काल संध्याकाळी माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो. गेल्यावर काकुने हसतमुखाने दार उघडले. हॉल मध्ये समोरच्या भींतीला L आकाराची बैठक, उजव्या हाताला पुस्तके नावे दिसतील अशी नीट रचुन ठेवलेली पुढे आतल्या खोलीत व स्वयंपाकखोलीत जाणारा दरवाजा. आत जाऊन बसलो घरच्यांबरोबर नमस्कार - चमत्कार झाले आणि समोरच्या भिंतीवरील शोकेस कडे लक्ष गेलं.... भरपुऽऽऽर मेडल्स आणि ट्रॉफिज हारीनं मांडुन ठेवल्या होत्या अर्थात मोजल्या नाहित म्हणा किंवा मोजायची हिंमतच झाली नाहि म्हणा पण हृतिक रोशनला सुध्दा दोन्हि हातापायाच्या बोटांवर मोजता येणार नाहित इतकि नक्किच होती. मी मनातल्या मनात माझ्या २ ट्रॉफिजना उगी-उगी केलं. शेजारीच भारतरत्न डॉ. कलामांच्या हस्ते बालश्री स्वीकारतानाचा तिचाच फोटो होता. घरात २ विद्यार्थी असल्यावर पुस्तकांचा जेव्हढा सहाजिक पसारा होतो तोहि होता मात्र एकुण घर व्यवस्थित. हे सगळं सांगायच कारण मला तिचं घर आवडलं, म्हणजे माणसं मोकळी वाटलीच पण तिच्या घरात सुरक्षित’ वाटलं. आता मला कोणी मारायला वगैरे फिरत होतं म्हणून मी तिच्या घरात लपलो वगैरे नव्हतो, पण सुरक्षित वाटलं हे मात्र खरं ... काहि ठिकाणं, मंदिरे, जागा, वास्तु, घरं किंवा घरातले काहि ठराविक भाग असे असतात कि तिथे आपल्याला सुरक्षित वाटतं. म्हणजे ब्रह्मांडात काहिहि उलथापालथ झाली तरी इथे आपल्याला धक्का लागणार नाहि अशी वेडि समजुत देखिल होते.
काहि जण याला वास्तुपुरुषाचा आशिर्वाद म्हणतील, काहि दिशांना महत्व देतील, कोणी मनाचे खेळ म्हणतील तर काहि जण अगदि काहिहि बोलतोस म्हणुन उडवुनहि लावतील. पण मला असं खुप जाणवतं. अगदि कोयना अभयारण्यात आम्हि ज्या झाडाखाली चुल पेटवायचो ते झाड उगीचच मला आवडु लागलं होतं. कदाचित २-३ दिवसांच्या सवयीने असेल पण पुढले ६-८ दिवस त्या झाडाजवळ असलं कि खुप सुरक्षित वाटायचं. सकाळी जंगलातुन पाय तुटेस्तोवर भटकायच, मग जेवुन दुपारभर आणि संध्याकाळी जवळच्याच दुसर्या एका झाडाखाली बसुन प्राणी निरीक्षण करायचो पण त्या दुसर्या झाडाचा ’लळा’ नाहि लागला. तसेच एक झाड त्या अभयारण्यात वरच्या डोंगराळ भागात होते, उंऽऽचपुरे आणि भक्कम. म्हणजे अगदि अष्टसात्विक भाव वगैरे काय म्हणतात ते जागृत व्हावेत असं सुंदर झाड होतं.
आता आपलं घर सवयीचं असल्याने मालकिचं असल्याने तसा फरक पडत नसला तरीहि घरातली एखादि खोली किंवा त्या खोलीचा एखादा विशिष्ट भाग हा आपलासा वाटतो. लहानपणी मी पलंगाशेजारच्या कपाटाला पाठ टेकायचो आणि माझ्या भोवती उरलेल्या २ बाजुंनी उश्या उभ्या करायचो. कधी तो माझा किल्ला असायचा कधी ती माझी गाडि व्हायची तर कधी माझं ऑफिस... पण कोपरा तोच. आत्याच्या घरी स्वयंपाक खोलीत देवघराखाली टेबल आहे त्याची देवघराखालची आणि गॅलरीचा दरवाजा अंगावर उघडणारी जेमतेम जागा मला खुप आवडते. आत्याशी मी अध्यात्मापासुन ते राजकारणापर्यंत जगभरच्या विषयांवर तिथे बसुनच गप्पा मारल्या आहेत. अश्या अनेक जागा होत्या - आहेत. काकाच्या घरातली बेडरुम मधली खिडकी जवळची जागा आवडते. अगदि उन आलं तरी शक्यतो तिथेच बसतो. माझ्या काहि मित्रांकडे देखिल अशी भावना होते.
काहि घरे - ठिकाणं अशी असतात कि कितिहि वेळा गेला तरी आपलेपणाची कींवा मी म्हणतो तशी सुरक्षीततेची भावना नाहि होत. म्हणजे ती जागा वाईट किंवा असुरक्षित असते असं नाहि पण जीव रमत नाहि तिथे. सारखि चुळबुळ होत राहते...का? ते माहित नाहि.
असो, तर एकुण काय अश्या जागांना कुणाची दृष्ट लागु नये इतकिच इच्छा. अश्या जागांवरुन मी मनातल्या मनात मी एकदा लिंबलोण उतरवुन टाकतो .... कालच एका नव्या जागेची दृष्ट काढुन आलोय त्याचीच हि गोष्ट.
- सौरभ वैशंपायन.
5 comments:
मस्त झालय पोस्ट.
वाचता वाचता अशा कितीतरी ’सुरक्षित’जागा माझ्याही मनात डोकावून जात होत्या. घरातल्या वगैरे तर असतातच पण ऑफ़िसात एकदा काही दिवसांपुरती एका वेगळ्या जागेवर बसायचे मी तर ती जागा तु म्हणतोस तशी अक्षरश: असुरक्षित वाटायची आणि काहीही कामच सुचायचं नाही:D
Waa farach chhan ahe lihaychi style. Sadhech shabda pan khup chhan bhavana pochavlya.
Ata amhala pan ticha ghar baghaychi utsukta lagliye. Tila mhanava ki photo taak
Sahich!!!
mast lihile aahe.
सुरक्षित’जागा hehe gret lihily!!
ब्लॉग प्रथमच वाचत नाहीये पण कमेन्ट मात्र प्रथमच.. :)
अशी सुरक्षित जागा आठवली आणि ती ही हे पोस्ट वाचून खरंच हलफुलकं वाटलं नुसतं आठवूनही! :)छान लिहिलंयस!
Post a Comment