Tuesday, April 19, 2011

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग!



गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला प्रणाम करताना - "राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |" असे त्याचे वर्णन केले आहे. दगडांच्या देशा म्हणजे "गड - कोटांचा" देश. आज एकट्या महाराष्ट्रात सुमारे साडेतीनशेहुन अधिक किल्ले आहेत. शिवछत्रपतींनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले व ते प्रत्यक्षात उतरवले ते गडकोटांच्यावरील असलेल्या त्यांच्या विश्वासावरतीच. निर्वाणाआधी शिवाजी महाराजांकडे जवळपास तीनशे साठ किल्ल्यांचा ताबा होता. म्हणुनच समर्थांनी त्यांचे "गडपती" असे सार्थ वर्णन केले आहे. पुरंदरच्या तहानंतर महाराजांकडे १८ किल्ले होते. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी बलिदन देउन "सिंहगड" जिंकून १९ वा किल्ला स्वराज्यात आणला आणि त्यानंतर ८ वर्षात महाराजांकडे अडिचशेहुन अधिक किल्ले होते. हे वाचून मती गुंग होते. जिथे एक एक किल्ला घ्यायला मुघल - विजापुरकरांना महिने किंवा चक्क अनेक वर्ष लागत (उदा. जिंजीचा वेढा जवळपास ९ वर्ष चालला होता) तिथे मराठे कधी एखाद्या रात्री हल्ला करुन किल्ला जिंकत.  आज ना उद्या खुद्द दिल्लीपती दख्खनमध्ये उतरणार हे महाराजांना माहीत होते. आपल्या एका किल्ल्याने एक वर्ष झुंजवले तरी मुघलांना किमान ३६० वर्षे युध्द खेळावे लागेल अश्याच दृष्टिने महाराजांनी गडकोट बळकट केले होते आणि म्हणूनच औरंगजेबाच्या राक्षसी वरवंट्याखाली महाराष्ट्राचं स्वातंत्र्य याच गड - कोटांनीच टिकवले. तीनशे वर्षे चालत असलेली विजापुर, गोवळकोंडा यांसारखी राज्ये त्याने बागेत फिरायला जावं तितक्या सहजतेने घेतली. पण जनरल सह्याद्रि व अतिचिवट मराठ्यांनी औरंगजेबाच्या माथ्याला टेंगळे आणली. आणि "आलमगीर" म्हणावणारा तो इथेच तोबा तोबा करत तीन हात जागेत विसावला.

भारतात अगदी रामायण - महाभारत कालापासून "दुर्ग" ही संकल्पना दिसते. याशिवाय मनुस्मृती, कौटिलिय अर्थशास्त्र, देवज्ञविलास यात दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. मनुस्मृती दुर्गांवर पुढील भाष्य करते - 

धनुदुर्गं महीदुर्गमब्दुर्गम्‌ वार्क्षमेव वा ।
नृदुर्गं गिरिदुर्गं वा समाश्रित्य वसेत्पुरम ॥
सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्गं समाश्रयेत ।
एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गंविशिष्यते ॥

पैकि - धनुदुर्ग म्हणजे सभोवार अनेक कोस पाणी पुरवठा नसणारा किल्ला. महीदुर्ग - बारा हात उंच तटबंदी असलेला किल्ला. अब्दुर्ग - सभोवार पाण्यामुळे नैसर्गिक संरक्षण मिळालेला किल्ला. वार्क्षदुर्ग - दाट झाडित लपलेला किल्ला. नृदुर्ग - हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांचं संरक्षण असलेला किल्ला. गिरिदुर्ग - डोंगरावरील किल्ला.

