बाई ठेवणे, अंगवस्त्र, नाटकशाळा, रक्षा, दासी, वेशस्त्रिया वगैरे उल्लेख आपण इतिहासात अनेकदा ऐकतो. त्याबाबत अर्थात खूप गैरसमज असतात. वास्तविक "चारीत्र्य" बघून मग "चरीत्र" ठरवण्याचा आपला "भारतीय" दृष्टीकोन इतिहासाचे फार मोठे नुकसान करतो असे माझे मत आहे. कारण एखादि व्यक्ती सामाजिक/धार्मिक/आर्थिक/राजकिय कारणांनी कितीही थोर असली तरी ज्याला आपण ठराविक मापदंड लावून तथाकथित "स्वच्छ" चारीत्र्य वगैरे म्हणतो त्यात ती व्यक्ती बसत नसेल तरी आपण बहुतेकवेळा त्या व्यक्तीवरती फुल्ली मारुन मोकळे होते. त्यातून ती व्यक्ती स्त्री असेल तर बघायलाच नको.
या लेखाच्या सुरुवातीला ज्या संज्ञा वापरल्या त्यांचा उल्लेख आल्यावरती आपल्या डोक्यात पहीला विचार येतो तो राजाने अथवा त्या पुरुषाने "शरीरसुखासाठी" केलेली सोय असा आणि इतकाच असतो. इतिहासाचा अभ्यास करताना माझ्यामते एकतर बंद दरवाज्याआड ती व्यक्ती काय करते? हा आपला प्रश्न असूच शकत नाही. तरीही ह्याबाबत बोलायचे झालेच तर सुरुवात राजवाडेंनी लिहीलेल्या "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" काय होता हे समजुन मग करावी लागेल. निसर्गातील इतर बहुसंख्य प्राण्यांप्रमाणेच मुक्त लैंगिक संबध ते एकपती/पत्नीत्व हा प्रवास मानवी समाजजीवनातील बदलत राहीलेला पैलू आहे. व यापुढेही तो बदलत रहाणार. ह्यावर अनेक धक्कादायक चर्चा व लेख होऊ शकतात.
रामायण - महाभारतात बहुपत्नीत्व/पतीत्व दिसून येतेच पण दासींचेही अर्थात अनेक उल्लेख आढळतात. विदुरचे मोठे उदाहरण आहेच. इतिहासाच्याबाबतीत आपण हे लक्षात घ्यायला हवं की ह्या तत्कालिन समाजमान्य परंपरा होत्या. महाभारत कालात उपस्त्रीयांना "वेशस्त्रिया" म्हणत. त्यांना राणीचा दर्जा नसे पण त्यांचा मान राजांच्या विवाहित स्त्रियांच्या खालोखाल असे. नंतरच्या काळात यांनाच रक्षा/राख म्हंटले गेले. ह्या "वेश्या" नव्हेत त्या फक्त राजाशी एकनिष्ठ असत. व त्यांना मान असे. महाभारतातील उद्योगपर्वात अज्ञातवासांतुन प्रकट झाल्यावर तहाचे बोलणे करण्यासाठी आलेल्या संजयाकडे युधिष्ठिराने हस्तिनापुरातील वडिलधारे, बंधु यांचे कुशल विचारले त्यात तो बंधुंच्या अथवा राजपरीवारातील वेशस्त्रीयांबाबत क्षेमकुशल विचारतो असा श्लोक आहे -
अलंकृता वस्त्रवत्या: सुगन्धा अबीभत्सा: सिखिता भोगवत्य:।
लघु यासां दर्शनं वाक् च लघ्वी वेशस्त्रिया: कुशलं तात पृच्छे:॥
(उद्योगपर्व अध्याय ३०) - अलंकार घातलेल्या, चांगली वस्त्रे नेसलेल्या व नानाप्रकारचे सुवास लावलेल्या, सुखामध्ये वाढलेल्या व मर्यादाशील असणार्या आणि सर्व प्रकारचे उपभोग मिळणार्या व ज्यांचे रुप व भाषण सुंदर आहे अश्या वेशस्त्रियांस माझ्यातर्फे कुशल विचारा!" याचा अर्थ त्या मर्यादाशील असून युधिष्ठिराच्या आदरास पात्र होत्या.
मुळात आपण हे समजुन घ्यायला हवं की अंगवस्त्रे, रक्षा ह्या केवळ आणि केवळ शरीरसुखासाठी नसत. पुर्वी मुलामुलींची लग्नं लहान वयातच होत. स्त्रीयांवर अनेक बंधने असत. त्यामुळे त्यांचे शिक्षण अल्प अथवा बिलकुल नसे. अश्यावेळी घरा बाहेर जात असलेला पुरुष व खास करुन तो रणांगण गाजवून आला असेल, बारा गावचं पाणी पिऊन आलेला व्यापारी असेल, स्वत: बहुश्रुत वा कलासक्त असेल तर अश्यांना आपल्या भावना आपली आवडनिवड त्याच पातळीवरती समजून घेणारं कोणीतरी लागे. आज मानसशास्त्र देखिल हे मान्य करतं की आपल्या भावना आपण भिन्नलिंगी व्यक्तीसमोर जरा जास्त चांगल्या व्यक्त करतो अथवा तशी सुप्त इच्छा कळत-नकळत असते. हे फार नैसर्गिक आहे. अश्यावेळी अश्या नाटकशाळा, अंगवस्त्र वगैरे त्यांची ही भावनिक - बौद्धिक गरज भागवत. त्या कलानिपुण असत, गायन, नृत्य, काव्य, चित्रकला वगैरे बाबतीत त्या हुशार असत. अनेकदा ह्याच स्त्रीया राजकारणाचे पट मांडत - उधळत. अर्थात मानसिक - बैद्धिक - शारिरीक पातळीवरती अशीच इच्छा स्त्रीयांच्या मनात येत असणे सहाजिक आहे पण पुरुषसत्ताक पद्धतीने स्त्रियांना त्यांच्या भावनांसकट दडपून टाकले.
