Saturday, May 19, 2007

पाऊस

पाऊस सरसरुन पडतो,
गंध मातीचा दरवळतो,
भिजवुन धरित्री सारी,
नभ मल्हार रागही गातो. -१

उभी इंद्रधनुची कमान,
मृगाचे स्वागत करतो,
हिरव्या मखमाली संगे,
थेंबांचे तोरण धरतो. -२

दाही दिशा ओलावुन,
वाराही भरारा फ़िरतो,
पडदे मेघांचे साराया,
नभात रवीही झुरतो. -३

क्षितीजांच्या रेषांवरती,
पसरते दुरवर लाली,
उच्छ्वास टाकुनि धरणी,
मग अलगद हसते गाली. -४

त्या ओल्या वळणांवरुनी,
मीही अलगद वळतो,
मग सरते कातरवेळ,
तो मित्रहि अखेर ढळतो. -५

मित्रही ढळला म्हणुनी,
जीव असा हुरहुरतो,
होतात अंधुक क्षितीजे,
नभ धरेत या विरघळतो. -६


- सौरभ वैशंपायन.

No comments: