दुसरं अफू युध्द.
हॅरी पार्कर्सने हॉंगकॉंगहुन नौदलाची कुमक मागवली. पण यावेळी ब्रिटिश एकटे आले नाहीत. त्यांना फ्रेंच येऊन मिळाले. फ्रेंचाचा राग कशावरुन होता तर त्यांचा एक फ्रेंच धर्मप्रसारक चीनी सरकारने हालहाल करुन मारला होता. परत सुमारे दोन वर्षे हुतूतू खेळल्यावर चीनने शरणागती पत्करुन १८५८ साली तिअनस्टिन चा करार केला. या करारानुसार ब्रिटिशांना १८५८ साली तर अफूच्या व्यापाराचा मुक्त परवानाच मिळाला. शिवाय पुढील कलमे नव्याने चिन्यांना मान्य करावी लागली – १) ब्रिटन, रशिया, फ्रान्स व अमेरीका यांना पेकिंग सकट चीनच्या वेगवेगळ्या शहरात वकिलाती उघडता येतील. २) न्य़ूझुआंग, दानश्यूई, हांकौ व नानजिंग सह १० नव्या बंदरात व्यापाराची सूट मिळावी. ३) यांगत्से नदीवर परदेशी व्यापारी जहाजांच्या वाहतूकीला मोकळीक मिळावी. ४) चीनच्या अंतर्गत भागात परदेशी लोकांना जाण्यास बंदी आहे ती उठवावी. ५) चीनने ब्रिटिश व फ्रेंचांना ताबडतोब प्रत्येकी वीस लाख चांदीचे टाएल्स (तत्कालिन नाणे) नुकसान भरपाई म्हणून द्यावेत.
ह्या विजयाचा आनंद तायपिंग बंडखोरांनाच जास्त झाला त्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी करायचा प्रयत्न चालू केला. पण ब्रिटिशांनी त्यांनाही टांगून ठेवले. तिअनस्टिनचा करार नुसता कागदावर उतरला होता पण त्याची शाई वाळण्यापूर्वीच चिन्यांनी नवा तंटा उभा केला. याच तहाला सरकारची अधिकृत मान्यता मिळावी म्हणून जे ब्रिटिश - फ्रेंच शिष्ट मंडळ पेकिंग जमलार्गाने येत होते त्यावर टाकूच्या किल्यातून तोफांचा भडिमार केला. तीन जहाजातील सुमारे सातशे ब्रिटिश व काही फ्रेंच यात खलास झाले. हे समजताच जपान - चीनचा कमिशनर म्हणून नेमलेल्या ब्रिटिश अधिकारी एल्गीनच्या (हा तोच लॉर्ड एल्गिन जो पुढे भारताचा व्हॉइसरी झाला) तळपायाची आग मस्तकात गेली १२ हजार ब्रिटिश व ६ हजार फ्रेंच, टाकूच्या किल्यावरती तुटुन पडले. टाकूचा किल्ला पडला. मांचू सेनेने परत तहाची बोलणी लावली. पण परत चिन्यांनी खंजीर खुपसला. तहाची बोलणी करायला गेलेल्या ब्रिटिश व शीख सैनिकांनाच अटक केली. एल्गीनच्या रागाचा भडका उडाला. त्याने थेट पेकिंगवरच चाल केली. ६ ऑक्टोबर १८६० ला ब्रिटिश – फ्रेंच सेना पेकिंग मध्ये घुसल्या. राजा जेहोलला पळून गेला. राजाचा राजवाडा त्यांनी ताब्यात घेतला. व अटक केलेल्या आपल्या माणसांना सोडवायला एल्गीन तुरुंगाकडे गेले – पण चिन्यांनी ब्रिटिश अधिकार्यांना व शीख सैन्याच्या तुकडीला हालहाल करुन मारले होते. एल्गीनच्या डोक्यात सूड उगवायचा विचार आला. १८ ऑक्टोबरला त्याने मांचू राजांचा भव्य दिव्य “यिहे युआन” व “युआन मिंग युआन” ज्यांना समर पॅलेस म्हणतात ते दोन्ही राजवाडे पेटवून दिले. शेकडो वर्षे दिमाखात उभा असलेले पण विलासी आणि नेभळट नेतृत्वाचे प्रतिक असलेले ते राजवाडे ढणाणा पेटले.
दुसरं अफू युध्द देखील ब्रिटनने जिंकलं होतं. आता वाढीव नुकसान भरपाई, अजून काही बंदरातून खुला व्यापार, धर्मप्रसाराला कायदेशीर मान्यता आणि अफूच्या व्यापाराला कायदेशीर मान्यता यावर नवीन अटिंसकट शेवटचा तह झाला. ब्रिटिश, फ्रेंच, व अमेरिका यांनी एकत्र येऊन चीनचे वस्त्रहरण केले.
ब्रिटन दोन दोन अफू युध्द जिंकले होते खरे, पण १८७३ मध्ये जी आर्थिक उलथापालथ झाली त्याचा फटका ब्रिटनला बसणे स्वाभाविक होते कारण जगभर त्यांच्या वसाहती पसरल्या होत्या. मग ह्याचा बोजा टाकायचा कोणावर? उत्तर सोप्पं होतं भारत आणि चीन. कवडीमोलावर काम करणारे मजूर भारतात होतेच. नुकतंच १८५७चं स्वातंत्र्यसमर व इंग्रजांच्या दृष्टीने ’बंड’ त्यांनी चिरडलं होतं. आता भारतीय त्यांचे ’गुलाम’ बनले होते. त्यांनी भारतातुन अफूचे अफाट पीक काढायला सुरुवात केली. त्यावेळी सुध्दा अनेक देशात अफूच्या विक्रीवर बंदी होती. पण ब्रिटनने त्यांचे ’गिर्हाइक’ ठरवले होते, “चीन!” पण चीन मध्येच याची लागवड केली तर?? लगोलग चीन मध्ये दणकून अफू पेरलं गेलं. मग काय भारत आणि चीन मधले अफू जगाच्या बाजारपेठेत विकायचे व बक्कळ पैसा कमवायचा सपाटा ब्रिटिशांनी लावला. पाठोपाठ डच, स्पॅनिश लोकांनीही आपले खिसे यात बेमालून जड करुन घेतले. भारतात अफूचा लिलाव व्हायचा तो कलकत्त्यात. त्यावेळचे अनेक गुजराती व पारशी देखील यात सामील होत. १६१९ साली डचांनी तर जकार्तामध्ये एक बंदरच ताब्यात घेतलं. १६४० मध्ये ते बंगालमधून अफू नेत व तो जकार्तामध्ये विकत. १६६० साली त्यांनी ६१७ किलो अफू तिथे नेला. हळू हळू मागणी इतकी वाढली की पुढल्या २५ वर्षांत त्यांनी किती अफू तिथे न्यावा? - तब्बल ७२,२८० किलो. डच व्यापारी शिपिंगचा खर्च भागवल्यावर सुध्दा ४०० पट नफा कमवत. आशियात त्यादरम्यान व्यापारी कारणांनी जी सागरी वाहतुक होई त्यात ३४% फक्त अफूसाठी वापरली जात होती.
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे …..
दोन अफू युध्द चीन हरला होता, पण चीनचे हाल इथे थांबणार नव्हते. चीनमध्ये अफूच्या बेसुमार लागवडीला खर्या अर्थाने हातभार लावला तो जपाननी. जपान व चीनमध्ये एकुण ११ युध्दं झाली. सुरुवात झाली ती कोरियाच्या स्वामित्वावरुन, १८७० साली. तैवान मधील कोळ्यांनी काही जपानी नाविकांना ठार मारले, जपानला तैवानवरती आक्रमण करायला कारणच मिळाले. त्यांनी तैवानमध्ये खोलवर घुसखोरी केली. चीनने तैवानच्या मदतीला धाव घेतली तसे लिऊ – चिऊ ही बेटं वगळता बाकी तैवान मधून जपानने माघार घेतली. मग चीनने देखील प्रकरण जास्त ताणले नाही. जपानने लिऊ – चिय़ बेटं पचवली, इथे जपानने चीनचे पाणी जोखले. मग आपला मोर्चा वळवला कोरियाकडे. १८७६ च्या फेब्रुवारी मध्ये जपानने कोरियावरती आक्रमण केले. व इतकी वर्ष चीनचे मांडलिक असलेल्या कोरियाशी करार करताना २ कलमे घातली – १) कोरिया हे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून जपानशी व्यवहार करेल. व २) कोरियाचा किनारा जपानला व्यापारासाठी खुला असेल.
मधल्या काळात कोरियात अंतर्गत बंडाळी माजली. चीनी सैन्याने येऊन ती बंडाळी मोडून काढली. मग चीन व जपानने एकत्र येऊन एक करार केला. त्या अंतर्गत कोरीयात दोघांपैकी कोणी काहीही हालचाल केली तर दुसर्या देशाला त्याची कल्पना दिली जाईल. मार्च १८९४ मध्ये पुन्हा कोरियात बंडाळी माजली. दोन्ही देशांनी आपापले सैन्य बंडाळी शमवायला पाठवले. चीनने केवळ १५०० व जपानने तब्बल ७०,०००. यानंतर जपानने कोरीयात जो तळ ठोकला तो ठोकलाच. इंग्लंड ने इथे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच जपानने त्यांना परस्पर उडवून लावले. अखेर १८९४ – ९५ मध्ये जे युध्द झाले त्यात जपानने चीनचा पराभव केला. झालेल्या तहात चीनवर जी कलमे घातली त्यातले एक कलम होते की चीनच्या सर्व व्यापारी बंदरातून जपानला जकातीशिवाय मालाची ने आण करता येईल. शिवाय चीनमध्ये जपानी व्यापारी ज्या वस्तू तयार करतील त्यावर कुठलाही अतिरीक्त कर असणार नाही.
क्रमश:
- सौरभ वैशंपायन.
===============
"झिंग - भाग अंतिम"
No comments:
Post a Comment