Tuesday, August 14, 2012

जिन्हे नाज़ है हिंद पर ....





११ ऑगस्ट २०१२ च्या दिवशी मुंबई, आझाद मैदानात जे काही झाले ते बघून कुणाही सामान्य पण विचारी माणसाचा संताप झाल्या शिवाय रहाणार नाही. आसाममध्ये, आजवरच्या केंद्र आणि तिथल्या राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे आणि मतांसाठी मुद्दामहुन दुर्लक्ष केल्याने बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या प्रश्नांनी स्थानिकांत जो सहाजिक असंतोष धुमसायला सुरुवात होते त्या कारणाने त्याचा भडका गेल्या महिन्यात उडाला ७३ लोकं मरुन, ३ लाख ’स्थानिक’ लोक बेघर होऊन जरा वातावरण कुठे नुकतेच निवळायला लागले आहे.  दुसरीकडे जून महिन्यापासून शांतीदूत बौध्दाची लेकरे रहात असलेल्या म्यानमारमध्येही घुसखोर मुस्लिमांची ससेहोलपट होऊ लागली. म्यानमार सरकारने त्यांना नागरीक म्हणून मान्यता द्यायला ठामपणे नकार दिल्याने त्यात अजून संघर्षाची भर पडली आहे. ह्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत त्याचा निषेध करायला रझा अकादमीने ’इस्लाम खतरें में’ ची बांग दिली. आणि एक पूर्व नियोजित दंगल घडवली गेली. गंमत म्हणजे यात मोठ्या संखेने जखमी होणारे पोलिसच होते. आजवर कुठल्याही घटनेत पोलिसांचे असे "खेळणे" बनवले नव्हते. मुंबईत घडलेल्या घटनेचे ठळक मुद्दे बघितले तर पुढील गोष्टी दिसतात -
 १) या दंग्यात चक्क पोलिसांनाच मारहाण झाली. "४६" पोलिसांसह ५४ जण जखमी. जखमींत ४ महिला कॉन्स्टेबल्सचा समावेश.
२) पोलिसांच्या गाड्या फोडल्या - उलथवल्या, दंग्यांसाठी खास बनवलेली १  "वज्र" गाडी पेटवली. ३ न्यूज चॅनल्सच्या गाड्या जाळल्या. ३३ बेस्ट बसेस फोडल्या.
३) पोलिसांची ३ शस्त्रे (सर्व्हिस रीव्हॉल्वर्स की रायफल्स ते नीट माहित नाही) व काही काडतुसे लंपास झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पैकी काही काडतूसे "मुंब्र्यात" मिळाल्याची बातमी ’पुढारी’ मध्ये वाचायला मिळाली.
४) महिला पोलिस कॉन्स्टेबलचाच विनयभंग केल्याची तक्रार ’अज्ञात’ दंगेखोरांविरुध्द दाखल केलीये.
५) दंगेखोर "अमर जवान" स्मृतीस्तंभाची नासधूस करतानाची स्पष्ट छायाचित्रे यत्र - तत्र - सर्वत्र दिसत आहेत.


सगळं वाचून काही सरळ साधे प्रश्न पडतात -
१) "रझा अकादमीचा" एकंदर ’इतिहास’ बघता भर रमजान मध्ये, आधीच येणार्‍या गणेशोत्सवाचा आणि स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा ताण पोलिसांवरती असताना स्वातंत्र्यदिनाच्या ३ दिवस आधी अशी सभा घेण्याची परवानगी का देण्यात आली?
 २) बरेली येथील मौलाना अब्दुल कादिर यांचे प्रक्षोभक भाषण सुरू झाले तेव्हा दक्षिण मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश व्यासपीठावर होते. मौलानांच्या प्रक्षोभक भाषणानंतरच हिंसाचाराला सुरुवात झाली, असेही चौकशीत स्पष्ट झाले असले तरी या मौलवीवर पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई का केलेली नाही?
३)  दंगलखोरांकडे दगद, हातोडे, रॉकेल, पेट्रोल कोठून आले?
४) दंगलखोरांना पकडून आणणाऱ्या पोलिसांनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का दम दिला जात होता, हे अनाकलनीय असल्याचे या वेळी हजर असलेल्या एका पोलिसाने चौकशीत सांगितले. एका उपायुक्ताने दंगलखोराला रंगेहाथ पकडले तरी त्याला सोडून देण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे अशा वेळी दंगलखोरांवर पाण्याचा माराही करण्यात आलेला नाही, असेही दिसून येत असल्याचे एका पोलिसाने सांगितले. पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे कळू शकलेले नाही. मात्र याची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडून अजूनही का करण्यात आलेली नाही?
५) मावळ मध्ये पाण्यासाठी - चार्‍यासाठी आंदोलन करणार्‍या निशस्त्र शेतकर्‍यांवरती गोळिबार करुन ३ बळी घेणारे, किंवा अंबडमध्ये वारकर्‍यांना शांत करायला गोळिबार करुन २ वारकर्‍यांचा बळि घेणारे पोलिस दल काय करत होते?
६) शिवसेना - मनसे सारख्या राजकिय किंवा इतर कुठल्याही सामाजिक संस्थांकडून वगैरें बंदचे नुकसान भरुन मागणार्‍या न्यायालय - सरकार कालच्या नुकसानाबाबत 'रझा अकादमी' वरती काय कारवाई करणार???

 हे अतिशय प्राथमिक पातळीवरचे प्रश्न आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरा प्रश्न एकच - "आपण परत फाळणीकडे वाटचाल करत आहोत का?" खरंतर अश्या नाजूक प्रश्नांकडे धार्मिक चष्म्यातून पहाणे योग्य नाही. पण जगभर जे चालू आहे ते बघता व देशात त्याच्या उमटणार्‍या प्रतिक्रिया बघता आपसूक धार्मिक भिंती उभ्या रहातात. विशेषत: राष्ट्रापेक्षा धर्माला कुणी महत्व देतं तेव्हा. आणि त्याही पुढे मतांसाठी त्यांचीच तळी उचलणार्‍यांचे वागणे बघून नाईलाजाने मलाही माझ्या धर्मावरती अडून रहाणे भाग आहे असे वाटायला लागते. डेन्मार्कमध्ये पैगंबरांचे व्यंगचित्र काढले - पेटव मुंबई, म्यानमारमध्ये मुस्लिमांची ससेहोलपट केली जाळा मुंबई, घुसखोर बांग्लादेशींना धोपटले तर मारा पुण्यातील आसामी आणि मणीपुरी विद्यार्थ्यांना - करा मुंबईत दंगे. काय चाललय? याची टोटलच लागत नाही कधी कधी.

ह्या दंगेखोरांवरती अखेर स्वसंरक्षणार्थ नाईलाजाने पोलिसांनी गोळीबार केला त्यात २ दंगेखोर ठार झाले, त्याचे फोटो फेसबुकवरती "शहिद" म्हणून टाकून काही मुस्लिम तरूण अजून माथी भडकवत आहेत. मी ती लिंक मुद्दाम शेअर केली आहे, अनेकांनी स्वत: त्याखालचे संभाषण वाचले तर सुन्न व्हायला होईल. विचार केला की डोकं भणभणतं. हे किती भयानक आहे? कळत नाही, हे तरूण मुद्दाम करतात कि ते खरेच भरकटले आहेत? आणि काही बोलण्याच्या पलीकडचे आहेत हे संभाषणावरुन समजतं.

 विशेष कौतुक करायचे असेल तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मानवाधिकार, कम्युनिस्ट वगैरे पिलावळीचे करावे लागेल. या घटनेबाबत एक चकार शब्द नाही गेल्या ३-४ दिवसात. आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोरांमुळे ३ लाख स्थानिक लोकं बेघर झाले, कत्तली - बलात्कार करुन हाकलले गेलेले कश्मीरी पंडित गेली ४ दशके परत काश्मीरमध्ये जाण्याची वाट बघत आहेत या प्रश्नांवरती हे मुग गिळून गप्प. काही विचारलं कि "शांतता पाळा", "अफवांवरती विश्वास ठेवू नका", "कठोर कारवाई करु" इतकिच पोपटपंची. क्रिया शून्य. पण तेच फक्त ’गोध्रा’ म्हणा .... यांव रे यांव... काय कळ उठते बघा. राष्ट्रीय विनोदवीर दिग्विजयसिंह, शबाना आझमी, जावेद अख्तर, तिस्ताबाई, जितेंद्र आव्हाड वगैरे कुठे गायब झालेत ह्या घटनेनंतर ते कळतच नाहीये. आश्चर्य म्हणजे दंगेखोरांनी मिडियाला यथेच्छ थोबडवून सुध्दा मिडीया त्याच रात्री थंड झालाय. नंतर केवळ ठळक बातम्यांत १ सेक्शन नाईलाज म्हणून दिला जातोय. मला आठवतंय राज ठाकरेंचं आंदोलन झालं तर २ दिवस वीट येईपर्यंत तेच तेच दाखवलं होतं. अण्णांच्या आंदोलनामुळे तर सगळी चॅनेल "अण्णा चॅनेल" बनली होती. अरे हो आठवलं - सध्या रामदेव बाबांनी उपोषण सुरु केलय. लोकांचाही भरघोस पाठींबा मिळत आहे. म्हणून त्यांच्या अटकेसाठी बर्‍याच बसेस सरकारला मिळाल्या आहेत, एका स्टेडियमचे अस्थायी कारावासात रुपांतर केले आहे, हजारोंची सुरक्षादले दिल्लीच्या चौका चौकात उभी केली आहेत. भाजपाने पाठींबा दिल्यावरती प्रत्येक न्यूज चॅनल एकच बातमी दाखवत आहेत - "रामदेवके मंच पे भगवा रंग." इतकं बरोब्बर जमवणार्‍या सरकार व मिडियाचं मला राहुन राहुन कौतुक वाटतं. आणि त्याहुनही "विस्मरणशक्ती" दांडगी असलेल्या जनतेचही.

देश शांत रहावा. धार्मिक - जातिय दंगली होऊ नयेत हे प्रत्येकाला वाटतं. इथे काही नागडि सत्य मांडणे गरजेचे आहे, काही प्रॅक्टिकल प्रश्न अतिशय शांत डोक्याने स्वत:ला व इतरांना विचारणे गरजेचे आहे. सर्वप्रथम "अखंड हिंदुस्थानची" स्वप्ने पहाणार्‍यांना एक सांगू इच्छितो स्वप्न कितीही हवेहवेसे, भव्य व सुखावणारे असले तरी शक्य नाहिये. निदान पुढची २ - ३ शतके नक्कीच नाही. त्यामागची राजकिय, आंतरराष्ट्रिय,  सामाजिक, धार्मिक, भौगोलिक, भावनिक, आर्थिक, ऐतिहासिक, वर्तमान कारणे व भविष्यातील याच पातळ्यांवरील सर्व शक्यता लक्षात घेतल्याच पाहिजेत. मला तेजोभंग आणि त्याहुनहि या स्वप्न रंजनात असलेल्यांचा रसभंग वगैरे करण्यात स्वारस्य नाही. मी द्रष्टा देखिल नाही. पण मुळात हे नजिकच्या काळात घडणे अजिबात शक्य नाहीये हे समजायला द्रष्टा असण्याही गरज मला वाटत नाही. नपेक्षा गरमी दाखवलीच तर वरील सर्व कारणे व शक्यता बघता राष्ट्राच्या नशिबी अजून संकटेच लिहीली जातील. मग यावरती उपाय काय? सर्वप्रथम सेक्युलरिझमच्या नावाखाली फालतू लाड करणारे सरकार जनक्षोभ निर्माण करुन हटवणे, ते फालतू लाड कुठल्याही दबावाला बळी न पडता हळू हळू बंद करणे,  मुस्लिम मुलांत मदरश्यांपेक्षा शालेय शिक्षणाचा प्रसार कसा करता येईल याचा बंदोबस्त करणे. आणि महत्वाचं म्हणजे सावरकरांच्या "हींदूंचे सैनिकीकरण, सैन्याचे हींदूकरण!" या नीतीचा अवलंब करणे. भोसला मिलिटरी शांळांप्रमाणे राज्या राज्यातून अजून अनेक शाळा उघडणे. ही महत्वाची पाऊले ठरु शकतात.

जे काही आजूबाजूला घडतय ते फार चिंताजनक आहे, परदेशांतील, परप्रांतातील प्रश्न मुंबईत दंगे करुन सुटणार नाहीयेत हे समजण्याची कींवा समजून घेण्याची इच्छाच समाजात नाहीये. त्याशिवाय आजूबाजूला होणारे बॉम्बस्फोट, भारतभर व मुख्यत्वे बिहार, आसाम, मुंबई, भागातला बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न हा राष्ट्रिय सुरक्षेचा प्रश्न आहे. मुस्लिमांना हे समजावलं पाहीजे कि याकडे धार्मिक प्रश्न म्हणून बघता येणार नाही. तर सरळ सरळ "राष्ट्रीय" प्रश्न म्हणूनच बघावे लागेल. त्यातूनही कुणाला हा धार्मिक प्रश्न वाटतच असेल तर मग त्यांनी सध्या सिरीयात आपल्याच "मुस्लिम" जनतेची "मुस्लिम" पंतप्रधान करत असलेली कत्तल कुठल्या निकषांवर तपासणार? इराक -इराण मध्ये जो विस्तवही जात नाही त्याचे काय? आपल्याच निरपराध "मुस्लिम" जनतेवरती रासायनिक अस्त्रे वापरणारे सद्दाम फासावर लटकले हे उत्तमच नाही का?  सद्दाम - खोमेनी यांपैकी नेमके बरोबर होते? आणि त्यांच्यातील सच्चे व पाक मुसलमान कोण? पाकिस्तानात भारतातून गेलेल्यांना ’मुजाहीर’ का समजतात यांचीही उत्तरे द्यावीत. आणि यांचीही उत्तरे नसतील तर निदान एका प्रश्नाचे उत्तर नक्की द्यावे - "जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहॉं है?"

6 comments:

mahendra said...

सगळेच मुद्दे अगदी योग्य आहेत. लेख आवडला.

sahdeV said...

bolti bandh article!!!!!

Abhishek said...

कुठल्याही गोष्टीचे (भ्रष्टाचार, आरक्षण, मुसलमान, बिल्डर, उद्योगपती) फालतू लाड बंद करायला पाहिजेत, हे नाठाळ सरकारच्या माथी कस मारावं हा मोठा (खूप मोठा) अनुत्तरीत प्रश्न आहे. मुठभर लोक पेटवण्याच काम करतात, आणि मिडिया जे दाखवेल ते बहुल लोकांपर्यंत पोहोचत.
प्रत्येक घटनां मधे ह्या मिडीया चा रोल पण महत्वाचा आहे. जेव्हा देश ह्या सगळ्या गोष्टींच्या वर असेल तेंव्हाच सुधारणा शक्य आहे, आणि त्या साठी शिक्षण पद्धतीत सुधारणा आवश्यक आहे. पण आजची शिक्षण पद्धती विकायला ठेवली आहे. पुढच्या पिढीकडून काय अपेक्षा?
'अमर जवान' चा वरील फोटो प्रतिकात्मक रित्या लक्षात घेतला तर अशा दंगलखोर लोकांना सर्वधर्मसमभाव भारतात रहाण्याचा काही हक्क आहे का? हे परीक्षण जेव्हा दंगलखोर आणि समाज स्वता करतील त्यावेळी सूर्योदय समजावा, नाहीतर रात्र अजून आहे... "जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहॉं है?" हेच आपल्या भाग्यी

Unknown said...

shut ur nd if need ours too bt start to act.....................it wont take more time..........thn v can design our INDIA as per our dream.

Pravin said...

GREAT POST. THOUGHT PROVOKING

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

चाबूक लेख, एकच फटॅक असले शब्द वापरून या लेखाची स्तुती करून झाली की आपण दुसरा ब्लॉग वाचायला मोकळे इतकी त्रयस्थ भूमिका निदान ११ ऑगस्ट २०१२ च्या दिवशी घडलेल्या घटनेशी संबंधित लेखांबाबत मला घेता येत नाही. मी या आणि अशा आशयाच्या लेखांवर प्रतिक्रिया टाळते पण तुझ्या लेखांची स्वतंत्र लिंक माझ्या इन-बॉक्समधे मिळाली. लेख वाचल्यावर रहावलं नाही म्हणून लिहितेय. आपल्या लेखांचं, कमेंट्सचं फलित काय रे? आपण फक्त चर्चा करतो.

तू फोटोची जी लिंक दिली आहेस त्या खालच्या कमेंट्स वाचल्या. ही लोकं नुसती फेसबुकावर चर्चा करून थांबत नाहीत. आत बरंच काही शिजत असतं. गुप्त सभा, खलबतं होत असतात. त्यातून कट रचले जातात. यांना देश, देशप्रेम याच्याशी काही देणघेणं नाही. "हमारी कौम" एवढंच त्यांना ठाऊक आहे. आज बांगलादेशच्या मुसलमानांवर अत्याचार झाले म्हणून दंगल केली. असं जर प्रत्येक देशातील मुसलमानांसाठी यांनी आपल्या देशाचं रणांगण करायचं ठरवलं तर आपण काय नुसतं बातम्या वाचून हळहळ व्यक्त करून मोकळं व्हायचं का? त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं पण हे नुसतं म्हणून उपयोग नाही, कृती करायला हवी.