Tuesday, February 28, 2012

"The Artist" - घडाघडा बोलणारा ’शब्देविण संवादू’वरचं चित्र बघुन अनेकांना RK studio च्या लोगोची किंवा सरळ सांगायचं तर "बरसात" च्या पोस्टरची थोडिशी आठवण होईलहि. परवाच उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेत्यासह ५ "ऑस्कर" पटकावणर्‍या "द आर्टिस्ट" फिल्म मधला हा फोटो आहे. आणि ते मिळालं नसतं तरच नवल होतं. २०११-१२ साली चक्क "ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट" (मराठीत कृष्ण-धवल) चित्रपट काढायचा हे मोठं धाडस आहे. हां अर्थात १९९३ साली स्पीलबर्गने देखिल "ऑस्कर शिंडलर" या जर्मन बिझनेसमची दुसर्‍या महयुध्दातील सत्यकथा "शिंडलर्स लिस्ट" या चित्रपटात मांडली होती हा चित्रपट देखिल ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होता आणि पठ्ठ्याने चक्क ७ अ‍ॅकेडमी अवॉर्ड मिळवुन "ऑस्कर शिंडलर्सच्या" लिस्ट मध्ये ७ "ऑस्कर" जमा देखिल करुन दाखवले. पण तो चित्रपट "मुक-चित्रपट" नव्हता. हा द आर्टिस्ट संपूर्ण मुक चित्रपट देखिल आहे. आणि ज्यांनी चार्ली चॅप्लीन किंवा त्या काळचे चित्रपटाचे दृष्य आणि मग संवादांची पाटि अश्या धाटणीचे चित्रपट बघितले असतील त्यांना हा चित्रपट कसा केलाय हे लगेच समजेल.  "मुक- चित्रपट" काढून ५ ऑस्कर खिशात घालण्यावरुन चित्रपट काय उंचीचा आहे हे आपसूक सिध्द झालंच आहे.

हि कथा आहे त्या काळाच्या एका अभिनेत्याची ज्याने मुक - चित्रपटांचा जमाना गाजवला आहे. तो प्रसिध्दिच्या शिखरावर आहे पण तरीहि सर्व सामान्यांशी तो सहजपणे वागतो. चित्रपटाची संपूर्ण कथा सांगत नाहि, परंतु अचानक भेटलेल्या गर्दितल्या एका सर्व सामान्य मुलीला तो तिच्या नृत्यातले कसब बघून आपल्या बरोबर काम करण्याची एक छोटि संधी देतो. त्याच दरम्यान चित्रपट "बोलायला" लागतो पण हा निर्मात्याच्या तोंडावर हसतो आणि हे काय चालणार? म्हणत चालता होतो. त्याच वेळि "ती" मुलगी इतर चित्रपटात लहान लहान रोल करत एक स्टार बनते तर दुसरीकडे आपला हेका सोडायला तयार नसलेला "तो" अगदि आपल्याकडचे सगळे पैसे घालून एक नवा "मुक चित्रपट" बनवतो आणि चित्रपट साफ कोसळुन तो कंगाल बनतो. पुढे शेवट व "ट्वीस्ट" अर्थात "सुखद" आहे. पण तो शेवट बघण्यात खरी मजा आहे. पैसा - नाव नसलं कि कसे सगळे पाठ फिरवतात व त्यानंतर स्वत:चा परिस्थितीशी न जुळवुन घेण्याचा हट्ट व त्याचवेळि काल पावतो जे आपल्याला मुजरे झाडत होते त्यांसाठी आपण "संपलो"  हि घुसमट "जुआन दुजारदाँ" याने जबरदस्त ताकदिने दाखवली आहे. इतकि कि आपली अस्वस्थतेने चुळबुळ सुरु होते. पण त्या घुसमटित ’अगतिकता आणि करारीपणा’ यांच्या एकमेकांवर कुरघोडि करणार्‍या अनेक छटा त्याने फार बोलक्या केल्या आहेत. त्याचा कुत्राहि फारच मिश्किल घेतला आहे. कुत्र्यालाहि एखादं अवॉर्ड द्यावं इतकं मजेदार काम त्याने केलय!

ह्याची स्टोरी लाईन आपल्याकडच्या "द डर्टि पिक्चर" बरोबर जुळते नव्हे जवळपास समांतरच जाते. अर्थात विषयाचा गाभा वेगवेगळा आहे. असो, तर शब्देविण असलेला हा संवादू कदाचित शब्दांसकट देखिल इतका प्रभावीपणे मांडता आला नसताअसं राहून राहून वाटतय. त्यात "जुआन दुजारदाँ" ची वाहवा आहेच पण काहि ठिकाणी दिग्दर्शक (मिशेल आझानाविसीअस) या कसलेल्या अभिनेत्याच्याहि वरणात झालाय. म्हणजे ३-४ प्रसंगात तर दिग्दर्शकच खरा हिरो ठरलाय इतके प्रभावी शॉट्स "मिशेल आझानाविसीअस" यांनी घेतले आहेत. त्यासाठी सलाम!!!

moral of the story - मुक्यानेच भरपूर काहि सांगणारा "द आर्टिस्ट" बघितलाच पाहिजे!

 - सौरभ वैशंपायन.

No comments: