Saturday, March 28, 2015

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही


श्रीराम - श्रीकृष्ण ह्या लोकोत्तर महापुरुषांच्या कार्यावरती अतुलनिय महाकाव्ये लिहिली गेली. ह्या दोघांनी आपले एकंदरच आयुष्य किती व्यापुन टाकले आहे ह्याचा विचार करताना मजा वाटू लागते. रोजच्या लहान सहान गोष्टी घ्या. कुणा भावंडामध्ये प्रेम दिसलं की - "बघा राम-लक्ष्मणांसारखी जोडी आहे" असे आपण म्हणतो. लहान मुलांच्या लीला ह्या "कृष्णासारख्या" असतात. आज्ञाधारी मुलगा हा "रामासारखा" असतो तर सतत मुलींच्या गराड्यात असलेला "कान्हा" असतो. उदाहरणे सुद्धा आपली जागा बदलत नाहीत. एक मर्यादा पुरुषोत्तम दुसरा अमर्याद पुरुषोत्तम. दोन व्यक्ती दोन टोके. ह्यांना आपल्या आयुष्यातून वजा केले तर? संस्कृती समजवणारी २ महाकाव्ये, अनेक कथा, हजारो काव्ये, हजारो गाणी, हजारो चित्रे निघून जातील. जगण्यातून "राम" निघून जाईल. माझ्या मते श्रीराम हा आत्म्याप्रमाणे आहे तर श्रीकृष्ण मना सारखा आहे. आत्म्याला जन्मभर शरीराची मर्यादा सांभाळावी लागते मन मात्र अमर्याद संचार करु शकतं. शरीरातुन आत्मा गेला कि देह निष्प्राण होतो अशी समजुत आहे .... आयुष्यात अथवा एखाद्या गोष्टीत राम राहिला नाही असेच आपण म्हणतो. तेच मनाबाबत म्हणाल तर मन आपल्या ताब्यात नसून आपण मनाच्या ताब्यात असतो हे कुणालाही मान्य होईल.पण आपली गोची अशी आहे की स्वत:वर मर्यादा आलेल्या चालत नाही आणि अमर्याद वागणं आपल्याला झेपत नाही.

याक्षणी मी मुद्दामहुन रामावरती लिहायला बसलोय. म्हणजे हा विषय अनेक दिवस डोक्यात होताच, व्हॉट्सअ‍ॅपच्या एका ग्रुपवरती राम - सीता - अग्निदिव्य वगैरे अगदि जुजबी चर्चा झाली त्याने परत ह्या विषयाने डोक्यात बागडायला सुरुवात केली. आधी अनेक वर्ष मलाही ह्याबाबत काही कळत नव्हतं. राम आपोआप IPC खाली आरोपीच्या पिंजर्‍यात ऊभा केला जात असे. पण मग हळुहळू काही गोष्टी नव्याने वाचनात येऊ लागल्या काही गोष्टी आपणहुन उलगडल्या जाऊ लागल्या. २०१४-२०१५ मध्ये राहुन आपण काही शे अथवा काही हजारवर्षांपूर्वीची समाजव्यवस्था व समाजमान्यता काय होती हे समजून घ्यायला हवे. आपण उलटे करतो त्यांना समजून घेण्या ऐवजी आपली मते आपण आदर्शांवरती लादतो. मात्र आपण २०१५ चे भारतीय संविधान त्या काळाला लागु करुन चालणार नाही ह्याची जाणीव होत गेली तशी विचारांना वेगळी दिशा वेगळी वाट मिळाली.

श्रीराम अथवा श्रीकृष्ण ह्यांना आपण आधीच देवत्व देऊन त्यांच्या प्रत्येक कृतीला गुदमरवून टाकतो. यांनी केली ती दैवी योजना होती म्हणून विचार चिरडून टाकले जातात. पण त्यांना माणसात आणले तर त्यांनी "माणूस" म्हणून केलेले कार्य अवाढव्य आहे ह्याची जाणीव होऊन मग ही माणसे  Larger than life बनतात. रामाबाबत विचार करतोय तेव्हा सगळे काव्य फुलोरे आपण बाजूला ठेवू. अमानवीय गोष्टी, चमत्कारांची जळमटे दूर करु. तसेच आधीच रामाला आरोपिच्या पिंजर्‍यात न ढकलता रामायणकालीन व त्याबरोबर अगदि अलीकडच्या काळाचाही विचार करुन बघायचा हा प्रयत्न आहे. लोकांना माझी मते पटतीलच असेही नाही व ती पटवून घ्यावीतच असाही हट्ट नाही.

मुळातच रामायण अथवा रामाचे आयुष्य हे "मर्यादा" सांभाळण्यात गेले आहे. समाजमानस व राम दोन्ही चौकटी मोडणारे नाहीयेत हे लक्षात घ्यावे लागेल. यद्यपी शुद्धम् लोक विरुद्ध नाकरणीय़म्‌ नाचरणीयम्‌ ..... चांगली गोष्ट असली तरी बदल नको. आहेत ते नियम काटेकोरपणे पाळू, उगीच प्रवाहा विरुद्द जाणारा रामही श्रीकृष्णाप्रमाणे क्रांतिकारी वगैरे नाही आणि जनता त्याहुन नाही. "जैसे थे" परीस्थिती मान्य करणारे समाजमानस रामायणात सतत डोकावते. मला याक्षणी कुठले कांड व त्यातील नेमका श्लोक आठवत नाही मात्र रामाच्या एका पूर्वजाला काही नियम मोडले म्हणून राज्यत्याग करावा लागल्याचा उल्लेख वाचल्याचे स्मरते. रामाची निवड देखिल सभा भरवुन दशरथाचे मोठे लांबलचक भाषण होऊन मग झालेली आहे. मी म्हातारा झाल्याने मला राज्य चालवणे आता जमत नाही असा सूर लावून ज्याला "जाणीव" अथवा ताकद नाही तो राज्य चालवण्यास उपयुक्त नाही वगैरे वगैरे बरेच काही सांगुन दशरथ रामाचे व त्याच्या गुणांचे कौतुक करुन राम हे राज्य चालवायला माझ्या दृष्टिने योग्य आहे असेही मत मांडतो. मात्र पुढे तो जनतेला विचारतो कि "तुम्हांला हे मान्य आहे का? राम तुम्हांला राजा म्हणून चालेल का? अजुन कोणाचे/मध्यस्थांचे काही विरोधी विचार असतील तरी त्यांनी नि:शंक मनाने मांडावे त्यातुन भलेच होऊ शकेल!" -


यदीदम् मेऽनुरूपार्धं मया साधु सुमन्त्रितम् |
भवन्तो मेऽनुमन्यन्तां कथं वा करवाण्यहम् ॥१५॥
यद्यप्येषा मम प्रीतिर्हितमन्यद्विचिन्त्यताम् |
अन्या मद्यस्थचिन्ता हि विमर्दाभ्यधिकोदया ॥१६॥ (अयोध्या कांड सर्ग २)

हे ऐकल्यावर सर्व जनता खुष झाली सर्वजण रामाचा जयजयकार करु लागले. त्यावर दशरथ गंमतीने म्हणतो - "अरे हे काय? रामाला राजा म्हणून तुमची मान्यता मिळताच मी तुम्हांला अप्रिय झालो बहुदा!" थोडक्यात राजा आहोत म्हणून वाट्टेल तसा राज्यशकट हाकला जात नसे. राजा हा जनतेच्या मान्यतेवरती निवडला जात असे हेच यातून दिसते.

ही रामाला "राजा" म्हणून मान्यता मिळताना "आनंदाची" घटना ह्या करीता आधीच सांगितली कारण साधारण समाजमन व राजाची मानसिकता कुठे झुकली होती हे समजेल. राम वनवासाला निघेपर्यंत व्यक्ती अथवा लोकांच्या समुहाची आनंद अथवा दु:खाची वर्णने ही एका चौकटीबाहेर गेल्याची उदाहरणे मिळत नाहीत. रामायण हे काव्य एकंदरच पुलंच्या कथाकथना मधील त्या पिंजर्‍यातील पोपटाप्रमाणे मीरची खात खात "अहिंसा - सत्य - अस्तेय"  हेच परत परत म्हणणारे आढळते. वाली देखिल मरताना फिल्म मधल्या शेवटचे श्वास मोजणार्‍या भारत उर्फ मनोज कुमार सारखा बडबड बडबड करत - रामाशी "शास्त्रार्थाची" चर्चा करत करत शेवटी स्वत:ची चूक मान्य करुन मरतो.

यानंतर मुख्य प्रसंग म्हणजे सीतेचे अग्निदिव्य व पुढे अयोध्येत पोहोचल्यावर सीतेचा त्याग. रामायण वाचताना रामाच्या प्रतिमेला पहिला धक्का तेव्हा बसतो जेव्हा रावणवध झाल्यावरती बिभीषण सीतेला सन्मानपूर्वक रामासमोर आणतो तेव्हा पूर्ण रामायणात एकदाच रामाचा तोल सुटलेला दिसतो. सीता समोर आल्यावरती चारचौघात तो तिला अद्वातद्वा बोलतो. मी तुला मुक्त केले आहे सर्व दिशा तुला मोकळ्या आहेत तुला हवे तिथे तू जाऊ शकतेस. तुला इथे उपस्थित असलेला किंवा नसलेला दुसरा कुणी पुरुष आवडला तर तू त्याच्या बरोबर उरलेले आयुष्य व्यतीत करु शकतेस. मी तुझ्या स्वीकार करु शकत नाही. रावणाने तुझ्यावरती कशावरुन जबरदस्ती केली नसेल? वगैरे वगैरे बरेच काही आणि २-३ तुरळक ठिकाणी तर असंबद्ध बोलताना आढळतो. हा भाग आतापर्यंत वाचलेल्या संयमी रामाशी अजिबातच संगती लावता येत नाही इतका टोकाचा संतापी राम उभा केला आहे. (गदिमांनी याच प्रसंगावरती गीत रामायणात "सखी सरले ते दोघांमधले नाते" हे गाणे लिहिले आहे.)  एक अख्खा सर्ग ह्यावरतीच आहे. मग सीतेचा सहाजिक विलाप आणि संताप ह्यावरती पुढचा सर्ग आहे. सीता रामाचा धिक्कार करते आणि लक्ष्मणाला चिता रचायला सांगते. आणि अग्नीचे स्मरण करुन त्यात प्रवेश करते. म्हणजे थोडक्यात रामाने अग्निपरीक्षा मागितली नाहीये आणि सीता अग्निपरीक्षा देत नसून संतापून जीव देते आहे असा सीन आहे. तीने अग्नित प्रवेश केल्यावरती एक अख्खा सर्ग देवता खाली येऊन रामाचे व सीतेचे गुणगान करतात सीतेचा स्वीकार कर म्हणून गळ घालतात. तोवर ही अग्नीमध्ये "वेटिंग" मोडवरती. मग पुढल्या सर्गात अग्निच प्रकट होतो. सीतेचा हात धरुन रामासमोर तीला ऊभी करतो आणि ती माझ्या तेजाहुनही पवित्र असल्याची साक्ष देतो मग राम आनंदाश्रु ढाळत स्वत:च्या मुळ स्वभावाला जागुन अत्यंत मृदुभाषी झालेला आढळतो. ज्याप्रमाणे सूर्य व प्रकाश वेगळे नाहीत तसेच सीता आणि मी वेगळे नाहीच, माझा सीतेवरती पूर्ण विश्वास आहे. मात्र त्याच बरोबर अग्नी देवाची साक्ष मिळाल्याने कोणी हिच्यावरती संशय घेणार नाहीत तसेच मलाही कामांध बनून सीतेचा स्वीकार केला असे म्हणणार नाहीत. हीचे पावित्र्य इतके प्रखर आहे की रावण हिचे काहिच वाकडे करु शकणार नव्हता. असे बरेच कोडकौतुक करताना आढळतो. ४ सर्गांची संगती लागता लागत नाही.

शांत, संयमी, मृदुभाषी, एक वचनी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम असलेला राम अख्या रामायणातले आपले रुप ह्या ३-४ सर्गांकरतो सोडतो आणि अयोध्येला निघताना पुन्हा आपला शांत, संयमी, मृदुभाषी, एक वचनी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम होतो. माझा सांगायचा मुद्दा असा की हा भाग उत्तर रामायणा प्रमाणेच प्रक्षेप आहे का? अशी स्वाभाविक शंका येते म्हणजे ज्या काळात स्त्रीयांना मर्यादा घातल्या जाव्यात अशी आचरट धारणा पक्कि होत गेली व काळाच्या ओघात स्त्रीयांना घरात कोंडले गेले त्याकाळात हा भाग आला असावा का? लोकांनी मुळ वाल्मिकी रामायण नक्की वाचून माझ्याप्रमाणे त्यांनाही हेच वाटतं का ते तपासून बघावे. मला इथे रामाची वकीलीही करायची नाहीये अथवा मला हा भाग अडचणीचा वाटतो म्हणून तो प्रक्षेप आहे असेही मला म्हणायचे नाही.  एकतर मी म्हणालो तसे चमत्कार काव्य फुलोरे बाजुला ठेवुन आपण असा विचार करु की सीता संतापून अग्निदिव्याला (अथवा जीव द्यायला) तयार झाली तरी पेटलेल्या चितेत जाऊन जिवंत परत येणे अथवा अग्नीपुरुष प्रकट होणे वगैरे सरळ सरळ भाकड कथा आहेत. आता रामायण कालिन अग्नि अथवा कुठलीही दिव्ये कशे होती कल्पना नाही मात्र शिवकालात अथवा पेशवाईत कुठल्या पद्धतीची दिव्य करावी लागत त्याची कल्पना देतो. त्या दिव्यांना कुठलाही वैज्ञानिक अथवा प्रमाण आधार नाही. पंचमहाभुतांची भीती  ... खोटं बोललं तर ती शक्तीच शिक्षा करेल ही भाबडी भावना असे. अग्नीदिव्य म्हणजे एक तापलेला आगीचा लालबुंद गोळा ज्याने अग्निदिव्य घ्यायचे कबूल केले त्याला दोन हिरव्या पानांमध्ये धरुन उचलावा लागे. त्या आधी तो पुरेसा गरम आहे हे लोकांना कळावे म्हणून त्यावरती पेंढ्याच्या काड्या टाकत त्यांनी पेट घेतलेला बघितला की तो पुरेसा तापलेला गोळा उचलायचा व तिथून काही पावले जी काही पन्नास - शंभर ठरलेली असतील ती पावले शांतपणे चालत जाऊन दुसर्‍या पेंढ्याच्या भार्‍यावरती टाकायच्या म्हणजे तो पेंढा जळत असे. ह्या दरम्यान त्याचा हात पोळला, त्याने तो गोळा खाली टाकला अथवा दुसर्‍या टोकाला असलेल्या पेंढ्याला आग लागली नाही तर हा माणूस खोटं बोलतोय असं समजलं जात असे. दुसरे असे जलदिव्य. म्हणजे काय तर जो दिव्य करणार आहे त्याने पाण्यात बुडी मारायची त्याच्या शेजारी एक धनुर्धारी व दुसरा एक पोहणारा असे दोघेजण असत. ह्याचे डोके पाण्याच्या खाली गेल्याक्षणी धनुर्धर बाण चालवणार. तो बाण पाण्यात अथवा काठावर कुठेही जाऊन पडला कि पोहायला उभा असलेला माणुस तिथवर जाणार व गेल्या मार्गानेच परत येणार. हे होईपर्यंत  डोके वर काढायचे नाही. माणूस परत आला की पाण्यात डुबकि मारलेल्याला वरती खेचणार. ही अशी दिव्ये असत. ज्यांना काही लॉजिक नाही. असेच काहीसे दिव्य सीतेने केले असावे का?

उत्तर रामायण मी आधी म्हणालो तसा सरळ सरळ प्रक्षेप आहे. कारण वाल्मिकी रामायणात शेवटच्या सर्गात रामाने पुढे दहा हजार वर्षे सुखाने राज्य केले. त्याच्या राज्यकालात कुनीच दु:खी नव्हते, रोग, वन्यप्राणी वगैरेंपासून प्रजाजन सुरक्षित होते वगैरे रामराज्याची कल्पना आहे. त्याच्या पिढ्यांनी देखिल सुख उपभोगले हे सांगुन रामायण जो कोणी वाचेल त्याचे कसे भले होईल ह्याची जंत्री दिली आहे. म्हणजे सीता - लक्ष्मणाचा त्याग वगैरे मुळ रामायणात नाही. आता तरीही उत्तर रामायणाचा विचार करायचा म्हंटलाच तर आपण हे लक्षात घ्यायला हवे की रामाची पत्नी कोण असावी? हा लोकांचा आक्षेप नसून राजाप्रमाणेच आमची राणी आदर्श व चारीत्र्याची पुतळी असावी हा आग्रह आहे. रामही जनतेच्या मागणीसाठी तिचा त्याग करतो. तिला वनात पाठवून पुन्हा तिच्याशी काहीच संपर्क ठेवत नाही. मात्र आपण हे देखिल लक्षात घ्यायला हवे की तो दुसरे लग्न करत नाही, राजा असून भूमीशय्या करतो, एकभुक्त रहातो, ब्रह्मचर्य पाळतो, यज्ञ समारंभात सीतेची मुर्ती बनवून घेतो. अखेर सीतेला धरणीने पोटात घेतल्यावर आपला देखिल अवतार संपला ह्याची जाणीव होते ... थोडक्यात त्यालाही आयुष्यात रस उरत नाही मात्र स्वत: देहत्याग करण्या आधी एका घटनेत तो शब्द दिला असल्याने लक्ष्मणाचा देखिल त्याग करतो. कथेनुसार होते असे की रामाच्या अवतार समाप्तीचा निरोप घेऊन काळपुरुष रामाला भेटायला येतो व सांगतो मी देवलोकांतुन काही निरोप घेऊन आलो आहे. तो तुला सांगायचा आहे मात्र आपल्या बोलण्याच्या मध्ये कुणीही खंड पाडू नये. राम त्याला वचन देतो की जर कोणी मध्ये आलंच तर त्याला देहांत प्रायश्चित्त देईन. बाहेर सर्वात विश्वासु म्हणून लक्ष्मणाला पहार्‍यावरती उभे करतो. थोड्याच वेळात दुर्वास तिथे येतात व मला रामाची भेट हवी म्हणून हट्ट करतात. लक्ष्मण प्रेमाने, आदराने, गयावया करुन सर्व प्रकारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. पण उलट ते अजून चिडतात व रघुकुलासकट अयोध्येलाच शाप देण्याची धमकि देतात. नाईलाजाने लक्ष्मण त्या खोलीचा दरवाजा उघडून दोघांच्या बोलण्यात व्यत्यय आणतो. काळपुरुष अदृष्य़ होतो. राम दुर्वासांची भेट घेतो. मात्र काळपुरुषाला दिलेल्या शब्दानुसार राम लक्ष्मणाला बोलावतो आणि सांगतो - "मी तुला माझ्यापासून दूर जायला सांगतो आहे, कारण माझ्यापासून दूर जाणे हेच तुला मृत्युसमान आहे! हेच तुझे देहांत प्रायश्चित्". लक्ष्मणही रामाला नमस्कार करुन सरळ शरयुवरती जाऊन जलसमाधी घेतो. म्हणजे राजपदासाठी एकट्या सीतेचा त्याग केला का तर नाही. राजा म्हणून दिलेला शब्द पाळायला त्याने लक्ष्मणाचाही त्याग केला आहे. राजमर्यादा सांभाळताना त्याने स्व:ता सगळ्या मर्यादा आखून घेतल्या व त्या पाळल्याचे रामायण - उत्तर रामायण सांगते. तिथे त्याने स्त्री - पुरुष भेद केला नाही.

सीतेवरती रामाचे किती निरातीशय प्रेम होते हे त्याच्या सीता हरणानंतरच्या विलापातुन दिसते. सीतेसाठी अठरा पद्मं वानर जमा करतो, जीव पणाला लावून तो युद्ध करतोच की. त्या ३-४ सर्गांनंतर परत राम - सीता दोघही "जैसे थे". अख्या रामायणतल्या त्या तीन असंबद्ध सर्गांसाठी रामाला एका बाजूने सरसकट झोडपले जाऊ नये. इतकेच म्हणणे मांडायला मी हा लेख लिहिला आहे. उत्तरकालात स्त्रीयांना धार्मिक रुढी परंपरांच्याखाली दडपून टाकायला कुणीतरी रामाचा वापर केला हा रामाचा दोष नाही. २०१५ चे नियम व रामायणकालिन नियम हे एक असूच शकत नाहीत. मी उत्तर रामायणाला तसेही फारसे महत्व देत नाही. मुळ वाल्मिकी रामायण मी म्हणालो तसे वाचून बघावे. माझे म्हणणे पटतय का त्याचा विचार व्हावा.

बाकी राम हा म्हणालो तसा आत्मा बनला आहे. आपल्या संस्कृतीत अखेरचे नाम हे रामनाम असावे असे मानले जाते इतका राम अभिन्न भाग झालाय. उत्तरेपासून दक्षिणेत लंकेपर्यंत ते पार तिथे पलीकडे इंडोनेशियापर्यंत रामायणाच्या पाऊलखुणा सापडतात. वडिलांनी दिलेल्या शब्दाखातर वनवास स्वीकारायचा, वनवासात पत्नीचे अपहरण झाल्यावरती शोध घेत घेत दंडकारण्य ओलांडायचे,  राज्य मिळवून देऊन सुग्रीवावरती उपकार करुन त्याची मदत घ्यायची, रावणाच्या राज्यात सत्तेची इच्छा कुणाला आहे हे ओळखुन बिभिषणाशी संपर्क साधायचा, समुद्रातुन सेतु बांधायचा, रावणाचा पराभव करुन त्याला मारुन त्याच्या पाठीराख्यांची गठडी वळायची, राजकिय, सामरिक व इतर नीती नियमांचा - आदर्शांचा - कारणांचा - परिणामांचा विचार करुन ते राज्य स्वत: न उपभोगता बिभीषणाच्या पदरात टाकणे आणि परत येणे ..... हे सगळं भव्य दिव्य आहे.त्याने दिपून जायला होतं आणि समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात तसा राम पाठीराखा भासायला लागतो आपोआप हात जोडले जातात व मुखातुन श्लोक बाहेर पडतो -

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे?
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥

 - सौरभ वैशंपायन

6 comments:

इंद्रधनु said...

काही गोष्टींची अचानक fashion निघते तशी सीतेचा त्याग केला म्हणून रामाची निंदा करण्याची fashion निघाली होती. पण निंदक हे सोयीस्कररीत्या विसरतात की तो सामान्य माणूस नसून राजा होता, त्यामुळे पतीधर्म पाळणं हे जसं त्याचं कर्तव्य होतं तसंच राजधर्म पाळणं हे देखील! आणि सत्ययुग असल्यामुळे वैयक्तित कर्तव्यांपेक्षा राजधर्म नक्कीच मोठा होता. फार वाईट वाटतं की सगळ्या शक्यता लक्षात न घेता फक्त टीकेसाठी म्हणून टीका केली जाते.

आशा जोगळेकर said...

त्या त्या काला च्या रीती प्रमाणे वागायला राजा ही नियमबध्द असतो।
आजच्े नियम त्याला लावून कसे चालेल.

Unknown said...

good analysis

shankar shenai said...

This is just awesome. This is difficult topic. Many restrictions zero freedom subject. You handled it so nicely. At times, you appear even stronger than the Character. You are great. You seems to be among the few who realizes Ram & Ramayan very well. God bless you. Keep writing.

अहिर भैरव said...

सौरभ रामायणाचे उत्तर कांड हे वाल्मीकिंचे नाहीं।हे आता अगदी स्पष्ट झालयं। जवळपास सर्व अभ्यासक वर्गाने हे मानले आहे। म्हणुनच अग्नि परीक्षा व शबरी कथा या तर्क संगत नाहींत।

खुपच छान लेख मित्र।

डॉ. प्रज्ञा देशपांडे said...

राम समजुन घेण्यात राम असेल तर ना! लेखनात राम ाहे हो !!!!