Monday, October 20, 2008

वेठबिगारी

सध्या घरात वेठबिगारीवर काम करतोय. म्हणजे दिवाळी आधीची आवराआवर!
दिवाळी टु दिवाळी काहि काम करायची असतात त्यापैकी एक म्हणजे माळा आवरणे, पलंग, मोठ्ठे लोखंडि कपाट, ह्या गोष्टि पोटात खड्डा पडेपर्यंत जोर लावुन (विनाकारण)जागेवरुन हलवायच्या असतात. चुकुन "अग जाऊदे ना! कोण कपाटं हवलुन त्याच्या मागे बघणार आहेत?" असा प्रश्न तोंडुन निघुन गेला कि "हे बघ हे मलाहि समजत तु अक्कल शिकवायची गरज नाहिये, सांगतेय ते नीमुटपणे कर, तुझ्यापेक्षा ३० पावसाळे जास्त बघितले आहेत मी, हां आता तु शिकव मला, मागच्या वर्षी देखिल हेच म्हणाला होतास, कपाटामागे किती जंजाळ आहे ते माहिती आहे का? दोन आठवड्यांपूर्वी रद्दी काढायला सांगितली होती ती तश्शीच, मित्र-मैत्रिणींच्या हमाल्या करायला सांगा एका पायावर तयार मी चुकुन काहि सांगितल तर तोंड वाकडे, आमची कींमतच नाहिये कोणाला!!!!" अशी सगळी हुकमी वाक्ये एका नजरेतुन टपाटप पडतात. म्हणुन मग काहिहि न बोलता हो हुक्म म्हणत झाडु, पोतेरी, पिशव्या, केरभरणी अशी अस्त्रे-शस्त्रे बळजबरी हाता कोंबली जातात. "अरे उंच आहेस ना? नुसता हात वर केलास तरी छतापर्यंत झाडु पोहचतो तुझा, मला मेलीला खुर्ची घ्यावी लागते!" अशी प्रस्तावना करत या गोष्टिंनी तुम्हांला एखाद्या बंदुकिप्रमाणे लोड केलं जातं.

कालहि आईने हसत-हसत चहाचा कप हातात दिला - "आज ओट्याखालची आवराआवर करायची आहे!" मी काहिहि उत्तर/रीऍक्शन/प्रतिक्रिया न देता पेपर मध्ये तोंड घातले.

आई: "अरे काय म्हणतेय मी?"

मी: "हं"

आई: "मग जरा थोबाड उघडुन करतो म्हण कि"

मी: "हं, करतो!"

आई:"हे बघ आधी पुढचे डबे काढुन इथे ठेव ओलं कापड देते डब्याची झाकणं पुसुन ठेवत जा दोन्हि कामं होतील!"

मी: "हे बघ मला ज्या गोष्टिंची अडगळ वाटेल ते मी फेकणार थांबवणार नसशील तरच ओटा डिपार्टमेंटला हात लावणार. एकतर ओटा हा फारच संवेदनशील भाग आहे घरातला. दिवसभरातुन किमान एक हजार एकशे एक वेळा पुसला जातो!"

आई: "...आणि म्हणुनच तो स्वच्छ राहतो. मेलं एक दिवस काय काम करायला सांगितलं तर अटि घालतात, आमची किंमतच कुठे आहे!"

मी: "ऑफर आपके सामने है! हां या ना?"

आई: "ठिक आहे पण मला दाखव आणि मगच टाक."

मी: "म्हणजे थोडक्यात जैसे थे?"

आई: "चहा पिऊन झाला कि लग्गेच कामाला लाग, मला नंतर तिथे स्वयंपाक करायचा आहे!" (माझ्या प्रश्नाला आईने मुरलेल्या राजकारण्या प्रमाणे "कट" मारला होता.)


भारतात बालमजुरांची वयोमर्यादा फक्त १४ असल्याचे दु:ख झालेल्या काहि क्षणांपैकी काहि क्षण गोंजारत मी कामाला सुरुवात केली. या "बायका" कॅटेगरीचं मला फाऽऽऽऽऽऽर कौतुक वाटतं. "लागेल कधीतरी" या घोषावर अनेक चित्रविचित्र किंवा त्याच त्याच गोष्टि जमा केल्या जातात. मी सामान काढलं तसं मागे उभं राहुन "हळु, तेल आहे!" किंवा "ग्लासचा बॉक्स सांभाळुन काढ. मागच्यावेळी बाबांनी त्यातला एक फोडुन झालाय ऑलरेडि!" अशी हतविर्य करणारी वाक्ये(हुकुम) "चॅलेंज" खेळल्या सारखी "मेरा एक और" करत टाकली जात होतीच.

डब्यांची पहिली रांग संपल्यावर मग अलीबाबाची खरी गुहा उघडली. रीकाम्या बरण्या, बरण्यांची झाकणे, टप्परवेअर(हा एक घाणेरडा प्रकार असतो, बायकांना जाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽम कौतुक असतं या प्रकाराचं. इतका बेक्कार प्रकार मी अजुन पाहिला नाहिये.) दुधाचे २ कुकर, चकलीचे साधारण ५ सोर्‍ये( सोर्‍येच ना?) पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी असे काहितरी काळॆ-मिठ किंवा तत्सम काहितरी हाताला लागत होते.

हे सगळं काढताना मी चेहर्‍यावर आयुष्यभराचे त्रासिक भाव आणुन "काय हे? बरण्या-बरण्या-बरण्या-बरण्या, सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये, झाकणं-झाकणं-झाकणं-झाकणं" अशी प्रत्येक गोष्टिची चारवेळा यादि करत होतो. मागुन आईने एकदा ऐकल, दोनदा ऐकलं मग आईने ऐकवलं - "बघु ना! तुझी बायको आली कि बघुच! तेव्हा तीने काहिहि केलं तरी चकार शब्द काढणार नाहिस. लिहुन ठेव!" मग मी "काहि म्हणालीस का?" असे भाव करुन परत ओट्याखाली डोकं घातलं. मग परत डोकं बाहेर काढुन आईला विचारलं - "आई!! आजीनी बाबांना असंच म्हंटल असेल का गं?" असा सरळ साधा प्रश्न केला. त्यावर आईनी "अनुल्लेखाने मारणे" हा उपाय वापरला. मला आजकाल आईची भीती वाटते काहिहि झालं तरी आई माझ्या होणार्‍या बायकोवर जाऊन पोहोचते. ती कोण आहे ते अजुन तरी मला माहित नाहि(म्हणजे तश्या मी बर्‍याच जणी आईला सुन म्हणुन ठरवुन ठेवल्या आहेत!) पण तिला जिथे असेल तिथे बर्‍याच उचक्या लागत असतील हे नक्कि!(त्यातल्या प्रत्येकिला विचारलं पाहिजे "काल तुला उचक्या लागल्या होत्या का?" म्हणजे पत्रिका वगैरे बघायला नको ना!)

असो, तर सध्या वेठबिगार म्हणुन काम करतोय, मोबदला म्हणुन दोन कप चहा, दोन वेळच जेवण आणि झोपायला थोडि जागा दिली जाते. विनोद सोडा पण आवरायला काढलेली जागा दुसर्‍या दिवशी बघुन "वा! बर झालं आवरलं. आता पुढच्या दिवाळीपर्यंत आराम!!" असा विचार येतो आणि सुटलो बाबा एकदाचा म्हणुन निश्वास टाकतो न टाकतो तोच "अरे पंखे पुसायचे आहेत आज!" असा आईचा खुऽऽऽऽऽप प्रेमळ आवाज येतो तिच्या हातात एक चहाचा वाफाळता कप असतो आणि चेहर्‍यावर "आज इतक तर कर उद्या काय करायच ते आज ठरवुन ठेवते!" अश्या आशयाचे स्मित असते. मग चहा संपवुन परत "बालमजुर" वेठबिगारीला जुंपला जातो!

- सौरभ वैशंपायन.

8 comments:

Sneha said...

lage raho.... :)

Girish Vaishampayan said...

ही वेठबिगारी वाटून घ्यायला ती कोण उचक्या लागणारी शोधा की लवकर ....[:p]
तुझ्या अनुभव कथनातून वाचकांच्या आठवणींची उजळणी होत्ये !!!

Jaswandi said...

hehe...mastch lihilays!
baki tujhyabaddal sahanbhuti ahe :)

me said...

hahhahhahah.....are aaila wachun dakhawale! tine tuze jaaaaaaaaaaaaam kautuk kele ani mag ti mazyawar ghasaraliy:) aata me khind ladhawate aahe ghari!

Milind Dharap said...

लई भारी ... घरोघरी मातीच्या चुली रे दुसर काय ... आणि बायको आल्यावर यातून सुटका होईल या भ्रमात राहू नकोस रे .. :)

sahdeV said...

Masta lihilays, as usual! :P

Vinayak said...

लगे रहो !
आज इंटर्नशिप कारोगे तो कल पर्मनंट हो जाओगे
तुझी होणारी 'ती' अगदी कौतुकाने वाचत असेल बघ .
हे असले लिहून ठेवून " मला जमत नाही ... !!" अशी उरली सुरली सबब सुद्धा तू पुराव्यानिशी बाद करून ठेवत आहेस याची तुझ्या बालमनाला जाणीव आहे ना ?
उद्या आईचा ड्वायलोग ऐकायला लागण्यापेक्षा "ती " चाच ऐकायला लागण्याची शक्यता जास्त आहे.

saurabh V said...

Sahdesv - Thank you! -)

@ Milind Dharap & Vinayak - तुमचे "अनुभवाचे" बोल मी लक्षात ठेवेन. :-D लग्नाच्या आधीच "सावधान" म्हणून ठेवल्याबद्दल धन्यवाद.
;-D