Monday, March 9, 2009

Life is calling.... where are you?

जगणे जगणे म्हणजे नेमके काय?

कधी "चला ट्रेकला निघुया!!" अस अच्चानक ठरवुन २ बिस्किटचे पुडे आणि पाण्याची एखादी बाटली टाकुन निघालाय कधी घराबाहेर? नसाल तर निघा. ट्रेकला नाही निदान असच आसपास कुठेतरी. असेल कोणी बरोबर तर उत्तम नाहीतर एकला चालो रेऽऽ गुरुदेवांनी्च सांगितलय. डोकं फिरल्यागत वागवं अधुन मधुन, म्हणजे इतर वेळी डोकं जागेवर राहतं किंवा निदान ठिकाणावर तरी नक्किच येतं. बुट चढवावेत, कॅप घालावी डोक्यावर आणि भटकावं मग उगीच खाच खळग्यातुन - झाडा फांदितुन.

कधी गड-सुळक्यांत फिरताना खुऽऽऽप तहान लागते, तळाशी थरथरता जेमतेम अर्धा थेंब बाकी आतुन फक्त कोमट वाफ भरलेली रीकामी बाटली तहान दुप्पट करते. मग डोक्यावर असलेलं ऊन डोक्यात जायला लागतं. झक मारली आणि आलो इथे असं वाटायला लागतं. कोरड्या ओठांवरुन दमटसर जीभ फिरवुन दुरवर नजर फिरवायची पाणी दिसतय का बघायला. उन इतकं वाईट्ट असतं की घाम वाळुन मिठाचे पांढरे शिक्के उमटतात पाठीवर. कानाला उन सडकुन काढत असतं. चिकट चेहर्‍यावर धुळिची पुट चढलेली असतात. आणि जरा सावली देईल असं झाड देखिल दिसत नाही. ज्यावर चढाई करायची तो कातळ चरचरीत तापलेला असतो, मधुनच एखादा कंटाळवाणा मुरमी पट्टा लागतो. खसाखसा पाय घसरतात. सुकलेले पिवळे गवत एखाद्या ढेकळा बरोबर बाजुला होते. टिशर्टच्या बाहिने नाकाच्या शेंड्यावरचा घाम पुसुन समोरच्या सुळक्याचा अंगावर येणारा चढ निश्चयाने चढतो ती वाट सुळक्याच्या कुठल्या डाव्या-उजव्या हाताला गायब होत असते. एखादी कचकचीत शिवी स्वत:ला आणि मुख्यत: त्या वेळेला घालत त्या वाटेने पुढे जातो - आणि ..... पुढ्यात चक्क पाण्याचे एखादे टाके दिसते. प्रतिसृष्टी निर्माण केल्याच्या आनंदात चेहर्‍यावर एक विजयी हसु येतं. मधलं अंतर दोन-चार ढांगात पार करुन टाक्याच्या कडेवर उभे राहतो. पण सगळा आनंद त्या पाण्यात उडी मारुन जीव देतो.... पाण्यात एखादा उंदीर किंवा घूस मेलेली असते आणि डोकं उठेल असा सडल्याचा कुजका भपकारा नाकाला जाणवतो. क्षणभर काही सुचत नाही चिडचिड अज्जिबात होत नाही उलट अति झालं आणि हसु आलं अशी अवस्था होते.  पण तहान स्वस्थ बसु देत नाहि. पाणी प्यावं??? आणि ठरवतो - सगळं गेलं तेल लावत ... जवळपास पडलेल्या २ काटक्या उचलुन पाण्याने टम्म फुगलेला तो गोळा उचलायचे ८-१० अयशस्वी प्रयत्न होतात. कधी वजनाने काटकि मोडते, कधी ते बाहेर आलं असं म्हणता म्हणाता धप्पकन परत आत पडतं, किंवा तरंगत दुसर्‍या काठाला टेकतं. मग त्या बाजुला जाऊन तोच प्रयत्न. अखेर ते कलेवर बाहेर निघतं. त्याला समोरच्या झाडित ढकलुन बाटली काढायची, त्यात पाणी भरुन घ्यायचं आणि ऍक्वागार्डचं पाणी प्यायल्याच्या आत्मविश्वासाने ती तोंडाला लावायची.... पानी बुझाए ओन्ली प्यास बाकी ऑल बकवास म्हणत अर्धाधिक बाटली रीचवायची. - इस मे हि तो लाईफ है यार!

कधी भटकलाय वाघाचे ठसे शोधत? कदाचित समोरच्या झाडितुन दोन निखार्‍यांसारखे डोळे आपल्यालाच निरखत असतील, आपल्या प्रत्येक हालचालीवर त्याचे लक्ष असेल. आपण मात्र त्याचेच ठसे शोधत माती चाचपडत पुढे जात रहायचं. मग अचानक ठश्यांच्या काही जोड्या मिळतात, मग त्याची मोजमापे घेतली जातात पंजा आपल्यापेक्षा कदाचीत एखाद्या सेमीने मोठाच... उभट असेल तर मादा, चौरस असेल तर नर वाघ. उभट पंज्या आसपास छोटे ठसे दिसतात का? बघा!! आहेत?? मग एक आवंढा गिळायचा.... आपल्या बच्च्या सोबत असलेली आई म्हणजे वाघिणीचे नव्हे प्रत्यक्ष मृत्युच्या पावलांचे मोजमाप घ्यायचे. एकाने उभं राहुन सगळीकडे सावध नजर ठेवायची आणि मग एकाने वाकुन त्याची मोजमापे घ्यायची, त्याचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे नमुने बनवायचे. मग जायच पुढे जवळच ताजी विष्ठा सुध्दा असेल. त्यात एखाद्या प्राण्याचे केस देखिल दिसतील त्याचा उग्र भपकारा नाकाला जाणवेल. आता हिंमत असेल तर पाऊल टाकायचे पुढे, नाहीतर गपगुमान सावधगीरीने मागची-डावी-उजवी कडची चाहुन घेत आल्या पावली सटकायचे. केलय असं? - इस मे हि तो लाईफ है यार!

कधी झोपलाय मोकळ्या आकाशाखाली? रात्री कधीतरी वाढलेल्या थंडिने अर्धीमुर्धी जाग येते, सरकलेलं पांघरुण कुरकुरत चापडताना सहज डोळे उघडतात आणि डोळे परत मिटायला तयारच होत नाहित झोप-बिप सगळ भुर्रकन कुठे तरी उडुन जाते - नजर जाईल तिथे तारेच तारे किती? दहा हजार? एक लाख? एक करोड? माहित नाही, पण या क्षितीजापासुन त्या क्षितीपर्यंत तारेच तारे. आकाश वाचता येत असेल तर दुसरं सुख नाही. तो तिथे ध्रुव तारा. ते सप्तर्षी, हा मृग का? हो नक्किच मागे व्याध आहे की आणि तो काय ऐन मध्यभागी व्याधाच्या बाणाचा तारा. क्षितीजावरचा शुक्र की काय? नाही बहुदा - शुक्र मगाशीच उगवला असेल मग कुठला बरं?? असा विचार करताना तंद्री लागते सगळ कसं भव्य दिव्य असतं? निळं आकाश थांग न लागणारं. या ब्रह्मांडाच्या अनंत पसार्‍यात आपण क:पदार्थ असल्याची जाणीव होते. मग आठवतात आपले फालतु माज, निसर्गाशी केलेली चढाओढ, उंच सुळक्यांवर चढून जग जिंकल्याचा आवेश, विनाकारण आकाशाशी झट्या घेण्याची उद्दाम भाषा.... सगळ किती निरर्थक? किती निष्फळ? आणि बाष्कळ सुध्दा. मग कधीतरी पहाटे नकळत डोळा लागतो, सकाळी उठल्यावर मग काल पाहिलेलं स्वप्नवत वाटत राहतं. - बघितलंय कधी असं "लाईव्ह" स्वप्न? नसेल बघितलं तर बघा - इस मे हि तो लाईफ है यार!


- सौरभ वैशंपायन.

7 comments:

Bhagyashree said...

bhari !! atta sack adkavun junglat javasa vatla he vachun!! :D

Abhi said...

ek number,

sagalya athvani dolyasamor alyat.

thanks a lot,
Abhijeet

Dk said...

chal re mi tyaar aahe ekdam kadhi jaauyaat treck la?? :)

YOGESH NARVEKAR said...

khup chan

सखी said...

यही लाईफ है!! :)

Akshata Godkar said...

tuzya shabdatun... LIFE jaglyacha aanand milala...!
its classic!!
long way to go..keep posting dude! :))

Akshata Godkar said...

Tuzya shabdatun...LIFE jaglyacha aanand milala...!!
Its Classic...
Long way to go..Kp posting Dude.. :))