Saturday, January 24, 2015

मै तो सुपरमॅन ...

मध्ये काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरती मेसेज आला होता, संभाजी महाराजांबाबत. शंभूराजांचं अमानवी वर्णन त्यात केलं होतं. उंची सात फुट काय? आणि तलवारीचं वजन ६५ किलो काय? सिंह-वाघांचे जबडे हाताने उभे फाडत ... वगैरे वगैरे बरच काही. कपाळाला हात लावावा इतकाही तो मेसेज विशेष नव्हता. त्या आधी शिवाजी महाराजांवरती देखिल एक मेसेज फिरत होता - व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने रायगडवर येऊन तिथली माती बॅग मध्ये घेतली, सुभाषबाबू हिटलरला भेटायला गेले तेव्हा हिटलर शिवरायांवरचे पुस्तक वाचत बसला होता; अश्या अनेक सुरस रम्य कथा त्यात होत्या. हे मेसेज हसून सोडून द्यायचे असतात.

आपले राष्ट्रपुरुष हे "अमानवी" किंवा १००% आदर्शांचा  आणि फक्त सद्गुणांचाच तितका पुतळा असायलाच हवेत हा आपला हट्ट का असतो हे मला समजत नाही. मुघलांसमोर हार न मानलेले सगळे महायोद्धे अश्या अनुयायी + मावळ्यांसमोर आपली तलवार निमुटपणे म्यान करतात. मला शाळेच्या अभ्यासक्रमात जनार्दन लवंगारेंचा "महापुरुषांचा पराभव" म्हणून एक धडा होता. महापुरुषांचा पराभव हा शत्रू करत नाहीत तर त्याचे अनुयायीच करतात हे सप्रमाण त्यांनी सांगितले होते. तो धडा दुसर्‍या चालीवरती वाचायची गरज मला वाटली. म्हणजे नेत्याने - आदर्शाने जे नीतीनियम घालून दिले त्याला हरताळ फासणे हा वेगळाच मुद्दा आहे, मात्र आपल्या आदर्शाने काडीचीही चूक करता कामा नये ... नव्हे!!! त्यांनी चूक केली असेल तरी ती चूक नव्हतीच हा जो काही आपल्या समाजाचा हट्ट असतो त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे.

ते क्षत्रियकुलावतंस शिवाजीराजे झाले म्हणून झोपतानाही कंबरेला तलवार असायलाच हवी ही अपेक्षा करणारे आपल्याकडे बहुसंख्य मिळतात हे स्वानुभवाने सांगतोय. बरं, चार खर्‍या गोष्टि ह्यांना ससंदर्भ समजवाव्यात तर "महापुरुषांचा" अपमान झाला असं गावभर बोंबलत फिरतात. आजकाल सोशल नेटवर्किंगच्या साईट्स असल्याने भोंग्याच्या रिक्षांचे पैसे देखिल भरायची गरज उरलेली नाही. म्हणजे जसं पोरगं उकाड्याने कितीही कावलं असलं तरी बहुतांशी आयांचा त्याला गोंड्याची कानटोपी चढवायचा जो हट्ट असतो; त्याच पद्धतीने इतिहासातील महापुरुषांच्या मोठेपणाची हौस ह्या महाभागांनाच असते. मोबाईलवरती आलेले मेसेज व कादंबर्‍या हे ह्या महाभागांचे "संदर्भ" असतात. वरुन ते महापुरुष जातीनिहाय वाटून घेतलेले असतात. आंबेडकरवादि सावरकरांकडे बघत नाहीत, सावरकरवादि गांधींकडे बघणार नाहीत, गांधीवादी कुणाकडेच बघणार नाहीत.

मी तरी खोटं का बोलू? ८-१० वर्षांपूर्वीपर्यंत मी सावरकरांपलीकडे बघत नव्हतो. पण वय, वाचन, अक्कल वाढत गेली तशी निदान दुसर्‍या बाजूचं म्हणंणं ऐकायची तयारी झाली. फाळणीच्या बाबतीत डॉ आंबेडकरांचे बरेचसे विचार "प्रॅक्टिकल" होते. वास्तवाला धरुन होते तर सावरकरांचे विचार हे कितीही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते तरी ते आत्यंतिक आदर्श असे "हिंदू" विचार होते. व मुळात हातातली परीस्थिती कुठल्याही कारणाने निसटल्यावर सावरकरांचे ते विचार प्रत्यक्षात येऊ शकत नव्हते ह्याची जाणीव झाली. शिवाय स्वा. सावरकर अथवा डॉ. आंबेडकर हे "इतिहासकार" खचितच नव्हेत ह्याची जाणीव झाली. ते "विचारवंत" होते असं म्हणता येईल व त्यांच्या दृष्टिने समाज जसा होता अथवा व्हायला हवा होता ती उदाहरणे इतिहासातून हुडकून लोकांसमोर ठेवली. स्वा. सावरकरांवरती जसा आत्यंतिक व एकांगी हिंदूत्वाचा शिक्का मारुन लोकं मोकळे होतात तसेच डॉ आंबेडकरांवरती देखिल धम्माबाबत त्यांनी जे विचार मांडले त्यावर धम्मप्रसारासाठी डॉ. आंबेडकरांच्याही १०० वर्ष आधीपासून काम करणार्‍या जगभरातील संस्थांनी "श्रीयुत आंबेडकरांनी त्यांना हवा तो धम्म मांडला खरा धम्म नव्हे!" अशी टिका केली होती. या प्रकारच्या समकालिन टिका आपण लक्षात घ्यायला हव्यात. त्यांच्यात काही तथ्य असेल तर निदान ते ध्यानात घ्यायला हवे.

मुळात महापुरुष असोत अथवा आपल्या दृष्टिने खलपुरुष असोत पहिल्यांदा त्या गुणदोषांसकट इतिहासातील ते पात्र स्वीकारायला हवं. तरच इतिहास समजायला सुरुवात व मदत होते. खलपुरुषांचा चांगला गुण अथवा महापुरुषाचा वाईट गुण नाकारुन काही मिळणार नसते ना इतिहास बदलणार असतो. शिवाय जे कर्तृत्व गाजवले अथवा ज्या चूका झाल्या त्या पूर्वायुष्यात कि उत्तर आयुष्यात ह्यावर विचार व्हायला हवा. आधी चूका करुन नंतर इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असे काही अचाट - अफाट करुन दाखवले असेल तर उत्तमच. मात्र राघोबांसारखे आधी अटकेपार झेंडे गाडायचे व नंतर इंग्रजांशी चुंबाचुंबी करायची असे असेल तर कपाळाला हात लावावासा वाटतो. अर्थात अटकेपारचा झेंडा ही जमेची बाजू घ्यायची व उत्तर आयुष्यातून काय करायचं नाही? हे शिकायचं. इतिहास हा धडा घेण्यासाठी असतो. एकमेकांच्या उरावर बसण्याकरता नव्हे हे समजून घ्यायची वेळ आली आहे.

शेकडो वर्षांनी अथवा काही दशकांनी आपल्याला एकसंध इतिहास दिसू शकतो, आधीच्या व नंतरच्या घटना संगतीवार दिसतात पण त्याकाळी तो इतिहास "LIVE" असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. दुसरी गोष्ट  इतिहासातील पात्रांची मनोभूमिका आपण अनेकदा लक्षात घेत नाही. सर्वात मोठे उदाहरण छत्रपती शंभूराजे. आजकाल - "शंभूराजे मुघलांना जाऊन मिळाले ते शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा मुघलांना चकवायला ठरवलेला संयुक्तिक राजकिय डाव होता." असं सांगितलं जातं. पण त्यात घरातल्या स्त्रीयांना कसं काय समाविष्ट केलं ह्याचं उत्तर कोणी देत नाही. वर्षभर आघाडी शांत ठेवायची म्हणून भूपाळगड प्रकरण होऊ देतील? भूपाळगडावरती सातशे जणांचे हात तोडले गेले, भूपाळगड पाडला गेला. हे केवळ एक डाव म्हणून शिवराय कसे होऊ देतील? ती संभाजी महाराजांची तरुण वयातल्या उसळत्या रक्ताची चूक होती हे लक्षात घ्यायला हवं. उलट संभाजीराजे त्यांच्या शीघ्रकोपी स्वभावाला धरुनच वागले. शीघ्रकोप हा त्यांचा स्वभाव होता त्याला कोणी काहीच करु शकत नाही. त्या शीघ्रकोपी व्यक्तित्वासकट त्यांचा इतिहास मान्य करायला हवा. आणि हा शीघ्रकोप पुढेही गोवा स्वारीत पोर्तुगीज विजरई दिसल्यावर वहात्या पाण्यात घोडा घालणे असो अथवा कलशाची बाजू घेऊन शिर्क्यांवर केलेला हल्ला असो कायम दिसून येतो. एखादा गुण चांगला की वाईट हा प्रश्नच नाही परीस्थितीनुरुप तो गुण चांगला - वाईट असा बदलू शकतो. त्यामूळे शीघ्रकोपी शंभूराजांचे व्यक्तित्व एकदा लक्षात घेतले की इतिहास सुटसुटित होतो.

संभाजीराजांची मनोभूमिका अत्यंत शांतपणे लक्षात घ्यायची गरज आहे. सख्खी आई नाही. वयाच्या नवव्या वर्षी राजकारणासाठी मुघलांचा मनसबदार म्हणून जावं लागतं, मागोमाग आग्र्याचं जीवघेणं संकट, जीव वाचावा म्हणून का होईना पण खुद्द वडीलांनीच जिवंतपणी श्राद्ध घालणं,  मग परत मुघलांशी शांतता हवी म्हणून पुन्हा मनसबदार होणे. हे सगळं वयाच्या १२-१४ पर्यंत बर्‍याच अंशी अनाकलनिय असेलही. वडील सांगतात ते चांगलच असेल हा समजूतदारपणा असेलही, पण शारीरिकच नव्हे तर जे वैचारीक दृष्ट्या उमलण्याचं फुलण्याचं वय असतं त्या वयात संभाजीराजे जगावेगळ्या मनस्थितीतून गेले ह्यात वाद नाही. अश्या घडामोडी कुणा पिता-पुत्राच्या आयुष्यात आल्यासं दुसरं उदाहरण नाही. उलट म्हणूनच मुघलांना जाऊन मिळणे अथवा पुढे शिवाजी महाराज जिवंत असताना अघोर मार्गाला जाऊन केलेला कलषाभिषेक असो, संभाजी महाराजांच्या जुन्या दुखावलेपणाची संगती लागायला सुरुवात होते. आज ३५०-३७५ वर्षांनी आपण बघताना शिवराय हे सगळं सगळं स्वराज्यासाठी करत होते हे आपल्याला समजतं पण आपण मागे जाऊन संभाजीराजांच्या त्या त्या वयात स्वत:ला त्या जागी ठेवायचा प्रयत्न जरी केला तरी मनात शेकडो प्रश्न उभे रहातात.

जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची त्या - त्याक्षणी एक राजा अथवा राजपुत्रच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून जे वाटलं ते त्यांनी केलं. आपण दोहोंची बाजू समजून घ्यायला हवी. खासकरुन शंभूराजांची. आणि बाजू समजून घेणे म्हणजे जे कटू घडलं त्यावर मखमालिशी करणं नव्हे. संभाजीराजे अत्यंत बुद्धीमान होते आणि अश्या माणसांची घुसमट लवकर होते. त्यांच्या मनासारखं व त्यांना आव्हान देईल असं काम मिळालं नाही की अश्या बुद्धीमान लोकांच "आपली इथे किंमत नाही" हे मत फार लवकर बनतं. कदाचित अश्याच परीस्थितीत मनाचा कोंडमारा होऊन ते मुघलांना जाऊन मिळाले. मात्र ते ज्या तिरमीरीत उठून मुघलांना जाऊन मिळाले त्याहून जास्त ओढीने स्वराज्याकडे परत आले. आपलं ऐकणारं इथे कोणीच नाही संतापाच्या भरात आपण आपल्याच माणसांना त्रास दिलाय हे ज्याक्षणी लक्षात आलं त्याक्षणी त्यांनी परतायचा निर्णय घेतला.

