Wednesday, March 14, 2012

Ra.hul

"भिंत" म्हंटल्यावर पहिल्यांदा आठवते ती चीनची भिंत, मग चांगदेव वाघावर बसून भेटायला येत आहेत हे ऐकून ज्ञानोबा माऊलींनी म्हणे ते ज्या भिंतीवरती बसले होते ती भिंतच त्यांच्या दिशेने चालवली होती ती भिंत, आणि जर्मनीचेच नसून जवळपास जगाचे दोन भाग करणारी आणि मग ८९ मध्ये धुळिस मिळालेली "बर्लिन वॉल". अनेक शतकांतून अश्या जग बदलणार्‍या भिंती निर्माण होत असतात. परवाच "धावणारी भिंत" क्रिकेट मधून निवृत्त झाली आणि आणखि एक चमत्कार पुढल्या पिढ्यांसाठी पुस्तकांत नोंद करण्यापुरता उरला.

पानिपतातून कसं जानू भिंताड्या ३ दिवस तग धरुन सदाशिवराव भाऊंच्या पत्नीला वाचवत  ग्वाल्हेरला निसटला? तसंच, ग्राउंडवरती आपल्या टिमने पराभवाकडे रांगायला सुरुवात केली कि आपला राहुल भिंताड्या उभा रहायचा, चक्क २-३ दिवस उभा रहायचा. अ‍ॅडलेड घ्या, कलकत्ता आठवा. किंवा नॉन - स्ट्रायकर एन्ड वर सेहवाग ते श्रीशांत असे १० जण बदलले तरी हा आपला स्ट्राईकवरती गौतम बुध्दाच्या शांततेने उभा राहिला होता ते आठवा. हे म्हणजे आपल्याच अनिलभाईने पाकिस्तानचा बाजार एकहाती उठवला होता त्याला वरताण झालं. एकदिवसीय क्रिकेटमध्येहि दहा हजारहुन अधिक धावा करुन त्याने केवळ तो केवळ कसोटि क्रिकेटमधला खेळाडू नव्हता हे आरामात सिध्द केलं.

राहुल द्रविड हा नको इतक्या सद्‍गृहस्थ धाटणीतला होता. म्हणजे नॅटवेस्ट सीरीज फायनल मध्ये गांगुलीने शर्ट वगैरे फिरवला तसं राहुलला स्वप्नातहि शक्य नव्हतं कारण तो मुळात त्याचा पिंडच नव्हता. संझगिरी एकदा म्हणाले होते कि सौरवच्या जागी राहुल असता तर त्याने खिश्यातून झटकायला म्हणून रुमालहि काढला नसता. पण मुळात द्रविडचे अवतारकार्यच वेगळे होते. म्हणजे वनवासात गेलेल्या राम-सीता-लक्ष्मणाचे कौतुक होते, श्रीरामाच्या पादुका सांभाळलेल्या भरताचे कौतुक होते पण १४ वर्षे आपल्या पतीपासून दूर राहिलेल्या उर्मिलेबद्दल कोणालाच पडली नसते .... अनेकदा तसंच अक्षम्य दुर्लक्ष द्रविडबाबत झालं. पण तो तिथे नसता तर? हा विचार केला कि केवळ द्रविड होता म्हणून पराभव टळला अश्या पोतडिभर मॅचेस सहज काढता येतील. मात्र त्याने कधीच नाराजीचा जाहिर सूर काढला नाहि. तो फक्त खेळत राहिला. त्याला कोणी सचिन - लारा - जयसूर्याच्या पंक्तीला बसवले नाहि, त्याला "स्फोटक" वगैरे कधी कोणी म्हंटले नाहि. अगदि द्रविड आउट झाला म्हणून वैतागून कोणी टिव्ही बंद केल्याचेहि मला आठवत नाहिये. पण इतर कोणी असलं नसलं तरी द्रविड असला कि आशेचा तंतू आपसूक चिवट व्हायचा. मॅच जिंकू, किमान ड्रॉ करु इथवर तरी समाधान मनात आपोआप असायचं. (या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल खेळू शकला नसल्याचं कारण बहुदा ऑसीजनी वर्गणी काढून, एखाद्या ७२ घंटे मैं १००% इलाज करणार्‍या बंगालीबाबाला मूठ - करणी वगैरे करायला सांगितलं असावं अशी मला दाट शंका येतेय. नाहितर नेहमीचं ’गिर्‍हाइक’ द्रविड - लक्ष्मण सोडतील?? :-p)

