Tuesday, July 22, 2008

आर्य

१>गिधाड!

मध्यानीच्या सुर्यालाहि झाकुन टाकावं इतकी गिधाडं आकाशात गरगरत होती. आज त्यांना बर्‍याच दिवसांनी पोट फुटेतोवर खायला मिळणार होते. त्यांच्या चोचींना लाल रंग चढणार होता आणि त्यांच्या जिभेला गरम रक्त लागणार होतं. खाली हजारो प्रेते रक्ताच्या चिखलात पडली होती. त्यात लहान-मोठे, स्त्री-पुरुष असा कुठलाच भेद नव्हता. वाचलेली लहान मुले त्या प्रेतांजवळ फतकल मारुन भीतीने रडत ओरडत होती. त्यातहि ज्यांच वय नेमकं काय झालय हे कळण्या इतपत होतं त्यांची पाचावर धारण बसली होती. भीत-भीत ते त्या प्रेतांच्या खचात आपले नातेवाईक शोधत होते. काहि मरणपंथाला लागलेले जीव तळमळ करत एक घोट पाण्याची अवास्तव अपेक्षा करत यमदुतांच्या वाटेकडे डोळे लावुन बसले होते. आजुबाजुला फुटकि भांडि-कुंडि, घोड्यांनी तुडवुन काढलेले तंबु, गळुन पडलेली रक्ताळलेली शस्त्रे असं बरच सामान विखुरलेलं होतं. जे या यातनातुंन सुटले होते ते नशीबवान होते म्हणायचे, निदान ज्या स्त्रीया पहिल्या हल्ल्यात मेल्या त्या सुटल्या कारण ज्या जिवंत राहिल्या त्यांच्या अर्धमेल्या देहाला सिकंदराच्या ग्रीक लांडग्यांनी ओरबाडुन त्यांची लक्तरे केली होती. आणि आता वरची गिधाडे त्यांच्या मरणाची वाट बघत होती. आणि हळु-हळु गिधाडे गिरक्या घेत खाली उतरु लागली, थोड्याच वेळात रक्ताचा वस हुंगत कोल्हि-कुत्री देखिल आली आणि त्या ठिकाणाला यमपुरीहुन वाईट दशा आली.

गांधार, राणीगत, उत्तखंड सारखी अनेक राज्य आणि गणराज्य जिंकत सिकंदर तक्षशीलेपर्यंत आला होता. आता त्याचा मोर्चा केकय साम्राज्याकडे वळला. मात्र केकयच्या आधी मस्कावतीनं त्याची वाट रोखली. चुटकीसरशी जिंकु या भ्रमात असलेल्या ग्रीक सैन्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ यावी असा तिखट प्रतिकार मस्कावतीनं केला. खरं तर असा प्रतिकार त्याला प्रत्येक राज्याकडुन होत होता अपवाद फक्त तक्षशीलेच्या अंभीचा होता. स्वत:हुन त्याने सिकंदराशी हात मिळवणी केली होती, कारण त्याला पौरव राजाला हरवायच होतं आणि त्यासाठि तो कुठल्याहि थराला जायला तयार होता. तक्षशीलाच फितुर झाल्यावर सिकंदराला भारताचे दरवाजे सताड उघडे झाले. आणि आता तो त्या भागातल्या एकुलत्या एक बलशाली राज्यावर चाल करुन जात होता, केकयवर- पौरव राजावर. पण केकयवर जाताना मस्कावतीनं वाट रोखली. एखाद्या मद चढलेल्या हत्तीला मुंगीनं हैराण करावं तसं मस्कावतीनं आपली चिमुटभर ताकद सिकंदरा विरुध्द वापरली. मात्र नाईलाज झाला. मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे, पैसा या बाबतीत सिकंदर शेकडो पटीने बलाढ्य होता. सिकंदर जग जिंकायच्या महत्वाकांक्षेने पिसाट झाला होता. त्या मस्कावतीच्या नागरीकांना-सैनिकांना बिचार्‍यांना आपले राज्य वाचविणे हाच एक उद्देश होता. पिसाट वृत्तीने मस्कावतीचा बचाव मोडुन काढला. गणराज्याचा नेताच पडला म्हणून वेळ पडली तेव्हा त्या राज्यातल्या स्त्रीयाहि त्या नेत्याच्य पत्नीच्या बरोबर तलवार घेऊन मैदानात उतरल्या. पण असा कितीसा टिकाव लागणार होता? अखेर मस्कावतिनं हत्यार ठेवलं.

सिकंदरानं गणराज्यातील काहि प्रमुखांना बोलावुन त्यांना सांगितले - "आमच्यात सामिल व्हा आणि पुढे लढाईत मदत करा, किंवा हे राज्य सोडुन दुर निघुन जा! दोन्हि मान्य नसेल तर तुमचा विनाश ठरलेला आहे!! आम्हाला सामिल झालात तर योग्य मोबदला देऊ किंवा जायचे असेल तर निघुन जायला तुम्हाला २ दिवसांची मुदत देतो!! तिसरा दिवस विनाश घेऊन उगवेल!" पराभूतांना स्वत:च मत नसत. बिचारे काय करतात? विचारांती ठरवलं - आपण दुर निघुन जाऊ, निदान त्या अंभी राजा सारखी आपली तलवार स्वकियांच्या रक्तानं माखवण नको. आपल्या पिल्लांचे आयुष्य इथुन दुर सुरक्षीत तरी राहिल. मोठ्या जड अंत:करणाने, जिथे उभं आयुष्य काढलं ती मातृभूमी सोडुन तिथले नागरीक निघाले. पण इतक्या हजारो लोकांचा प्रवास सहाजिकच धीम्या गतीनं होऊ लागला. पहिलाच मुक्काम नगराच्या वेशी बाहेर थोड्याच अंतरावरील माळावर पडला. सकाळी उठुन निघण्याच्या तयारीत असताना अचानक धुळीचे ढग उठले. घोड्यांच्या टापांचा आवाज वाढत गेला आणि आली - सिकंदराच्या सैन्याची गिधाडि धाड मस्कावतीच्या बेसावध नागरीकांवर पडली. सिकंदरानी शब्द मोडला होता....कपटाने त्यांचा काटा काढला होता...जग्जेता म्हणवणार्‍याकडे शब्द राखण्याचीहि दानत नव्हती. क्षणभरात अमानुष कत्तल उडाली. सारे मातीमोल झाले. कापाकापी, बलात्कारांना ऊत आला. जे या तडाख्यातुन वाचले ते नेसत्या वस्त्रानिशी परागंदा झाले. मागे राहिले आक्रोष, शाप, अश्रु आणि मृत्युचे शिसारी आणणारे तांडव.

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

5 comments:

Vrushali said...

lihile mastch ahe..vachatana angaver kata ala..

me said...

ka raktalale lihitos mitra? jangal ani itihasa palikade khup sundar aaushya aahe!

saurabh V said...

मी,

आणि हे खुप काहि काय आहे?

Anonymous said...

जे कोणी लिहिले आहे छान लिहिले आहे. वाचून मुठी वळतात. प्रचंड राग येतो.

Unknown said...

सौरभ अपाला नव्हे तर एकंदरीत इतिहास हा रक्तानेच लिहिला जातो म्हणतात ना "रनाविना स्वातंत्र्य कोना मिळे?" किती अनन्वित अत्याच्यार झेलते आहे आपली मातृभूमि आनी आपल्या आया बहिनी शतकान्पासुन....माहिती हवे जगाला ख़रच खुप सुन्दर लिहिले आहेस रे...धन्यवाद्