Tuesday, June 17, 2014

वर्षाऋतु


सीताहरण झाल्यावर तिचा शोध घेता घेता श्रीराम - लक्ष्मण माल्यवान पर्वतावर पोहोचले. याच दरम्यान वर्षाऋतु सुरु झाला. आद्य कवि वाल्मीकिंना देखिल रामाच्या मुखातुन वर्षाऋतुचे कौतुक लक्ष्मणाला ऐकवण्याचा मोह आवरला नाही. वर्षाऋतुचे तोंड भरुन कौतुक करताना देखिल रामाला सीतेचा विरह जाणवतो आहे.

===============

जणू आसन्नप्रसवा गर्भधारिणी,
मार्ग क्रमती मंदगामिनी,
धारण करुनी गर्भि जलाशय
तनु अलंकारली सौदामिनी ।।१।।

नभ उतरले गिरिशिखरावर,
पाय-या जणू या सौमित्रा,
चढुन जावे क्षणिक झरझर
बलाकमाला द्यावी मित्रा ।।२।।

भरुन ओंजळ घ्यावी ज्याची,
गंध केतकी असा चिंब अन्
माखुन घ्यावा गंध मातीचा,
घमघमुन जावे कुटीर अंगण ।।३।।

लगडुन आले थेंब बिलोरी,
झुकुन गेला तो जांभुळ बघ,
मागला निसटला झाडावरुनी,
रंग तयाचे किती मोज बघ ।।४।।

केकारव करती मोर आम्रवनी,
उडती चक्रवाक अन् बगळे,
हिरव्या गार तृण शालीवर,
इंद्रगोपांची लाल ठिगळे ।।५।।

माल्यवान गेला मदात झिंगुन,
सृजनास लागते काय आणखि?
धरणीच्या तापल्या श्वासासारखि
जळत असेल जानकी, हाय! मम सखि ।।७।।

- सौरभ वैशंपायन

Monday, June 9, 2014

बाहुली

सुखदेव - भगतसिंगांबाबत एक छान "दंतकथा" सांगितली जाते की, त्यांनी काहि कुटुंबांना रावीच्या महापुरात उड्या घालून वाचवले होते. एका कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यावरती त्यातली एक लहान मुलगी खूप रडून गोंधळ घालू लागली सारखी पाण्याच्या दिशेने धावू लागली. काही केल्या ती गप्प होईन ना. मग भगतसिंगांना समजले की ज्या घरातून त्यांना वाचवले तिथे त्या छोटिची बाहुली राहिली आहे. तिचं रडणं न बघवून त्या दोघांनी पुन्हा पुराच्या पाण्यात उडि मारली आणि ती बाहुली आणून दिली. चिखलाने बरबटलेली बाहुली बघून देखिल ती मुलगी हसली व चिखलाने माखलेली ती बाहुली तीने घट्ट कवटाळली. ते बघून सुखदेव - भगतसिंगांना क्षणभर वाटून गेलं की एका निर्जीव बाहुलीसाठी इतका जीव टाकते आणि आपण आपल्या मातृभूमीसाठी काहितरी केलं पाहिजे. ही दंतकथा आहे हे माहित असून त्यावर कविता कराविशी वाटली.
= = = = = = = = = = = = = = = = = = = =

ध्रोंकार करत मग अशी निघाली रावी,
तोफेतून बारुद जशी फुटावी,
ओढ तीज अनिवार वाहिला ऊत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥१॥

सरसरत अंतर कापत पाणी गहिरे,
लोटित पाणी मागे, चुकवित भवरे,
दो तीरावरती जन अचिंबित होत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥२॥

वादळवार्‍या समोर जणू चिमुकले घरटे,
तसे उधाण पाण्यामधले गाठले घर ते,
जणू तुफानाशी लढू लागली ज्योत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥३॥

दिसली कोपर्‍यात बाहुली निवांत निजलेली,
चिखलात माखली पाण्यात चिंब भिजलेली,
घेऊन प्राण सानुलीचा परतले दूत,
जलौघात शिरले दोन मायचे पूत ॥४॥

धावली चिमुकली पाहताच बाहुली,
कवटाळली उराशी जणू ही तिची माऊली,
का रे मम देशासाठी जीव असा न होत?
तत्क्षणी शहारुन आले मायचे पूत॥५॥

 - सौरभ वैशंपायन

Tuesday, April 22, 2014

आर या पार ... दोनो तरफ मोदी सरकार!!!




जसा जसा महाराष्ट्रातल्या निवडणूकिचा शेवटचा टप्पा व १६ मे चा दिवस जवळ येत चालला आहे तसे अनेक फेसबुक स्टेटस वर नरेंद्र मोदि भारताचे पंतप्रधान झाले तर एक हुकुमशहा सत्तेवर येईल. दंगली होतील. अल्पसंख्यांक्य धोक्यात येतील. भारत कसा सेक्युलर आहे, मोदि म्हणजे प्रति-हिटलरच, RSS म्हणजे मुसोलिनीच्या ब्लॅक कॅपचा भारतीय अवतार आहे हे सांगण्याचं पीक आलं आहे. अनेक तथाकथित विचारवंत देश सोडून जाण्याची भाषा करु लागले. (म्हणजे "यांच्या" म्हणण्यानुसार जर मोदि "संकट" असतील तर हे ज्या लोकांबाबत "कळवळा" आहे त्यांना सोडून पळून जाणार असं समजायचं का? अर्रर्र असं कसं? ) आजकाल यांचा त्रागा, हा राग येण्यापेक्षा कीव व त्याहीपुढे मनोरंजन बनत चालला आहे. गेल्याच आठवड्यात सेक्युलरपणाचा बिल्ला छातीवरती लावून फिरणार्‍या देशभरातल्या समस्त मोठ्या मोठ्या विचारवंतांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी वगैरे वगैरे वगैरे वगैरे लोकांनी एकत्र येऊन मोदिंना विरोध दर्शवला. पण जागा भरायला तेव्हढीच एक बातमी ह्याहुन तीची दखल कितपत घेतली गेली हे शोधावं लागेल.

एकतर  हा शुद्ध मूर्खपणा आहे कींवा मग उघड उघड लबाडी आहे. मुळात भारतीय समाजात व्यक्तीपूजा असली तरी हुकुमशाही मान्य करणारी मानसिकता नाहीये. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींसारख्यांचे सिंहासन जनतेने हादरवून सोडले. आणि आता तर सोशल मिडिया व इतर साधने इतकी प्रभावी आहेत की जनतेला कुठल्याही कारणाने दडपणे शक्य नाही. एखाद्या राज्यात एकहाती सत्ता चालवण्यासारखे वेगळे, "देश" पातळीवर तसे वागणे शक्य नाही. एक सरळ साधी गोष्टि आहे कत्तली करणारा हूकूमशहा तयार व्हायला कुठेतरी लष्कराचा सपोर्ट असायला लागतो. सुदैवाने भारताची व भारतीय लष्कराची मानसिकता अशी कधीच नव्हती व नाहीये. हे असे काही करायचा वेडगळपणा भाजपा - मोदि करणे शक्यच नाही. मोदी सत्तेवर येऊन कत्तली करतील वगैरे म्हणणारे मुर्खांच्या नंदनवनात आहे. मोदिंचा बागुलबुवा आता अजून मोठा करता येणार नाही ह्याची जाणीव त्यांच्या विरोधकांना झाली आहे.

आता मुख्य प्रश्न असा आहे की मोदि इथवर कसे आले? व नमो लाट अशी अनिरुद्ध का झाली आहे? ह्यातली पहीली मुख्य बाजू आहे की लोकांना कॉंग्रेसची कमालीची चीड आली आहे. महागाई, हतबलता, संरक्षणाची वाताहात, अंतर्गत सुरक्षेचे वाभाडे, लोकांशी संपूर्ण तुटलेला संवाद, अंगात आलेली मुजोरी व सर्वांचा कळस म्हणजे अनिर्बंध बोकाळलेला भ्रष्टाचार. कॉंग्रेसी चेहरा देखिल लोकांना डोळ्यांसमोर नकोसा झालय. हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरी बाजु अथवा कारण आहे - गेल्या १० वर्षात मोदिंनी केलेला गुजरातचा विकास. महाराष्ट्र गुंतवणूकित, उद्योगांत गुजरातपेक्षा अग्रेसर आहे असं आकडे दाखवून सांगतात तेव्हा ज्या परीस्थितीत मोदि तिथे मुख्यमंत्री म्हणून नेमले गेले, त्यानंतर मोजून काही दिवसांत झालेले गोध्रा व त्यावरची प्रतिक्रिया म्हणून झालेली भयानक दंगल, कसलाही प्रशासकिय अनुभव नसताना ह्या सर्व गोष्टि हाताळणे खचित सोपे नव्हते व गेली १०-१२ वर्ष त्याच गोष्टिवरुन विरोधकांनी मांडलेला छळवाद - सगळ्याला हा माणुस पुरुन उरला हे लक्षात घ्यायला हवे. हे सगळे सांभाळत असताना त्यांनी गुजरातचा विकास केलाच शिवाय दंगलीत दोषी असलेल्या अनेकांना शिक्षा झाली. युट्युब मधील एका व्हिडिओ मध्ये पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना खुद्द ओवेसी सारखा माणूस बोलून गेला की गुजरात मधील अनेक गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे व होते आहे. पण लोकांनाच कंटाळा येईपर्यंत विरोधकांनी बोंबाबोंब केली त्याने मोदि आपसूक मोठे होत गेले. जितकं मोदिंना दडपण्याचा प्रयत्न केला उलट तितके त्यांना इंधन मिळाले. उलट आज अनेक मुस्लिम मोदिंना पाठिंबा जाहिर करताना दिसत आहेत. निदान त्यांचा विरोध खूपच निवळला आहे हे नक्की.