सध्या तरी सचिनचे "महाशतक" हि एक प्रमुख "राष्ट्रिय चिंता" बनली आहे. वास्तविक सचिन ते शतकच काय नंतरहि अजून पाच - पंचवीस शतकं झळकावेल आता मुख्य प्रश्न असा आहे कि द्रविडची जागा कोण घेणार?? एखादि जाहिरात करण्याइतकं का ते सोपं आहे??? कारण राहुलची जागा घेणं म्हणजे फक्त भरमसाठ रन्स करणं नसतं. टिमला गरज असेल तेव्हा नांगर टाकून उभं रहाणं, समोरचा खेळाडू मागहुन येऊन १०० करतो तेव्हाहि आपण ६०-७० वरती शांतपणे खेळत रहायचं, समोर असलेल्या बॅट्समनशी "प्रतिस्पर्धी" म्हणून न खेळता "पार्टनर" म्हणून खेळत रहायचं, अनेकदा नको असलेल्या भूमिका संघासाठी यशस्वीपणे पार पाडणे म्हणजे राहुलची जागा घेणे असा अर्थ होतो. ऐनवेळि विकेटकिपर सारखी प्रचंड कठीण भूमिका पार पाडायची ताकद आताच्या संघात कोणाकडे आहे? राहुलने ती देखिल बजावली. कारण राहुल द्रविडची भूमिका हि भारतीय संघासाठी बहुतांशी द्रौपदि वस्त्रहरणाप्रसंगी श्रीकृष्णाची जी भूमिका होती तीच असायची.


राहुल भोवती प्रसिध्दीचं झगमग करणारं, डोळे दिपवणारं मोठं वलय असं दिसल नाहि. ना त्याच्या भोवती कुठले वाद कधी उभे राहिले. म्हणजे थोडक्यात बापडा क्रिकेटमधला उच्च मध्यमवर्गिय होता म्हणा ना. एखाद्या गोष्टिची - व्यक्तींची योग्य किंमत ती जागच्या जागी असली ना कि नसते, ती गोष्ट किंवा व्यक्ती गेल्यावरती जाणवणारी कमतरता घालमेल अजून वाढवते ..... राहुल तू विश्वास बाळग - आता जेव्हा जेव्हा भारताचा संघ पराभवाकडे रांगायला आणि मग दुडुदुडु धावायला सुरुवात करेल तेव्हा प्रत्येक घरातून हळहळता आवाज येईल "आता पीचवरती द्रविड हवा होता रे!"

 - सौरभ वैशंपायन

5 comments:

नागेश देशपांडे said...

Nice on Saurabh. you have described Rahul "The Wall" as it is what he have done through out his career.

Like :)

अमोल केळकर said...

मस्त लेख
सध्याच्या काळात भिंत म्हणल्यावर फेसबुकचीच भिंत ( पक्षी वॉल) आठवते. :)

Sagar Kokne said...

राहुलने योग्य वेळी निवृत्ती घेतल्याने सचिनची मात्र अजूनच पंचाईत झाली आहे. एकतर महाशतक होत नाहीये आणि मग आता सचिननेही निवृत्ती घ्यावी असे त्याचे टीकाकार बोलायला मोकळे. आमचे दोघांवरही प्रेम आहे.पण मला मात्र असे बिलकुल वाटत नाही की राहुलवर अन्याय झालाय. क्रिकेट जगतात त्याला एक उत्तम दर्जाचा फलंदाज म्हणूनच ओळखले जाते. त्याला इतरांप्रमाणे ग्लॅमर मिळायला हवे होते असे कोणाला वाटत असेल तर ते त्याला स्वत:लाच नको होते. आता कसोटी क्रिकेट राहुल आणि कुंबळेशिवाय अधिकच पांगळे झाले आहे.
Ra.hul चा Ra.One शी तर काहीच संबंध नाही. नसावाच!

Reshma Apte said...

wah zakkas zalay Ra.. hul cha lekh ,,, mast :)
keep it up

BinaryBandya™ said...

"आता पीचवरती द्रविड हवा होता रे!"

mastch...