरायांच्या नावे दादोजींनी शहामृग म्हणजेच राजगड हा किल्ला १६४० - ४१ मध्ये घेतला असावा. चित्रे शकावली म्हणते - शके १५६४ चित्रभानू नाम संवत्सरे सन सलास आर्बैन आलफ सन १०५२ मावळाचे सरदेत (सरहद्दित) शाहमृग पर्वत होता तेथे शिवाजी महाराजे याणी ठाणे घालोन इमारत केली, आणि राजगड नाव ठेविले." म्हणजे तोरण्याच्याही आधी राजगड स्वराज्यात आला होता असे म्हणता येते. १६४० -४१ म्हणजे शिवाजीराजे ११ वर्षांचे असावेत. शिवाय बंगरुळात जाण्या आधी हा बेवसाऊ गड दादोजींनी शिवबाराजांच्या ताब्यात आणला असावा. याच्याच आसपास दादोजींनी ढमाले देशमुखांकडुन कुवारीगड देखिल घेतला असावा.

एकदम उघड स्वराज्याची घोषणा अथवा हालचाल शक्य नसल्याने शिवाजी राजे व दादोजींची पाऊले जपून पडत होती. बंगरुळाहुन येताना शहाजीराजांशी जिजाऊसाहेब - शिवबाराजे व दादोजींनी मंत्रणा केलीच असणार. त्याबरहुकुम परत आल्यावर २५ मे १६४२ च्या एका फर्मानावरुन रोहीरेश्वराचा पुजारी बदलण्याचा आदेश शिवबाराजांनी दिलेला होता. आदिलशहाला हे समजताच त्याचे उत्तर देण्यासाठी बाबाजे नरसप्रभूंना त्यांनी विजापुरास बोलावले, पण ते गेले नसावेत. कार्य पुढे चालून राहिले.

याच दरम्यान तिथे रणदुल्लाखान मरण पावला. व शहाजीराजांचा पक्ष दुर्बळ झाला. आदिलशहा बरोबर खटके उडु लागले व अफझलखान, घोरपडे यांनी आगीत तेल ओतायला सुरुवात केली. आदिलशहाने दुषितमनाने शहाजीराजांना आपली जमात हजर करण्याचे हूकूम केले. पण शहाजीराजांनी त्याला टाळाटाळ केली व ते कर्नाटकातुन निघोन गेले (बहुदा ते पुण्यास आले असावेत) त्यांनी एक वकिल आदिलशहाकडे पाठविला त्याचा हात आदिलशहाने कलम केला. प्रकरण पेटले. आता संघर्ष उघड होता. शरण वा लढुन मरण .... स्वाभिमानी शहाजीराजांनी दुसरा मार्ग स्वीकारला.शहाजीराजां बरोबरच, सय्यद रेहान व सैय्यद याकूत यांनीहि आदिलशाहीला सोडले असे दिसते. आदिलशहा चिडला ७ जमादिलावर हि.१०५४ म्हणजे १ ऑगस्ट १६४४ रोजी एक फर्मान पाठवले - "ज्याअर्थी शहाजी भोसले दरबारातून निर्वासित व अपमानित झाला आहे व त्याचा मुतालिक दादाजि कोंडदेव कोम्डाण्याचे बाजूस आह, दफे करण्यासाठी व ती विलायत ताब्यात आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे (कापशीकर)यांस तुमच्यासह नेमले आहे. तरी तुम्हि आपल्य हशमांसह मशारनिल्हेजवळ जाऊन त्यांच्या संमतीने दादाजी कोंडदेव व त्या हरामखोराचे संबधी शिक्षा देऊन नोस्तनाबुद करा व ती विलायत ताब्यात आणा. ते तुमच्या उत्कर्षाचे कारण आहे.

हे फर्मान मिळताच खंडोजी व बाजी घोरपडे पुण्याकडे निघाले. महाराजांचे व १४ असावे. एकदम संघर्ष उडुन नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी बहुदा पुणे परगणा सोडून दिला. घोरपड्यांनी त्याचा कारभार त्रिंबकजी राजेंना दिला. दादोजी व शिवराय रोहिरेश्वर डोंगराच्या आश्रयाला आले. हाच तो प्रसंग जेव्हा त्यांनी रायरे्श्वरासमोर स्वराज्य निर्मी्तीची शपथ घेतली. त्याला दैवी अनुष्ठान होते.

नरसप्रभुंनी महसुलाचा भरणा विजापूरला न करता शिवाजी महाराजांना करायला सुरुवात केली हे बघुन विजापूरहुन त्यांना एक दमदाटिचे फर्मान आले - "तुझे खोरीयात रोहिरेश्वराचे डोंगराचे असराण पुडावियाने (शिवराय) मावळे वगैरे लोक जमा केला आणि तेथुन जाऊन पेशजी किल्यावरील ठाणे उडवुन आपण किल्यात शिरला. हाली राजगड किल्ला नाव करुन बळकाविला ..... तरी ठाणे मजकुरी आमीनासी रुजु रहाणे आणि तनखा साहकरोन देणे हे न जालीयास खुदावंत तुला विजापुरी नेऊन गरदन मारतील." नरसप्रभू अर्थात घाबरले मात्र शिवरायांनी त्यांची अमजूत घालुन अभय दिले.

अखेर शेवटचा उपाय म्हणुन आदिलशहाने सगळ्या प्रकरणाची चौकशी केली व त्यात त्याला आढळून आले कि शहाजी राजांनी फितुरी केल्याचा आरोप खोटा आहे, व मुस्तफाखान त्यास जबाबदार आहे. त्याने मुस्तफाखानाला कैद करुन सातार्‍याच्या किल्यावर महिनाभर ठेवले. शहाजीराजांना बंगरुळची जहागि्री व ५ लाखांची जहागिरी परत मिळाली. १६४५ च्या आसपास हि दिलजमाई झाली असावी. नरसप्रभूंनाही "दिवाणातून हरगीज इजा होणार नाही" असे अभय असणारे दुसरे पत्र आले.

आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटक मोहिमेवर पाठवले महाराजांनी ९ किल्ले जिंकुन दिल्याने आता तर आदिलशहाचे मन परत साफ झाले. व त्याच्यामुळे दादोजी कोंडदेवांना पुन्हा पुण्याचा कारभार सोपवला गेला. महाराजांच्या ताब्यातील रोहिडा, राजगड, तोरणा हे देखिल तसे राहु दिले.

इथुन शेवटपर्यंत राजगड महाराजांकडेच राहीला. राजगड महाराजांच्या राजधानीचा गड झाला एक दोन नव्हे चांगली उमेदिची चोविस वर्ष महाराजांनी राजगडावरुन सुत्रे हलवली. बर्‍याचदा राजगड - गुंजवण्याशी संबधीत हा सुरुवातीचा इतिहास आपल्याला माहित नसतो. या प्रकरणानंतर दोन वर्षातच दादोजी निवर्तले. दादोजी निवर्तले म्हणजे कोंडाण्यावर नविन किल्लेदार नियुक्त होणार होता. इतकी वर्ष कोंडाण्याचा जो आधार होता तोच मोडला, पण महाराजांनी स्वस्थ बसणे पसंत केले कारण अजून स्वराज्याला बळकटी आली नव्हती. किल्ले मजबुत करणे भाग होते. शिवदिग्विजय बखर या कालाबाबत म्हणते - "मनुष्यांचा बचाव होऊन राज्यसाधन कोणत्याप्रकारे करावे? मनुष्ये आपल्यास कशी मिळतील? हा विचार पाहता किल्ले - कोट प्रथम घ्यावेत. मग प्रांत घ्यावा. किल्ल्याचे आश्रय करुन प्रांत घेण्यास आयास लागणार नाहित ..... हे सर्वतोपरी उत्तम विचार ठरवुन राजगडाचे राजकारण करुन आपण खासाजातीने सरंजाम मावळे लोक घेऊन जाऊन किल्ल सर केला. ती जागा पुण्याचे लगत्यास, बिलंद बाकि, चांगली जाणून किल्याचे पहाडास तीन सोंडा होत्या. त्या नव्या बांधल्या त्यांचे नावे पद्मवती, सुवेळा व संजिवनी अश ठेवली. इमारतीचे कामावर मोरो त्रिंबक पिंगळे ठेविले."


