Wednesday, April 13, 2011

तख्तास जागा हाच गड करावा...




गेल्या लेखात आपण स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा म्हणजे "राजगडचा" मागोवा घेतला. "गडांचा राजा आणि राजांचा गड" या सदरात येणारा दुसरा गड अर्थात रायगड. हि स्वराज्याची दुसरी राजधानी. चंद्रराव मोरेच्या प्रकरणात महाराजांना जावळित उतरावे लागले. शिवकांळात जावळी परीसरात मोरे, शिर्के, सावंत, हबशी, सुर्वे, दळवी, यांची घराणी वर्चस्व राखुन होती. यांपैकी खेळाणा(विशाळगड) किल्ल्यावरील मोरे हे स्वतंत्र राज्य राखुन होते व उरलेल्या ७ मोरे घराण्यांनी आपला एक प्रमुख निवडुन त्याला "चंद्रराव" किताब दिला. शिवकाळात "चंद्रराव" हा किताब महिपतगडावरील "दौलतराव मोरे" हा पुरुष राखुन होता. "दौलतराव मोरे" ह्याचे निधन झाल्यावर त्याच्या दत्तक पुत्राला – यशवंतरावाला "चंद्रराव" किताब देण्यास विजापुरच्या आदिलशहाने विरोध केला. तेव्हा दौलतरावाची विधवा पत्नी "माणकाई" हिने शिवरायांकडे मदत मागितली. स्वराज्य कार्यात एक मात्तबर माणूस हाताशी येईल असा विचार करुन महाराजांनी चाळिशी उलटून गेलेल्या "मुलाला", "चंद्रराव" किताब मिळवुन दिला. काही काळाने आदिलशाहिचा विरोध शमल्यावर यशवंतरावाने शिवरायांशी बेबनाव मांडला. 

महाराजांनी त्याला जरबेत घेणारा खलिता धाडला पण चंद्ररावाला जावळिच्या घनदाट अरण्याची गुर्मी चढली होती त्याने महाराजांना उलटा मुजोर जबाब पाठवला "येता जावळि ... जाता गोवळि! पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही! तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या! ..... येथे उपाय कराल तर तो अपाय होईल!" तरीही महाराजांनी समजावणारी अजून एक थैली पाठवली "..... जावळि खाली करोन, हात रुमाल बांधोन, भेटीस येवोन हुजूराची चाकरी करणे! इतकियावरी बदफैली केलिया मारले जाल!"  चंद्ररावाने मग्रुर उत्तर पाठवले - " ..... जावळिस येणारच तरी यावे! दारुगोली महजूद आहे!" महाराजांचा संयम संपला. स्वत: जातीने महाराज जावळित उतरले. यशवंतरावाचा माज उतरला. घाबरुन तो "रायरी" किल्यावर जाऊन लपला. अखेर या झगड्यात इ.स. १६५६ मध्ये शिवरायांनी मोरे घराण्याकडुन जावळी जिंकुन घेतली. याच मोहिमेत महाडचे मुरारबाजी देशपांडे शिवरायांच्या सेवेत आले.ते चंद्रराव मोर्‍यांकडून लढत होते पण महाराजांनी त्या हिर्‍याला स्वराज्यासाठी हाक दिली आणि त्यांनी पुरंदर प्रकरणापावतो स्वराज्याची सेवा केली. महाराजांना जावळि मोहिमेत असे हिरे आणि बेलाग चीरे गवसले त्यातलाच एक "रायरी".


मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. "सके १५७७ संवत्सरी पौष शुध्द चतुर्दस राजश्री सिवाजीराजे याणी देशमुखाचा जमाव घेऊन जाऊन जाऊली घेतली. चंदरराऊ पळोन राइरीस गेले. तेथे राजश्री स्वामीनी किलीयास वेढा घातला. वैशाखमासी सके १५७८(एप्रिल-मे १६५६) शिवाजी राजे भोसले याणी रायरी घेतली. समागमे कान्होजी जेधे देशमुख ता भोर व बांदल व सिंलींबकर देशमुख व मावळचा जमाव होता. हैबतराऊ व बालाजी नाईक  सिंलींबकर  याणी मध्यस्ती करुन चंदरराउ किलियाखाली उतरले" अशी नोंद  जेधे शकावलीत आहे. पण चंद्ररावाला विनाशकाले विपरीत बुध्दि सुचली. महाराजांच्या छावणीत आश्रित राहुन त्याने विजापुरशी संधान बांधले. त्याच्या "गुफ्तगु" करणार्‍या थैल्या महाराजांच्या जासूदाने मधल्यामध्ये पकडल्या. चंद्रराव छावणीतुन निसटला. पण कुठे जाणार होता? पकडला गेलाच. अखेर शिक्षा म्हणून त्याची गर्दन मारली, त्याची बाजी वा कृष्णाजी हि मुले देखिल मारली. जावळि निष्कंटक झाली.

शिवरायांनी गड घेतला तेव्हा त्यास गडाचे स्वरूप जवळपास नव्हते असेच म्हणावे लागेल. दक्षिणेत मुस्लिम सत्ता येण्याआधी हा किल्ला कोणा मराठे पाळेगाराच्या ताब्यात होता व चौदाव्या शतकात त्याने विजयनगरचे मांडलिकत्व स्वीकारले होते. पुढे निजामशाहीत गड शिर्क्यांच्या ताब्यात होता, गडावर आजही "शिर्काई" देवीचे मंदिर आहे ते बहुदा याच कळातले असावे. या काळात रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मग किल्ला विजापूरकरांकडे आला व पुढे शिवाजी महाराजांकडे. रायगडची निरनिराळ्या कालखंडातील कागदपत्रात, आज्ञापत्रात, बोली भाषेतील वेगवेगळी १५  विश्वासजन्य नावे उपलब्ध आहेत – १)रायरी २)तणस ३)राशिवटा ४)नंदादिप ५)इस्लामगड ६)रायगिरी ७)राहिर ८)मामले रायरी ९)उत्तमगड १०)सरखा ११)रेडि १२)राजगिरी १३)राजदुर्ग १४)शिवलंका १५)पूर्वेकडिल जिब्राल्टर


शिवरायांनी राजगड सोडुन रायगड निवडला त्याबाबत शिवदिग्विजय प्रकाश टाकते. शिवराय आग्र्याहुन सुटुन आले, काही महिन्यांनी मथुरेत गुप्तपणे राहणारे शंभूराजे देखिल सुखरुप राजगडि पोहोचले. या आनंदाच्या घटनेप्रित्यर्थ जिजाऊ साहेबांनी मेजवानी देण्याचे ठरविले काही महिन्यांनी राजकारणातून फुरसत मिळताच त्यांनी मेजवानीचा बेत केला. बारा मावळातल्या तालेवार देशमुखांना राजगडावर बोलावले शिवदिग्विजयबखर सांगते - "ते समयी कारभारी यांणी मोठा चवरंग होता, त्याजवरी कचेरीत गादी ठेवुन जागा उंच करविली. नंतर दुतर्फा मंडळी बसली त्यांत मोहीते, महाडिक, शिर्के, निंबाळकर, घाटगे, जाधव आदीकरुन जमा झाले होते. त्याणी महाराजांची जागा उंच करुन गादि घातली हे पाहून इर्षा वाटली की, आता आंम्हा मराठ्यांस सभ्य थोर, मोठेपणा शिवाजीराजे यांजकडे आला. आम्ही कदिम तालेवार, राजे, मोर्चेलाचे अधिकारी असतां ...... असें असता अमर्यादपणानी उंच स्थळी बसणार. आम्हि सेवकभाव दाखविणार. त्यास आम्हांस कचेरीत बसावयाची गरज काय? म्हणोन बोलोन उठोन चालिले ......  नंतर बाळाजी आवजीस महाराजांनी विचारले. पुढे योजना कोणते प्रकारे करावयाची, ती सांगा. त्यावरुन विनंती करते जाले कीं "महाराज या नावांस छत्रसिंहासन पाहीजे. त्याशिवाय राजे म्हणविणे अश्लाघ्य, लाजिरवाणे,खुशामती बोलणे. स्वयंभू पदवी असली म्हणजे खुशामत जसे ईश्वर शोभेप्रत पावतात, तशीच पदवी जो छत्रसिंहासनाशिश राजा असतो ..... छत्रसिंहासन असलें म्हणजे, या लोकांची बोलणी शिशुपालवत्‌ सभेचे ठायी होतील. समयावच्छेदे नाशही पावतील" ...... कशी योजना सांगा म्हणता; काशीस गागाभट्ट, महासमर्थ ब्राह्मण, तेजोराशी, तपोराशी, अपरसूर्य, साक्षात वेदोनारायण, महाविद्वान, त्याजकडे कोण पाठवून तेथे गोष्टिचा उपक्रम करुन त्यांचे आज्ञेने जे करणे ते केले असतां राजमान्य निर्बाध होते."  या घटनेनंतर महाराजांनी राजधानी हलविण्याचे कारणे -
१) शास्ताखानाच्या स्वारीच्यावेळि त्याच्या स्वारांनी अगदि गडाखालपर्यंत येऊन जाळापोळ केली होती. शिवाय मावळांतील सगळे देशमुख राजांना शरण आले नव्हते.
२) रायगड कोकणात दुर्घट जागी होता. त्यावर शत्रूला आक्रमण करायचे झाल्यास सह्याद्रिची हजार-बाराशे मीटरची भिंत ओलांडणे क्रमप्राप्त होते.  शिवाय रायगडच्या आसपासचे शिर्के, मोरे, दळवी हे महाराजांना संपूर्ण शरण आले होते.
३) आरमार स्थापन झाल्याने समुद्रावरच्या हालचालीवर अणि व्यापारावर नियंत्रण ठेवायला समुद्राला तुलनेनी जवळ असलेली राजधानी गरजेची होती. कोकण- घाट दोहोंवर जास्त भक्कम पकड बसवता येणे शक्य होते.

महाराजांनी बेलाग बुलंद असलेल्या रायगडची निवड केली ती पारखूनच सभासद बखर म्हणते - "राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्या प्रमाणे दिड गाव उंच. पर्जन्यकाळि कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु उंचीने तो थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच देखोन संतुष्ट जाले आणि बोलिले - तख्तास जागा हाच गड करावा."  सभासद रायगडाबाबत अजुन लिहितो - "रायगड पहाडी किल्ला चांगला. आजुबासुन शत्रूची फौज बसावयास जागा नाही. घोडे माणूस जाण्यास महत्‌संकट. वरकड किल्ले पन्हाळे बहुत. पण खुलासेवार व मैदान मुलुखात. यास्तव आजच्या प्रसंगास हीच जागा बरी. येथे लवकर उपद्रव होऊ न शकेल."    इथुन पुढे निर्वाणापर्यंत महाराजांचे वसतीस्थान रायगडच होते.


पाचाड हे पायथ्याचे मुख्य गाव. त्यावेळि पाचाडला खूप महत्व होते. रायगड परीसरातील घोडदळ पाचाडात उभे असे. दुसरे महत्व असे कि  पुढे वृध्दापकाळी जिजाऊसाहेबांना गडावरचा पावसाळि - हिवाळि गार वारा सोसवेना म्हणून त्यांना पाचाडात एक वाडा बांधून दिला होता आजही त्याचे अवशेष आहेत, तक्याची विहीर आहे. शिवाय पाचाडात जिजाऊसाहेबांची समाधी आहे. तिथुन बघितलं कि रायगडचे रुद्र टकमक टोक दिसते. त्याकाळि तो मातृभक्त राजा कदाचित टकमकवरुनच त्या वाड्याच्या दिशेने नमस्कार करीत असावा. राज्याभिषेकानंतर नऊच दिवसांनी जिजाऊसाहेब निवर्तल्या त्या देखिल पाचाडातच, तेव्हा या मातीवर  शिवछत्रपतींचे पृथ्वीमोलाचे अश्रू सांडले असतील. या परीसराला हळव्या नात्यांचा परीसस्पर्ष आहे तो असा. या खेरीज कोंझर, रायगडवाडि, छत्री निजामपूर, कावल्या - बावल्याची खिंड अश्यां आटोपशीर गावांनी, खुणांनी रायगडला वेढले आहे.

रायगड चढताना पहिल्यांदा लागतो तो खुबलढा बुरुज. तेथे चित दरवाजाही होता पण आता तो नाही. अरे हो ..... खुबलढा बुरुजासमोर सध्या ST बस थांबा आहे त्याच्या पाठीमागे एक वाट जाते. ती एका गुहेपर्यंत जाते. त्या गुहेला २ मोठी खिंडारे आहेत व खाली खोल दरीतला दूरवरचा प्रदेश सहज नजरेत येतो. त्याला "वाघबिळ" किंवा "चित्त्याचे डोळे" म्हणतात. शत्रुवर नजर ठेवायला उत्तम जागा आहे. तसेच खुबलढा व समोर दिसणार्‍या टकमकच्या बेचक्यात "नाना दरवाजा" आहे. "नाना" याचा बोली भाषेतील अर्थ "लहान" किंवा "दुय्यम" म्हणता येईल पण दुय्यम असून नेहमीच्या राबत्यासाठी हाच वापरला जात असावा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील "हेन्‍री ऑक्झेंडन" याच दरवाजाने वर आला होता. पुढे वाटेत मदारी मेहतर मोर्चा लागतो. आणि मग येतो महादरवाजा. जय आणि विजय या दोन भरभक्कम बुरुजांच्या गोमुखी रचनेत तो लपला आहे. दोन्हि बुरुज बुलंद असून जवळपास एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट आहे. व बुरुजांकडून एक तटाबंदि टकमककडे तर दुसरी हिरकणी बुरुजाकडे गेली आहे. हेच काम बघून इंग्रज वकिलाला "पुरेसा धन्यसाठा असल्यास अत्यल्प शिबंदिसह हा गड संपूर्ण जगाविरुध्द लढू शकतो" असे वाटले असल्यास नवल नाही. महादरवाज्याचे काम हा युध्द वास्तूशास्त्रातील अति उत्तम नमुना म्हणायला हवा. हा महादरवाजासुध्दा असा बांधला आहे कि त्यावरही वरुन सहज लक्ष ठेवता येईल. नीट बघितले तर लक्षात येते कि महादरवाज्यचे स्थान गंगासागर व हत्ती तलाव यांच्या बेचक्यातील आहे - गडावरचा पाण्याचा साठा महत्वाचा असला तरी जर गरज पडलीच तर हे दोन तलाव फोडल्यास कितीही मोठ्या संखेने शत्रु आला तर यांच्या जलप्रपातात सहज वाहुन जावा. सध्या गळती लागल्याने हत्ती तलाव कोरडा असतो. गंगासागर मात्र वर्षभर पुरुन उरेल इतके पाणी साठवतो. 


गडावर अनेक अवशेष आहेत. काही सुस्थितीत आहेत काही मोडकळिच आले आहेत. मात्र २ अनमोल गोष्टि म्हणजे "राजदरबार" व "श्री शिवछत्रपतींची समाधी". सातशे वर्षांच्या भिषण रात्रीनंतर स्वातंत्र्यचा सूर्योदय इथेच झाला. चार पातशाह्यांच्या छाताडावर पाय देऊन एक "हिंदु राजा पातशहा जाहला हि गोष्ट सामान्य नव्हे." गडावरील या राजसभेत ता. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला.राजदरबारापासून हुजुरबाजार (बाजारपेठ) मार्गे जगदिश्वरमंदिरापर्यंत ताशे - कर्णे यांनी गजबजलेली व मोर्चेल, सोन्याची अंबारी, दोहो बाजुंनी ढळणार्‍या चवर्‍या यांनी सुशोभित "शिवछत्रपतींची" मिरवणूक निघालेली रायगडाने बघितली व शके १६८० च्या हनुमान जयंतीला याच वाटेने त्या महापुरुषाची अंतयात्रा निघालेली सुध्दा बघितली. स्वराज्याचे राष्ट्राचे परमोच्च सुख व पराकोटिचे दु:ख दोन्ही या शिखराने अनुभवले आहे. जगदिश्वराच्या मंदिरसमोर आजही तो पुरुषोत्तम चीरनिद्रा घेत पहुडला आहे. रायगडावर सर्वात जास्त वेळ कुठे द्यावा तर तो समाधीजवळ. इथे भल्याभल्यांचा अहंकार आपसूक गळून पडतो. एखाद्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात समाधीसमोर शांतपणे बसणं हा शहाणं करणारा अनुभव असतो. शक्य झाल्यास तो जरुर घ्या.

तसेच राजगडावरील हुजूरबाजार (बाजारपेठ) हा महाराजांच्या दूरदृष्टिचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. ती रोजची बाजारपेठ नव्हे. तर देशभरातील मु्ख्य व्यापार्‍यांचे मुतालिक तेथे वसवावेत आणि त्यांच्याकडून त्या वस्तूंचे वेगवेगळे नमुने उपलब्ध केले जात असावेत. व मोठ्या व्यवहाराची बोलणी तिथे होऊन सावकार सौदा पक्का करत असावा. व थैली सीलबंद करुन सरकारात कर भरणे, वाटेत माल अडवला जाऊ नये म्हणुन व्यापार्‍यांना परवानगीची पत्रे देणे अशी कामे येथे होत असावीत. यावर आज्ञापत्रातील साहुकार प्रकरण प्रकाश टाकते - "साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. ....साहुकाराचे संरक्षणात बहुत फायदा आहे..... पेठांपेठांत दुकाने वखारा घालोन हत्ती, घोडे, नरमिना, जरबाब, पशमी आदि करुन वस्त्रजात व रत्ने व शस्त्रे आदिकरुन अशेष वस्तुजात यांचा उदिम चालवावा. हुजूरबाजारामध्येही थोरथोर  सावकार आणोन ठेवावेत..... त्यांसी अनुकुल न पडे तरी असतील तेथचे त्यांचे समाधान रक्षून आपली माया त्यांस लावून त्यांचे मुतालिक आणून त्यांस अनुकुल ते जागा, दुकाने देऊन ठेवावे." पण महाराज किती दक्ष, सावध व लोकांची अचूक पारख असलेले हो्ते हे आज्ञापत्रातील पुढच्या ओळींतून समजते टोपिकर म्हणजे युरोपिय व अरब व्यापार्‍यांबाबत आज्ञापत्र म्हणते - "सावकारांमध्ये फिरंगी इंगरेज वलंदेज फरासीस डिंगमारादि टोपीकर हेही लोक सावकारी करितात. परंतु ते वरकड सावकरांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्यच करतात ..... राज्य करणारास स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? ..... त्यांची आमदफ्तरी आलेगेले ऐसेच असो द्यावी, त्यांसी केवळ नेहमी जागा देऊ नये. जंजिरेसमिप या लोकांचे येणे जाणे सहसा होऊ देऊं नये.. ... कदाचित वखारेस जागा देणे जाहलेच तर खाडिचे सेजारी समुद्रतीरी न द्यावा.... आरमार पाठीसी देऊन त्यांचे बळे बंदरी नुतन किल्ला करणारच, तेव्हा तितके स्थळ राज्यातून गेलेच." थोडक्यात दख्खनचा व समुद्रावरचा व्यापार महाराजांना आपल्या पंखाखाली घ्यायचा होता. नुसतीच तलवारच नव्हे तर तराजू देखिल तितकाच महत्वाचा असतो हे महाराज उमजून होते. म्हणुनच २२ - २२ गाळे असलेला ४४ दुकानांचा संसार वरती रायगडावर मांडला होता.


रायगडावरच्या वास्तूंविषयी एकुणच खूप लिहिता येईल पण लेखाचे विस्तारभय आहेच मात्र त्या प्रत्यक्षात जाऊन बघणे उत्तम. रायगडचा शिवकालोत्तर इतिहास जाणून घ्यायचा तर - शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ. स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. या छाव्याने शत्रुंवर केलेली पंजेफाड हि विस्मयकारक आहे. मात्र छत्रपती शंभूराजांना स्वस्थता अशी लाभलीच नाही. त्यांचा एका ठिकाणी फारवेळ गेलाच नाही राज्यारोहण वगळता त्यांची रायगडाशी संबधित "ठळक" घटना क्वचितच असावी. मात्र पुढे औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांना पकडल्यावर व त्यांची हालहाल करुन हत्या केल्यावर, स्वराज्याची जबाबदारी छत्रपती राजाराम महाराजांवर आली. इ. स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. मात्र त्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. म्हणूनच मग औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. 


५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने हा वेढा चालू होता. या वेढ्याला यश मिळावे म्हणून औरंगजेबाने कवी कलशचा मुलगा व एक मराठी सरदार यांच्याकडून रायगडाचे मेणाचे "मॉडेल" बनवुन घेतले होते म्हणे.  अखेर दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले.औरंगजेबाने हा किल्ला घेतला खरा पण तो सांभाळणे त्याला जड होऊन बसले. कारण गायकवाड, गोळे यांसारखे स्वराज्याचे पाईक, कांगोरी किल्यावरुन त्याला सतावत होतेच. गड मिळुनही जीवाला स्वस्थता लाभेना. दिल्लीतले नियम मराठ्यांच्या गल्लीत लागू होत नव्हते ... होणारही नव्हते. अखेर वैतागुन त्याने किल्ला जंजिर्‍याचा सिद्दिअ खैरीयतखान याला दिला. मराठ्यांना दुर्दैवाने जंजिरा कधीच जिंकता आला नाही, पेला ओठाशी आला म्हणतानाच दरवेळि तो उडवला जात असे. मात्र सिद्यांनी गडावर जवळपास ४० वर्षे फतकल मांडली होती. अखेर ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठांनी घेतला. 

पुढे पेशवे कालात नाना फडणवीस किल्यावर अनेकदा येऊन गेल्याचा उल्लेख आहे. मात्र कोल्हापुर - सातरा अश्या दोन गाद्या तयार झाल्या, आणि पेशव्यांमुळे सगळ्य भारताचे राजकारण पुण्यात ठरवले जाऊ लागले. साम्राज्य विस्तारल्याने आक्रमणाचे भय संपले व रायगड सारखा बुलंद डोंगरी किल्ला परत मोठ्या युध्दात कधी वापरावा लागला नाही. मात्र त्याला शेवटचे युध्द खेळावे लागले इंग्रजांशी. पण १८१८ मध्ये हा किल्लासुध्दा इंग्रजांच्या ताब्यत गेला. इंग्रजांनी धार्मिक भावनांना थेट कधी ठेच पोहोचवली नाही मात्र "राष्ट्रिय अस्मिता" जागविणारी अनेक ठिकाणे त्यांनी तोफांचा मारा करुन पाडली त्यात रायगडही होता. कारण "शिवाजी" या नावाची आठवण सुध्दा इथल्या लोकांना नविन उभारी देऊ शकते हे त्यांना माहीत होतं.


आज आपण स्वतंत्र आहोत, पण ते स्वातंत्र मिळवण्याची उर्मी छत्रसाल बुंदेल्यापासून थोरल्या बाजीरावांपर्यंत आणि नरवीर उमाजी नाईकांपासून ते सुभाषबाबुंपर्यंत अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शिवछत्रपतींनीच दिली. ते स्वातंत्र्य आता आपल्याला टिकवायचे असेल, आणि रयतेच्या काडिलाही धक्का न लावणार्‍या "जाणत्या राजाला" थोडसं ओळखायचा प्रयत्न करायचा असेल तर प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा रायगडला नक्कि जावे.
 
 "शिवरायांचे आठवावे रुप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ॥"

 - सौरभ वैशंपायन. 

================================
संदर्भ - 
१) महाराष्ट्राची धारातिर्थे - पं महादेवशास्त्री जोशी
२) राजगड बखर - श्री अप्पा परब
३) हुजूरबाजार - श्री अप्पा परब
४) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
५) शककर्ते शिवराय - श्री विजयराव देशमुख

4 comments:

goldenmean said...

Nice article.

Anonymous said...

सूर्याजी पिसाळ प्रकरणाची अधिक माहिती येथे आहे:
http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_10.html

Reshma Apte said...

afaat saurabh

mahitipurn aani lekh anai sundar mandani :)

very nice article yaa ,,, keep it up :)

Surendra said...

सुंदर !