तर राजा कृष्णदेवरायाच्या काळातील लाला लक्ष्मीधर याने देवज्ञविलास मध्ये दुर्गांचे ८ प्रकार सांगितले आहेत - 
प्रथमं गिरिदुर्गंच, वनदुर्ग द्वितीयकम्‌।
तृतीयं गव्हरंदुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम्‌॥
पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्यान्मिश्रकं तथा।
सप्तमं ग्रामदुर्गं स्यात्‌, कोष्ट्दुर्गं तथाष्टकम्‌॥

यात डोंगरी किल्ला, वनदुर्ग, गुहेचा किल्ला म्हणून उपयोग करणे, पाणकिल्ला, दलदलीतील किल्ला, मिश्रदुर्ग, गावकूसा भोवतीचा कोट किंवा लाकडि कोट असलेलं ठिकाण असे आठ प्रकार सांगितले आहेत.



महाराष्ट्रात अनेक सत्तांनी दुर्ग जिंकले अथवा नव्याने बांधले. त्यात सातवाहन, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव, विजयनगर, मराठे या सत्ता होत्या तर तुघलक, खिलजी, मुघल, बिदरशहा, निजामशहा, आदिलशहा, सिद्दि, पोर्तुगिज, इंग्रज हे शुध्द परकिय देखिल होते. त्यामुळे महाराष्ट्रात बहुविध शैलींचे किल्ले बांधले गेले. अनेकदा मुळ बांधकामात बदल करुन त्यावर आपली शैली उभारायची असे प्रकार देखिल सर्रास दिसतात. महाराष्ट्रात आधिक्याने आढळतात ते गिरीदुर्ग आणि अर्थातच तेही मुख्यत: सह्याद्रिच्या रौद्ररम्य रांगेत. त्याशिवाय गेली अनेक शतके समुद्राच्या थपेडा खात उभे असलेल्या भक्कम जलदुर्गांनी देखिल महाराष्ट्राचे वैभव वाढवले आहे.


सध्यातरी आपण मुख्य विचार करणार आहोत तो शिवछत्रपतींनी बांधून घेतलेल्या दुर्गांचा व मराठ्यांच्या दुर्गांवरची व्यवस्था साधारणत: कशी होती याचा. शिवाजी महाराजांकडे भले ३६० किल्ले होते, पण त्यांनी नव्याने बांधुन घेतलेले किल्ले साधारण १८ - १९ असावेत. त्यात मुख्यत: राजगड, तोरणा, प्रतापगड, रायगड हे डोंगरी तर पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी हे समुद्रि किल्ले येतात. गड बांधणीत प्रत्येकवेळि महाराजांनी नवनवे तरीही यशस्वी प्रयोग केले. एखादा संपूर्ण दुर्ग किंवा दुर्गाचा महादरवाजा मराठ्यांनी बांधला हे ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचे गोमुखी प्रवेशद्वार. किल्ल्याचा महादरवाचा थेट दिसणार नाही असा दोन बुरुजांच्या आत बांधायचे तंत्र महाराजांनी वापरले. यामुळे शत्रूला थेट तोफ तर त्यावर डागताच येत नाही पण महादरवाज्या समोर आल्या खेरीज शत्रुला त्यावर हल्ला चढवताच येत नाही मात्र यावेळि शत्रू महादरवाज्या समोरील चिंचोळ्या जागेत आला कि तट बुरुजांच्या जंग्यांतून ३ ठिकाणहून त्यावर भरपूर मारा करुन त्याला सहज परास्त करता येते.


पूर्वी महादरवाजा फोडायला हत्ती वापरत. मग त्याला अटकाव करायचे मार्गही शोधावे लागत. त्यासाठी दरवाज्यावर मोठे मोठे अणकूचीदार खिळे लावत म्हणजे धडक मारायला हत्ती बिचकायचे. त्यावर शत्रू असा उपाय करत असे कि दरवाज्या समोर उंट आडवा टेकवून हत्तीला त्या उंटावर धडक द्यायला लावत म्हणजे उंटामुळे हत्तीला ते खिळे दिसत नसत. म्हणजे हत्तीच्या व खिळ्यांच्या मध्ये उंट मेला तरी पलिकडचा दरवाजा फुटत असे. मग यावरचे उपाय म्हणजे  एकतर महादवाज्याकडे येणार्‍या वाटेतला काहि भाग हा इतका चिंचोळा  वा नागमोडि ठेवायचा कि "हत्ती" त्यातून आत येऊच शकणार नाही, दुसरे - दरवाज्यांच्या पुढे हत्तीला धावत यायला मोठी जागाच ठेवायची नाही, तिसरे - दरवाज्या समोर उंच पायर्‍या बांधायच्या व चौथे - दरवाजा थेट समोर न ठेवता उजव्या किंवा डाव्या भिंतीत ठेवायचा. तरीही काही कारणाने समजा महादरवाजा शत्रूच्या हाती पडलाच तरी आत आल्या आल्या थेट किल्ल्यात प्रवेश नसे समोर एक भक्कम भिंत उभी असे म्हणजे संपूर्ण U टर्न किंवा ९० अंशात वळावे तर समोर पुन्हा उंच पायर्‍यांची वाट असे त्याने सहाजिक शत्रूची गती कमी होई आणि या वळणार्‍या वाटेवरती मारा करता येईल अशी सोय आत असे. या खेरीज साधारण डोंगराच्या मध्यावरच तटबंदी घालून डोंगराचा जास्तीतजास्त भाग स्वत:साठी सुरक्षित करायचा आणि शिवाय मग बालेकिल्ला अजून उंचीवर बांधायचा हे तंत्र आपल्याला रायगड, राजगड, प्रतापगडावर देखिल दिसतं.


शिवछत्रपतींनी बांधून घेतलेल्या किल्ल्याचं अजून वैशिष्ट्य म्हणजे मुख्य दरवाजाकडे जाणार्‍या वाटांच्या उजवीकडे किल्ल्याचा कडा व तटबंदि असते. याचं कारण श्री प्र. के. घाणेकरांनी त्यांच्या "अथा तो दुर्गजिज्ञासा" या पुस्तकात देताना सांगितलं आहे कि  पूर्वी मुख्य लढाई ही ढाल - तलवारींनीच होई. शिवाय बहुसंख्य माणसे ही उजव्या हाताचा जास्त वापर करणारी असतात. सहाजिकच तलवार उजव्या हातात असे व ढाल ही डाव्या मनगटाच्या वरील भागात चामड्याच्या पट्ट्यांनी आवळून "बांधली" जात असे. याचा विचार करुन शत्रूला याचाच वापर त्याच्या विरुध्द करण्याच्या दृष्टिने हे दुर्ग बांधले. हल्ला करताना तटबंदि उजव्या बाजूला असली कि सहाजिक त्यांच्या उजव्या बाजूवरुन बाण, बंदूका, उकळते तेल व मुख्यत: दगड - धोंडे यांचा मारा होणार. हा मारा चूकवण्यासाठी (मुख्यत: दगडांचा) त्या सैनिकाला तलवार मध्ये घालता येत नसे अन्यथा तलवारीला खांडे पडून तलवार निकामी होई मग त्यासाठी ढाल वरती उजव्या बाजूला धरणे क्रमप्राप्त होते अन्यथा चाळिस - पन्नास फुटांवरुन फेकलेला लहानसा गोटा अगदी जीवघेणा देखिल ठरु शकतो. पण मग त्यासाठी तलवार डाव्या हातात घ्यावी लागेल. ह्याने  समजा वरुन होणारा मारा चूकवत शत्रू दरवाज्या नजिक आलाच तर अचानक मराठ्यांची लहानशी टोळी दरवाज्या बाहेर हल्ला करायला आल्यास पुन्हा ढाल - तलवारीची अदलाबदली करणे जवळपास अशक्य असे त्याने शत्रूचा मारा निष्प्रभ होई.


शिवछत्रपतिंनी राजाभिषेकानंतर रघुनाथपंतांकडून 'राज्यव्यवहारकोश' तयार करवून घेतला. त्यात सातवे प्रकरण किल्ल्यांवर आहे. तर शिवकालोत्तर कालात लिहिल्या गेलेल्या रामचन्द्रपंत अमात्य यांच्या "आज्ञापत्रात" आठव्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. खरतर दुर्गांचे महत्व विषद करणारे ’आज्ञापत्रातील’ ते "दुर्ग" प्रकरण मुळापासून वाचण्यासारखे आहे. तरी या कारणाखेरीज आज्ञापत्र या करीता महत्वाचे आहे कि शिवछत्रपतींच्या आज्ञेवरुन रघुनाथपंतींनी राज्यव्यवहारकोषात सुमारे १४०० फार्सी अथवा मराठी भाषेबाहेरील शब्दांना गिर्वाणभाषेतील प्रतिशब्द दिले आहेत. त्यात अर्थात किल्ल्यांवरील वास्तू अथवा बांधल्या गेलेल्या भागांना असे प्रतिशब्द दिले आहेत. मुळात "किल्ला" हा शब्दच फार्सी आहे. संस्कृत भाषेत आपण त्याला "दुर्ग" म्हणतो, ज्याचा भेद करणे दुर्गम आहे तो दुर्ग. याशिवाय बालेकिल्ल्यास "अधित्यिका", माचीस "उपत्यिका",  खंदक म्हणजेच परीखा असे अनेक शब्द सांगता येतील. शिवाय - चर्या (तटावरची नक्षीदार दगडांची रांग), नाळ (दोन तटांमधली माणसांच्या वावरण्याची जागा (जशी संजीवनी माचीत आहे), जिभी/हस्तीनख (दारासमोरील आडोसा), जंग्या (तटांमधून बंदूका/तीरांचा मारा करायला ठेवलेली जागा), फांजी (तटावरची चालण्याची जागा), रेवणी (खंदक व तट यांच्यातील तटाबाहेरची जागा) असे शब्द किल्यांच्या अनेक भागांसाठी वापरलेले आढळतात.


किल्ल्यांची बांधणी कशी आहे ते बघुन त्याची शैली समजते, बुरुज जर गोलाकार असतील तर ती भारतीय शैली, ’चौकोनी’ असतील तर ते ब्रिटिशांनी बांधलेले तर भिंतीच्या पुढे किंचीत अधांतरी पण भक्कम असलेले किंवा पंचकोनी बुरुज असतील तर ते पोर्तुगिज बांधणीचे आहेत असे समजायचे. काही वेळा भारतीय बांधणीत देखील षटकोनी अथवा अष्ट कोनी देखिल बुरुज आढळतात पण ते क्वचित. उदा राजगड बालेकिल्ल्याचे दोन्ही बुरुज देखिल असेच कोनातील (त्यांना चार कोन आहेत) आहेत. दुपदरी किंवा चिलखती बुरुज ही संकल्पना आपल्याला शिवछत्रपती निर्मित दुर्गांच्या बांधकामात अनेकदा दिसते. बुरुजांच्या बांधणी शिवाय त्या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरची चिन्हे, तो किल्ला कोणी बांधला अथवा कोणाकडून जिंकून घेतला हे दर्शवतात. उदा कमळ असेल तर ते देवगिरी सत्तेचं प्रतिक आहे, गंडभेरुंड (द्वीमुखी गरूड) असल्यास विजयनगरचं साम्राज्य, शरभ किंवा सिंह असल्यास आदिलशहा किंवा मराठे, क्रॉस असल्यास पोर्तुगीजांचा किल्ला, गणपती असल्यास पेशवाई काळातील बांधकाम असं सहज ओळखता येतं.  शिवाय अनेकदा विजयाचे चिन्ह म्हणून दुसर्‍यांची प्रतिकं आपल्या प्रतिकांच्या पंज्यात अथवा शेपटित धरलेले दर्शवितात, उदा - काहीवेळा गंडभेरुंड शरभाच्या पायाखाली किंवा सिंहाच्या शेपटित हत्ती धरलेला दाखवतात.


वरील गोष्टि बर्‍याच अंशी माहितही असतात, आता आपण बघूया कि किल्ल्यावरची व्यवस्था कशी असे? - त्यासाठी असे "कान्हूजाबता" म्हणजे कानून+जाबता थोडक्यात सांगायचे तर "नियमावली". केंद्रिय सत्तेकडून ही नियमावली बनत असे. त्या किल्ल्याचा मुख्य असे किल्लेदार. मराठी कागदपत्रात त्यासाठी ’हवालदार’ असाही शब्द वापरलेला आढळतो, वास्तविक हवालदाराचे सुध्दा २ वेगवेगळे उल्लेख आहेत एक ’परगण्याचा’ तर दुसरा ’किल्ल्यावरचा’. सध्या फक्त किल्ल्यापुरता विचार करु. तो हवालदार किल्ला व त्याच्या परीसरातील न्याय, मुलकि व लष्करी कामांसाठी जबाबदार मानला जात असे. मात्र कुठलीही नेमणूक तो किल्लेदार थेट करु शकत नसे. तो फारफार तर शिफारीस करु शकत असे मात्र निर्णय केंद्रिय सत्ताच घेत असे. हे किल्लेदार त्या पंचक्रोशीच्या बाहेरचे असत. याचे कारण, समजा शत्रूने उद्या त्या किल्लेदाराच्या कुटुंबाला पकडून समोर उभे केले तर मानसिक दबावाखाली तो शरण जाण्याची शक्यता असे. कुटुंब दूरच्या कुठल्या गावात असेल तर हि शक्यता उरत नसे.


मुलकि वा आर्थिक कामांसाठी किल्लेदाराला जबाबदार धरले जाई त्याच्या हाताखाली अनुक्रमे सबनिस > कारखानिस > फडणीस (सबनिस व कारखानीस या दोघांच्या हाताखाली वेगवेगळे फडणीस असत) > दफ्तरदार > कारकून अशी फळी असे. पैकि सबनीस जमाखर्च बघत व किल्लेदाराच्या अल्पकालिन अनुपस्थितीत किल्लाची जबाबदारी सबनिसांकडे असे, सबनिस साधरणत: ब्राह्मण जातीचा नेमत. तर कारखानीस किल्ल्यावर अथवा किल्ल्याच्या परीसरात होणारे उत्पादन, रसद व किल्ल्याचे जतन/डागडुजी यांकडे लक्ष पुरवत असे, बहुतेकदा कारखानीस कायस्थ प्रभू असत. गरज असताना किल्ल्यावरील खजिना उघडताना त्यावेळि किल्लेदार, सबनिस, कारखानिस आणि फडणवीस हे तिथे उपस्थित असणे गरजेचे असे. तसेच धान्याचे कोठार उघडायचे असल्यास कोठिदार किंवा कोठावळ्याला असेच उघडता येत नसे त्यावेळि कारखानीस तिथे उभा रहात असे. यांच्याशिवाय किल्ल्यावर तासकरी (घटिकापात्रांवर लक्ष ठेवुन तासांचे तोल वाजविणारा) असत, किल्ला मोठा असेल तर एकापेक्षा जास्त तासकरी असत. त्यांचा पगार सरकार करी. किल्ल्यावर अथवा पायथ्याशी दोन - दोन गवंडि, सुतार, चांभार मुद्दाम आणून वसवले जात. त्यांना सरकारातून पगार मिळत असे. ऐकून नवल वाटेल पण अशी कला असणार्‍यांना सामान्य सैनिकापेक्षा जास्त पगार मिळत असे. आज्ञापत्रात यांखेरीज जोशी, वैद्य, जडिबुटिची माहीती असणारे वैदू. रसायनवैद्य असावेत असे आज्ञापत्र म्हणते.


लष्करी हुद्यांमध्ये किल्लेदाराच्या हाताखाली सरनौबत > तटसरनौबत असत. यांच्याच हुद्याच्या जवळचे म्हणावेत असे नाईक > तटसरनाईक देखिल असत. किल्ला जितका मोठा वा महत्वाचा तिथे यांची संख्या एकाहून अधिक असे.


