Thursday, June 4, 2015

मास्तर - KEY



वसंत वसंत लिमये, ऐकायलाच हटके असलेलं नाव. जसं नाव तसा माणूसही एकदम हटके. जवळच्या माणसांसाठी "बाळ्या", नवख्यांसाठी "सर" आणि ह्या दोहोंच्या मधल्यांसाठी "मास्तर." माणूस दिलखुलास. एखादी गोष्ट मनात आली की घोळ घालत न बसता काम करुन मोकळा होणारा. माझ्या आठवणीप्रमाणे माझे ट्रेकवरचे २ लेख वाचून खुली दाद द्यायला म्हणून आपणहून मास्तरांनी मला फोन केला होता तिथे आमची औपचारीक ओळख झाली. गिर्यारोहण क्षेत्रात वावरणार्‍या लोकांसाठी "वसंत वसंत लिमये" हे नाव किती मोठं आहे हे वेगळं सांगायला नको, त्यांचा आपणहून आलेला फोन ही माझ्यासाठी अर्थात मोठी गोष्ट होती. ४ वर्षांपूर्वी तो फोन त्यांनी का केला होता? हे मला आत्ता २-३ दिवसांपूर्वी समजलं जेव्हा त्यांच नवं पुस्तक "कॅम्प फायर" हातात पडलं. ट्रेकिंगच्या सुरस रम्य कथा हा आम्हांला त्यावेळी जोडणारा धागा होता. वास्तविक "कॅम्प फायर" हे त्यांचे पहिले पुस्तक नाही, आधीही अनेक ठिकाणी स्तंभलेखन, लघुकथा लेखन, "धुंद-स्वच्छंद" हे पुस्तक आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ असणारी अत्यंत वेगवान कथानकाची "लॉक ग्रिफिन" हि कादंबरी त्यांच्या लेखणीतून उतरली आहे. पण ह्या नव्या पुस्तकाची - बात ही कुछ और है।

मला स्वत:ला "Story teller" व्हायची इच्छा आहे. आपण घेतलेला अनुभव किंवा सुचलेली कल्पना सांगताना समोरच्या माणसांनी खुर्चीची टेकली पाठ सोडून उत्सुकतेनं पुढे झुकून बसायला हवं हे माझं स्वप्न आहे. मास्तरांशी माझी ओळख वाढत जाण्यामागचं हे एक कारण. मास्तर स्वत: एक उत्तम  "Story teller" आहे हे मी स्वानुभवावरुन सांगतो. कॅम्प फायरची पानं पलटताना देखिल ह्याचा अनुभव येत रहातो. मुळात निलेश जाधव यांनी तयार केलेलं पुस्तकाचं मुखपृष्ठंच झकास उतरलंय. त्यातल्या डोंगराच्या चित्राचा हाताला जाणवणारा खरखरीतपणाच उत्सुकता चाळवणारा आहे. आतली प्रत्येक लेखांना अनुरुप काढलेली रेखाचित्रे सुद्धा अत्यंत सुरेख झाली आहेत.

हे पुस्तक म्हणजे वसंत लिमयेंनी स्वत: ८० आणि ९० च्या दशकांत वेगवेगळ्या मासिकांत, वृत्तपत्रात त्यांच्या डोळस भटकंतीच्या अनुभवांवरती जे स्तंभलेखन केले त्याचं संकलन आहे. वास्तविक माझं अर्धं पुस्तक वाचून झाल्यावरच पुस्तकावरती लिहायचा मोह अनावर झाला होता, पण त्यावर ताबा ठेवून आधी पुस्तक पूर्ण केलं आणि आत्ता लिहायला बसलो.  प्रत्येक लेख अनुभवांचा खजिना आहे. वाचता वाचता आपण मास्तरांबरोबर तिथे त्या जागी जाऊन पोहोचतो. पुस्तकाचं नावंच इतकं मस्त ठेवलंय - "कॅम्प फायर" ..... ट्रेक अथवा भटकंतीच्या रात्री शेकोटीभोवती जागवत ट्रेकच्या, प्राणी-पक्षांच्या, जंगलाच्या, इतिहासाच्या, माणसांच्या आणि अगदी भूताखेतांच्या अश्या जगभरच्या गप्पा मारण्याची मजा काय असते ती ट्रेकर्सना विचारा. तो अनुभव घेतला नसेल तर स्वत: घ्या .... आणि कुठल्याही कारणाने ते पण झेपणारं नसेल त्यांनी निदान हे पुस्तक वाचा. या पुस्तकाची तुलना मी "सिंहासन बत्तीशी" बरोबर करेन. जशी दर रात्री सिंहासनावरची एक एक पुतळी जिवंत होऊन विक्रमादित्याची गोष्ट सांगते तसंच पुस्तकाची दिड - दोन पानं जिवंत होतात आपल्याला गोष्ट सांगतात. मास्तर सुरुवातीचे २-३ परीच्छेदच अशी वातावरण निर्मिती करतात कि ते सगळं समोर घडायला लागतं. डोंगर दर्‍यातुन फिरला असाल, गिर्यारोहणातील चार तांत्रिक बाबी माहीत असतील तर ह्या "कथाकथनाची" मजा अजूनच वाढते.

अडीच - तीन हजार फुटी कोकणकड्याला सर करणारा हा माणूस कोकणकडा संबधीत चार लेखात त्यांच्या सगळ्या ग्रुपची सगळी उरफोडी धडपड मांडतो ती वाचूनच थकायला होतं. इतका वेडेपणा करायची काय गरज? हा प्रश्नही काहींना पडेल आणि त्याची उत्तर पुस्तकाच्या इतर लेखात निश्चित सापडतील. सह्याद्रि अथवा हिमालयातील माहीती देणारं हे पुस्तक नव्हे. गिर्यारोहणातील तांत्रिक बाबींचा खल करणारं देखिल नव्हे पण हे त्यांच्या काही दशकांतील अनुभवांचे गाठोडे आहे. हे पुस्तक वाचून ट्रेकिंग मधलं सगळ सगळं समजेल असंही नाही कारण व्यक्तीपरत्वे अनुभव बदलतात व ते अनुभव स्वत: घेणं हाच सर्वोत्तम मार्ग. पण निदान कसं वागावं? हे नक्कीच समजेल. हे बरे - वाईट अनुभव रक्त आटवूनच मिळतात.

हे पुस्तक म्हणजे पांढर्‍यावरती काहीतरी काळं आत्मस्तुतीपर लेखन नव्हे. बहुतांशी वेळा लिहिताना मास्तरांनी "आम्ही सगळे" हा  ट्रेकिंगचा नियम लिखाणात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे पाळलाय. १९८२ - ८३ साली स्कॉटलंडला जाऊन त्यांनी आऊट डोअर एज्युकेशमध्ये टिचर्स डिप्लोमा पूर्ण केला. सह्याद्रि - हिमालय आणि युरोपातल्या भटकंतीचा प्रचंड अनुभव ह्या व्यक्तीने घेतलाय. आज ह्या माणसाचा शब्द गिर्यारोहण क्षेत्रात फार लक्षपूर्वक ऐकला जातो. चुकणार्‍यांचा हक्काने कान पकडावा इतका अधिकार आज निश्चित त्यांच्याकडे आहे. लिमयेंचे लिखाण अथवा कार्यक्रमांमधले भाषण अथवा अनुभवकथन हे केवळ शब्दांचे मनोरे नसतात. गिर्यारोहण क्षेत्रात एक जबरदस्त गोष्ट म्हणजे समजा तुम्ही अथवा तुमच्या चमुने आजवरती अस्पर्शित शिखर सर केले तर त्याला नाव द्यायचा मान त्या व्यक्ती अथवा चमूला मिळतो. नाव देताना काही अलिखित बाबी सांभाळाव्या लागतात जसे - ते नाव आजुबाजूच्या परीसराला साजेसे असावे, त्याने त्या शिखराचे वैशिष्ट लक्षात यावे. एव्हरेस्ट सर करण्याआधी शेर्पा तेनसिंग व एडमंड हिलेरी यांनी सरावासाठी हिमालयातील बद्रिनाथ परीसरातील एक शिखर सर करायचा प्रयत्न केला होता, त्यात त्यांना काही कारणाने अपयश आले होते. पुढे एका चमूने तो सर केला, त्या चमुचे ग्रुप लिडर होते वसंत वसंत लिमये - त्या शिखराला नाव दिले - "एकदंत" आता बद्रिनाथ परीसरात ३ शिखरे झाली - निलकंठ, पार्वती व त्या दोहोंमध्ये तुटलेल्या दातासारखा दिसणारा "एकदंत". ह्या शिवाय कुमॉंऊ भागात त्रिधार, खड्गधुरा आणि उत्तरधुरा अशी अजुनही तीन अस्पर्शित शिखरांना नाव देण्याचा मान लिमये व त्यांच्या चमूला मिळालाय. गिर्यारोहण क्षेत्रात वावरणार्‍यांना ज्यांच्या अंगाखांद्यावरती आपण खेळलो त्यांचेच बारसे करण्याचा हा मान नक्की काय असतो हे समजेल. आयुष्यात ४ वेळा ही संधी मिळणं हा केवळ नशिबाचा भाग नव्हे. त्यासाठी स्वत:ला त्या हजारो फुटी दोरांवरती झोकून द्यावं लागतं. कभिन्न कातळाला भिडावं लागतं. कंबरभर बर्फात खसर-फसर करत पाय ओढावे लागतात. तेव्हा हे मोठेपण येतं. अनेकदा कल्पनेबाहेरची किंमत चुकवावी लागते. स्वत:च्या जीवाशी खेळावं लागतं. दुर्दैवाने आपले साथीदार गमवावे लागतात. हे सगळं केल्यानंतर मागे उरतो तो "अवलिया" बनतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे नाही लागत. निसर्ग कधी कुरवाळून तर कधी धपाटे घालून तुम्हांला शहाणं बनवतो. ह्या प्रवासात इतर अवलियेही भेटतात. मग यात्रेत चार क्षणांकरता भेटलेले फकिर गप्पा मारता मारता कसे चिलीम फिरवतात? तशीच जगण्याचीही मैफिल सजते. मास्तरांच्या आयुष्यात आलेले असे काही अवलियेही त्यांनी आवर्जून नमुद केले आहेत.


मी पूर्ण लेखात वसंत लिमयेंचा उल्लेख अनेकदा "मास्तर" असा मुद्दामहुनच केलाय कारण खरंच हा माणूस "मास्तर" आहे - सह्याद्रीच्या  "blackboard" किंवा हिमालयाच्या "whiteboard" वरती शिकवणारा "मास्तर". त्या अनुभवांची एक "मास्तर - key" देखील आहे त्यांच्याकडे. त्याच मास्तर-key ने भटकंतीची दारं उघडायची असतील हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं ..... चुकलं .... मास्तरांच्या समोरील त्या शेकोटीभोवती बसायला हवं ..... पानं पलटता पलटता "कॅम्प फायरची" मजा घ्यायलाच हवी.

  - सौरभ वैशंपायन


8 comments:

Prashant Pimpalnerkar said...

झकास !

Shrikant Kelkar said...

Chhan

Shrikant Kelkar said...

Chhan

Unknown said...

Kharach Sundar!! Afat anubhavancha gathavda jama kelela Firasta' n atyant manapasun Goshti sangnara Balya!! And a very well written comment ! Must read Camp Fire!

Deepfitness said...

great article ! Captures what VV is very well!

Anonymous said...

shevatache chitra tumhi kaadhale ahe kaa? chhan ahe.

shankar shenai said...

Dear Saurabh, Beautiful write up. Master Key is beautiful appreciation of book by Shri Vasant Vasant Limaye. I have not read his book as I did not come across the same. You have an amazing writing style which I must mention here. God bless you dear Saurabh.

प्रसाद said...

मस्त लिहिलं आहे.
अगदी मनापासून लिहिल्याचं दिसून येतंय