Sunday, April 3, 2011

स्वप्नी जे देखिले रात्री ...आपण साखळि सामन्यांतली ३री मॅच जिंकलो तेव्हाच चॅट करताना मित्राला म्हणालो - "सध्या डोक्यात इतकं क्रिकेट आहे कि, काल मला स्वप्न पडले होते कि आपण वर्ल्डकप जिंकला आहे!". पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. गेले दिड महीना उठता - बसता क्रिकेटशिवाय काही सुचत नव्हतं. आणि बहुतकरुन सर्वच भारतीय क्रिकेटप्रेमींची हीच अवस्था होती. "सचिनसकट वर्ल्डकप" हेच ते स्वप्न होते. काल तो वर्ल्डकप सचिनने उचलेला बघितला आणि धन्य वाटलं.

श्राध्दाच्या वेळि मंत्रपुष्पांजली म्हंटलेली कोणी ऐकली आहे का? सहाजिकच नाही, पण ३० मार्च २०११ रोजी शिवाजी पार्कमध्ये हे प्रत्यक्षात घडलं. मोहालीत पाकिस्तानचं श्राध्द घातल्यावर देशभरात जो जोश होता त्याला पारावार उरला नव्हता. मात्र तोंड देखलं "पाकला बुकललं तिथेच फायनल जिंकलो, आता वर्ल्डकपचं होईल ते होईल!" हे अर्धसत्य सगळ्यांनी कितीही बोंबलून सांगितलं तरी प्रत्येकाला विश्वचषक हवा होताच. त्यासाठी दहाव्या वर्ल्डकप मध्ये लंकेचा "दशानन" लोळवणं भाग होतं. पाक विरुध्दच्या सेमी फायनल आधी आणि नंतर एकूण २ वेळा कामानिमित्त चर्चगेटला जावं लागलं. ट्रेन थांबली किंवा हळू झाली कि उजव्या हाताच्या वानखेडे स्टेडियमकडे गाडितले हजारो डोळे मोठ्या आशेने बघायचे. ट्रेनच्या खिडकि - दरवाज्यातून मान बाहेर काढून बघणार्‍या लोकांच्या डोळ्यातलं ते स्वप्नं सरळ सरळ वाचता येत होतं. २५ तारखेला घरी आल्यावर फेसबुक वरती आपोआप स्टेटस अपडेट झालं - "वानखेडे स्टेडियमने सचिनची २ तारखेची अपॉइंटमेंट मागितली आहे!"

अखेर काल ती त्याला मिळालीच. गेल्या ३ मॅच मध्ये आपली बॉलिंग आणि फिल्डिंग अफाट झाली. झहीर खानने टिच्चून बॉलिंग केली. काल तर झहीरने चक्क ३ मेडन ओव्हर टाकून लंकेच्या ओपनर्सना गुदमरवून टाकलं. वरुन २ विकेट्स घेतल्या. शिरस्त्याप्रमाणे पहीला बळी त्यानेच घेतला. आपण झहीरच्या बॉलिंगवरती हा टेंभा मिरवतोय पण आता इथे धोक्याची घंटा वाजलेली ऐकू येतेय, सध्या झहीर सोडला तर दुसरा "स्ट्राइक बॉलर"  दिसतच नाहीये. भज्जीला काय झालय ते समजत नाहीये. तो वाईट बॉलिंग करत नाहीये, पण भज्जीची जादू दिसत नाहिये हे पण खरं. दुसरीकडे नेहराला झाकावा आणि श्रीशांतला काढावा इतका स्वैर मारा त्याने केला. नेहरा अनफिट असल्याचा अनेकांना आनंदच झाला. पण त्याजागी अश्विनला खेळवले गेले नाही. श्रीशांतसारखा अत्यंत बेभरवश्याचा माणूस(?) अंतिम सामन्यात का घेतला हे कोडे आहे. मग ह्याला हाक मार, त्याला शूक - शूक कर, असं करुन पार्ट टाइम बॉलर्स चक्क अंतिम सामन्यात खेळवावे लागले. हे लक्षण अजिबात चांगले नाही आणि विश्वविजेत्यांसाठी नाहीच नाही. अनेकांना वाटेल कि काय हे? विजय साजरा करायचा सोडून ही काय खुसपटं काढतोय? पण युध्द जिंकले असले तरी जखमी सैनिक मोजावेच लागतात हा नियम आहे. ऑसीजने १२ वर्ष बेदरकार राज्य केलं कारण जिंकताना देखिल काय चूका झाल्या? त्या परत होऊ नये म्हणून काय करावे? त्यावर त्यांनी भर दिला. आता आपण "चॅम्पियन" आहोत "so let's live like Champion".

काल सर्वोत्तम गोष्ट कुठली असेल तर आपले क्षेत्ररक्षण. युवी - रैना - विराट ने शब्दश: अदृष्य भिंत उभी केली होती. पॉइंट वरती युवराजने त्याच्या नैसर्गिक कमजोर बाजूला म्हणजे उजवीकडे डाइव्ह मारुन जो बॉल अडवला व ४ रन्सच्या जागी त्यांना भोपळा सप्रेम भेट दिला ते बघताना मला जॉन्टि र्‍होड्सची आठवण आली. चित्याच्या वेगाने त्यांच्याकडून हे सगळं घडत होतं. या पठ्ठ्यांनी सहज २५-३० रन्स वाचवल्या अन्यथा पुढे ते महाग पडलं असतं. झहिरने देखिल २ वेळा अतिशय सुरेख बाउंड्रि अडवून ४-५ रन्स वाचवले. हे सगळं गॅरि गुरुजींमुळे झालय हे मान्य केलच पाहिजे. BTW गॅरी क्रस्टन हा अर्थाअर्थि पहीला साऊथ आफ्रिकन ठरला जो वर्ल्डकप फायनल मध्ये पोहोचला आणि चक्क जिंकला सुध्दा.


मग मैदानात उतरले सचिन -सेहवाग. सचिन वानखेडेवर असण्याची तुलना, विठोबा पंढरपुरात असण्याशीच होऊ शकते. सचिनला त्याच्या घरच्या मैदानावर आतिषबाजी करताना बघायला सगळे उत्सुक होते. पण पक्वान्नाचा घास घ्यावा आणि दाताखाली खडा यावा तसं दुसर्‍या बॉलवरती झालं. मलिंगाने सेहवागला LBW पकडलं. स्टेडियमवरच्या त्या गंभीर वातावरणात गौतम गंभीर वन डाऊन आला. नॉन स्ट्रायकर एन्डवरती आपला सचिन गौतम बुध्दाच्या शांततेने उभा होता. गंभीरने आल्या आल्याच फोर मारुन मलिंगाला आदाब अर्ज केला आणि आपले इरादे जाहिर केले. मग दुसर्‍या बाजूने, ST च्या लाल डब्याने आधी घुमल्यासारखं करुन घाटातली मलिंगाच्या केसांसारखी वळणं सहज पार करावीत, तशी सचिनची बॅटिंग सुरु झाली. त्याने कुलसेकराला पिदवायला सुरुवात केली. पट्टिने आखल्यासारखा स्ट्रेट ड्राइव्ह त्याने तडकावला तेव्हा अर्धा मिनिट सचिनने अदिदासची जाहिरात केल्यागत बॅट उभी धरली होती - "वंडरफुल!" मग त्याच ओव्हरमध्ये थर्डमॅनच्या थोडं उजवीकडे मारलेल्या फोर वरती "सचिन तेंडुलकर" अशी ठसठशीत सहि करुन मगच त्याने बॉल टोलवला होता. तो फोर बघून "चला! म्हणजे सचिन आळस देऊन उठलाय एकदाचा!" हे समजलं. पण सचिन अधिक रंगात येण्याआधीच मलिंगाच्या ऑफ वरुन बाहेर जाणार्‍या बॉलच्या रस्त्यात सचिनने बॅट घातली आणि मागे संगाकाराने कुठलिही चूक केली नाही. सचिनसारखी विकेट मिळाल्यावर आनंदाने मलिंगाच्या कुरळ्या केसांनी सुध्दा जागच्याजागी एक जास्त गिरकि घेतली असेल. सचिन १८ वर परतत असताना अख्खे स्टेडियम गप्प झाले, पण पहिल्यांना सचिनने फार धावा न करता देखिल स्टेडियममधली लोकं टाळ्या वाजवत उभी राहिलेली मी पाहिली. २२ वर्षात सचिनने किती शतके केली? किती धावा जमवल्या? हा भाग अलाहिदा ..... सचिनने "आदर" कमवलाय तो असा.

कोहलीने देखिल बर्‍या धावा केल्या कोहली गंभीर मध्ये ८३ रन्सची भागीदारी झाल्याने डावाला आकार आला. ५वा आलेल्या धोनीने केलेली सुरुवात बघून आजहि धोनी हिंदि फिल्म मधल्या पंजाबी लग्नातील "मुह - दिखाई कि रस्म" करण्यापुरता आलाय कि काय याच चिंतेत सगळे होते. कारण संगाकाराने चूक केली म्हणून धोनीला स्टंप् करु शकला नाही. अखेर गंभीर धोनीची १०९ धावांची भागीदारीने भारताने निश्चित विजयाकडे वाटाचाल केली. गंभीरचे शतक ३ धावांनी हुकले याचं वाईट वाटतंय. पण त्याची खेळि सुरेख व योग्यवेळी झाली. गंभीर आउट झाल्यावर युवराज आला. पाकिस्तान वगळता बाकि सगळ्या मॅचमध्ये युवराजने चांगली कामगिरी केल्याने त्याच्याकडून अपेक्षा होत्याच. मॅच कट टू कट सुरु होती आणि कधी बॉल जास्त कधी रन्स जास्त असं होत होतं. पण खरंतर काळजीचं काहीहि कारण नव्हतं. कारण ६ विकेट्स हातात होत्याच पण ते ५२-५३ रन्स करताना अजून बॅटिंग पॉवर प्ले उरला होता तो अखेर भारताच्या कामी आलाच. धोनीने बॉलच्या कानाखाली सणसणीत आवाज काढून लंकेला नॉक - आऊट केले.मग सगळं स्वप्नवत होतं. युवराज - सचिनचे आनंदाश्रू. खेळाडुंनी एकमेकांना मारलेल्या जोशपूर्ण मिठ्या, स्टेडियमच्या छतावरील रिंग मधून झालेली फटाक्यांची आतिषबाजी आणि मग सचिनला सगळ्यांनी खांद्यावर उचलून वानखेडेला मारलेली एक फेरी. मग सगळ्यांनी उचलून धरलेला तो विश्वचषक, शॅम्पेनचा पाऊस, बॅकग्राउंडला वानखेडेच्या फ्लड लाईट्सचा लखलखाट, उडणारे शेकडो फ्लॅश, आणि भारतातल्या प्रत्येक रस्त्यावर - प्रत्येक नाक्यावर वाजणारे ढोल, धर्म, जात, वय, लिंग विसरून बेभान नाचणारे "भारतीय" आणि त्यांच्या हातात फडकणारे तिरंगे. सगळं रोमांचक, अविस्मरणिय.पण महेला जयवर्धनेनी प्रेशरखाली केलेले १०३ रन्स आणि मुथैय्या मुरली धरनची शेवटची वन डे मॅच म्हणूनही हि फायनल सगळ्यांच्या कायम लक्षात राहील. we miss you murali! अलविदा!

यजमान देशाने वर्ल्डकप जिंकला. हे देखिल पहिल्यांदा झाले. आजवर ज्या देशाने यजमानपद भूषवले तो देश कधीच वर्ल्डकप जिंकू शकला नव्हता. आता पुढचा २०१५ चा विश्वचषक ऑस्ट्रेलिया - न्यूझिलॅन्ड मध्ये आहे - तब "उनके घर में घूस के मारेंगे!" आणि तेव्हा "११ कांगारु" आणि "११ किवींची" शिकार केली तरी PETA वाले काही बोलणार नाहीत हे नक्कि.

 - सौरभ वैशंपायन.

2 comments:

Suhas Diwakar Zele said...

वाह क्या बात ..क्या बात !!
तुझ्या या शब्दांचा आभारी आहे रे मित्रा... आपलं सगळ्यांच स्वप्न पुर्ण झालं, आनंदी आनंद झाला :) :)

Milind Dharap said...

अरे वा सौरभ ...!!! काय झकास लिहिल आहेस.
कालच मनात विचार आला कि सौरभला विचाराव कि WC वर काहि लिहिलस कि नाहि?
ओरकुट वर काहि अपडेट आल नाहि मग मुददाम तुझी बलोग चि साeट बघितलि.
असच मसत मसत लिहित रहा....!!!

qualipad मराठि वरुन आता typing and copy paste करता येत नहि ना मग मराठि मधे लिहिनयाचे जाम वानधेा झालेत