Thursday, March 24, 2011

झिंग - Made In Asia, भाग अंतिम.





चीनच्या मांचुरिया भागावरुन रशिया व जपान यांच्यात १९०४ - ०५ मध्ये युध्द झाले. रशियाचा पराभव झाल्याने मांचुरीयाचा मोठा भाग जपानला मिळाला. या भागाचे महत्व असे की या भागातून दुसर्‍या महायुध्दात जपानला युध्दासाठी लागणारा कच्चा माल मिळत असे, तो मिळाला नसता तर जपानला एशिया – पॅसिफिक मध्ये ना जम बसवता आला असता ना पर्ल हार्बरवरती हल्ला करता आला असता. मांचुरिया आपल्या ताब्यात रहावा म्हणून जपानने तिथे आपले एक कळसूत्री बाहुले बसवले. याच प्रमाणे त्यांनी दक्षिण – पूर्व मंगोलियात देखील असेच एक कचकडे सरकार बसवले. १९११ मध्ये चीनमधली राजसत्ता उखडली गेली व प्रजासत्ताक आले. पण म्हणून जादूची कांडी फिरली नाही. जपान दुसर्‍या महायुध्दापर्यंत चीनला रेटा देतच होता. पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीचे खच्चीकरण करण्यासाठी दोस्तांनी पॅरीस करारात परस्पर चीनचा शांटुंग प्रांताचे जो जर्मनीच्या अधिपत्याखाली होता त्याचे पालकत्व जपानला बहाल केले. त्या विरुध्द आवाज उठवण्याऐवजी चीनी सरकारने त्याला मान्यता दिली. म्हणजे देश कोणाचा राज्य कोणाचे? व तो परस्पर दिला जातो कोणाला? झाल्या प्रकाराने जपान अजून शेफारले. १९३९ सालपर्यंत तर जपानने जबरदस्तीने चीनचा संपूर्ण पूर्व किनाराच जिंकून घेतला होता. हे सगळं सांगण्याचा उद्देश हा की जपानने पध्दतशीरपणे आपल्या व्यापारासाठी राजमार्ग आखलाच पण पुढे याच मार्गवरुन अफूची ये जा सुरु झाली.

जपानने या संपूर्ण भागात अफूची अमर्याद लागवड करुन घेतली. जपानने चीन्यांना केवळ वापरुन घेतले. कधी "युनिट ३७१" मधले आपले विकृत रासायनिक – जैविक प्रयोगांचे गिनिपिग म्हणून तर इतरवेळी अफूच्या शेतात राबणारे मजूर म्हणून. मांचुरियाचे रुपांतर तर केवळ अफूच्या शेतीमध्ये झाले होते. जपानमध्ये जो अफू पिकत असे त्याचे रुपांतर जपानची "मित्सुई" ही प्रसिध्द कंपनी हेरोईन मध्ये करत असे. मांचुरिया व कोरियातुन कमावलेल्या अफूच्या जोरावर २०व्या शतकाच्या सुरुवातीला जपान हा जगातला सर्वात जास्त अफू उत्पादन व विक्री करणारा देश बनला. मांचुरियातील जवळपास अर्धाधिक तरुण पिढी अफूच्या व्यसनाने घेरली गेली. १९३७ साली लिग ऑफ नेशन्सने जगभरातील बेकायदेशीर अफू उत्पादन व विक्रीला जपानला जबाबदार धरले, कारण जगातील एकुण अफु उत्पादनापैकी जवळपास ९०% उत्पादन एकटा जपान करत होता. युध्दकाळात तर जपानने या भागात अफू, हेरॉइन व मॉर्फिन अक्षरश: वाटले. मजुरांना त्यांनी इतके व्यसनाधीन केले की पैशा ऐवजी मजुरांना अंमली पदार्थच दिले जात. अगदी दहा वर्षांच्या मुलांनासुध्दा हेरॉईनच्या सिगारेट्स दिल्या जात. सुमारे ५ लाख नागरीक या व्यसनाने बाधित होते, म्हणजे सुमारे १/८ लोकं अधिकृतरित्या गर्दुल्ले म्हणून नोंदवले गेले. अनधिकृत लोकांची तर गणनाच नसावी.
  

६ सप्टेंबर १९४६, हाजिमे सातोमी युध्दोत्तर कबुलीजबाब देताना.
२००७ साली जपानच्या नॅशनल लायब्ररीत दुर्लक्षित झालेली जी कागदपत्रे उजेडात आली त्यात उघड झाले की नांजिंग भाग, जो जपानने तीन लाख चीन्यांची कत्तल करुन जिंकला व तिथे आपले बाहुले बसवले त्या भागातुन जो अफू पिकवला गेला त्याची किंमत युध्द काळातल्या जपानी बाहुले असलेल्या नांजिंग सरकारच्या एकूण बजेट इतकीच होती . त्यावेळचा अफूचा व्यापार करणारी कंपनी “हून जी शांग तांग” हीने ३०० लाख युआन किंमतीचा अफू विकला व नांजिंग प्रांतिय सरकारचे बजेट होते ३७० लाख युआन. ही कंपनी म्हणायला खाजगी होती जिला नांजिंगच्या कळसूत्री सरकारने लायसन्स दिले होते. अर्थात या कंपनीला असेच इतके घबाड मिळाले नव्हते. त्या कंपनीचा मालक “हाजिमे सातोमि” हा त्यावेळचा ओपिअम किंग होता व जपानी राजघराण्याशी त्याचे चांगले संबध होते. व या सगळ्या व्यवहारातुन मिळालेल्या प्रचंड पैशातला काही भाग हा थेट जपानचे पंतप्रधान ’टोजो’ यांना मिळायचा. दुसर्‍या महायुध्दानंतर, जे जपानी युध्द गुन्हेगार होते त्यापैकी मेजर जनरल र्‍यूकिची तानाका यांनी आपल्या कबुलीजबाबात सांगितले “दर २ महिन्यांनी लेफ्टनंट जनरल कियोनबू शियोझावा हे नांजिंगच्या वार्‍या करत व येताना सातोमि यांच्याकडून पैशांच डबोल आणत!” हे शिओझावा युध्दकाळातील जपानमधील चीनच्या बिजींग कार्यालयाचे ( Ko-a-in ) प्रमुख होते. टोजोंचे ते उजवे हात मानले जात.


सातोमी याखेरीज अनेक मोठ्या अधिकार्‍यांची बडदास्त ठेवत. अनेक बड्या राजकारण्यांशी त्यांचे हितसंबध होते. अगदि ’नोबुसुके किशी’ यांच्या बरोबर देखील. हे तेच किशी जे १९५६ व १९५८ मध्ये जपानचे लागोपाठ २ वेळा पंतप्रधान झाले. यांनी १९४२ च्या निवडणूकित सातोमी यांच्याकडून ५ लाख येनची मदत झाली होती. हा पैसा अर्थातच अफू च्या व्यवहारातून आला होता. १४ डिसेंबर २००६ साली आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भारत – जपानमधील आर्थिक मैत्रीची सुरुवात करणारे महान नेते वगैरे म्हणून या किशींचा गौरव केला होता. अर्थात त्यात खोटं काहीच नव्हतं. पण भारताबरोबरच्या आर्थिक सहकार्याची सुरुवात करणार्‍या माणसाचे स्वत:चे आर्थिक हितसंबध कोणाशी व कुठवर होते हे लक्षात यावे इतकेच.


सातोमी अर्थातच ह्यातला बराचसा पैसा जपानच्या इंपिरिअल सैन्यासाठी देत असे. मुळात सगळा व्यवहारच गुंतागुंतीचा होता. जपानने त्यांच्या सैन्याच्या खर्चासाठी खास चलन छापून घेतले – ग्युनप्यो(Gunpyo). स्थानिक लोकांना, म्हणजे चीन्यांना अफू विकत घ्यायची असेल तर त्यांना ती ग्युनप्योमध्ये खरेदी करावी लागे. पण हे ग्युनप्यो सरळ सरळ मिळत नसत. तर लोकांना त्यांची लिगल टेंडर विकावी लागत, व त्या हिशोबात त्यांना ग्युनप्यो मिळत. यामुळे ग्युनप्योची किंमत वाढत गेली. रशिया – जपानच्या युध्दाच्या वेळी बेहिशोबी ग्युनप्यो छापला गेल्याने ज्या ग्युनप्योला फारशी किंमत उरली नव्हती तिला अफूमुळे सुगीचेच दिवस आले. शिवाय ग्युनप्योच्या मागे लिहिले होते की ते जपानी येन मध्ये कधीही रुपांतरीत करता येतील. त्यामुळे त्याला महत्व होतेच. सातोमींनी १९४२ या एका वर्षातच आपल्या जवळील काही ग्युनप्योंचे येन मध्ये रुपांतर केले त्याची किंमत होती - १०० लाख येन. यावरुन एकूण युध्दकाळात अफूने जपानी सैन्याला किती मदत दिली, हे समजते. युध्द संपेपर्यंत तर मांचुरिया, पूर्व मंगोलिया, व सगळ्या चीनच्या किनारी भागात या ग्युनप्योंचा सुळसुळाट झाला. १५ ऑगस्ट १९४५ ला जपानने शरणागती दिल्यावरही जवळपास महिनाभर हॉंगकॉंग मध्ये त्याचा चलन म्हणून वापर होत होता. मग ब्रिटिशांनी त्यावर बंदी आणली. व ग्युनप्योंना हॉंगकॉंग डॉलरमध्ये परिवर्तीत करण्याचे आदेश दिले. पण जपानी सरकारने ६ सप्टेंबर रोजी आता या चलनाला काही मुल्य नाही असे जाहीर करताच एका रात्रीत त्यांचे रुपांतर कागदाच्या कपट्यात झाले. ह्या ग्युनप्योंची शेवटाची रंजक कथा अशी कि १९९३ साली हॉंगकॉंगने जपान सरकारवर केस दाखल केली की एका रात्रीत हे चलन बाद केल्याने आमचे झालेले नुकसान भरुन द्या. पण जपानने ग्युनपोंसाठी काही कायदे केले नव्हते, तसेच सॅन फ्रान्सिस्को करारन्वये आम्ही सगळी नुकसान भरपाई केली आहे असे सांगून हात वर केले. सॅन फ्रान्सिस्को करारावर अमेरीका – इंग्लंडसकट ४७ देशांनी सह्या केल्या असल्याने १९९९ साली ही फाईल बंद झाली.


१८ व्या व १९ व्या शतकांत युरोपात जी औद्योगिक क्रांती झाली त्यातल्या भांडवलाचा मोठा वाटा हा भारत व चीन मधल्या अफूने ब्रिटन व युरोपिय देशांना दिला होता. खुद्द अमेरिका व ब्रिटनमध्ये अफूवर बंदी होती पण याचा अर्थ ते दुसर्‍या देशांत पिकवून तिसर्‍या देशांना विकायचे नाही असा थोडिच होतो? दुसर्‍यांच्या पिढ्या बरबाद करायची व त्यावरुनच पैसा कमवायची खोड ब्रिटन – अमेरिकेने पहिल्यापासून जपली आहे. त्याचाच प्रत्यय आता येणार होता रशियाला. ठिकाण होतं "अफगाणिस्थान". साल होतं १९७३. शस्त्र होतं अफू.


 - सौरभ वैशंपायन.

5 comments:

गुरुनाथ said...

सौरभ, तु रेफ़्रंस म्हणुन काय वापरले आहेस ह्या लेखासाठी, पाशचात्य वाटते आहे, जपानी काही धुतल्या तांदळाचे नाहीतच म्हणा पण एक आहे तो अफ़ु चा पैसा हा जपान चे पंतप्रधान ह्यांना मिळत होता की सम्राटाला मिळत होता हे नक्की कर , कारण टोजो हे युद्ध्कालीन पंतप्रधान होते व सम्राट "हिरोहितो" हे होते टोजो नव्हे, ह्याचा उल्लेख तुला महानायक मधे सापडेल, टोजो जेव्हा नेताजींना डायट (जपानी संसद) च्या खास अधिवेषना ला घेऊन आले होते (जेव्हा नेताजी जगासमोर पाणबुडी प्रवासानंतर प्रकट झाले होते)तेव्हा त्या सभेवर खास म्हणजे पहीले नेताजी व दुसरे आलेले म्हणजे सम्राट हिरोहितो हे होते
दुसरे असे की जपान मधे ऐन महायुधात देखिल "रॉयलिस्ट", म्हणजे हिरोहितो समर्थक व शुद्ध "लष्कर समर्थक" म्हणजे तोजो समर्थक असे दोन तट होतेच जपानी लष्करात, युद्ध हारल्यावर बुडत्या नावेत बसायचे नाही ह्या राजकीय नियमाला अनुसरुन बरेच से "शुद्ध लष्करवादी" माफ़ीचे साक्षीदार झाले होते, त्याचाच परीपाक म्हणजे मित्रदेशांनी युद्धखोर म्हणुन तोजोंना फ़ासावर लटकवले होते व मॅकाआर्थर ची नांदी केली होती, सो मला थोडम कन्फ़्युजन आहे की हा पैसा सम्राटांना जात होता की तोजोंना जे पंतप्रधान होते?

Anonymous said...

Aphaganistan-Russia-Aphu, can you give a link for detailed history? Thank you in advanced

saurabh V said...

guru -

अरे संदर्भ म्हणून ढिगाने लिंक्स वापरल्या आहेत. पण हाजिमे सातोमीचा संदर्भ हा खुद्द २००७ साली "जपानच्या" नॅशनल लायब्ररीत दुर्लक्षित झालेली जी कागदपत्रे उजेडात आली त्यात उघड झाला आहे.

जपानी धुतल्या तांदळासारखे म्हणणे सोड मी तर म्हणेन जपान्यांपुढे हिटलर सुसभ्य म्हणावा लागेल. हिटलरने साधारण ६-७ लाख ज्यूंची कत्तल केली. जपानने याच्या तीनपट चीनी मारले व जगाने त्याकडे लक्षही दिले नाही. युनिट ३७१ ह्या सारखा विकृत प्रोजेक्ट कदाचित कुठला नसावा. गर्भार बायकांचे पोट जिवंतपणी फाडत साले.

तोजो कि हिरोहोटो ह्याबाबत म्हणशील तर पदांबाबत मी गोंधळ केला असेन. पण पैसा टोजोंना जात असे असे कागदपत्रे म्हणतात. मग पंतप्रधान असतील, राजे नाही. चेक करुन १-२ दिवसांत अपडेट करतो.

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

saurabh V said...

अनामिक,

रशिया - अफगाणिस्थान - अफू हा मोठा इतिहास आहे. त्यावर अर्ध लिहुनही झालय पण सध्या पूर्ण करायला वेळ नाहिये. पण लिहायला घेतलय पूर्ण होईल तेव्हा देइनच वाचायला. यामागे अनेक बहुविध आणि नाना कळा असलेल्या प्रचंड वेगवेगळ्या घटना आहेत. त्याचा परीपाक हा रशियाच्या पराभवात आहे. पण गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील बातम्यात रशिया - नाटो व अमेरीकेला ड्रग्स ट्रॅफिक अडवायला मदत करायचे ठरविल्याच्या बातम्या आल्या होत्या. चक्र असं फिरतं. :-)

Anonymous said...

चालेल, वेळ मिळेल तास पोस्ट करावा... तुझ्या शैलीत वाचायला जास्त मजा येईल. धन्यवाद.