Sunday, August 12, 2007

पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमण मोहीम २००७!

भरारी संस्था (मुंबई) दरवर्षी "नरवीर बाजीप्रभु देशपांडे" पुण्यतीथी पावनखिंडीत साजरी करतात. अर्थात ती तिथी वरुन साजरी करत असल्याने तारीख नक्की नसते. तारखे नुसार १२ जुलैला ही पुण्यतीथि येते तर तीथिनुसार "व्यास पौर्णिमा" हीच बाजीप्रभु पुण्यतीथि म्हणता येईल. मुंबई वरुन २६ जुलै २००७ ला निघालो करवीर नगरी म्हणजे कोल्हापुरला-पन्हाळ्याच्या दिशेने. साधारण ४० जण होतो. सगळे नवीन ओळखी करुन घेत गप्पा मारत होते. मुंबई-पुणे महामार्गावर रात्रीच प्रवास माझ्यासाठी नेहमीच मजेचा असतो विशेषत: रात्री घाटतुन ’खोपोली’ गाव बघणे डोळ्यांसाठी सुखद अनुभव असतो. रात्र वाढली तशी हळु हळु निद्रादेवी सगळ्यांच्या डोळ्यावर जाउन बसली. जाग आली ते थेट कोल्हापुरला. ढगांनी अंधुक झालेली वाट मागे टाकत आणि धुक्याने चिंब झालेली झाडे भराभर मागे टाकत गाडी वळणांवर वळणे मागे टाकत धावत होती. पन्हाळ्यावर थंडगार धुक्याने आणि गवतावर पसरलेल्या ओल्या दवाने आमचे "स्वागत" केले. सगळ्या झाडांची पाने एकमेकांना दवाच्या थेंबांचे झेल देत होती.
गडावरच "राजाची झोपडी" नावाच्या हॊल मध्ये आमची सोय केली होती. आवराआवर करुन झकास गरमागरम चहा घेउन आम्ही गड बघायला निघालो. पन्हाळा प्रचंड आहे जवळपास गावच आहे वरती, गडावर पोलीस स्टेशन,कोर्ट,शाळा अश्या प्राथमिक सोयी झाल्या आहेत. शिवाय बरीच हॊटेल्स आहेत.वर पक्षी अभयारण्य देखील आहे. यावरुन गडाचा पसारा कीती मोठठा आहे तुमच्या लक्षात येईल.


तीन दरवाजा, पुचाटी(पिछाडी)बुरुज,,पाण्याची ३ मजली टाकी,,वाघ दरवाजा, सज्जाकोठी असं बरच बघुन आणि ’बशीरभाईं’ कडुन त्याचा इतिहास समजावुन घेत होतो. पन्हाळ्याला १२०० वर्षांचा इतिहास आहे. खरंतर पराशर ऋषीं पासुन पन्हाळ्याला इतिहास आहे. पराशर ऋषींची खडकात खोदलेली गुहा आजही तेथे आहे. पन्नगालय हे त्याचे मुळ नाव. पुर्वी तेथे ’नाग’ लोकांची वस्ती होती. मात्र गड म्हणुन शिलाहार राजांच्या काळात "राजधानी" म्हणुन पन्हाळ्याला मन्यता मिळाली. अशी कथा आहे की पन्हाळ्याचे बांधकाम करताना बुरुजाचे काम करताना तो सारखा ढासळत होता. ज्योतिष्याने ’नरबळी’ द्या असे सांगितले, मात्र नरबळी हा गरोदर स्त्रीचा असावा ही अट घातली. त्यावेळी गंगु तेल्याची गरोदर बायको तयार झाली. तिला भिंतीत चिणल्यावर बुरुज पुर्ण बांधुन झाला. म्हणुनच ’कहां राजा भोज कहां गंगु तेली” अशी म्हण आली असावी.