राजगडाचे बांधकाम बघितले कि छाती दडपते. शिवाय दुर्ग बांधणीत महाराज व त्यांचे सहकारी किती दुरदर्शी होते हे समजते. राजगडसारखा किल्ला नाही. राजगडासारखा बालेकिल्ला नाही. राजगडाच्या डोंगराच्या सोंडा फार दूरवर पसरल्या आहेत पण सुरक्षेच्या दृष्टिने जितक्या महत्वाच्या तितक्या बांधून घेतल्या आहेत. राजगड बांधताना अतिशय बारीक सारीक गोष्टिंचा विचार केला आहे. पुढे लिहिल्या गेलेल्या आज्ञापत्रातील विचार स्वराज्याच्या सुरुवातीपासूनच केला असल्याचे लक्षात येते. आज्ञापत्रातील काही वाक्ये याचे प्रमाण देतात. मुळात दुर्गांना किती महत्व होते ह्यावर आज्ञापत्रात म्हंटले आहे - "ज्यांस राज्य पाहिजे त्यांणी गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण."  जिथे जिथे तटांवर तोफांचा जास्त मारा होऊ शकतो तिथे तिथे दुहेरी तटबंदि बांधून घेतली आहे. हे बांधकाम दृष्ट लागण्यागत आहे. एकदा तटबंदिला नजर लगटली कि तटबंदिच्या वळाणांबरहूकुम ती शेवटपर्यंत सरकत जाते. राजगडाच्या तटाबंदिला कित्येक हजार टन दगड लागला आहे, तो कुठुन उत्पन्न केला हे कळायला सध्या मार्ग नाही. कारण पद्मावती तलावातुन किंवा इतर टाक्यांना फोडुन/खणून  इतका दगड नक्किच निघाला नसेल. तो दगड गडाखालून दूरुन आणत असावेत असे मानायला २ पत्रे उपयोगाची आहेत एक खुद्द शिवरायांचे पत्र १६६१ मधील आहे व दुसरे जेधे नामक सरदारांचे कोकणातील एका पाटलाला लिहिलेले आहे. दोन्हीचा आशय एकच आहे कि आज्ञा मानली नाहि तर राजगडाच्या कामात धोंडे वहायचे काम करावे लागेल. म्हणजे एकतर हा दगड खालून वरती आणत असावेत व शिक्षा म्हणुन गुन्हेगाराला राजगडावरील बांधकामात धोंडे वहावे लागत. तिसरी गोष्ट - १६६१ पर्यंत कदाचित राजगडाचे काम पूर्ण तरी झाले नव्हते किंवा वार्षिक डागडुजीचे काम असावे.


राजगडचा बालेकिल्ला दुसरी महत्वाची बाब. दोन्हि हात समोरच्या खोबण्यात आधाराला लावल्या खेरीज राजगडच्या बालेकिल्ल्यावर जाणे स्वप्नातही शक्य नाही. एक चूक मागच्या दरीत घेऊन जाऊ शकते. सध्या लोखंडि कठडे लावुन हा मार्ग तुलनेने खूपच सोप्पा केलाय पण त्याकाळि वरती पुरेसा धान्यसाठा, पाणी व शस्त्रे असली तर एकटा बालेकिल्ला सहज अनेक महिने लढवता येऊ शकेल असा आहे. बालेकिल्ल्याच्या वाटेचे रक्षण करायला धनुष्यबाण अथवा भाला घेऊन बसलेली एक - दोन माणसे देखिल पुरे पडू शकतील. एकावेळि एकच माणूस बालेकिल्याची वाट चढू अथवा उतरु शकतो. शिवाय हि वाट २ ठिकाणी नागमोडि वळते. दोन्हि वळाणे वरच्या महादरवाजाच्या टप्प्यात आहेत. हि दोन्हि वळणे पार केली कि येतो तो बालेकिल्याचा महादरवाजा. समोरच जननी देवीचे मंदिर आहे. बाजूला कोनांमधले भक्कम बुरुज आहेत. पायर्‍या चढून माग वळलो कि दूरवर नागिणीसारखी पसरलेली सुरेख सुवेळा माची दिसते. बालेकिल्यावरुन पूर्वेला सिंहगड, पुरंदर तर पश्चिमेला तोरणा व वातावरण साफ असेल अगदि रायगड सुध्दा दिसतो. दक्षिणेला रोहीडा, रायरेश्वर, महाबळेश्वर दिसू शकतात. इथुन लोहगड, तुंग, तिकोना देखिल दिसतात म्हणे पण त्यासाठी सह्याद्रि वेड्यागत भटकून किल्यांच्या स्कायलाईनची दिसताक्षणी ओळखणारी सरावलेली नजर हवी.महाराजांनी स्वराज्यावर आलेल्या पहिल्या संकटापासून ते आग्रास्वारीपर्यंतच्या हालचाली या राजगडावरुन केल्या. सगळ्यात ते जीवावरच्या संकटातुन सुदैवाने सहिसलामत वाचले. एखादी वास्तू लाभते असे म्हणतात ते कदाचित असे काहीसे असावे. तरीही मग महाराजांनी राजधानी रायगडला का हलवली? हा प्रश्न स्वाभाविक रित्या पडतो. त्याबाबत शिवदिग्विजय प्रकश टाकते. शिवराय आग्र्याहुन सुटुन आले, काही महिन्यांनी मथुरेत गुप्तपणे राहणारे शंभूराजे देखिल सुखरुप राजगडि पोहोचले. या आनंदाच्या घटनेप्रित्यर्थ जिजाऊ साहेबांनी मेजवानी देण्याचे ठरविले काही महिन्यांनी राजकारणातून फुरसत मिळताच त्यांनी मेजवानीचा बेत केला. बारा मावळातल्या तालेवार देशमुखांना राजगडावर बोलावले शिवदिग्विजयबखर सांगते - "ते समयी कारभारी यांणी मोठा चवरंग होता, त्याजवरी कचेरीत गादी ठेवुन जागा उंच करविली. नंतर दुतर्फा मंडळी बसली त्यांत मोहीते, महाडिक, शिर्के, निंबाळकर, घाटगे, जाधव आदीकरुन जमा झाले होते. त्याणी महाराजांची जागा उंच करुन गादि घातली हे पाहून इर्षा वाटली की, आता आंम्हा मराठ्यांस सभ्य थोर, मोठेपणा शिवाजीराजे यांजकडे आला. आम्ही कदिम तालेवार, राजे, मोर्चेलाचे अधिकारी असतां ...... असें असता अमर्यादपणानी उंच स्थळी बसणार. आम्हि सेवकभाव दाखविणार. त्यास आम्हांस कचेरीत बसावयाची गरज काय? म्हणोन बोलोन उठोन चालिले ......  नंतर बाळाजी आवजीस महाराजांनी विचारले. पुढे योजना कोणते प्रकारे करावयाची, ती सांगा. त्यावरुन विनंती करते जाले कीं "महाराज या नावांस छत्रसिंहासन पाहीजे. त्याशिवाय राजे म्हणविणे अश्लाघ्य, लाजिरवाणे,खुशामती बोलणे. स्वयंभू पदवी असली म्हणजे खुशामत जसे ईश्वर शोभेप्रत पावतात, तशीच पदवी जो छत्रसिंहासनाशिश राजा असतो ..... छत्रसिंहासन असलें म्हणजे, या लोकांची बोलणी शिशुपालवत्‌ सभेचे ठायी होतील. समयावच्छेदे नाशही पावतील" ...... कशी योजना सांगा म्हणता; काशीस गागाभट्ट, महासमर्थ ब्राह्मण, तेजोराशी, तपोराशी, अपरसूर्य, साक्षात वेदोनारायण, महाविद्वान, त्याजकडे कोण पाठवून तेथे गोष्टिचा उपक्रम करुन त्यांचे आज्ञेने जे करणे ते केले असतां राजमान्य निर्बाध होते."  या घटनेनंतर महाराजांनी राजधानी हलविण्याचे कारणे -
१) शास्ताखानाच्या स्वारीच्यावेळि त्याच्या स्वारांनी अगदि गडाखालपर्यंत येऊन जाळापोळ केली होती. शिवाय मावळांतील सगळे देशमुख राजांना शरण आले नव्हते.
२) रायगड कोकणात दुर्घट जागी होता. त्यावर शत्रूला आक्रमण करायचे झाल्यास सह्याद्रिची हजार-बाराशे मीटरची भिंत ओलांडणे क्रमप्राप्त होते.  शिवाय रायगडच्या आसपासचे शिर्के, मोरे, दळवी हे महाराजांना संपूर्ण शरण आले होते.
३) आरमार स्थापन झाल्याने समुद्रावरच्या हालचालीवर अणि व्यापारावर नियंत्रण ठेवायला समुद्राला तुलनेनी जवळ असलेली राजधानी गरजेची होती. कोकण- घाट दोहोंवर जास्त भक्कम पकड बसवता येणे शक्य होते.

महाराजांनी बेलाग बुलंद असलेल्या रायगडची निवड केली ती पारखूनच सभासद बखर म्हणते - "राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्या प्रमाणे दिड गाव उंच. पर्जन्यकाळि कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु उंचीने तो थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच देखोन संतुष्ट जाले आणि बोलिले - तख्तास जागा हाच गड करावा." इथुन पुढे निर्वाणापर्यंत महाराजांचे वसतीस्थान रायगडच होते. पण राजगड हा महाराजांचा लाडका किल्ला असणे स्वाभाविक होते. म्हणूनच बहुदा रायगडच्या सिंहासनावर बसून देखिल नगारखान्याच्या दरवाज्यातून पूर्वेला नजरेसमोर तोरणा - राजगड दिसावेत असेच स्थान महाराजांनी निवडले असावे.


राजगड ऐतिहासिक कारणांशिवाय अजून एका कारणासाठी आवडला - भरपूर पक्षी आहेत. खरतर मला त्यातले काहीच कळत नाही. पण बरोबर ४ - ४ जण उत्तम कॅमेरा - दुर्बिण बरोबर वागवुन होते. त्यांच्या निमित्ताने - Little egret, Great egret, Tree pipit, Grey wagtail, Greenish warbler, eurasian craig martin, Pied bush-chat, Jungle babbler, Red-breasted flycatcher, Red-throated flycatcher, Brahminy starling,Purple sunbird हे आणि असे बरेच माहित नसलेले ढिगभर पक्षी बघायला मिळाले. त्यांच्या पोटजाती कश्या ओळखायच्या, त्यांचे रंग - आवाज वगैरे घडाघडा ते सांगत होते. मी बापडा मुक्याने मान हलवुन त्याला होकार भरत होतो. पण एक खरंय एरवी दुपारी फार पक्षी दिसत नाहीत पण पहिल्या दिवशी दुपारी २ वाजता राजगड चढत असताना टळटळित दुपारी अनेक वेगवेगळे पक्षी दिसले. कदाचित थंडिचे दिवस आहेत म्हणूनहि असेल. पण पक्षीमित्रांना या काळात राजगड ट्रेक खेरीज पक्षी निरिक्षणासाठी तिथे जायला नक्कि सुचविन. सुवेळा माचीच्या नेढ्यात बसून दरीत उडणारी पाखर बघता येतात. बालेकिल्यावरुन तर नजरेच्या उंचीवर उडणारे ससाणे दिसतात काहि क्षण एकाच जागी स्थिर राहुन मग खाली दरीत एखाद्या बाणाप्रमाणे सूर मारताना बघणे रोमांचक असते. झालच तर भरपूर प्रकाश देणारी व उत्तम फोकस असलेली बॅटरी असल्यास रात्री निवांत पायवाटांच्या आजुबाजूला साप - सरडे - पाली शोधत फिरणे देखिल होऊ शकेल.

