कर्णानं अलगद मान वळवण्याचा प्रतत्न केला, पण वेदनेची एक असह्य कळ शरीरात उठली. अर्जुनानं सोडलेल्या बाणनं आपलं काम चोख बजावलं होतं. रथाच रुतलेलं चाक वर काढण्यात गुंतलेल्या कर्णाच्या डाव्या खांद्यातुन घुसुन तो बाण मानेतुन बाहेर आला होता. अर्जुनाला थांबायला सांगितल्या नंतर सुध्दा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन त्याने बाण मारला होता. "तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" हा एकच प्रश्न कर्णाला त्याही अवस्थेत सतावत होता. "धर्म?मी खरच चुकलो धर्म?" पुन्हा कर्णानं मान हलवली मात्र संपूर्ण शरीरच वेदनांच मोहोळ बनल. कर्णाच्या मांडी पासुन ते कानच्या पाळी पर्यंत कर्णाला अनेक जखमा झाल्या होत्या. अर्जुनानं सोडलेले काही बाण तर इतके भेदक होते की धातुच्या पट्ट्यांचं चिलखतही त्यांनी भेदले होते. आतल्या भागात फ़ाटलेल्या चिलखतानंच जखमा झाल्या होत्या. त्याच्या बाणांनीही काही वेळा अर्जुनाला जखमी केलं होतं पण ते बाण आपण आपल्याच धाकट्या भावावर सोडतो आहे ही वेदना त्या बाणाच्या वेगाला आणि दिशेला बंधक बनवत होती. शिवाय अर्जुनाच्या रथाच सारथ्य करणारा श्रीकृष्ण? त्याला कुठल्याही बाणांचा त्रास होऊ नये याची पुर्ण काळजी कर्ण घेत होता. आज श्रीकृष्णच अर्जुनाच चिलखत बनला होता. ही गोष्ट जितकी कर्णाला माहीत होती तितकीच श्रीकृष्णाला सुध्दा. अर्जुन मात्र बेभान होऊन शरसंधान करत होता. अर्जुनानं मारलेला शेवटचा बाण थोडासा सुडाच्या भावनेनीच मारला होता. प्रत्युंचा कानाच्याही काकणभर मागेच खेचुन मारलेल्या बाणानं कर्णाला लोळवलं होतं.
असह्य आणि वाढत जाणर्या वेदना कर्णाला मरणयातना देत होत्या. इंद्राला कवच कुंडले काढुन देताना इतक्याच मरणयातना त्याने भोगल्या होत्या. इंद्राच्या आशिर्वादाने त्याच शरीर वेदनामुक्त झाल, अगदी तजेल कांती मिळाली पण ते शरीर अभेद्य राहीलं नव्हतं चारचौघां प्रमाणे सामान्य झालं होतं. "आज माझी कवच-कुंडल असती तर?" कर्णान विचार केला. "कुठलीही शक्ती माझ्या कवचाचा भेद करु शकली नसती." पण दिलेलं दान हे उजव्या हाताचं डाव्या हाताला कळु नये याची आठवण त्याला झाली. "छे छे मी केलं ते योग्यच होतं!" अगदी देवांचा राजाच भिक्षुक बनुन त्याच्या समोर याचना करत होता. तो कर्णाच्या दानशुर पणाचा परमोच्च क्षण होता. अगदी आपला मृत्यू आपण ओढावुन घेतोय हे माहीत असुन सुध्दा त्यानं मोठ्या मनानं ती कवच-कुंडल इंद्राला दिली. अर्थात त्याला आशिर्वाद म्हणुन सुंदर शरीर आणि देवा-दिकांना हेवा वाटावा अशी वासवी शक्ती मिळाली होती. मात्र घटोत्कच वासवी शक्तीचा बळी ठरला होता. आणि ज्याच्यासाठी ती शक्ती राखुन ठेवली होती त्या अर्जुनाच्या बाणाचा कर्ण बळी ठरला होता.
अजुन एक कळ कर्णाच्या मस्तिष्कापर्यंत गेली आणि कर्णाच्या नकळत त्याची उजवी टाच तिथल्या मरुभुमीवर घासली गेली. पण अश्या मरणयातना कर्णाला नविन नव्हत्या. आजवर त्याने अनेक शारिरीक आणि मानसिक मरणयातना भोगल्या होत्या. खरं तर कुंतीने असहाय्यपणे तो तान्हा निष्पाप जीव गंगेच्या पाण्यात सोडला तेव्हाच कर्ण जगासाठी मेला होता. कोणत्याही चिमुकल्या जीवासाठी त्याची आई हेच जग असतं, पण आईनेच असं तोडुन टाकलं तर? मात्र कर्णाला राधामाता आणि अधीरथानं पुनर्जन्म दिला. पण तोच पुनर्जन्म कर्णाला आयुष्यभर छळत आला.
गुरुकुलात पांडवांकडुन पदोपदी होणारी टवाळी त्याला फ़र मनस्ताप देत असे. आणि गुरुकुलाच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक गोष्ट अर्जुनाइतकीच, उलट रेसभर उजवीच करुन दाखवल्यानंतरही "सुतपुत्र" म्हणुन झालेली हेटाळणी? इतका क्लेषकारक अनुभव त्याला त्या आधी आला नव्हता. मात्र तीच सुरुवात होती मरणयातनांची. पुढे द्रौपदी स्वयंवरात देखील "मी सुतपुत्राला वरणार नाही!" म्हणुन भर सभेत द्रौपदीनं केलेला अपमान सुध्दा मरणयातना देणारा होता. वास्तविक कर्णानं इतरांना नुसतं पेलणंही अशक्य असलेला तो जडशिळ धनुष्य प्रत्युंचा चढ्वुन तयार देखिल केला होता. पण द्रौपदीचे ते शब्द कानावर पडताच, छतावरच्या फ़िरत्या यंत्रावर बसवलेल्या माश्याच्या दिशेने उगारलेला धनुष्याचा हात उगीच भरुन आल्यागत झाला. त्याच्या डोळ्यांदेखत ब्राह्मण वेशातील अर्जुनानं तो पण जिंकला होता. वास्तविक कर्णाचा तेजोभंग होण्याची ती पहीलीच वेळ नव्हती.अगदी द्रोणांसारख्या ’ज्ञानी’ गुरुंनी सुध्दा त्याला राजपुत्र आणि सुतपुत्र यातला फ़रक पदोपदी जाणवुन दिला होता.
पण द्रौपदीकडुन-एका स्त्री कडुन झालेला अपमान कर्णाच्या जिव्हरी लागला होता. "पण एका अर्थी बरेच झाले ती रुपगर्विता माझी पत्नी बनली नाही. माझ्या वृषालीची जागा ती कधीच घेऊ शकली नसती! "वृषालीची आठवण येताच कर्णाला वेदना कमी झल्यागत वाटली. "वृषाली,वृषकेतु,शोण,अधीरथ बाबा,राधामाता आणि कुंती.कुंती? कुंती? तिची आठवण मला का यावी? मला जिने जन्मत:च पाण्यात सोडुन दिले ती कुंती? युध्दाच्या आदल्या रात्री नातं सांगायला आलेली कुंती? की आयुष्यात अजणपणी झालेल्या चुकीची शिक्षा म्हणुन मला जन्म देणारी एक कुमारी माता? तिच्या वेदना कदाचित तिलाच ठाउक!आयुष्यभर माझी आठवण काढली असेल तिने! आमचं नातं फ़क्त आम्हा तिघांनाच माहीत होतं.कुंतीमातेला, मला आणि श्रीकृष्णाला!"
श्रीकृष्ण! आठवणी सरशी कर्ण त्याही अवस्थेत भारावुन गेला. "माझं आणि कृष्णाचंसुध्दा एक अनामिक नातं होतं. आमचं नातं शब्दांच्या पलिकडच होतं. मी पांडवांच्या पक्षात याव असं त्याला मना पासुन वाटत होतं. पण माझा नाईलाज होता. दुर्योधनाशी मी प्रतारणा करु शकत नव्हतो. मी एका चक्रव्युहात अडकलो होतो. माझी अवस्था मलाच माहीत होती!" त्या विचारांसरशी कर्णाची छाती धपधपु लागली. "एकि कडे नकळत शत्रु झालेले भाऊ आणि दुसरीकडे मित्रपक्षातील भिष्म-द्रोणां सारखे झालेले हीतशत्रु! मी कोणाची बाजु घ्यायला हवी होती? ज्याने आयुष्यभर मला साथ दिली त्या दुर्योधनाकडे एका रात्रीत पाठ फिरवणे योग्य ठरले असते? फक्त जेष्ठ पांडव म्हणुन युधिष्ठीरच्या सिंहासनावर जाउन बसण्याचा अधिकार मला होता? रज:स्वला-एकवस्त्रा द्रौपदीला सभेत फ़रपटत आणल्या नंतर कुत्सित्पणे हसुन माझा सुडाग्नी विझवण्यासाठी "दुर्योधनाच्या मांडीवर बैस!" असे सांगणारा मी, द्रौपदीचा सहावा पती होण्याची माझी लायकी उरली होती?"
