Tuesday, August 2, 2016

लोकमान्य : एक गारुड



लोकमान्य टिळक हे गारुड आहे, "अफाट" हा एकच शब्द!

एक माणूस किती विषयांत पारंगत असावा? डोंगरी तुरुंगातील १०० दिवस हा त्यांच्या कार्याचा "ट्रिगर पॉइंट" म्हणता येईल. मग ह्या माणसाने मागे वळून बघितलेच नाही. आपला काळ त्यांनी एकहाती गाजवला. केसरी व मराठातुन पत्रकारिता, समाजकारण, देश पातळीवरील गुंतागुंतीचं राजकारण, शिक्षण - शाळा महाविद्यालये, "ओरायन" व "आर्क्टिक्ट: आर्यांचे वस्तीस्थान" या क्लिष्ट ग्रंथांचे लेखन, हे एकीकडे करत असतानाच दुसरीकडे ताई महाराज प्रकरण, विनाकारण गोवले गेलेले वेदोक्त प्रकरण, चिरोल केस, राजद्रोहाचे खटले, काळे पाणी, काळ्या पाण्याच्या काळातच गीतारहस्या सारखा अतुलनीय ग्रंथ उतरवुन काढायचा, बंगालच्या फाळणीला विरोध, लखनौ करार, शिवजयंती - गणेशोत्सव, हे चालवलं होतं. आपल्याला वाचून धाप लागते, त्या महापुरुषाने ते सगळं धडाडीने पार पाडलं. दुसरं कुणी असतं तर चरख्यातल्या ऊसाच्या चिपाडागत हालत झाली असती पण हा माणूस मंडालेहुन परत येतो काय? आणि "पुनश्च हरी ॐ" म्हणतो काय? त्यांचे काम मोजता मोजता दम लागतो पण टिळकांच्या अष्टावधानी व्यक्तित्वाचा शोध संपता संपत नाही. कितीही शोध घेतला तरी हा माणूस प्रत्येक ठिकाणी दशांगुळे उरतोच. आजकालची अनेक क्षेत्रातली मोठ्या सावलीची पण वास्तवात खुजी लोकं बघितली की टिळकांचे रुप अजून विराट व्हायला लागते. एकाचवेळी हा माणूस इतक्या वेगवेगळ्या आघाड्यांवरती सर्जनशील काम करत होता काही आघाड्यांवरती "लढत" होता.

त्यांना नसतील का सांसारिक व्याप? त्यांच्या आयुष्यात हळवे कोपरे नसतील का? त्यांना शारिरीक व्यथा नव्हत्या का? मुलाशी तात्विक वाद, मंडाले मध्ये असताना सहचारीणी सोडून गेल्याची आलेली तार, केसरी सांभाळताना केलेली आर्थिक तडजोड? ह्या माणसाने मनात आणलं असतं तर सगळं सोडून सरकारी वकिली करुन सुखात नसता का राहू शकला? लब्धप्रतिष्ठितांत सहज ऊठबस करु शकला असता. टिळकांवरती आजकाल हीनपातळीवरची जातिय टिका वाचून ऐकून मन निराश आणि डोकं सुन्न होतं. ज्या माणसाने इंग्रजांना राजकिय हादरे दिले, नाकाने कांदे सोलणार्‍या इंग्रज सरकारला चक्कर येऊन कांदे हुंगायला लागावेत अश्या गरगर करणार्‍या आवर्तनात ढकलून दिले त्याची आजची केली जाणारी किंमत समाजाची बौद्धिक पातळी किती खालावली आहे त्याची निदर्शक आहे.

टिळक काय किंवा कुठलेही स्वातंत्र्यपूर्व नेते काय त्यांनी केलेली अग्निदिव्य एकतर आजच्या पिढीला माहीत नसतात, माहीती झाली तरी तो नेता कुठल्या जातीचा होता? ह्यावरती झुंडि झुंडिंनी त्याचा स्वीकार अथवा धिक्कार होतो. स्वातंत्र्य जन्मताच फुकटात मिळालं की हे असं होतं. हे दिशाहीनपण देशाला कुठे घेऊन जाणार नियतीच जाणे.

बाळ गंगाधर टिळक - केसरी संपादक - बंगालचे बडेदादा - लोकमान्य टिळक - टिळक महाराज हा प्रवास थक्क करणारा आहे. टिळकांना लोकांनी ईश्वराचा अंश मानायला सुरुवात केली होती. शंख -चक्र - गदा- गीतारहस्य असे चतुर्भुज रुप असलेले चित्रही बघायला मिळते. टिळकांवरती राजद्रोहाचे ३ खटले झाले, पण राजद्रोही तोच लोकमान्य हे समीकरणही पक्के झाले. भारतातला पहीला गिरणी कामगारांचा संप मुंबईत झाला कारण होते टिळकांना झालेली ६ वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा. हा संप ६ दिवसांचा होता. ज्यावेळी गिरण हा मुंबईच्या चलनवलनाचा एक भाग होता तो सहा दिवस उत्स्फुर्तपणे बंद होता ह्यावरुन टिळकांवरील लोकांचे निरातीशय प्रेम समजेल.

आमुचा वसंत कुणी नेला।
त्यावाचूनि जनहृत्कमलांचा बाग म्लान झाला।।धृ।।
या पुण्योत्सवकालाला
टिळकतुकोबा देशभक्तीच्या का न कीर्तना आला?
वाल्मीकि म्हणू टिळकाला।
स्वतंत्रतेचे जो रामायण नित्य कथी विश्वाला।।
आम्हाला मोक्षाला नेण्याला।
ज्ञानेश्वरी केसरिपत्रिका ज्ञानेश्वर तो बनला।।
तह देशाचा करण्याला।
नरवर गाजी शिवाजी दिल्लीला का गेला?
कथी न्यायदेवते मजला।
टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला।।
- कवी गोविंद

लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्ह कवी गोविंदांनी केलेले कवन - "टिळक विठोबा केव्हा येईल पुण्यपूर पंढरीला" ही ओळच सर्व काही सांगुन जाते. लोकमान्य हे लोकांच्या मनातील अढळ श्रद्धास्थान होते; ती जागा आजवर कुणी घेऊ शकले नाही. आजही "केसरीकार टिळक" हा पत्रकारितेमधला मापदंड आहे.

टिळकांच्या आयुष्यातील प्रकाशात असलेल्या गोष्टी इतक्या आहेत की त्यावर अनेक खंड सहज लिहुन व्हावेत ...... मग मौन धरलेल्या इतिहासाच्या पोटात अश्या किती गोष्टी असतील ज्या केवळ मौखिक होत्या? केवळ टिळकांच्या शब्दांवरती राजकारणाचे, क्रांतिकार्याचे पट रचले - उधळले गेले असतील?


- सौरभ वैशंपायन.





1 comment:

App Development Bangalore said...

I really appreciate your professional approach. These are pieces of very useful information that will be of great use for me in future.