समोर अवचित उभी राहता,
आत मनाच्या हलले काही,
झुळके सरशी निघून गेलीस,
क्षणभर मजला कळले नाही - १
चुकला रस्ता चुकले नक्षे,
फिरू लागल्या दिशा दहाही,
मंत्र फुंकला पडले गारुड,
हतबल झाले रिपू सहाही - २
भूलोकीची नाहीस तू गं,
झरा स्वर्गीचा जणू प्रवाही,
माझ्यासाठी केवळ मृगजळ,
शाप असावा मजला हाही - ३
ठाऊक होते या मूर्तीची,
प्राप्ती मजला होणे नाही,
पूजत आलो रात्रंदिनी परी,
कधी न केला स्पर्श जराही - ४
- सौरभ वैशंपायन
No comments:
Post a Comment