Wednesday, April 11, 2007

रानवेडा!

कीर्र झाडी गच्च दाट,
अंधारात रातकीडा,
भयाण-भीत जंगलात
फ़िरे एक रानवेडा. - १

माती मऊ साय जणु,
काळा उभा कातळकडा,
शांत-शीत जंगलात,
फ़िरे एक रानवेडा. - २

जाई-जुई पारीजात,
बकुळाचा नाजुक सडा
जंगलात सुगंधाच्या
फ़िरे एक रानवेडा. - ३

मोहरला आंबा कधी,
कधी बहरे केवडा,
मंद-धुंद रानामधे,
फ़िरे एक रानवेडा. - ४

होत अचानक शांत,
कधी खेळवित झाडा,
वा‍र्‍यास अश्या देत साथ,
फ़िरे एक रानवेडा. - ५

निळे सांगते आकाश,
हात पसरुन भिडा,
खुणावणार्‍या क्षीतिजासाठी
फ़िरे एक रानवेडा. - ६

कधी गुलाबी थंडी,
रापला उन्हात बापुडा,
घमघमणार्‍या पावसामध्ये,
फ़िरे एक रानवेडा. - ७

उदास पायवाट कधी,
कधी खळखळे ओढा,
पाय सोडुन पाण्यात,
फ़िरे एक रानवेडा. - ८

घाली बुलबुल साद,
कधी ओरडे कवडा,
वसंताच्या कोकीळासंगे,
फ़िरे एक रानवेडा. - ९

कधी पौर्णिमेचा चंद्र,
पडे चांदण्याचा सडा,
अश्या टिपुर चांदण्यात,
फ़िरे एक रानवेडा. - १०

सौरभ वैशंपायन.

No comments: