Tuesday, June 26, 2007

लज्जा

तव भालावर तेज रवीचे, नजरेत जराशी मादकता,
आरस्पानी रुप तुझे गं, अधरावर थोडी अधीरता - १

अलगद खुलली तजेल कांती, सुंदर केतकी रंग असा,
बघणे सुध्दा सुखकारक तुज, दवबिंदुचा स्पर्श जसा - २

केस रेशमी सुगंधीतही, गालांवरती खोल खळ्या,
ओठ जणू कि गुलाबपाकळी, हसणे जणु कि कुंदकळ्या - ३

चारुता पसरली सलज्ज वदनी, मीठीत माझ्या रुजलीस का?
सहज चुंबिता गौरतनु तव, लाजेत अशी तु भिजलीस का? - ४


- सौरभ वैशंपायन

No comments: