Sunday, November 18, 2012

साहेब
रुद्राक्षाची माळ धरलेला ’तो’ हात उगारलेल्या बोटासकट वर झाला की मुंबई सारखं आंतराष्ट्रिय शहर दोन दिवस बंद व्हायचं. साधारण ८-९ वर्षांचा असेन, तेव्हा त्या घटानेचाचा अर्थ समजण्या इतका मोठही नव्हतो, पण मला इतपत स्वच्छ आठवतय की बाबरी पतन झाल्यावरती त्याबाबत जेव्हा सगळे खुसरपुसर करत बोलायचे, किंवा सोयीस्कर मौन घ्यायचे, तेव्हा शिवाजी पार्कवरती फक्त एकच आवाज जाहीरपणे घुमला होता "होय! आम्हीच पाडली बाबरी!". त्यामागचे तत्कालिन राजकिय, सामाजिक, धार्मिक संदर्भ व निवडणूकांतले फायदे तोटे यांच्या निकषांसकट असे जाहिर बोलणे देखिल फार जड होते. पण हेच जाहिरपणे सांगणारा दुसरा कोणी हरीचा लाल निघाला नाही हे देखिल तितकेच खरे.

खोटं कशाला बोला? ’राजकारण’ म्हणजे काय ह्याची बर्‍यापैकि जाणीव होईपर्यंत मी बाळासाहेब ठाकरे यांचा "भक्त" होतो, लहानपणी "सामना" या नावाखालती असलेले "बाळ ठाकरे" हे नाव, त्या भोवतीचं वलय, लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकणारी भाषणाची शैली हे सगळं माझ्याकरता अप्रुप होतं. पण मग वाढत्या वयानुसार शिंग फुटली शेकडो गोष्टि नव्याने पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या, समजून घेतल्या तशी राजकिय जाणीवांची व गरजांची क्षितीजं थोडी रुंदावली. आपोआप मी "भक्त" कॅटेगरीतून ’चाहता’ कॅटेगरीत आलो. त्यांची एखादि गोष्ट नाही पटली तर नाहि पटली हे सकारण सांगायचो. पण कॅटेगरी बदलली तरी त्यांच्याबद्दलचा आदर मात्र तोच होता, मी मनापासून चाहता नक्कीच होतो. माणूस दिलखुलास होता. आपली ताकद काय व कशात आहे ह्याची जाणीव असलेला नेता होता. ताकद असल्याने आपसूक एक बेदरकारपणा येतो तो देखिल भरपूर होता. बोलायला लागले कि भाषणं अनेकदा सभ्यपणाची पातळी ओलांडायचं. (त्यातून वाजपेयी - अडवाणी ऐकणार्‍यांना ते बोलणं अब्रह्मण्यम होतं. कदाचित संयुक्त महाराष्ट्रानंतरच्या पिढ्यांना अत्रे फारसे किंवा अजिबातच ऐकायला मिळाले नाहीत म्हणून असेल, पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र या भाषेनी दचकायला कधी पासून लागला?) पण अत्रे म्हणाले होते तसंच बाळासाहेबांनी "आयुष्यात सगळं केलं, फक्त ढोंग केलं नाही", (अर्थात राजकारणात याला अपवाद ठेवावा लागतोच.) जे काही आहे ते तोंडावरती. जे बोललो त्याची सगळी जबाबदारी घेऊन. "मला तसं बोलायचं नव्हतं" हे वाक्य नंतरची सारवासारव करावी लागते तेव्हा अनेकजण वापरतात, बाळासाहेबांवरती ही वेळ आल्याचं मला आठवत नाही.


एकच पक्ष, एकच नेता, एकच ठिकाण, एकच दिवस आणि थोडि थोडकी नव्हे तर तब्बल सलग साडेचार दशकं ... लाखो लोकं त्याच ओढीने लाखांच्या संख्येने जमत, जगात दुसरं उदाहरण असेल तर दाखवावं. तुम्ही अनेकांना थोडावेळ, कींवा थोड्यांना बराचवेळ मुर्ख बनवू शकता पण अनेकांना नेहमीच मुर्ख बनवू शकत नाही. त्या माणसात असं काहितरी नक्किच होतं की सामान्य माणूस रस्त्यावरती उतरायचा. त्या सामान्य माणसात पोट भरलेला पांढरपेशा उच्च मध्यम वर्गिय किंवा एकंदरच मध्यमवर्गिय किती हा प्रश्न अलाहिदा, तसा तर तो कुठल्याच पक्षाच्या पाठी नसतो. मुश्किलीने एखादि सभा गाजली तर ठीक होतं पण ४५-४६ वर्ष तुम्ही दारु प्यायला देऊन, पैसे वाटून लाखोंची गर्दि नाहि खेचू शकत हे कुणीही मान्य करेल. साहेबांवरती लोकांच अफाट प्रेम होतं. त्यांना हिंदुहृदयसम्राट वगैरे म्हंटलं की काही सो कॉल्ड उच्च शिक्षित आणि ओपन माइंडेड लोकं कुत्सित हसतात, पण ९३ च्या दंगलीत मुंबई २ दिवसात कुणी शांत केली? ६ दिवस मार खाणारा हिंदू नंतरच्या २ दिवसात कसा उसळला होता? शिवसेना भवनात झालेल्या मिटींग मध्ये "तुम्ही हातात बांगड्या भरल्यात का?" ह्या साहेबांच्या एकाच प्रश्नाचा तो परीणाम होता हे नाकारु शकत नाही हे देखिल तितकच खरं. आजही शिवसैनिक रस्त्यावरती तलवारी घेऊन उभे राहिले आणि आम्हांला सुरक्षित वाटलं, आमच्या घरची माणसं आता नीट घरी येतील याची खात्री पटली हे सांगणारी अनेक माणसं भेटतील. परवा १३ नोव्हेंबरला देखिल "बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक आहे" हे ऐकून वडापाव विकणार्‍यापासून ते बड्या धेंडांपर्यंत मातोश्रीवरती रीघ लागली. परत सांगतो दोघांची कारणं वेगळी असतीलही पण त्यामागे "ताकद" होती, मग ती प्रेमाची असेल कींवा राजकिय असेल.

अनेक जण विचारतीलही की काय केलं त्यांनी, की इतका पाठींबा देता? तर याचा अर्थ एकच त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीतले त्यांचे काम माहित नसावे, किंवा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावरती देखिल मराठी माणसाचे गुदमरलेपण ’मार्मिक’ च्या माध्यमातून कसं बाहेर आणलं. त्या मार्मिकच्या फटकार्‍यांनी अनेक जण विव्हळले होते हे त्यांच्या लक्षात नसेल. आज "मराठी" हा मुद्दा घेऊन आज दुसरे देखिल उभे राहिले आहेत पण अजूनही मराठी माणसाला मुंबईत कुणी हक्क दिला, त्याची अस्मिता कोणी जागृत केली? ह्या प्रश्नाचं उत्तर एकच "बाळ ठाकरे". दुसरी गोष्ट - प्रबोधनकारांचा वारसा असेलही पण सेनेत जात बघितली गेली नाही. बाकिच्या पक्षात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री बसावा व त्याबदल्यात दुसर्‍या जातीचा उपमुख्यमंत्री बसवून मांडवली करावी, असं शिवसेनेत कधी दिसलं नाही. मुळात शिवसेना - भाजपा सत्तेत आली ती बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचारामुळे. ९० सालच्या मंडल आयोगाला विरोध करुनही ९५ साली ते निवडून आले ह्यावरुन काय ते समजावं. सत्तेत न रहाता रीमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणे फार कमी लोकांना जमते, त्याची सुरुवातही बाळासाहेबांनीच केली म्हणा ना. म्हणजे मुख्यमंत्रीपदापेक्षा शिवसेनाप्रमुखपद मोठं होतं (अर्थात ही चांगली गोष्ट नाही हे माझेही मत आहे पण ती घडून गेलेली गोष्ट आहे जे आज नाकारता येत नाही.), हे बाळासाहेबच करु जाणे. मग ह्याला कोणी हुकूमशाही म्हणेल, कुणी झुंडशाही म्हणेल, कोणी आंधळा अनुययही म्हणेल, कुणाला तो पक्ष फक्त गुंडांचाही वाटतो, पण संपूर्ण मुंबई बंद करुन दाखवायची ताकद शिवसेनेत तेव्हढी होती हे देखिल तितकेच खरे. बरं ज्यांना विरोध व्हायचा त्या विरोधकांना ठाकरी भाषेचे सपकारे बसून देखिल विरोधक कधी दात-ओठ खाऊ बाळासाहेबांवरती तुटून पडले नाहीत उलट राजकारणाबाहेर सगळ्यांशीच त्यांचे संबध चांगलेच राहिले. पवार आणि मी बीअर प्यायला बसतो हे भर सभेत सांगणारे बाळासाहेबच.

शिवसेनेची कार्यपद्धती सगळ्यांहुन वेगळी होती. लहान लहान शाखांतून त्यांनी पक्षाची केलेल्या बांधणीने पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवले. अनेक चेहरे नसलेल्या लोकांना त्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार बनवले. कदाचित लोकांची नस त्यांनी ओळखली होती. घरात उदंड लेकरं असली की वेळ पडल्यास बाहेर घराची पडती बाजू सावरायला त्यात एखादं वांड पोरगं असावं म्हणतात. बाळासाहेबांची "शिवसेना" तशी होती. बाळासाहेबांची शिवसेना अश्या करता कारण साहेब स्वत: सगळं बघत होते तोवर आलबेल होतं. नंतर वयोमानाने किंवा इतर कारणांनी शिवसेनेच्या रोजच्या कामातून त्यांनी लक्ष कमी केलं त्यानंतर शिवसेनेतुन अनेक जण अनेक कारणांनी बाहेर पडले, कुठली कारणं कोण बाहेर पडलं ते इथे लिहित बसण्याचे प्रयोजन व वेळ नाही. खुद्द बाळासाहेबांना अखेर "या चिमण्यांनो परत फिरा रेऽ" म्हणावं लागलं होतं. पण बाहेर पडलेल्या लोकांतही भाषणांत साहेबांवरती पलटवार करण्याची धमक नव्हती. त्यामागे नवीन ’ठाकरी’ टोला येण्याची "भीती" तर होतीच पण बाळासाहेबांना उलट उत्तर देणं हे एकूण महाराष्ट्राच्याच कल्पनेबाहेरचं होतं. मात्र इथे एक कडवट गोष्ट मांडावी लागते आहे की सध्याच्या शिवसेनेचा ’दरारा’ संपलाय, कारण तो असता तर मुळातच CSTची दंगल करण्याची कुणाची छाती झालीच नसती. कींवा आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्यातील भाषणात साहेबांनाही "म्हातारी उडता नयेची तिजला..." चालीवरती आर्जवे करत "उद्धव - आदित्यला सांभाळा" हे सांगण्याची वेळ आली नसती. आयुष्यभर केवळ आदेश देणार्‍या साहेबांचे, ते काहितरी मागणारं चित्र न बघवणारं होतं इतकं शेवटी मी नमुद करु इच्छितो.


आज तरी दूर दूरपर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या इतका भक्कम नेता दिसत नाही. २०१४च्या निवडणूकांचे निकाल काय असतील ते माहीत नाही पण २०१४ च्या निकालांवरती १७ नोव्हेंबर २०१२ चा ठसा असणार आहे हे नक्की.

उद्याच्या महाराष्ट्रात बाळ ठाकरे नाहीत ही एकंदरच अस्वस्थ करणारी बाब आहे. ती राजकिय पातळीवरची जितकी आहे तितकी वैयक्तिक पातळीवरची देखिल आहे. आणि ही माझीच नाही तर करोडो मराठी माणसांची भावना आहे. आजकाल कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे गल्लीबोळातून भाऊ, भाई, दादा वगैरे उगवत आहेत. अधून मधून एखाद्या नावामागे साहेब देखिल लावले जाते, पण कुठलही नाव न घेता केवळ "साहेब" म्हंटलं की एकच नाव डोळ्यापुढे यायचं आणि येईल.

बाळासाहेबांसारखा माणूस गेल्यावरती राहुन राहुन दासबोधातला मृत्युनिरुपणाचा समास आठवतो -
"मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥
मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥
मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥१३॥

कारण आज हे पुन्हा लोकांना सांगावं लागतय असा माणूस गेलाय!

 - सौरभ वैशंपायन.