Tuesday, July 21, 2020

जत्थे

डोईवरी तप्त जाळ
वेढुन टाके सावली
चालले जत्थे कुठे हे
धावती नग्न पावली? - १

ना दिशा ठाऊक कोणा
ना मध्य ना अंतही
थांबेल केव्हा कधी
जी वाट आहे घेतली - २

हुसके कुणी दरडावून
कोठे शिपाई दे शिवी 
झाले मोकळे खिसे 
ना कटीला पावली - ३

आहे भुकेली दो दिसांची 
कुशीत निजली बाहुली
चालला श्रावणबाळ कोणी
घेऊन पाठी माऊली - ४

अगदीच नाही परंतु
दारे मनाची लावली
नाही म्हणाया चतकोर
कोठे मानवता धावली - ५

वांछिल जो ते त्यास लाहो
ही जाणीव जेव्हा जागली
आर्तता साऱ्या विश्वाची
अश्रूत एका मावली - ६

 - सौरभ वैशंपायन

No comments: