Friday, February 5, 2010

सावधान ... वणवा पेट घेत आहे.

इतिहासाची नव्या संदर्भांसकट पुनरावृत्ती होते हे ऐकले होते काहि मोजक्या घटनांत दिसले सुध्दा होते आज परत तेच दिसते आहे. हे वर्ष संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे सुवर्ण मोहोत्सवी वर्ष आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु होती तेव्हा "मुंबई - बेळगाव कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" अशी घोषणा होती. अर्थात नेहरुंचा पर्यायाने कॉंग्रेसचा "मुंबई" महाराष्ट्राला द्यायला खुला विरोध होता. तगडे राजकारणी आणि मुजोर "धनानंद" महाराष्ट्राविरोधात उभे राहिले होते. महाराष्ट्राचा हा स्वभाव आहे कि तुम्हि जितका विरोध कराल जितके दडपाल तितका तो उसळतो. "केला जरी पोत बळेची खाले। ज्वाळा तरी ती वरती उफाळे॥" हिच महाराष्ट्राची आंगिक प्रवृत्ती आहे. दुर्दैवाने काहि अंशी सर्व ठिकाणी दिसतो तसा टोकाचा लाळघोटेपणा देखिल आहे - त्यावेळि यशवंतराव चव्हाण यांनी जाहिर विधान केले - "मला संयुक्त महाराष्ट्र आणि नेहरु यांच्यात निवड करायला सांगितली तर मी नेहरुंची निवड करीन, नेहरु हे महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत!" आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोच लाळघोटे पणा नेहरुंच्या पतवंडासाठी करत आहेत. "राहुल-सोनियांसाठी कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन शिवसेना - मनसे चा समाचार घेतील!" हे त्यांचे कालचे बोल आहेत. पण चालायचेच हा लाळघोटेपणा केला नाहि तर बुडाखालची खुर्ची डुगडुगते हे सगळ्या कॉंग्रेसी जनांना माहित आहे.


आज राहुल गांधी मुंबई दौ‍र्‍यासाठी येत आहे. बाळासाहेबांनी त्याला काळे झेंडे दाखवायला सांगितले आहे. जर शिवसैनिक काळे झेंडे घेउन राहुलसमोर गेले तर कायदा सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलच पण मुख्यमंत्री आणि सरकारची दिल्लीतील कॉंग्रेसच्या वर्तुळात नाचक्कि होईल. हे टाळायला ते शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अटक करत सुटले आहेत मगाशी अटक केलेल्यांची संख्या २३० सांगितली आहे. आता मजा येणार आहे, कारण जर तरीहि कोणी हरीचा लाल शेकडो शिवसैनिकांसकट काळे झेंडे फडकावत राहुलसमोर गेलाच तर नक्किच हमरीतुमरी होऊन वातावरण गरम होईल आणि मग पोलिसांचा लाठिचार्ज फार स्वाभाविक आहे ...... मग शिवसेना - मनसे, सरकार आणि अशोक चव्हाणांवर "महाराष्ट्रद्वेषी राहुलसाठी मराठी माणासावरच निंदाजनक हल्ले करतात, बघा बघा आणि हेच महाराष्ट्रावर राज्य करणार!" अशी बोंब मारायला मोकळे.


पण राडा झाला तर सामान्य माणूसच भरडला जाणार आहे.

सावधान ...... वणवा पेट घेत आहे.- सौरभ वैशंपायन.

2 comments:

राज जैन said...

१००% सहमत आहे !

वणवा पेट घेत आहे.. सावधान रे !

seema tillu said...

महाराष्ट्रात आज आपल्याच मराठी लोकांवर दडपशाही चालली आहे. यू. पी. बिहारवाल्यांना खूष करण्यासाठी राहूल गांधी त्या लोकांनी मुंबई वाचवली असं सांगतो. सैन्यात लोक काही मराठी, बिहारी म्हणून असत नाहीत, तर ते भारतीय असतात हे त्याल माहीत नाही का? आणि २६/११ ला आपले मराठी शिपाई व अधिकारी कामाला आले ते त्याला माहीत नाही का? म्हणजे हा प्रांतवादच झाला.तो सर्वांना चालतो, पण आपण आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवला तर आपण प्रांतवादी. तिकडे कर्नाटकात मराठी लोकांवर अन्याय होतो, तो दिल्लीला दिसत नाही.प्रत्येक प्रांतात तेथील भाषेला व स्थानिक लोकांना महत्त्व असते.पण आपल्या इथे नाही. खरे म्हणजे आपण सर्व मराठी लोकांनी एक होऊन आवाज उठवला पाहिजे.