पन्हाळ्याचे बुरुज खुप मजबुत आहेत.काही ठीकाणी तर ते ८ ते १२ फुट रुंद आहे. पुचाटीच बुरुज हे किल्ल्याचे फार महत्वाचे अंग इथे बर्याच घटना घडल्या त्यातलीच एक घटना म्हणजे भुपाळगडचे कील्लेदार फ़िरंगोजी नरसाळ हे भुपाळगड, मुघलांना मिळालेल्या ’शंभुराजांना’ आणि दिलेरखाना्ला सोपवुन आले तेव्हा जी ३०० माणसांच्या हातापायाची तोडा-तोडी झाली त्याचे जबाबदार म्हणुन फ़िरंगोजी नरसाळ यांना महाराजांनी - "युवराज असतील तरी काय जाहले भांडे(तोफ) का नाही वाजवले?" असा परखड सवाल करुन त्यांना तोफेच्या तोंडी दीले.फ़िरंगोजी नरसाळ्याच्या देहाचे तुकडे पुचाटी खालच्या दरीत पसरले.या शिवाय कोणाचा हात-पाय कलम करायचा असेल तर त्याला इथेच आणत असत. जवळच उकळते तेल असे त्याला शिक्षा दीली कि त्याचा तोडलेल्या अवयवाला उकळत्या तेलात बुडवत म्हणजे तो भाग तेलामुळे ’सील’ होई, माणुस वेदनांनी बेशुध्द होई मात्र रक्तस्रावाने मरत नसे. म्हणतात की बर्याचदा ढोलाच्या आवाजात हे सगळ चाले म्हणजे त्याची विदारक कींकाळी कोणाला ऎकु जात नसे.

३ मजली टाकी किंवा विहीर ही गडावरील पाण्याच्या संचयाचे मुख्य ठीकाण. या ठीकाणी पहारे असत. पाण्यात विष कोणी कालवुन दगा देउ नये म्हणुन ही काळजी घेत असत. थोरल्या छत्रपतींच्या एका आज्ञापत्रात त्यांनी लिहीले आहे -"वर्षभर पुरुन उरेल इतका पाण्याचा साठा प्रत्येक गडावर असावा. "ओहोळांवर विसंबुन न राहता प्रत्येक गडावर टाकी खोदुन घ्या. भांड्याच्या आवाजे ओहोळाचे पाणी आटते,असे न होवो म्हणौन पाण्याची मुबलक व्यवस्था लावुन द्यावी."




वाघ दरवाजा हा रायगडला देखिल ब्राह्मण तलावाला डाव्या हाताला टाकुन थोडं खाली उतरलं की दिसतो मात्र तो दरवाजा ६०० फुट उंची्वर आहे. तो चढुन जाईल तो वाघाच्या काळजाचा म्हणुन तो "वाघ दरवाजा". राजधानीच्या गडाला कीमान २ दारे असावित हा शिवछत्रपतींचा विचार अपल्याला रायगडी दिसतो. मात्र इथला वाघ दरवाजा फ़ार वेगळा विचार करुन बांधला आहे हे शिलाहारकालीन बांधकाम आहे. हा दरवाजा बांधल्या नंतर त्याचे अर्धे द्वार हे दगडाच्या भरावाने बांधुन काढलं आहे. थोडक्यात २ फळ्यांच्या दरवाज्यापैकी फक्त जर एक फळी लावुन घेतली तर कसं दीसेल? तसाच काहीस हा दरवाजा आहे. आता त्याने काय होईल? तर पायर्यांची लांबी पुर्ण असल्याने एकाचवेळी बरेच जण तिथे जमतील मात्र दरावाज्यातुन एका वेळी फार-फार तर २ माणसे जाऊ शकतील. दरवाज्याजवळ जी गर्दी होईल तिच्यावर वरुन मारा करायचा. थोडक्यात हा सापळा आहे.


सज्जाकोठी हा गडाचा सर्वोच्चभाग इथे उभ राहीलं की गडाच्या पायथ्याची गावे फार छान दीसतात त्याच बरोबर जर शांतता असेल तर गावातील माणसांचे बोलणे आपल्याला सहज ऎकु येते. सज्जकोठीच्या गच्चीवर उभे राहीले की गडाच्या परीसरातील अर्धाधिक भाग नजरे खालुन घालता येतो. मुघलांचे खरे रुप पाहुन पश्च्चातदग्ध संभाजी राजे जेव्हा महाराजांकडे परत आले आणि "दुधभात खाउन स्वामींच्या चरणाचे स्मरण करुन राहिन" असे मान्य करुन संभाजी राजे वास्तव्यासाठी याच सज्जाकोठित होते. दीर्घकालीन आजारपणाने रायगडी महाराजांचे निधन झाले तेव्हा देखिल शंभूराजे इथेच होते.त्यांना जेव्हा महाराजांच्या निधना बाबत कळले तेव्हा पुढे महाराजांचे दिवस त्यांनी पन्हाळ्यावरच केले. आणि मग त्यांना अटक करायला अलेल्या दरबारी लोकांना त्यानी जेरबंद केले ते इथेच.शंभूराजांच्या आयुष्यतील नंतरच्या बर्याच घटना पन्हाळा आणि कोल्हापुर परीसरात घडल्या.

हे सगळ समजावुन घेउन आम्ही परत मुक्कामावर आलो. दुपारचं जेवण आणि थोडा आराम करुन परत उरलेला कील्ला बघायला निघालो. मग आम्ही धान्याची कोठारे बघायला निघालो.वातावरण तसे कुंदच होते.


गडावर गंगा-यमुना-सरस्वती अशी ३ कोठारे आहेत. पावसाळा सुरु होण्यापुर्वी आजुबाजुच्या गावातील शेतसारा आणि कराच्या स्वरुपातील धान्य या कोठारांतुन साठवले जाई. मग वर्षभर ते वापरले जाई. "FIFO" system नुसार हे धान्य बाहेर काढले जाई. म्हणजे ते खराब होत नसे. असं म्हणतात की त्या कोठारांना लागलेली ’कीड’ म्हणजे ’शिपाई’ कारण त्या काळच्या शिपायाचे एकावेळचे खाणे म्हणजे १२ ते १५ भाकर्या आणि चटणी/ठेचा होय.

तिथुन आम्ही पावनगडाकडे कूच केले. पावनगड हा पन्हाळ्याचाच एक भाग आहे.मात्र शत्रुला चकवा देण्यासाठी त्याच वापर होतो. जसे राजमाची कींवा पुरंदर यांना जवळ-जवळचे कील्ले आहेत तसच हा प्रकार. त्या दिशेने येणारा शत्रु प्रथम पावनगडावर हल्ला करतो मात्र त्यामुळे पन्हाळ्यावरील सैन्य सावध होऊन गडाचा महत्वाच भाग वाचतो. पावनगडावर काही मंदीरे आहेत. लक्ष्मी मंदीर अजुन सुस्थितीत आहेत. जवळच पराशर ऋषिंची पुरातन गुंफा आहे.


पावनगडावरुन आम्ही चोर दरवाज्याने खाली आलो. दरवाज्याची वाट बरीच निसरडी होती. आणि सध्या खालच्या गावात जाणार पाण्याचा पाईप तिथुनच गेला होता. त्याच्यावरुन एक पाय इकडे एक पाय तिकडे अशी कसरत करत खाली उतरलो.फक्त पाय सटकायचा अवकाश समोरच्या ४-६ जणांना घेउन माणुस थेट ५०-६० फुट खाली. ना काही धरायला काही संधी ना समोरच्याला सावध करायला वेळ. मात्र भरारीच्या ’टीम’ ने सगळ्यांना व्यवस्थित जपुन नेलं. मी नेहमीच ट्रेक करत असलो तरी मला माझ्यापेक्षा बाबांच्या 'SLR camera' ची काळजी होती. उगीच ’माज’ नको म्हणुन चुपचाप आधरासाठी अमितचा हात धरला.घसरणीचा पट्ट संपवुन आम्ही खालच्या जंगलात घुसलो. परत पन्हाळ्याकडे जायला निघालो.



वाट उतरताना मोठ्ठी "इंगळी" वाटेवरच आली. लगेच सगळ्या ७-९ जणांचा घोळका तिच्या भवती जमला. बिचारी गांगरली आणि नांगी वर करुन ’पवित्रा’ घेउन उभी राहीली. मग समीरने तिला ईजा होणार नाही याची काळजी घेउन तिची नांगी काठीने अलगद धरुन ठेवली. मग ५ मिनीटे तिचे पुर्ण निरीक्षण झाल्यावर त्याने काठी बाजुला केली आणि एका क्षणात ती मागच्या दगडाच्या फटीत घुसली. काहीतरी मिळाल्याच आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर होता. जे आधीच पुढे निघुन गेले होते त्यांना फोटो वर समाधान मानाव लागलं. मग खाली उतरुन "वीर शिवा काशिद" यांच्या समाधीकडे निघालो. महाराज जेव्हा पन्हाळ्यावरुन सटकले तेव्हा वेळ काढण्यासाठी त्यांनी २ पालख्या केल्या. एकात शिवा काशिद यांना बसवुन ती पालखि वेढ्याला दिसेल अश्या पध्दतीने नेली. अर्थात ते पकडले गेले बराच वेळ काढुन ते जेव्हा पालखिच्या बाहेर आले तेव्हा कोणालाच नक्की माहीत नव्हते की हाच शिवाजी आहे म्हणुन. फाजलखानाने ’अफझल’ स्वारीच्यावेळी महाराजांना बघितले होते. मग ’फाजलखानास’ बोलाविले की "बाबा या माणसानेच तुझ्या बापाचा कोथळा बाहेर काढला होता का?" त्यावर ’ये कंबख्त तो सिवा नहि!’ असे फाजलखानाने सांगताच परत ’दगा दगा’ बोंबलत सिद्दीचे सैन्य महाराजांच्या मागावर पळत सुटले. ओघाने पुढची-मागची गोष्ट येईलच मात्र त्यावेळी "शिवा काशीद" यांना ठार मारण्यात आले.
आपल्या धन्याची सेवा जीव देउनही कशी बजावतात ह्याचे मुर्तीमंत उदाहरण.त्यांच्या समाधीला ’श्रध्दांजली’ वाहुन परत पन्हाळ्याकडे निघालो. संध्याकाळी जेवणं होण्याआधी सगळ्यांची ओळख झाली. दुसर्या दिवशीचा कार्यक्रम सांगुन वाटेत चालताना काय करावे काय करु नये याचे धडे सगळ्यांना देण्यात आले. भरारी बरोबर माझा हा तिसरा पन्हाळ-विशाळ असल्याने मला त्याची बर्यापैकी कल्पना होती. पहीला टप्पा २७-२८ कि.मी चा आहे. तो कर्पेवाडीला संपतो.
रात्री १०:३० ला निजा-निज झाली.खरंतर आमच्यातील ’नचिकेतचा’ दुसर्यादिवशी वाढदिवस होता. त्याला रात्री १२:०१ ला उठवायचे असं ठरलं होतं. पण दिवसभर फिरुन झाल्यावर मग जमिनीला पाठ लागल्यावर काय विचारता? एकदम सकाळीच जाग आली. सगळे झट्पट आवरुन तयार झाले.

या वर्षी हर्षद जोशी आमचा मोहीमप्रमुख होता. त्याच्या हाताने पन्हाळ्यावरील ’नरवीर बाजीप्रभू देशपांड्यांच्या" पुतळ्यास हार अर्पण करुन आमच्या मोहीमेला सुरुवात केली. मग हर्षदने पुढील सुचना देउन आम्हाला राजदिंडीपाशी एकत्र आणले. "पुढचे ३ दिवस फक्त चालायचे आहे, महाराष्ट्रातील कठीण अश्या ट्रेकपैकी हा ट्रेक असुन ज्यांचा हा पहिला ट्रेक आहे त्यांना फार मोठ्ठा अनुभव मिळणार आहे!" असे सांगुन अमितने सगळ्या नवख्यांचा उत्साह वाढवला. शिवरायांचा आणि भवानीमातेचा जय-जयकार करुन आम्ही आमच्या पदभ्रमण मोहीमेची खर्या अर्थाने सुरुवात केली.
राजदींडी वरुन खाली उतरुन आम्ही ’मसईपठाराकडे’ निघालो.

मसईपठार हे एखाद्या मोठ्या बेटाप्रमाणे आहे. एका मागोमाग एक अशी ७ पठारे आहेत. मधल्या पठारावर मसईदेवीचे छोटेसे मंदिर आहे.
बांधकाम नविन असले तरी मंदिर बरेच पुरातन आहे. पुर्वी शेंदुर फासलेला दगड होता.
आता तिथे छोटया मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. महाराजांच्या आधी देखिल या मंदिराचा उल्लेख आहे. हा जुना व्यापारी मार्ग असल्याने याच मसईपठाराच्या परीसरात लेणी आढळतात. पुर्वी जिथे व्यापारी प्रवास करताना विश्रांती घेत तिथे त्यांनी कालांतराने लेणी वा मंदीरे बांधली. जसे राजमाची किल्याच्या आसमंतात कर्जतच्या बाजुने वर येताना किंचीत आड्वाटेला पण लक्षात येईल अश्या ठीकाणी देखिल आपल्याला अशीच लेणी दिसतात. तसेच हे मसईचे मंदिर आहे. पुर्वी हे व्यापारी-वाटसरु मसईदेवी वर सगळा भरवसा टाकुन सगळे प्रवास करत. आम्ही देखिल मसईचीदेवीची आरती करुन पुढे निघालो. गप्पाटप्पा करत सगळे मार्ग चालत होते. मसईच्या आजुबाजुला दरीत बरीच भातखाचरं दिसत होती. मसईपठाराच्या ४थ्या पठारावरुन आम्ही खाली उतरलो. २ तास चालणे झाल्यावर आम्हाला कुंभारवाडा लागला. २५-३० घरांची ही वाडी आहे. वाटेत अश्या बर्याच वाड्या लागतात. या वाड्यांमधील लहान-लहान मुले "ओ - २ गोळ्या द्या की!" म्हणत मागे लागतात. गोळ्या दिल्या नाहीत तर मग पैसे द्या म्हणुनही मागे लागतात. मात्र ’भरारीच्या’ टीमने आधीच सांगितले होते "त्यांना गोळ्या-पैसे देऊन त्यांच्या सवयी बिघडवु नका, नाहीतर मागुन येण्यार्या ट्रेकर्सना त्याचा त्रास होतो." बर्याचदा काही ट्रेकर्सच त्यांना गोळ्या-पैसे देतात आणि रस्ता दाखवा असे सांगतात.
ज्यांना हा ट्रेक नवा होता ते "काय होऽ आली का कर्पेवाडी?" असे विचारायचे मग आमच्या सारखे ’वासरात शहाणे’ असलेले ८-१० जण सांगायचो "छे-छे अजुन याच्या तिप्पट चालायचे आहे." मग त्यांचे गळपटणे, मग भरारीवाल्यांनी "अरे काहीही सांगतोय हा, अजुन साधारण एक-सव्वा तास चाललाऽऽत की आलं कर्पेवाडी, आता ३-४ तास चालला आहात अजुन तासभर काही कठिण नाही तुमच्यासाठी" असं म्हणुन त्यांना ’पिन मारणे’ हे प्रकार आमच्यासाठी नविन नसले तरी मजेदार होते.
अशीच वाट तुडवताना कधीतरी मग पोटात कावळे ओरडायला लागतात कींवा उंदीर पकडा-पकडी खेळत आहेत असे वाटायला लागते.तसेच काही वाटायला लागले तेंव्हा मग चला इथे थांबु नको थोड पुढे थांबु असं करत कीलोमीटरभर अंतर तुडवुन एका ओढ्यापाशी सगळे आलो. आणि त्या एका की.मी मध्ये आम्हाला पावसाने गाठले.मसईपठारावर ’लपाछुपी’ खेळणारा पाऊस आता कोसळायला सुरुवात झाली होती. आता थांबेल मग थांबेल असं वाटण्याच्या पलीकडे पाऊस गेल्यावर मुकाट्याने सगळ्यांनी आपापले डबे उघडले. वरुन धो धो कोसळणारा पाऊस जेवण्या आधीच डबा धुतोय की काय असे वाटत होते. आम्ही ५ जण एकाच डब्यात खात होतो. मध्येच डब्यात पडणारे पाणी अचानक थांबले - कारण उन्मेषनी कोणाचीतरी छत्री उचलुन आणली होती. मनसोक्त खाऊन आम्ही आमचे हात आणि डबे त्या खळाळणार्या ओढ्यात धुतले. चला निघुया म्हंटले आणि.....पाऊस थांबला. हे सगळं नविन असलेली माणसे "काय राव हा पाऊस,सगळ्या जेवणाची चव गेली, जेवणावर पाणी पसरवलं" म्हणत होते तर आमच्या सारखे ’भटक्या-विमुक्त जमाती मधील लोकं’ "वा!!! बार्याच दिवसांनी असं छकास जेवायला मिळालं" म्हणत होते.
जेवुन झाल्यावर १० मिनीटे आराम करुन सगळे निघालो.या पवसने वाटेच खेळखंडोबा केला होता.
सगळ्या वाटेवर पोटरीभर चिखल साचला होता. मग मागे रुतलेला एक पाय़ काढायचा आणि आणि पुढच्या चिखलात ठेवायचा हा क्रम करत पुढला अर्धातास काढला. ज्यांचे साधे बुट होते म्हणजे हंटरशूज नव्हते त्यांचा एक बुट चिखलात फसायचा. मग नुसताच पाय बाहेर यायचा. मग शेजार्यापाजार्याच्या खांद्याचा आधार घेउन मग तो बुट बाहेर काढायचा मग त्यातला चिखल ओतायचा, परत बुट घालायचा आणि पुढची वाट सुरु. असं मजल दर मजल करत टप्पे पार करत होतो.
साधारण संध्याकाळी ५ वाजता कर्पेवाडीत पोहोचलो. सगळ्यांसाठी गावातील लोकांची घरे भरारी दरवर्षी घेते.आम्ही पोहोचलो तेव्हा घरातले ’बापे’ शेतावर गेले होते.ते ६:००-६:१५ परत येतात असं म्हंटल्यावर वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नव्हता.ओल्या-सुक्याची पर्वा न करता तिथेच सगळ्यांनी बसकण मारली.घरे मिळाल्यावर दिवसभरात ज्यांचा ’ग्रुप’ झाला होता ते एकेका खोलीत शिरले. माझ्या बरोबर कीरण दामले, वैभव, अक्षय मुळे आणि पाठक काका होते. मग सगळ्यांचे आवरणे चहा पिणे चालु झाले. बशीरभाईंनी झकास गरमा-गरम वाफाळता चहा करुन ठेवला होता. मग अमितने ’पारले-G चा’ मोठ्ठ्ठ्ठा पुडा फोडला. आधिच भिजुन गार झालेली ’तुकडी’ हवा तेव्हढाच चहा आणि ४-६ बिस्कीटे घेउन आपापल्या ’विश्रांतीस्थलावर’ गेली. मग आता उरलं कोण? मी-अमित-हर्षद-मामा आणि आशिष आता सगळा चहा आणि बिस्किटे आता आमचीच होती. उगीच मऊ होण्यापेक्षा बिस्किटे खाऊन टाकलेली बरी ना?
शहाण्यामुलां सारखी सगळी संपवली!!!!!
रात्री जेवण होई पर्यंत वेळ मोकळाच होता. मग अक्षय बरोबर बर्याच गप्प झाल्या अगदी इतिहासा पासुन ते अगदी MP3-MP4 पर्यंत. जेवणाची वेळ कधी झाली ते कळलच नाही. झकास गरमा-गरम झेवुन सगळे अर्ध्या तासात ’गुडुप’, सकाळी एकदम ६:४५ ल जाग आली.मग आळोखे-पिळोखे देत आपापले ’बाड-बिस्तर’ आवरले. चहा-उपमा घेउन सगळे ’जवान’ तयार. "pack-lunch" मध्ये उपमाच होता. हर्षदने सगळ्यांना एकत्र बोलावले. मग आमचा कर्पेवाडी मधला मुक्काम हलवण्याची वेळ आली. गावाच्या मध्यभागी ४थी पर्यंत शाळा आहे - एका खोलिची. पु.ल. म्हाणतात तसे इथे एक शिक्षकी शाळा आहे. एकटे मास्तर वर्ग ’हाकतात’. तिथेच दरवर्षी गावकरी आम्हाला उतरायला जागा देतात. याचीच परतफेड म्हणा कींवा परतफेडीपेक्षा सामाजिक बांधीलकी म्हणुन "भरारी आणि भरारीशी संबधित व्यक्ती" या शाळेतल्या मुलांसाठी वह्या-पुस्तके, बसण्यासाठी बसकटे, गोष्टीची पुस्तके अशी मदत करतातच करतात. अशीच मदत काही जणांनी मदत पाठवली होती. मग आमच्यात वैद्य नावाचे शारदाश्रमचे माजी मुख्याध्यापक आले होते, त्यांच्या हस्तेच तिथल्या शिक्षकांना मुलांसाठी वह्या-पुस्तके दिली. सगळे आटोपल्यावर उन्मेषने एक खुश खबर दिली - "अप्पा परब पांढरपाण्याला पोहोचले आहेत." आणि आम्ही सगळ्यांनी एकच जल्लोश केला, अप्पा परब - मराठयांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत, शिवाय नाणेतज्ञ आहेत. दरवर्षी ते आमच्या बरोबर असतात मात्र यावेळी त्यांच्या तब्येतीमुळे ते पन्हळ्गडापासुन आमच्या बरोबर नव्हते. नाहीतर हा सत्तरीचा माणुस इतका झपझप चालतो की तरुणांना लाज वाटावी. अप्पा भेटणार या आनंदात आम्ही आमचा तिसरा दिवस सुरु केला.
गावकर्यांचा निरोप घेउन आम्ही निघालो.या दिवशी अगदी रीमझिम पाऊस पडत होता.
मध्ये चालताना माझ्या मोठ्या बहीणीच्या गुडघ्याला बरीच दुखापत झाली. बिचारी लंगडत-लंगडत चालत होती. आमचे सेनापती "श्री श्री हर्षद जोशी" यांची ती पत्नी असल्याने खुद्ददस्तुर सेनापतीच त्यांना आधार देत चालत होते. आता सेनापतींचा ’जनानाच’ जायबंदी झालाय म्हंटल्यावर आमचा वेग कमी झाला.शेवटी मग मी, संघमित्रा, मैथिली-हर्षद, उन्मेष, मामा आणि समीर असे राहीलो.माझ्या बहीणीच्या चालीशी जमवुन घेत आम्हि जात होतो.

अधेमधे वाड्या लागत होत्या. तिथली लहान लहान मुले आम्हाला बघुन लाजुन धावत-धावत त्यांच्या झोपडीत शिरत. तिथल्या वातावरणात काय गुढ होते माहीत नाही पण त्या "टुमदार" झोपडीत राहणर्‍यांचा मला क्षणभर हेवा वाटला. इथल्या लोकांच्या कापळावर एकही आठी मला आढळली नाही. मीठ-भाकरी खाउन सुखी राहणर्या त्या जिवांना अजुन शहरी धावपळीचा स्पर्श झाला नाहीये हे खुप महत्वाचे आहे.अर्थात त्यांच्याही काही समस्या असतीलच, पण त्यावर मात करुन ते जगत आहेत ही समाधान करक बाब आहे असं मला वाटतं.
पांढरपाण्याच्या जवळ पोहोचतानाच माझा देखिल डावा गुडघा "वाजु" लागला. शेवटच्या एका तासात तर मला माझा डावा गुडघा वाकवताच येईना.लंगडत लंगडत आम्ही दोघेही भाऊ-बहीण पांढरपाणी कधी येईल याकडे नजर ठेउन चालत होतो. तिच्या गुढघ्याची तर सुजुन ’पुरी’ बनली होती. शेवटी हर्षद-मैथिलीला जवळच्या डांबरी रस्त्या कडे पिटाळले तिची अवस्था फारच वाईट होती, कीमान त्यांना एखादि गाडी ’लिफ्ट’ देईल तितकेच बरे! असा विचार करुन त्यांना पुढे पाठवले.
शेवटी आम्हाला देखिल खुप पुढे गेल्यावर डांबरी रस्ता लागला. शेवटी पांढरपाण्यात पोहोचलो तेव्हा खाली बसायचे वांदे झाले होते. डावा पाय सरळ ठेउनच सुर्य नमस्कार घालतात तसे वाकुन बसावे लागत होते. बसताना "राम" म्हणायची वेळ येत होती. शेवटी पाठककाकांनी आयोडेक्स लावुन दिले आणि मग क्रेब बॅंडेज बांधुन ’चीप-चा्प’ कोपर्‍यात बसुन राहिलो. मग चा आमचा मुक्काम अप्पांच्याच खोलीत होता. संध्याकाळी अप्पांचे एक व्याख्यान झाले. त्यावेळी अप्पांनी पन्हाळगडाची माहिती दिली, शिवाय सिद्दी जौहरच्या मगरमिठीतुन महाराज कसे निसटले याची साद्यांत कथा सांगितली.