आता कर्णाच्या घश्याला कोरड पडली होती. डोळ्यांसमोर अंधार येत होता. आजुबाजुला कण्हणार्यांचे आवाज त्याला बेचैन करत होते. कर्णाचा श्वास मंद होत चालला होता. धपधपणार्या छातीचा भाता आता हळु-हळु पण लयीत खाली-वर होत होता. मधुनच एखादी दुखरी कळ जीवाची तगमग वाढवत होती. आणि अचानक -"कर्णा!" अशी कातर हाक ऎकु आली - "कृष्ण!श्रीकृष्ण! तोच! त्याचाच आवाज!" आवाजाच्या दिशेने कर्णाने मान वळवण्याचा प्रयत्न केला, पण मानेत घुसलेल्या बाणाने त्याच्या अस्तित्वाची अशी काही जाणिव करुन दिली कि कर्णाच्या उजव्या हाताची मुठ कुरुक्षेत्रातील रेताड जमिनीवर वळली. मुठभर कोमट रेती त्याच्या रक्ताळलेल्या हातात आली. "अंह! पडुन रहा!" - कृष्णानं त्याला सावध केलं. कर्णाच्या डोळ्यांसमोर इतका अंधार येत होता की डोळे उघडणं कठीण होतं. मात्र श्रीकृष्णानं जवळ येउन त्याचा रक्तानं चिकट झालेला हात घट्ट पकडला. त्या मऊ गुबगुबीत पंजाच्या उबदार स्पर्शाने कर्णाला हरवलेली चेतना परत येत्येय असे वाटले. फ़क्त आठवण काढल्या सरशी येणारा श्रीकृष्ण खरोखर देव होता. त्याच्या कपाळावर श्रीकृष्णाने प्रेमाने हात फ़िरवला. उभ्या आयुष्यात इतका आश्वासक स्पर्श याआधी त्याला फ़क्त राधामाता आणि वृषाली या दोघांकडुनच मिळाला होता.
आता कर्णाला स्वछ दिसु लागलं होतं. श्रीकृष्णाच्या पंज्यावर आपल्या डाव्या हाताची थरथरती मुठ कर्णानं शक्य तितकी घट्ट केली. कर्णाच्या उजव्या मुठितुन आता रेती सटकायला सुरुवात झाली होती. मानेत घुसलेल्या बाणामुळे डावीकडे बसलेल्या श्रीकृष्णाकडे त्याला तिरपा कटाक्ष टाकुन बघावं लागत होतं. काहीही घडलं तरी नेहमी स्मितहास्य असलेला श्रीकृष्णाचा चेहरा त्याला आज मलुल वाटत होता. "मला क्षमा कर कर्णा! पण तुझ्यात आणि अर्जुनात मला अर्जुनाची बाजु घ्यावी लागली!आपण दोघेही आपापल्या कर्तव्याने बांधिल होतो! मला सत्याची बाजु घ्यावी लागली!!!" - कातर स्वरात श्रीकृष्णानं त्याची बाजु मांडली. "सत्य? या सत्यानिच माझा आयुष्यभर घात केला! पहीले सत्यानं माझ्याकडे पाठ फ़िरवली आणि शेवटी मी सत्याकडे! फ़क्त आसत्य वदुन मी आचार्य भृगुराज परशुरामांकडुन मी अस्त्रविद्या शिकलो म्हणुन मी आज ब्रह्मास्त्र विसरलो आणि अजाणतेपणी मी आंधळ्या ब्राह्मणाची गाय मारली म्हणुन शापाच्या रुपानं या भुमीत माझ्या रथाचं चाक रुतलं! अजुन कसलं सत्य-असत्य मोजावं? उभ्या आयुष्यात सुतपुत्र म्हणुन मला असत्य संबोधन मिळालं आणि जेंव्हा सत्य समजलं तेंव्हा त्याचा आनंद मानावा अस काही उरलं नव्हतं.