दुसरी गोष्ट बाकरें गुरुजींना दिलेले दानपत्र एक -एक ओळ सुटी करुन वाचली की संभाजीराजांचे संपूर्ण व्यक्तीमत्व तपशीलवार डोळ्यासमोर उभे रहाते. ते स्वत: संभाजीमहाराजांनी दिलेले दानपत्र असल्याने ऐतिहासिक दृष्ट्या ते अमुल्य आहे. यामध्ये ते आजोबा शहाजीराजे व वडिल शिवाजी महाराज यांच्या शौर्याची, पराक्रमाची, दानशूरतेची, प्रजाहीतासाठी असलेल्या तळमळीची प्रचंड स्तुती करतात. मात्र शिवराय "वडिलांच्या भूमिकेत कमी पडले" असा सूर एका वाक्यात दिसून येतो. ते सगळं वाचताना पंचपक्वानात कचकन दाताखाली बारिकसा खडा यावा तसं एकक्षण वाटतं, पण संभाजीराजांच्या बाजुचा विचार करता यात मला काहीच वावगे वाटत नाही. मी परत सांगतो जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची. शिवाजी महाराजांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. पण त्यात ते कुटुंबाला वेळ देऊ शकले नाहीत आणि ते शक्यही नव्हतं. अन्यथा स्वराज्य उभं रहातंच ना. पण वडिलांकडून मुलाच्या ज्या अपेक्षा असतात त्यांची अपेक्षा संभाजीराजांनी उमलत्या वयात केली असेल व व्यस्त वेळामुळे महाराज त्या पूर्ण करु शकले नसतील तर संभाजीराजांची घालमेल होणं स्वाभाविक होतं.

वडील - मुलाच्या नात्यातला हा तडा इतरही अनेक थोरा मोठ्यांच्या बाबतीत दिसून येतो. मग ते लोकमान्य टिळक - श्रीधरपंत टिळक असोत अथवा महात्मा गांधी व हरीलाल असोत. लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक भूमिकेत अजिबात पटत नसे. त्याचे पडसाद अगदी केसरी विरुद्ध मूकनायक अश्या स्वरुपातही उमटले. पण लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत हे मात्र बाबासाहेबांचे जीवलग मित्र बनले. बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की बाळ गंगाधर टिळक हे खरे लोकमान्य नव्हेत. तर श्रीधरपंत हेच खरे लोकमान्य. श्रीधरपंत देखिल बाबासाहेबांना इतके जवळचे मानत की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचे पत्र लिहीले ते डॉ आंबेडकरांना. श्रीधरपंतांचं असं जाणं बाबासाहेबांनाही भावनिक पातळीवरती फार हेलावून टाकणारं होतं. तीच गोष्ट गांधीजी व त्यांचा थोरला मुलगा हरीलालची. तुम्ही असाल जगासाठी बापू - महात्मा ... "माझे वडील कुठे आहेत?" हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. व त्यांना तो प्रश्न पडायचे कारण सर्वात मोठा पुत्र असल्याने वडिलांचा आपल्या हातातून सुटत चाललेला हात त्यांनी अनुभवला होता. इंग्लंडला जाऊन वकिलीच्या उच्च शिक्षणाबाबत वडिलांनीच घेतलेली विरोधाची भूमिका ही "स्वातंत्र्यसैनिक" म्हणून घेतलेली होती. तो नकार एक तरुण, काहीतरी करुन स्वत:ला सिद्ध करायला धडपत असणारा "मुलगा" म्हणून हरीलाल यांच्या मनाला लागणं हे आपण समजून घ्यायला हवं. ह्या नात्यांच्या नाजूक गाठी हलक्या हातानेच सोडवाव्या लागतात. दोहोंची भूमिका समजून घ्यावी लागते.

इतिहास हा दरवेळी तलवारींनी खेळलेला - रक्ताळलेला नसतो. त्याला नात्याचेही अत्यंत हळवे पदर असतात. ते हातावर बसलेल्या फुलपाखरागत हळुवार हाताने सांभाळावे लागतात ह्याचं भान आपल्याला यायला हवं. एकदा संभाजीराजांची मनोभूमिका अंशत: अनुभवली तरी संभाजीराजे मुघलांना जाऊन मिळाले ह्यावर पांघरुण घालायची गरज उरत नाही. उलट नंतर त्यांचा त्या सगळ्यातून बाहेर पडून डोळे दिपवून टाकणारा पराक्रम व मृत्यूलाही धीरोदात्तपणे सामोरे जाणारी वीरवृत्ती अजून लखलख करत तेजाळते.

मी काय लिहीलय हे कदाचित काही त्रस्त समंधांना समजणारही नाही. तो त्यांना महापुरुषांचा अपमान, संभाजीराजांना बदनाम वगैरे करण्याचा डाव वाटेल कारण ती लोकं झोपतानाही कंबरेला एक अदृष्य़ तलवार लटकवून झोपतात. ह्याच त्रस्त समंधांपासून इतिहास जपण्याची विनंती करणारा हा लेख. आपले महापुरुष सुद्धा "माणूस" होते "सुपरमॅन" नव्हते. त्यांनाही राग-लोभ-प्रेम-तिरस्कार-भीती-करुणा अश्या सहाजिक मानवी भावना होत्या. त्यांच्या हळव्या भावना आपण समजून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही तर स्वत:ला अनुयायी तरी का म्हणवून घ्यायचे? आपले हट्ट व अवाजवी अपेक्षांचे ओझे इतिहासातील महापुरुषांच्या खांद्यावर टाकणे आपण थांबवायला हवे. एखाद्या मेसेजमध्ये कधीच न घडलेल्या गोष्टी ठोकून देऊन महापुरुषांना मोठे करण्याइतके आपण मोठे झालो नाही ह्याची जाणीव ठेवावी. महापुरुषांनी आधीच इतके करुन ठेवले आहे की त्यांना खोट्या ठिगळांची गरज नाही. त्यामुळे जगातल्या सगळ्याच गोष्टिंची अपेक्षा एकाच व्यक्तीकडून करण्यात काही हशील नाही हे आजकालच्या वैचारीक "सुपरमॅन" असलेल्यांनी समजून अमानवी मेसेज तयार करणे अथवा अजून पुढे दहा जणांना पाठवणे थांबवायला हवे.

अजून काय लिहीणे? सुज्ञ असा!

 - सौरभ वैशंपायन.

14 comments:

मुक्त कलंदर said...

महापुरुषांना प्रत्येकजण त्याच्या वैचारिक कुवतीनुसारच स्वीकारतो. किंबहुना प्रत्येकजण महापुरुषांना त्यांच्या सोयीनुसारच दाखवतात. लेख अतिशय उत्तम जमला आहे आणि विश्लेषण अगदीच बारकाईने झाले आहे.

Some Little Greens said...

chhaan lihileyt ...

purna patale nasel kadachit .. pan avadale ..

Nitin Tonge said...

Noticeable attempt to elaborate the subject, below links may further elucidate the topic.

https://www.youtube.com/watch?v=GtVmIfIgMsc

https://www.youtube.com/watch?v=kSPPAdQjqXU

https://www.youtube.com/watch?v=HKBGoqbmcJs

links are three lectures delivered by Prof. Narhar Kurundkar at Nanded, sometime in mid seventies and was chaired by
Ranjeet Desai.

Unknown said...

Saurabh ... Tujha vachan prachand ahe ani tu nustach vachun sodun det nahis tar tyacha vishleashanahi uttam prakare kartos he tujha lekh vachun patla ... itihasaha chya modification var tu bollas mhanun tula ek athavan karun dyavishi vatte ... Shivaji Maharajanche guru mhanun aslela Dadoji Kondadevancha ullekh jevha itihasachya pustakatun kadhanyacha mudda upasthit zalela tevha fakt samanya samandh jantach navhe tar tathakathit thor itihaskarannihi tyala virodh darshavla hota ... aplya samajat ek varg kayamch asa asel jyala ekhadi chook manya karun tyat badal karna mhanje gabharyatlya devala baher payryanvar anun basavnya itka apavitra vatta ... tyach devache abhar manayche ki apan tyatle nahi _/\_

Mi suddha kahi divasanpurvi blog lihayla ghetlay ... Tuza abhipray kalala tar khup avadel ...

-Nikita

Ruchira Dandgaval said...

manala bhidnara lekh...navin drushtikon milala...atyant surekh...!!!

Unknown said...

manala patnara lekh... navin drushtikon milala... atyant surekh...!!!

Yogesh Alekari said...

पारखड... या लेखाची गरज आहेच आत्ता....

ॐकार केळकर said...

"महापुरुषांचा पराभव" हा रोज अनुभवास मिळतो. सर्वच्या सर्व मोठ्ठ्या व्यक्तींचा पराभव काही प्रमाणत का होईना, झाला आहे, आणि तोही त्यांच्या अनुयायांकडूनच…
सौरभचा हा लेख त्याच्या अभ्यासातून निर्माण झाला आहे.
"निर्माण झाला आहे" असे म्हणायचे कारण म्हणजे संभाजी राजांच्यावर बनवलेल्या मेसेज चे नुसते संदर्भ देऊन खंडन करता आले असते. त्यातली चूक दाखवून संभाजी महाराजांचा मोठेपणा/महानता ह्या फालतू मुद्द्यात तोलू नये असे मांडता आले असते. मेसेज महत्वाचा न धरता, त्यामागील मुद्दा महत्वाचा धरून भावना प्रकट केल्या आहेत.

Unknown said...

बहोत खूब ।

लिहित राहा ही विनंती _/\_

Unknown said...

बरोबर लिहल आहेस मित्रा !!!

http://gauravssonsale.blogspot.in/?m=1 हां माझा ब्लॉग pls read it

Maitri Yuva Foundation said...

" नात्याचेही अत्यंत हळवे पदर असतात, ते हातावर बसलेल्या फुलपाखरागत हळुवार हाताने संभाळावे लागतात याचं भान आपल्याला यायला हवं...."

काय अप्रतिम लिखाण केले आहे.....

Unknown said...

"महापुरुषांचा पराभव" हा धडा जनार्दन वाघमारेंचा होता, जनार्दन लवंगारे हे एक अभिनेते आहेत याची कृपया नोंद घ्यावी.. लेख अतिशय चांगला आहे..!!

​​भटक्या योगी said...

​​खूपच सुंदर लेख !
आजकाल सोशियल साईट्स वरून आलेले मेसेज जराही शहनिशा न करता बिनधास्तपणे फोरवर्ड केले कि आपण पण काहीतरी 'समाज प्रबोधन?' केल्याच समाधान काही महाभाग करवून घेतात. खरतर थोड्या प्रयत्नाने आपण यात खरं काय हे जाणून घेऊ शकतो, पण whats-app आणि facebook हीच ज्यांची 'संधर्भ-साधने' आहेत, त्यांना कशाचे सोयर-सूतक नसते, महापुरुष आहे ना मग द्या ठोकून काहीपण आणि बरं का यांना अनुयायांची पण कमी नाही. स्वतःच्या इतिहासाबद्दल अनास्था हि मोठी शोकांतिका आहे, हे चित्र बदलावयास हवे. बाकी लेख फक्कड जमलाय, अशा विचारांची खरंच आज गरज आहे.

​​भटक्या योगी said...

​​खूपच सुंदर लेख !
आजकाल सोशियल साईट्स वरून आलेले मेसेज जराही शहनिशा न करता बिनधास्तपणे फोरवर्ड केले कि आपण पण काहीतरी 'समाज प्रबोधन?' केल्याच समाधान काही महाभाग करवून घेतात. खरतर थोड्या प्रयत्नाने आपण यात खरं काय हे जाणून घेऊ शकतो, पण whats-app आणि facebook हीच ज्यांची 'संधर्भ-साधने' आहेत, त्यांना कशाचे सोयर-सूतक नसते, महापुरुष आहे ना मग द्या ठोकून काहीपण आणि बरं का यांना अनुयायांची पण कमी नाही. स्वतःच्या इतिहासाबद्दल अनास्था हि मोठी शोकांतिका आहे, हे चित्र बदलावयास हवे. बाकी लेख फक्कड जमलाय, अशा विचारांची खरंच आज गरज आहे.