Friday, April 3, 2009

शिवजन्म

सुर्य लोपला, फाल्गुन वद्य तृतिया तिथी
नऊ दिन नऊ मास जाहले वाट पहावी किती?
सुखस्वप्नांच्या समिधा आणि हवी आसवाचे
शिवनेरीवर जन्म घेतसे भाग्य मातृभूचे - १


पूर्ण होतसे यज्ञ त्याक्षणी पुत्र कामनेचा
हर्षभराने फुटला पान्हा मातृ भावनेचा
कृतार्थतेने भरले लोचन आज माऊलीचे
शिवनेरीवर जन्म घेतसे भाग्य मातृभूचे - २


कर्णे जाहले तप्त, नगारे बडवी छाताडे
नाद दृगोच्चर ऐकुन त्यांचा शहारले कडे
शिवनेरीवर पाट वाहिले दुधा मधाचे
शिवनेरीवर जन्म घेतसे भाग्य मातृभूचे - ३


सुर्यदर्शना नेती बालक होता ते जागे
तेज पाहुनी परस्परांचे, क्षण दिपले दोघे,
स्वकरांनी रवि कुरवाळी मुख प्रतिबिंबाचे
शिवनेरीवर जन्म घेतसे भाग्य मातृभूचे – ४

- सौरभ वैशंपायन
(३ मार्च २००९ - रामनवमी)

No comments: