जसा जसा महाराष्ट्रातल्या निवडणूकिचा शेवटचा टप्पा व १६ मे चा दिवस जवळ येत चालला आहे तसे अनेक फेसबुक स्टेटस वर नरेंद्र मोदि भारताचे पंतप्रधान झाले तर एक हुकुमशहा सत्तेवर येईल. दंगली होतील. अल्पसंख्यांक्य धोक्यात येतील. भारत कसा सेक्युलर आहे, मोदि म्हणजे प्रति-हिटलरच, RSS म्हणजे मुसोलिनीच्या ब्लॅक कॅपचा भारतीय अवतार आहे हे सांगण्याचं पीक आलं आहे. अनेक तथाकथित विचारवंत देश सोडून जाण्याची भाषा करु लागले. (म्हणजे "यांच्या" म्हणण्यानुसार जर मोदि "संकट" असतील तर हे ज्या लोकांबाबत "कळवळा" आहे त्यांना सोडून पळून जाणार असं समजायचं का? अर्रर्र असं कसं? ) आजकाल यांचा त्रागा, हा राग येण्यापेक्षा कीव व त्याहीपुढे मनोरंजन बनत चालला आहे. गेल्याच आठवड्यात सेक्युलरपणाचा बिल्ला छातीवरती लावून फिरणार्या देशभरातल्या समस्त मोठ्या मोठ्या विचारवंतांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी वगैरे वगैरे वगैरे वगैरे लोकांनी एकत्र येऊन मोदिंना विरोध दर्शवला. पण जागा भरायला तेव्हढीच एक बातमी ह्याहुन तीची दखल कितपत घेतली गेली हे शोधावं लागेल.
एकतर हा शुद्ध मूर्खपणा आहे कींवा मग उघड उघड लबाडी आहे. मुळात भारतीय समाजात व्यक्तीपूजा असली तरी हुकुमशाही मान्य करणारी मानसिकता नाहीये. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींसारख्यांचे सिंहासन जनतेने हादरवून सोडले. आणि आता तर सोशल मिडिया व इतर साधने इतकी प्रभावी आहेत की जनतेला कुठल्याही कारणाने दडपणे शक्य नाही. एखाद्या राज्यात एकहाती सत्ता चालवण्यासारखे वेगळे, "देश" पातळीवर तसे वागणे शक्य नाही. एक सरळ साधी गोष्टि आहे कत्तली करणारा हूकूमशहा तयार व्हायला कुठेतरी लष्कराचा सपोर्ट असायला लागतो. सुदैवाने भारताची व भारतीय लष्कराची मानसिकता अशी कधीच नव्हती व नाहीये. हे असे काही करायचा वेडगळपणा भाजपा - मोदि करणे शक्यच नाही. मोदी सत्तेवर येऊन कत्तली करतील वगैरे म्हणणारे मुर्खांच्या नंदनवनात आहे. मोदिंचा बागुलबुवा आता अजून मोठा करता येणार नाही ह्याची जाणीव त्यांच्या विरोधकांना झाली आहे.
आता मुख्य प्रश्न असा आहे की मोदि इथवर कसे आले? व नमो लाट अशी अनिरुद्ध का झाली आहे? ह्यातली पहीली मुख्य बाजू आहे की लोकांना कॉंग्रेसची कमालीची चीड आली आहे. महागाई, हतबलता, संरक्षणाची वाताहात, अंतर्गत सुरक्षेचे वाभाडे, लोकांशी संपूर्ण तुटलेला संवाद, अंगात आलेली मुजोरी व सर्वांचा कळस म्हणजे अनिर्बंध बोकाळलेला भ्रष्टाचार. कॉंग्रेसी चेहरा देखिल लोकांना डोळ्यांसमोर नकोसा झालय. हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरी बाजु अथवा कारण आहे - गेल्या १० वर्षात मोदिंनी केलेला गुजरातचा विकास. महाराष्ट्र गुंतवणूकित, उद्योगांत गुजरातपेक्षा अग्रेसर आहे असं आकडे दाखवून सांगतात तेव्हा ज्या परीस्थितीत मोदि तिथे मुख्यमंत्री म्हणून नेमले गेले, त्यानंतर मोजून काही दिवसांत झालेले गोध्रा व त्यावरची प्रतिक्रिया म्हणून झालेली भयानक दंगल, कसलाही प्रशासकिय अनुभव नसताना ह्या सर्व गोष्टि हाताळणे खचित सोपे नव्हते व गेली १०-१२ वर्ष त्याच गोष्टिवरुन विरोधकांनी मांडलेला छळवाद - सगळ्याला हा माणुस पुरुन उरला हे लक्षात घ्यायला हवे. हे सगळे सांभाळत असताना त्यांनी गुजरातचा विकास केलाच शिवाय दंगलीत दोषी असलेल्या अनेकांना शिक्षा झाली. युट्युब मधील एका व्हिडिओ मध्ये पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना खुद्द ओवेसी सारखा माणूस बोलून गेला की गुजरात मधील अनेक गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे व होते आहे. पण लोकांनाच कंटाळा येईपर्यंत विरोधकांनी बोंबाबोंब केली त्याने मोदि आपसूक मोठे होत गेले. जितकं मोदिंना दडपण्याचा प्रयत्न केला उलट तितके त्यांना इंधन मिळाले. उलट आज अनेक मुस्लिम मोदिंना पाठिंबा जाहिर करताना दिसत आहेत. निदान त्यांचा विरोध खूपच निवळला आहे हे नक्की.
राहुल गांधी ह्या माणसाची एकंदर पाचपोच किती आहे ह्यावर अनेकांनी उघड उघड प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अर्णव गोस्वामीच्या मुलाखतीत त्याचा किती पराकोटिचा गोंधळ उडाला होता हे देशाने बघितलं आहे. अर्णवचे प्रश्न काय होते - ह्याने उत्तरं काय दिली? हे जगाने बघितलंय. हा माणूस भर सभेत काय बरळतो त्याच्या अनेक क्लिप्स सगळीकडे फिरत असतात. हे असंच काही बरळल्याने २ वर्षांपूर्वी त्याच्या दरभंग्याच्या सभेत तर तरुणांनी इतका राडा घातला की ह्याला मान खाली घालून गाशा गुंडाळावा लागला होता. भावनिक दृष्ट्या राहुल गांधी अस्थिर व उपचारांवर असल्याबाबत विकिलिक्स मध्ये देखिल नोंदवलं गेलं. जिथे जिथे राहुल गांधींनी प्रचार केला तिथे तिथे कॉंग्रेस पार झोपली. ३/४ महिन्यांपूर्वी ३ राज्यातील विधानसभा पार पडल्या तेव्हा आपल्या परीवारातील लोकांनी देशासाठी कसे प्राण दिले आहेत हा एकच विषय घेऊन राहुल गांधींनी किमान ५/६ सभा रेटल्या. आपल्या आजी - वडिलांबाबत कुणालाही आत्मियता असणे समजण्यासारखे देखिल आहे. पण मग त्याच बरोबर हे पण त्यांनी सांगायला हवं होतं की राजीव गांधींच्या मारेकर्यांबाबत सहानुभुती असलेले करुणानिधी हे त्यांच्या सरकारमधले भक्कम खोड आहेत. व राजीव गांधींचा बळी घेणार्या तमिळ वाघांचे गालगुच्चे घ्यायची त्यांना खोड आहे.
गरिबी ही मानसिक अवस्था आहे असं ह्या महान समाजमानसशास्त्रज्ञांच म्हणणं होतं. लोकपाल आंदोलन, निर्भया प्रकरण झालं तेव्हा हे महाशय अनेक दिवस गायब झाले होते. त्याखेरीज पक्षातील जेष्ठ व त्याही पुढे देशाचे पंतप्रधान जो निर्णय घेतात तो "नॉन-सेन्स" कसा आहे हे पत्रकारांसमोर त्या ठरावाच्या चिंध्या करुन त्यांनी जग जाहीर केलं. हेच महाशय भाजपात जेष्ठांना कसं डावललं जाते त्यावर गेल्या आठवड्यात बोलत होते तेव्हा मला राहुन राहुन कौतुक वाटलं. ह्यांच्या मातोश्रींनी सीताराम केसरींना जणू शाल श्रीफळ देऊन लाल किल्यावरती त्यांचा जाहीर सत्कारच केला होता. दिल्लीत विधानसभेसाठी शीला दिक्षितांच्या प्रचाराची राहुल गांधीनी सभा घेतली तेव्हा भर सभेतून लोकं उठून चालती झाली. मुळात कॉंग्रेस व त्यांच्या युवराजाचीच परीस्थिती गंभीर आहे. पक्षातले जुने जाणते लोकांच्या रोषाला इतके घाबरले आहेत की अनेकांनी निवडणूक लढवायला नकार दिला. सोनिया गांधीनी यावेळी प्रचारात फार रस घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सभा तर त्यांनी तब्येतीचे कारण सांगुन टाळल्या. पवारांना देखिल राहुलचे नेतृत्व मान्य नाही, त्यांनी देखिल मुंबईच्या सभेकडे पाठ फिरवली. एकंदर काय? कॉंग्रेसला या निवडणूकित ३ आकडी जागा कमावता आल्या तरी खूप आहे.
नीट व शांतपणे विचार केल्यास भाजपा - मोदि वगळता दुसरा ऑप्शन सध्या उपलब्ध नाहीये. कॉंग्रेस - राहुल गांधींचा तर दूर दूरपर्यंत प्रश्न येत नाही कारण ह्या पारिस्थितीला तेच जबाबदार आहेत. मग दूसरा ऑप्शन काय? मुलायमसिंग यादव? ममता बॅनर्जी? मायावती? जयललिता? करुणानिधी? नितीशकुमार? की कम्युनिस्ट? ह्या तिसर्या आघाडिचं भंपक काडबोळं देशाचं वाट्टोळं करेल, क्षणभर मानलं की असंल अस्थिर सरकार आलं तर कॉंग्रेस बाहेरुन पाठिंबा देऊन वर्षभर हे बाहुले चालवेल आणि लोकांच डोकं थंड झालं किंवा ह्या कडबोळ्यांमुळे अजून बिघडलं की आहेतच पुन्हा निवडणूका व सत्ता जाईल कॉंग्रेसकडे. नकोच रे बाबा! रहाता राहिला "आप", ४९ दिवसांत सरकार व जनतेला वार्यावर सोडून पळून जाणारे ह्या देशाचा कारभार किती दिव्य करतील याचा तर विचारही करवत नाही. BTW त्यावरुन आठवलं गेले १५ दिवस केजरीवाल कॅमेरासमोरुन पूर्णत: गायब झाले आहेत. गेल्या महिन्यात तर मिडियाने त्यांची इतकी हवा केली होती की बास रे बास. ३/४ ठिकाणी मार खाल्यापासून पेपर मध्ये देखिल एकाही ओळीची बातमी आली नाहिये.
एकीकडे सेक्युलर तुणतुणे वाजवून हेच ढोंगी दुसरीकडे हे मात्र बदनाम झालेल्या इमामांना जाऊन भेटतात. मायावती मुस्लिमांना एकत्र येऊन जात्यांध्यांना विरोध करायला सांगतात तेव्हा नाही बरं सेक्युलर देशाला तडे जात???? गेल्या १० वर्षात देशाची अवस्था अति झालं आणि हसु आलं ह्याच्याही पलीकडे गेली आहे. हे सगळं निस्तरुन रुळावर आणायला देशाला किमान पुढली १० वर्षे भक्कम सरकार व सशक्त नेतृत्व हवे आहे! मोदिंना देशांतर्गत प्रश्नांबरोबरच देशा बाहेरील कारणांसाठी सत्तेवर आणणे मला गरजेचे वाटते. १६ मे ला भाजपा - नमो सत्तेवर आल्यास १७ मे पासून घरा घरातून सोन्याचे धूर निघू लागतील ह्या भ्रमात कोणीच नाहीये. यांनी केलेलं निस्तरायलाच २ वर्ष निघून जाणार आहेत. त्याच दरम्यान घरचं झालं थोडं ह्या धाटणीचे आंतरराष्ट्रिय प्रश्न निर्माण होऊ घातले आहेत. डोळे आणि डोकं उघडे ठेवले तर सामान्य लोकांना देखिल ते प्रश्न दिसू शकतील.
आपली लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही असली तरी "समजूतदार" लोकशाही नाहीये. मी मरण्या आधी भारतीय निवडणूक ही जात, धर्म, राज्य, त्यातले पाणी वाटप, वीज, रस्ते यांच्यापेक्षा आर्थिक स्थिरता, नोकर्या, तंत्रज्ञान, संरक्षण, औद्योगिक धोरण, पर्यावरण, परराष्ट्र धोरण, तेल, देशाची आयात - निर्यात यांसारख्या विषयांवर जाहीर खडाजंगी होऊन पार पडलेल्या बघू इच्छितो. (पण अगदिच मला १५० वगैरे वर्षांच व्हायचं नाहीये. थोडसं आधी हे शक्य होईल अशी माफक अपेक्षा आहे. :p ) अर्थात त्यासाठी पाणी - वीज - रस्ते - घरं - शिक्षण - अन्न ह्या मुलभूत गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे.
..... म्हणूनच - अबकी बार मोदि सरकार!!!
- सौरभ वैशंपायन.
2 comments:
Mi purnpane sahmat aahe ...
Jr bharat ek prabal desh mhanun pudhe yawa ase watat asel tr modi sarkar la paryay nahi ..
Congress naw ghetale tri nko hote ..
well said.... u r right .
Post a Comment