Monday, March 14, 2011

अनंत अमुची ध्येयासक्ती .....


शाळेत आंम्हाला कुसुमाग्रजांची "कोलंबसचे गर्वगीत" म्हणून एक कविता होती. त्यात खलाशी असलेला गर्वोन्मत्त कोलंबस "पदच्युत" आणि "पामर" असलेल्या समुद्राला कसा हिणवतो त्याचे रोमांचक वर्णन कुसुमाग्रजांनी केलय. ती कविता वाचल्यावर, त्यावेळचं बालमन सहाजिक आपणही समुद्रावर असंच राक्षसी लाटांशी झुंज घेत, नवं जग शोधावं अशी स्वप्न बघूही लागलं होतं. अनेकांना ही कविता तोंडपाठही असेल. पण परवा जपानमधल्या ८.९ रीश्टर स्केलच्या भूकंपाची व त्यामुळे आलेल्या त्सुनामीची बातमी आली आणि समुद्राला खिजवणार्‍या कवितेतल्या काही ओळी शब्दश: समुद्रानेच मानवावर उलटवल्या आहेत कि काय असं वाटायला लावणारी दृश्ये प्रत्यक्ष टिव्हीवरती बघायला मिळत होती -

"हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे 
विराट वादळ हेलकावु दे, पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे 

ताम्रसुरा प्राशुन मातु दे, दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता 
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता"



त्यानंतर जपानमध्ये गेले ३ दिवस जे काही चालू आहे ते खरोखर एखाद्या ताम्रासुराचे थैमान आहे. भुकंप - त्सुनामी हि संकटं कमी होती कि काय, पण आधीच अणुबॉम्ब पडुन त्याचे दुष्परीणाम भोगलेल्या जपानला आता भुकंपामुळे  नुकसान झालेल्या त्यांच्याच एका अणूभट्टितून होणार्‍याकिरणोत्सर्जनाचा धोका निर्माण झालाय.


काडि काडि करुन जमवलेले हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. माणूस किती क्षुल्लक असावा आणि विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने ह्यॅव केले त्यॅव केले म्हणून कितीही पाठ थोपटून घेतली तरी निसर्ग विरुध्द मानव हा लढा शेवटपर्यंत अगदि अस्साच असमान रहाणार आहे ह्याची जाणीव परत एकदा झाली. त्या त्सुनामीच्या भोवर्‍यात एक अख्खं मालवाहू जहाज केसेन्नुमा शहराच्या मध्यभागी नांगरल्यागत उभं राहिलं आणि त्या गर्वगीतातील -

"पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे, फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती
"

 या कडव्यांवरतीच एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं. 




जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात, जात्याच उद्यमशील असलेल्या स्वभावामुळे तो फिनिक्स पक्ष्याप्रमाणे परत झेप घेईलही, पण एका क्षणात काहि हजार जीव  - "कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती" या ओळिंसारखे संपले त्याचं काय??? तरी कदाचित त्यांच्याकडे वारंवार भूकंप होतात म्हणुन बांधलेली बहुतांशी घरे लाकडि असतात. मोठ्या इमारती भूकंपाचे तीव्र झटके सहन करु शकतील अश्या असतात. सध्या मी "एका दिशेचा शोध" हे पुस्तक वाचतोय, त्यात श्री संदिप वासलेकर म्हणतात ते खरे आहे - "एखाद्या मोठ्या भूकंपात किती लोकं मरतात हे त्या देशात राज्यकारभार व प्रशासन कसे चालते आणि लोकांची सामाजिक मुल्ये काय आहेत यावर जास्त अवलंबुन आहे. ज्या देशात राजकिय पुढारी व शासकिय अधिकारी गैरमार्गाने इमारत बांधण्यास परवानगी देतात, बांधकाम करणारे नफा कमावण्यासाठी कमी दर्जाचा माल वापरतात, सामानात भेसळ करतात अश्या देशात भूकंप झाल्यास हजारो नव्हे तर लाखो लोक मरतील" . जपानच्या नुकसानातुन आपण याही दृष्टिने धडा घ्यायला हवा असं मला वाटतं.


सध्यातरी प्रश्नांशिवाय काहिच नाहीये. गेल्याच दशकांत त्सुनामीचा एक तडाखा आपल्यालाही बसला होता. त्यातुन मोडलेले संसार परत उभे राहीले, काही अजून रहात आहेत. पुढे जाण्याचं नावच आयुष्य आहे. मरणात जग जगतं हे खोटं नाही. म्हणूनच कुसुमाग्रजांसारख्या शब्दप्रभूला मानवी जीवनाची क्षणभंगुरता माहीत असताना देखिल कोलंबसच्या तोंडुन समुद्राला हिणवण्याची इच्छा झाली असावी. -
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा, किनारा तुला पामराला!"




पण या कवितेबरोबर मला कुसुमाग्रजांचीच "कणा" कविता देखिल आठवते आहे विशेषत: दुर्दम्य मानवी स्वभाव दाखवणार्‍या त्याच्या शेवटच्या २ ओळी - 

"मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवुन फक्त "लढ" म्हणा!"


 - सौरभ वैशंपायन.

1 comment:

Seema Tillu said...

खूपच छान! निसर्गापुढे माणसाचे काही चालत नाही हेच खरे.तरी माणसाची झुंजत राहाण्याची प्रवृत्ती ही कौतुकास्पद आहे.अशा आपत्तींमध्ये किती मृत्यूमुखी (जनावरांसकट) पडतात, त्यावरून देशाची disaster management किती सक्षम आहे हे समजून येते हेही तितकेच खरे.जपानमध्ये एवढय़ा मोठया आपत्तीमध्ये लोक किती शांतपणे व शिस्तीत, कुठेही गोंधळ न होता काम करत होते ह्यावरून आपण धडा घ्यायला हवा. बाकी तुझा लेख छान झाला आहे.