कर्णाच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. वार्यावर उडणार्या त्याच्या विस्कटलेल्या केसांप्रमाणे त्याचं मन आंदोलन घेत होतं. त्याला त्याक्षणी कृष्णाशी खुप काही बोलयच होतं पण त्याला धड्पणे काहिच बोलता येत नव्हतं. त्याची जिभ आत खेचली जात होती आणि अस्प्ष्टसा घर्र-घर्र असा आवाज येत होता सुकल्या ओठांवरुन त्याने जीभ फ़िरवण्याचा निष्फ़ळ प्रयत्न केला. पण जीभ ओठांपर्यंत पोहोचलीच नाही. या अस्वस्थतेने त्याला धाप लागली. त्याला शांत करत श्रीकृष्णाने त्याचे शांत-स्निग्ध-मधाळ डोळे कर्णाच्या निळ्या-निळ्या डोळ्यांना भिडवले आणि एका निश्चयी स्वरात त्यानं कर्णाला विचारलं "कर्णा तुझी अखेरची ईच्छा?" प्रत्यक्ष नारायण त्याला त्याची अखेरची ईच्छा विचारत होता. "ईच्छा?" खरतर जिच्या मांडीवर तो पहिल्यांदा रडला असेल त्याच कुंतीमातेच्या मांडीवर डोके ठेवुन त्याला मृत्यु हवा होता, तिच्या कुशीत शिरुन त्याला आयुष्य़भराचे अश्रु तिच्या पदरात रीते करायचे होते. पण मग तो राधामाते वर अन्याय झाला असता. कर्णाला निदान शेवटच्या श्वासांमध्ये कोणावरही अन्याय करयच नव्हता.
कर्ण पडला होता,योगा-योगानं त्याच्या उजव्या हाताला पश्चिमेकडे अस्ताला जाणारा सुर्य होता. कर्णाचा पिता सुर्य. "मी सुर्यपुत्र आहे,मी त्याच्याच तेजाचा एक अंश आहे!" असं कर्णाला ओरडवसं वाट्त होतं. उद्या आपण आपल्या पित्याला पाहु शकणार नाही, त्याला अर्ध्य देउ शकणार नाही हा सल त्याला कष्ट्प्रद वाटत होता. आणि आज सुर्य देखील उगाचच रेंगाळतोय असं वाटत होतं. सुर्यास्त उगिचच लांबला होता. मात्र आपल्या पुत्राच्या अखेरच्या घटकेला तो येउ शकत नव्हता. तो त्याचे कर्म करत होता. जगाचे पालन करण्याचे कर्म. काय चमत्कारीक क्षण होता? जगाचे पालन करणारे दोन नारायण कर्णाच्या डाव्या-उजव्या बाजुस उभे होते. हे भाग्य कर्णाचच होतं आणि ते मृत्यु शिवाय कोणीही हिरवुन घेउ शकत नव्हत. "मृत्यु -अंतिम ईच्छा!" कर्ण परत भानावर आला. अर्धाधिक अस्ताला गेलेल्या सुर्यबिंबा वरुन त्याने आपली नजर हटवुन श्रीकृष्णाकडे वळवली.
कृष्ण त्याच्या उत्तराची अजुन वाट पहात होता."मल..आ....नि...रबिज...भूमी व...र,भूमी वर.....दहन.....क..र!" -कर्णानं फ़ार प्रयत्नां नंतर उत्तर दिलं. तो अजुन काहीतरी पुट्पुटत होता पण पुढचं कृष्णाला नीट ऎकु येत नव्हतं म्हणुन कृष्णानं स्वत:चा उजवा कान शक्य तितका कर्णाच्या ओठांजवळ नेला. त्याला काहीतरी "कुंती....र्जुन......दुरय..ओ..धन." काही असे तुटक आणि अस्पष्ट बोल ऐकु आले. अंदाज बांधुन कृष्णाने मान हलवली - "होय कर्णा मी सांभाळिन सगळं!" असं म्हणुन त्याचा डावा हात आपल्या उजव्या हाताने थोपटला. पुढच्याच क्षणी कर्णानं एक जोरात श्वास घेतला त्याची मान किंचीत वर उचलली गेली आणि जमिनीवर आदळुन कळत-नकळत उजव्या बाजुला कलंडली. कर्णाच्या उजव्या हातातील रेतीसुध्दा निसटुन गेली होती. श्रीकृष्णाच्या हातावरची पकड मात्र अजुनही तितकीच पक्की होती. आता उगिचच रेंगाळतोय असे वाटणारा सुर्य देखिल अस्ताला गेला होता. सर्वत्र हळु-हळु अंधार पसरला होता. श्रीकृष्ण आणि कर्ण दोघांच्या अंधुकश्या आकृत्या मात्र तश्याच होत्या.
कर्ण सगळ्याच्या पलीकडे गेला होता!!
कर्णपर्व संपले होते!!!
- सौरभ वैशंपायन
5 comments:
आपला लेख खुपच सुंदर आहे! मला तो खुपच आवडला.
सुंदर.... सुंदर
.
keep it up...man..
खुपच सुंदर आहे
mastach
रसिक रंजन दिवाळी अंक २०१२
http://www.rasikranjan.com/rasikranjan.pdf
Post a Comment