गडाच्या परीघात महार - मांग यांचे "मेटे" असत. यांना मेटकरी म्हणत. गड यांच्या खांद्यावर शांतपणे डोके ठेवून झोपत असे. कारण परचक्र आल्यास त्याची पहिली लाट हे बहाद्दर आपल्यावर घेत. गडाभोवतालची गस्त हेच घालत. त्यांना आजूबाजूची जमिन कसून गुजराण करावी लागत असे मात्र त्यांवर कुठलाही कर लावला जात नसे. व्यवस्थेत त्यांना आदर होता. किल्ल्याच्या आसपासच पेठा असत. गडावरच्या वस्तू याच बाजारातून मिळत व बाजाराला गडाचे संरक्षण. पावसाळ्यापूर्वी  किल्ल्यावरच्या सगळ्या वस्तू शाकारण्याची व्यवस्था करावी लागे, गहू - बाजरीच्या पेंढ्यांनी घरे, दारूची कोठारे, बुरूज, दोन तटांना जोडणारी ठिकाणे, दरवाजे हे शाकारले जात. त्यासाठी सरकार खालच्या गावातून वेठे (मजूर) बोलावून घेई व बाजारभावानुसार काही हजार गवताचे भारे मागवून घेत.


प्रत्येक किल्ल्याचा वार्षिक अहवाल असे. सरकारातून एक अधिकारी येऊन "AUDIT" करत असे. कधी कधी नव्याने जिंकलेल्या किल्ल्याची पहाणी करुन त्याची डागडुजी, त्याला लागणारे सैन्य, सैन्याला लागणारे धान्य, युध्दकाळाची बेगमी आधीच करुन ठेवण्यासाठी अधिकचा पण बाजूला काढावा लागलेला धान्यसाठा, पाण्याची व्यवस्था, तेल, मीठ, जीरे, मोहरी यांसारखा छोटा खर्च देखिल जमेस धरला जात असे. शस्त्रे सरकारच देत असे. दरवर्षी त्यांची संख्या मोजली जात असे. त्यांची संख्या कमी अथवा जास्त झाली तर त्याची चौकशी होत असे. गुन्हेगाराला कडक शासन होई. कुठली शस्त्रे कोणी बाळगावी याचे नियम होते. परवानगिशिवाय वाघनखे बाळगायची बंदि होती. दुतर्फा खर्च म्हणून एक प्रकार असे म्हणजे एका किल्ल्यावरचा माणूस काही कारणाने तात्पुरता अथवा कायमचा दुसर्‍या किल्ल्यावर नामजाद झाला तर त्याचा पगार नव्या ठिकाणी दिला जात असे मात्र त्याची नोंद पूर्वीच्या किल्ल्यावर देखिल केली जाई. तसेच त्याच्या जमिनीचा कर नविन ठिकाणहून सरकारात जमा होत असे.


सर्वसाधारणपणे किल्लेदाराचा पगार सर्वात जास्त असे साधारण ५००-६०० रुपये. शिवाय त्यांना अब्दागिरेचा मान असे. त्याखालोखाल मग सबनीस, कारखानिस, सरनौबत, तटसरनौबत अशी उतरती भाजणी असे. मात्र क्वचित किल्लेदार नविन असला व सबनिस, कारखानिस हे जुने जाणते व खूप अनुभवी असले तर त्यांचा पगार नवख्या किल्लेदारापेक्षा जास्त असे. या सगळ्यांत विशेष मान होता तो गोलंदाजांना किंवा "तोपचींना". अचूक ठिकाणी तोफा डागण्याचे तंत्र अनेक वर्षे युध्दात आघाडिवर राहून त्यांनी आत्मसात केलेले असे, त्यामुळे यांनाही कधी कधी अगदि कारखानिसांइतका पगार देखिल असे. मोठ्या किल्ल्यांवर ५ पर्यंत तोपची सहज असत. शांतता काळात व मुख्यत: पावसाळ्यात अर्थातच तोफांची काळजी घेण्याचे जोखमीचे काम त्यांवरच असे. सामान्य सैनिकाचा पगार हा साधारण ५ रुपये असे. यातही १/३ - १/३ - १/३ अशी वाटणी करुन अन्न, वस्त्र व मोहरा यात तो पगार विभागून त्याला दिला जात असे.


वर सांगितलेला सगळा खर्च हा "सनदि खर्च" म्हणून अंदाजपत्रकात आधीच नोंद होत असे, व तसे पैसे गडावर पाठवले जात. जो पगार वाटला जात असे त्यासाठी सरकारातून "हजेरनविस" येत असे किल्ल्यावरील सगळ्या सैनिकांची तो स्वत: किल्लेदार, सबनिस, कारखानीस यांच्या समक्ष हजेरी घेत असे व नोंद केलेली संख्या बरोबर आहे का? हे बघत असे. ती बरोबर असल्याची खात्री झाली कि मगच स्वत:कडिल पैसे किल्लेदार - सबनिसाकडे देत असे. मात्र कधी कधी अचानक काही कामे निघत, वीज पडून नुकसान होई, दुष्काळ पडल्याने ठराविक कोट्याचे धान्य गडाच्या आसपासच्या गावांना वाटावे लागे इ.इ. ह्या अनाहुतपणे उपटल्या खर्चांना "गैरसनदि खर्च" म्हणत. हा खर्च किल्लेदार आधी करत असे व मागहुन त्याची पडताळणी, हिशेब करुन मग सरकारातून तो खर्च किल्लेदारास मिळत असे.


गडावर कुठल्याही धर्माचे देवस्थान असेल तर त्याचा खर्च सरकार करत असे. त्याला दिवाबत्तीची सोय करुन दिली जात असे. नंदादिपात किती तेल असावे याचे माप कागदपत्रात "छ-टाक" म्हणजे सहा टाक असावे असे दिले आहे तर माणसाला अन्न शिजवायला "नव टाक" अशी नोंद आहे. आज आपण छटाक, नवटाक  वेगळ्या अर्थी वापरतो ते सोडा, पण त्याचेही लिखित नियम असत. सरकारचे वेगळे तूपाचे भांडार असे एक खाण्याचं तूप दुसरं नासकं तूप. नाव नासकं असलं तरी ते जखमेवर बांधण्यासाठी अनेक वर्षं साठवलेलं तूप असे. नासक्या तूपातून जखमा "बांधत" अथवा "तळत". बांधण्यापर्यंत काय ते समजतही, पण ’जखम तळणं" काय प्रकार आहे? तर त्यांचे हात - पाय कलम होत त्यांचा रक्तस्त्रावाने मृत्यू होऊ नये म्हणून हात कलम केल्यावर लोंबणारे मांस - जखम उकळत्या तूपात पटकन बुडवून बाहेर काढली जाई कि ती जखम "सील" होई.


किल्ल्यावरती अनेक सण उत्साहात साजरे होत. पण मुख्य सण "दसरा". या दिवशी गडावरती नवं निशाण लावत. गडाच्या रक्षणकर्त्या देवतेची पुजा करत. त्याच बरोबर किल्ल्याच्या परीसरातील अतृप्त आत्मे, पिशाच्च यांचीही शांती करण्यासाठी प्रत्येक किल्ल्यावर रेड्याचा बळी देत. हा सगळा खर्च सरकार करे. आधी रेड्याच्या नाकाचा टवका कापून त्याच्या नाकातील रक्त गाळत किल्ल्याला फेरी मारत व फेरी पूर्ण झाली कि किल्लेदार स्वत:च्या हाताने रेड्याचा बळि देई. सैनिकांत त्याचा प्रसाद वाटला जाई. दिवाळित शोभेचे दारुकाम होई. गोळा न घालता दारू ठासून तोफा उडवल्या जात. त्यांनाच चंद्रज्योती म्हणतात.


अजूनही शेकडो लहान - मोठ्या गोष्टि आहेत जसे किल्ल्याचे दरवाजे उघडणे - बंद करण्याचे नियम, किल्लेदाराला सरकारी कामासाठीच किल्ला तात्पुरता सोडावा लागला तर अधिकार कुणाकडे द्यावेत याचे नियम, गडावरती राजप्रासाद असेल त्याची व्यवस्था, वर्षभर तोफगोळे व दारू दमट होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, हत्यारांची घ्यायची काळजी, गडावरती व गडाभोवताली कुठली झाडे, वृक्ष अथवा झुडुपे असांवित? किल्ल्यावरच्या कचर्‍याचे काय करावे? गडावरची पाण्याची व्यवस्था कशी असावी याबाबत काटेकोर नियम असत.


शिवछत्रपतींच्या किल्ल्यांविषयी आजवर अनेक पुस्तके आली. एकेका किल्ल्यावर इतिहास व व्यवस्था असे एक एक पुस्तक निघाले तरी किमान ३०० पुस्तके निघतील इतका हा विषय मोठा आहे, एका लेखात तो बसणे कदापी शक्य नाही. याच किल्ल्यांनी मराठ्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. देशासाठी झुंझताना सह्याद्रि, जंगले व कोकण - गोव्यात फेसाळणार्‍या समुद्राने साथ दिली. या शिखरांवर त्यांच्या पायथ्याशी, किंवा भर समुद्रात आपला इतिहास घडला. अनेक वीर या किल्ल्यांसाठी, महाराजांसाठी, स्वराज्यासाठी लढताना कामी आले. त्यांचा मुकुटमणी देखिल तिथे रायगडावर चीरनिद्रा घेत पहुडला आहे. त्यांचा जन्म झाला गडावर, आयुष्यभर तो महामानव लहान मोठ्या गडकोटांवर वावरला व अखेरचा श्वास देखिल गडावरच घेतला. ते सर्वार्थाने "गडपती" होते. या सगळ्याची आठवण आपण ठेवली पाहीजे. आज आपले गडकोट काळ गिळत आहे. जंगल माजून बुरुज ढासळत आहेत, काही निर्बुध्द आणि कद्रू लोक त्यांच्या भिंतींवर आपली नावे कोरुन ती ठिकाणे विद्रुप करतात तेव्हा मनाला खूप त्रास होतो. समुद्रात नुसता तीनशे फुटि पुतळा उभारुन काहीही फायदा नाही. आपल्या ऐतिहासिक ठेव्याविषयीच जागरुकता नसेल तर त्या नव्याने बांधलेल्या तीनशे फुटि पुतळ्यानी काय मेलेली मने जिवंत होणार? ऐतिहासिक स्मारके हि स्फुर्ती घेण्यासाठी असतात कि कचरा करण्यासाठी? याविषयी समाजाला भान येत नाही तोवर सर्व फुकट आहे. फक्त ज्या वेगाने गडकोट नष्ट होत आहेत ते बघता दोन पिढ्यांनी महाराष्ट्राला "दगडांच्या देशा" अशी हाक मारता येणार आहे का? यावर विचार व्हावा इतकिच अपेक्षा.

बहुत काय लिहिणे? सुज्ञ असा!
विज्ञापना, राजते लेखकावधि ॥

शिवशक ३३७,  चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती, शिवपुण्यतीथी).

 - सौरभ वैशंपायन.

============
संदर्भ -
१) अथा तो दुर्गजिज्ञासा - प्रा. प्र के घाणेकर.
२) १७ एप्रिल २०११ रोजी जनसेवा समिती आयोजित दुर्गजिज्ञासा या कार्यक्रमातील श्री निनाद बेडेकर, श्री पांडुरंग बलकवडे व प्रा. घाणेकर यांची व्याख्याने.
३) आज्ञापत्रातील "दुर्ग" प्रकरण.


5 comments:

BinaryBandya™ said...

मित्रा अप्रतिम माहिती ..
धन्यवाद

इंद्रधनु said...

Chhan sangrahi asavi ashi mahiti....

Sanket Patekar said...

mast....! khup sundar..! atyawashyak mahiti dilit...!

mi suddha hajar hoto tya vyakhyanala.....vile parle yethe...!

Architect Pritesh Shinde said...

bhari mahiti :)

chandrashekhar said...

अतिशय अभ्यासपूर्वक माहिती दादा 🙏 ....