Saturday, October 29, 2011

गंध

गेल्या महिन्यात घरी रंगकाम चालू होतं, मला तो रंगाचा विशिष्ट वास फार आवडतो. दमेकरी लोकांना त्रास होतो म्हणून आजकाल स्मेललेस - गंधरहित रंग येतात. ज्यांना त्रास होतो त्यांच ठिक आहे, पण आठवडाभर घरात तो नव्या कोर्‍या पेंटचा वास आला नाहि तर रंगकाम झालय हे डोळ्यांना दिसलं तरी मनाला पटत नाहि. काहितरी कमी आहे असं वाटत राहतं.

"गंध" हि सजिवांना मिळालेली किती सुंदर गोष्ट आहे? विचार करता करता लक्षात आलं कि आपलं रोजचं आयुष्य सुध्दा किती गंधाळलेलं आहे. किती म्हणून गंध मोजाल? नव्या कोर्‍या पुस्तकांचा तो विशिष्ट वास? आणि नव्या दप्तरचा, छत्रीचा, रेनकोटच्या रबराचा किंवा प्लास्टिकचा नवा नवा वास .... शाळेत असतानाचा जूनचा सुरु झालेला पाऊस आणि या सगळ्यांचा एकत्रीत गंध मी कधीच विसरु शकत नाही.

पावसावरुन आठवलं उन्हाने रापून तडे गेलेल्या जमीनीवर पहिल्या सरी पडल्या कि वातावरणात एक सुखावणारा मातीचा गंध पसरतो. त्या वासाला दुसर्‍या कशाचीहि सर नाहि, कॉम्पिटिशन तर नाहिच नाहि. का ते माहित नाहि पण कालिदासाच्या मेघदूताचे नाव निघाले कि आपसूक हा गंध नाकाजवळ पिंगा घालतो, स्वर्गिय काव्य तितकाच स्वर्गिय गंध त्यामूळेहि असेल कदाचित. तो मातीचा वास अंगभर माखून घ्यावासा वाटत राहतो.

डोंगर दर्‍यात व त्यातुनही दाट जंगलातून फिरताना तुडवल्या गेलेल्या रोपट्यांचा - गवताचा एक टिपिकल वास आपली सोबत करत असतो. पावसाळा असेल तर पचपचीत झालेल्या ट्रॅकपॅन्टला गुडघ्यापर्यंत तोच वास असतो. त्याच डोंगर दर्‍यांतल्या गुहांमध्ये - लेण्यांमध्ये रात्र काढा कधीतरी, वटवाघुळांनी - पाकोळ्यांनी भरलेल्या त्या गुहांतला तो उग्र दर्प किंवा सरळ दुर्गंधच म्हणायला हरकत नाहि, छातीभरुन श्वास घेऊच देत नाहि. हां नाहि म्हणायला गड किल्यांवरच्या मंदिरात जिथे गावकरी नेमाने दिवा-बत्ती करतात तिथे तेलाचा, खांबांना पुसलेल्या शेंदुराचा मिक्स वास असतो. त्या वासानेहि अंधार्‍या रात्रीत आपसूक सुरक्षित वाटतं.

हे झालं डोंगर दर्‍यांच, पण प्रत्येक गावाला - शहराला स्वत:चा गंध असतो. एप्रिल महिन्यात कोकणात एखाद्या आमराई जवळून संध्याकाळी चक्कर मारा बरं. आंबेमोहराचा घमघमाट आणि कोकण हे समिकरण डोक्यात कसं आपोआप फिट्ट बसेल. किंवा एखाद्या गोठ्याजवळून जाताना शेण - गवत यांचा एक थंडगार गंध परत परत घेत रहावासा वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसात, सकाळिच शेणाने सारवलेल्या पडवीत करकरणारी काथ्याच्या दोर्‍यांची खाट, त्यावर जाडं भरडं कांबळ टाकून रात्री तारे मोजत मोजत झोपण्यातलं सुख अवर्णनिय आहे. ते सुख जितकं मोकळ्या आकाशाखाली झोपण्यातलं असतं तितकच नकळतपणे त्या सारवलेल्या अंगणाचा येणार्‍या गंधाच देखिल असतं.

प्रत्येक घराला, घराच्या प्रत्येक खोलीला, खोलितल्या कपटांना आपापला गंध असतो. आवरण्याच्या निमित्ताने जुनी पेटि उघडली कि त्यातुन विशिष्ट गंध येतो. तो गंध केवळ त्या वस्तूंचा नसतो .... आठवणींचा देखिल असतो. जुने - लहानपणीचे कपडे, फोटो, मळक्या किंवा मोडक्या तरीहि हव्याहव्याश्या वाटणार्‍या - न टाकवणार्‍या बाहुल्या किंवा खेळणी. त्यांचा ठेवणीतला वासच फार लाडिक असतो, म्हणजे, कामात डोकं घालुन बसलं असताना कोणीतरी छोट्या छोट्या हातांनी मागुन गळ्याला मिठी मारावी आणि बोबडं बोबडं "चल ना लेऽऽऽ खेलूया आपन!" असं म्हणाव ....  कि टाकायला म्हणून काढलेल्या जवळपास सगळ्या गोष्टि परत तश्याच त्या पेटित जातात.

अजून एक सुखावणारा प्रसन्न वास म्हणाजे सणासुदिच्या दिवशी किंवा घरात शुभ कार्य असताना स्वयंपाक खोलीतून येणारा अन्नाचा एक विशिष्ट मिश्र वास. एरवी कधी तेच सगळे पदार्थ जसेच्या तसे केले तरी "तो" गंध इतर दिवशी नाहि येत हेहि खरआहे. खास करुन मसाला उदबत्तीची सुगंधी वलय पंक्तीत आजूबाजूला तरंगत आहेत, पानात वरण-भात-साजूक तूप, केळं घालून केलेला नैवेद्याचा शीरा किंवा खीर, बटाट्याची भाजी, डाळिंबीची उसळ या दोन - चार पदार्थांचा मुख्य व त्यात कोशिंबीरी, पातळ भाज्या, लोणची यांचा "मी पण! मी पण!!" करत मिसळला गेलेला सुगंध ... वा (.... मी खुलासेवार वर्णन करत अजून नाही लिहू शकत कारण मला भूक लागायला सुरुवात झालीये आता!). म्हणजे आधी गंधाने, मग डोळ्यांनी व त्यानंतर जीभेने अन्नाची चव घेतली जाते.

गंध नसता तर अनेक सुखांना मुकलो असतो. Anosmia नावाचा आजार असलेल्यांची गंध घेण्याची जाणीव कमी कमी होत जाते, अश्यांची नंतर काय घुसमट होत असेल? मध्ये "गंध" याच नावाने एक मराठी चित्रपट आला होता त्यात HIV बाधीत व्यक्तीची भूमिका मिलिंद सोमणने उत्तम वठवली होती त्यात त्याच्या गंध घेण्याच्या ताकदीवर परीणाम झाला असतो त्यातली मनावर सर्वात जास्त ओरखाडा काढणारी गोष्ट म्हणजे त्याची बायको (सोनाली कुलकर्णी) न्हाऊन आल्यावर तो तिच्या ओल्या केसांचा गंध घेत असतो पण तो गंध न आल्यावर त्याने दाखवलेली बेचैनी आतवर बोच लावणारी आहे. या उलट तसाच चित्रपटातला संदर्भ पण सुखद शेवट करणारा म्हणजे "श्वास" चित्रपटाचा शेवट, कोकणात आपण आपल्या गावात आलोय हे अंध झालेल्या छोट्या्या परश्याला तो आपल्या गावाचा ओळखीचा हवाहवासा वाटणारा गंध छातीभर भरुन घेतल्यावर समजते, त्यावेळच्या त्याच्या आनंदाने वाजविलेल्या टाळ्या आपल्याहि चेहर्‍यावर आपसूक आश्वासक हसू आणतात.

एकदा विचार करुन बघा आपलं आयुष्य या गंधांनी किती सुखकर बनवलय. चार दिवस घरा बाहेर असाल तर घराचं दार उघडल्यावर आधी मनभरुन घराचा ऊबदार गंध घ्या, घर त्यानेच तुमचं स्वागत करेल. जेवण झाल्यावर एकदा नॅपकिनला हात - तोंड पुसण्या ऐवजी कधीतरी घरातल्या आजी, आई, मावशीच्या पदराला तोंड पुसा, तो गंध साठवून घ्या.

तसा शैक्षणिक दृष्ट्या  "ढ" असल्याने आजवरच्या आयुष्यात दुसरं काहिहि नसेल पण मी एक गोष्ट शिकलोय, रंग आणि गंध या दोन गोष्टि फार सुंदर आणि हळव्या असतात तुम्हि त्यांना जितका जीव लावाल तितकच ते तुमचं आयुष्य रंगीत करतील -  गंधाळलेलं करती. क्वचित तो गंध दु:खाचाही असेल, वादळि रात्रींचा अनामिक सुगंध देखिल असेल. पण तो गंध खरा असेल, निर्मळ असेल ..... अगदी एका हातात मोर्चेल घेऊन दुआ देत फिरणार्‍या फकिराच्या त्या धुपाटण्यातल्या गंधा इतकाच.

 - सौरभ वैशंपायन.

3 comments:

सौ गीतांजली शेलार said...

खूप छान ! गंध अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यात !

BinaryBandya™ said...

sundar lihale ahes :)

Reshma Apte said...

gandh fulancha, panaanchaa, matichaa, zaadanchaa, gharatala, daaratala, bakulichyaa sukalelyaa fulatala,, aathavanitalaa, sathavanitalaa,,, cheharyaavr hasu fulavanaaraa,, kwachit kadhi nakaatun manaat saathanaaraa datanaaraa

GANDH

sundar apratim likhaan as usual saurabh :)

ek sugandhi lekh :)