राहुल गांधी ह्या माणसाची एकंदर पाचपोच किती आहे ह्यावर अनेकांनी उघड उघड प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अर्णव गोस्वामीच्या मुलाखतीत त्याचा किती पराकोटिचा गोंधळ उडाला होता हे  देशाने बघितलं आहे. अर्णवचे प्रश्न काय होते - ह्याने उत्तरं काय दिली? हे जगाने बघितलंय. हा माणूस भर सभेत काय बरळतो त्याच्या अनेक क्लिप्स सगळीकडे फिरत असतात. हे असंच काही बरळल्याने २ वर्षांपूर्वी त्याच्या दरभंग्याच्या सभेत तर तरुणांनी इतका राडा घातला की ह्याला मान खाली घालून गाशा गुंडाळावा लागला होता. भावनिक दृष्ट्या राहुल गांधी अस्थिर व उपचारांवर असल्याबाबत विकिलिक्स मध्ये देखिल नोंदवलं गेलं. जिथे जिथे राहुल गांधींनी प्रचार केला तिथे तिथे कॉंग्रेस पार झोपली. ३/४ महिन्यांपूर्वी ३ राज्यातील विधानसभा पार पडल्या तेव्हा आपल्या परीवारातील लोकांनी देशासाठी कसे प्राण दिले आहेत हा एकच विषय घेऊन राहुल गांधींनी किमान ५/६ सभा रेटल्या. आपल्या आजी - वडिलांबाबत कुणालाही आत्मियता असणे समजण्यासारखे देखिल आहे. पण मग त्याच बरोबर हे पण त्यांनी सांगायला हवं होतं की राजीव गांधींच्या मारेकर्‍यांबाबत सहानुभुती असलेले करुणानिधी हे त्यांच्या सरकारमधले भक्कम खोड आहेत. व राजीव गांधींचा बळी घेणार्‍या तमिळ वाघांचे गालगुच्चे घ्यायची त्यांना खोड आहे.

गरिबी ही मानसिक अवस्था आहे असं ह्या महान समाजमानसशास्त्रज्ञांच म्हणणं होतं. लोकपाल आंदोलन, निर्भया प्रकरण झालं तेव्हा हे महाशय अनेक दिवस गायब झाले होते. त्याखेरीज पक्षातील जेष्ठ व त्याही पुढे देशाचे पंतप्रधान जो निर्णय घेतात तो "नॉन-सेन्स" कसा आहे हे पत्रकारांसमोर त्या ठरावाच्या चिंध्या करुन त्यांनी जग जाहीर केलं. हेच महाशय भाजपात जेष्ठांना कसं डावललं जाते त्यावर गेल्या आठवड्यात बोलत होते तेव्हा मला राहुन राहुन कौतुक वाटलं. ह्यांच्या मातोश्रींनी सीताराम केसरींना जणू शाल श्रीफळ देऊन लाल किल्यावरती त्यांचा जाहीर सत्कारच केला होता. दिल्लीत  विधानसभेसाठी शीला दिक्षितांच्या प्रचाराची राहुल गांधीनी सभा घेतली तेव्हा भर सभेतून लोकं उठून चालती झाली. मुळात कॉंग्रेस व त्यांच्या युवराजाचीच परीस्थिती गंभीर आहे.  पक्षातले जुने जाणते लोकांच्या रोषाला इतके घाबरले आहेत की अनेकांनी निवडणूक लढवायला नकार दिला. सोनिया गांधीनी यावेळी प्रचारात फार रस घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सभा तर त्यांनी तब्येतीचे कारण सांगुन टाळल्या. पवारांना देखिल राहुलचे नेतृत्व मान्य नाही, त्यांनी देखिल मुंबईच्या सभेकडे पाठ फिरवली. एकंदर काय? कॉंग्रेसला या निवडणूकित ३ आकडी जागा कमावता आल्या तरी खूप आहे.

नीट व शांतपणे विचार केल्यास भाजपा - मोदि वगळता दुसरा ऑप्शन सध्या उपलब्ध नाहीये. कॉंग्रेस - राहुल गांधींचा तर दूर दूरपर्यंत प्रश्न येत नाही कारण ह्या पारिस्थितीला तेच जबाबदार आहेत. मग दूसरा ऑप्शन काय? मुलायमसिंग यादव? ममता बॅनर्जी? मायावती? जयललिता? करुणानिधी? नितीशकुमार? की कम्युनिस्ट? ह्या तिसर्‍या आघाडिचं भंपक काडबोळं देशाचं वाट्टोळं करेल, क्षणभर मानलं की असंल अस्थिर सरकार आलं तर कॉंग्रेस बाहेरुन पाठिंबा देऊन वर्षभर हे बाहुले चालवेल आणि लोकांच डोकं थंड झालं किंवा ह्या कडबोळ्यांमुळे अजून बिघडलं की आहेतच पुन्हा निवडणूका व सत्ता जाईल कॉंग्रेसकडे. नकोच रे बाबा! रहाता राहिला "आप", ४९ दिवसांत सरकार व जनतेला वार्‍यावर सोडून पळून जाणारे ह्या देशाचा कारभार किती दिव्य करतील याचा तर विचारही करवत नाही. BTW त्यावरुन आठवलं गेले १५ दिवस केजरीवाल कॅमेरासमोरुन पूर्णत: गायब झाले आहेत. गेल्या महिन्यात तर मिडियाने त्यांची इतकी हवा केली होती की बास रे बास. ३/४ ठिकाणी मार खाल्यापासून पेपर मध्ये देखिल एकाही ओळीची बातमी आली नाहिये.

एकीकडे सेक्युलर तुणतुणे वाजवून हेच ढोंगी दुसरीकडे हे मात्र  बदनाम झालेल्या इमामांना जाऊन भेटतात. मायावती मुस्लिमांना एकत्र येऊन जात्यांध्यांना विरोध करायला सांगतात तेव्हा नाही बरं सेक्युलर देशाला तडे जात???? गेल्या १० वर्षात देशाची अवस्था अति झालं आणि हसु आलं ह्याच्याही पलीकडे गेली आहे. हे सगळं निस्तरुन रुळावर आणायला देशाला किमान पुढली १० वर्षे भक्कम सरकार व सशक्त नेतृत्व हवे आहे! मोदिंना देशांतर्गत प्रश्नांबरोबरच देशा बाहेरील कारणांसाठी सत्तेवर आणणे मला गरजेचे वाटते. १६ मे ला भाजपा - नमो सत्तेवर आल्यास १७ मे पासून घरा घरातून सोन्याचे धूर निघू लागतील ह्या भ्रमात कोणीच नाहीये. यांनी केलेलं निस्तरायलाच २ वर्ष निघून जाणार आहेत. त्याच दरम्यान घरचं झालं थोडं ह्या धाटणीचे आंतरराष्ट्रिय प्रश्न निर्माण होऊ घातले आहेत. डोळे आणि डोकं उघडे ठेवले तर सामान्य लोकांना देखिल ते प्रश्न दिसू शकतील.

आपली लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही असली तरी "समजूतदार" लोकशाही नाहीये. मी मरण्या आधी भारतीय निवडणूक ही जात, धर्म, राज्य, त्यातले पाणी वाटप, वीज, रस्ते यांच्यापेक्षा आर्थिक स्थिरता, नोकर्‍या, तंत्रज्ञान, संरक्षण, औद्योगिक धोरण, पर्यावरण,  परराष्ट्र धोरण, तेल,  देशाची आयात - निर्यात यांसारख्या विषयांवर जाहीर खडाजंगी होऊन पार पडलेल्या बघू इच्छितो. (पण अगदिच मला १५० वगैरे वर्षांच व्हायचं नाहीये. थोडसं आधी हे शक्य होईल अशी माफक अपेक्षा आहे. :p ) अर्थात त्यासाठी पाणी - वीज - रस्ते - घरं - शिक्षण - अन्न ह्या मुलभूत गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे.


..... म्हणूनच - अबकी बार मोदि सरकार!!!

 - सौरभ वैशंपायन.

Friday, March 7, 2014

आधार

एका सैनिकाच्या नववधूच्या बाबतीत लिहायचा प्रयत्न आहे. लग्न झाले त्याच उत्तररात्री तो तिला सोडून सीमेवर गेला आहे, त्यालाही अनेक महिने उलटून गेले आहेत अश्या पार्श्वभूमीवरची ही कविता आहे. call of duty शी संबधित कल्पना अनेकांनी कवी - लेखकांनी मांडल्या आहेत. शेक्सपिअरने क्रेसिडा - ट्रॉयलस ची कथा अशीच मांडली आहे, तरीही ही नावं अनोळखी वाटली तर "दिल चाहता है" मधला प्रिटी - अमीरचा ऑपराचा सीन आठवा ..... तीच क्रेसिडा - ट्रॉयलस ची गोष्ट. आपल्याकडे सावरकरांनी देखिल "कमला" काव्यात पहिल्या रात्री आपल्या नववधुला सोडून पानिपतावरती जाणारा मुकुंद रंगवला आहे. "बॉर्डर" चित्रपटातील सुनिल शेट्टीने रंगवलेल्या कॅप्टन भैरव सिंगना आठवा, ती तर १९७१ ची सत्य घटना आहे. तसाच काहिसा प्रयत्न :-)

=============================

जाणवे प्रिया मज पाठी,
स्पर्ष भिंतीचा गार,
उष्ण श्वास ओठांशी
अन्‌ देहामध्ये अंगार ॥१॥

ही रात्र लक्ष तार्‍यांची
तो चंद्र वाहतो भार
तु दिले स्पर्ष सुगंधी
वाहती केशसांभार ॥२॥

रात्रीच्या त्रियाम प्रहरी,
पोचलास अलगद पार
उदास किणकीण ताल
अन्‌ शुष्क उशाशी हार ॥३॥

प्रिया तुजविण नाही,
दुजा जीवा आधार,
विरहले हात हातातून
त्या ऋतु जाहले चार ॥४॥

- सौरभ वैशंपायन.

Sunday, February 9, 2014

Geography Dictates strategy

जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या "Military History of India" पुस्तकातील एका प्रकरणाचे शिर्षक - "Geography Dictates strategy" असं फार बोलकं दिलं आहे. १६७४ साली भारतात आलेला फ्रेंच प्रवासी अ‍ॅबे कॅरे चौलला उतरला, तिथुन गोवा मार्गे तो विजापुरला जाणार होता. प्रवासाच परवाना काढण्यासाठी तो मराठ्यांच्या कचेरीत गेला. बोलण्या्च्या ओघात तिथल्या अधिकार्‍याने शिवाजी महाराजांबाबत त्याला २ महत्वाच्या गोष्टि सांगितल्या ज्या त्याने टिपून ठेवल्या - १) महाराज सर्वात जास्त खर्च हेरखात्यावर करतात व त्या माहितीच्या जोरावरती मोहीम आखतात, २) महाराजांनी स्वत:च्या व शत्रूच्या प्रदेशातील भूगोलाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला असून गरज वाटेल त्या प्रदेशाचे ते नकाशे तयार करुन घेतात. ...... Geography Dictates strategy.

..... पण म्हणून दिसला उंच डोंगर की बांध दुर्ग, दिसली बरी जमिन की बांध गढी असं नसतं. त्या मागे प्रचंड अभ्यास असतो. शतकानुशकतं झिरपत आलेलं ज्ञान व तत्कालिन गरज यांचा विचार करुन दुर्ग बांधावे लागतात. दुर्गांच मुख्य काम म्हणजे संरक्षण. गावांना, बाजार पेठांना, मंदिरांना, बंदरांना, खाड्यांना, व्यापारी मार्गांना, राजधानीच्या संरक्षणासाठी तिच्या भोवती, राज्याच्या सीमांवरती अश्या ठिकाणी दुर्ग उभारावे लागतात. अनेकदा गावांभोवती अथवा बाजारपेठांभोवतीच भक्कम तट उभारले जातात. गावांभोवती असलेली संरक्षक तटबंदि अथवा खंदक अनेक ठिकाणी आजही दिसतात. मराठ्यांच्या भितीमुळे त्यावेळी कोलकत्याच्या व्यापार्‍यांनी इंग्रजांच्या मदतीने हजारो रुपये खर्चून कोलकत्याच्या बाजारपेठी भोवती भला मोठा खंदक खणायला घेतला, आजही त्याचा बराचसा भाग शिल्लक आहे त्याला - "Maratha Ditch" म्हणूनच ओळखतात.
रायगड सारखा बेलाग बुलंद दुर्ग राजधानी म्हणून निवडला तरी रायगडचे दुर्गमत्व जसे स्वत:च्या स्थानात व बांधणीत आहे तसेच त्याचे दुर्गमत्व त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या गिरीशिखरांवरती अवलंबून आहे. रायगडच्या चारही बाजूंना नजर फिरवली की - महेंद्रगड, पन्हाळगड (रायगड जवळचा), माणगड, लिंगाणा, कोकणदिवा व पसरलेला सरळसोट उभा सह्याद्री अशी ती अभेद्य जागा असल्याचे लक्षात येते. अनेकदा घाटांमध्ये अनेक चौक्या असत.

गिरीदुर्ग बांधताना अनेकदा एखादि मोक्याची जागा मिळे पण गोची अशी असे की त्या महत्वाच्या जागेला तोफेच्या टप्यात ठेवू शकेल, किंवा निदान मुख्य गडाची महत्वाची रसद मधल्या मध्ये बंद पाडू शकेल अशी दुसरी जागा आसपास असे. मग नाईलाजाने तिलाही तटबंदी बांधून तिथे लहान शिबंदी ठेवावी लागे. अनेकदा मुख्य गड जिंकायचा अथवा वाचवायचा तर ती तुलनेने दुय्यम जागाच युध्दाचे केंद्र बनत असे. अश्यामुळे महाराष्ट्रात व इतर अनेक ठिकाणी गडकोटांच्या जोड्या दिसतात -> पुरंदर - वज्रगड, पन्हाळा - पावनगड, अंकाई - टंकाई, साल्हेर - सालोटा, हि प्रातिनिधिक उदाहरणे. वास्तविक नाशिककडची एक डोंगररांगच रांगच दुर्गांनी सजल्याचे कारण हेच आहे - अचल, अहिवंत, वणी, रावळा, जावळा, कण्हेरा, धोडप, कुणदेव, हदगड, चांदवड, वेताळगड वगैरे वगैरे. नावे मोजताना धाप लागेल इतके दुर्ग तिथल्या गिरी शिखरांवरती आहेत. नाशिककडून त्या भागातून येणारी - जाणारी प्रत्येक वाट किमान २ दुर्गांच्या नजरेखाली असे.

मात्र अनेकदा आधीच बांधलेल्या जागा अडचणीच्या बनत, त्या हेरुन ते गड पाडणेच शहाणपणाचे असे. महाराजांनी जसे अनेक दुर्ग बांधले तसे काही दुर्ग याच कारणाने जमिनदोस्त देखिल केले. १६४९ साली शिरवळचा कोट असाच पाडला. कारण जो कोणी शिरवळमार्गे पुढे सरके तो हमखास हा लहानसा कोट जिंकत असे व त्यात स्थान भक्कम केले की त्याचा धोका पुरंदरला होत असे. भवनगिरी पट्टण, सावशी हि अजून काही उदाहरणे, हे गड पाडण्याची आज्ञा करणारी पत्रेच उपलब्ध झाली आहेत. हे सर्व करायला अर्थात बराच खर्च येत असे, पण पुढची सुरक्षा लक्षात घेऊन तो खर्च करुन गड पाडत. दक्षिणेत देखिल महाराजांनी असेच -२/३ दुर्ग बेवसाऊ करुन पाडले. ऐन कानडि मुलखात उभारलेल्या साजरा - गोजरा जवळचा एक कोट असाच त्यांनी पाडला.

अनेकदा बेवसाऊ झालेले दुय्यम दुर्ग पुन्हा अनेक कारणांसाठी पुन्हा वसवावे लागत. १३ मे १६५९ मध्ये बांदलांना लिहिलेल्या एका पत्रात बांदलांचा देशमुख "रायाजी" वयाने लहान असल्याने मुख्य सरदार असलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांना उद्देशुन त्यांनी लिहिले आहे कि "तुमच्या रहाळात (हिरडस मावळ)  जासलोडगड (हा सध्याचा कावळ्या कि दुर्गाडि याबाबत शंका आहेत.) सध्या ओस आहे, त्याला पुन्हा भक्कम करुन त्याचे नाव "मोहनगड" ठेवा. मी इथून २५-३० असामी पाठवतो आहे त्यांना तिथे आळंदा (पहारेकर्‍यांसाठीच्या इमारती) बांधून द्या." हा गड तसा छोटासाच पण अफझखान येणार त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराज हे सांगत आहेत. प्रतापगड परीसरात लढाई झाली तर जीव वाचवायला विजापूरी सेना वरंधा, चिकना वगैरे घाटांकडे सरकली तर इथून त्यांवर लक्ष ठेवता येईल हा विचार त्या मागे आहे. अफझलखानाचा वध १० नोव्हेंबर १६५९ रोजी केला महाराज हि आज्ञा मे मध्ये देत आहेत हे लक्षात घ्या.


शत्रुची प्रगत शस्त्रात्रे व आजूबाजूला फायदेशीर ठरेल अशी परीस्थिती लक्षात घेऊन दुर्ग वसवावे लागतात. तोफा आल्या आणि दुर्ग बांधणीचे तंत्रच बदलले. महाराजांनी जे दुर्ग बांधले अथवा दुरुस्त करुन घेतले त्यात मोठा बदल म्हणजे गडाचा दरवाजा नेहली दोन बुरुजांच्या आड लपवला - त्यालाच गोमुखी रचना म्हणतात. अर्थात त्याने तोफेचा गोळा कधीच दरवाज्यावरती थेट बसत नसे. अनेकदा तटांची उंची मुदामहुन लहान ठेवत कारण तोफेतुन सुटलेला गोळा परस्पर तटबंदिवरुन पलीकडे निघून जात असे. काहिवेळा तटबंदि देखिल फारशी भक्कम नसे चार - सहा गोळ्यात ती ढासळेल अशी असे मात्र त्याच्या आजूबाजूचा प्रदेशच असा असे कि तोफा त्या भागात आणणे जवळपास अशक्य सोपे उदाहरण म्हणजे वाळवंटातील गडकोट .... आजूबाजूला नजर जाईल तिथवर रेतीचा समुद्र, तोफा वाळूत फसायची १००% हमी, त्यामुळे आजूबाजूचा प्रदेश अश्यांचे दुर्गमत्व आपोआप वाढवत असे.
महाराजांनी असे ३६० हुन अधिक दुर्ग राखले होते. "उद्या खासा आलमगिर दख्खनेत उतरेल, माझा येक येक कोट त्याविरुध्द येक येक वरुस लढला तरी त्याला दख्खन काबिज करावयास ३६० वरुसांचे आयुष्य लागेल!" हा दांडगा आत्मविश्वास त्या महामानवाच्या मनात होता. त्याचा इतिहासही आपल्याला माहित आहे. त्यानंतर मराठा साम्राज्य वाढले, अटक ते कटक या पट्यात क्वचितच असा गड असेल ज्यावर भगवा फडकला नसेल. अटक, पेशावर, लाहोर, मुल्तान, आग्रा, अगदि लाल किल्यावरती तब्बल १४ वर्ष भगवा फुरफुरला होता.
ज्या गडकोटांनी आपले स्वातंत्र्य मिळवून दिले, ते अबाधित राखले त्यांचे मोजकेच पैलू, व इतिहास आज आपल्याला माहित आहेत. मराठ्यांनी किमान एकदा पाय ठेवलेल्या ठिकाणी भेट देऊ असे ठरवले तरी ओरीसातील कटक पासून ते आजच्या पाकिस्तानातील अटकपावेतो जावे लागेल. या दुर्गांचा इतिहास बोलका केला पाहिजे. त्यांचे दुर्गमत्व प्रकाशात आणायला हवे. कदाचित तरच आपण इतिहासाच्या ऋणातुन अंशात्मक मुक्त होऊ शकू.
 - सौरभ वैशंपायन.

Thursday, November 14, 2013

सिंहासन चोविशी



आपल्याकडे सम्राट विक्रमादित्यावरती "सिंहासन बत्तीशी" म्हणून ३२ गोष्टिंचा एक संग्रह आहे. प्रत्येक रात्री सिंहासनावरची एक एक दिव्य पुतळी जिवंत होऊन ते सिंहासन शोधुन काढणार्‍या राजा भोजाला सम्राट विक्रमादित्याच्या एकेका सद्गुगुणाबाबत सांगत असते व शेवटि म्हणते "हे राज‍न, हा गुण तुझ्यात असला तरच तु ह्या दिव्य सिंहासनावरती बैस!" आणि मग राजा भोज मोठ्या मनाने अश्या ३२ रात्री जागुन त्या गोष्टि ऐकतो व अखेर नम्रपणे त्या सिंहासनावरती बसायला नकार देतो. उद्या आपल्या चालत्या बोलत्या विक्रमादित्याचा संपूर्ण कारकिर्दितला शेवटचा सामना आहे. अर्थात त्याचे वेगळे असे सिंहासन कधी नव्हते, पण मागे सचिन वरीलच एका लेखात म्हणालो होतो तसं "सिंहासनासाठी सम्राट नसतो सम्राटांसाठी सिंहासनं असतं, आणि ते नसलं तर सम्राट जिथे बसतो ती जागा आपसूक सिंहासन होते!" उद्याची कसोटी संपेल तेव्हा आम्ही विक्रमादित्याच्या २४ वर्षांच्या गोष्टि येणार्‍या पिढ्यांना सांगू आणि विचारु - "मनापासून सांग, तू खरच "सचिन" होऊ शकतोस का?"

१५ नोव्हेंबर १९८९, कराची ते १४ नोव्हेंबर २०१३ वानखेडे .... २४ वर्ष. क्रिकेटच्या किमान ४ पिढ्या बदलल्या. सचिन पहिल्यांदा खेळायला उतरला तेव्हा जन्मही न झालेल्या किंवा रांगणार्‍या अनेकां बरोबर सचिन आज खेळतो आहे. मात्र तसंच सचिनचा जन्म झाला त्याचवेळि काही सचिन द्वेष्ट्यांचा सुद्धा जन्म झाला असावा, कारण तशी काही माणसं मी आजूबाजूला बघितली आहेत. सचिन निवृत्त कधी होणार? सचिनचा इतका उदो उदो का? हे प्रश्न अशा महानुभवांना नेहमी पडत. पैकी त्यांची पहिली इच्छा उद्या पूर्ण होते आहे. पण सचिनचा उदो उदो का? हे समजण्यासाठी २४ वर्ष बघावी लागतील. मी त्याच्या अशक्य विक्रमांबाबत बोलतच नाहीये. त्याच्या गेल्या २४ वर्षातील खेळ व सामाजिक जीवनाबाबत बोलतोय.

एक खेळाडू म्हणून जेव्हा आपण त्याची कारकिर्द तपासतो. तेव्हा इतकी शारिरीक, मानसिक, भावनिक तंदुरुस्ती त्याने कुठुन मिळवली व जपली? ह्याचं कौतुक मिश्रित आश्चर्य वाटत रहातं. कुठलाही मैदानी खेळ खेळणार्‍या खेळाडूची कारकिर्द हि शारिरीक तंदुरुस्तीवरती अवलंबून असते हे सहाजिक आहे. आजवर अनेक वेगवेगळे खेळ व खेळाडू बघितले पण इतकी मोठि कारकिर्द माझ्या बघण्यात नाही. क्रिकेटमध्ये नाहीच नाही. १५-१६ वर्ष खेळणारे अनेक दिग्गज आहेतही पण शरिर थकू लागलं, सांधे कुरकुरु लागले की ते "सन्माननिय" निवृत्ती घेतात जे फार सहाजिक व बरोबरही आहे. पण "सचिन संपला" अशी १२-१२-१२ रोजी जगबुडि होणार इतकिच धादांत असत्य आवई ३-४ वेळा उठली होती हे सगळ्यांना आठवत असेल. त्याची पाठदुखी, त्याचा शस्त्रक्रिया झालेला टेनिस एल्बो, त्याचे पोतडिभर nervous 90's वगैरे, जवळपास ६-८ महिने तो संघा बाहेरही होता. पण तो परत आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं.

Titan कप वगळता कॅप्टनशीप तितकी त्याला कधीच मानवली नाही. काही काळ मॅच फिक्सिंगचे काळे ढगही संपूर्ण भारतीय क्रिकेटवरती पसरले होते, अनेक जुने जाणते त्यात फसले, त्यांचे हात व चेहरे काळे पडले पण सचिन निष्कलंकच राहीला. मॅच फिक्सिंगनंतर बरीच जुनी खोडं उपटून फेकली गेली. फांद्या सपासप कापल्यावर नवी पालवी फुटावी तसाच काहिकाळ डळमळलेला भारतीय संघ नवा आकार घेऊ लागला. सौरव गांगुलीने त्याला आकार दिला. आजचा धोनीच्या हाता खालच्या संघापाठी कुठेतरी गांगुलीचे कष्ट आहेत. त्याच वेळी एक बाजू सचिनने लावून धरली होती हे देखिल तितकच खरं. तेव्हाही अगदि काल-परवासारखा सचिन शिवाय उरलेला संघ कुठला? हाच प्रश्न होता.

आजकाल T-20 चा जमाना आहे. सगळं झटपट. त्यात चूक किती बरोबर किती हा भाग निराळा. पण चार मॅच मध्ये दिसलेला चेहरा पाचव्या मॅचपासून पुढे दिसेल की नाही याची शाश्वती नसते. शारीरीक, मानसिक क्षमतेचा कस लावणारं कसोटि क्रिकेट मागे पडलंय. फक्त दंडाच्या जोरावरती पोतडिभर रन्स खेचणार्‍यांना कसोटि मध्ये लागणारी कसोटि कितपत झेपेल हा प्रश्न उरत असताना दुसर्‍या बाजूला चक्क २ तपं टिकून २००वी कसोटी खेळणारा ४० वर्षांचा हा खेळाडू बघितला की आपोआप सलाम केला जातो. एकदिवसीय खेळात सर्वात वेगवान शतक आणि कसोटि मधल्या ३०० धावा हे दोन मुख्य अपवाद वगळता क्रिकेट मधला व अर्थात फलंदाजी मधला जवळपास प्रत्येक विक्रम आज सचिनच्या नावावर आहे. इथवर पोहोचायला सचिनने अफाऽऽऽट मेहनत घेतली आहे.