चाणक्य तर अश्या स्त्रियांना आसरा द्यावा तसेच मुद्दाम अश्या स्त्रिया तयार कराव्या, अगदी विषकन्या सुद्धा. त्यांचा उपयोग हेर म्हणून करावा असेही म्हणतो. हे प्रकार त्याकाळी समाजमान्य होते, आज काही शे वर्षांनी त्याबाबत आपली मते बनवणे काहीच फायद्याचे नाही. त्यामुळे शहाजीराजे, संभाजीराजे, राजाराम, शाहुराजे, नानासाहेब पेशवे वगैरेंना नाटकशाळा होत्या ह्यात बिचकण्यासारखं काहीच नाहीये. तत्कालिन इतिहासात अजुन एक उल्लेख येतो तो म्हणजे "कुणबिणी". मध्ये ह्याला "जातीय" ठरवून बराच गदारोळ झाला होता. पण तो गदारोळ म्हणजे इतिहासाचे शून्य ज्ञान असल्याचे मोठे उदाहरण आहे. मुळात बाजारात विकत मिळणार्या "कुणबिणी" हा जातीय उल्लेख मुळीच नाही; "कुणबी" जातीशी त्याचा संबध नाही. ब्राह्मण कुणबिणी हव्यात अशी मागणी असलेले अथवा हलक्या जातीतील कुणबीण घरात काही महीने वावरली त्याबद्दल तत्कालिन समाजरुढीनुसार एका कुटुंबाला प्रायश्चित्त घ्यायला लावल्याचे उल्लेख आहेत. मुळात "कुणबिणी" हा उल्लेख घरातील पडेल ते काम करणार्या बायका म्हणून येतो. मेण्याबरोबर पाणी घेऊन वेगाने पळू शकतील अश्या काटक कुणबीणी हव्यात असे उल्लेख आढळतात. इतकेच कशाला खंडोजी माणकरास छत्रपती शाहु महाराजांचे "बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या दहा अकरा वर्षांच्या निरोगी नाचावयालायक आणवणेविशी महाराजांची एकांताची फर्मास आहे" असे पत्र मिळाते. त्यावर खंडोजी माणकराने "कोंकणात अशा पोरी मिळत नाही!" असा जबाब पाठवला. नानासाहेबांनी देखिल शाहु महाराजांनी अशाच कुणबिणींची चौकशी केल्याबद्दलची पत्रे आहेत. माझ्या दृष्टिने ह्यात कुठेही जातीय, भावनिक वगैरे काहीच नाहीये. तो सगळा तत्कालिन मामला होता.
भारतीय कामसुत्रांत "नायिकाभेद" सांगितले आहेत. त्यावर अनेक ग्रंथ लिहीले गेले आहेत. अशा एकनिष्ठ अंगवस्त्रांपासून ते वेश्यांपर्यंत सर्वच स्त्रियांना वात्सायनाने कामसुत्रात तसेच इतरांनी राजतरंगिणी, शृंगारतिलक, श्रृंगारप्रकाश, अग्निपुराण, रसमंजीरी वगैरे ग्रंथात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. ह्या नाजुक विषयाला धसमुसळीने हाताळण्याऐवजी थोडं तारतम्य ठेवून हाताळलं तर अनेक गणिते सोपी होतात.
- सौरभ वैशंपायन
3 comments:
Finally someone brings this up. मी काही इतिहास अभ्यासक वगैरे नाही, पण संदर्भ पाहुन मला असे वाटत आहे की, एके काळी स्त्रीयांचे स्थान खुपचं उच्च होते, their choices were respected, विवाहबाह्य म्हणजे खरं तर लैंगिक संबंध टॅब्यु नसावेत त्या काळी. परकीय आक्रमणांनंतर परिस्थिति बदलली असावी.
तू इतिहासाचार्य वि का राजवाडेंचे "भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" वाचलं आहेस का? अर्थात त्यावरती काहींनी प्रतिवादही केला आहे व राजवाडेंची काही उदाहरणे खोडून काढली आहेत पण राजवाडेंनी लिहिलेल्या बाबींवरती विचार करावा लागतो.
संसाराचं ओझं लादून न घेता, कलेची आराधना करणा-या, कलागुणसंपन्न स्वतंत्र स्त्रियांना एकेकाळी (म्हणजे नेमकं कधी? माहित नाही. पण कदाचित पुरुष प्रधान संस्कृती वरचढ होण्या आधी) समाजात मान होता, आदराने त्यांच्याकडे पाहिलं जाईल. नगराच्या मध्यवर्ती वस्तीमधे त्यांचे महाल असत. राजाश्रयाने किंवा नगरपिता, धनिक यजमानाकडे त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. मात्र कालांतराने गणिका आणि मग वेश्या असा त्यांचा सामाजिक दर्जा, पत खालावून जाऊन त्यांचे स्थान नगराच्या बाहेर, गल्लीबोळांमधे कसे फ़ेकले गेले याचा सामाजिक इतिहास भारतीय संस्कृतीबद्दल बरंच काही महत्वाचं सांगून जातो. कधीतरी, कुठेतरी याबद्दल वाचल्याचे आठवते. संदर्भ काहीच आठवत नाहीत.
असो. पोस्ट आवडली.
Post a Comment