वास्तविक हा लेख लिहीवा असे वाटण्यास २ गोष्टी कारणीभूत ठरल्या १) ३-४ महीन्यांपूर्वी माझ्या काही मित्रांना भेटलो होतो, गप्पांच्या ओघात त्यातल्या अंबरीश फडणवीस व निनाद कुलकर्णी यांनी सबव्हर्जन ह्या विषयाला हात घातला होता तेव्हापासून ते फिट्ट डोक्यात बसलाय आणि २) नरेंद्र मोदि काश्मीरचा दुसर्यांदा दौरा करुन आले. सीमे पलीकडून सारखा सारखा होणारा गोळीबार लक्षात घेऊन त्यांनी पाकला चार खडे बोल सुनावले होते. मात्र दुसर्याच दिवशी पुन्हा पाकने तीच खोडी काढली. लगोलग माझ्या काही मित्रांनी "बघूच मोदि काय करतात?" असा लाडीक बालहट्ट धरला. मग त्यांच्याशी बोलताना खूप काही बाहेर येत होतं ते कुठेतरी एकत्र करावं ह्या उद्देशाने हा पोस्ट!
===========================================================
नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान कसे बनले ह्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल ..... तब्बल ३० वर्ष मागे. तसं तर लेखांच्या संदर्भांसाठी आपल्याला शेकडो वर्ष मागे जावं लागेल व एक धागा खरोखर तितका मागे जातो देखिल. पण मोदिंच्या पंतप्रधान पदाचे रहस्य मात्र ३ दशके मागे जाते. १९८५ मध्ये निकाल लागलेला "मुहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो खटला." हो! हा तोच खटला आहे जिथुन राजीव गांधीच्या हातातील कॉंग्रेसने; प्रतिगामी मुस्लिमांची वोट बॅंक आपल्या बाजूने वळवायला शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बदलला. त्यावरुन खूप मोठे गहजब झाले. मुस्लिमांना झुकते माप दिल्याने जनसंघ, विश्व हिंदू परीषद आदि खूप खवळले. मग पारडी समसमान करायला राजीव गांधी सरकारने एक आणखि निर्णय घेतला - "अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी सर्वांसाठीच खुली करण्यात येईल!" पुढचा इतिहास बाबरी जमीनदोस्त करणे - मुंबई दंगे - केंद्रात वाजपेयी सरकार वगैरे करत पोहोचतो २००२ गुजरात - गोध्रापाशी. मोदिंना गुजरात दंग्यामुळे कॉंग्रेस व मिडीयाने जमेल तिथे फटकवायला सुरुवात केली. तब्बल १२-१३ वर्षे भारतीय जनता तेच बघत होती. सगळे एकाच मुद्यावरुन ह्या माणसावरती तुटून पडले आहेत पण हा शांत आहे, दुसरीकडे गुजरातमध्ये पहील्याहुन अधिक वेगाने व नजरेत भरेल अशी प्रगती दिसू लागली होती. गुजरातमध्ये जो माणूस जाऊन येई तो तिथल्या बदलाबाबत बोले. आपल्याकडे एक मानसिकता असते रोज रोज शेजारच्या घरातल्या पोराला आई-बाप बडवत असतील तर त्याची आपल्याला आपसूक दया येते. त्यातून ते पोरगं हुशार असून त्याला चापटवत असतील तर आपल्याला आई-बापाचाच राग येतो. तेच नरेंद्र मोदिंच्या बाबतीत झालं.
बरं कॉंग्रेसने १० वर्षात खूप काही भरीव करुन दाखवलं होतं का? तर तसं पण नाही. २००४ मध्ये अशांत समंध असलेल्या कम्युनिस्टांचा टेकू घेऊन आलेल्या सरकारमुळे अनेक गरजेचे ते निर्णय घेऊ शकले नाही व नंतर २००९ मध्ये तुलनेने भक्कम सरकार आलं तर हजारो कोटींच्या घोटाळ्यांची उड्डाणे सुरु झाली. राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श घोटाळा, 2G घोटाळा, कोलगेट घोटाळा, गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वड्रा आणि DLF च्या व्यवहाराचं गौड बंगाल सगळं जनता बघत होती. त्यातच अण्णा हजारेंच आंदोलन, रामदेवबाबांचं आंदोलन त्या आंदोलनांना चिरडण्यासाठी कॉंग्रेसने उचललेली पाऊले त्यांच्यावरचा जनतेचा रोष वाढवायला मदतच करत होती. त्यातच संपूर्ण देशाला क्लेषकारक असं निर्भया प्रकरण झालं. जनता पुन्हा रस्त्यावरती उतरली. त्यांच्या आंदोलनाला आटोक्यात आणायला सरकारने चक्क वॉटर कॅनन, अश्रुधुराचा वापर केला आणि जनतेचा संयम संपला. आता जनता उघड उघड कॉंग्रेस विरुद्ध बोलू लागली. हे कमी की काय महागाई डायन जनतेचे खिसे साफ करु लागली. सरकारचा जनतेशी शून्य संपर्क, जनतेत पराकोटीचा रोष, महागाई, असुरक्षितता ह्या सगळ्या पार्श्वभूमी वरती नरेंद्र मोदि राष्ट्रिय राजकारणात उतरले व कल्पने पलीकडे यशस्वी झाले. भले भले तथाकथित व स्वयंघोषित विचारवंत जे - "नरेंद्र मोदि हुकूमशहा आहेत!", "नरेंद्र मोदि भारताचे पंतप्रधान कधीच होऊ शकणार नाहीत!", "भारतीय जनता खूनी माणसाला नाकारेल" वगैरे मुक्ताफळे उधळत होती त्यांच्या आजवरच्या सगळ्या अनुभवाला, गणितांना फटकारुन जनतेने एकहाती सत्ता भाजपाला दिली. निवडणूकी आधी मी मी म्हणणारे टिव्ही वरुन गायब झाले.
खुद्द भाजपाला इतके यश मिळेल याची खात्री नव्हती. म्हणून त्यांनी देखिल निवडणूकिच्या आधी अनेक स्थानिक पक्षांची मोळी बांधली. पण गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी १००% तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश वगैरं सारख्या ठिकाणी तब्बल ९०% यश भाजपाच्या - मित्रपक्षांच्या पारड्यात पडले. विरोधक साफ आडवे झाले. त्या दरम्यान विरोधकांवरती मोजता येणार नाही इतके विनोद सोशल नेटवर्किंग साइट्सवरती फिरत होते. दशकानुदशके एकाच घराण्याच्या हातात पक्षाची सूत्रे दिल्याने पक्षांतर्गत लोकशाहीचा "प्रवाह" संपूर्ण आटला व कॉंग्रेसला पटाशीच्या दातांवरती आपटावं लागलं. इतकं असूनही अजूनही कॉंग्रेस गांधी घराण्याच्या दावणीलाच बांधला आहे. व तो जितका काळ गांधी घराण्याला मिठ्या मारुन राहील तितका गाळात रुतत जाईल. कॉंग्रेस संपवायला गांधी घराणेच फार मोठा हातभार लावत आहे. आज कॉंग्रेसकडे सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद देखिल नाही. काल अंटोनी समीतीने फाऽऽऽऽर मनन चिंतन करुन जो निष्कर्ष काढला तो देखिल केवळ गांधी घराण्याची उरली सुरली इभ्रत राखायलाच काढला गेल्यांचं स्पष्ट दिसतय. गेल्या आठवड्यात सभागृहातील हौदात चक्क राहुल गांधी उतरले बहुदा झोप पूर्ण झाल्याने आळोखे पिळोखे देत ते चुकुन पुढे आले असावेत. लग्गेच टिव्ही वरती राहुल गांधी आक्रामक वगैरे निष्कर्ष काढुन विचारवंत मोकळे झाले. मात्र तेच राहुल गांधी परवा "जातिय हिंसा विरोधी बिलवरती" योगी आदित्यनाथ कॉंग्रेसच्या आजवरच्या पापाचा पाढा वाचून दाखवत होते तेव्हा टेडि-बेअर गत गपगुमान बसले होते. बहुदा त्यांनी परवा हौदात उतरुन त्यांचा ह्या वर्षातला कोटा पूर्ण केला आहे. विरोधी पक्ष नेतेपद तर नाहीच नाही वरुन उपसभापती पदावरती AIADMK च्या तंबीदुराईंची केलेली निवड कॉंग्रेसचा सभागृहातील आवाज अजूनच क्षीण करुन गेली. परवा देखिल ते विरोधकांना ज्या पद्धतीने थांबवून योगी आदित्यनाथांना बोलायला सांगत होते, मला क्षणभर त्यांच्यात गोअरिंग दिसला, राइशस्टॅगमध्ये हिटलरच्या विरोधात बोलणार्यांना गोअरिंगने दुर्लक्षित करत खड्यासारखे बाजूला काढून टाकले त्याची आठवण झाली.
ह्या सगळ्या घटनांची सुरुवात शहाबानो केसपासून कशी हे कदाचित अजून अनेकांना पडलेले कोडे आहे. तर शहाबानो केस ही एखाद्या स्ट्रायकरसारखी ठरली जीने ह्या खेळीला सुरुवात केली. एका धर्माला दुसर्याची भीती दाखवा, एका राज्याला दुसर्या राज्याशी वाद घालायला लावा, सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करा हे धंदे आजवर कॉंग्रेस करत आली. जनतेला ते दिसतही होतं पण त्यांना पर्याय मिळत नव्हता. मोदिंना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करुन भाजपाने ती संधी घेतली व हिंदूंना अचानक आपला तारणहार त्यांच्यात दिसला. मोदिंना बदनाम करायला विरोधकांनी जे अस्त्र सोडलं व अल्पसंख्यांकांचा खूनी म्हणून त्यांची प्रतिमा रंगवली त्याच वेळी त्यांना हे समजलं नाही की आजवरती त्यांनी जाती - धर्माचे जे घाणेरडे राजकारण खेळले त्याचे नवीन अर्थ जनतेच्या मनात रुजले होते. अल्पसंख्यंकांचा शत्रू हा हिंदूंना आपला तारणहार वाटावा ही देशाच्या एकतेला वास्तविक घातक गोष्ट आहे हे मान्य करायलाच हवं, मात्र ती केवळ बागुलबुआ न रहाता प्रत्यक्ष स्थिती झाली आहे हे नाकारता येत नाही. हिंदूंना असं वाटावच का? तर - काश्मीरी पंडित आपल्याच देशात २०-२५ वर्ष विस्थापित रहात आहेत तेव्हा मानवतावादी व सर्वधर्मसमभाव वगैरे बाबत बोलणारे बोलके पोपट मुके होतात हे त्यांनी बघितलं होतं. सैन्यात मुस्लिमांची नेमकी संख्या किती? वगैरे माहीती काढण्याचा UPA सरकारचा हीन प्रयत्न लष्करप्रमुखांनी सार्वजनिक रीत्या हाणून पाडलेला लोकांनी बघितला, आसाम मध्ये बांग्लादेशी घुसखोरांमुळे स्थानिक हिंदू बोडो प्रजातीचे साडे तीन लाख लोकं बेघर होतात पण कॉंग्रेस चुप्प बसली. भिवंडित जागेवरुन वाद होऊन २ पोलिस हवालदार काही माथेफिरु मुस्लिमांचा जमाव ठेचून मारतो आणि कोर्टाचा निर्णय असून सुद्धा सरकारने आजवर तिथे पोलिस स्टेशन उभारले नाही, बर्मा ह्या तिसर्याच देशा मध्ये बौद्ध विरुद्ध घुसखोर मुस्लिम अशी दंगल झाली त्याचे पडसाद उठावेत कुठे? तर मुंबईत? पोलिसांच्या गाड्या जाळतात, पोलिस जखमी होतात, महीला कॉन्टेबलचे विनयभंग होतात, दंगेखोर अमर जवान ज्योतीची लाथा घालून तोडफोड करत होते आणि सरकार ढिम्म!!! हे जनता बघत होती.
जनतेला हिंदूंचा तारणहार शोधावा लागला तो कॉंग्रेस व ह्या तथाकथित मानवतावादी पोपटांमुळेच. लगोलग न्यायालयांचा व चौकशी करणार्या समितीचा निर्णय आला मोदि गुजरातमध्ये २००२ मध्ये घडलेल्या प्रकारात निर्दोष आहेत आणि मग तर सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाचा त्यांच्यावरती डोळे झाकुन विश्वास बसला व तो त्यांनी मतांच्या रुपाने मोदिंच्या झोळीत टाकला. तो विश्वास इतका मोठा होता की मुस्लिम वोट बॅंक शिवाय उत्तरप्रदेशातील व त्यामुळे देशातील सत्ता मिळत नाही ह्या समिकरणाला मोदि व शहांनी पार पुसून टाकले. त्यांनी उत्तर प्रदेशात आजवर न घडलेली गोष्ट घडवून आणली. मुस्लिम वोट बॅंकचा आधार न घेता सत्ता हस्तगत केली. त्यालाही आता ३ महीने झाले. दुसरीकडे मुस्लिमांतही मोदिंबाबत मत बदलु लागल्याचे आशादायी चित्र आहे. ह्या ठिकाणी मी आत्ताच एक गंमतीशीर गोष्ट सांगु इच्छितो - २०१९ मध्ये देखिल मुस्लिम वोट बॅंकशिवाय हा करीश्मा नरेंद्र मोदिंनी पुन्हा करुन दाखवला तर २०२४ पासून कॉंग्रेसची पाऊले हळुहळू "हिंदुत्ववादि" होण्याकडे पडू लागतील. मरण्याआधी "हिंदुत्ववादि" कॉंग्रेसला वोट देणे हे माझे स्वप्न आहे. लोकं हे वाचून माझ्यावरती हसतीलही पण हे कठिण असलं तरी अशक्य नाही. राजकारणाची वारांगना कुणाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही.
आता सर्वात महत्वाचा विषय मोदिंसमोरील आंतरराष्ट्रिय पातळीवरची आव्हाने कुठकुठली आहेत? आजूबाजूला नजर टाकल्यास जगभर काय सुरु आहे ते आपण बघू शकतोय. जागतिक मंदि, अरब स्प्रिंग, मग युरोपातील मंदी, इराक, इराण, इजिप्त मधले सत्ताबदल, सिरिया मधले मानवी हत्याकांड, इराक - अफगाणिस्थान मधून टप्याटप्याने अमेरीकन सैन्य मागे घेण्याची केलेली ओबामांची घोषणा, युक्रेनच्या निमित्ताने रशियाची दंडेली, शपथविधीला मोदिंनी SAARC मधील देशांच्या प्रमुखांना बोलावणे, BRICS परीषदेत घेतलेले आर्थिक निर्णय, काही दिवसांपूर्वी अमेरीकेचे संरक्षण सचिव चक् हॅगेल ह्यांनी दिल्लीमध्ये भारत - अमेरीक - जपान अशी फळी उभारण्याबाबत केलेले वक्तव्य, मोदिंचे भूतान व नेपाळ दौरे, पाकिस्तान मध्ये नवाज शरीफ विरुद्ध इम्रान खानने उठविलेलं रान - हे सगळं तोडून बघितलं तर वेगवेगळे विषय आहेत मात्र हा कोलाज म्हणून एकत्र बघितलं तर डोकं गरगरायला लागतं.
मोदिंबरोबरच आपल्यासमोर भविष्यात काय मांडून ठेवलय हे जाणून घ्यावं लागेल त्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला काय घडलं? अथवा घडतय हे बघावं लागेल. अनेकदा आपल्याला न कळत आपण देशाचे नुकसान करत असतो. आपल्याला माहीतही नसतं की आपण आत्ता करतोय त्याचे परीणाम समाजावरती १० वर्षांनी नेमके काय होणार आहेत. ते आपल्याकडून कोणीतरी करुन घेत असतो. "मॅट्रिक्स" बघितलाय? तस्सच. खरोखर सामाजिक पातळीवरती तसं घडत असतं. त्याला SUBVERSION म्हणतात. युरी बेझमेनोव्ह यांनी सबव्हर्जन बाबत फार सविस्तर सांगितले आहे. एखादा देश, त्याची संस्कृती, धर्म, आर्थिक व्यवहार, सामाजिक जाणीवा, राष्ट्रिय अस्मिता यांना सुरुंग लावून ती उध्वस्त करायची व तिथे आपल्याला हवं ते रुजवायच, उगवायचं, पोसायचं. बरं! तो देश आपले शत्रु राष्ट्रच असायला हवं असा काही नियम नाही! आंतरराष्ट्रिय राजकारणात कोणी कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. म्हणूनच आपल्या राष्ट्राचा नागडा स्वार्थ जिथे असेल त्या जगातील कुठल्याही कोपर्यात आपल्याला हवं त्या ठिकाणी कळ फिरवायला सुरुवात करायची. त्यात ४ पायर्या असतात -
1) Demoralization (१५ ते २० वर्ष)
2. Destabilization (साधारण ५-६ वर्ष)
3. Crisis (५-६ महीने)
4. Normalization
हा विषय इतका मोठा आहे की ह्यावरती एखादं पुस्तक होऊ शकेल. आपण सबव्हर्जनचा शक्य तितका धावता, ढोबळ व सुटसुटीत आढावा घेऊ. ज्यांना ह्या विषयाची उत्सुकता असेल त्यांनी मी दिलेली लिंक व युरी बेझमेनोव्ह ह्या नावाचा गुगल - युट्युबवरती सर्च करुन बघावा.
1) Demoralization (१५ ते २० वर्ष) - Demoralization चा डिक्शनरी मधला अर्थ destroying the moral basis for a doctrine or policy असा आहे. पहीली पायरी १५-२० वर्षांची असते. ती अश्याकरीता की बालवाडीत ..... सॉरी फारच "गावंढळ" वाटलं का? ..... तर KG - KG जे म्हणतात ते तिथे लहान मुल सोडलं की पुढल्या २० वर्षात मास्टर्स/डॉक्टर्स/इंजिनिअर्स वगैरे छाप घेऊन शिक्षणाच्या कारखान्यातून ते बाहेर पडतं. ह्याच दरम्यान त्याच्या मनात, डोक्या्त, भावनांमध्ये डोळ्यांसमोर जे घडतं कानांना जे ऐकू येतं ते जाऊन बसतं त्याला आकार यायला लागतो. वैचारीक द्वंद्व सुरु राहतं. ह्या संपूर्ण काळात समजा उदा. त्या व्यक्तीवर १५-२० वर्षात "कम्युनिझम हेच सर्वोत्तम!" हा एकच विचार सतत सतत सतत बिंबवत राहीलो तर ती व्यक्ती वयाच्या ऐन विशी-पंचवीशीतच कट्टर डाव्या विचारांनी भारुन जाईल. मात्र त्याच सोबत समाजातील इतर घटक हाताशी धरावे लागतील. त्यात धर्म, शिक्षण, सामाजिक राहणीमान, पॉवर स्ट्रक्चर, प्रसारमाध्यमे आणि संस्कृती ह्यांना दूषित करावं लागतं. ह्या १५-२० वर्षात "घडणार्या" पिढ्यांना "बंडखोर" करावं लागतं. त्या देशापेक्षा बाहेरील तत्वज्ञान (जे सबव्हर्जन घडवून आणणार्या देशातील असते) किती महान आहे हे हळूहळू रुजवावं लागतं. त्यांच्या पूर्वजांच्या लहान चूका देखिल कानकोंड होऊन जावं इतक्या मोठ्या करुन दाखवायच्या. धर्माच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचे. आपला धर्म काहीतरी चूकिच्या संकल्पना सांगतोय असं सतत नव्या पिढीला वाटत राहीलं पाहिजे. आणि असं वाटण्यासाठी खोट्या धार्मिक संघटना/ धर्मगुरु ऊभे करायचे. ते संभ्रमात असतानाच त्यांच्या समोर चूकीचे आदर्श व नेते ऊभे करायचे. उदा. राज कपूर यांचे चित्रपट बघा. एक कलाकार म्हणून ते निश्चितच फार मोठे होते मात्र जवळपास सगळ्या चित्रपटांचा आशय "लुळी-पांगळी श्रीमंती आणि धट्टिकट्टि गरीबी" असाच आहे. गरीब रहा, श्रीमंत झालात म्हणजे तुम्ही लबाड आहात असंच चिंत्र उभे करणारे सगळे चित्रपट. अथवा चित्रपटातूनच पोलिस, न्यायव्यवस्था कशी भ्रष्ट असते हे बिंबवत रहायचं मात्र त्याच बरोबर खलनायकी चरीत्राच्या व्यक्तींना "हीरो" बनवायचं, व्यवस्था आणि समाजाच कसा "गुन्हेगार" निर्माण करतो हे गरजेहुन खूप जास्त मोठं करुन दाखवायचं. ह्या मिडियाच्या मायाजाला शिवाय खरोखरची न्याय व्यवस्था, अधिकारी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, एकाच वेळी देशातील वेगवेगळ्या भागांतील स्थानिक राजकारणांतील वाद चिघळवणे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार करणे हे वेगवेगळ्या पातळ्यांवरती एकाचवेळी करत रहाणे. ही पहीली पायरी. म्हणजे स्थानिक लोकांनाच एकत्र करुन पढवायचं, फितवायचं. लाचखोर बनवायचं. राजकारणात बाहेरुन पैसा ओतायचा व आपल्याला हवी ती माणसं निवडून आणायची. त्यांना निवडून देणार स्थानिक जनताच मात्र काम ते दुसर्या देशाचे करत असतात ..... त्यांच्याही नकळत.
2. Destabilization (साधारण ५-६ वर्ष) - ह्यात त्या देशाच्या आर्थिक बाजूला शक्य तितकं अस्थिर करायचं. आधीच्या २० वर्षात परीस्थितीच अशी निर्माण करायची की सरकारला जनतेच्या छोट्यातल्या छोट्या बाबतीत हस्तक्षेप करावा लागेल. ह्याने जनतेतील असंतोषाला एकत्र आणायला मदत होते. कामगार व कंपनी मालकांत बेबनाव तयार करणे. लहान मोठे संप आंदोलने घडवून आणत रहाणे. कामचूकारपणा वाढवणे. कमी श्रमात अथवा मुल्यात प्रत्येक बाबतीत जास्त मोबदला मिळवण्याची मानसिकता (एका वर एक फ्री, अमुक गोष्टीत १०% जास्त वगैरे) तयार करणे.चंगळवादाला शक्य तितकं प्राधान्य देणे, कर्जांचे सढळ हस्ते वाटप करायच्या सोयी उपलब्ध करणे. अश्या बाबी ह्या पायरीत केल्या जातात. पण ह्या लहान लहान गोष्टिं बरोबर दोन जमातीं, भिन्न भाषिकांमधले तणाव वाढवणे, "असंतुलन" तयार करणे. सरकारी बाबूंना लाच खायला घालून आणि आपल्याला हवी ती माणसं सत्तेत आणून त्या राष्ट्राच्या परराष्ट्र व संरक्षण निर्णयांना पोखरणे ह्या यातल्या पायर्या आहेत. अफगाणिस्थानचा इतिहास बघितला तर केजीबी ने अफगाणिस्थानमध्ये खल्क व परचम अश्या दोन्ही एकमेकांच्या विरोधात असणार्या पक्षांना हाताशी धरुन हेच केलं होतं. ही पायरी पार पाडली की खरी कसोटी सुरु होते.
3. Crisis (५-६ महीने) - मुख्य संघर्ष. जो आपण खल्क X परचम मध्ये बघू शकतो, जो आपण अरब स्प्रिंग मध्ये बघू शकतो, जो सध्या इराकमध्ये सुरु आहे, जो २-३ वर्षांपूर्वी सुदानच्या फाळणीला कारणीभूत ठरला.अशी शेकडो उदाहरणे देता येतील ज्यात अमेरीका व रशियाने आगीत तेल ओतायचे काम केले. ह्यात देशभर प्रचंड तणाव निर्माण होतो आणि एक वेळ अशी येते जिथे "ठिणगी" पडते. देश २ अथवा त्याहून जास्त विभिन्न मानसिकतेत विभागला जातो. ह्यात सरकार विरुद्ध जनता, दोन धर्म, दोन पक्ष, लोकशाही विरुद्ध हुकूमशहा, हुकूमशहा विरुद्ध जनता असे अनेक संघर्ष असू शकतात. अश्यातही दोन्ही बाजूंना मदत करणे चालू ठेवायचे. आपल्या सर्वात जवळील उदाहरण म्हणजे २०११ मधले "जनलोकपाल" आंदोलन. मला इथे हे सर्वप्रथम प्रामाणिकपणे मान्य केले पाहीजे की त्या आंदोलनातून भ्रष्ट्राचाराविरुद्धचा लढा वगैरे ऊभा राहून पूर्ण व्यवस्थेतच प्रचंड क्रांती वगैरे होईल अश्या सुखस्वप्नात मी देखिल होतो. त्यावेळी हे काय चाललय त्याचा विचार करायला देखिल अवधी नव्हता इतक्या वेगाने ते घडत होतं. अथवा अकलेवरती पडदा आपसूक पडला होता की त्याबाबत विचारच करायची इच्छा नव्हती. पण ते फार भयानक व देशाला अराजकाच्या दिशेने फरपटत नेण्याचे काम होते हे आज समजते आहे. आपल्या सुदैवाने ते प्रकरण हाताबाहेर गेलं नाही. म्हणूनच "आप" हा डोक्याला "ताप" आहे. हा पक्ष आपल्या-आपणच जितक्या लवकर विरघळून नामशेष होईल तितकं चांगलं. तर अश्या ठिणग्या पाडणार्या संघर्षानंतर येते शेवटची पायरी - Normalization.
4. Normalization - इतका संघर्ष झाला राष्ट्राचे प्राण कंठाशी आले आणि अचानक शेवटची पायरी अशी "नॉर्मल" वगैरे? तर ह्याचाच अर्थ - "लोहा गर्म है। मार दो हतोडा।" परकीय राष्ट्राचा हस्तक्षेप (उदा- रशियाचा अफगाणिस्थान मध्ये अथवा अमेरीकेचा इराक - लिबिया मध्ये), जनतेतील यादवी (उदा. - सुदान, अथवा सध्याचे इराक मधले ISIS) अथवा शस्त्रधारी संघटना (जसा भारतात नक्षलवाद आहे) तयार करायच्या. त्यांना शस्त्र, प्रशिक्षण, पैसा यांचा पुरवठा करत रहायचा. हा संघर्ष इतका टीपेला न्यायचा की दोघेही आपापसांत लढून दुर्बळ होत राहीले पाहीजेत मात्र तरीही समोरच्याला धुळीत मिळवायची महत्वाकांक्षा मात्र तितकीच वाढून ती जवळपास पूर्ण होण्याच्या पातळीवरती आली की शेवटची पायरी - Normalization. ह्यात वेळ पडली तर एका गटाची बाजू कशी न्याय्य अथवा तिथल्या जनतेला मदतीची कशी गरज आहे हे जगाला बोंबलून सांगायचे व उघडपणे आपली सारी शस्त्रात्रे घेऊन त्यांच्या बाजूने उतरायचे व टप्याट्प्याने तो देश आपल्या कह्यात आणायचा. की झालं सगळं "नॉर्मल."
तसं बघायला गेलं तर भारत अनेक शतके ह्या ४ टप्यांतून आलटून पालटून जातो आहे. गेली अडिच हजार वर्षे भारताने केवळ आक्रमणच बघितले आहे. नर्मदेच्या वरच्या प्रदेशात खास करुन पंजाब, व गंगा - यमुनेच्या सुपिक व संप्पन्न खोर्यातील उत्तर- प्रदेश, दिल्ली, बिहार ह्यांनी हजारो मुंडक्यांच्या राशी देखिल बघितल्या आहेत. भूमीपुत्रांच्या रक्ताचे महापूर बघितले आहेत. हिंदू धर्मावरील शक, कुशाण, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मांची सतत होणारी रक्तलांछित आक्रमणे सहन केली आहेत. पहीले ही आक्रमणे तलवारींनी होत, मग तराजूंनी झाली. आजच्या युगात हे आक्रमण बौद्धिक व आर्थिक आक्रमण आहे. ब्रेन ड्रेनची समस्या सोबतीला आहेच. म्हणूनच परवा लाल किल्यावरुन पहील्यांदाच पंतप्रधान म्हणून बोलताना मोदिंनी भारतीयांना बाहेर शिका मात्र इथे येऊन उत्पादन करा असे आवाहन केले त्याला फार मोठा अर्थ आहे. त्या आधी भारतरत्न श्री अब्दुल कलाम यांनी असेच भावनिक आवाहन केले होते.
सध्या मोदि सरकार जे करते आहे त्यावर UPA सरकारची सावली असणे फार सहाजिक आहे. सरकार बदलले की पटले नाहीत तरी एका रात्रीत गेल्या सरकारचे सगळे निर्णय विरुद्ध दिशेला नाही नेता येत. कारण आधीची १० वर्षे त्याचा खूप मोठा प्रवास झालेला आहे. त्यामुळे रेल्वेची भाव वाढ असो, जेटलींनी मांडलेले बजेट असो अथवा मोदिंनी काही नवीन केलेल्या घोषणा असोत त्यावरती विरोधक जेव्हा म्हणतात की ही तर आमचीच योजना होती तेव्हा त्या मागची कारणे समजून घ्यायला लागतात. त्यात अनेकदा राष्ट्रिय - आंतरराष्ट्रिय आर्थिक - राजकीय हितसंबध असतात. राष्ट्राचा वेळ - पैसा गुंतलेला असतो. एका रात्रीत ही दुकाने गुंडाळणे कधीच शक्य नसते. मोदि सध्या तरी दिल्लीची साफ सफाई करत आहेत. कॉंग्रेस कार्यकालातले दिल्लीमध्ये १० वर्ष चिकटलेले बहुतांशी सरकारी बाबू म्हणे त्यांनी दिल्लीच्या बाहेर रवाना केले आहेत व त्या जागी नवे अधिकारी बसवले आहेत. त्यांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत टांग अडवणारे कोणीच नकोय. भविष्याची तरतूद ते आत्ता करुन ठेवत आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेला अजून चार सहा महीने जातील. शहांच्या मार्फत ते पक्षांतर्गत फार मोठे बदल घडवून आणत आहेत. फार सावधपणे व चतुराईने मोदि एक एक आघाडी शांत करत आहेत. त्यामुळे रोज सकाळी उठून काय करत आहेत मोदि? हे विचारण्यात सध्या तरी हशील नाही. मी तरी वैयक्तिक पातळीवरती मोदिंना आधीचे प्रकार निस्तरुन त्यांचे धोरण राबवणे ह्यासाठी ३ वर्षांचा कालवधी दिला आहे.
हे झालं अंतर्गत आघाडीबाबत, आंतरराष्ट्रिय परीस्थिती काय आहे? सद्य स्थितीत अरेबिक देश अजूनही अरब स्प्रिंग मधून सावरले नाहीयेत. त्यांच्या आयुष्यातून "वसंत" केव्हाच निघुन गेलाय, उरल्यात नुसत्या "स्प्रिंग" ज्याने ते देश अस्थिरतेत जगत आहेत. बहुतांशी अरब देशांची परीस्थिती तेलही गेले तुपही गेले हाती राहीले धुपाटणे अशी झालीये. त्यातुनच जिहादिंना पोषक वातावरण तयार झाले आहे. अरब राष्ट्रांतला जिहाद हा pendulum wave इफेक्ट आहे. एका देशाला धक्का दिला की पुढचा आपोआप अस्थिर व्हायला लागतो. अरब स्प्रिंग हा "जिहाद" नसला तरी pendulum wave इफेक्ट होता. जिहादिंचे सध्याचे रणक्षेत्र आहे इराक व सिरीया. एकदा का इराक - सिरिया मध्ये ISIS आले की लिबिया, अफगाण व पाकिस्तान मधल्या तालिबानींना बळ मिळेल. अखेरीस ISIS हे अल-कायदाचेच प्रतिबिंब आहे. जिहादिंची दुसरी दृष्टि जाईल इजिप्तवरती तिथे मुस्लिम ब्रदरहुड ला हाड-हुड करुन हाकलवलंय पण मुस्लिम ब्रदरहुडचं नेटवर्क तगडं आहे. रंकाळा तळ्यातल्या अमरेवेलीप्रमाणे आहे, कितीही साफ करा, उपटून फेका तिथे रान माजणार. मुस्लिम ब्रदरहुडचे धागे भारतात - महाराष्ट्रात पर्यंत पोहोचले आहेत. इंडियन मुजाहीदिन वगैरे मुस्लिम ब्रदरहुडच्या शेंड्याकड्ची नवीन कोवळी पालवी आहे हे कायम लक्षात ठेवायला हवं. तसंही कल्याण मधले चार तरुण इराकमध्ये ISIS ला जाऊन सामिल झाल्याची बातमी आली होती. ही तर नुसती सुरुवात आहे. ISIS च्या अबु-बक्र-अल-बगदादी याने स्वत:ला खलिफा ठरवून जगभरातील मुस्लिमांना खिलाफत जिवंत करण्याची अनेक आवाहने गेल्या २ महीन्यात केली आहेत. मोरक्कोपासून म्यानामारपर्यंत पसरलेल्या मुस्लिमांना त्याने जिहादचे आवाहन केले
आहे. ह्यात गंम्मत म्हणजे ह्यांनीच ऐन रमजान महिन्यात इराक - सिरीया सीमे दरम्यान मृत्युचा नंगा नाच करताना शेकडो येझिदी, शिया व कुर्द लोकांचे शिरकाण केले आहे. इराक फुटण्याच्या मार्गाकडे चालु लागला आहे. तो फुटला तर किमान ४ छकले होतील. शिया - सुन्नी - कुर्द, तुर्कमान असे उपगट आहेत. परत कुर्द आणि अरबांत शिया - सुन्नी विभागणी वेगळी. म्हणजे शिया अरब - सुन्नी अरब, शिया कुर्द, सुन्नी कुर्द वगैरे वगैरे. बरं इराक फुटून प्रश्न सुटणार नाहीच. जिहाद वगैरेंच्या कातड्याखाली तेल विहिरींसाठी मारामारी आहे सगळी. आता अमेरीकेला इथल्या तेलाची काही पडली नाहीये आता. अमेरीका फारसं लक्ष घालणार नाही. कुत्ता जाने चमडा जाने! हा सगळा घाणेरडा खेळ सुरु व्हायला कुठेतरी अमेरीकाच जबाबदार आहे हे मात्र नक्की. इराकचे काय होईल ते येत्या २-३ वर्षात दिसेलच मात्र त्यामुळे तेलाच्या किंमती वर खाली होत रहाणार व त्याचा थेट फटका आपल्याला बसतच रहाणार.
तरी पण क्षणभर समजा की अमेरीकेने मध्ये हस्तक्षेप करुन बगदाद वाचवले तरी ते काय चाटायचे आहे? बगदाद वाचवून इराक शांत ठेवायचे दिवस नाहीयेत. सद्दामच्या पाडावानंतरही अमेरीका ते करु शकली नव्हती आता तर संपूर्ण आनंदि आनंदच आहे. मग जिहादींचा मागणी तसा पुरवठा करणारे लिबिया - इराक - पाक असे ३ जण तयार आहेतच. मागोमाग अमेरीकेने सैन्य काढून घेतल्याने अफगाणिस्थानची भूमी जिहादिंसाठी मोकळी होतेच आहे. इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा अफगाणिस्थान पडला अथवा चूकिच्या हातात गेला त्याचा थेट फटका भारताला बसला. भले आता भारतीय भूमीतून पाकिस्तान नावाचे राष्ट्र तयार झाले आहे. पण भारत - अफगाणिस्थान संबध तेच राहीले आहेत. आणि म्हणूनच दिल्लीत कुठलेही सरकार येवो अफगाणिस्थानवरती पकड ठेवायचे हर तर्हेचे उपाय आपण करतो. पुरंदर - वज्रमाळसारखे आहे हे. पुरंदर वाचवायचा तर लढाई "वज्रमाळसाठी" करावी लागत असे अगदी तसेच.
हे सगळं फार गुंतागुंतीच आहे. धोक्याची सूचना एकच - मोरक्कोपासून सुरु होणारी मुस्लिम देशांची रांग पार इंडोनेशियापर्यंत पसरली आहे त्यात केवळ इस्त्राइल, भारत, नेपाळ व कंबोडिया या बिगर मुस्लिम देशांची पाचर आहे. न जाणो पुढल्या १-२ दशकांत कुणाला खिलाफतीचा उमाळा आलाच व भारतातील काही मुस्लिम संघटनांनी त्या खिलाफतीला पाठिंबा द्यायचे ठरवलेच तर त्यावेळी गांधींनी खिलाफतीला पाठिंबा द्यायचा जो आत्मघातकी निर्णय घेतला तसाच आत्मघातकी निर्णय आजच्या युगातला कोणी गरीबांचा गांधी घेणारच नाही असे नाही. उलट अश्या गोष्टी करायला इथले निधर्मी पोपट तयारच असतात. आझाद मैदानावरती जे काही झाले ते बघता मी मांडतो आहे तो मुद्दा फार गंभीर आहे हे लक्षात घ्या. कसलीच शाश्वती नाही. मला सगळ्याच मुस्लिमांना एकाच पारड्यात मुळीच टाकायचे नाहीत. पण हिंदुंचा विश्वास गेली अनेक शतके धक्के खाऊन डळमळीत झालाय हे वास्तव आहे. इथे पानिपतावरती मरहट्यांबरोबर राष्ट्र वाचवायला इब्राहीमखान गारदी देखिल असतात हे मान्य करुन देखिल आधी नादिरशहाला व नंतर अब्दालीला जिहादि निमंत्रणांच्या अक्षता पाठवणारे अनेक शाह-वलीउल्लाह आणि नजिब आजूबाजूला दिसायला सुरुवात होते. आणि स्वत:चे मत नसलेले कुंपणावरचे सगळे "अवधचे नवाब" ऐनवेळी अब्दालीला जाऊन मिळतात व त्यानेच मराठ्यांचे पानिपत होते हा इतिहास आहे. हा इतिहास लक्षात घ्यावा इतकीच अपेक्षा.
आता राहीला मोदि पाकिस्तान - चीन विरुद्ध काय करणार? तर प्रत्येक समस्येचे उत्तर "युद्ध" नसते. शपथविधीलाच SAARCच्या प्रमुखांना बोलवून मोदिंनी पहील्याच चेंडूवरती सिक्सर मारला होता. "मी आलोय" हे तर त्यांनी जगजाहीर केलंच पण भारताला आजूबाजूच्यांशी सौदार्हपूर्ण संबध हवेत हे जाहीर केलं. लगोलग भूतान व नेपाळ हे चीनच्या कच्छपी जाऊ लागलेले देश कुरवाळायला सुरुवात केली. नेपाळ दौरा विशेष महत्वाचा होता असं मला वाटते. नेपाळ - भारत खुली सीमा असल्याने नेपाळमधून अनेक दहशतवादी, ISI ची पिलावळ घुसखोरी करत असते. आजवर अनेक खतरनाक अतिरेक्यांना भारत - नेपाळ सीमेवरती अटक झाली आहे हे लक्षात घ्यायला हवं. मोदिंनी एका नेपाळी मुलाला आसरा देऊन त्याला परत त्याच्या कुटुंबाशी भेट घडवून दिली, हे दिसायला लहान असलं तरी ह्याचे sub-conscious पातळीवरती वेगळे परीणाम साधता येतात, नेपाळींचे मन ह्या साध्या घटनेनी पण जिंकता येते. पशुपतीनाथ मंदीराला काही टन चंदन व काही आर्थिक मदतीच्या मोबदल्यात जर भारत नेपाळकडून त्यांनी वापरुन उतु जाणारी वीज बिहार - उत्तर प्रदेशात वळवणे, ISI च्या हालचालींना पायबंद, भारतातील माओवादी नक्षलवाद्यांना होणारी शस्त्रास्त्रांची आवक रोकणे, चीनच्या कह्यातुन नेपाळची सुटका ह्या गोष्टि साध्य करु पहात आहेत. नेपाळमध्ये माओवादी नेता "प्रचंड" एकदा अल्पकाळ का होईना पंतप्रधान बनला होता ही गोष्ट डोळे उघडून बघितली तर खूप काही समजू शकेल की नेपाळची पाऊले कुठे वळत आहेत. व ती आत्ताच ठिक करायची गरज आहे. अजून पाच वर्ष मोदिंनी हे पुढे रेटलं तर SAARCचं अघोषित नेतेपद आपोआप भारताकडे चालुन येईलच. पण भारता भोवती चीन जे असंतुष्ट देशांचे कडे उभारुन भारताला बांधू पाहत आहे त्याला तोडता येईल. येत्या २-३ वर्षात मोदिंनी श्रीलंका, बांगलादेश व अगदि पाकिस्तानचा दौरा केल्यास मला विशेष वाटणार नाही. अर्थात त्यासाठी पाकिस्तान शांत हवा. सध्या इम्रान खानने नवाज शरीफ यांच्या विरुद्ध जे रान पेटवले आहे त्याची परीणीती काल त्याच्या गाडीवरती गोळीबार होण्यापर्यंत पोहोचली आहे तो वाचला असला तरी त्याच्या आंदोलनाला आता अधिकच धार येणार. पाकिस्तानी लष्कर नेहमीच अश्या घटनांची फार आतुरतेने वाट बघत असते. वर्षभरात परत पाकिस्तानात लष्करशहा येणारच नाही ह्याची काही एक शाश्वती नाही. तसे झाल्यास भारत - पाक संबधांचे आयाम पुन्हा कुशी बदलतील.
हे सगळं लिहीण्याचा प्रपंच इतक्या करीताच की दर वेळी काय करत आहेत मोदि? हा प्रश्न उताविळपणे विचारला जाऊ नये. त्यांना थोडा वेळ द्यावा. हिंदू संघटन व बलवान करण्याची ही संधी काळाने फार मोठ्या अंतराने दिली आहे ती वाया जाता कामा नये. सबव्हर्जनचा धडा लक्षात घ्या. भारताला वाचवायला हिंदू धर्म बलशाली व्हायला हवा. इथे नोंद कराविशी वाटते की बलशाली म्हणजे खुनशी अथवा उन्मादित नव्हे. हे बल समर्थ रामदासांनी शिकवलेले, छत्रपती शिवरायांनी मिळवलेले आणि थोरल्या बाजीरावांनी वाढवलेले आणि शिंदे - होळकरांनी जपलेले बल आहे. इतिहास नीट वाचा मराठा साम्राज्याचा भाग असलेली भूमीच आज भारतात आहे बाकीचा "पाकिस्तान" झाला आहे. दुसरी गंमतीची गोष्ट ज्या ठिकाणी मराठा साम्राज्य बलशाली होती त्याच भागात मोदिंना भरघोस मतदान झाले आहे. कश्मीर, बंगाल, दक्षीण भारत ह्या ठिकाणी मराठा साम्राज्य नव्हतेच अथवा तुलनेने क्षीण होते ... मोदिंना ह्या ठिकाणी यश मिळाले नाहिये हे लक्षात घ्या. भले हा योगायोग असेलही पण इतिहासाचे एक चक्र पूर्ण झाले आहे. मोदि हा हिंदूंचा एक "CHANCE" आहेत. तो वाढवायचा की फुकट घालवायचा हे आपल्या विचारांवरती अवलंबून आहे.
- सौरभ वैशंपायन

9 comments:
सहज सुंदर लेखन, छान लिहिले आहे
देशद्रोही निष्प्रभ होतिल दर्शन घडता शक्तीचे
Hi Sourabh,
Very informative post and good analysis. I like your writings. Can I share this post on my fb wall?
@ sarojKumar -
Thank you very much!
Yes sure you can share this link! :-)
अभ्यासपूर्ण लेख.
excellent analysis...
Speechless
Speechless
saurbh chhan.. mala mazya mail war tuza n ambarish cha id or cell no. pathaw
ambarish cha blog gayab zalay.. mala bolaych aahe tyashi
Post a Comment