इतकं असून सचिनला एकदाही बेताल वागताना बघितलं नाही. ना मैदानात ना मैदाना बाहेर. प्रसिद्धिचं इतकं मोठं वलय असताना सचिनने डोक्यात हवा जाऊन गैरवर्तन कधीच केलं नाही, म्हणून सचिन मोठा. आपल्या वलयाची व त्या वलयाची आपल्या चाहत्यांवर असलेल्या छापाची सचिनला जाणिव आहे व म्हणून इतर सर्व जण दारूच्या ब्रॅन्डच्या "make it large" म्हणत जाहिराती करत असताना सचिनने ती गोष्ट कधी केली नाही. म्हणूनच सचिन आपसूक larger than life झाला. त्याने कधी भारतीय संघातल्या अथवा विरुद्ध संघातल्या खेळाडूबाबत जाहिरपणे वाईट मतप्रदर्शन केलं नाही. मिडिया व "जाणकार" म्हणावणार्‍यांकडून जेव्हा जेव्हा बोचरी टिका झाली तेव्हाही सचिनची बॅटच बोलली.शिवाय सचिन वेगवेगळ्या कार्यक्रमात अथवा मुलाखतींमध्ये बोलला तेव्हा शब्द न शब्द त्याने जपून वापरला. एक उदाहरण द्यायचं झालंच तर अर्चना विजया या T V anchor वा मॉडेलचं देता येईल. तिने स्वत:च्या ब्लॉगवरती लिहिलेली गोष्ट - एका मुलाखती नंतर सचिनने सहज मला विचारलं "“How do you maintain your physique?” वरती हीच कन्यका सांगते - "दहातले नऊ जण "फिजिक" ऐवजी "फिगर" हा शब्द वापरतात ज्याला एक ’ओशटपणा’ असतो. पण सचिन बोलतानाही शब्दांची निवड कित्ती अचूक करतो. व त्याच मुळे आज तो इतक्या उंचीवर का आहे ते समजतं."

आज इतक्या उंचीवर पोचल्यावरही हा दरवर्षी रणजी सामने न चुकता खेळतो. खेळाडू म्हणून सचिनची चपळता का टिकून आहे ह्याचं गमक इथे आहे. चेंडूचा टप्पा बॅटच्या मध्यावर येतो आहे ना हे बघायला तो आजही ओल्या चेंडूने सराव करतो. उष्ण आणि आर्द्र (humid) ठिकाणी खेळावं लागणार असेल तर शरीरात पाण्याची कमी होऊ नये म्हणून केवळ पाणी पिण्यासाठी पहाटेचा गजर लावून उठणारा हा काटेकोर माणूस आहे. सचिन उगीच घडत नाहीत. त्यासाठी येतानाच काहि गोष्टि वरुन आणाव्या लागतात. शिवाय घरातलं वातावरण अपयशात पाठींबा देणारं हवं आणि यशात कान ओढणारं देखिल, तसंच संपूर्ण जीव ओतणारा आणि खेळ व खेळाडूलाच पैलू पाडणारा आचरेकर सरांसारखा अतिशय शिस्तबद्ध प्रशिक्षक लागतो. अन्यथा पावसाळ्यात  कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तसे ’महान’ क्रिकेटपटू गल्लोगल्ली तयार झाले नसते का??? फक्त ५.६ फुटाचा असूनही सचिन इतरांपेक्षा दशांगुळं मोठा दिसतो तो असा.


"सचिन" होणं फार अवघड आहे. अख्खा देश आपल्याकडे बघतोय, प्रत्येक मॅच मध्ये त्यांना शतक हवय जे अशक्य आहे .... तरी त्या अपेक्षांच ओझं खांद्यावर घेणं फार फार धीराचं काम आहे. अनेक लोकांना वाटेल त्यात काय? त्या ओझ्या बरोबर करोडो रुपये कमावलेच कि त्याने? पण तो ज्या उंचीवरती आहे त्या उंचीवर बहुतकरुन माणसांचे पाय जमिनीवरुन सुटतात व अशी ओझी पेलवत नाहीत. पण हा आपला २४ वर्ष कृष्णासारखा लोकांच्या बोजड अपेक्षा व भारतीय संघाचा गोवर्धन करंगळीवर तोलून ऊभा होता. ह्या सामन्यानंतर त्या गोवर्धनाला आपापल्या बॅटचे टेकू देणारे गोप यापुढे सचिन शिवाय देखिल खूप यशस्वी ठरोत ही स्वाभाविक सदिच्छा आहेच. पण आपलं विश्वरुप दर्शन दाखवत पिचवरती "तो" बॉलर्सची रक्तहीन अहिंसक "कत्तल" करत असताना अख्या मैदानात जो "सच्चिन - सच्चिन" आवाज घुमत रहातो तो उद्याच्या कसोटी नंतर परत ऐकू येणार नाही. त्या "सच्चिन - सच्चिन" मध्ये महाभारत युद्धाच्या "पाज्चजन्यं ह्रषीकेशो देवदत्तं धनंजय:" पासून ते एखाद्या महाआरतीपर्यंत सगळं आपसूक सामावतं. कारण सचिन हा क्रिकेट रसिकांचा देव आहे. सचिन ज्या क्षणापर्यंत खेळेल तोवर क्रिकेट हा "धर्म" असेल, ज्या क्षणी तो पिच सोडेल त्याक्षणी क्रिकेट हा "खेळ" होईल! मग कदाचित या कसोटी नंतर जन्माला आलेली पोरं - टोरं थोडी मोठी होऊन जेव्हा हातात बॅट धरुन "चला क्रिकेट खेळू!" असं म्हणतील तेव्हा त्यांना आम्ही बघितलेल्या - अनुभवलेल्या या सिंहासन चोवीशी मधली एखादी गोष्ट सांगून म्हणू - "बाळा, सचिन जे खेळायचा ना त्याला क्रिकेट म्हणत!!!"

 - सौरभ वैशंपायन

Wednesday, October 30, 2013

पुनरुत्थान!

 काही लाख वर्षांपूर्वी तिथे रोजच निसर्गाची दिवाळी साजरी व्हायची. लावारसाचे अनार उंच उंच उडायचे. निसर्गचक्राप्रमाणे ते शांत होत गेलं आणि उभी राहीली एक अभेद्य भिंत - सह्याद्रि!

पुढे त्या सह्याद्रिच्या अंगा खांद्यावरती अनेक सत्तांनी आपली ठाणी वसवली. श्री शिवछत्रपतींनी देखिल अनेक दुर्गम दुर्ग जिंकले अथवा नव्याने बांधले.


त्यावेळी ज्या दुर्गांनी छातीचा कोट करुन परकियांचे तोफगोळे आपल्या अंगावर झेलले व इथल्या मातीला स्वातंत्र्य मिळवून दिले - राखले. आज त्या दुर्गांची आपण साधी स्वच्छ्ताही राखू शकत नाही हि अत्यंत लाजेची गोष्ट आहे. अनेक कद्रू, कपाळकरंटी आणि निर्बुध्द लोकं तिथे आपली नावे लिहितात, दारुच्या पार्टी करतात, पान - गुटक्यांच्या पिंकांचे सडे शिंपतात ...... पण अगदिच अंधार नाहिये. पणतीची एक मिणमिणती वात सुध्दा अंधार दूर करु शकते तश्या ह्या निराशेच्या गोष्टिला छेद देणारे तरुण आज महाराष्ट्रात आहेत.

आपण मोठ्या आनंदाने दिवाळी साजरी करत असताना आपल्या शिवरायांचे दुर्ग अंधारात कसे? ह्या प्रश्नाने बेचैन होऊन मग सुरु झाला एक नवा उपक्रम. ऐन दिवाळीच गडकोटांवरती साजरी करायची. महाराष्ट्रातल्या एकातरी दुर्गावरती जाऊन शक्य तितकी साफ सफाई करायची, डागडुजी करुन गडावरची मंदिरे, समाधी, महाद्वार, पायर्‍या यांना तोरणांनी, फुलांनी, रांगोळ्यांनी, पणत्यांनी सजवायचे आणि अंधार पडला कि त्या पणत्या उजळवायच्या. शतकानुशतके अंधार बघितलेल्या दुर्गांना त्या २-४ दिवसात का होईना पण पुन्हा प्रकाशित करायचे.

मग एक चमत्कार घडतो, दुर्गातील वास्तू पुरुष जागा होतो. शहारुन उठतो, त्याला शिवकालातील उडवलेल्या चंद्रज्योती आठवतात. चार क्षण का होईना तो भरुन पावतो. ऐन सणासुदिला घरदार सोडून दूर गावच्या लाडक्या आज्जी - आजोबांना भेटायला जावं तसं आपणहून आलेल्या त्या तरुणांना तो तोंड भरुन आशिर्वाद देतो - "कल्याणमस्तु!", "तस्थातु!"

अश्या अनेक संस्था आजआपल्या आजूबाजूला काम करतात. FB वरती त्यांची पेजेसआहेत. महिना - पंधरा दिवस आधी त्यांचे संकल्प व त्यावर्षी निवडलेला दिवस आणि दुर्ग तिथे समजू शकतो. तुम्हालाहि शक्य झालं तर अश्या एखाद्या संस्थेबरोबर नक्कि जा. गडावरची दिवाळी अनुभवून बघा. तिथल्या वास्तू पुरुषाचा आशिर्वाद घ्या!

आणि समजा हे जमलं नाहि तरी एक गोष्ट नक्की करा ..... आजुबाजुच्या लहान मुलांना घरासमोर एखादा छोटासा "दुर्गम" गड बांधु द्या. या मातीशी त्यांनी नाळ पुन्हा जोडा!

शुभ दिपावली!!!

Monday, February 4, 2013

स्पंदने


भर थंडित त्याच्या अस्ताव्यस्त पहुडल्या उघड्या, काळ्या, थंडगार पडलेल्या अंगावरती मी हात टेकवला, खरंतर मलाच तेव्हा आधाराची गरज होती. त्याच्या थंड पडलेल्या देहातली धुगधुगीही अजूनही जाणवत होती. त्याच्या राकट कणखर देहातल्या नसां हाताला जाणवत होत्या. त्यात कधीकाळी गरम लाव्हाच वाहिला होता. त्याचे श्वासही सुरु होते. मी दूरवरती नजर फिरवली. उन्हं चढायला नुकतीच सुरुवात झाली होती. मी देखिल दूरुन त्याला भेटण्यासाठी बराच वेळ चालून आल्याने माझ्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्याच. मी आल्याचा त्याला आनंद झाला होता की नव्हता मला कळत नव्हतं. बहुदा त्याला त्याचं सुखं दुखं काहीच नसावं. त्याची सध्याची एकंदर अवस्था गीतेच्या स्थितप्रज्ञाची झालीये. कधीकाळी ज्यांच्या बापजाद्यांना त्याने सर्वतोपरी मदत केली होती आज त्यांचे वंशज त्याकडे फार अनोळखीपणे बघतात. ओळख दाखवणारे अर्थात माझ्यासारखे हजारो रोज त्याला भेटायला येतातही, काही त्याच्या जुन्या आठवणी जागतात. पण त्याला भेटायला येणारे अर्धाधिक तर उलट त्याला नवीन जखमाच देऊन जातात. अश्या अनोळखी माणसांमुळे असेल कदाचित विरक्ती हाच त्याचा स्वभाव बनला आहे. त्याच्या सध्याच्या अवस्थेकडे बघून कधीकधी फार गलबलून येतं. त्याचं डोकं मांडिवरती घेऊन त्याला प्रेमाने थोपटता आलं असतं तर किती बरं झालं असतं असंही वाटून जातं. त्याची अवस्था मात्र समाधी लागल्यागत असलेल्या संन्याश्यासारखी क्वचित स्वत:त गुंगलेल्या निष्पाप मुलासारखी. कधी कधी काही ओळखीचे आवाज आले की चेहर्‍यावरती ओळखीचे हसू येतं, वळून बघतो देखिल, पण तितक्यापुरतच. इतरवेळी गुडूप अंधारात स्वत:ला हरवून टाकतो. त्या अंधारात त्याला बघणारं कोणी नसतं. मग डोळे मिटून उसासे टाकत शांत झोपला कि रोज रात्री त्याला स्वप्न पडतात. त्याचे जूने वैभवाचे दिवस त्याला दिसतात त्याच्या डोईवरती चढवलेली मोठी पागोटी, अंगावर खास त्याच्यासाठीच घडवलेले दागिने ..... अचानक त्याला वास्तवाची जाणीव येते तो दचकून जागा होतो, परत परत विस्कटलेली पागोटी, तुटलेले दागिने बघतो त्यालाही मग भरुन येतं. त्याच्या डोळ्यांच्या कडांनाही पाणी साठतं, छाताडावरती वाट्टेल ते घाव सहन करणार्‍या त्याला, ते अश्रू घरंगळताना कोणीतरी पाहील ह्याची तितकी भीती वाटत रहाते. त्याच्या सुदैवाने त्याचवेळी आकाशात वीजा कडाडून पाठोपाठ धो धो पाऊस सुरु होतो त्याचे अश्रू आणि पाऊस यातला फरक फार कुणाला समजत नाही. ज्यांना समजतो ते त्याच्या जवळ जातात. त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्या विशाल, पिळदार देहापुढे सगळेच हात चिमुकले वाटतात. पण तरीही मी त्याला बिलगतो, त्याच्या निधड्या छातीवरती डोकं ठेवतो. नीट कान देऊन ऐकलं तर त्याच्या हृदयाची लयबद्ध स्पंदने देखिल ऐकू येत रहातात - शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी.

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, January 29, 2013

दुर्ग भांडार




सहा - सात महिन्यांपूर्वी माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या अल्बममध्ये मी दुर्ग भांडारचे फोटो बघितले होते. त्यादिवशीपासून दुर्ग भांडारला जायची संधी शोधत होतो. माझ्या ओळखीचे जे काही २-३ ट्रेकिंग ग्रुप आहेत त्यातल्या सगळ्यांची डोकी या प्लानवरुन खाऊन झाली होती. अखेर परवा २६ जानेवारीच्या मुहुर्तावरती पोदार कॉलेजच्या ग्रुप बरोबर जायची संधी मिळाली.

दुर्ग भांडार हा नाशिक जवळील ब्रह्मगिरीच्या डोंगराचाच एक भाग आहे. दररोज शेकडो व शनिवार - रविवारी हजारो लोकं ब्रह्मगिरी व जटा मंदिरात दर्शनासाठी येतात पण फारच कमी लोकांना पुढे एखादा दुर्ग आहे ह्याची कल्पना असते. माझ्या आजवरच्या अविस्मरणिय ट्रेक्सपैकी दुर्ग भांडार पहिल्या पाचांत ठेवायला हरकत नाही. जटामंदिरवरुनच पुढे अक्षरश: १५-२० मिनिटांच्या अंतरावरती हा दुर्ग सह्याद्रिच्या काळ्याकभिन्न कातळात "खोदून" काढलेला आहे. अर्थात जटामंदिर ते गड मधली वाट ही रेताड, भुसभुशीत, ढिसाळ, वगैरे शब्दांना आपल्यात सामावणारी व जेमतेम ’एक पाय नाचू रे गोविंदा’ करत पार करावी लागत असल्याने त्या दिशेला कोणी फिरकत नाही. चूक झाली तर डाव्या बाजूला २०-२५ फुटांचा अतिशय तीव्र उतार व मग थेट दरी आहे. ज्यांना ट्रेकची फार सवय नाही त्यांच्यासाठी कींवा आयुष्यातल्या पहिल्याच ट्रेकसाठी हा गड नक्किच नाही.


मी वर म्हणालो तसा कातळात "खोदून" काढलेला हा माझ्या पाहण्यातला पहिलाच गड आहे. मुळात तिथे गडाची मुख्य डोंगराहुन वेगळी अशी बांधणी दिसतच नसल्याने गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्या शिवाय खात्रीच होत नाही की इथे कुठलाही दुर्ग असेल. जवळ गेल्यावर ५-६० फुटांवरुनही प्रथमदर्शनी त्याचे प्रवेशद्वार हे सुरुवातीला पाण्याचे खोदलेले टाकेच असावे असे वाटते. कारण या वाटेच्या आधीच्या ट्प्यावर खरंच एक पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने पाणी अस्वच्छ आहे. मात्र एकदा का त्या चिंचोळ्या वाटेपाशी पोहोचलो की मती गुंग करणारे, अफाट मेहनत व सुरक्षिततेच्या दृष्टिने जबर शक्कल लढवलेले बांधकाम ..... नपेक्षा "खोदकाम" दिसते. उजव्या हाताच्या भिंतीत इतर गडांप्रमाणेच शिवकालिन असणारे हनुमानाचे शिल्प दिसते. आणि मग थोड्या सरळसोट उतरणार्‍या साधारण फुटभर उंचीच्या ५०-५५ पायर्‍या एखाद्या गुढ भुयारात उतराव्यात तश्या खाली घेऊन जातात. एका वेळि एकच माणूस जाऊ शकेल इतपतच जागा. हा कातळ पहारींनी, छिन्नी-हातोड्याने तब्बल ६० फूट तरी सरळसोट खोदला आहे. वरती बघितलं की आकाशाची भगभगीत पट्टी तेव्हढी दिसत रहाते. 

खाली पोहोचलो की अजुन एक अनपेक्षित गोष्ट आपली वाट बघत असते. ते म्हणजे गडाचे केवळ दोन - अडिच फुटि उंचीचे व फक्त तीन फुट लांबीचे पहिले प्रवेशद्वार. गडात शिरणार्‍या माणसाला आधी इथेच गुडघे टेकावे लागतात. लहान मुलाप्रमाणे रांगतच तिथून बाहेर पडावे लागते. हे तंत्र इतके जबरदस्त आहे की आतल्या बाजूला एक - दोन पहारेकरी जरी तलवार घेऊन बसले तरी ह्या गडाचे अगदी आरामात रक्षण करु शकतात. दरवाज्यातून प्रवेश करताना आधी डोके आत घालावे लागते दोन्ही हात जमीनीवरती टेकले असतात, गुडघे टेकल्याने कुठल्याही दिशेला सरकायचा वेग उरला नसतो आणि त्यातून चिंचोळी जागा. आत शिरु पाहणार्‍याचे डोके धडापासून विनासायास वेगळे होण्याची संपूर्ण खात्री.

हा पहिला रांगता प्रवेश झाला की उजवीकडे वळायचं,  दुसरी गंमत वाट बघत असते - दोन्ही बाजूला दरी आणि मध्ये जेमतेम ८-१० फुटाचा कातळ ज्यावरुन चालत दुसर्‍या टोकाला जायचं असतं. भणाण वारा असला तर दरीत फेकले जाण्याचे शक्यता असतेच. सुदैवाने वारा नव्हता पण इथे दुसरा त्रास वानरांचा होतो. आम्ही आत प्रवेश करताच उजव्या हाताच्या एका शिळेवरती अतिशय स्वस्थ चित्ताने तो बसला होता. यांना माणसांची इतकी सवय झाली आहे की अगदि एकट्या वानरालाही हाकलवून लावायचे प्रयत्न जवळपास निष्फळ असतात. फार फार तर आपल्यावरती उपकार केल्यागत फुटभर जागा बदलतात. हा टप्पा पार करुन पलिकडच्या कातळकड्याकडे पोहोचलं की डाव्या हाताला पुन्हा नवीन "लोटांगण" असतच. गडाचे दुसरे प्रवेशद्वारही अगदी तसेच. शिवाय यातुन आत गेलं की आधीच्या प्रवेशद्वारासारखं थेट वरपर्यंत पायर्‍या दिसत नाहित जवळपास ९० अंशात वळत जाणार्‍या फुटभर उंचीच्या पायर्‍या आहेत.

वरती कुठलंलही इमारतीचं बांधकाम दिसत नाही, कींवा तसे कुठलेही पुरावे दिसत नाहित. सरळ नाकासमोर चालत गेलं की उजव्या बाजूला थोडं खाली पाण्याची दोन टाकी खोदली आहेत. पैकी एक टाकं त्यातल्या त्यात स्वच्छ आहे असं मानता येतं, दुसरं टाकं मात्र हिरवट पाण्याने भरलेलं आहे. तिथुनच पुढे दोन मिनिटांवरती कातळ फोडून तयार केलेला बुरुज आहे. वास्तविक बुरुजापेक्षाही तो एखादा सज्जा असल्यागत फोडून काढला आहे तोफा अथवा बंदूंकांचा मारा करायला कुठलीही सोय, जंग्या नहियेत. मला पाणी वाहून जायलाही काही व्यवस्था दिसली नाही, पण ती असावी अन्यथा पावसाळ्याच्या दिवसात इथे छातीभर पाणी साठेल. या बुरुजात उतरताना काळजी घ्यावी लागते डाव्या बाजूला दरी आहे, अजिबात चूक न करता इथून बुरुजात उतरावं लागतं. बुरुजात उतरलं की खाली त्र्यंबकेश्वर दिसतं. अजून उजवीकडे बघितलं की खाली गंगाद्वारकडे जाणारा रस्ता व समोर ब्रह्मगिरीचा डोंगर दिसतो. परत संपूर्ण मागे वळलं व बुरुजात जिथून उतरलं तिथे जाऊन उभं राहीलं की समोर थोडंस डाव्या हाताला हरीहर गड व बसगड दिसतो. बास संपला गड. या गडात पहाण्यासारखं म्हणाल तर जवळपास काही नाही पण अनुभवण्यासारखं खूप काही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे व आधीच्या प्रवेशद्वाराजवळ जे मारुतीचे शिल्प कोरलेले दिसते त्यावरुन हा शिवकालीन गड असावा. जो नावाप्रमाणेच खजिना अथवा परचक्र आल्यास महत्वाच्या व्यक्तींना लपायला देखिल वापरता येऊ शकेल असा असावा, मात्र परत सांगतो वरती कुणाला रहता येईल, अन्न, दारुगोळा, खजिना साठवता येईल असं काही बांधकाम अथवा अवशेष दिसत नाहीत. त्यामूळे हा नक्कि कधी व का बांधला हे समजायला काही मार्ग नाहिये. मी आजवर वाचलेल्या इतिहासातही याचा उल्लेख मला मिळालेला नाही.

बुरुजातच फतकल मांडून आम्ही पोटपूजा सुरु केली. तासभर आराम - गप्पा झाल्यावरती परत निघालो. तोच रस्ता, तीच लोटांगणं मग त्या लोटांगणासहित फेसबुकच्या प्रोफाईलला डकवता येईल असा फोटो काढण्याची प्रत्येकाची धडपड सुरु झाली. आम्हा ६ जणांचा ग्रुप थोडा मागे पडला. आम्ही कातळकड्याच्या ८ फुटी चिंचोळ्या पट्टिवरती आलो आणि  समोरुन ५-७ वानरांचं टोळकं उभं राहीलं, डाव्या दरीतून  अजून दोघं वर आली, मागे वळलो तर एक जण आधीच येऊन उभा होता. त्यांनी फार हुशारीने जागा निवडली होती. पुढे - मागे माकडं डावी-उजवीकडे दरी. धीट तर इतके होते कि घाबरवायला पाण्याची रिकामी बाटली वाजवली तर ३ लहान पिल्लं पुढे येऊन तीच बाटली धरायचा प्रयत्न करु लागली. एक जण पुढे झाला व त्याने सरळ एका मुलीच्या ट्रॅकपॅन्टचा कोपरा चिमटीत पकडला. आता कुठलीही आक्रस्ताळी हालचाल जीवावरती बेतू शकत होती किंवा त्यांचा हल्ला ओढावून घ्यायला कारणीभूत ठरु शकत होती. गपगुमान एकमेकांची बॅग पकडून झुकझुक गाडि बनवली. त्यांच्याशी नजर न मिळवता मधला ५० फुटांचा पट्टा शब्दश: जीव मुठीत धरुन पार केला. त्यांच्या सरावल्या नजरांनाही आमच्या हातात खाण्यासारखं काही दिसलं नाही त्यामू्ळे त्यांनीही मग काही आडकाठी केली नाही. हे दिव्य पार करुन पुन्हा त्याच ढेकळांच्या घसरड्या वाटेवरुन तोल सावरत अखेर जटा मंदिर गाठलं. दुर्ग भांडारचा ट्रेक पूर्ण झाला होता. सगळे  जण या अनुभवाने "cloud 9" वरती पोहोचले होते.

परत येताना डोक्यात एकच विचार आला - ताजमहाल किंवा राजस्थानातले सुंदर राजवाडे बांधणे हे अर्थात फार मोठे व कलेच्या दृष्टिने अजोड आहे. मात्र त्याचवेळी सह्याद्रिच्या कातळकड्यातून अशी सर्वथा अजिंक्य वाटावी अशी जागा कोरुन काढणं जास्त कठीण आहे. त्या दोन्ही दरवाज्यांत घालावी लागणारी लोटांगणं हि त्या कारागिरांना, मजूरांना व ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली त्यालाच घातली असं मी अजूनही समजतोय. थोडक्यात किमान एकदा घ्यावा असा हा अनुभव आहे. 

 - सौरभ वैशंपायन.

Sunday, November 18, 2012

साहेब




रुद्राक्षाची माळ धरलेला ’तो’ हात उगारलेल्या बोटासकट वर झाला की मुंबई सारखं आंतराष्ट्रिय शहर दोन दिवस बंद व्हायचं. साधारण ८-९ वर्षांचा असेन, तेव्हा त्या घटानेचाचा अर्थ समजण्या इतका मोठही नव्हतो, पण मला इतपत स्वच्छ आठवतय की बाबरी पतन झाल्यावरती त्याबाबत जेव्हा सगळे खुसरपुसर करत बोलायचे, किंवा सोयीस्कर मौन घ्यायचे, तेव्हा शिवाजी पार्कवरती फक्त एकच आवाज जाहीरपणे घुमला होता "होय! आम्हीच पाडली बाबरी!". त्यामागचे तत्कालिन राजकिय, सामाजिक, धार्मिक संदर्भ व निवडणूकांतले फायदे तोटे यांच्या निकषांसकट असे जाहिर बोलणे देखिल फार जड होते. पण हेच जाहिरपणे सांगणारा दुसरा कोणी हरीचा लाल निघाला नाही हे देखिल तितकेच खरे.

खोटं कशाला बोला? ’राजकारण’ म्हणजे काय ह्याची बर्‍यापैकि जाणीव होईपर्यंत मी बाळासाहेब ठाकरे यांचा "भक्त" होतो, लहानपणी "सामना" या नावाखालती असलेले "बाळ ठाकरे" हे नाव, त्या भोवतीचं वलय, लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकणारी भाषणाची शैली हे सगळं माझ्याकरता अप्रुप होतं. पण मग वाढत्या वयानुसार शिंग फुटली शेकडो गोष्टि नव्याने पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या, समजून घेतल्या तशी राजकिय जाणीवांची व गरजांची क्षितीजं थोडी रुंदावली. आपोआप मी "भक्त" कॅटेगरीतून ’चाहता’ कॅटेगरीत आलो. त्यांची एखादि गोष्ट नाही पटली तर नाहि पटली हे सकारण सांगायचो. पण कॅटेगरी बदलली तरी त्यांच्याबद्दलचा आदर मात्र तोच होता, मी मनापासून चाहता नक्कीच होतो. माणूस दिलखुलास होता. आपली ताकद काय व कशात आहे ह्याची जाणीव असलेला नेता होता. ताकद असल्याने आपसूक एक बेदरकारपणा येतो तो देखिल भरपूर होता. बोलायला लागले कि भाषणं अनेकदा सभ्यपणाची पातळी ओलांडायचं. (त्यातून वाजपेयी - अडवाणी ऐकणार्‍यांना ते बोलणं अब्रह्मण्यम होतं. कदाचित संयुक्त महाराष्ट्रानंतरच्या पिढ्यांना अत्रे फारसे किंवा अजिबातच ऐकायला मिळाले नाहीत म्हणून असेल, पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र या भाषेनी दचकायला कधी पासून लागला?) पण अत्रे म्हणाले होते तसंच बाळासाहेबांनी "आयुष्यात सगळं केलं, फक्त ढोंग केलं नाही", (अर्थात राजकारणात याला अपवाद ठेवावा लागतोच.) जे काही आहे ते तोंडावरती. जे बोललो त्याची सगळी जबाबदारी घेऊन. "मला तसं बोलायचं नव्हतं" हे वाक्य नंतरची सारवासारव करावी लागते तेव्हा अनेकजण वापरतात, बाळासाहेबांवरती ही वेळ आल्याचं मला आठवत नाही.


एकच पक्ष, एकच नेता, एकच ठिकाण, एकच दिवस आणि थोडि थोडकी नव्हे तर तब्बल सलग साडेचार दशकं ... लाखो लोकं त्याच ओढीने लाखांच्या संख्येने जमत, जगात दुसरं उदाहरण असेल तर दाखवावं. तुम्ही अनेकांना थोडावेळ, कींवा थोड्यांना बराचवेळ मुर्ख बनवू शकता पण अनेकांना नेहमीच मुर्ख बनवू शकत नाही. त्या माणसात असं काहितरी नक्किच होतं की सामान्य माणूस रस्त्यावरती उतरायचा. त्या सामान्य माणसात पोट भरलेला पांढरपेशा उच्च मध्यम वर्गिय किंवा एकंदरच मध्यमवर्गिय किती हा प्रश्न अलाहिदा, तसा तर तो कुठल्याच पक्षाच्या पाठी नसतो. मुश्किलीने एखादि सभा गाजली तर ठीक होतं पण ४५-४६ वर्ष तुम्ही दारु प्यायला देऊन, पैसे वाटून लाखोंची गर्दि नाहि खेचू शकत हे कुणीही मान्य करेल. साहेबांवरती लोकांच अफाट प्रेम होतं. त्यांना हिंदुहृदयसम्राट वगैरे म्हंटलं की काही सो कॉल्ड उच्च शिक्षित आणि ओपन माइंडेड लोकं कुत्सित हसतात, पण ९३ च्या दंगलीत मुंबई २ दिवसात कुणी शांत केली? ६ दिवस मार खाणारा हिंदू नंतरच्या २ दिवसात कसा उसळला होता? शिवसेना भवनात झालेल्या मिटींग मध्ये "तुम्ही हातात बांगड्या भरल्यात का?" ह्या साहेबांच्या एकाच प्रश्नाचा तो परीणाम होता हे नाकारु शकत नाही हे देखिल तितकच खरं. आजही शिवसैनिक रस्त्यावरती तलवारी घेऊन उभे राहिले आणि आम्हांला सुरक्षित वाटलं, आमच्या घरची माणसं आता नीट घरी येतील याची खात्री पटली हे सांगणारी अनेक माणसं भेटतील. परवा १३ नोव्हेंबरला देखिल "बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक आहे" हे ऐकून वडापाव विकणार्‍यापासून ते बड्या धेंडांपर्यंत मातोश्रीवरती रीघ लागली. परत सांगतो दोघांची कारणं वेगळी असतीलही पण त्यामागे "ताकद" होती, मग ती प्रेमाची असेल कींवा राजकिय असेल.

अनेक जण विचारतीलही की काय केलं त्यांनी, की इतका पाठींबा देता? तर याचा अर्थ एकच त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीतले त्यांचे काम माहित नसावे, किंवा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावरती देखिल मराठी माणसाचे गुदमरलेपण ’मार्मिक’ च्या माध्यमातून कसं बाहेर आणलं. त्या मार्मिकच्या फटकार्‍यांनी अनेक जण विव्हळले होते हे त्यांच्या लक्षात नसेल. आज "मराठी" हा मुद्दा घेऊन आज दुसरे देखिल उभे राहिले आहेत पण अजूनही मराठी माणसाला मुंबईत कुणी हक्क दिला, त्याची अस्मिता कोणी जागृत केली? ह्या प्रश्नाचं उत्तर एकच "बाळ ठाकरे". दुसरी गोष्ट - प्रबोधनकारांचा वारसा असेलही पण सेनेत जात बघितली गेली नाही. बाकिच्या पक्षात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री बसावा व त्याबदल्यात दुसर्‍या जातीचा उपमुख्यमंत्री बसवून मांडवली करावी, असं शिवसेनेत कधी दिसलं नाही. मुळात शिवसेना - भाजपा सत्तेत आली ती बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचारामुळे. ९० सालच्या मंडल आयोगाला विरोध करुनही ९५ साली ते निवडून आले ह्यावरुन काय ते समजावं. सत्तेत न रहाता रीमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणे फार कमी लोकांना जमते, त्याची सुरुवातही बाळासाहेबांनीच केली म्हणा ना. म्हणजे मुख्यमंत्रीपदापेक्षा शिवसेनाप्रमुखपद मोठं होतं (अर्थात ही चांगली गोष्ट नाही हे माझेही मत आहे पण ती घडून गेलेली गोष्ट आहे जे आज नाकारता येत नाही.), हे बाळासाहेबच करु जाणे. मग ह्याला कोणी हुकूमशाही म्हणेल, कुणी झुंडशाही म्हणेल, कोणी आंधळा अनुययही म्हणेल, कुणाला तो पक्ष फक्त गुंडांचाही वाटतो, पण संपूर्ण मुंबई बंद करुन दाखवायची ताकद शिवसेनेत तेव्हढी होती हे देखिल तितकेच खरे. बरं ज्यांना विरोध व्हायचा त्या विरोधकांना ठाकरी भाषेचे सपकारे बसून देखिल विरोधक कधी दात-ओठ खाऊ बाळासाहेबांवरती तुटून पडले नाहीत उलट राजकारणाबाहेर सगळ्यांशीच त्यांचे संबध चांगलेच राहिले. पवार आणि मी बीअर प्यायला बसतो हे भर सभेत सांगणारे बाळासाहेबच.

शिवसेनेची कार्यपद्धती सगळ्यांहुन वेगळी होती. लहान लहान शाखांतून त्यांनी पक्षाची केलेल्या बांधणीने पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवले. अनेक चेहरे नसलेल्या लोकांना त्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार बनवले. कदाचित लोकांची नस त्यांनी ओळखली होती. घरात उदंड लेकरं असली की वेळ पडल्यास बाहेर घराची पडती बाजू सावरायला त्यात एखादं वांड पोरगं असावं म्हणतात. बाळासाहेबांची "शिवसेना" तशी होती. बाळासाहेबांची शिवसेना अश्या करता कारण साहेब स्वत: सगळं बघत होते तोवर आलबेल होतं. नंतर वयोमानाने किंवा इतर कारणांनी शिवसेनेच्या रोजच्या कामातून त्यांनी लक्ष कमी केलं त्यानंतर शिवसेनेतुन अनेक जण अनेक कारणांनी बाहेर पडले, कुठली कारणं कोण बाहेर पडलं ते इथे लिहित बसण्याचे प्रयोजन व वेळ नाही. खुद्द बाळासाहेबांना अखेर "या चिमण्यांनो परत फिरा रेऽ" म्हणावं लागलं होतं. पण बाहेर पडलेल्या लोकांतही भाषणांत साहेबांवरती पलटवार करण्याची धमक नव्हती. त्यामागे नवीन ’ठाकरी’ टोला येण्याची "भीती" तर होतीच पण बाळासाहेबांना उलट उत्तर देणं हे एकूण महाराष्ट्राच्याच कल्पनेबाहेरचं होतं. मात्र इथे एक कडवट गोष्ट मांडावी लागते आहे की सध्याच्या शिवसेनेचा ’दरारा’ संपलाय, कारण तो असता तर मुळातच CSTची दंगल करण्याची कुणाची छाती झालीच नसती. कींवा आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्यातील भाषणात साहेबांनाही "म्हातारी उडता नयेची तिजला..." चालीवरती आर्जवे करत "उद्धव - आदित्यला सांभाळा" हे सांगण्याची वेळ आली नसती. आयुष्यभर केवळ आदेश देणार्‍या साहेबांचे, ते काहितरी मागणारं चित्र न बघवणारं होतं इतकं शेवटी मी नमुद करु इच्छितो.


आज तरी दूर दूरपर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या इतका भक्कम नेता दिसत नाही. २०१४च्या निवडणूकांचे निकाल काय असतील ते माहीत नाही पण २०१४ च्या निकालांवरती १७ नोव्हेंबर २०१२ चा ठसा असणार आहे हे नक्की.

उद्याच्या महाराष्ट्रात बाळ ठाकरे नाहीत ही एकंदरच अस्वस्थ करणारी बाब आहे. ती राजकिय पातळीवरची जितकी आहे तितकी वैयक्तिक पातळीवरची देखिल आहे. आणि ही माझीच नाही तर करोडो मराठी माणसांची भावना आहे. आजकाल कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे गल्लीबोळातून भाऊ, भाई, दादा वगैरे उगवत आहेत. अधून मधून एखाद्या नावामागे साहेब देखिल लावले जाते, पण कुठलही नाव न घेता केवळ "साहेब" म्हंटलं की एकच नाव डोळ्यापुढे यायचं आणि येईल.

बाळासाहेबांसारखा माणूस गेल्यावरती राहुन राहुन दासबोधातला मृत्युनिरुपणाचा समास आठवतो -
"मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥
मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥
मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥१३॥

कारण आज हे पुन्हा लोकांना सांगावं लागतय असा माणूस गेलाय!

 - सौरभ वैशंपायन.