Monday, March 21, 2011

झिंग - Made In Asia, भाग १


        धर्म ही अफूची गोळि आहे असे मार्क्स म्हणाला होता. ह्यात कितपत तथ्य आहे हा भाग निराळा, पण धर्म आणि अफू या दोन गोष्टि एकत्र आल्या की मात्र कधीही न उतरणारी झिंग चढते हे मात्र खरं आहे. त्या मदात मग आपण केलेली प्रत्येक गोष्ट ही योग्यच आहे, असं वाटायला लागतं आणि समोरच्यालाही तसंच वाटावं अशी जबरस्ती केली जाते. त्याविरोधात गेलात तर तुम्ही शत्रू ठरता व शत्रूला शिक्षा एकच – मृत्यु!


        अंमली पदार्थ व दडपशाही यांच नातं तसं जुनंच आहे. गेल्या ४० वर्षांत या धंद्यातील दडपशाहीची जागा थेट आंतरराष्ट्रिय दहशतवादाने घेतली आहे. मुळात अंमली पदार्थ, त्यांचे सेवन अथवा विक्री, त्यामध्ये घालवला अथवा कमावला जाणारा भरघोस पैसा, त्यामध्ये असणारे धोके, व एकदा त्यात अडकलं कि सहसा न मिळणारी परतीची वाट ह्याविषयी समाजात अनेक समज – गैरसमज आहेत. अंमली पदार्थांची स्वत:ची अशी एक धुंद आणि काळि दुनिया आहे. सामान्य माणूस त्यात कधी पडत नाही. पण ह्या अंमली पदार्थांच्या पैशावर जागतिक स्तरावरचा, आर्थिक व धार्मिक दहशतवाद कसा जन्मतो, वाढतो आणि फोफावतो हे समजलं कि आपणं या चक्रात कधीही भरडले जाऊ शकतो याची जाणीव होते. आपल्या आजुबाजुला घडणारे भीषण दहशतवादी हल्ले हे बर्‍याचदा अंमली पदार्थांच्या व्यापारातुन आलेल्या पैशाने कार्यान्वित होतात हे वास्तव, परिस्थिती अजुनच गडद करतं. आणि अंमली पदार्थ व दहशतवाद यांतलं नात किती अतुट आहे हे अधोरेखित करतं. यामागचं हादरवुन टाकणारं वास्तव हे आहे कि यामध्ये मोजक्या कुख्यात संघटना, किंवा पाच – पन्नास ड्रग माफिया नसतात तर ह्या सगळ्याला खतपाणी घालणार्‍यांमध्ये आर्थिक व लष्करी महासत्ता, गुप्तहेर संघटना, मोठे मोठे राजकिय पुढारी, अनेक मोठि घराणी, व धनाढ्य कंपन्या असतात.

अश्याच अंमली पदार्थांच्या हलाहलाची व दहशतवादाच्या भस्मासूराची ही खरीखुरी गोष्ट, पुराणातल्या सूर्याला ग्रासणार्‍या राहू – केतूच्या युतीपेक्षा पिडादायक व भयानक.

 ===============

१) मेड इन एशिया!

आनंदाचं झाड


           
अफू हा काही कालचा शोध नक्कीच नाही. गेली ४ हजार वर्ष माणूस या “आनंदाच्या झाडाबरोबर” राहतो आहे. उत्खननातुन मिळालेल्या पुराव्यांवरुन साधारण तीस हजार वर्षांपूर्वी ’निआन्डेर्थल’ मानवाला पहिल्यांदा अफूची ओळख झाली असावी असा अंदाज आहे. पण तरी पहिला विश्वासजन्य म्हणता येईल असा पुरावा साधारण ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वी सुमेरीअन संस्कृतीतुन मिळतो. सुमेर म्हणजे सध्याचा इराक आहे तो भाग. इथल्या मेसेपोटेमिआ इथे याची लागवड केली जात असे. त्याला “हुल गिल” असं म्हणत, म्हणजे “आनंदाच झाड”.  ’ओडिस्सी’ या काव्यात होमरने याचे गुण गाताना म्हंटले आहे कि “मद्यातून ज्यांनी ज्यांनी याचे सेवन केले त्यांतील एकालाही आपल्या नातेवाईकाच्या मृत्युबाबत वाईट वाटले नाही. त्यांच्या समोर आई – वडिलांचा मृत्यु झाल्यावरही त्यांच्या डोळ्यातून अश्रु आले नाहीत!”
          

रोमन संस्कृतीमध्ये सोम्नस हा निद्रेचा देव आहे, ग्रीक लोक यालाच हायप्नोस संबोधत, हे देव देखील अनेकदा अफूची झाडे हातात घेऊन उडत असताना दाखवतात. इजिप्त मध्ये देखील याची लागवड व्हायला सुरुवात झाली. अगदी मेल्यावर राजाच्या ममी शेजारी अफू ची बोंडे ठेवत असत. पुढे सिकंदराने जग जिंकायला ज्या प्रदेशातून आपला मोर्चा नेला तिथे तिथे अफू पसरत गेले. वेदना व शोक भावनांचा विसर पाडायला लावणारे असल्याने सिकंदराच्या सैन्याला याचा खचित उपयोग झाला असणार. सिकंदराबरोबर ते भारतापर्यंत पोहोचले. साधारण आठव्या शतकात अरबस्तानात ह्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. मुस्लिम धर्मात प्रेषितांनी दारु पिण्यास बंदी केल्याने हशिश अथवा अफू वापरुन त्यातून अरबांनी पळवाट काढली होती. याच दरम्यान चीनमध्ये देखील औषधात याचा वापर होऊ लागला.


             ग्रीक वैद्यांनी त्यावर अनेक प्रयोग करुन विष उतरवणे, डोकेदुखी, दमा, आवाजातील बिघाड, दृष्टीदोष, खोकला, रक्ताची उलटी, बहिरेपणा, लघवीशी संबधित आजार, ताप, अनेक स्त्रीरोग, यांवर अनेक औषधे शोधली होती. यासाठी ते कधी कधी पूर्ण झाडाचा उपयोग करीत तर कधी त्यातल्या विशिष्ट भागाचा उपयोग करत. अनेक वैद्यकीय प्रकारात अफूला “Hand Of God” म्हंटले आहे, हे किंचित अति वाटत असलं तरी असह्य दुखा: वरती जालीम उपाय होता हे मात्र खरं.  भारतात अफूला संस्कृत नाव होते “आफूकं” आणि “अहीफेन” अही म्हणजे साप व फेन म्हणजे फेस. विषावर याचा चांगला उतारा पडतो हे आयुर्वेदात सांगितले आहे. विविध आयुर्वेदिक ग्रंथात यावरती सखोल विवेचन केले आहे. पैकी “भाव प्रकाश” मध्ये “आफुकं शोषणं ग्राही श्लेष्मघ्नं वातपित्तलम ||”  असे वर्णन केले आहे. सुश्रुतानुसार व्रणातील आर्द्र भावाचा नाश करणे म्हणजे शोषण होय. अफूचा मुख्य उपयोग वेदना शमनार्थ असला तरी सूज उतरवणे व जखम सुकवणे यासाठी अफू मदत करत असावा. अफू वात वाढविणारा आहे हे श्लोकात सांगितलेच आहे. वाताच्या वाढण्याने जखमेत कोरडेपणा येतो. या खेरीज अफूला “ग्राही” असे देखील म्हंटले आहे म्हणजे मलातील द्रवाचे शोषण करणारा, थोडक्यात जुनाट अतिसारावर देखील अफू गुणकारी आहे.


            पंधराव्या शतकात मुघलांनी अफूच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. अकबराच्या काळात ह्याच्याकडे उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून बघितले जाई. गंगेच्या खोर्‍यात, बंगाल व पुढे अगदी आसामपर्यंत, तर या बाजूला माळवा प्रांतात याचे उत्पादन घेतले जाई. आजही भारतात मुख्यत: राजस्थान, माळव्यात व उत्तरप्रदेशात अफूची शेती होते. मात्र त्यावर कडक सरकारी निर्बंध आहेत. युनायटेड नेशन्सच्या १९६१ च्या व भारतीय अंमली पदार्थ विषयक १९८५ च्या कायद्या अंतर्गत अफू पिकवण्याचा परवाना मिळतो. हा अफू औषधी उपयोगांसाठी वापरतात. आपण जी खसखस वापरतो ती देखील अफूच्या झाडापासून मिळते.


 अफूच्या झाडाला थंड हवामान लागतं. मुळातच पाणी कमी लागत असल्याने रेताड जमिनीत देखील तरारुन पीक येतं. पहिल्या दोन महिन्यात याची काळजी घ्यावी लागते. साधारणत: पावसाळ्यात बी शेतात पसरवलं जातं. अफूच्या झाडाची पूर्ण वाढ व्हायला अदमासे चार महिने लागतात.  अफूचं झाड साधारण छाती इतकं वाढतं. ऐन हंगामात अफूचं शेत सुंदर लाल चुटूक फुलांनी बहरलं असतं. मग दोन आठवड्यांचा हंगाम संपल्यावर पाकळ्या गळून जातात, की मध्ये उरतं ते अफूचं बोंड. हे बोंड फिक्कट हिरव्या रंगाचं असतं. ते गडद हिरव्या रंगाच होतं व फुगून येतं. या बोंडाच्यावर एक छत्रीसारखा छोटा आकार असतो, त्याची टोके वरच्या बाजूला वळलेली दिसली की समजायचं - हे बोंड अफू काढायला तयार झालंय. त्याला धारदार सुरीने काळजीपूर्वक उभा छेद देतात, म्हणजे त्यातुन पांढर्‍या रंगाचा चीकासारखा घट्ट द्राव बाहेर पडतो. तो भांड्यात साठवायचा. हा द्राव गोळा करण्याचं काम साधारणत: पाऊस नसताना त्यातूनही दुपारच्यावेळी करतात. प्रत्येक बोंडातून साधारण चार – पाच वेळा हा द्राव निघतो. त्यानंतर ही बोंड कापून सुकवली जातात व त्यातून निघणार्‍या बिया पुढल्यावर्षीच्या लागवडीसाठी जपून ठेवल्या जातात. हे जमा केलेलं अफू मग काही दिवस सुकवण्याचं काम चालतं. अर्थात तो कडकडीत सुकवत नाहीत. घट्ट चिकटसर आणि चॉकलेटी रंगाचा अफू सर्वोत्तम समजला जातो. याच अफूवर प्रक्रिया करुन मॉर्फिन अथवा हेरॉइन बनवलं जातं. साधारण अफूच्या वजनाच्या १०% मॉर्फिन सहज मिळतं.


क्रमश:
 - सौरभ वैशंपायन.

===============
"झिंग - भाग २"

2 comments:

BinaryBandya™ said...

changali mahitee

saurabh V said...

& still Many more to come.

kramash: ahe :-)