एकंदर राजगडची भेट म्हणजे सुख आहे. पुढल्या वर्षी परत एकदा त्याच्या भेटिचा योग येईल अशी अपेक्षा.

 - सौरभ वैशंपायन.

======
संदर्भ -
१) किल्ले राजगड बखर - श्री अप्पा परब
२) हुजूरबाजार - श्री अप्पा परब
३) शककर्ते शिवराय - श्री विजयराव देशमुख
४) राजाशिवछत्रपती - श्री बाबासाहेब पुरंदरे
५) महाराष्ट्राची धारातिर्थे - पं महादेवशास्त्री जोशी
६) सांगाती सह्याद्रीचा - सह्याद्री पुस्तक समिती.

Sunday, January 9, 2011

युध्दाकडून युध्दाकडे१० जानेवारी १७६० .... महाराष्ट्रात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या आनंदानं साजरा केला जात होता. तिळगुळ वाटले जात होते, गुळाच्या पोळ्यांच्या पंक्ती उठत होत्या. त्याचवेळि तिथे उत्तरेत, दिल्ली वाचवताना कामी आलेला दत्ताजी बहाद्दराचा बिन मुंडक्याचा मुडदा, बुराडि घाटावर यमुनेच्या वाळवंटात भडाग्नि घेत होता. जव्हेरगंजाच्या पाठीवर सोन्या-चांदिच्या अंबारीत मिरवणार्‍या "शिंदे स्वारीच्या" नशिबी साधा मंत्राग्नी सुध्दा नसावा ह्याहुन दुर्दैव ते काय???

वाट्टेल त्या किंमतीवर दिल्ली शत्रुच्या ताब्यात पडू देणार नाही ह्या चिरडिने, स्वकियांनीच निमंत्रणांच्या अक्षता धाडुन बोलावलेल्या अब्दालीच्या परचक्राची पहीली लाट शिंद्यांच्या लष्कराने आपल्या छातीवर झेलली होती. अफगाणिस्थान आणि  महाराष्ट्र दिल्लीसाठी समोरासमोर उभे ठाकले होते.

राष्ट्रावर अघोरी संकट आलं होतं, युध्दातील पहिली आहुती पडली होती. इतिहासपुरुषाची पाऊले पानिपताकडे पडायला सुरुवात झाली होती. इतिहासाचा प्रवास युध्दाकडून युध्दाकडे सुरु झाला होता.

 - सौरभ वैशंपायन

Friday, January 7, 2011

अशी हिवाळि संध्या ....

संध्येचे केशरी रंग, अन्‌ दव माझ्या पायाखाली,
तिचे रेशमी स्पर्ष, लज्जा आरक्त गुलाबी गाली,
वादळे किती लपलेली, झुकल्या नजरे खाली,
अशी हिवाळि संध्या, तिचीया मिठीत निमाली.


- सौरभ वैशंपायन.