सामान्य माणसासाठी तो एक दंतकथा होता. कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी अनेक वर्ष तो झगडला नव्हे जिंकला. वरुन ७ वेळा टूर दि फ्रान्ससारखी जगातली सर्वात कठीण सायकलिंगची स्पर्धा जिंकून जगात अशक्य काहीच नाही हे त्याने दाखववून दिले होते. हे सगळं अमानवी पातळीवरचं होतं. कर्करोगाने खचल्या लाखो जीवांचे तो प्रेरणास्थान होता. पण २००५ पासून त्याच्यावर जे आरोप होत होते त्याचा सोक्षमोक्ष अखेर गेल्या महिन्यात लागला. अर्थात त्याच्या चाचण्या आधीही झाल्या होत्या व गेल्या जूनमध्ये ज्या चाचण्या झाल्या त्यांच्या आधारावरती अमेरीकन डोपिंग संघटनेने लान्स आर्मस्ट्रॉंगवरती आरोप सिध्द केले व त्यामुळे आंतरराष्ट्रिय सायकलिंग संघटनेने त्याची टूर-द-फ्रान्सची सातही पदके काढून घेतली आणि त्यावर आजन्म बंदी देखिल घातली आहे.
एखादं व्यक्तीमत्व किती चढ-उतारातून जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लान्स आर्म स्ट्रॉन्ग. ज्यांनी त्याचे "It's not about bike, It's about journey back to life" हे पुस्तक वाचलं असेल त्यांना त्याचा पूर्वेतिहास माहित असेलच. आईचे २ डिव्होर्स, लहानपणापासूनच जन्मदात्या पित्याशी असलेले तणावपूर्ण संबध, त्याचे शाळा-कॉलेज मधले गरीबीतले दिवस, कॉलेजच्या दिवसात आयुष्यात येत जाणारी स्थिरता, पहिल्या २nd hand गाडिने लावलेली रेस, सायकलिंगमधला प्रवेश, सायकलिंगच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून निवडणे, स्थानिक, राष्ट्रिय पातळीवरच्या व नंतर आंतरराष्ट्रिय स्पर्धा जिंकणॆ हा प्रवास वाचताना आपण थक्क होतो. सायकलिंग मधल्या काही तांत्रिक बाबी देखिल त्याने त्यात मांडल्या त्यासाठी घ्यावी लागणारी शारीरिक, मानसिक व बौध्दिक तयारी किती वरच्या पातळीवरची असते त्याची चुणूक त्याने पुस्तकातून दाखवली होती. त्याआधी फक्त जो जिता वो सिकंदर मध्ये यावर थोडं बघायला मिळालं होतं. त्याचं पुस्तक हे सायकलिंगच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील खेळाडूला प्रेरणादायक होतं.
पण ते पुस्तक त्याने ज्या कारणासाठी लिहिला ते कारण म्हणजे त्याला या सगळ्या प्रवासा दरम्यान झालेला कर्करोग, व त्यातून त्याने - त्याच्या आईने - सहकार्यांनी - प्रेयसीने केलेला मानसिक - शारीरिक - भावनिक संघर्ष. त्याच्या आईशी असणारे त्याचे भावनिक नाते त्याने फार सुंदर शब्दबध्द केले आहे. तो संघर्ष वाचताना लान्सबद्दलचा आदर प्रत्येक पानातून वाढत जातो. लान्स कधी तुमचा आदर्श बनला हे तुम्हांला समजतही नाही. या पुस्तकानंतर त्याने अजून २ पुस्तकंही लिहिली, त्याची लोकप्रियता इतकी अफाट होती की त्यावरती आरोप झाले त्या नंतरही लोकांनी लान्सवरतीच विश्वास ठेवला. लान्सही अर्थात सांगत राहिला मी निर्दोष आहे. गेल्या महिन्यापर्यंत माझा व माझ्यासारख्या अनेकांचा ठाम विश्वास होता की लान्स अशी रडेगिरी करणार नाही, अगदी इथपर्यंतही मत होतं कि त्याच्या चाचण्यात काही वावगं निघालं तर कॅन्सरवरती उपचारासाठी जी औषधे घेतली जातात त्यातून अजाणतेपणी ते शरीरात आलं असेल, लान्स आपणहून हे करणार नाही. पण वाइट हे होतं कि लान्स आर्मस्ट्रॉंगचे पायही मातीचेच निघाले.खासकरुन जेव्हा त्याच्या सहकार्यांनी पुढे येऊन सांगितलं कि लान्स स्वत:हि हे करायचा व स्पर्धेत त्याच्या पुरक खेळ करता यावा म्हणून आम्हांलाहीत्यात सहभागी करुन घ्यायचा. या कामात त्याला त्याची पत्नीच मदत करत होती. हे सगळं ऐकून माझ्यासारख्या कित्येकांच्या आदर्शाला तडा गेला. लान्स इतकाच त्यांचा रागही आला - "हे सगळं आधी सांगायला काय झालं होतं? तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म??"
यश सगळ्यांनाच पचवता येतं असं नाही. फार ताकद असावी लागते त्यासाठी. एकदाका यश डोक्यात गेलं व फक्त यशाची तेव्हढी चटक लागली कि काय होतं? यश मिळवण्यासाठी माणूस कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो हे लान्सच्या उदाहरणावरुन समजतं. अर्थात लान्स हा काही जगातला पहिला खेळाडू नाहिये जो डोपिंग टेस्टमुळे सर्वस्व गमावून बसला आहे ना शेवटचा असेल. मात्र आता कुणावर आदर्शवत विश्वास टाकायचा कि नाही हे लोकांना ठरवावं लागणार आहे. इतके आरोप होत असताना लान्सने गप्प रहाणे पसंत केले. ना "विश्वामित्री पवित्रा" घेतला ना "नरो वा कुंजरो वा पवित्रा." तो फक्त गप्प होता, कदाचित त्याला कळलं होतं कि आता तेलहिं गेलय आणि तूपही. या दंतकथेची बसलेली दातखिळ बरेच काही सांगुन गेली.
- सौरभ वैशंपायन.
5 comments:
सहमत आहे. लान्सचं पुस्तक यादीत वाचायच्या होतं पण आता वाचायचा मूड गेला.
या प्रकरणात काही बाबींचा खुलासा होणे आवश्यक आहे. टूर द फ्रान्सच्या संयोजकानी अमेरिकन सायकलिंग असोसिएशनचा उत्तेजक चाचणीचा अहवाल स्वीकारणे संशयास्पद आहे. टूर द फ्रान्सकडे उत्तेजक चाचण्या नसतील तर या स्पर्धेला जागतिक मान्यता कशी मिळू शकते? कॅन्सरच्या औषधात स्टेरॉइडस् चा समावेश असतो याची दखल घेतली गेली की नाही?
लान्स्च ते पुस्तक नक्की वाचावास वाटतंय.. त्याचा कारकीर्दीचा शेवट जरी खराब झाला असला तरी बालपणीच्या तणावाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर आयुष्यात गरुड झेप घेण , cancer सारख्या रोगाचा धक्का पचवण व त्यातून सावरण केव्हाही ग्रेटच. मला ह्या पुस्तका विषय माहित नव्हत. आत्ता तुझा ब्लोग मुळे समजल सौरभ. ह्या पुस्तकाची कुठे लिंक वा मराठीत भाषांतर केलेलं पुस्तक आहे का?
लान्स्च ते पुस्तक नक्की वाचावास वाटतंय.. त्याचा कारकीर्दीचा शेवट जरी खराब झाला असला तरी बालपणीच्या तणावाच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर आयुष्यात गरुड झेप घेण,cancer सारख्या रोगाचा धक्का पचवण व त्यातून सावरण केव्हाही ग्रेटच. मला ह्या पुस्तका विषय माहित नव्हत. आत्ता तुझा ब्लोग मुळे समजल सौरभ. ह्या पुस्तकाची कुठे लिंक वा मराठीत भाषांतर केलेलं पुस्तक आहे का?
सगळेच संशयास्पद आहे...बघू पुढे काय होते आहे ते
Post a Comment