Tuesday, June 26, 2007

एकांत

अशा मौन चंद्रवेळी, कुठे घुमते बासरी?
आले विसरुन घरा, मागे पडली ओसरी. - १

कसे सांगु तुला कान्हा? काय वाटेल या जना?
आपल्या दोहोंचे बोलणे, बघ ऎकते यमुना. - २

असे नको वेड लावु, तुज पुन्हा मी सांगते,
जागे नक्षत्रांची रात्र, रासलीला ही रंगते. - ३

शांत-शामल ती काया, पाहता डोळां आले पाणी,
रूप साजिरे पाहता, न लवते पापणी. - ४

नभी शुक्राची चांदणी, नभी पूर्ण चंद्रकळा,
जणू सावळ्याची रात्र, की रात्रच सावळा? - ५

पुन्हा तेच स्निग्ध स्मित, परी रूपे ही अनंत,
जरी म्हणते नको तरीही, भावतो हा एकांत - ६


-सौरभ वैशंपायन.

No comments: