Saturday, October 8, 2011

के मरके भी किसी को याद आएंगे ….






तो रोज सकाळि उठल्यावर आरश्यात स्वत:च्या प्रतिबिंबाला विचारायचाआज तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल्यास तू जगाला काही नविन देणार आहेस का?” याचं उत्तर सलग काही दिवस नकारार्थि आलं कि तो बेचैन व्हायचा. आणि मग झपाटल्यागत काहितरी शोधायचा. आणि मग काही महिन्यांनी त्याच्याच नव्हे तर जगभरातीलटेक्नोसॅव्हिलोकांच्या आयुष्यात एक अभूतपूर्व असा मोठा दिवस उगवायचा …. परवा स्टीव जॉब्जच्या आयुष्यातला खरच शेवटचा दिवस होता …. पण त्याने आजवर लोकांना जे काही दिलं ते संपूर्ण उमजायलाच अजून काहि वर्ष जातील. जाण्याआधी सुध्दा स्टीव तू आंम्हाला कधीही संपणारी स्वप्न दिलीस, आम्ही अजून काय अपेक्षा ठेवाव्यात?
ह्याला स्वादुपिंडाचा कर्करोग आहे, हा पुढच्या सहा महिन्यांचाहि पाहुणा नाहिये!” हे डोळ्यात पाणी आणून जगातील नामांकित डॉक्टरांपैकि एकाने सांगितल्यावर ह्या पठ्याने सहा महिने सोडा …. तब्बद दहा वर्षे मृत्युशी पैजा लावल्या आणि त्या जिंकत आला. रोज सकाळि तो प्रतिबिंबाच्याच नाही तर मृत्युच्या डोळ्यात डोळे घालुन विचारायचाआज शेवटचा दिवसबोल नविन काय देणार?” हे करायला जिगर लागते. ती स्टिवकडे अर्थात होती. स्टिव तू आमचा हीरो होतास आणि राहशील.

स्टीवबद्दल गेले दोन दिवस टिव्ही, इंटरनेट, वर्तमानपत्र सर्वत्र “सबकुछ” येतय. त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सगळं काही. नविन काही सांगावं असं दिसत तरी नाहीये. पण आमची पिढी २ सफरचंदांची गोष्ट कधीच विसरु शकणार नाही. एक म्हणजे झाडावरुन न्यूटन नामक महाभागाच्या टाळक्यात पडलेलं ते सफरचंद (आणि त्याच्यामुळे शाळेत डोक्याला ताप करुन ठेवणारे गुरुत्वाकर्षणाचे नियम. …तो नारळाच्या झाडाखाली का बसला नव्हता हा त्यावेळचा माझ्या डोक्यातला पहिला विचार होता!) आणि दुसरं एका बाजूने एक चावा घेतलेलं “Apple” चं सफरचंद.
लोकं झाडाचं बी लावून त्याची फळ घेतात, ह्याने त्या अर्ध्या खाल्लेल्या सफरचंदासकट स्वत:ला अविश्रांत मेहनतीत गाडून घेतलं आणि नंतर त्या झाडाला येणारी फळ कल्पनेबाहेर रसाळ होती. 

फळांनी लगडलेल्या झाडालाच लोकं दगड मारतात हा न चूकणारा नियम आहे. तसे याच्याहि बाबतीत घडले. ज्याला पेप्सीतून आपल्या कंपनीकडे बोलावताना “आयुष्यभर गुळचट पाणी विकण्यापेक्षा माझ्या बरोबर येऊन अजून काहीतरी चांगलं कर!” हे सांगितलेल्या भागिदारानेच अंतर्गत सत्तास्पर्धेत स्टीव्हला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरा कोणी असता तर हाय खाल्ली असती पण “नकोसा होणं” ते “हवाहवासा वाटणं” हा प्रवास तो जन्मल्या क्षणापासून ते आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्यांवर तो करत आला होता. त्याने पिक्सर हि नविन कंपनी स्थापन केली, वॉल्ट डिस्ने सारख्या जगप्रसिध्द कंपनीबरोबर भागीदारी करुन जगातली पहिली संपूर्ण अनिमेटेड फिल्म “टॉय स्टोरी” बनवली. वॉल्ट डिस्नेच्या संचालक मंडळात जाऊन बसला. या सगळ्यातून परत नवं विश्व उभं केलं, आणि परत त्याच Apple  कंपनीत ताठ मानेनं भागीदार म्हणून प्रवेश केला. हे सगळं केवळ आत्मविश्वासावर कमावलं होतं. त्याची प्रतिभा व मॅनेजमेंट स्किल्स काय होती हे US मध्ये दाखल केलेल्या ३३८ पेटंटमध्ये स्टीव्ह फाउंडर किंवा को-फाउंडर आहे हे जाणून घेतल्यावर समजते …. याहुन अधिक सांगणे न लगे.


साधारण १९७४-७५ ची गोष्ट असेल, मन:शांतीच्या शोधार्थ स्टीव्हने भारताची वारी केली. जाताना तो परत गेला ते बुध्द धम्म स्वीकारुन आणि बरोबर भारतीय अध्यात्मिक विचार घेऊनच. त्याच्यावरच्या या विचारांचा पगडा त्याने स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात केलेल्या भाषणात दिसून येतो. त्याने मृत्यू विषयी मांडलेले तत्वज्ञान भारतीय अध्यात्माच्या फार जवळचे आहेत. स्टीव्हला एक उत्तम उद्योजक म्हणून कल्पनातीत लोकप्रियता मिळालीच पण लोकांना तो आवडायचा त्याच्या नवनवीन, अफाट आणि तंत्रज्ञान जगताला एका रात्रीत बदलून टाकणार्‍या कल्पनांमुळे. लोकांना तो आपला वाटायचा, त्याच्या प्रोडक्टमध्ये त्याने “I” ठेवला होता. “I-Phone”, “I-pod”, I-pad” असं म्हंटल्यावर  “माझं गॅजेट” म्हणून लोकांना आपसूक त्या प्रोडक्ट विषयी आपलेपण वाटायचं. एक यशस्वी संशोधक म्हणून जगलेल्या स्टीव्हने मृत्युला इतक्या जवळून बघितले होते कि मृत्युमध्ये सुध्दा त्याला शोधच दिसला, त्या स्टॅनफोर्ड मधील भाषणात तो म्हणाला होता – “death is very likely the single best invention of life” ….. आपला स्टीव्ह कसल्याश्या नविन शोधा करता फार दूर निघून गेलाय. माझ्या Appel I-POD वरती गाणी ऐकताना मला राहून राहून “अनाडि” चित्रपटातील एका गाण्याच्या दोन ओळी आठवत आहेत – “के मरके भी किसी को याद आएंगे, किसीकि आसूओ में मुस्कुराएंगे …. जीना इसीका नाम है।“

 - सौरभ वैशंपायन.

4 comments:

Reshma Apte said...

mast mast

kharach jobs was gr8 ,,, zunz den aani jinkan aashaavadi aani sashodhan shil rahaan he tyanchyakadunach shikav

te Apple porak karun gele :( :(

may his soul rest is peace

Suhas Diwakar Zele said...

मस्त रे...

स्टीवची कारकीर्द आणि कामगिरी विसरणे अशक्य !!

इंद्रधनु said...

चांगल्या आणि क्रिएटीव लोकांना देव इतकंच आयुष्य का देतो....

Travellers Studio said...

Sahi reee... tyane je kela aahe he kadhich visru shakat nahi yaar... Technology la ek nava rup dila tyane.. Great Great n Great....