Friday, March 25, 2011

यहॉं के हम सिकंदर



मी ९० च्या दशकात जन्माला आलो या गोष्टिवर मी आज तुडुंब खुष आहे. कपिल पाजींना "लाईव्ह" वर्ल्डकप उचलताना पहाता आला नाही कारण त्यानंतरचा माझा जन्म. पण दस्तूरखुद्द सचिनला याची देही याची डोळा खेळताना बघणं हे कदाचित गेल्या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्मांमधील केलेल्या पुण्यांच फळ असावं. आणि इतकच नाही आज दिवाळिचा डबल बोनस मिळावा तसं पॉन्टिंगच पडलेलं थोबाड बघायला मिळालं. खर म्हणजे जर एक "उद्दामपणा" सोडला तर पंटर खेळाडू निश्चित मोठा. पण "जर - तर" च्या गोष्टि आहेत ह्या. सध्या बिचार्‍याच्या कुंडली मधले ग्रह, कुंडलीतली आपापली जागा सोडून दुसर्‍या आकाशगंगेत पिकनिकला गेल्यागत आयुष्य भरकटलय त्याचं. आधी अ‍ॅशेस मध्ये इंग्लंडने त्याच्या साम्राज्याला चूड लावून तशीही अ‍ॅशरांगोळि करायला सुरुवात केलीच होती. आणि आता या वर्ल्डकपमध्ये ना त्याला आजवर १०० करता आले होते, न ऑस्ट्रेलियाकडून कोणाचं शतक झालं होतं. आणि आज त्याचं शतक झालं तर ऑसीजचं गेले १२ वर्ष निरंकुश चाललेलं संस्थान आपल्या "युवराजाने" खालसा केलं. नाडि तुटलेल्या लेंग्याला एका हाताने सावरत लढल्यागत  त्याचं "मेरी झांसी नही दूंगा ..... मेरी झांसी नहीं दुंगा" चाललं होतं पण काही फायदा नाही झाला.

दुपारी आपली कचकून केलेलि बॉलिंग बघूनच फेसबुकवर बोंब मारली कि आज आपण जिंकणार (आधीच अश्या रिक्षा फिरवायचे मक्ते एकट्या पॉल ऑक्टोपसकडे नाहीयेत म्हंटलं!). अर्थात झालंही तसच. अश्विनने आपण टिममध्ये येऊन जागा केवळ उबवली नाही हे परत सिध्द केलं. शेवटि रैना सुध्दा श्रावणातल्या पावसागत रीप रीप करत का होईना पण योग्यवेळि ठिक ठाक बरसला. पण गंभीरने मधल्या ओव्हर्स मध्ये खरच गंभीर परीस्थिती निर्माण केली होती. आदल्या बॉलवरचीच घाई घाईने धाव घ्यायची चूक त्याने पुढल्याच बॉलला करावी?? अर्थात ऑसीज एकच चूक परत परत करत नाहित म्हणून अख्खं एक तप क्रिकेटवरती त्यांनी बेगुमान राज्य केलं, तर हि संधी गंभीरला बरे देतील? गंभीर आऊट झालाच. पंटर प्रमाणे आपल्या धोनीचे वैयक्तिक ग्रह सध्या नीचीचे असावेत कारण त्याला अजून मोठी खेळि करता आली नाहिये. झालच तर एक जाहिरात कमी करुन तो वेळ एखाद्या सवत्स गायीच्या पायांतून जाऊन किंवा काहितरी शेपटि पकडून कसल्याश्या ग्रह शांती करतात ते करुन बघावं, कदाचित फायदा होईल.

बाकि सचिन तेंडुलकर बाबत म्या पामराने काय बोलावं? १८ हज्जार धावा? कधी कधी वाटतं हा देव (मी त्याला माणूस म्हणणं सोडलय २००* झाल्यापासून) वेडा झालाय. अरे काय ताकद आहे त्याची???? असं असतं का कधी?? रजनिकांतही असं नाही करु शकत. पण त्याच्या १००व्या १०० ची आस मात्र नक्किच लागली आहे. "लगान" मध्ये गावकरी देखिल जितक्या उत्कंठापूर्वक पावसाची वाट बघत नाहीत त्याहुनही जास्त उत्सुकतेने तमाम सचिनप्रेमी त्याच्या त्या विक्रमाची वाट बघत आहेत. आज त्याने त्या दिशेने सुरुवात केलीही होती, अगदि थर्ड मॅनला एक कॅचही सुटला होता, मला लगोलग २००३ च्या वर्ल्डकपची आठवण आली बहुदा वसिम अक्रमच्या बॉलिंगवरती एक्स्ट्रा कव्हरवरती सचिनचा कॅच सुटला होता तेव्हा ९८ खेळून गेला होता सचिन. मला वाटलं कि परत समांतर इतिहास घडणार, पण हाय!! घात झाला .... परत निघालेल्या तेंडुलकरला अंपायरने परत बोलावले व नो - बॉलचा रीव्हू घेतला तेव्हा सारखे वाटत होते "नो बॉऽऽऽऽल हवा रेऽऽ" पण तेही झाले नाही. तो नो बॉल असता तर पॉन्टिंगने नक्किच रागाने स्वत:च्या डोक्यावरचे केस उपटून घेतले असते. असो .... आता बहुदा हि बिलामत पाकिस्तानवरती कोसळणार अशी स्वाभाविक अपेक्षा करुया (या रम्य कल्पनेनी सुध्दा माझ्या चेहर्‍यावर जन्मभराचा आसूरी आनंद ओथंबलाय).

असो, तर मदांध महाराजा पॉन्टिंग याचे संस्थान खालसा केले याबद्दल युवराजच्या नावाऽऽनं चांऽऽऽग भलंऽऽऽ

 - सौरभ वैशंपायन.

2 comments:

Anonymous said...

सौरभ,

<<<सचिनची बिलामत पाकिस्तानवरती कोसळणार अशी स्वाभाविक अपेक्षा करुया (या रम्य कल्पनेनी सुध्दा माझ्या चेहर्‍यावर जन्मभराचा आसूरी आनंद ओथंबलाय).
- आसूरी आनंद Very true me too...
I m waiting for his best ever play.
<<<मदांध महाराजा पॉन्टिंग याचे संस्थान खालसा केले याबद्दल युवराजच्या नावाऽऽनं चांऽऽऽग भलंऽऽऽ
-ओय बल्ले बल्ले...

---Priya.

BinaryBandya™ said...

बहुदा हि बिलामत पाकिस्तानवरती कोसळणार ...

हो हो नक्कीच कोसळणार ..