Tuesday, February 24, 2009

खूण

जा सखे गं शोधुन ये मोहन मुरलीवाला,
कुठे हरवला? ना कळे, ना क्षण उसंत जीवाला - १

काल रातीला भेट जाहली कालिंदिच्या तीरी,
श्याम - सावळा समोर आणिक चुकार पावा करी - २

रात्रभर जागी होती चांदणवेडि चंद्रकला,
जरा स्पर्शता तरंग उठले कालिंदिच्या गुढ जला - ३

स्पर्श असे कि मोरपिस जणु शरीरभर थरथरते,
क्षितीजावरती शुक्र मनोहर रात्र अशीच सरते - ४

श्याम सावळ्या मिठीत अलगद सावरले मी मला,
कुणा न कळता वाट पहाते कदंब तरुच्या तला - ५

(श्याम - सावळ्या मिठीत अवचित किनखापी जर खुपते
कुणा न कळता ओठांवरची अजुन पण खूण जपते - ५)

- सौरभ वैशंपायन.

No comments: