Monday, September 1, 2014

पावनखिंड




आषाढाची रात्र वादळी,
चाले मनात थैमान,
करकर करकर लवती झाडे,
जणू प्रमत्त सैतान - १

पन्हाळ्यात त्या चाले लगबग,
उडली का लग्नाची धांदल?
स्वतंत्रतेचे लग्न "शिवाशी",
वरातीमधुनी सहाशे बांदल - २

अंधाराच्या घोंगडीवरती,
वीजा रेखती लखलख नक्षी,
रात्र विषारी जहरी काळी,
डोह कालिया यमुना वक्षी - ३

कंसाचे पहारे बसले,
अडकुन पडला देवकीनंदन,
कालियांनीच भरले डोह,
कसे करावे यमुना लंघन? - ४

उडी घेतली डोहामध्ये,
कालियाचे करण्या मर्दन,
ओढुन तोडुन जहरी विळखे,
निसटुन जाई कृष्ण प्रतर्दन - ५

क्षण क्षण जवळी येता मृत्यु,
अपुला परका कुणी बघेना,
राजा अमुचा जगावेगळा,
शिवरायाचा पाय निघेना - ६

मरो लाख पण हवा जगाया,
लाखांचा पोशिंदा नेता,
उडवा तितुक्या तीनदा तोफा,
खेळण्यावरी तुम्ही पोचता - ७

धरुन ओंजळ ज्योति भवती,
नाव सोडली दर्यावरती,
फुंकर घाली तो वडवानल,
त्यात समुद्रा उधाण भरती - ८

आल्या आल्या लाटा आल्या,
उठली आरोळी दीन! दीन!!
हर महादेव! प्रत्युत्तर आले,
कंठामधुनी शेकडा तीन - ९

खिंडीतुन त्या रुद्र उतरला,
पाठीमागे तीनशे भैरव,
करु अभिषेक रिपू रक्ताचा,
या मातीला देउ गौरव - १०

मृत्युही सरकुन व्हावा मागे,
अशी फिरे तलवार,
खिंडीला त्या रोखुन धरले,
प्रहर उलटले चार - ११

जखमांनी तो देह विव्हळता,
महाभारत पुन्हा घडले आजी,
व्यूहचक्रातील कौरव जौहर,
सौभद्र पुन: अवतरला बाजी - १२

झाली इशारत उडल्या तोफा,
राजा माझा आहे सुखरुप,
सार्थक झाले आयुष्याचे,
जगण्याचे ना उरले अप्रुप - १३

श्वास अडकला कंठामध्ये,
थांबले हृदयाचे स्पंदन,
लांघुन गेले जीवन रेषा,
ना तुटले मातीचे बंधन - १४

क्षण क्षण करीता सरली शतके,
खिंड जाहली इथेच पावन,
साक्ष अजुनी देते येथील,
खळखळणारे निर्झर जीवन - १५

- सौरभ वैशंपायन